Wednesday, October 7, 2020

शंभर मी - एक ज्ञानशास्त्रीय प्रयोग

श्याम मनोहर यांची नवी कादंबरी ‘शंभर मी’ हा मराठी कादंबरीलेखनाच्या परंपरेतला एक महत्त्वाचा प्रयोग आहे- मराठी वाचकांनी त्याचा अनुभव घ्यायला हवा असा.

श्याम मनोहर आवडणार्‍या लोकांना ‘नेमाडे’ नावडतात. किंबहुना, नेमाडे नावडतात म्हणूनच श्याम मनोहर आवडतात असं त्यांनी ठरवलेलं असतं. अशा आवडीत आणि नावडीतही फारसं स्वारस्य नसतं. कारण कादंबरीच्या श्रेष्ठत्वाच्या निकषांवर नव्हे तर व्यक्तिगत किंवा साहित्यिक राजकारणाचा भाग म्हणून अशी आवड-निवड जन्माला आलेली असते.

मराठी कादंबरीच्या पटावर भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर हे दोन ध्रुव आहेत. नेमाड्यांची कादंबरी काळाच्या विस्तृत पटावर प्रोटॅगॉनिस्टला उभा करून त्याच्या नजरेने असण्याचा अन्वय मांडते. नेमाडे भावात्मक बुद्धीची कमाल दाखवताना कधी राजकीय खेळी रचतात. नेमाड्यांची कादंबरी वाचकाला गुंगवते, त्यावर गारूड करते

मनोहरांची कादंबरी वाचकाला, त्याच्या एकसंध असण्याच्या पूर्वकल्पनेला प्रश्न करत त्याच्यावर गारूड तर करत नाहीच, उलट त्याला भानावर आणते, जागं करते, सलगतेच्या हिप्नॉसिसमधून बाहेर काढायला वेगवेगळ्या प्रश्नांचे व्यूह रचते. त्यामुळेच श्याम मनोहरांची कादंबरी ही मराठीतील खर्‍या अर्थाने शोधनमार्गाने जाणारी कादंबरी आहे.


‘शंभर मी’ हा प्रयोग आहे. या प्रयोगाला कादंबरी का म्हणायचं? ‘कादंबरी’ असण्याच्या आवश्यक आणि पुरेशा अटी कोणत्या? काळाची रचना, निवेदन, पात्रांची रचना, कथानक, त्यातला संवाद, विरोध, समतोल? ‘कादंबरी’ हा आधुनिकतेला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेला घाट अनेकांनी विविध प्रकारांनी राबवलाय. ‘शंभर मी’ ही या समकालाची कादंबरी आहे. अस्मितेच्या हजार तुकड्यांत विखुरलेला ‘मी’ आणि त्याच्या विखुरलेपणाला सामोरी जाणारी भाषा या दोन्हीचं डायलेक्टिक लौकिक ‘शंभर मी’ने नेमकं पकडलंय. ते पकडताना कंद प्रश्नाने सांधलेला, हजार तुकड्यांत विखुरलेला फॅार्म त्यांनी शोधून काढलाय.

श्याम मनोहरांच्या लेखनावरच्या जे. कृष्णमूर्ती आणि नित्शेच्या प्रभावावर सतीश तांबे यांनी ‘लेखाजोखा’मध्ये लिहिलं आहे. श्याम मनोहरांच्या लेखनावर एक तिसरा अत्यंत खोल प्रभाव आहे तो म्हणजे वैज्ञानिक शोधप्रणालीचा. अविवेकी मनुष्यप्राण्याची विवेकाची निकड फक्त शास्त्राच्या चौकटीत भागवली जाते. त्या मेथडॉलॉजीचा प्रयोग-अनुमान-निष्कर्ष पद्धतीचा श्याम मनोहरांच्या कादंबरीरचनेवर प्रभाव आहे. ‘शंभर मी’ हा या अर्थानेही ‘मी म्हणजे काय काय काय’ शोधणारा प्रयोग आहे.

‘मी कोण?’ हा भारतीय संस्कृतीतील आद्य प्रश्न. उपनिषदांतले ऋषीदेखील रानात जाऊन हे सारं भवताल बघणारा, अनुभवणारा, भोगणारा ‘मी’ कोण आहे, या प्रश्नापासून सुरुवात करून आत वळायचे. एका अर्थाने श्याम मनोहरांनी ‘मी कोण’ला डावलून ‘मी काय?’ हा प्रश्न विचारून भारतीय अध्यात्माच्या कचाट्यातून कादंबरीची मुक्ती करून घेतलीय.

‘मी काय?’ची अनेक उत्तरं- (शंभराहून अधिक) त्यांनी रचली आहेत. नामरूपाकडून सुरुवात करून तो ‘मी’ नक्की वर्णन करता येतो काय? (प्रणवमामा, ओंकारमामा, सोहंमामांचं प्रकरण.) की शरीर, सेक्स, मूल होणं, जन्म, वंध्यत्व या जैविक हालचालींतून प्रगट होतो? श्याम मनोहरांची ‘शंभर मी’ सलील वाघांच्या भाषेत बोलायचं तर ‘विनानेपथ्याच्या निवेदनभूमी’वरून या प्रश्नाकडे बघते.

वाचकाला प्रोटॅगॉनिस्टचा एकसंध ‘मी’ ही कादंबरी लाभू देत नाही, तर ‘मी’च्या हजार ज्ञानशास्त्रीय शक्यता ती तपासते. ‘मी’चं स्वरूप तपासणं हा तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात सत्ताशास्त्रीय प्रश्न आहे. ‘मी’चं असणं श्याम मनोहर तपासतात तो सारा प्रयोग ‘मी’चं ज्ञानशास्त्रीय संशोधन आहे.

भाषेतला ‘मी’, लहान मुलाचा ‘मी’, दुसर्‍याचा ‘मी’ न्याहाळणं हे क्रौर्य आहे हे जाणलेला ‘मी’, संस्करणातून अविवेकासकट जगू पाहणारा, अहंकारातून मुक्ती झाल्याचं भान येणारा एका प्रेताचा ‘मी’- सारे ‘मी’ श्याम मनोहर एकत्र आणतात, रचतात, त्यांची मांडणी करतात. वाचकाला या ‘मी’च्या ‘काय काय’पणाला प्रश्न करायला लावतात.

श्रेष्ठ कलाकृती ही संस्कृतीच्या केवळ समकालीन नव्हे तर निरंतर प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते. ‘शंभर मी’ ते साध्य करते. म्हणूनच ती श्रेष्ठ कलाकृती आहे.

‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तम राव’, ‘कळ’ आणि ‘उत्सुकतेने मी झोपलो’ हे श्याम मनोहरांचे प्रयोग मानवी अस्तित्वाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. या तिन्हींपेक्षा ‘शंभर मी’ निराळी आहे ती तिच्या वाचनीयतेमुळे आणि अ‍ॅक्सेसिबिलिटीमुळे. अधिक अधिक मोठ्या साक्षर समुदायापर्यंत पोहोचण्याची क्षमता असणारी वाचनीय कलाकृती हे ‘शंभर मी’चं आणखी एक बलस्थान.


समकालातील एक महत्त्वाचा, जागं करणारा, भानावर आणणारा प्रयोग म्हणून ‘शंभर मी’ ही जशी वाचली जाईल, अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल तशी तिची महत्ता परिचित होत जाईल.


आपली स्मृती एका सलग ‘मी’ची निर्मिती करते. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनुभव घेणारा एक सलग ‘मी’ देहाच्या आत राहतो, अशी परस्परपोषक समजूत बाळगून समाजव्यवहार चालतात, पण ज्ञानव्यवहार तसा चालत नाही. 


मूल न होणार्‍या बाईचा ‘मी’, बायको दुसर्‍याला लागू असलेल्या पुरुषाचा ‘मी’, मनातल्या मनात रचलेल्या प्रयोगांचा साक्षीदार ‘मी’, भाषेत व्यक्त होणारा लिंगांची विभिन्नता ओळखणारा ‘मी’ हे ‘शंभर मी’तले सारे ‘ व्यवहारातले आणि तरीही सलग न राहू शकणारे 'मी’ आहेत.

मला जाणवणारा मनोहरांच्या ‘मी’च्या विश्लेषणातला, स्त्रीलिंगी ‘मी’च्या चित्रीकरणातला परंपरागत भाबडेपणा कधी अस्वस्थ करतो. मात्र, अशा काही जागा वगळता हा ‘मी’ ज्ञानव्यवहारात लिंगभावनिरपेक्ष वावरत असतो.


ग्लोबलायझेशनने मुक्त झालेला (काही प्रमाणात) समाज किती निरनिराळ्या माहितीच्या इनपुट सिस्टीम्सवर पोसला जातो आणि त्यातून व्यक्तींचे ‘मी’ कसे घडत जातात याचा ज्या सूक्ष्म नजरेने मनोहर वेध घेतात तो खरोखरच अभ्यासपूर्ण आहे.

असणे म्हणजे काय? ‘मी’ची भरवण करताना भवतालातून कोणत्या गोष्टींना ‘मी’ स्वीकारतो त्याला प्रश्न विचारतो, त्यामुळे घडविला जातो. ही सारी प्रक्रिया मनोहर निगुतीने मांडतात.

या कथात्म साहित्यातला ‘मी’ मानवांना सांगतो, ‘मानवहो, मी तुमची श्रद्धा मागत नाही. तुम्हाला स्वतंत्र ठेवतो.’ तर वाचकाला स्वातंत्र्याच्या भानापर्यंत नेणारी ही आधुनिक, शोधनमार्गी संहिता आहे आणि प्रयोगशील वाचकासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे यात शंका नाही.


शंभर मी / श्याम मनोहर / पॉप्युलर प्रकाशन /

पृष्ठे : ३३६/ मूल्य : ३२५ रुपये

No comments:

Post a Comment