Thursday, August 19, 2010

इतिहासाचं अवघड ओझं

मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं होतं. अ‍ॅन फ्रॅंकची डायरी असो किंवा जी.ए. कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेलं ओल्गा ल्योगेलचं ‘रात्र वै-याची आहे’ असो, जर्मनीतल्या छळछावण्यांतल्या यातनांचं डॉक्युमेंटेशन आपणांस भेटतं – अंगावर काटा आणतं.


व्हिक्टर फ्रॅंकेलचं ‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’ हे माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आयुष्यात कोसळून जाण्याचे जेव्हा जेव्हा क्षण आले - तेव्हा तेव्हा या पुस्तकानं मला सावरलं. जगण्याचा अन्वय लावत, ‘अर्थ’ शोधणा-या डॉ. फ्रॅंकेलनं मला प्रत्येक ठेचेसमोर मोठी रेष काढायला ऊर्जा दिली. डॉ. फ्रॅंकेलं हे नावाजलेले मानसोपचारतज्ञ – त्यांची नाझी छळछावणीत रवानगी झाली. त्या क्षणापासून ते शेवटी युद्धाच्या टोकाला काही छळछावण्यांत माणसं अन्नाच्या अभावानं एकमेकांना खाऊ लागली या टोकाच्या वास्तवापर्यंत प्रत्येक क्षणाला डॉ. फ्रॅंकेल यांनी नोंदवलं आहे. ‘माणूसपण’ मारून टाकण्याच्या प्रत्येक नाझी-प्रयत्नाला त्यांनी आपलं ‘अर्थ’ शोधणारं मन कसं जिवंत ठेवलं याची नोंद म्हणजे ‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’.



‘हॉलोकास्ट’मध्ये फक्त ज्यू नव्हे तर ज्यांना ‘जिप्सी’ म्हणून ओळखलं जातं ते रोमान, कॅथलिक, गे, लेस्बियन अशा जवळ जवळ अकरा दक्षलक्ष व्यक्तींचं शिरकाण करण्यात आलं. लहान मुलं, स्त्रिया, पुरूष, अपंग, आजारी – कोणाला म्हणजे कोणालाही यातून निसटता आलं नाही. आऊशवित्झ आणि दखाऊच्या छावण्यांत दाखल झालेल्या सुरूवातीच्या ज्यूंना आपल्याला मारून टाकणार आहेत याची तर कल्पनादेखील नव्हती. स्पिलबर्गचा ‘शिंडलर्स लिस्ट’ किंवा त्याहून अंगावर काटा आणणारा अलॉं रेनेचा ‘नाईट अ‍ॅण्ड फॉग’ पाहिल्यावर या क्रौर्याच्या अमानवी मिती डोळ्यांसमोर येतात. अ‍ॅडॉल्फ हिटलर नावाचा क्रूर माणूस या सा-या हत्याकांडाच्या पाठीमागे होता – ‘माणूस’ म्हणून त्याची गणती तरी कशी करायची? असा प्रश्न पडतो. काय करायचं अशा वांशिक विद्वेषानं भरलेल्या इतिहासाचं? काय शिकणार आपण त्यातून?


१९७६ मध्ये अमेरिकेतल्या बॉस्टनमध्ये दोन शाळाशिक्षकांनी यातून येणा-या पिढ्यांना नवीन धडा शिकवायचा असं ठरवलं आणि त्यातून जवळ जवळ एकोणीस लाख विद्यार्थ्यांना ‘माणूसपणा’ची ओळख करून देणा-या ‘फेसिंग हिस्ट्री अ‍ॅण्ड अवरसेल्व्हज’ या कोर्सची निर्मिती झाली. त्या दोन शाळा-शिक्षकांपैकी एक जण होती मार्गो स्टर्न स्टॉर्म. ती अजूनही या नॉनप्रॉफिट संस्थेची कार्यकारी संचालक आहे. हॉलोकास्टच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना वंशवाद, वांशिक हत्याकांड, हिंसा याबद्दल जागरूक करायचं हे त्यांचं ध्येय आहे. जागं करणारा ज्ञानाचा क्षण कसं परिवर्तन घडवून आणू शकतो हे पाहायचं तर ‘फेसिंग हिस्टरी…’च्या प्रकल्पाकडे पाहावं लागतं. काय आहे हा प्रकल्प?



‘इतिहासाला आणि स्वत:ला सामोरं जाताना’ हे या प्रकल्पाचं नाव आहे. त्याच्या केंद्रस्थानी आहे त्यांचं एक हॅण्डबुक. हॉलोकास्टमध्ये जे घडलं ते घडण्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती, इतिहास, जातीय विद्वेषाची कारणं या सा-या इतिहासासकट मुलांच्या शिक्षणाला सुरूवात होते. पण फक्त इतिहास शिकणे या टप्प्यावर हा प्रकल्प थांबत नाही. तर एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो अशा वातावरणात? असा प्रश्नही विचारला जातो. आपली अस्मिता कशी बनते? आपण जे आपल्यासारखे नाहीत त्यांचा द्वेष का करतो? या द्वेषाची पाळंमुळं आपल्या अस्मितेशी निगडित भयामध्ये कशी असतात? हॅण्डबुकच्या प्रत्येक पानावर वाचणा-या विद्यार्थ्यांला त्या इतिहासाशी आणि त्या इतिहासातून वर्तमानाशी कसं जोडायचं? याचे धडे मार्गोनं आणि त्यांच्या टीमनं तयार केले आहेत.



मी याचं प्रात्यक्षिक पाहायला गेले न्यू यॉर्कच्या ‘फेसिंग हिस्टरी’च्या शाळेत. वर्ग चालू होता. वर्गशिक्षिकेनं मला आत बसायची परवानगी दिली. सातवी-आठवीतली मुलं वंशवादाला प्रश्न करत होती. एक विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणाला, “सगळे स्कूल टिचर्स डिमोक्रॅट्संना का मत देतात?” मग रिपब्लिकन-डिमोक्रॅट यांच्या वेगवेगळ्या धोरणांवर मुलं बोलायला लागली. धडा चालू होता जर्मन राजकीय पक्षांबद्दल. पण मग चर्चा अमेरिकेपर्यंत आलीच ओघानं. दोन देशांतल्या पक्षीय राजकारणाच्या तुलनेपासून ते अमेरिकन वंशवादापर्यंत अनेक विषयांवर त्या मुलांचा गट तावतावानं बोलत होता. सारे विद्यार्थी न्यू यॉर्कच्या ‘इनरसिटी’ म्हणजे शहरातल्या श्रमिक वस्तीतले होते. दुस-या साहित्याच्या वर्गात नववीचा वर्ग शेक्सपीयरच्या ‘ऑथेल्लो’वर चर्चा करत होता. ते नाटक बसवणार होते आणि त्या वर्गात ऑथेल्लोच्या ‘मूर’ अस्मितेवर विद्यार्थी वाद घालत होते.



तिस-या तासाला, मी मुद्दामहून सायन्स क्लासमध्ये गेले. जीवशास्त्राचे बेसिक धडे, डीएनए- गुणसूत्रे शिकताना – सायन्स टिचरनं ‘युजेनिक्स आणि त्याचा हॉलोकास्टमधला वापर’ यावर छोटं प्रेझेंटेशन दिलं. मुलांनी शास्त्राची नाळ समाजापर्यंत कशी जोडली जाते यावर वर्गात चर्चा केली.



हिटलरला वेडा, राक्षस, अतिरेकी, अघोरी माणूस असं संबोधलं, की नाझी अत्याचार समजून घेता येत नाही. पण त्यानंही ‘माणूस’ म्हणूनच हे शिरकाण केलं हे तपासायचं ठरवलं, की माणूसपणाच्या आणि प्रतिकाराच्या शक्यता तपासता येतात. ज्या प्रत्येकानं हिटलरचे आदेश पाळण्यापासून ते त्याला निमूटपणे समर्थन देण्यापर्यंत भूमिका निभावल्या, त्या प्रत्येक भूमिकेची चिरफाड मुलं करु शकत होती. हॉलोकास्टचा अनभुव केंद्रस्थानी ठेवून त्यातून काय शिकायचं? काय बदलायचं? कसं बदलायचं? अस्मितेच्या राजकारणाचे तोटे का होतात? या सा-या सामाजिक/राजकीय प्रश्नांना आठवी-नववीतली मुलं सामोरी जात होती. इतर अभ्यासक्रम होताच, परंतु त्या सर्व अभ्यासक्रमाकडे बघताना – परत कधीही हॉलोकास्ट होऊ द्यायचं नसेल तर नागरिकांची भावी पिढी कशी घडवायला हवी याचं भान शिक्षकांकडे होतं.



अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या इतिहासाच्या शिक्षकांसाठी ‘फेसिंग हिस्टरी...’ शिबिर घेते. रवांडा या देशात हुतु आणि तुत्सी जमातींत दंगे होऊन त्याचं पर्यवसान वंशविच्छेदात झालं. पण त्यानंतर रवांडातल्या शाळांना प्रश्न पडला, की इथं ‘इतिहास’ कसा शिकवायचा ? तेव्हा ‘फेसिंग हिस्टरी...’ ला पाचारण करण्यात आलं. वांशिक दंगलीनंतरच्या रवांडात ‘फेसिंग हिस्टरी’नं त्या वांशिक दंग्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळेचे अभ्यासक्रम आखले. मुलांना जबाबदारीचं, माणूसपणाचं भान देत ते शिकवले. तुम्ही ‘फेसिंग हिस्टरी’च्या वेबसाईटवर गेलात तर जगभरातल्या घडामोडींवर तिथं शिक्षकांना – विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असं अभ्यासपूर्ण मटेरिअल भेटतं. ‘२६/११ नंतर मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यांना कसं समजून घ्यायचं?’ हे शिकवणारा धडाही ‘फेसिंग हिस्टरी’च्या वेबसाईटवर आला होता. आपल्याकडच्या शाळांतूनही असे प्रकल्प राबवायला हवेत असं मनात नेहमीच वाटतं.



इतिहासाकडे सत्तेचं/घडामोडीचं डॉक्युमेंटेशन असं केवळ न बघता – शास्त्रीय ते सामाजिक सर्वच परिवर्तनात घेतलेल्या निवडींचा, निर्णयांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवण्याची ‘फेसिंग हिस्टरी’ची पद्धत अत्यंत लक्षणीय आहे.



भारतातल्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना काय होईल आपण फाळणीचा इतिहास नीट उलगडून दाखवला तर! जर त्यांनी दीपा मेहतांचा ‘अर्थ’ किंवा ‘ट्रेन टु पाकिस्तान’ पाहिला, गांधीजींच्या नौखालीतल्या दैनंदिनीतली काही पानं वाचली, मुंबईतल्या मोहल्ल्यांची निर्मिती समजून घेतली आणि आपल्याला टोचणा-या निरगाठी न सुटलेल्या इतिहासाकडे बघितलं तर आपण अधिक खुल्या मनाचे नागरिक नाही का तयार करू शकणार? टोबा टेकसिंग बघून नववीतले विद्यार्थी भारतीय जातीयवादाकडं नव्या नजरेनं बघतीलच की नाही ? की जाऊन नंतर दंगलीत दगड मारतील?



खूप वर्षांपासून एक प्रकल्प माझ्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या एकोणिसशेबहात्तरच्या दुष्काळाचं डॉक्युमेंटेशन करून, त्यातून महाराष्ट्रातल्या जातीयतेबद्दल विद्यार्थ्यांशी नीट खुलेपणानं बोलायचं, असा. त्यात बहात्तरमध्ये मुंबई माटुंगा लेबर कॅम्प, गोवंडीत माणसं कुठून आली? यावर एक धडा असेल. डॉ. मुकुंदराव घारे, डॉ. तात्याराव लहाने यांसारख्यांसोबतचे संवाद, युक्रांदमधल्या कार्यकर्त्यांचं लेखन, कॉम्रेड प्रभाकर संझगिरींच्या घरी पाहिलेले दुष्काळाचे फोटो, मिशन-यांचं महाराष्ट्रातलं बहात्तरचं काम- हे सारं विद्यार्थी बघतील , शिकतील. या काळाचा अभ्यास करताना बहात्तरच्या दुष्काळानं महाराष्ट्रातली कार्यकर्त्यांची फळी घडवली हे लक्षात येतं. आधुनिक महाराष्ट्राच्या पाठीशी बहात्तरचा हा दुष्काळ उभा आहे. यातून माणसं घडली, चळवळी उभ्या राहिल्या, गावागावातली जातीयता उघड झाली. आपले विद्यार्थी कुठलं परदेशी मर्टन, पार्सन्सचं समाजशास्त्र शिकतात? का नाही आपण निर्माण करू शकत या दुष्काळासोबत एक समाजशास्त्रीय अभ्यासक्रम? महाराष्ट्राचं एक देशी समाजशास्त्राचं पुस्तक नाही का तयार करता येणार आपल्याला? इतिहासाकडून फक्त भडकावणारा, अर्धवट ज्ञानावर आधारलेला भाषावाद स्वीकारून छोट्या युवराजांना शरण जायचं की इतिहास घडवण्याची आपली जबाबदारी ओळखून मानवी मूल्यांना जपण्याची इच्छा बाळगायची? यावर करू दे ना विद्यार्थ्यांना विचार! नव्यानं जग बघणाऱ्या

विद्यार्थ्यांना बहात्तरचा दुष्काळ जे शिकवेल, ते या भूमीत रुजलेलं शिक्षण असेल ना ?


हॉलोकास्टकडून, गुजरातच्या दंगलीकडून, बहात्तरच्या दुष्काळाकडून, फाळणीकडून शिकण्यासारखं अगाध आहे. आपल्या समाजाबद्दल, तसंच आपल्या स्वत:च्या धारणांबद्दलही. ‘फेसिंग हिस्टरी’च्या प्रकल्पानं हे सारं कसं शिकवता येईल याचं एक मॉडेल बनवलंय. याचं कलम मराठी भूमीत व्हायला हवं. मग इतिहासाचं ओझं कशाला अवघड वाटेल?

Friday, August 13, 2010

जात : परदेशस्थ

परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता माणूस कुठल्या परदेशात का गेला? याचं तर्कशास्त्र आपण शोधून काढू शकतो.

कॅलिफोर्नियामध्ये जंगलं तोडून राहणेबल जागा बनवण्यासाठी सरदारजींना मोठ्या प्रमाणात नेण्यात आलं होतं. एकोणिसाव्या शतकात, कष्ट करणा-या रोबस्ट माणसांना इंग्रजांनी जंगलतोडीच्या कामावर अक्षरश: विकलं. फक्त पंजाबी पुरूषांना नेल्यामुळं अर्थात त्यांनी तिथल्या बायकांशी लग्नं केली. त्या स्त्रियाही कष्टकरी वर्गातल्या हिस्पॅनिक्स होत्या. मेक्सिकोतून आलेल्या त्या लॅटिन अमेरिकन स्त्रिया आणि सरदारजी यांनी मग ‘कॅलिफोर्निया’मध्ये आपली नवी कुटुंबं वसवली. या ‘मेक्सिडूं’चा ( मेक्सिकन+हिंदू) अभ्यास करणारा एकजण मला जेव्हा भेटला तेव्हा ‘हिंदू’ म्हणून सामावलेले सरदारजी आणि लॅटिन अमेरिकन स्त्रिया यांचं स्थलांतरानं लादलेलं साहचर्य आणि त्यातून उलगडणारी NRI अस्मितेची एक घडी नजरेसमोर आली.

युगांडातून इदी अमीनच्या राजवटीत परागंदा झालेले ‘मिसिसिपी मसाला’ पटेल, अमेरिकेनं व्हिसा डॉक्टर्स, इंजिनीयर्सना साठच्या दशकात खुला केल्यावर पहिल्या फळीतले अमेरिकावासी प्रोफेशनल, Y2K च्या जमान्यात H1 च्या जोरावर लोंढ्यानं अमेरिकेत आलेले आयटीवाले किंवा पश्चिम आशियात पैसे कमावायला गेलेल्या NRIची अमेरिकेत शिकणारी अंडरग्रॅज्युएट पिढी. अमेरिकन NRI म्हटलं, की हे सारे समूह झरझर नजरेसमोर येतात. जगभरच्या भारतीय वंशाच्या NRIबद्दल समान पद्धतीनं लसावि काढून बोलणं योग्य नाही. मात्र
‘मौजे अमेरिकेतले NRI’ हा गट अभ्यासण्याजोगा आहे. अनिल अवचटांनी एकेकाळी केला तसा डिसमिस करण्याजोगा निश्चितच नाही.

साठच्या दशकात, ६८-६९ मध्ये जेव्हा अमेरिकेनं डॉक्टर्स आणि इंजिनीयर्ससाठी व्हिसा खुला केला तेव्हा अनेक प्रोफेशनल्स, आयआयटीयन्स अमेरिकेत गेले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर त्या अगोदर डॉ. केतकर, डॉ. आनंदीबाई जोशी किंवा मराठी नसूनही मराठी माणसाच्या स्मृतीत घट्ट रूतून बसलेले १८८५ सालच्या जागतिक धर्म परिषदेस गेलेले विवेकानंद ही काही उदाहरणं नजरेसमोर येतात.

माझ्या थिसिससाठी डॉ. केतकरांच्या भाषाविषयक विचारांचा विचार करत असताना त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्याबाबतही माहिती हाती येत गेली. पैसे नसल्यामुळे बटाट्याच्या शेतात काम करून दिवसाला दोन डॉलर्स कमावून काढलेले कष्टाचे दिवस किंवा कॉर्नेल विद्यापीठात असताना कडाक्याच्या अपस्टेट न्यू यॉर्कच्या मरणाच्या थंडीत हीटिंग उपलब्ध असलेल्या सिनेमागृहात काढलेले तासन‍्तास याबद्दल समजलं. त्या काळात अमेरिकेत अनेक हुन्नरी लोकांनी छलांग मारली. डॉ. केतकर मात्र त्यांच्या ध्येयानं प्रेरित होऊन अमेरिकेत आले होते. भारतात परत येताना जहाजावर त्यांची डॉ. अचिंत्य लक्ष्मीपती यांच्याशी गाठ पडली ‘भाषिक राज्याच्या’ कल्पनेवर त्या दोघांचंही एकमत झालं अशा नोंदी आहेत.

प्रत्येक स्थलांतरित, विस्थापित किंवा सेटल झालेला समाज आपल्या अनुभव, स्मृती आणि सत्तेची समीकरणं यांतून उतरंडीची एक रचना मनातल्या मनात निर्माण करतो. मी या ‘सत्ताकेंद्री’ रचनेला नवी वर्गव्यवस्था न मानता भारतीय गुणदोषांसकट वर्गव्यवस्थेबरोबरच रेप्लिकेट होणारी जातिव्यवस्था म्हणून बघते. उदाहरणार्थ, सत्तरच्या दशकात आलेल्या पिट्सबर्गच्या वेंकट अंकलना नव्वदच्या दशकात आलेल्या H1 आयटीवाल्यांचा नॉशिया येतो. त्यांची ABD म्हणजे अमेरिकेत जन्माला आलेली ‘देशी’ मुलं आता ३०-४० च्या वयोगटात आहेत तो भारतीयांचा एक ‘जातसमूह’ आहे. डॉ केतकरांनी वर्णन केल्याप्रमाणं या ‘प्रोफेशनल आद्य सिटिझन’ जातसमूहात लग्नसंबंध जुळतात आणि त्यांचे विचार/स्वयंपाकाबद्दलची बायकांची मते इत्यादी गोष्टींत साम्य आढळतं. H1 व्हिसावरचा ‘गुलटी’ म्हणजे आंध्रप्रदेशातला इंजिनीयर मुलगा आणि या आद्य सिटिझन समुहातला - ज्याचे आईवडील आंध्रातून आले यांचा ABD मुलगा यांच्यात जमीनअस्मानाचं अंतर असतं. मात्र तेलगू ABD आणि गुजराथी ABD आनंदानं नांदू शकतील इतका सारखेपणा दुस-या पिढीत दिसून येतो. भारतीय भाषा/राज्य यांच्या मावळणा-या प्रभावाच्या छायेत ही दुसरी पिढी वाढलेली असते. ती अधिक मनापासून अमेरिकन असते.

या आद्य सिटिझन समूहानं अमेरिकेत आल्यावर ‘अमेरिकन’ व्हायचा प्रयत्न मनोमन केला. यांच्या अम्मांनी इकडं पहिल्यांदा ट्राऊझर्स घालून इंग्रजी बोलण्याचा सराव केला. काही उच्चशिक्षित आंटी इथं ग्रंथपाल किंवा तत्सम सरकारी नोक-यांत लागल्या. न्यूजर्सीत ‘न्यूवर्क’मधल्या डॉट-बस्टर्सच्या गुंडगिरीचा दुर्दैवी अनुभवही यांतल्या काही मंडळींनी घेतला. व्हाया ब्रिटन अमेरिकेत आलेल्या पटेलांनी एडिसन, क्वीन्स मध्ये ‘लिटल इंडिया’ स्थापन केलं. तिथं या आद्य समूहानं आपली नाळ जोडली.

मात्र नंतरचे H1 वर आलेले दुस-या फळीतले सिटिझन्स... यांचा समूह अमेरिकेतही वेचून वेगळा काढता येतो. हार्वर्डची कायदाविषयाची प्राध्यपिका माझी मैत्रिण राकेल H1 कायद्याच्या निर्मितीसाठी ज्या कमिटीनं कायदेशीर बाबींवर संशोधन केलं त्याचा भाग होती. आफ्रिकेतून गुलाम आणताना वापरलेले स्लेव्हरीचे कायदे आणि H1 व्हिसाचे कायदे यांमधली साम्यस्थळं याबद्दलचं राकेलचं विवेचन ऐकून माझे डोळे अक्षरश: पाणावले!

H1 व्हिसावर आलेल्या व्यक्तींना अमेरिकेत कायमस्वरुपी शांततेनं राहता येणं... यासाठी सिटिझनशिपचा मार्ग दुस्तर करून त्यांचं खच्चीकरण कसं करायचं? हे पॉलिसीपातळीवर H1च्या धोरणातच ठरवलेलं आहे. तिशीत अमेरिकेत गेलेल्या आणि वयाच्या चाळिशीतच ‘म्हाता-या’ दिसणा-या H1 वाल्यांनी किती सोसलंय हे त्यांची कुटुंबं जाणतात. शिवाय, सुरूवातीला परदेशस्थ नातलगांबाबत असूया आणि नंतर तुच्छता दाखवणं हे भारतीय कुटुंबांत सर्रास पाहायला मिळतं, पण हे सुपर अफ्लुअंट लोकांचं विस्थापन पैसे वजा जाता दुष्काळात मराठवाड्यातून पुण्यात झालेल्या विस्थापनापेक्षा फारस सुसह्य नसतं. गणितात जशी ‘मॉड-व्हॅल्यू’ बघतात तशी ‘मॉड-व्हॅल्यू’ घेतली तर H1 वाल्यांचं आयुष्य पहिली दहा वर्षं प्रचंड खडतर असतं. परतायला ‘डोंबिवलीतल्या दोन खोल्या’ हे वास्तव त्याहून खडतर म्हणून कित्येकांनी अमेरिकेत खस्ता खाल्ल्या आणि ‘मारुतीच्या बेंबी’त नावाच्या नाटकाचा दुसरा अंक रंगवला.

आद्य सिटिझन्स आपल्या मुलांची आयव्ही लीगची कर्जं किंवा त्यांची मल्टिकल्चरल लग्नं यांमध्ये गुंतून होते तेव्हा नव्या दमाचे H1 वाले कॅलिफोर्नियात ' सर्वणा ’मध्ये जेवत, कन्सल्टंटच्या चक्रात ग्रीनकार्ड कधी /कसं / केव्हा होईल या चिंतेत होते. H4 म्हणजे H1 या व्हिसावर येणा-या व्यक्तीचा लग्नाचा जोडीदार. त्यांना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे, भारतातून अमेरिकेच्या ओढीनं आलेल्या मुलींची झालेली घुसमट हा या जातीय रचनेचा दुसरा पैलू. यातून काही समुहात वाढणारा हिंसाचार किंवा मानसिक त्रास हा वेगळ्या लेखाचा विषय.


यामध्ये विद्यार्थी म्हणून आलेल्या आणि नंतर परत न गेलेल्यांचा गट वेगळा. या गटाला सामान्य H1 पेक्षा आपण ‘थोर’ आहोत, अमेरिकन संस्कृती अधिक जाणणारे आहोत असं वाटत असतं. ‘कॅम्पस’वर राहिल्यामुळे कोणत्या गोष्टींना अमेरिकन नजरेत ‘D-क्लास’ दर्जा आहे हे या विद्यार्थिसमूहाला चटकन समजतं. त्यामुळे H1 ची Y2K फळी ही ‘घोडागिरी स्पेशालिस्ट’ आणि कॅम्पसवरून सिअ‍ॅटलला मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करणारे अधिक तरबेज स्पेशालिस्ट असा ‘देशस्थ-कोकणस्थ’ रेषेचा फरक या जातीत दिसतो.

अमेरिका बॉर्न देसी यांना ABCD म्हणजे अमेरिका बॉर्न कन्फ्युज्ड देसी म्हणायची सुरूवातीची चाल होती. मात्र अनुभवानं अमेरिकन वास्तवात वाढलेली भारतीय ‘दिसणारी’ दुसरी पिढी अजिबात ‘कन्फ्युज्ड’ नाही हे अनेकांच्या लक्षात आलंय.

सगळा देशच स्थलांतरित लोकांचा असल्यामुळे अमेरिकेत सामाजिक सत्तेची मापकं हे वेगवेगळे ब्रॅंड्स बनतात. उदाहरणार्थ तुमची मुलं आयव्ही लीगमध्ये जातात की नाही, तुम्ही राहता ते सबर्ब/काऊंटी कोणत्या दर्जाची आहे /तुमचं व्हिसा स्टेटस काय? / तुमची गाडी कोणती / तुम्ही मराठी मंडळाचे सभासद आहात की रोटरी मध्ये अ‍ॅक्टिव्ह आहात / तुमच्या भारताच्या फे-या किती फ्रिक्वेंट / तुम्ही अमेरिकेतच म्हातारं व्हायचं ठरवलंय की भारतात?... सारे प्रश्न महत्त्वाचे होतात. त्यांची उत्तरं हे ब्रॅंड्स बनतात.

लिबरल बनण्यापूर्वीच्या भारतात परदेशस्थांबद्दल कमालीचं अप्रूप होतं. परदेशस्थांनाही भारतीय नॉस्टॅल्जिया प्रचंड होता. मात्र आता दोन्ही देशांतली ‘मेटा नॅरेटिव्हज’ बदलत आहेत. अमेरिकन ठप्पा म्हणजे थोर हे समीकरण आता मोडलंय आणि अमेरिकेत प्रत्येक जण जणू ‘वॉलमार्ट’मध्ये काम करतोय, असा तुच्छ भाव बाळगायचेही दिवस गेले. आता दोन्हीकडचे मध्यमवर्ग एकमेकांची पॅकेजेस अधिक खुल्या आणि त्यामानानं कमी असूयेनं तपासू लागलेत. अमेरिकन उच्चवर्णीय मायग्रंट म्हणजे विश्व हिंदू परिषदेला जोपासणारा, अमेरिकेत दुय्यम दर्जाचं जीवन जगणारा, सांस्कृतिक दृष्ट्या रूटलेस म्हणून उथळ व सर्वसामान्य किंवा बुश राजवटीइतकाच आपमतलबी हा स्टिरिओटाईप आता बदलायची वेळ आली. जितका उथळपणा भारतात आहे तितकाच अमेरिकेतही आहे असं थंड डोक्यानं विचार केल्यावर दिसतं.

मराठी मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात गेलं की विद्यार्थी I-20 वाले नवे मायग्रंट्स आणि व्हेटरन अमेरिकन जुने अंकल असा मोठा स्पेक्ट्रम भेटतो. खरंतर, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मोठा क्रॉससेक्शन एकदम नजरेसमोर येतो. मला अमान मोमीन असाच भेटला होता. अमान होता ऑलमोस्ट पासष्ट वर्षांचा. त्याला अमेरिकन पद्धतीनं ‘अरे तुरे’ करायला त्यानंच शिकवलं. अमानच्या सुरूवातीच्या उत्कृष्ट कथांमध्ये हे ‘अर्ली-भारतीयांचं’ विश्व त्यानं उलगडलंय. नंतरची म्हणजे ‘कुंपणापलीकडच्या देशा’तली अजिता काळे पिढी. या पिढीनं आपली घसट भारतातल्या सांस्कृतिक केंद्रांबरोबर वाढवली. याचा पश्चिम किना-यावरचा परिपाक म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळानं विद्या हर्डीकरांसोबत घेतलेले विविध सांस्कृतिक इनिशिएटिव्हज.

पहिला Y2K धारेचे H1 वाले आता एकतर सिटिझनशिप घेऊन परत आलेत किंवा तिथंच स्थायिक झालेत. त्यांची रेडवुड सिटीत किंवा ऑस्टिनच्या काऊंटीत घरं झाली. अमेरिकन सिरीयलमध्ये आता भारतीय चेहेरे दिसायला लागलेत. अमेरिकन ज्यूंपेक्षाही जास्त दरडोई उत्पन्न आणि शिक्षण या समूहाकडं आज रोजी आहे.

पहिल्या फळीत आलेले उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय भारतीय होते. त्यांच्या बोच-या जातीय-ब्राह्मणी-जाणिवा आता ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ बनल्यात. ब्राह्मणेतराना ‘चॅरिटेबली’ सामावून घेतल्यासारखं दाखवायचं आता ‘अनकूल’ ठरलंय. माझ्या एका कार्यक्रमात आलेल्या नितीन कांबळे या आयटी तज्ञानं जेव्हा ही स्पर्धात्मक गुणवत्तेच्या वेष्टनाखालची आयटीवाल्यांची जातीयता खेचून बाहेर काढली तेव्हा मला कसनुसं झालेलं आठवतंय. ‘शादी डॉट कॉम’वरचा छोटा रिसर्चही या जातीय घडणीबद्दल तेच सांगतो.


NRI ही एक हायब्रिड अवस्था आहे. यात भारतीय म्हणून सुरुवातीला कौतुक, नंतर असूया, नंतर टीका आणि त्याची परिणती तुच्छतेत होते. मात्र आता या चष्म्यापलीकडे या हायब्रिडिटीला तपासण्याचे दिवस आलेत. त्यातली सामाजिक गणितं आता उलगडून पाहता येतात. भारतीय जातीय गुणदोषांपलीकडे NRI हायब्रिडिटी तपासणं आवश्यक आहे.

मराठी कुटुंब भेटल्यानंतर गप्पा कशावर चालल्या आहेत यावरून ‘व्हिसा-जात’ ओळखता येते. रूममेटच्या कटकटी – कॅंम्पस विद्यार्थी - बॉसचे तकाजे – ग्रीनकार्डचा वैताग - H1ची घुसमट, नवीन घर, मुलांच्या शाळा – ग्रीनकार्ड मास्टर्स, बेसमेंट रिनोव्हेशन – रोटरॅक्ट क्लब – सिटिझन फोरम – आयव्ही लीगमधली मुलं किंवा त्यांच्या बहुसांस्कृतिक विश्वात आपलं एकटेपण सर्वात महत्त्वाची म्हणजे मोक्ष आणि मर्सिडिजची चर्चा – आद्य नागरिकांचा ज्येष्ठ संघ ! दीक्षितांची माधुरी असो किंवा अश्विनी भावे – EB 1 सारख्या व्हिसावर अमेरिकेत आलेले क्रिएटिव्ह बुद्धिमान लोकं. इथल्या जात- व्यवस्थेत कोणीच अनप्रेडिक्टेबल राहात नाही.

अमेरिकेत बरीच दशकं ‘स्थलांतर-स्थलांतर’ खेळ चाललाय. यात माणसं आपण केलेल्या त्यागांची भरपाई विविध ब्रॅंड्संनी करत आहेत.
मला यातली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे पिढ्यान् पिढ्यांच्या भारतीय कौटुंबिक दंभाला अमेरिकन कडू व्यवहारी वास्तववादाची थेरपी मिळत आहे. आपल्या शरीरातल्या सा-या पेशी सात वर्षांत संपूर्ण नव्या होतात. अगदी डोळ्यांतले रॉडस आणि कोन्स पण नवे होतात. अशी सात वर्षं अमेरिकन अन्न खाल्लेले वन्स अपॉन टाईप भारतीय ज्या नफ्फट खरेपणानं ( मनातल्या मनात का होईना) आपली गणितं मांडतात, ट्रेड ऑफ्स जोखतात ते मला आवडतं. CYA सारख्या थिअ-या सांगणारे मोक्ष आणि मर्सिडिजच्या कचाट्यातही शेवटी एकटेपणा मान्य करतात. संस्कृती किंवा सिंगल माल्ट हा आधार आहे, उपाय नाही हे जाणून.

भारतीय जातींची, कुटुंबांच्या ग्लोरीची, भारतीय गुटगुटीत दंभाची कॉइन्स अमेरिकेत चालेनाशी होतात. अमेरिकन रूथलेस, माजुर्डी, ब्लंट, कष्टकरी संस्कृती या भारतीय मनांवर कलम होते. त्या कलमी वास्तवाचं समाजशास्त्र आता तपासायची वेळ आली आहे. झुंपा लाहिरीच्या ‘नेमसेक’मध्ये त्या वास्तवाचा एक तुकडा भेटतो... किंवा ‘हॅरॉल्ड अ‍ॅण्ड कुमार’ सारख्या विनोदी चित्रपटात दुसरा. जुन्या परदेशस्थ समीकरणापलीकडे ही ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ मूल्यांची नवी ग्लोबल जात घडताना डोळ्यांसमोर दिसते... या जातीत सरमिसळीनं, बरंवाईट, सारंच आहे. कौतुक, असूया, तुच्छता या सा-या पलीकडचं नवं कुरकरीत आणि तरीही दुखरं काहीतरी!

Monday, August 9, 2010

अपूर्णांकांचं प्रेम

माझे आजोबा त्यांच्या लहानपणी पो-या म्हणून मराठवाड्यातल्या चाकूरच्या बलभीम वाचनालयात कामाला होते. पहाटे ग्रंथालय झाडून ठेवायचं आणि पुस्तकांवरची धूळ झटकून पाणी भरून ठेवायचं हे त्यांचं काम होतं. माझे आजोबा राहायचे जवळच्या उजळंब नावाच्या खेड्यात. ते तिथून पहाटेचे निघून ग्रंथालयात जायचे. पुढे ते ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.शि.रा. रंगनाथन यांचे पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक म्हणून निवृत्त झाले. शेवटच्या श्वासापर्यंत, काका म्हणजे माझे आजोबा, म्हणजे श्री. कृ.मु. उजळंबकर स्वत:ची ओळख 'निवृत्त ग्रंथालय संचालक' अशी करून द्यायचे. काकांचं ग्रंथालयवेड इतकं जबरदस्त होतं की आम्ही सर्व त्यांच्या ग्रंथालयधर्माचे पहिले कन्व्हर्टस होतो. सुट्टया लागल्या की काकांबरोबर ‘शासकीय विभागीय’मध्ये जायचं आणि हाताला लागतील त्या पुस्तकांचा फन्ना पाडायचा हे ठरलेलं होतं. सुट्टया लागल्या की काका ‘शासकीय’मध्ये मुलांच्या पुस्तकांचा कोपरा तयार करायचे. पण ते मुळात लिबरल होते. हाताला लागेल ते कोणतंही पुस्तक वाचायला त्यांची मनाई नसायची. काका भाषावार प्रांतरचनेनंतर पुण्यात आले होते. त्यांचा खाक्या मराठवाडी, निझामशाहीतला-ढिसाळ आणि प्रेमळ, पुस्तकांवर प्रेम करणारा, उदारमतवादी होता.
काकांच्या ग्रंथालय-धर्मात धर्मांतरासाठी एकच गोष्ट आवश्यक होती, ती म्हणजे पुस्तकांवर प्रेम. एकदा जीव पुस्तकांना चटावला, की मग ते प्रेम सरणारं नाही हे काकांना पक्कं ठाऊक होतं.
काकांचे गुरू शि.रा. रंगनाथन हे ग्रंथालयशास्त्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांच्या 'ग्रंथालयाची पाच सूत्रं' जगभर प्रचलित आहेत. रंगनाथन यांची दशांश पध्दत जगभर महत्त्वाची मानली जाते. डॉ. रंगनाथन यांनी ज्ञानाची विभागवार वर्गवारी करून प्रत्येक पुस्तकाला नोंदणी क्रमांक देण्याची शिस्त निर्माण केली. रंगनाथन यांचा विचार, त्यांच्या अगोदर ज्यानं वर्गीकरण पध्दतीचा अभ्यास केला होता त्या मेल्विल ड्युईपेक्षा पुढे जाणारा होता. गुगलवर तुम्ही बघितलंत तर भारतातले आद्य आय.टी. प्रणेते म्हणून रंगनाथन यांचा उल्लेख आढळतो. 'याहू'च्या प्रणेत्यांनी आपलं आद्य सर्च इंजिन डिजाईन करताना रंगनाथन यांची विचारप्रणाली आधारभूत मानली होती. इंटरनेटवर जे सर्च इंजिन असतं त्या सर्च इंजिन पाठीमागे रंगनाथन यांचीच माहिती आणि ज्ञानाच्या वर्गवारीची व्यवस्था आहे. डॉ. रंगनाथन यांच्या वर्गीकरण पध्दतीनं ग्रंथालयातली सर्व पुस्तकं त्यांच्या त्यांच्या ओळखीनं त्यांच्या त्यांच्या योग्य ठिकाणी सापडतात. भारतीय ज्ञानशास्त्राचा पाया डॉ.रंगनाथन यांच्या वर्गीकरण पद्धतीमागे आहे. डॉ. रंगनाथन यांच्या शिस्तीमुळे हे नोंदणी क्रमांक उर्फ अपूर्णांक भारतातल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांवर आले. त्यातल्या काही अपूर्णांकांवर माझा तर जीवच जडलेला आहे.
काकांनी डॉ. रंगनाथन यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. त्यामुळे डॉ. रंगनाथन हे नाव लहानपणापासून परिचयाचं होतं. काकांबरोबर बोलताना कायम ग्रंथालयांचाच विषय निघायचा. ग्रंथालय संचालक झाल्यावर काकांचं ऑफिस होतं 'एशियाटिक'च्या इमारतीत. तेव्हापासून माझ्याही 'एशियाटिक'च्या फे-या सुरू झाल्या. तिथल्या नोंदणी क्रमांकांत दडलेल्या पुस्तकांचा परिचय होऊ लागला.
नोंदणी क्रमांक घालण्यापूर्वी अनेक पुस्तकं काकांकडे ग्रंथालयात यायची. 'इथं बसून वाचणार असशील तर वाचायला देतो' या अटीवर काकांच्या ऑफिसात बसून एका बैठकीत पुस्तकं वाचून संपवायला त्यांनी शिकवलं.
नंतर अमेरिकेतून फोन केला तरी काका गावाची, प्रवासाची चौकशी करायच्या अगोदर गावातल्या लायब्ररीची चौकशी करायचे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाची वॅन डर बिल्ट लायब्ररी, माझ्या स्कूलची अरिझोना स्टेटची हेडन लायब्ररी, न्यूयॉर्कची पब्लिक लायब्ररी, वॉशिंग्टनची फेमस अमेरिकन काँग्रेसची लायब्ररी... काकांमुळे हे प्रत्येक ग्रंथालय जणू मंदिर आहे अशा भक्तिभावानं तिथं प्रदक्षिणा केल्या, पुस्तकं वाचली, जागच्याजागी परत ठेवली आणि काकांना त्यांची वर्णनं ऐकवली.
एका समर सेमिस्टरला मला रिसर्च स्कॉलरशिप नव्हती. तेव्हा मध्ययुगीन युरोपचा अभ्यास करणारा एक गट अरिझोनात होता. त्यांना असिस्टंटची गरज होती. दिवसभर ग्रंथालयात बसून काम करायचं होतं. विद्यार्थी या कामाला तयार नसायचे. ती नोकरी मला मिळाली. काम होतं मध्ययुगीन युरोपचे सर्व संदर्भ एकत्रित करायचे. त्यासाठी मला रोजचे पुस्तकांचे, जर्नल्सचे नोंदणी क्रमांक मिळायचे. त्या नोंदणी क्रमांकांच्या खाली येणारं प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक जर्नलचा प्रत्येक अंक तपासून त्यातल्या मध्ययुगीन युरोपच्या संदर्भांना एकत्रित करायचं ते काम होतं. काकांच्या कोलॉन क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाच्या शिस्तीमुळे नोंदी करण्याचं काम मला कधीच अवघड वाटलं नाही. मध्ययुगीन युरोपातली माणसं थेट आपल्या जुन्या भारतीयांसारखी होती की- असं कित्येकदा लक्षात यायचं. एका स्कॉटिश मासिकात, मध्ययुगीन इंग्लंडमध्ये बोट जुनी झाली की तिचा दफनविधी कसा साग्रसंगीत करण्यात यायचा याचं वर्णन होतं. वस्तूंनाही नात्यानं बांधणारं मध्ययुगीन 'रिलेशनल कॉसमॉस' या प्रकल्पात असं अनेकदा भेटलं. माझे सहकारी मला 'लायब्ररी-मोल' म्हणायचे. मी उन्हाळयाच्या पूर्ण सुट्टीभर तासनतास या जुन्या जर्नल्समधून मध्ययुगीन संदर्भ काढून नोंदवण्याचं काम केलं. आधुनिक विज्ञानापूर्वीचं युरोपिअन वास्तव त्यामुळे परिचयाचं झालं. जगावर वसाहतवादी आक्रमण करण्यापूर्वी युरोपीयन अंगीकारलेल्या अंतर्गत -वसाहतवादाचं स्वरूप नजरेसमोर आलं. काकांनी लहानपणापासून काळजात पेरलेलं 'ग्रंथालय प्रेम' त्या उन्हाळ्यात कामी आलं.


अमेरिकेतल्या प्रशस्त, सर्व सोयींनी युक्त ग्रंथालयात मोकळेपणानं फिरताना मजा येत असे. दिवसाचे बारा तास या ग्रंथालयात प्रकल्पाचं काम करताना घालवले तरी त्रास होत नसे. सर्व सोयींनी युक्त ग्रंथालयं म्हणजे पुस्तकावर प्रेम करणा-या माणसांची पंढरीच होती. इथं मला या अपूर्णांकांवर जडलेलं प्रेम खरं कामाला आलं. अमेरिकेत ओळखपत्र असलेला प्रत्येक नागरिक विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतो. याउलट, पुण्यात परत आल्यावर मी जयकर ग्रंथालयात जेव्हा सभासद होण्यासाठी गेले तेव्हा, आम्ही 'इंडिपेण्डण्ट स्कॉलर' असं काही मानत नाही. तुम्ही विद्यार्थी नसाल तर इथं सभासद होता येणार नाही' असं खास पुणेरी उत्तर मिळालं.
आता किंडल, फ्लिपकार्ट आणि जेसटोर यांचे आशीर्वाद लाभल्यावर ग्रंथालयं रोज हाताशी नसली तरी आयुष्य धकतं. पण इंटरनेटनं समृध्द या सा-या माहितीची पायाभरणी डॉ. रंगनाथन यांनी केली आहे हे आठवलं की प्रत्येक वेळी ऊर भरून येतो. ९ ऑगस्ट हा डॉ. रंगनाथन यांचा जन्मदिवस. माझे आजोबा हयात नाहीत. नाहीतर प्रत्येक ९ ऑगस्टला ते रंगनाथन-स्मृती समारंभ आयोजित करत असत. मला वाटतं, प्रत्येक ग्रंथालयप्रेमीसाठी ९ ऑगस्टचा दिवस हा महत्त्वाचा असायला हवा. वाचणा-या, ग्रंथालयात जाणा-या प्रत्येक माणसावर डॉ. रंगनाथन यांचं केवढं मोठं ऋण आहे!
रंगनाथन यांच्या वर्गीकरण पध्दतीत साहित्य 'O' या वर्णामध्ये वर्गीकृत केलेलं सापडतं. आठशे एकवीस पूर्णांक तेवीस (821.23) हा जगभरातल्या कवितासंग्रहांचा नोंदणी क्रमांक होता. मुंबईत म्हाता-या 'एशियाटिक'च्या आचळांना लुचताना तो क्रमांक माझ्या प्रथम परिचयाचा झाला. आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’च्या पुढ्यात मी दिवसेंदिवस घालवले आहेत. त्या वयाला शोभेशा पाब्लो नेरूदाच्या कविता पहिल्यांदा भेटल्या. रिल्केचं 'सॉनेटस ऑफ ऑर्फिअस' पण ‘आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’मध्येच सापडलं. पाऊल त्सेलान, येहुदा अमिचाई , शिम्बोरस्का, मांदेलश्ताम, लॉर्का -- लिटिल मॅगेझिनवाल्यांनी मराठीत ज्या ज्या कवींची नावं माझ्या ओळखीची करून दिली होती, त्या प्रत्येक नावाला मी ‘आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’ या खिंडीत गाठलं. अजूनही सवयीनं प्रत्येक ग्रंथालयात पाऊल टाकलं, की मी पहिल्यांदा 'जागतिक कवितेचा कप्पा' शोधते. तिथं नेहमीची बोदलेअर, रिम्बाँ, त्स्वेतयेवा ही स्टेशनं लागतात का? ते तपासून बघते. 'लॅण्डमार्क', 'क्रॉसवर्ड' मध्ये हे वर्गीकरण वापरत नाहीत, त्यामुळे मी वैतागते.
माझे आजोबा कृ.मु.उजळंबकर हे डॉ. रंगनाथन यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी काळजात पेरलेल्या ग्रंथालयप्रेमानं जगभरची कविमंडळी मला भेटली हे आठवून मला भरून येतं. 'एशियाटिक'मध्ये आयुष्यातल्या इतक्या उनाड दुपारी काढल्या की अजूनही डोळे मिटले तरी 'एशियाटिक'चे नोंदणी क्रमांक डोळ्यांसमोर येतात. समाजशास्त्र 300, मार्क्सवाद 313 असे... एकदा अ‍ॅण्ड्रिआ डवॉरकिनचं 'इंटरकोर्स' नावाचं स्त्रीवादी समीक्षेचं पुस्तक जेव्हा इतर इरॉटिक पुस्तकांसमवेत सापडलं तेव्हा फुटलेलं हसूही आठवतं. अशा अपूर्णांकांची प्रेमं आता नामशेष होताना दिसतात. तरीही या इंटरनेटच्या, सर्च इंजिनच्या सांगाड्यांना तेच अपूर्णांक बिलगून बसलेत या कल्पनेनं मला तसल्ली मिळते आणि डॉ. रंगनाथन यांच्याविषयी मनात अपार कृतज्ञता दाटून येते.

भयकारी कल्पनेची कल्पना

प्रत्येक चांगलं वाचणा-या माणसाला काही लेखकांची स्टेशनं लागतातंच. जसा दस्तयावस्की किंवा जेम्स बाल्डविन. तसं इंटरनेट सर्फिंग करताना काही वेबसाईट्स प्रत्येक जिज्ञासू सर्फरला भेटतातंच. तुम्ही कोणत्या साईटसना भेट देता यावरून तुमच्या विचारसरणीचा, इझम्सच्या पगडयाचा, त्यातून बाहेर पडायच्या धडपडीचा किंवा कमिटमेंट फोबियाच्या पलीकडे- 'आहे मी लिबरल आणि आवडतात मला वेगवेगळया वादातल्या गोष्टी' या वृत्तीचा अंदाज येतो. माझ्या एका जिज्ञासू मित्रानं माझं नवीन गोष्टी वाचण्याच्या भुकेचं लक्षण हेरून बरेच वर्षांपूर्वी एका वेबसाईटशी माझा परिचय करून दिला- ती होती www.edge.org . स्लेट, सलॉन, अटलांटिक , NPR च्या जोडीने एज ची नेट- भेट त्याच्यामुळे सवयीची झाली.
स्टिव्हन पिंकर, नासिम तालेब, मॅट रिडले, रिचर्ड डॉकिन्स यांसारखे लेखक 'एज'वर आपल्या लेखनाची, कल्पनांची चिकित्सा करतात आणि त्यांच्या 'एज'वरच्या चर्चा या अकलेला खुराक देतात हे माझ्या तात्काळ लक्षात आलं. कित्येकदा या चर्चा डोक्यावरून गेल्या तरी त्या आवडू लागल्या. या वेबसाईटचा संपादक जॉन ब्रोकमन यानं 'एज'वर अनेक वाद-विवाद, उपक्रम राबवले आणि यातील काही चर्चांची नंतर पुस्तक स्वरूपात निर्मिती केली. या लेखकांमध्ये प्रचंड ज्ञानपिपासा आहे. त्यामुळे इझमच्या वादापलीकडे जाऊन, शास्त्रीय विश्लेषण पध्दतीने विविध सामाजिक आणि शास्त्रीय विषयांचा ऊहापोह 'एज'वर गेल्या दहा वर्षांत माझ्या वाचनात आला. 'एज'वरचं लेखन डाव्या किंवा आंधळया उजव्या वादांपलीकडचं असल्यामुळं सुरुवातीच्या काळात त्यांनी एक संकल्पना मांडली- थर्ड कल्चर. या थर्ड कल्चरमधल्या अनेक लेखनाशी मनोमन वाद घालत कधी आवडीनं मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत 'एज'वरचे अनेक प्रकल्प चवीनं वाचले. ('एज' लेखनाचा प्रतिवाद करताना माझ्या एका अतिहुशार मैत्रिणीनं ’ क्लिफ़’ नावाचा 'एज'मधल्या विचारांची समीक्षा करणारा गटही मग स्थापन केला."एज’वर वाचायचं आणि ’क्लिफ’ वर वाद घालायचे, अधिक समजून घ्यायचं हे ठरून गेलं.)
जॉन ब्रोकमन या 'एज'च्या संपादकानं दरवर्षी या वेबसाईटसाठी एक प्रकल्प राबवला. तो म्हणजे एका विशिष्ठ कल्पनेला विविध क्षेत्रातील बुध्दीमंतांचा काय प्रतिसाद आहे याचं एक संकलन त्यांनी वेबसाईटवर मांडलं आणि नंतर पुस्तक रूपानं ते छापलंही.
पहिल्या वर्षीचं संकलन होतं, 'व्हॉट वी बिलीव्ह बट कॅनॉट प्रूव्ह' म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्यावर आमची श्रध्दा/विश्वास आहे पण त्या सिध्द करता येत नाहीत. तेंडुलकरांची 'नियती' ही संकल्पना घेतली उदाहरणार्थ तर तशा विविध संकल्पनांचा उहापोह जगभरातल्या विविध विषयातल्या तज्ज्ञांनी केला. त्यांच्या आतापर्यंत सिध्द न झालेल्या अशा संकल्पना त्यांनी 'एज'वर मांडल्या होत्या. या अत्यंत लक्षवेधी उपक्रमानंतर दुस-या वर्षी माझ्यासारख्या अनेक पाकोळयांनी 'एज'वर कोणता प्रश्न असेल याची वाट पाहिली... आणि नंतरचा प्रश्न अधिक फॅसिनेटिंग होता. 'व्हॉट इज युअर डेंजरस आयडिया?' मनात उमटणा-या भयकारी कल्पना मांडायला त्यांनी जगभरातल्या 108 विद्वानांना पाचारण केलं होतं. भयंकर कल्पनांचं हे संकलन हे माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे.
आपले विचार, कल्पना, नवीन संकल्पना जिथून जन्म घेतात अशा पारंपरिक इझम्सनी वेढलेल्या विचार व्यूहापलीकडे जाऊन ज्ञात/अज्ञात/अज्ञेयाच्या कसोटयांवर घासून 'डेंजरस आयडिया' मांडणारे लेखक मला आवडले आणि ही कल्पना राबवणारा संपादक त्याहून महत्त्वाचा वाटला. 'एज' या वेबसाईटने पूर्वी 'पुढील पन्नास वर्षे' या विषयावरचे लेखनही संकलीत केले आहे. मात्र त्या संकल्पनेपेक्षा 'डेंजरस आयडिया' मला अधिक भावली. यातल्या सर्व 'आयडिया' चांगल्या/पॉझिटिव्ह/मानवसमूहाला हितकारक/चॅरिटेबल अशा नाहीत. काही कल्पना अतिशय वादग्रस्त किंवा अंगावर काटा आणणा-या आहेत. उदाहरणार्थ स्टिव्हन पिंकरची कल्पना - जेनेटिक छापानुसार मानवीय गटांमध्ये त्यांची बुध्दी आणि मनोवृत्ती यात फरक असणार ही अंगावर काटा आणणारी आहे. सर्व मानवीय समूहांमध्ये अतितीव्र बुध्दीमत्ता किंवा संवेदनशील असण्याच्या शक्यता समप्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे मानवतावादी मूल्यं- तर त्यालाच सुरूंग लावणारी ही स्टिव्हन पिंकरची- जेनेटिक छापानुसार बौध्दिक कुवत आणि मनोवृत्ती गटागटात विषम प्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे सिद्ध होईल ही कल्पना वादग्रस्त म्हणून अधिक खोलात विचार करायला लावणारी आहे.
यात डॅनियल हिलीसनं ही 'डेंजरस आयडिया' एकमेकांना उघडपणे सांगण्याची कल्पनाच 'भयप्रद' असल्याचं नोंदवलंय तर दुसरीकडं डॅनियल गिल्बर्टनं आयडिया ’डेंजर" असू शकतात' ही संकल्पनाच 'डेंजरस' आहे असं मत मांडलंय. हे पुस्तक हातात आलं की त्याच्याशी वाद घालत घालतच वाचून संपतं आणि नंतर पुस्तकांच्या कपाटात हाताशी येईल अशा अंतरावर राहतं.
जे कृष्णमूर्तींच्या एका संवादामध्ये रूपर्ट शेल्ड्रेक हे नाव भेटलं होतं. फिजिक्सचे अभ्यासक डेव्हिड बोहम आणि जीवशास्त्रज्ञ रूपर्ट शेल्ड्रेक यांच्या कृष्णमूर्तीं बरोबरच्या संवादांनी माझ्या मनावर ठसा उमटवला होता. शेल्ड्रेक यांची एक डेंजरस कल्पना या पुस्तकामध्ये आहे. 'कबुतरं आपापल्या घरटयात परत कशी येतात?' या अतिशय सोप्या प्रश्नातून सुरुवात करून प्राणी आपले मार्ग/दिशा निश्चित कशी करतात आणि त्या आकलनाकडे विज्ञान जगताचं त्यांच्या मर्यादांमुळे होणारं अक्षम्य दुर्लक्ष यामुळॆ होणारं अपरिमित नुकसान यावर शेल्ड्रेक यांनी विवेचन केलंय. 'थर्ड कल्चर'च्या या वाचनानं माझ्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी केली. असे रोबस्ट प्रश्न घेऊन आम्ही का खोल पाण्यात उडया घेत नाही ?असं वाटून मन खंतावलंदेखील.
ऍन सायलरनं या 'एज'ला प्रत्युत्तर म्हणून 'क्लिफ' हा गट सुरू केला होता. 'एज' म्हणजे कडयाचं टोक तर क्लिफ म्हणजे 'दरी' म्हणून तिच्या प्रतिक्रियेचं नाव क्लिफ. तिनं मला एकदा विचारलं होतं, की तुझी डेंजरस आयडिया काय आहे? पुस्तकाची इतकी पारायणं झाली होती की ऍनचा प्रश्न मला सुरुवातीला साधा-सोप्पा वाटला. खूप डेंजरस आयडिया माझ्या मनात असतील असं मला वाटत होतं. पण जसजशा तिला मी माझ्या कल्पना सांगू लागले तस तसं प्रत्येकवेळी ती हसून, 'ज्ञानदा, तू सांगतीएस तो युटोपिआ आहे त्यात भयकारी असं काही नाही.' असं माझ्या प्रत्येक कल्पनेला म्हणत राहिली.
'युध्द' बेकायदेशीर ठरतील, प्रत्येक भारतीय तथाकथित उच्चवर्णीय हा जातीय सरमिसळीतून बनलाय हे सत्य जेनेटिकली सामोरं येईल, सामाजिक शब्दकोषातून 'अनौरस', 'व्यभिचार', 'लग्न' असे शब्द नामशेष होऊन त्या जागी - ’अस्तित्वात असलेल्या कायदेशीर सोयी सवलती धुडकावून जन्माला आलेलं मूल’ किंवा’ ’ अर्थिक स्थिरतेसाठी तगवलेली लग्न नावाची गंजकी व्यवस्था मोडून दुसरी व्यवस्था समान्तरपणॆ चालवणारे नाते' किंवा 'सामाजिक सोयीसाठी आणि मुलांसाठी तगवलेली आर्थिक तडजोड' असे नवे वर्णन लागू होईल अशी माझी दिवास्वप्नं मी 'ऍन'ला 'डेंजरस आयडिया' म्हणून ऐकवली. तल्लख ऍननं अर्थातच सा-या माझ्या कल्पनंमध्ये 'डेंजरस' असं काहीच नाही हे दाखवून दिलं. शक्यता, विशफुल थिंकिंग या पलीकडे 'डेंजरस आयडीयेचं' क्षेत्र सुरू होतं हे मग माझ्या ध्यानात आलं. 'कर्मफळ सिध्दांतांचं फुल ऍण्ड फायनल शास्त्रीय ब्रेकडाऊन' अशी एक कल्पना मग मी तिला ऐकवली. ती कल्पना मात्र मला खरोखरच दक्षिण आशियाई मनाचं ब्रेकडाऊन करणारी भयावह कल्पना वाटते. अ‍ॅनच्या परीक्षेत ती कल्पना काठावर पास झाली.
जॉन ब्रॅकमननं संपादित केलेल्या 'डेंजरस कल्पना' अतिशय वेचक आहेत. पुस्तकाच्या शेवटी रिचर्ड डॉकिन्सनं या कल्पनांचं विश्लेषण केलंय. जगाच्या अंताबद्दल, कयामती बद्दल भाष्य करणा-या (माझ्या कर्मफळ सिध्दांत याच पठडीतला) आणि त्या अनुषंगाने सामाजिक चिंतन करणा-या 24, मन/सायकॉलॉजी यावर चिंतन करणा-या 20, राजकारण आणि अर्थकारणाबद्दलच्या 14 आणि मग धर्मकल्पना, आणि इतर या संकल्पनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या कल्पना मिळून 108 कल्पना या पुस्तकात मांडल्या आहेत. डॉकिन्सचं विश्लेषण मूळातूनच वाचण्यासारखं आहे. अनेकदा माणसाचा विचर आपण यांत्रिक पद्धतीने करतो मात्र तोंडदेखलेपणॆ जेनेटीक पद्धतीने माणसं निर्माण करण्याला विरोध करतो- या पाठिमागे आपल्या कोणत्या तृष्णा आहेत? हा डॉकिन्सचा प्रश्न महत्वाचा वाटला. आपला सारा विचार किती संस्कृती केंद्री, मानव केंद्री आहे हे तत्क्षणी जाणवलं.
भयकारी कल्पनांची गुंफण ही मानवी नैतिकतेला केंद्रस्थानी मानून त्याभोवती झाली आहे याचं डॉकिन्सनं विश्लेषण केलं आहे. माणूस म्हणून जगताना 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' हे मांडताना सारा विचार कसा मनुष्यकेंद्री होतो याकडे डॉकिन्स निर्देश करतो. उत्क्रन्तीची प्रक्रिया मात्र मनुष्यकेन्द्री नाही हे तो स्पष्ट करतो.
अशा धक्का देणाऱ्या कल्पना शास्त्रीय संशोधन पुढे नेतील असा ’एज’ वाल्यांचा विश्वास आहे. वरवरून पाहता 'डेंजरस आयडिया' आकर्षक, सहज सुचेल असं शिवधनुष्य वाटते. मग विचार करताना लक्षात येतं की खरी जिवंत, सळसळती डेंजरस कल्पना मनाच्या पटलावर जन्माला येणं यासाठी साधना हवी. तरच ते 'दर्शन' शक्य आहे. असं दर्शन ज्यामुळे भविष्यातील विज्ञानाची दिशा बदलेल. येरा गबाळयाचे ते काम नोहे

बाप रखुमादेवीवरू

आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं सारं चित्त पंढरीच्या वाटेवर चालणा-या, जगाच्या कानाकोप-यांतून आलेल्या पावलांची, मनांची, काळजी घेण्यात- त्यांच्या आर्ततेची संगती लावण्यात, त्यांना त्यांच्या मुळापर्यंत पोचवण्यात लागलं असणार... त्या काळात त्याला वामांगीकडं लक्ष द्यायलाही फुरसत नसते तर माझ्यासारख्या कन्फ्युज्ड जिवांची काय कथा? या वारीनं, या विठूनं, त्याच्या गजरानं न भारावलेला माणूस माझ्या परिचयाचा नाही. महाराष्ट्राच्या गुणसूत्रातच हा विठुराया स्थानापन्न झालेला आहे. असं काय आहे या त्याच्या भेटीत?
दिलीप चित्रे यांना एकदा वारी पुण्यात यायच्या दिवशी मी भेटले होते. तेव्हाचं चित्र्यांचं वाक्य माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते, की या वारीकडे संस्कृतीचं 'क्रॉस पॉलिनेशन' असं बघावं लागेल. वेगवेगळ्या भागांतून येणारी भक्तमंडळी इथं उराउरी भेटतात, गाणी गातात, दंग होतात आणि नवनव्या कल्पनांची देवाण-घेवाण करतात, इथं नवी संस्कृती जन्माला येते.
प्रत्येकानं आपापला मोक्ष स्वत: मिळवायचा ही या भूमीची परंपरा... पण अशा भक्ति मार्गावर एकमेकांना भेटून एकत्र पायवाट चालायची हे वारीचं इनोव्हेशन.
माझे गुरुजी जेम्स फोर्ड यांचा 'आयकॉन्स' नावाचा सेमिनार मी अटेण्ड करायचे. काय होतं या 'आयकॉन्स'च्या सेमिनारमध्ये? तर देशोदेशीचे आम्ही विद्यार्थी त्यात आपापल्या संस्कृतींतल्या 'चिन्हं, मूर्ती, प्रतिमा आणि मूर्तींचा अभाव' या विषयावर चर्चा करायचो. प्रोफेसर फोर्ड हे जपानमधील बौध्दधर्माचे प्राध्यापक. ते हा सेमिनार मॉडरेट करायचे - आम्हाला शिकवायचे. या सेमिनारमध्ये माझा ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या आयकॉन्सशी परिचय झाला, तर माझ्या आफ्रिकन मित्रानं मूर्त स्वरूपात परमेश्वराचं नसणं या इस्लामिक संकल्पनेचा आणि नायजेरमधल्या त्याच्या संस्कृतीचा अन्वय लावून दाखवला. डो डॉटरी या माझ्या अमेरिकन वर्गमैत्रिणीनं मॉर्मन चर्चमधल्या प्रतिमांतून नाहीशा होत गेलेल्या 'होली मदर'चं चित्र आमच्यासमोर मांडलं. प्रत्येक संस्कृतीनं आपापल्या दृश्य जाणिवांसकट आपापल्या विश्वातला परमेश्वर घडवला होता, हे आमच्या ध्यानात येऊ लागलं आणि त्यातून संस्कृतीच्या सब- कॉन्शस निरगाठी प्रत्येक समूह कशा सोडवितो ते लक्षात येण्यास सुरुवात झाली.
फोर्ड गुरूजींनी या सा-या सेमिनारची सुरुवात केली होती ती त्यांच्या अमिदा बुध्दाच्या कथेनं. एका गावातील अमिदा बुध्दाची मूर्ती त्याच्या भक्ताला दृष्टांत देते. अतीव भक्तीच्या टोकावर भक्ताच्या गालावर चटका बसतो आणि तो डाग त्या बुध्दाच्या मूर्तीवर उमटतो असं या कथेचं मूळ बीज. फोर्ड गुरूजींचं यावर एक मूलभूत विश्लेषण होतं. त्यांच्या मते, स्वर्गात किंवा ब्रह्मलोकात बुध्द आहे आणि त्याची 'मूर्ती' म्हणजे हा अमिदा बुध्द अशी या जपानी परंपरेत धारणा नाही तर ती मूर्ती म्हणजेच तो अमिदा बुध्द अशी त्यांची धारणा आहे. म्हणून भक्तांच्या स्वप्नात- चालता- बोलता मनुष्यमापातला असा अमिदाबुध्द येत नाही तर ती मूर्ती- म्हणजे 'तोच' येतो. फोर्ड गुरूजींचं प्रवचन ऐकणं हा भाग्ययोगच. त्यांच्या या 'मूर्ती हेच देवाचं असणं' या विषयानं मात्र मला जागं केलं. मला जाणवलं, की विठोबासुध्दा असा आपल्या स्वप्नात कर कटावर ठेवूनच येतो. ‘संत सखू’ सिनेमात सखूला सोडवायला कर कटावर ठेवलेला चार फुटी 'मूर्ती विठोबा' ऊर्फ खरा विठोबा येतो. आपणही विठोबाकडे स्वर्गात, क्षीरसागरात कुठेतरी आनंदात राहणा-या ओरिजनल विठोबाची पंढरपूरची प्रतिकृती असं न बघता- हाच तो नाम्याचं जेवण जेवणारा विठुराया, हाच-ज्यानं जनीचे केस विंचरले, हाच- ज्यानं तुकोबाला दर्शन दिलं, हाच-ज्यानं दामाजी पंतांची सुटका केली, हाच-तो समचरण, साजिरा विठोबा असं त्याच्याकडे बघतो. फोर्ड गुरूजींना मी जेव्हा रा. चिं. ढे-यांचं माढ्याची मूळ विठोबा मूर्ती आणि ही नवी मूर्ती यांबाबतचं संशोधन ऐकवलं तेव्हा माझ्या सेमिनार पेपरमध्ये अजून भर पडली. भक्तांना 'मूर्ती'पलीकडचा विठोबाही दिसतो. मूळ मूर्ती कुठेही गेली तरी ज्या मूर्तीत आपण भाव जडवला, जीव गुंतवला तीच मूर्ती; नव्हे, तोच विठोबा आम्हाला खरा विठोबा वाटतो... नव्हे, तोच खरा विठोबा असतो.
याच फोर्ड गुरूजींच्या वर्गात आम्हा सर्वांच्या लक्षात अजून एक गोंधळ येऊ लागला. तो म्हणजे इंग्रजी भाषेच्या मर्यादेचा. आता, विठोबाला काय म्हणायचं? गॉड- तर तो गॉड या अब्राहमिक धर्मातल्या
( अब्राहम ज्यांचा मूळपुरुष आहे असे धर्म - म्हणजे ज्यू , इस्लाम आणि ख्रिश्चन ) 'गॉड'पेक्षा निराळा आहे. पंढरपुरातल्या विठोबाला आपण 'मूर्ती' म्हणू शकत नाही, तो प्रतिमा नाही, तो विठ्ठलाची प्रतिकृती नाही- तो शंभर टक्के ओरिजिनल विठ्ठल आहे. या साजि-या ध्यानाचं वर्णन करायला इंग्रजी भाषा तोकडी आहे याचं ज्ञान झालं. त्याचबरोबर गॉड, रिलिजन, सेक्रेड, फेथ, ग्रेस, बेनेव्हलन्स या सर्व शब्दांना अभिप्रेत ख्रिश्चन धर्मकल्पनेचा संदर्भ सतत नजरेसमोर येऊ लागला. 'गॉड' या शब्दात अभिप्रेत असलेला परमेश्वर वाळवंटात कुत्र्याचं रूप घेऊन, प्रकट होऊन धावत नव्हता किंवा त्याच्या पाठीमागे नामदेव तूप घेऊन धावत नव्हते. 'गॉड' या कल्पनेला सर्वात्मक परमेश्वर श्रीखंड्या होऊन एकनाथांच्या घरी व्रात्यपणा पण करणारा नव्हता. प्रत्येक संस्कृतीनं आपल्या कॉस्मॉलॉजीत, आपल्या असण्यात, आपल्या माणूसपणाच्या सीमा जाणण्यात त्या पलीकडे स्थित असणा-या 'परमेश्वराचं' एक रुपडं ठरवलं होतं. आणि ते रूप त्याच्या भाषेशी निगडित होतं.
माझा चीनमधल्या चर्चमध्ये काम करणारा एक वर्गमित्र मोठ्ठे डोळे करून म्हणाला, तुमच्याकडे तीन प्रकारचे देव आहेत. देवांचा एक गट आपल्या गावाला राहतात आणि त्यांना भेटायला त्यांच्या घरी तुम्ही जाता. विठोबा, तिरूपती, काशी विश्वेश्वर किंवा जेजुरीचा खंडेराया. दुसरे देव आहेत ते पाहुणे बनून तुमच्या घरी येतात- नवरात्रातली देवी किंवा गणपती. आणि तिसरे देव- तुमच्या घरात राहतात. ज्यांची तुम्ही घरातच पूजा करता. त्याचं वर्णन काही अंशी बरोबर होतं. पण या तीन प्रकारापलीकडे कधी झाडात, कधी गावाच्या सीमेवर, कधी पाण्यात, नदीत, तळयात, भक्तांच्या हृदयात प्रकट झालेले देव आहेत असं त्याला सांगावंसं वाटलं. मग जाणवलं की या भारतीय भूमीत चराचरात परमेश्वराचं रूप दडलंय असं म्हणतात. हे या भूमीतलं अद्वैती नातेसंबंधानं बांधलेलं विश्व आहे. अरुण कोलटकरांच्या 'जेजुरी' त नाही का अशा 'दगडात देव शोधणा-या माणसांचं' जग आहे.
मग मला आमच्या पुण्याच्या घरातलं देवघर आठवलं. काकाला घरी यायला उशीर झाला की बाळकृष्णाला पाण्यात बुडवणारी आजी आठवली. किंवा खंडोबाच्या नवरात्रात वडे तळणारा तिचा गोरा गोरा चेहेरा समोर आला... या 'देव' कॅटॅगरीत काकूच्या अन्नपूर्णेपासून बरीच 'देवमाणसं' देवघरात बसायची. माझा लाडका विठोबा घरच्या देवघरात रुक्मिणीसमवेत उभा राहायचा हे देखील आठवलं. माझ्या लाल अलवणातल्या आजीची जगण्याची घुसमट वारी त्याच्या डोळ्यादेखत घडत होती- ते ही.
ढे-यांच्या ‘महासमन्वया’नं या विठोबाचं कित्येक पिढ्यांना, अवतारांना, कल्पनांना पोटात घेऊ शकणारं रूप सामोरं आणलं. जैन, बौध्द परंपरांपासून ते तुकोबांच्या गाथेतल्या अल्लाच्या अभंगांपर्यंत विठुरायाची सांस्कृतिक व्याप्ती पसरलेली आहे हे लक्षात आलं. चार्ल्स साँडर्स पर्स नावाच्या एका तत्त्वज्ञानं चिन्ह जगाचं तत्त्वज्ञान मांडलंय. तो तीन प्रकारच्या चिन्हांचं विश्लेषण करतो. आयकॉन- म्हणजे जी गोष्ट निर्देशित करायची त्याचं छोटं रूप, इंडेक्स- म्हणजे त्या गोष्टीचं निर्देशन होईल अशी सूचक गोष्ट आणि सिम्बॉल-म्हणजे त्या वस्तूला दिलेली विवक्षित खूण. चिन्हांची ही सारी व्यवस्था एका सबस्ट्रॅटम म्हणजे मूळ सांस्कृतिक भूमीवर उभी असते असं विवेचन पर्स ने केलं आहे. विठोबाच्या गोजि-या ध्यानाकडे बघितल्यावर पर्सनं निदेशित केलेल्या या सांस्कृतिक भूमीतच 'महाराष्ट्री' असण्याचं सारं गमक दडलंय असं मला वाटायला लागलं. या भूमीत जे जे सारं परमेश्वराबद्दलचं चिंतन झालं त्या सा-याला विठोबाच्या विटेनं सामावून घेतलंय. त्यानं हरिहर भेद गिळून टाकले, त्यानं बुध्दाचा अवतारच आपलासा केला. एवढंच काय, साईबाबांचंदेखील 'विठोबाकरण' या महाराष्ट्राच्या भूमीत होऊ शकलं.
या पार्श्वभूमीवर नेमाड्यांच्या 'हिंदू' कादंबरीत नायकाचं नाव खंडेराव विठ्ठल म्हटल्यावर मला हसूच आलं, परवा. अरेच्च्या- म्हणजे नेमाड्यांनी 'हिंदू' मध्ये जेजुरी-पंढरी असा शैव-वैष्णव लंबगोल मानून त्याची खंडेराव आणि विठ्ठल अशी दोन केंद्र मानलीत कां काय? असा विचार मनात आला. की खंडेरावात हे हरिहर एकत्र झालेत? असा प्रश्नही मनात आला. देशी जाणीवांना व्यक्त प्रश्न करणारा ' पांडुरंग' सांगवीकर आणि दक्षिण आशियात पसरलेली बहुकेंद्री हिंदू जाणीव तपासणारा खंडेराव यांना वेधून असलेला विठ्ठल डोळ्यांना दिसला.
परवाच, सुषमा देशपांडेनं लिहिलेल्या 'बया दार उघड' या नाटकाची तालीम बघत होते. त्यातल्या विठा नावाच्या एका भक्ताची कथा सामोरी आली. तिचं मन विठोबावर जडलंय. आणि नवरा परंपरेचा आधार घेत शारीर बळजबरी करू बघतो. त्याला विठ्ठलाच्या प्रेमात दंग झालेली विठा सुनावते-
'तुझी सत्ता आहे देहावरी समज
माझेवरी तुझी किंचित नाही'
विठ्ठलाच्या भक्तीत सकस झालेले देशी स्त्रीवादाचे स्वर सुषमाच्या नाटकात भेटले. नुसताच हरी हर नव्हे तर स्त्री पुरुष भेदही गिळणारी विठू माऊली सामोरी आली.
या अशा सर्व काही व्यापून दशांगुळं शिल्लक राहणा-या विठोबाची मला आर्त आठवण येते आहे. आषाढीनंतर तृप्त वैष्णवजन आपापल्या संसारात परततील. मग माझ्या विठोबाला सवड मिळेल माझ्यासाठी. मला इरावती कर्व्यांना भेटलेला 'बॉयफ्रेंड' नको. मला हवाय या जगण्याच्या वाळवंटात माझं बोट धरून चालणारा माझा हक्काचा बाप. कृपा सिंधु करुणा करू, बाप रखुमादेवीवरू!