Wednesday, October 7, 2020

शंभर मी - एक ज्ञानशास्त्रीय प्रयोग

श्याम मनोहर यांची नवी कादंबरी ‘शंभर मी’ हा मराठी कादंबरीलेखनाच्या परंपरेतला एक महत्त्वाचा प्रयोग आहे- मराठी वाचकांनी त्याचा अनुभव घ्यायला हवा असा.

श्याम मनोहर आवडणार्‍या लोकांना ‘नेमाडे’ नावडतात. किंबहुना, नेमाडे नावडतात म्हणूनच श्याम मनोहर आवडतात असं त्यांनी ठरवलेलं असतं. अशा आवडीत आणि नावडीतही फारसं स्वारस्य नसतं. कारण कादंबरीच्या श्रेष्ठत्वाच्या निकषांवर नव्हे तर व्यक्तिगत किंवा साहित्यिक राजकारणाचा भाग म्हणून अशी आवड-निवड जन्माला आलेली असते.

मराठी कादंबरीच्या पटावर भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर हे दोन ध्रुव आहेत. नेमाड्यांची कादंबरी काळाच्या विस्तृत पटावर प्रोटॅगॉनिस्टला उभा करून त्याच्या नजरेने असण्याचा अन्वय मांडते. नेमाडे भावात्मक बुद्धीची कमाल दाखवताना कधी राजकीय खेळी रचतात. नेमाड्यांची कादंबरी वाचकाला गुंगवते, त्यावर गारूड करते

मनोहरांची कादंबरी वाचकाला, त्याच्या एकसंध असण्याच्या पूर्वकल्पनेला प्रश्न करत त्याच्यावर गारूड तर करत नाहीच, उलट त्याला भानावर आणते, जागं करते, सलगतेच्या हिप्नॉसिसमधून बाहेर काढायला वेगवेगळ्या प्रश्नांचे व्यूह रचते. त्यामुळेच श्याम मनोहरांची कादंबरी ही मराठीतील खर्‍या अर्थाने शोधनमार्गाने जाणारी कादंबरी आहे.


‘शंभर मी’ हा प्रयोग आहे. या प्रयोगाला कादंबरी का म्हणायचं? ‘कादंबरी’ असण्याच्या आवश्यक आणि पुरेशा अटी कोणत्या? काळाची रचना, निवेदन, पात्रांची रचना, कथानक, त्यातला संवाद, विरोध, समतोल? ‘कादंबरी’ हा आधुनिकतेला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेला घाट अनेकांनी विविध प्रकारांनी राबवलाय. ‘शंभर मी’ ही या समकालाची कादंबरी आहे. अस्मितेच्या हजार तुकड्यांत विखुरलेला ‘मी’ आणि त्याच्या विखुरलेपणाला सामोरी जाणारी भाषा या दोन्हीचं डायलेक्टिक लौकिक ‘शंभर मी’ने नेमकं पकडलंय. ते पकडताना कंद प्रश्नाने सांधलेला, हजार तुकड्यांत विखुरलेला फॅार्म त्यांनी शोधून काढलाय.

श्याम मनोहरांच्या लेखनावरच्या जे. कृष्णमूर्ती आणि नित्शेच्या प्रभावावर सतीश तांबे यांनी ‘लेखाजोखा’मध्ये लिहिलं आहे. श्याम मनोहरांच्या लेखनावर एक तिसरा अत्यंत खोल प्रभाव आहे तो म्हणजे वैज्ञानिक शोधप्रणालीचा. अविवेकी मनुष्यप्राण्याची विवेकाची निकड फक्त शास्त्राच्या चौकटीत भागवली जाते. त्या मेथडॉलॉजीचा प्रयोग-अनुमान-निष्कर्ष पद्धतीचा श्याम मनोहरांच्या कादंबरीरचनेवर प्रभाव आहे. ‘शंभर मी’ हा या अर्थानेही ‘मी म्हणजे काय काय काय’ शोधणारा प्रयोग आहे.

‘मी कोण?’ हा भारतीय संस्कृतीतील आद्य प्रश्न. उपनिषदांतले ऋषीदेखील रानात जाऊन हे सारं भवताल बघणारा, अनुभवणारा, भोगणारा ‘मी’ कोण आहे, या प्रश्नापासून सुरुवात करून आत वळायचे. एका अर्थाने श्याम मनोहरांनी ‘मी कोण’ला डावलून ‘मी काय?’ हा प्रश्न विचारून भारतीय अध्यात्माच्या कचाट्यातून कादंबरीची मुक्ती करून घेतलीय.

‘मी काय?’ची अनेक उत्तरं- (शंभराहून अधिक) त्यांनी रचली आहेत. नामरूपाकडून सुरुवात करून तो ‘मी’ नक्की वर्णन करता येतो काय? (प्रणवमामा, ओंकारमामा, सोहंमामांचं प्रकरण.) की शरीर, सेक्स, मूल होणं, जन्म, वंध्यत्व या जैविक हालचालींतून प्रगट होतो? श्याम मनोहरांची ‘शंभर मी’ सलील वाघांच्या भाषेत बोलायचं तर ‘विनानेपथ्याच्या निवेदनभूमी’वरून या प्रश्नाकडे बघते.

वाचकाला प्रोटॅगॉनिस्टचा एकसंध ‘मी’ ही कादंबरी लाभू देत नाही, तर ‘मी’च्या हजार ज्ञानशास्त्रीय शक्यता ती तपासते. ‘मी’चं स्वरूप तपासणं हा तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात सत्ताशास्त्रीय प्रश्न आहे. ‘मी’चं असणं श्याम मनोहर तपासतात तो सारा प्रयोग ‘मी’चं ज्ञानशास्त्रीय संशोधन आहे.

भाषेतला ‘मी’, लहान मुलाचा ‘मी’, दुसर्‍याचा ‘मी’ न्याहाळणं हे क्रौर्य आहे हे जाणलेला ‘मी’, संस्करणातून अविवेकासकट जगू पाहणारा, अहंकारातून मुक्ती झाल्याचं भान येणारा एका प्रेताचा ‘मी’- सारे ‘मी’ श्याम मनोहर एकत्र आणतात, रचतात, त्यांची मांडणी करतात. वाचकाला या ‘मी’च्या ‘काय काय’पणाला प्रश्न करायला लावतात.

श्रेष्ठ कलाकृती ही संस्कृतीच्या केवळ समकालीन नव्हे तर निरंतर प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते. ‘शंभर मी’ ते साध्य करते. म्हणूनच ती श्रेष्ठ कलाकृती आहे.

‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तम राव’, ‘कळ’ आणि ‘उत्सुकतेने मी झोपलो’ हे श्याम मनोहरांचे प्रयोग मानवी अस्तित्वाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. या तिन्हींपेक्षा ‘शंभर मी’ निराळी आहे ती तिच्या वाचनीयतेमुळे आणि अ‍ॅक्सेसिबिलिटीमुळे. अधिक अधिक मोठ्या साक्षर समुदायापर्यंत पोहोचण्याची क्षमता असणारी वाचनीय कलाकृती हे ‘शंभर मी’चं आणखी एक बलस्थान.


समकालातील एक महत्त्वाचा, जागं करणारा, भानावर आणणारा प्रयोग म्हणून ‘शंभर मी’ ही जशी वाचली जाईल, अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल तशी तिची महत्ता परिचित होत जाईल.


आपली स्मृती एका सलग ‘मी’ची निर्मिती करते. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनुभव घेणारा एक सलग ‘मी’ देहाच्या आत राहतो, अशी परस्परपोषक समजूत बाळगून समाजव्यवहार चालतात, पण ज्ञानव्यवहार तसा चालत नाही. 


मूल न होणार्‍या बाईचा ‘मी’, बायको दुसर्‍याला लागू असलेल्या पुरुषाचा ‘मी’, मनातल्या मनात रचलेल्या प्रयोगांचा साक्षीदार ‘मी’, भाषेत व्यक्त होणारा लिंगांची विभिन्नता ओळखणारा ‘मी’ हे ‘शंभर मी’तले सारे ‘ व्यवहारातले आणि तरीही सलग न राहू शकणारे 'मी’ आहेत.

मला जाणवणारा मनोहरांच्या ‘मी’च्या विश्लेषणातला, स्त्रीलिंगी ‘मी’च्या चित्रीकरणातला परंपरागत भाबडेपणा कधी अस्वस्थ करतो. मात्र, अशा काही जागा वगळता हा ‘मी’ ज्ञानव्यवहारात लिंगभावनिरपेक्ष वावरत असतो.


ग्लोबलायझेशनने मुक्त झालेला (काही प्रमाणात) समाज किती निरनिराळ्या माहितीच्या इनपुट सिस्टीम्सवर पोसला जातो आणि त्यातून व्यक्तींचे ‘मी’ कसे घडत जातात याचा ज्या सूक्ष्म नजरेने मनोहर वेध घेतात तो खरोखरच अभ्यासपूर्ण आहे.

असणे म्हणजे काय? ‘मी’ची भरवण करताना भवतालातून कोणत्या गोष्टींना ‘मी’ स्वीकारतो त्याला प्रश्न विचारतो, त्यामुळे घडविला जातो. ही सारी प्रक्रिया मनोहर निगुतीने मांडतात.

या कथात्म साहित्यातला ‘मी’ मानवांना सांगतो, ‘मानवहो, मी तुमची श्रद्धा मागत नाही. तुम्हाला स्वतंत्र ठेवतो.’ तर वाचकाला स्वातंत्र्याच्या भानापर्यंत नेणारी ही आधुनिक, शोधनमार्गी संहिता आहे आणि प्रयोगशील वाचकासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे यात शंका नाही.


शंभर मी / श्याम मनोहर / पॉप्युलर प्रकाशन /

पृष्ठे : ३३६/ मूल्य : ३२५ रुपये

Friday, September 11, 2020

मूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग
समाजमानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात 2010 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर २००४ साली वादग्रस्त लेख लिहिला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक लेखांतून आणि मुलाखतींतून चंगळवादी बनलेल्या, जुनी मूल्ये हरवलेल्या मध्यमवर्गाचे विश्लेषण हे सूत्र सतत दिसून येत होते. भारताच्या आर्थिक प्रगतीचे खरे पेव ज्या वर्गामुळे फुटले तो हा 'द ग्रेट इंडियन मिडलक्लास'! नंदी मात्र या मध्यमवर्गाला आर्थिक प्रगतीचे व्हॅनगार्डस न मानता - फक्त वस्तूंचा वापर, विक्रय आणि त्यावर उधळपट्टी करणारा, मूल्यांची चाड नसणारा हुकुमशाहीशरण मध्यमवर्ग आहे असे मानतात आणि त्यांवर टीका करतात. मोदींना निवडून आणणारा हा मध्यमवर्ग आहे.


आपण सगळे स्वतःला मध्यमवर्गाचा भाग समजतो म्हणून ही 'नव्या-मध्यमवर्गा'वर होणारी टीका समजावून घेणे, तिचा विचार करणे आणि त्यातला कंद मुद्दा जाणून घेणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटतं.

मध्यमवर्ग म्हणताक्षणी आपल्या नजरेसमोर त्या मध्यमवर्गाच्या मूल्यांचा एक समुदाय उभा ठाकतो. नेकीने नोकरी करणे, कामात सचोटी बाळगणे, शिक्षणाला -डिग्रीला प्रचंड महत्त्व देणे, न्याय्य भूमिकेसाठी आग्रह धरणे, चौकटीतले जगणे जगत असताना त्या चौकटीबाहेरच्या, त्यात सामावल्या न जाणा-या व्यक्ती अगर समूहांबाबत चॅरिटेबल विचार करणे, हिंसेची भयास्तव का होईना नालस्ती करणे, उधळपट्टी न करणे, बचत हे मूल्य मानणे, कर्जाला घाबरून असणे, कोर्ट-कज्ज्यांना शक्यतो नाकारणे; तरीही नेहरूप्रणित समाजवादी, लोकशाही मूल्यांच्या चौकटीत सर्व विसंगतींसकट बसणे अशी मूल्ये 'जुन्या मध्यमवर्गा'चा विचार करताना दिसून येतात. मराठी मध्यमवर्गाने ही सरमिसळ, नेमस्त मूल्ये कित्येक काळ उराशी बाळगली.

जगभरातच मध्यमवर्गाची निर्मिती ही औद्योगिकीकरणानंतर झाली. फ्रेंच भाषेत औद्योगिकीकरणानंतर जन्माला आलेल्या या वर्गाला 'पेटी बूर्ज्वा' असे नावही मिळाले. शहरीकरणाच्या प्रक्रियेत, रॅशनल आर्थिक गणितात शेतीपासून क्रमश: तुटत गेलेला हा 'व्हाईट कॉलर' समाज निर्माण झाला. आधुनिक शासनाने निर्माण केलेल्या नोकरशाहीने या मध्यमवर्गाला पगार दिले आणि त्यातूनच ज्ञान श्रमातून, व्यवस्थापन श्रमातून, सल्लागार श्रमातून वाढणारी मध्यवर्गीय मूल्ये निर्माण झाली. भारतात या मध्यमवर्गाच्या उगमाकडे जाताना इंग्रजांच्या राज्यातल्या 'बाबू' लोकांकडे प्रथम जावे लागते. शिक्षक, कारकून, साहेब ते सैन्यातले छोटे अधिकारी या सर्व, शासनाने पोसलेल्या पगारी नोकरदारांमधून भारतीय मध्यमवर्गाची निर्मिती झाली.
भारतातल्या या पहिल्या फळीतल्या मध्यमवर्गाने ज्यामध्ये तथाकथित उच्चवर्णीय जातींचा समावेश होता त्यांनी, परंपरागत उच्चवर्णीय मूल्ये आणि इंग्रजी सत्तेला आवश्यक ती पाश्चात्य मूल्ये यांच्या संकरातून आपले पर्याय निवडले. 'वर्क इज वर्शिप’, ‘ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी' ही काही ब्राह्मणी मूल्ये नव्हती तर ती प्रोटेस्टंट मूल्ये होती. अशा भारतीय उच्चवर्णीय आणि पाश्चात्य मूल्यांच्या संकरातून जुन्या मध्यवर्गीय जाणिवा निर्माण झाल्या.

असे सगळे लिहिताना मला मराठी वाड्मयीन परंपरेतले काही प्रातिनिधीक मध्यमवर्गीय आवाज आठवतात - केतकरांपासून ते अगदी तेंडुलकरांच्या 'कन्यादान'पर्यंत, या मध्यमवर्गाची वेगवेगळी रूपे समोर येतात. या सगळ्यांच्या जोडीने शाहुमहाराजांमुळे पश्चिम महाराष्ट्रात थोडा निराळा मध्यमवर्ग निर्माण झाला. कर्मवीर ते किर्लोस्करवाडी असे त्या मध्यमवर्गाचे काही ठळक प्रवाह आपल्या नजरेसमोर येऊ शकते.

या जुन्या मध्यमवर्गाच्या मूल्यांचे रेषेरेषेच्या फरकाने प्रतिनिधीत्व मटा, लोकसत्ता ही माध्यमे परंपरा मराठीत करताना दिसते. जुना मटा बदलला, तशी जुनी मटाप्रणित मूल्ये बदलली आहेत. आता ‘शॉपर्स स्टॉप’ आणि ‘मॉल्स’मध्ये जाणारा, क्रेडिट कार्ड, आयटी, इंग्लिश, मॅकडीचे बर्गर- संस्कृतीतल्या मध्यमवर्गाकडे, बाय द वे ज्याला एकीकडून दिवाळी पहाट, आणि संदीप खरे आवडतात त्या मध्यमवर्गाची मूल्ये कोणती आहेत? हा नवा मध्यमवर्ग 'मूल्ये' हरवलेलाआहे की त्याने त्याची नवी मूल्यव्यवस्था बनवली आहे? आणि ती जुन्या मध्यमवर्गाला पटत का नाही?

अमेरिकन हावरटपणा, भारतीय दुटप्पीपणा यांच्या उथळ मिश्रणातून या नव्या मध्यमवर्गाची काही मूल्ये जुन्या मध्यमवर्गाला उलगडताना मला दिसताहेत. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक भाबडा, सुलभ नॉस्टॅल्जियादेखील जाणवतो आहे.

नवमध्यमवर्गाच्या या हपापलेपणाकडेही आपल्याला सांभाळून बघावे लागेल. स्थलांतराने, आपल्या मूळांपासून पूर्ण फारकत झालेल्या या नव्या मध्यमवर्गाने आपले सारे काही सुबत्तेसाठी पणाला लावले आहे. आपली, 'बिलाँगिंग'ची भूक हा मध्यमवर्ग वस्तूंनी भरून काढतोय! त्याला सगळे हवे आहे, आत्ताच्या आत्ता! त्याला याच आयुष्यात सारी सुखे उपभोगायची आहेत. हे करताना, अमेरिकन मध्यमवर्गाला काही परिमाणात लपेटून बसलेली सुप्त गिल्ट या भारतीय मध्यमवर्गाला डसलेली नाही. त्यामुळे भारतीय नवा मध्यमवर्ग हा अधिक खुला, अधिक बॅंडएड उत्तरे शोधणारा बनत चाललेला आहे. युरोपीयन मध्यमवर्गाला असलेले विवेकवादाचे झाकण किंवा अमेरिकन मध्यमवर्गाला ग्रासणारी ख्रिश्चन पापकल्पना भारतात नाही. म्हणून भारतीय नव्या मध्यमवर्गाची हिंसा आणि हावरटपणा दिवसेंदिवस exponential वेगाने वाढत जाणार हे उघड आहे.

मग या नव्या मध्यमवर्गासाठी नवी मूल्ये येणार तरी कुठून? मला या प्रश्नाचे उत्तर दोन बाजूंनी सापडण्याची शक्यता दिसते. त्यासाठी एक म्हणजे इंग्रजपूर्व काळात आपली मूल्ये कुठून आली याचा विचार आपण करायला हवा. क्षत्रिय समाजरचनेला आवश्यक 'स्वामिनिष्ठा' हे प्रधानमूल्य त्या काळात होते आणि त्याचबरोबर भागवतधर्माने त्यांच्या दर्शनातून माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी कसे वागावे? याची मांडणी केलेली होती. या जुन्या मूल्यसमूहाकडे अधिक उघड्या आणि खुल्या पद्धतीने आपल्याला बघावे लागेल.

ते साध्य करण्यासाठी जे. कृष्णमूर्ती, ओशो यांच्यासारखे आधुनिक ऋषी, साठच्या दशकातल्या नवी आध्यात्मिकता कदाचित कामी येईल. सध्याच्या 'ग्रीन'-पर्यावरणा प्रेमी कडूनही काही स्वागतार्ह मूल्ये स्वीकारता येतील.

दुसरीकडे मला ख्रिश्चन विचारसरणीचे विविध परिपाक-पर्याय डोळ्यांसमोर येतात. अल्बर्ट एलिस , व्हिक्टर फ्रॅंकेल इत्यादी मानसशास्त्रज्ञांच्या लेखनाचा उपयोग मूल्यांच्या निर्मितीत होऊ शकतो.

नव्या कॉर्पोरेट्समधून निर्माण होणा-या, HR ट्रेनिंगनं वाढणा-या या नव्या वर्किंग क्लासला ही दुसरी पर्यायी मूल्ये ड्रकर पासून कोव्हीपर्यंत उपलब्ध होतील. या नव्या मूल्यांची वाहणी फेसबुक, ट्विटर यांच्यासोबत नवनव्या कॉर्पोरेट व्हिजन-मिशनच्या मूल्यव्यवस्थेतूनही होईल. बाबू क्लासच्या पलीकडचा हा 'प्रायव्हेट सेक्टर क्लास' मध्यमवर्गाची मूल्ये भावी काळात ठरवेल. ही सारी समकालीन अमेरिकन वर्गाची मूल्ये आहेत.

या नव्या मध्यमवर्गापुढे कर्मफल सिद्धांताला पूर्ण बकवास समजून, हिंसेने सारे प्रश्न सोडवण्याचा पर्यायही उभा असणारच आहे. यातले निवडीचे पोस्टमॉडर्न कंपल्शन मध्यमवर्गाला नकोसे वाटते. त्यांना वोक-आदेशांची भूक नव्याने लागत आहे.

नंदींची टीका मला पूर्णत: पटत नाही. या नव्या मध्यमवर्गाला 'मूल्ये' नाहीत असे मोडीत काढण्यापेक्षा कोणत्या मार्गाने आपण त्या कंझंप्शन क्लासपर्यंत पोचणार आहोत याचा विचार आमच्या माध्यमांनी, लेखकांनी, विचारवंतांनी करायला हवा.
नव्या मध्यमवर्गीय नीतिशास्त्राची शोधन-समीक्षाकेंद्री मांडणीच श्याम मनोहरांनी 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू' या कादंबरीत केली आहे. मराठी मध्यमवर्गाचा घेट्टो म्हणज पुणेरी जाणिवा - त्यांना सोलून त्यांचा मूलगामी क्रिटिक आणि संशोधनाची ज्ञानमार्गी महत्ता मनोहरांनी अधोरेखित केली आहे.

नंदींच्या मूल्ये हरवलेल्या मध्यमवर्गापलीकडे असलेला मूल्यांच्या शोधातला हा मध्यमवर्ग मला अधिक महत्त्वाचा वाटतो आणि भावी काळासाठी अधिक लक्ष देण्यायोग्य !