Monday, August 9, 2010

भयकारी कल्पनेची कल्पना

प्रत्येक चांगलं वाचणा-या माणसाला काही लेखकांची स्टेशनं लागतातंच. जसा दस्तयावस्की किंवा जेम्स बाल्डविन. तसं इंटरनेट सर्फिंग करताना काही वेबसाईट्स प्रत्येक जिज्ञासू सर्फरला भेटतातंच. तुम्ही कोणत्या साईटसना भेट देता यावरून तुमच्या विचारसरणीचा, इझम्सच्या पगडयाचा, त्यातून बाहेर पडायच्या धडपडीचा किंवा कमिटमेंट फोबियाच्या पलीकडे- 'आहे मी लिबरल आणि आवडतात मला वेगवेगळया वादातल्या गोष्टी' या वृत्तीचा अंदाज येतो. माझ्या एका जिज्ञासू मित्रानं माझं नवीन गोष्टी वाचण्याच्या भुकेचं लक्षण हेरून बरेच वर्षांपूर्वी एका वेबसाईटशी माझा परिचय करून दिला- ती होती www.edge.org . स्लेट, सलॉन, अटलांटिक , NPR च्या जोडीने एज ची नेट- भेट त्याच्यामुळे सवयीची झाली.
स्टिव्हन पिंकर, नासिम तालेब, मॅट रिडले, रिचर्ड डॉकिन्स यांसारखे लेखक 'एज'वर आपल्या लेखनाची, कल्पनांची चिकित्सा करतात आणि त्यांच्या 'एज'वरच्या चर्चा या अकलेला खुराक देतात हे माझ्या तात्काळ लक्षात आलं. कित्येकदा या चर्चा डोक्यावरून गेल्या तरी त्या आवडू लागल्या. या वेबसाईटचा संपादक जॉन ब्रोकमन यानं 'एज'वर अनेक वाद-विवाद, उपक्रम राबवले आणि यातील काही चर्चांची नंतर पुस्तक स्वरूपात निर्मिती केली. या लेखकांमध्ये प्रचंड ज्ञानपिपासा आहे. त्यामुळे इझमच्या वादापलीकडे जाऊन, शास्त्रीय विश्लेषण पध्दतीने विविध सामाजिक आणि शास्त्रीय विषयांचा ऊहापोह 'एज'वर गेल्या दहा वर्षांत माझ्या वाचनात आला. 'एज'वरचं लेखन डाव्या किंवा आंधळया उजव्या वादांपलीकडचं असल्यामुळं सुरुवातीच्या काळात त्यांनी एक संकल्पना मांडली- थर्ड कल्चर. या थर्ड कल्चरमधल्या अनेक लेखनाशी मनोमन वाद घालत कधी आवडीनं मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत 'एज'वरचे अनेक प्रकल्प चवीनं वाचले. ('एज' लेखनाचा प्रतिवाद करताना माझ्या एका अतिहुशार मैत्रिणीनं ’ क्लिफ़’ नावाचा 'एज'मधल्या विचारांची समीक्षा करणारा गटही मग स्थापन केला."एज’वर वाचायचं आणि ’क्लिफ’ वर वाद घालायचे, अधिक समजून घ्यायचं हे ठरून गेलं.)
जॉन ब्रोकमन या 'एज'च्या संपादकानं दरवर्षी या वेबसाईटसाठी एक प्रकल्प राबवला. तो म्हणजे एका विशिष्ठ कल्पनेला विविध क्षेत्रातील बुध्दीमंतांचा काय प्रतिसाद आहे याचं एक संकलन त्यांनी वेबसाईटवर मांडलं आणि नंतर पुस्तक रूपानं ते छापलंही.
पहिल्या वर्षीचं संकलन होतं, 'व्हॉट वी बिलीव्ह बट कॅनॉट प्रूव्ह' म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्यावर आमची श्रध्दा/विश्वास आहे पण त्या सिध्द करता येत नाहीत. तेंडुलकरांची 'नियती' ही संकल्पना घेतली उदाहरणार्थ तर तशा विविध संकल्पनांचा उहापोह जगभरातल्या विविध विषयातल्या तज्ज्ञांनी केला. त्यांच्या आतापर्यंत सिध्द न झालेल्या अशा संकल्पना त्यांनी 'एज'वर मांडल्या होत्या. या अत्यंत लक्षवेधी उपक्रमानंतर दुस-या वर्षी माझ्यासारख्या अनेक पाकोळयांनी 'एज'वर कोणता प्रश्न असेल याची वाट पाहिली... आणि नंतरचा प्रश्न अधिक फॅसिनेटिंग होता. 'व्हॉट इज युअर डेंजरस आयडिया?' मनात उमटणा-या भयकारी कल्पना मांडायला त्यांनी जगभरातल्या 108 विद्वानांना पाचारण केलं होतं. भयंकर कल्पनांचं हे संकलन हे माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे.
आपले विचार, कल्पना, नवीन संकल्पना जिथून जन्म घेतात अशा पारंपरिक इझम्सनी वेढलेल्या विचार व्यूहापलीकडे जाऊन ज्ञात/अज्ञात/अज्ञेयाच्या कसोटयांवर घासून 'डेंजरस आयडिया' मांडणारे लेखक मला आवडले आणि ही कल्पना राबवणारा संपादक त्याहून महत्त्वाचा वाटला. 'एज' या वेबसाईटने पूर्वी 'पुढील पन्नास वर्षे' या विषयावरचे लेखनही संकलीत केले आहे. मात्र त्या संकल्पनेपेक्षा 'डेंजरस आयडिया' मला अधिक भावली. यातल्या सर्व 'आयडिया' चांगल्या/पॉझिटिव्ह/मानवसमूहाला हितकारक/चॅरिटेबल अशा नाहीत. काही कल्पना अतिशय वादग्रस्त किंवा अंगावर काटा आणणा-या आहेत. उदाहरणार्थ स्टिव्हन पिंकरची कल्पना - जेनेटिक छापानुसार मानवीय गटांमध्ये त्यांची बुध्दी आणि मनोवृत्ती यात फरक असणार ही अंगावर काटा आणणारी आहे. सर्व मानवीय समूहांमध्ये अतितीव्र बुध्दीमत्ता किंवा संवेदनशील असण्याच्या शक्यता समप्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे मानवतावादी मूल्यं- तर त्यालाच सुरूंग लावणारी ही स्टिव्हन पिंकरची- जेनेटिक छापानुसार बौध्दिक कुवत आणि मनोवृत्ती गटागटात विषम प्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे सिद्ध होईल ही कल्पना वादग्रस्त म्हणून अधिक खोलात विचार करायला लावणारी आहे.
यात डॅनियल हिलीसनं ही 'डेंजरस आयडिया' एकमेकांना उघडपणे सांगण्याची कल्पनाच 'भयप्रद' असल्याचं नोंदवलंय तर दुसरीकडं डॅनियल गिल्बर्टनं आयडिया ’डेंजर" असू शकतात' ही संकल्पनाच 'डेंजरस' आहे असं मत मांडलंय. हे पुस्तक हातात आलं की त्याच्याशी वाद घालत घालतच वाचून संपतं आणि नंतर पुस्तकांच्या कपाटात हाताशी येईल अशा अंतरावर राहतं.
जे कृष्णमूर्तींच्या एका संवादामध्ये रूपर्ट शेल्ड्रेक हे नाव भेटलं होतं. फिजिक्सचे अभ्यासक डेव्हिड बोहम आणि जीवशास्त्रज्ञ रूपर्ट शेल्ड्रेक यांच्या कृष्णमूर्तीं बरोबरच्या संवादांनी माझ्या मनावर ठसा उमटवला होता. शेल्ड्रेक यांची एक डेंजरस कल्पना या पुस्तकामध्ये आहे. 'कबुतरं आपापल्या घरटयात परत कशी येतात?' या अतिशय सोप्या प्रश्नातून सुरुवात करून प्राणी आपले मार्ग/दिशा निश्चित कशी करतात आणि त्या आकलनाकडे विज्ञान जगताचं त्यांच्या मर्यादांमुळे होणारं अक्षम्य दुर्लक्ष यामुळॆ होणारं अपरिमित नुकसान यावर शेल्ड्रेक यांनी विवेचन केलंय. 'थर्ड कल्चर'च्या या वाचनानं माझ्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी केली. असे रोबस्ट प्रश्न घेऊन आम्ही का खोल पाण्यात उडया घेत नाही ?असं वाटून मन खंतावलंदेखील.
ऍन सायलरनं या 'एज'ला प्रत्युत्तर म्हणून 'क्लिफ' हा गट सुरू केला होता. 'एज' म्हणजे कडयाचं टोक तर क्लिफ म्हणजे 'दरी' म्हणून तिच्या प्रतिक्रियेचं नाव क्लिफ. तिनं मला एकदा विचारलं होतं, की तुझी डेंजरस आयडिया काय आहे? पुस्तकाची इतकी पारायणं झाली होती की ऍनचा प्रश्न मला सुरुवातीला साधा-सोप्पा वाटला. खूप डेंजरस आयडिया माझ्या मनात असतील असं मला वाटत होतं. पण जसजशा तिला मी माझ्या कल्पना सांगू लागले तस तसं प्रत्येकवेळी ती हसून, 'ज्ञानदा, तू सांगतीएस तो युटोपिआ आहे त्यात भयकारी असं काही नाही.' असं माझ्या प्रत्येक कल्पनेला म्हणत राहिली.
'युध्द' बेकायदेशीर ठरतील, प्रत्येक भारतीय तथाकथित उच्चवर्णीय हा जातीय सरमिसळीतून बनलाय हे सत्य जेनेटिकली सामोरं येईल, सामाजिक शब्दकोषातून 'अनौरस', 'व्यभिचार', 'लग्न' असे शब्द नामशेष होऊन त्या जागी - ’अस्तित्वात असलेल्या कायदेशीर सोयी सवलती धुडकावून जन्माला आलेलं मूल’ किंवा’ ’ अर्थिक स्थिरतेसाठी तगवलेली लग्न नावाची गंजकी व्यवस्था मोडून दुसरी व्यवस्था समान्तरपणॆ चालवणारे नाते' किंवा 'सामाजिक सोयीसाठी आणि मुलांसाठी तगवलेली आर्थिक तडजोड' असे नवे वर्णन लागू होईल अशी माझी दिवास्वप्नं मी 'ऍन'ला 'डेंजरस आयडिया' म्हणून ऐकवली. तल्लख ऍननं अर्थातच सा-या माझ्या कल्पनंमध्ये 'डेंजरस' असं काहीच नाही हे दाखवून दिलं. शक्यता, विशफुल थिंकिंग या पलीकडे 'डेंजरस आयडीयेचं' क्षेत्र सुरू होतं हे मग माझ्या ध्यानात आलं. 'कर्मफळ सिध्दांतांचं फुल ऍण्ड फायनल शास्त्रीय ब्रेकडाऊन' अशी एक कल्पना मग मी तिला ऐकवली. ती कल्पना मात्र मला खरोखरच दक्षिण आशियाई मनाचं ब्रेकडाऊन करणारी भयावह कल्पना वाटते. अ‍ॅनच्या परीक्षेत ती कल्पना काठावर पास झाली.
जॉन ब्रॅकमननं संपादित केलेल्या 'डेंजरस कल्पना' अतिशय वेचक आहेत. पुस्तकाच्या शेवटी रिचर्ड डॉकिन्सनं या कल्पनांचं विश्लेषण केलंय. जगाच्या अंताबद्दल, कयामती बद्दल भाष्य करणा-या (माझ्या कर्मफळ सिध्दांत याच पठडीतला) आणि त्या अनुषंगाने सामाजिक चिंतन करणा-या 24, मन/सायकॉलॉजी यावर चिंतन करणा-या 20, राजकारण आणि अर्थकारणाबद्दलच्या 14 आणि मग धर्मकल्पना, आणि इतर या संकल्पनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या कल्पना मिळून 108 कल्पना या पुस्तकात मांडल्या आहेत. डॉकिन्सचं विश्लेषण मूळातूनच वाचण्यासारखं आहे. अनेकदा माणसाचा विचर आपण यांत्रिक पद्धतीने करतो मात्र तोंडदेखलेपणॆ जेनेटीक पद्धतीने माणसं निर्माण करण्याला विरोध करतो- या पाठिमागे आपल्या कोणत्या तृष्णा आहेत? हा डॉकिन्सचा प्रश्न महत्वाचा वाटला. आपला सारा विचार किती संस्कृती केंद्री, मानव केंद्री आहे हे तत्क्षणी जाणवलं.
भयकारी कल्पनांची गुंफण ही मानवी नैतिकतेला केंद्रस्थानी मानून त्याभोवती झाली आहे याचं डॉकिन्सनं विश्लेषण केलं आहे. माणूस म्हणून जगताना 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' हे मांडताना सारा विचार कसा मनुष्यकेंद्री होतो याकडे डॉकिन्स निर्देश करतो. उत्क्रन्तीची प्रक्रिया मात्र मनुष्यकेन्द्री नाही हे तो स्पष्ट करतो.
अशा धक्का देणाऱ्या कल्पना शास्त्रीय संशोधन पुढे नेतील असा ’एज’ वाल्यांचा विश्वास आहे. वरवरून पाहता 'डेंजरस आयडिया' आकर्षक, सहज सुचेल असं शिवधनुष्य वाटते. मग विचार करताना लक्षात येतं की खरी जिवंत, सळसळती डेंजरस कल्पना मनाच्या पटलावर जन्माला येणं यासाठी साधना हवी. तरच ते 'दर्शन' शक्य आहे. असं दर्शन ज्यामुळे भविष्यातील विज्ञानाची दिशा बदलेल. येरा गबाळयाचे ते काम नोहे

2 comments:

  1. मस्त लेख. एज माझीही आवडती साइट आहे. याखेरीज ट्विटरवर योग्य लोकांना फॉलो केले तरी बरेच रोचक दुवे मिळतात.

    ReplyDelete
  2. या कर्मफळ सिद्धांताला 'Just-World Fallacy' म्हणणारा हा लेख अलिकडेच वाचण्यात आला:
    http://youarenotsosmart.com/2010/06/07/the-just-world-fallacy/

    ReplyDelete