Thursday, January 6, 2011

इतिहास आणि अस्मिता


दोन प्रश्न
दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणात दोन प्रश्न सामोरे आले आहेत. पहिला प्रश्न सभ्यतेचा शिष्टाचार मोडून जेव्हा अनुचित वावड्यांना माध्यमातून प्रकट केलं जातं ते प्रकरण कसं हाताळायचं? समाजातल्या दडपलेल्या कार्पेट्खालची राळ जेंव्हा मूर्त स्वरूप धारण करते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे कसं बघायचं? आणि दुसरं अशा सांस्कृतिक प्रॉव्होकेशन्सना समाजातल्या धुरिणांनी कसं हाताळायचं? पब्लिक इंट्लेक्चुअलची अशा प्रसंगात नेमकी भूमिका कोणती?

लेन आणि कोंडदेव
जेम्स लेन आणि कोंडदेव प्रकरण एकमेकांशी निगडित आहे. भारतात राजकीय नेतृत्वाबाबत अशी नीच गॉसिप ही नवीन घटना नाही. जेम्स लेन या बेजबाबदार अभ्यासकानं शिवाजी महाराजांचे मिथभंजन करण्याच्या निमित्तानं गॉसिपची राळ त्याच्या संहितेत समाविष्ट केली. त्यातूनच हे पुतळा प्रकरण उद्भवले आहे. लेनच्या पुस्तकातील वाक्यावर आक्षेप घेत , पुस्तकावर बंदी घालण्याऐवजी जर महाराष्ट्र शासनाने नीट भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली असती तर ते उचित ठरले असते. मात्र आर. आर. पाटील यांनी एक भूमिका घ्यायची , ती सर्वोच्च न्यायालयात नीट मांडायची नाही यातून शासन हा प्रश्न सोडवू इच्छित नाही असे दिसून आले.
या प्रश्नासंदर्भात भूमिका घेताना सामाजिक नेतृत्वाचा कमकुवतपणा आणि राजकीय नेतृत्वाचा डामरटपणा दिसून आला.

इतिहास : सामाजिक स्मृति
इतिहास ही सामाजिक स्मृति आहे. प्रत्येक काळात वर्तमानातील प्रश्नांसोबत इतिहास रचला जातो. आणि सामाजिक स्मृतिकोशातून आवश्यक ते ऐतिहासिक दुवे आधोरेखित होतात काही दडपलेही जातात. रामायणातील शंबूकाचे प्रकटीकरण हे याच डोळ्यांनी तपासावे लागेल. मिथक, साहित्य आणि स्मृति यातून भारतीय इतिहास घडतो. पाश्चात्य इतिहासाप्रमाणे भारतीय इतिहास कल्पना ही केवळ पुराव्यांच्या आधाराने उभी रहात नाही. तर अस्मितांच्या प्रश्नाला बिलगूनच भारतीय इतिहास घडत गेलेला आहे.

आधुनिकता आणि अस्मिता

लेनच्या पुस्तकावर बंदी घालू नये असे मानणारे आधुनिकतेच्या, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा रेटून लावत आहेत. मात्र अस्मिताग्रस्त भारतीय समाजमनाला ती भूमिका समजून घेता येत नाहीये. जागतिकिकरणाच्या रेट्यात जसे तिसरे जग चेंगरायला लागले तसा अस्मितेचा प्रश्न जगभर ऐरणीवर आला. यातूनच अस्मितेचे भावनिक प्रश्न राजकीय बनले आणि आधुनिकतेतील अनेक मूल्ये त्यांच्या वसाहतवादी संदर्भामुळे मागे सारली जाऊ लागली. सर्वधर्मसमभवासारख्या मूल्यांची टीका हा याच काळाचा परिपाक. मात्र भारतीय न्यायव्यवस्था ही पुराव्यांच्या आधारे आधुनिकतेच्या चौकटीत निर्णयन करते. मात्र त्या न्यायालयीन तोडग्यातून सांस्कृतिक तोडगे निघत नाहीत. सांस्कृतिक तोडग्यांसाठी जे सामाजिक जबाबदारीचं भान आणि कळकळ समप्रमाणातआवश्यक आहे- तिचा सार्वत्रिक अभाव जाणवतो आहे. आमच्या डाव्या विचारवंतांना समाजाशी नाळ जोडून घेता येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत जे जबाबदारीचं भान अधोरेखित करावं लागतं ते आमचे डावे नेते करत नाहीत.

सामाजिक नेतृत्व
शिवाजीमहाराजांच्या शिवसेनाप्रणित राजकीय वापराची चिड्चिड मराठा समाजात खद्खदत असतानाच ’महाराज विरुद्ध छत्रपती’ या संघर्षाला लेनच्या पुस्तकामुळे गती मिळाली. सेनेचं शिवरायांचं हिन्दुत्वीकरण जेव्ह्ढं आक्षेपार्ह तितकंच सेना पॅटर्नवर बेतलेल्या ब्रिगेड आणि महासंघांचं शिवाजी महाराजांना पुरुषसत्ताक मराठा राजकारणाचे हिरो करणंही चुकीचं आहे. या दोन्ही भूमिकांना नाकारणारे धुरीण मात्र गायब आहेत. शिवराय जसे घडले ते घडवण्याचं श्रेय एकट्या जिजाऊंचं असणं शक्यच नाही अशा मूर्ख-पुरूषी मानसिकतेतून कदाचित दादोजींसारख्या शिवरायांच्या गुणी शिक्षकाला महत्वं प्राप्तं झालं असावं. शिवरायांच्या ’हिंदु’ रक्षणाच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठीही दादोजींना त्यांच्या गुरुपदी बसवण्यात आलं असावं. डॉ. सदानंद मोरे यांच्या मते शिवरायांना दादोजींनी शिकवल्याचे पुरावे आहेत. मात्र त्यांना ’गुरु’ म्हणून वाढविल्याचा ऐतिहासिक पुरावा नाही. दादोजींचं प्रमाणाबाहेर उदात्तीकरण ही एक राजकीय चाल म्हणूनच तपासावी लागेल. एकीकडे धार्मिक तर दुसरीकडे जातीय अस्मिताकरण ही या संघर्षाची दोन टोके आहेत.

इतिहासाचे अवधूत ध्यान
बुद्ध आपल्या शिष्यांना अवधूत ध्यान करण्यास सांगत असे. म्हणजे स्मशानात जाऊन मृत शरीरांकडे बघणे आणि ध्यान करणे. देहाचे सारे दशावतार बघून त्याची अंतिम गती जाणून त्यातून विरक्त होणे ही अवधूत ध्यानाची प्रक्रिया होय. देहाबद्दलाच्या आसक्तीची निरगाठ सोडविण्यासाठी बुद्धानं आपल्या शिष्यांना ही शिकवण दिली होती. इतिहासातील मृत स्मृतींचे अवधूत ध्यान करण्यासाठी आज या समाजात धीरोदात्तपणाचा संपूर्ण अभाव आहे. लेनने उचकटलेली वावडी निस्तरण्यासाठी आता इतिहास संशोधकांनी, विचारवंतांनी पुढे येऊन , नवीन भाषा घडवून, या वावडीचा संपूर्ण निपटारा करावयास हवा. असे जातीय राजकारणापलीकडे जाणारे सक्षम धुरीण सामोरे येत नाहीत ही या पोचट समाजाची शोकांतिका आहे.

जातीय राजकारण
नाकाने कांदे सोलणारा ब्राह्मणी दुराग्रह आणि छत्रपतींचा राजकीय वापर करणारा करणारा मराठा दुरभिमान या कात्रीत शिवचरित्र सापडले आहे. या ब्राह्मण-मराठा वादाचा तिसरा कोन म्हणजे ओबीसी राजकारण. दादोजी कोंडदेवांचे शिवचरित्रात नेमके स्थान काय होते ते ठरविण्यासाठी पुरके शिक्षणमंत्री असताना एक समिती नेमण्यात आली. डॉ. हरी नरके यांनी असे विधान केले की या समितीमध्ये सर्व जातींचे विद्वान समाविष्ट नव्हते. वरवर पाहता सर्व जातींच्या विद्वानांची समिती हे उदार विधान दिसले तरी ते अत्यंत जातीय विधान आहे. डॉ. नरके यांना समितिवर इतरही आक्षेप घेता आले असते ( कारण त्या समितीच्या निवडीत अनेक घोळ होतेच) मात्र नरके यांनी तसे केले नाही. विद्वानांनी, ज्यांच्यावर बौद्धिक जबाबदारी आहे त्यांनी जातीय र्‍हेटॉरिकचा आधार घेणे उचित नाही. डॉ. नरके यांना जातीयता नाकारणारे महात्मा फुले जसे ठाऊक आहेत तसेच एड्वर्ड सैदही ठाऊक असणारच. सैद म्हणतो, " The role of the intellectual is to raise embarrassing questions, to confront orthodoxy and dogma (rather than to produce them), to be someone who cannot easily be co-opted by governments or corporations someone whose whole being is staked on a critical sense, a sense of being unwilling to accept easy formulas, or ready-made clichés, or the smooth, ever-so-accommodating confirmations of what the powerful or conventional have to say, and what they do." डॉ. नरके या सैद्प्रणित जबाबदारीने बोलतील तर ते लोकशाहीवादी भूमिका पुढे नेतील. परंतु दुर्दैवाने त्यांनी ही जबाबदारी नाकारली आहे.

डॉ. मोरे वस्तुनिष्ठ चौकटीत बोलतात परंतु मराठा समाजाच्या पुरुषी मानसिकतेला टार्गेट करत नाहीत. त्यांच्यामते रुढीग्रस्त मराठा समाज स्त्रीवादी भूमिका समजू शकणार नाही. विद्याताई बाळ स्त्रीवादी भूमिका मांडत आहेत. परंतु ती ऐकण्यास समाजाचे कान सक्षम नाहीत.

भारतीय परंपरेवर आधुनिक मूल्यांचा संकर सक्षमपणे करणारी लोहियाप्रणित जातिव्यवस्थेचा बिमोड करायची भाषा कुणीच करताना दिसत नाहीत. चॅरिटेबल जातीय सहानुभूती बाळगतच वैचरिक भूमिका घेण्याचा हा बोटचेपा हा खेळ आता बंद करायची ही वेळ आहे. जात-धर्माच्या पलीकडे कर्तृत्ववान बाईचं सुपर कर्तृत्ववान मूल असं आम्हाला शिवरायांकडे बघता येणं आवश्यक आहे. ते वास्तविक आहे आणि सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात शक्यही आहे.

12 comments:

 1. ब्रिगेडसारखी रिकाम्या डोक्याची दुसरी संघटना बघण्यात नाही.

  ह्यांना त्या लाल महलात दादोजींचा पुतळा का होता ह्याचीच माहिती आहे की नाही अशी शंका येते. आणि महत्वाचे म्हणजे दादोजींचा पुतळा हटवल्याने पुण्यातले रस्ते चांगले झाले का? सामान्य माणसाला भेडसावणार्‍या महगाईवर तोडगा निघाला का? राजकारणी प्रामाणिक झाले का? शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या का? भारनियमन आटोक्यात आले का? देशाचा जिडिपि वाढला का? दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या कमी झाली का? स्त्रीयांवरील अत्याचार थांबले का? ही यादी खूप खूप वाढवता येईल.

  धर्मांध अतिरेकी आणि हे ब्रिगेडी ह्यांच्यात काहीही फरक नाही. लोकांची माथी भडकावणे आणि इतर महत्वाच्या गोष्टींपासून समाजाचे लक्ष हटवणे ह्या उद्देशासाठी राजकारण्यांनी जन्माला घातलेलं हे पिल्लू आहे. ह्यांची अकलेची दिवाळखोरी पावलो पावली दिसून येते. पण ह्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही नाही.

  जेम्स लेनचा विरोध करण्यासाठी स्वतःच्याच देशातली बहुमूल्य साहित्य संपदा जाळणारे हे मठ्ठ लोक इतिहास बदलायच्या वल्गना करतात तेव्हा हसू येतं.

  ReplyDelete
 2. It is nothing to do with Shivaji or Dadoji.

  It is NCP's way of hinting Prithwiraj that his likely "cleanliness" drive, even if superficial, should be restricted to Congress only. Dares he extend it to NCP-affiliated-govt-officers/ministers he has "trouble" in store.

  dhananjay.gangal@gmail.com

  ReplyDelete
 3. ब्रिगेड पेक्षाही रिकाम्या डोक्याची संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जे दलितांचा विकास करण्याची भाषा करतात त्यांच्या संघटनेत किती दलित सरसंघचालक झाले? बाबरी मशीद, अजमेर, हैदराबाद, मालेगाव प्रत्येक ठिकाणी संघ परिवाराचे लोक सापडले आहेत. तरीही संघ मात्र केवळ सामाजिक कार्य करणारी संघटना आणि संभाजी ब्रिगेड ने एक भांडारकर फोडले म्हणून ते अतिरेकी?आणि दादोजींचा पुतळा काढल्याने रस्ते सुधारले नाहीत असे जे बोलतात त्यांनी बाबरी मशीद फोडण्याच्या वेळी हा प्रश्न का बरे विचारला नाही?
  ज्यांना ब्रिगेडची भाषा खुपते त्यांना हिंदुत्ववादी नेत्यांनी अहिन्दुंच्या बाबतीत वापरलेली भाषा मात्र सोज्वळ वाटते. बौद्ध धर्माचा इतिहास दडपून सर्व काही हिंदूंच्या नावावर खपवलेले चालते. पण वैदिक धर्माच्या विरोधात कोणीही बोलले तर मात्र यांचे रक्त खवळून उठते. जो धर्म स्वतःच्याच ८५ टक्के अनुयायांना समान दर्जा देत नाही त्या धर्माचे हे ठेकेदार आहेत.

  ReplyDelete
 4. इतिहासाकडेच नव्हे तर कोणत्याच गोष्टीकडे तर्कशुद्धपणे पाहता न येणं हा आपला भारतीयांचा सामंती गुणधर्मच आहे..आणि इथलं राजकारण या गोष्टीचा अगदी पुरेपूर फायदा उठवतं.

  सतत फणा काढून फुत्कारणारी अस्मिता हा त्याचाच भाग. आणि जातीसंस्थेमुळे भारतात या अस्मितेला वेगळे आधार शोधावे लागतच नाहीत. शिवाय अस्मितेवर आधारित लढ्यांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांना व्यावहारिक प्रश्नांशी काही घेणंदेणं नसलं तरी चालतं.

  कधी शिकणार आपण माणसांकडे माणसांसारखं बघायला? इतिहासाकडे ‘घडून गेलेल्या घटना’ म्हणून बघायला? आपल्या लेखी इतिहास हा कायम गौरवशालीच असला पाहिजे. पानिपतचं युद्धसुद्धा म्हणे गौरवशालीच! "अमुक अमुक हे आमचं दैवत आहे आणि त्यांच्याबद्दल कोणी काही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही" हा आजचा परवलीचा मंत्र आहे. मग इतिहासाचा एक सोशल सायन्स - समाजशास्त्र म्हणून अभ्यास करण्याचा मार्गच खुंटतो ना!

  इथले सांस्कृतिक पुढारपण करणारे लोकही तर्कसंगत विचार करू शकत नाहीत हे दुर्दैव आहे. किंवा कोणत्यातरी कोत्या फायद्यांच्या मोहापायी ते तसा विचार करायचं टाळतात. मुळात त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच उरलेलं नाही. ते नेहमी कोणाच्या ना कोणाच्या दावणीला उभे असलेलेच असतात. मग भले त्यांनी समाजधुरीणांच्या विरोधात उभं ठाकून स्वतंत्रपणे आणि ठामपणे आपलं म्हणणं मांडत राहणाऱ्या चार्वाकांचं नाव घेवो किंवा जातींच्या पलिकडे जाऊन शोषितांचा एकच धर्म मानणाऱ्या जोतिबा फुल्यांचं.

  ReplyDelete
 5. एखाद्याचे आईबाप किंवा गुरू नेमके कोण होते ह्याच्याशी आपल्याला काय देणेघेणे ? मराठीत अशी म्हण आहे "ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये".
  आपण इतिहासात किती मागे जाणार? संशोधकांना या विषयावर वाद घालुंदेत. आपण व्यक्तीकडे पाहु. एखाद्याचे आईबाप, गुरू कोण होते यावरून त्याचा मोठेपण कमी किवा जास्त होतो का ? लॉरॅन्स ऑफ अरेबिया, लियनएर्डो डा विन्सी, फीएडएल कॅस्ट्रो हे औरस नवते.
  गुरूषिष्यांच्या जोडीमध्ये गुरू ला जास्त आणि शिष्याला उगाचच कमी महत्व दिले आहे असे सुद्धा मला वाटते.

  असो या विषयावर प्रथमच काही तरी सक्षम वाचायला मिळाले.

  ReplyDelete
 6. हे पटलं. म्हणजे या बाबतीत शिष्याला कमी महत्त्व दिलं आहे असं नाहीये, पण एकंदरितच भारतीय परंपरेत गुरूला जरा अवास्तवच महत्त्व दिले जाते. माणूस आपल्या आयुष्यात अनेक व्यक्तींकडून, अनेक घटनांमधून शिकत असतो. त्या सगळ्याला त्या त्या ठिकाणी महत्त्व असतंच, पण त्यामुळे तो गुरू महानच असला पाहिजे असं काही नाही. मला शाळेत शिकवणारे काही शिक्षक जाती-धर्माच्या बाबतीत फारच पक्षपाती होते हे आता मला कळतं, ज्याबद्दल आता मला त्यांचा राग येतो. पण त्यांनी मला गणित आणि विज्ञान चांगलंच शिकवलं.

  ReplyDelete
 7. सॉरी, सॉरी, देर से आए, मगर होपफुली दुरुस्त आए...

  प्रस्तुत राजकीय/जातीय विश्लेषणाशी दुमत नाही. लेखाच्या मूळ एथिकल प्रश्नांशी ही अर्थातच नाही. पण ब्लॉगच्या सुरुवातीचे प्रश्न लक्षात घेता, शेवटी इतिहासाबद्दलची, शिवाजी, जिजाबाई व कोंडदेवांबद्दलची चर्चा राजकीय पातळीवर होणे अपुरेच ठरेल हे नोंदवावेसे वाटते. स्त्रीवादी भूमिकेतून "कर्तृत्ववान बाईचं सुपर कर्तृत्ववान मूल असं आम्हाला शिवरायांकडे बघता येणं" कितीही वास्तविक आणि आवश्यक असले (व ते आहेच!) तरीही, ही भूमिकाही शेवटी असलेल्या वरवरच्या राजकीय इंटरप्रेटेशन्स मधेच भर घालेल. आधुनिक मराठी ऐतिहासिक समजेबद्द्लच्या काही मूळ मुद्द्यांना बाजूलाच ठेवले जाइल; आणि याच मुद्द्यांवर अजून खोलवार विचार गरजेचा आहे.

  उदा. सभ्यता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे भारतीय इतिहासपरंपरेतलं नातं. मिथक/साहित्य/स्मृति = भारतीय इतिहास, व पुरावे/कडू सत्य = पाश्चात्य इतिहास ही बायनरी फारच सोपी आणि काही प्रमाणात मिसलीडिंग आहे. भारतीय इतिहासाची परंपरा कितीही जुनी असली तरी या पाश्चात्य कल्पनांशी संबंध आल्यामुळे तिच्यात मूलभूत परिवर्तन झाले - पुरावे+एकसूरी सत्य+साहित्य+मिथक यांचे विचित्र मिश्रण म्हणजेच आधुनिक भारतीय इतिहासकल्पना. हे परिवर्तन प्रत्येक काळातल्या प्रश्नांसोबत बदलणार्‍या इतिहासापेक्षा मूलभूत होता. इतिहास म्हणजे काय, ही व्याख्याच कायमची भरतात याने बदलून गेली. त्यात सत्यकल्पना, आणि सत्याचा नवीन एकसूरीपणा आला; मिथक, गॉसिप्, साहित्य, या सगळ्यांशी नाते तुटले नाही, तरी त्यांच्याकडे या नवीन एकसूरीपणाच्या चौकटीतून पाहण्याची पद्धत गोवली गेली. म्हणूनच, या न्यायव्यवस्थेच्या चौकटीशी त्याचे प्रथमदर्शनी दिसतील त्यापेक्षा जवळचे संबंध आहेत.

  याच मिश्रित चश्म्यातून आपल्याला आज रामायणाचेही आकलन होते (खरोखर रामलल्ला त्याच ठिकाणी जन्मला का?) आणि शिवरायाचेही (दादोजी/रामदास गुरु होते याचा पुरावा कुठाय?), आणि या प्रश्नांना न्यायालयीन रूप पुन्हा पुन्हा येत राहते. अस्मितांना बिलगणेही आपल्याला पुराव्यांशिवाय खरंच जमतं का? पुराणकथांच्या, किंवा अलीकडच्या बखरींच्या, इतिहासाकडे पाहण्याच्या लवचिकपणाला, आणि परस्पर घडत असलेल्या अस्मितांकडेसुद्धा, पुरावे/दस्तावेज/सत्य या आधुनिक अस्त्रांमुळे आपण गमावून बसलोय. आज ही मराठी/भारतीय इतिहासकल्पनेतील डबल-एज्ड् अस्त्र होऊन बसली आहेत - राजकीय/अस्मितेच्या चौकटीत बसतात तेव्हा हवीहवीशी, आणि त्रासदायक असली की संशयास्पद आणि परसंस्कृतीचे! पण एकसूरी (सिंग्युलर) सत्याशिवाय कुठेच आपले चालत नाही, मग ते राजकीय अस्मितेच्या र्‍हेटॉरिक मध्ये असो, वा शाळेच्या पाठ्यपुस्तकात असो.

  म्हणूनच, तू म्हणतेस तसं "सांस्कृतिक तोडग्यांसाठी जे सामाजिक जबाबदारीचं भान आणि कळकळ समप्रमाणात आवश्यक आहे" हे अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी न्यायालयीन तोडग्यासहित राजकीय तोडग्याच्याही पलिकडे जावेच लागेल. ही लवचिकता (म्हणजेच, इतिहासाकडे पाहण्याचे एकाच वेळी अनेक परस्पर विरोधी दृष्टीकोन असू शकतात, त्यांना बिंबवण्याच्याही अनेक साहित्यिक पद्धती असू शकतात आणि असायला हव्यात, त्यांना राजकीय र्‍हेटॉरिक पलिकडे साहित्यिक व सांस्कृतिक् जागा करून दिली पाहिजे या कल्पना) खरोखर आपल्याला हवी आहे का? ती पेलवून घ्यायची पुन्हा आपल्या संस्कृतीत क्षमता येऊ शकेल का? या मिश्रित इतिहासकल्पनेतल्या प्रॉब्लेम्स् ना आपण पुन्हा सामोरे जायला तयार आहोत का? या सर्वांवर "इतिहास आणि ऐतिहासिकता" या वैचारिक सत्राखाली फेरविचार व्हावा लागेल. मगच कार्पेटखालीच काय राहू ध्यावे, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली काय स्वीकारावे हे आपण आपल्या परीने ठरवू शकू, नाही का?

  हे एका अर्थी एडवर्ड सईद च्या तू मांडलेल्या अजेंडातच मोडतं. पण सईद ला खरोखर सीरियसली घ्यायचे झाले, तर या (वासाहतिक) इतिहासकल्पनेच्या फेरविचारा शिवाय, आणि त्याच्या कडू लेगसीला सामोरे गेल्याशिवाय ते कठिण आहे, एवढीच मी त्यात भर घालीन! मग लेनला दोष देऊन चालणार नाही. त्याचे पुस्तकच गॉसिप-गोष्टींतून ऐतिहासिक प्रतिमा कशी तयार झाली यावर होते. ते भाबडे होते, ऍरोगंट होते, हे सगळे मान्य करून त्याचे पुस्तक ऍब्सॉर्ब् करण्याची आपली क्षमता आणि तयारीही बदलेल. आणि पुतळ्यांकडे पाहण्याची, त्यांचे महत्त्व ठरवण्याचीही!

  प्राची

  ReplyDelete
 8. I am a fan of your writings. You possess a rare combination of wide-ranging knowledge, rational thoughts and immaculate Marathi.
  By the way, I have sent you a friend request on facebook. But,I am not really sure about it, because yours is a pretty common name and there was no other way I could confirm that it was you.
  So, accept it if that’s you. Off course, only if you wish to!
  -Ambarish Vahikar

  ReplyDelete
 9. मी तुमचा हा ब्लोग खूप दिवसा पूर्वी वाचला होता आणि आत फक्त प्रतिक्रिया बघायला उघडला होता.
  @ जोशी ; पुण्यात आणि महाराष्ट्रात खूप समस्या आहेत पण त्या समस्या दादोजीचा पुतुला लावून सुटल्या का? ज्यावेळी चुकीचा इतिहास लोकांच्या डोक्यावर मारला जातो त्यामागे खूप मोठी कुटील कारस्थाने अस्टतात. तुम्ही कदाचित जोशी असल्यामुळे ते सोयीस्कर वाटत असेल. शिवाजी महाराजाचे स्मारक सुमुदरात व्ह्वावे यसाठी सरकारने ३०० कोटी मंजूर केल्या नंतर कुमार केतकर यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसल्या होत्या . त्या आत्महत्या कुंभ मेळ्यासाठी ८०० कोटी मंजूर केल्या नंतर दिसल्या नाहीत. जर कुंभ मेला लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान आहे तर महाराज काय आहेत. उलट कुंभ मेला हे हिंदू धर्मासाठी सरकारने पैसे केले असा आरोप होवू शकतो महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत तसे नाही.......

  ReplyDelete
 10. Everyone who talks about this issue, either cusses Laine (and the people who helped his research) or disses the brigade and their ilk.
  I wonder why we think it is necessary for a man to be not only great (as great as shivaji) but that everybody involved in his story have to suit perfectly to the views and opinions of the time in which he is being judjged (that is now).

  ReplyDelete
 11. Sharad Patil’s position is also important… I think much more rational than More…

  Deepak

  ReplyDelete
 12. Sharad Patil’s position is also important… I think much more rational than More…

  ReplyDelete