Friday, September 17, 2010

मास्तरांच्या नसण्याचं ऊन

सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय; तो मूळातून वाचावा असा आहे. महत्वाचा आहे. कारण लेख फक्त कौतुक संप्रदायातला नाही. ‘अज्ञानापोटी अति कौतुक’ हा मराठी वाङमयास ग्रासणारा दुर्गुण तर आहेच परंतु तो अनेक सुमार मनोवृत्तींचं द्योतक आहे. चलाख आणि सुमार माणसाला आपण सुमार आहोत हे कळलं की तो ‘सर्वांचं बेफाट कौतुक’ अशी सर्वसमावेशक रणनीती आपलीशी करतो. ही केवळ खुशमस्करेगिरी नसते, तर हा विनिमय असतो. ‘मी तुमचं कौतुक करतो तुम्ही माझं सुमारत्व उघडं पाडू नका’ असा चलाख विनिमय! पण नामदेव ढसाळांचा लेख ( या वेळी तरी) विनिमयाच्या कंगो-यापलीकडचा म्हणून महत्त्वाचा आहे. मास्तरांनी सत्तरच्या दशकानंतरचं बदलतं गिरणगाव, तिथलं राजकारण का टिपलं नाही? असा प्रश्न नामदेव ढसाळ विचारतात. त्याचा खोलात विचार करावाच लागतो. सुर्वेमास्तरांबद्दल असे काही प्रश्न पडतात आणि काही अनुत्तरितही राहतात.
सुर्वेमास्तरांच्या निधनानंतर त्यांचा मानसपुत्र मुकुंद सावंत यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेत श्रध्दांजली सभा आयोजित केली होती. त्या दिवशी त्या समाजविज्ञान संस्थेत त्या बहुतांश अमराठी समुहात मास्तरांना आठवताना कवितेचा, जगण्याचा, डाव्या चळवळींचा मोठा पट सामोरा आला. संस्कृतीला काचणारे प्रश्न कविता निर्भयपणे मांडते आणि जिथे माणसं बघू इच्छित नाहीत अशा, कार्पेटखालच्या वास्तवावर तीव्र उजेड पाडते. मास्तर तर भारतीय संस्कृतीला फास लावणा-या अनेक प्रश्नांच्या तिठ्यावर उभे होते. त्यांच्या कवितेनं मराठी सरस्वताला भानावर आणलं. इश्क आणि इन्किलाब या उर्दू परम्परेतल्या दोन भूमिकांवर त्यांनी कामगार वर्गाच्या अनुभवांचं जे अफाट कलम केलं, ते किती महत्त्वाचं! आणि त्यांचा मनात अपराधीभाव बाळगणारा बाप. नात्यांच्या ताण्याबाण्यातून उलगडणारं शहराचं लुम्पेन वास्तव. किती अमानवी वास्तवाच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं मास्तरांनी.
हिंदू कुटुंबानं वाढवलेला हा ‘जातलेस’ माणूस. ‘मास्तरांची सावली’ हे कृष्णाबाईंचं आत्मचरित्र वाचून वाटतं, की अशा ‘बाळगलेल्या’, ‘पाळलेल्या’ पण नाही – फक्त ‘बाळगलेल्या’ या मुलानं या ‘गुंग्या ग्रहावर’ स्वत:ची किती ‘अस्खलित सिग्नेचर’ उमटवली. मेघना पेठेचा ‘अजातपुत्रास अनौरस आईचा अनाहूत सल्ला’ त्याच सुमारास प्रसिध्द झाला होता. वाटलं, मास्तरांना अशा अनौरस आईचा अनाहूत सल्ला जणू आतून कळला होता. म्हणून कवितेसदृश कोणतंही वातावरण नसताना हा नारायण कवितेत व्यक्त झाला.
‘जातलेस असणं’ हा एक काच; तर दुसरा काच म्हणजे सर्व मराठी काव्यपरंपरा ‘विठोबाग्रस्त’ असण्याचा. या भक्तीपलीकडे जाणारा सुर्वेमास्तर हा पहिला लोकयत महान कवी. करंदीकर , मुक्तिबोधांनी मार्क्सवादी कविता लिहिली, परंतु त्या अर्थानं, मास्तरांनी फक्त माणसाची कविता लिहिली. स्वत:ची जातकुळी तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर अशी तपासून पाहूनही मास्तर निराळे राहिले. मास्तरांची महत्ता जेंव्हा भवताली सारा खरेपणा, सच्चाई गिळून टाकणारं वास्तव असतानादेखील ते कवितेत जेन्युईन राहिले यात आहे. त्यांची कविता हीच नव्या क्रांतीची पताका.
मास्तरांच्या कवितेत कित्येक पात्रं भेटतात. त्यांतला ‘जिवा’ माझा सगळ्यात लाडका. ‘तुमच्या त्या उदास रात्री मला नकोत’ म्हणून कवींनाही प्रॅग्मॅटिक फटकारणारा. मास्तरांनी माणसाला आणि मार्क्सला कवितेत खेचून आणलं. मास्तरांच्या चरित्रातले विविध तिढे, त्यांचं कामगारवर्गातलं स्थान या सा-यांमुळेच त्यांची कविता वेगळी झाली. मात्र असं सारं असूनही मास्तरांचा सुलभ डावेपणा कधीकधी डाचतो. त्याचबरोबर याच सोप्या/ सुलभ , ’डाव्या’ कवीला जवळ करताना मुंबईतल्या तमाम ‘बॉम्बेवासियांची’ मास्तरांप्रती असलेली टोकन चॅरिटी ऊर्फ ‘लटकी सहानुभूती’ मला त्रास देते. जर या क्रयविक्रयाच्या विक्राळ शहरात, जिथे पैसा सर्वस्व झाला, तिथं इतर कवींचं काय झालं याची पर्वा कधी कोणी फारशी केल्याचं ऐकिवात नाही. त्या शहरात या ‘बॉम्बे’वासियांनी मास्तरांच्या कवितेवर प्रेम केलं, की मास्तरांच्या टोकन अस्मितेवर? असा प्रश्न नेहमी मला पडतो. पण मास्तरांना हे कळूनही मास्तर साधे राहिले. टोकन म्हणून ते कौतुक स्वीकारतही राहिले.
वसंत  गुर्जर, तुळशी परब, वाहरू सोनावणे या माणूसकेंद्री कवितेच्या परंपरेतल्या पुढल्या कवींचं काय झालं? की मास्तरांच्या कवितेला ‘लटकी सहानुभूती’ दाखवून आम्ही इतर ‘बॉम्बे’वासियांप्रमाणे नंतरच्या कविंना विसरलो? हे आता मास्तर गेल्यानंतर तरी खरेपणानं आपण आपल्याला विचारायला हवं. काय करता येईल या कवितेला घुसमटवून टाकणा-या शहरात, ज्यांनी जगण्याशी पंगा घेतला अशा आमच्या कविपरंपरेसाठी? एकीकडून संमेलनाचे घासून बुळबुळीत झालेले ‘तेच ते’ आवाज कानावर पडत आहेत आणि मनात माझ्या तुळशीचं पुढे काय झालं? कुठे गेली त्याची कविता? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
काय पध्दतीचं टोक सुमार राजकारण गाठू शकतं याचा दर संमेलन म्हणजे एक जिवंत नमुना! कमअस्सल कवी, कमअस्सल लेखक प्रसिध्द होण्यासाठी कायम धडपडतात, पण ज्यांच्या निष्ठांचा, कवितेचा, शब्दांचा आत्मा खणखणीत असतो असे लेखक आणि कवी ‘मला मदत करा किंवा मला मान द्या’ अशी निकृष्ट भीक मागत नाहीत! सुमार साहित्यिकांना माणूस कळत नाही – माणसांना खरं साहित्य कळत नाही अशा विचित्र, सांधा निखळलेल्या चक्रात जी ‘सुमारांची सद्दी’ चालू आहे, ती अंगावर काटा आणणारी आहे.
असो. हे सारं वास्तव रेषेरेषेच्या फरकानं डाचतं... एकिकडे सुर्व्यांच्या कवितेपेक्षा त्यांच्या ‘टोकन अस्मिते’वर व्यक्त झालेली लटकी सहानुभुती आणि दुसरीकडे बेदरकार शहरातलं कवितेचा गळा घोटणारं साहित्यिक राजकारण – पण ह्या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारणारी जिवंत कविता अशी संपत नाही. ती येतेच हट्टानं उगवून – जिथं कविता उगवेल असं कदापि वाटणं शक्य नाही तिथेही! सु्र्वेमास्तरांसारखी... उकिरड्यावरही!

3 comments:

  1. लयाला जात नसलेली गोष्ट अशी आहे की, लटकी सहानुभूती दाखवणारे हे लोकच समाज नावाच्या हलत्या गाड्याचे चालक मालक झाले आहेत. आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्यावर त्यांची पाशवी पकड आहे. म्हणजे मला टाईम्स ऑफ इंडिया वगैरे म्हणायचे आहे हे लक्षात येईलच. मराठी भल्याभल्या लोकांचे काहीही बरेवाईट झाले तरी चुकूनही त्यांना छाप्यात न घेणा-या टाईम्सने नारायण सुर्वे यांची बातमी पहिल्या पानावर अग्रभागी छापावी यापेक्षा आणखी मतलबी हिडिसपणा कुठला.. आणि दुस-या बाजूने तुम्ही.. तुम्हालाही मास्तरांना सांभाळून घेण्याचा मोह आवरत नाही.. म्हणजे.... पण मास्तरांना हे कळूनही मास्तर साधे राहिले. टोकन म्हणून ते कौतुक स्वीकारतही राहिले वगैरे वगैरे.. माझं म्हणणं.. सुर्वे हे मूलभूत होता होता राहिलेले कवी होते, पण त्यांचा कविता थांबवल्यानंतरचा उत्तरकाळ (साहित्यिक म्हणूनचा सुद्धा) कविपणाशी अगदीच सुसंगत होता असे नव्हे.. पण तरीही त्यांना काही काळ का होईना कविद्रव्य लाभलं याबद्दल त्यांना लाल सलाम..

    ReplyDelete
  2. त्याच कविद्रव्याबद्दलच्या आदरामुळे जीभ अडखळली. - ज्ञानदा

    ReplyDelete
  3. "वसंत सीताराम गुर्जर, तुळशी परब, वाहरू सोनावणे या माणूसकेंद्री कवितेच्या परंपरेतल्या पुढल्या कवींचं काय झालं?"

    हे वसंत सीताराम गुर्जर कोण? विठ्ठल सीताराम गुर्जर माहिती आहेत, ते माझे पणजोबा आणि गडकर्‍याचे मित्र...

    ReplyDelete