Monday, April 5, 2010

विमलाजी : देखण्या आयुष्याची ओळख

विमला ठकार हे या भारतात फुललेलं एक सुंदर आयुष्य होतं. विमलाजींच्या देहावसानाची बातमी लोकसत्तेत वाचली. माझ्या हातात कायम विमलाजींची पुस्तकं असायची किंवा माझ्या जवळच्या मैत्रिणींना विमलाजी मला अत्यंत आदरस्थानी आहेत हे ठाऊक होतं. त्यांच्या सोबत विमलाजींबद्दल बोलणं झालं. विमलाजी असत्या तर, 'विमल' नावाचा देह आता आपल्यात नाही असं स्पष्ट म्हणाल्या असत्या. सत्यावर नुसतं प्रेम करणारी नव्हे सत्य जगणारी, सत्य असणारी ही व्यक्ती होती. मृत्यूसमयी त्या 88 वर्षांच्या होत्या. अॅनला फोनवर मी म्हटलं, " त्या आता नाहीत यात शोक करण्यासारखं काही नाही. या विश्वाला, त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला, आयुष्याला विमलाजींनी भरभरून दिलंय, समृद्ध केलंय. काय सुंदर, देखणं आयुष्यं होतं त्यांचं!" अॅन म्हणाली, "what a remarkable life!"
पण मग कसं होतं हे आयुष्य? विमलाजींचा जन्म अमरावतीचा. घरात परंपरेनं अध्यात्म आणि विवेकवादाचं वातावरण. आजोबांकडं आध्यात्मिक सत्पुरुषांचं येणं-जाणं तर वडील रॅशनॅलिस्ट संघटनेचा विचार मांडणारे. अशा घरात, पूर्ण स्वातंत्र्यात विमलाजींचं बालपण गेलं. विमलाजींच्या चरित्रात या सर्व गोष्टींचे उल्लेख येतात. त्यांची आध्यात्मिक जिज्ञासा, प्रयोग या सर्वांचे. पण माझ्या लक्षात राहिला तो विमलाजींचा त्यांच्या वडिलांसोबत झालेला हृद्य संवाद.
विमलाजींना आध्यात्मिक जिज्ञासा आहे हे कळल्यावर वडील त्यांना म्हणाले, "तुम्हाला ज्या पद्धतीनं शोध घ्यायचा तो घ्या. पण कुणाच्याही 'गुरू' म्हणून आहारी जाऊ नका. जे मनाला, बुद्धीला पारखून घेता येईल तेच ज्ञान म्हणून स्वीकारा."
आणि हा धागा विमलाजींच्या जीवनशोधात, शोधयात्रेत सतत दिसतो. आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात गुरू करायला आणि गुरू व्हायला अनेक प्रलोभनं असतात. आयुष्याच्या दर्शनानं भयभीत झालेल्या विकल मनाला स्वत:च्या कृत्यांची पूर्ण जबाबदारी घेण्यापेक्षा 'गुरू'ची आयुष्यात स्थापना करणं सुलभ वाटतं. आणि गुरूंचंही तसंच होतं. विमलाजी म्हणायच्या, "कामेषणा, वित्तेषणा सुटते पण लोकेषणा सुटत नाही." म्हणजे मनुष्य एखाद्यावेळी कामभावनेतून, धनलोभापासून मोकळा होऊ शकतो. पण लोकांनी मला नेता किंवा गुरू मानावं ही भावना सोडणं सर्वात अवघड. कुणी आपल्याला 'गुरू' मानलं की जसं अहंकाराचं पोषण होतं. ते सोडणं फार अवघड. अध्यात्माच्या क्षेत्रात सात दशकांहून अधिक वावर करूनही विमलाजी या लोकेषणेपासून मुक्त राहिल्या. त्यांनी 'गुरू'चं नातं कुणाशीही जोडलं नाही. कृष्णमूर्ती यांच्या अगदी निकट असून त्यांनी कृष्णमूर्ती यांचंही 'शिष्यत्व' कधी स्वीकारलं नाही.
नव्या युगातल्या नव्या माणसांशी त्यांनी सख्यत्वाचं, मैत्रीचं नातं जोडलं आणि मैत्रीपूर्ण संवाद केला.
माझा आणि विमलाजींचा असा मैत्रीपूर्ण संवाद झाला होता. आणि इतकी मोकळी, स्वीकाराची ज्ञानपूर्ण संवादाची, समजून घेण्याची भेट मी आयुष्यात त्यापूर्वी कधी अनुभवली नव्हती.
जे. कृष्णमूर्ती यांच्या लेखनाचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता. कृष्णमूर्ती यांच्या परखड, स्पष्ट, तरीही ऋजू विश्लेषणानं मला खूप काही दिलं होतं. मात्र मला संवादाची भूक होती. माझ्या आतले प्रश्न, कोलाहल, अशांत मन यावर जालीम उपाय शोधावा अशी विशीतली आकांक्षा माझ्या प्रयोगांच्या पाठीशी होती. सबब मी माझ्या मार्क्सवादी शिक्षणात न शोभेलशा भुकेनं तुकोबांपासून ते निसर्गदत्तांपर्यंत जे हाती मिळेल त्याचं वाचन करत होते. घरातून संत वाङ्मयाचे संस्कार होते. परंतु माझ्या अस्वस्थ एकटेपणाची, हृदयस्थ काहिलीची उत्तरं मला कळत नव्हती. अशा वेळी कृष्णमूर्ती यांच्या लेखनानं किंवा दर्शनानं म्हणते हवं तर, मला एक दरवाजा उघडून दिला. स्वत:च्या कृत्यांची unconditional जबाबदारी घेण्याचा दरवाजा. जगावर, भूतकाळावर परिस्थितीवर बोट दाखवताना स्वत:कडं वळलेल्या तीन बोटांची जबाबदारी घेण्याचा दरवाजा जिद्‌दूनं मला दाखवला. पण जिद्‌दू मला अप्राप्य वाटायचा.
मला संवाद हवा होता. या आयुष्याच्या निरगाठींवर जिता जागता संवाद. आणि कृपा किंवा योगायोग म्हणू. हवं तर माझ्या हातात विमलाजींचं 'प्रयाणोत्सव' हे पुस्तक आलं. कृष्णमूर्ती यांच्या लेखनातून परंपरा पूर्ण वजा होती. तर बाईंनी भारतीय आध्यात्मिक परंपरा न नाकारता तिला आधुनिकतेला जोडलं होतं. ज्ञानोबा-तुकोबा जे मला प्रिय होते त्याच्या शब्दांची उकल विमलाजीं इतकी सुंदर दुस-या कुणीच कधीही केली नाहीए. यांना आपण भेटायचं असं मी ठरवलं. त्यावेळी कैसर इराणी ही त्यांची सेक्रेटरी होती. मी कैसरला पत्र लिहलं. विमलाजींनी मला दोन तासाची वेळ दिली. माऊंट अबूला, शिवकुटीमध्ये त्यांनी मला बोलावलं.
कविहृदयाची स्त्री, विनोबांच्या भूदान चळवळीत तिनं महत्त्वाचं योगदान दिलं. भारतभर प्रवास केला. जेपींपासून ते दादा धर्माधिकारींपर्यंत सर्वांसोबत काम केलं. विवेकाला पटलं त्या सर्व सामाजिक कामात सहभाग घेतला पण कधीही स्वत:चं संस्थान होऊ दिलं नाही.अशा प्रखर बुद्धिमान व्यक्तीला भेटणं हा माझ्या आयुष्यातला फार मोठा योग होता.
कोणत्याही भेटीत आपण आपल्या अहंकाराचं कसं पोषण होईल ते बघत असतो. या अमक्या थोर व्यक्तीनं मला अमुक असं कॉम्प्लिमेंट दिलं हे आपण नंतर चवीनं सांगतो. विमलाजींच्या भेटीत ते झालं तो संवाद होता. त्यात कौतुक नव्हतं तर जाणवली होती त्यांची आस्था. आपल्याशी संवाद साधू इच्छिणा-या धडपडणा-या मुलीच्या प्रश्नांना उत्तरं देताना, कोणताही आविर्भाव न घेता प्रेमानं विमलाजींनी माझ्याशी संवाद साधला. "अगं, आयुष्याच्या या टप्प्यांवर आपण का भेटलो? भेटी का होतात? ते जरी आपल्याला ठाऊक नसलं तरी प्रत्येक भेटीत जे काही उत्तम माझ्याजवळ आहे ते सारं मी त्या भेट घेणा-याला द्यावं असं मला वाटतं," असं त्या म्हणाल्या. विमलाजींशी भेट म्हणजे खुल्या अवकाशाशी भेट. या भेटीनं मला माणूस म्हणून खूप काही दिलं. किती बालिश वाटतात आता मला मी विचारलेले प्रश्न आणि किती मूलभूत उत्तरं दिली त्यांनी मला. तो संवादही नंतर मी स्वतंत्रपणे लिहून काढला.
आज ते वाचताना विमलाजींच्या आस्थेचं प्रत्यंतर जागोजाग येतं. कृष्णमूर्ती आणि विमलाजींच्या विषयी जरी मी, लिहिलं तरी मी कोरडा पाषाण आहे! त्यामुळे अशा भेटीनंतर बदल होतो. तोही अतिशय थोडासा. पण त्या थोड्याशा बदलानंही मला भान दिलं. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाकडं, त्यातून निर्माण होणा-या तीव्र दु:खाकडंही एका अनुभवासाठी आवश्यक शिकवणी म्हणून बघण्याचं भान विमलाजींनी मला दिलं.
मराठी मुलखातल्या असून नंतर गुजरात ही त्यांनी कर्मभूमी मानली. डलहौसी आणि माऊंट अबू इथं त्या राहायच्या. माऊंट अबूतली शिवकुटीतली संध्याकाळ अजून मला आठवते. स्मरणरंजनासाठी नाही. तर त्या संवादानंतर ता-यांनी उमलून आलेलं आकाश जसं माझ्या नजरेला दिसलं त्या अवकाशाची ती आठवण आहे. विमलाजींचं आयुष्य हा फार मोठा प्रवास आहे. त्या प्रवासानं अनेक लढे, सामाजिक चळवळी, आयुष्यं उजळली. त्यांच्या देहाचं आपल्यात नसण्याचं हे स्मरण. त्याचबरोबर त्यांच्या असण्याचं समृद्ध झालेल्या क्षणांचंही!

Monday, March 29, 2010

प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा

प्रसारमाध्यमातील भाषेचा जनमानसावर प्रचंड प्रभाव पडत असल्यामुळे प्रमाण भाषेचा प्रश्न प्रसार माध्यमांना गंभीरपणे घ्यावा लागतो. जी मराठी भाषा , ज्या प्रकाराने प्रसारमाध्यमात वापरली जाते, त्याचा लोकांवर प्रभाव पडतो. प्रसारमाध्यमातील भाषेचे लोकप्रियतेमुळे सार्वत्रिकीकरण होत जाते.

व्याकरणाच्या दृष्टीने जी प्रमाण मराठी भाषा मानली जाते- ती पुणेरी- पेशवाई- ब्राह्मणी असल्यामुळे, त्या प्रमाण भाषेला लोकभाषेचा मान मिळालेला नाही. अति संस्कृतप्रचुर किंवा ब्राह्मणी भाषा सर्वसामान्य मराठी माणसापासून दूरची राहिलेली आहे. या परिस्थितीत प्रसारमाध्यमे तात्कालिक निर्णय घेऊन 'भाषा' घडवण्याचे किंवा बिघडवण्याचे काम करत आहेत. प्रसारमाध्यमांचा प्रभाव लक्षात घेता कोणत्या प्रकारची भाषा प्रसार माध्यमात वापरली जायला हवी याबद्दल विचार आणि त्याचे डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे. पुस्तकी-शासकीय मराठी भाषा ही पुणेरी - ब्राह्मणी असल्यामुळे त्या भाषेला एक जातीय परिमाण आहे. मराठी प्रमाण भाषेचे देहू-आळंदी हे केंद्र मानल्यास त्याला व्यापक परिमाण लाभू शकेल आहे मला वाटते आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

जागतिकीकरण ही एक सांस्कृतिक प्रक्रिया आहे. अमेरीकाकरण करणारी एक सांस्कृतिक प्रक्रिया म्हणून या कल्चरल प्रोजेक्ट चे वर्णन अनेक think-tanks नि केले आहे. माझा मूळ मुद्दा या अमेरिकन- भांडवलशाही - जागतिकीकरणाला भाषिक अस्मिता कसा लढा देणार आहे? याचा आहे. मी दोन scenario मांडते. भांडवलशाही जीवन दृष्टीचे कलम मराठी भाषेवर करणे हा एक पर्याय. दुकानांच्या पाट्या बदलणे हे मला त्याचेच लक्षण वाटते. असे करून मराठी भाषा वाढवायची असेल तर इंग्रजी भाषेकडून तिला खूप शिकावे लागेल.

इंग्रजी भाषेच्या वाढीस आवश्यक असे अंतर्गत colonization करून जवळ जवळ चारशे वर्षात इंग्रजीने जगात पसरण्यापूर्वी आपल्या Scottish, Welsch, Gaelic इत्यादी भाषा नामशेष करून त्यातून एक प्रमाण इंग्रजी भाषेशी निर्मिती केली होती. या भाषेच्या अंतर्गत हिंसेचा फायदा इंग्रजीला जगभर पसरण्यासाठी झाला हे नाकारून चालणार नाही. मराठीला एक प्रमाण भाषा म्हणून वाढायचे असल्यास तिला कोंकणी, अहिराणी, वऱ्हाडी या भाषांबाबत आपले धोरण ठरवावे लागेल. अशा तऱ्हेच्या अंतर्गत वसाहतावादामुळे काही बोलींचा बळी जातो. त्या केवळ म्युझियम पुरत्या उरतात. हे कटू सत्यही स्वीकारावे लागेल कदाचित.

परंतु- जागतिकीकरणाच्या मूल्यासोबत जर मराठीला टक्कर घ्यायची असेल तर मारामारीचे राजकारण सोडून मराठीला मूलभूत विचारव्यूहाची निर्मिती करावी लागेल. यासाठी प्रथम मराठी असणे म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. भाषा ही धर्माप्रमाणेच सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र आणि नीतीशास्त्र या तीन तत्वज्ञानाच्या शाखांचे documentaion करत असते. मराठी भाषेचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र आणि नीतिशास्त्र म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. त्या पार्श्वभूमीवरून मग अमेरिकीकरण होणे म्हणजे काय ते तपासावे लागेल. भांडवलशाही आणि जागतिकीकरणाच्या विचार व्यूहाला छेद द्यायचे मूलभूत काम मग करावे लागेल.
तुकोबा - ज्ञानोबाच्या कवितेवर आणि तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या मराठी भाषेला हे शक्य आहे. मराठीचे भाषाकरण जर अशा 'मराठी' मूल्यांवर आधारित झाले तर ते दीर्घकाळ टिकणारे ठरेल.

पहिला मार्ग सोयीचा , चटकन समजणारा आणि तात्कालिक निकाल देणारा आहे. परंतु त्यात दीर्घकालीन हीत नाही. दुसरा मार्ग मात्र अजूनही विचारातच येत नाही. त्या विचार व्युहाकडे आपण आज बघतही नाही. माझ्या भूमीत रुजण्याची सर्व मूल्य माझ्या भाषेत आहेत. त्या मूल्यांवर मी संकर करेन परंतु कंद मूल्ये मी डावलणार नाही - अशा वृत्तीने काम केल्यास त्याचे परिणाम वेगळे होतील. मराठीची वैश्विक भूमिका नाती जोडणारी आहे. पसायादानातून व्यक्त होणारी आहे. या जोडणाऱ्या भाषेच्या केंद्रस्थानी सृजन आहे, नवी कल्पना आहे. 'जागतिकीकरणाच्या साठमारीत माझा थोडा मराठी शिंतोडा' असे symbolic स्टंटबाज राजकारण करणारे फक्त अस्मितावादाचा पुरस्कार करतात. त्यांची मूल्ये मला शेवटच्या मराठी माणसाचे हीत साधणारी वाटत नाहीत.
मात्र यावर अजून दीर्घ लिहिण्याची आवश्यकता आहे. मला वाटते मराठी भाषेत जी एक खुली, मोकळी नैतिक space आहे ती जाणून घेतली तर प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान या दोन्ही शाखांना अधिक माणूसपणाचा चेहेरा मिळेल.

मात्र मूलभूत विचार व्युहातून जागतिकीकरणाला छेद दिला तर दीर्घकालीन उपाय निघू शकतात. प्रश्न खोल पाण्यात उतरण्याचा आहे. साडेतीन फुटात ज्यांना पोहायचं त्यांचा नाही.

तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे यामधील मराठी म्हणूनच मराठी मानवतावादी मूल्यांसोबत रुजवली जाणे आवश्यक आहे.

Monday, February 8, 2010

'अतूट' नात्यात खिंडारं का पडली?

गेली 40 वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणसाचं नाव घेऊन शिवसेना उभी आहे. हे 'मराठी माणूस आणि शिवसेना' यांचं तथाकथित अभेद्य आणि अतूट नातं तपासून बघण्याची आता वेळ आली आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मराठी माणसानं शिवसेनेला जो मार दिलाय तो बघता या 'अभेद्य' आणि 'अतूट' नात्यात खिंडारं का पडली? याचं विश्लेषणही आवश्यक आहे.

शिवसेनेचा जन्म 1960च्या दशकातला. तेव्हापासून 'मराठी' माणसासाठी शिवसेना आक्रमक झाली. आज राहुल गांधींना काळे झेंडे दाखवताना शिवसेना जशी बिचकली तशी सुरुवातीची सेना नव्हती. मोरारजी देसाईंची गाडी अडवणारी 'दंगलखोर' सेना म्हणून ती प्रसिद्ध होती. या शिवसेनेच्या रावडी रुपालाच काँग्रेसनं वापरलं. गिरणी कामगारांच्या युनियन्स कम्युनिस्टांच्या ताब्यात होत्या. त्या फोडायला 'शिवसेना' नावाचं गुंड हत्यार काँग्रेसनं वापरलं. आजही शिवसेनेचा इतिहास तपासताना सुरुवात कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या खुनापासूनच होते.

सुरूवातीच्या दशकात मुंबईतला मराठी मध्यमवर्ग शिवसेनेच्या बाजूनं नव्हता. 72/73च्या सुमारास मुंबईत सरकारी कर्मचार्‍यांचा मोठा संप झाला होता. मोठ्या प्रमाणावर मराठी मध्यमवर्ग या संपाचा भाग होते. या संपाला शिवसेनेनं विरोध केला होता. 71ला बांग्लादेशच्या युद्धानंतर रणरागिणी इंदिरा गांधींनी वातावरण भारून गेलं होतं. त्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी जिंकल्या तेव्हा 'हा विजय गायीचा, बाईचा की शाईचा?' अशी टीका बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. मराठी मध्यमवर्गाशी ही भूमिका सुसंगत नव्हती. मात्र सेनेचा इंदिरा विरोध लगेचच मावळला. आणिबाणीत जेव्हा मराठी जनमत इंदिरा गांधींच्या विरोधात होतं तेव्हा मात्र बाळासाहेब ठाकरे 'आणिबाणी'चं समर्थन करत होते. शिवसेनेचा पहिल्या 15 वर्षांचा इतिहास असा विरोधाभासांनी भरला आहे. जयप्रकाशांच्या नवनिर्माणाला ठाकर्‍यांचा पूर्ण विरोध होता. तसंच आता ज्यांच्यासोबत युती आहे, त्या भाजपचं अलिकडचं व्हर्जन म्हणजे 'जनसंघ'देखील ठाकर्‍यांना प्रिय नव्हता.

जनसंघासोबतच्या जनता सरकारला विरोध करतच 70च्या दशकात शिवसेना राजकीय ग्रिप घेण्यासाठी धडपडत होती. यावेळी शिवसेनेतलं खरं कार्यकर्ता एलिमेंट म्हणजे सुधीर जोशी, दत्ताजी साळवी यांनी स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून कामं सुरू केली. मात्र इतिहास हे पण दाखवतो की नंतर सत्तेचं फळ चाखायची वेळ आली तेव्हा 'मराठी' मुलांसाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची पदं मिळाली.



यानंतर 80वं दशक उजाडलं ते गिरणी कामगारांच्या लढ्यानं. 1982च्या जानेवारीत कामगारांनी दत्ता सामंतांना लढ्याचं नेतृत्व करण्यासाठी साकडं घातलं. परंतु मराठी माणसानं 1981च्या दिवाळीत मराठी कामगारांसाठी सेनेनं काय केलं होतं याचं विस्मरण होऊ देता कामा नये. 1981च्या दिवाळीत वाढीव बोनसच्या मागणीसाठी 10 गिरण्यांनी संप पुकारला. बाळासाहेब ठाकरे या लढ्याचं नेतृत्व करत होते. महागाईनं कामगार बेजार झाले होते. आणि गिरणी कामगारांना बोनस वाढवून हवा होता. ऐन दिवाळीत मालकांशी एकतर्फी तह करून हा संप मागे घेण्यात आला. यामुळं कामगार चिरडीला आले. 1982च्या कामगारांच्या संपाची ही घाताची पार्श्वभूमी अनेकदा विसरली जाते. आज काल काही झालं तरी खुट्ट माणून 'भारतमाता'पाशी जमणार्‍या मराठी माणसांना हा इतिहास बहुधा ठाऊक नाही.
कामगारांच्या लढ्यात शिवसेनेची भूमिका नगण्य राहिली. मात्र दरम्यान दोन गोष्टिंनी सेनेला तारलं. ठाण्याची सत्ता शिवसेनेकडं होतीच. तिथल्या वाढत्या औद्योगिक वातावरणात शिवसेनेनं आपलं स्थान निर्माण केलं होतं. 1984च्या भिवंडीच्या दंगलीत ठाण्याच्या राबोडी भागात जे झालं तिथून शिवसेनेची 'हिंदुत्त्वाची' लाईन हळू हळू निश्चित होत गेली.



एकीकडे 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं काढू' या आशयाचं काँग्रेसचं वक्तव्य आणि हिंदुत्त्वाची नवी लाईन याचा एकत्रित परिणाम म्हणजे 1985 साली छगन भुजबळांना मिळालेलं मुंबईचं महापौरपद. इथून सेनेला उभारी मिळाली. मुंबईची सत्ता सेनेकडं आली. भुजबळ, प्रभू, नलावडे, मिलिंद वैद्य, हरेश्वर पाटील, राऊळ, श्रद्धा जाधव..गेली 25 वर्षं या शहरावर सेनेनं सत्ता गाजवली.
म्हणजे आज जी काही बकाल मुंबई आपल्याला दिसते त्याची बहुतांश जबाबदारी सेनेचीच आहे. या महानगरपालिकेच्या सत्तेसाठी सेनेला हिंदी आणि हिंदू या दोन्ही अस्मितांचा आधार आवश्यक होता. 92च्या दंगलीत सेनेनं तो आधार मिळवला. ज्याचं स्पष्ट प्रतिबिंब 95ला सेनेला सत्ता मिळण्यामध्ये झालं.



मुंबईतल्या पहिल्या छठपूजा सेनेनंच घातल्या. संजय निरुपम यांना मोठंही सेनेनंच केलं. अनेक अमराठी नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याचं कामही सेनेचं...तसंच मुंबईचा मराठी कामगार देशोधडीला लागून परागंदा झाला तेव्हा त्याच्यासाठीही सेना नव्हती. सेनेच्या मराठीप्रेमाच्या भूमिकेत सातत्य नाही. शिवसेना ही विचारप्रणाली केंद्रित संघटना नसल्यानं व्यक्तिकेंद्रित संघटनेचे सर्व गुण सेनेत दिसतात. भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट या सर्व पक्षांमध्ये व्यक्ती महत्त्वाच्या ठरतात. परंतु पक्ष व्यक्तीपलीकडे एका विचार प्रणालीवर चालतो. मात्र सेनेत तसं काही नाही. ठाकर्‍यांचं नेतृत्त्व हे शिवसेनेच्या केंद्रस्थानी आहे. काँग्रेसचं धोरण पटलं नाही, भाजपच्या चुका झाल्या तर त्यावर सडकून टीका करता येते. मात्र शिवसेनेची धोरणं किंवा कृतींवरची टीका ही बाळासाहेब ठाकर्‍यांवरची वैयक्तिक टीका समजली जाते. त्यामुळे टीका सहन करण्यासाठी जो उदारपणा दाखवावा लागतो, तो शिवसेनेच्या 'दादागिरी' संस्कृतीचा भागच नाही. बाळासाहेबांचं दैवतीकरण करायचं आणि आणि दुय्यम दर्जाच्या इतर नेत्यांनी या दैवतीकरणाची ढाल करून वाट्टेल तसं वागायचं ही शिवसेनेची खेळी आहे.

लोकशाही बहुमतावर चालते. जेव्हा बाळासाहेबांनी मराठी बहुमताचं मन रिप्रेझेंट केलं तेव्हा मराठी माणसानं सेनेला निवडून दिलं. शिवसेना नावाच्या ऑप्शनमुळं महाराष्ट्रात 85 ते 95मध्ये दरम्यान वेगळी राजकीय संस्कृती उदयाला आली. बिगरमराठा नेतृत्वाला वाव मिळाला. या सार्‍यांचं प्रतिबिंब युतीच्या सत्तेत दिसून आलं. मात्र आता मराठी मानस बदलतंय आणि सेनेला आणि सेनेला आता नव्यानं मराठी मानस समजून घ्यावं लागेल. नवा मराठी माणूस आता झुणका भाकर केंद्र किंवा शिववड्यानं खुष होत नाही. त्याला मराठी माणसाच्या विकासाची ब्लू प्रिंट हवी आहे. म्हणून त्यानं मनसेकडे डोळे लावलेत. आणि 'मनसे' हेच शिवसेनेचं सध्याचं खरं दुखणं आहे. विकासकामं करायची तर त्यासाठी अभ्यास, विचारप्रणाली, आणि काडर लागतं. शिवाय राजकीय पक्षांना पिढीनुसार बदलणार्‍या अस्पिरेशन्स समजाव्या लागतात.

जागतिकीकरणानंतचरचा मोकळा खेळकरपणा आता नव्या मराठी पिढीला आवश्यक वाटतो. व्हेलेंटाईन डेमध्ये धुडगुस घालणारी, सचिनला टार्गेट करणारी, आदेशांवर चालणारी सेना नव्या पिढीला आपली वाटत नाही. तरूण मराठी मनाचा आवाज शिवसेना ऐकत नाही म्हणून आता राज ठाकर्‍यांची लोकप्रियता वाढतीए. 'मराठी माणूस आणि सेना' यांचं नातं तपासताना अशी अनेक खिंडारं नजरेसमोर येतात. लोकशाहीत हुकुमशाहीची मूल्यं जास्त काळ तग धरू शकत नाहीत. आज या नव्या ग्लोकल म्हणजेच ग्लोबल आणि लोकल मराठी मनाला जर सेनेनं जाणलं नाही तर 70 ते 85च्या दरम्यान मुंबईनं जसं शिवसेनेला स्वीकारलं नाही त्याच्या दुसर्‍या हप्त्याला सेनेला सामोरं जावं लागेल.

Sunday, June 14, 2009

Things I had written in the past

मनसे अणि दुखर मराठी मन
http://ibnlokmat.tv/showblog.php?id=7601

मुंबई मध्ये बम्बई बम
http://ibnlokmat.tv/showblog.php?id=9321

Last week's Programs

Take Off- Interview with Pallavi Joshi - June 8, 2009
Take Off-Interview with Shrirang Godbole- June 9, 2009
Take Off - Show on Editing and Dubbing- June 10, 2009
Take Off- Show on Cinematography and Set Designing- June 11, 2009
Take Off- Show on Careers in Media- June 12, 2009

Aajacha Sawal:
June 5, 2009 : Have we forgotten's the real history of Shivaji Maharaj? http://ibnlokmat.tv/programdetails.php?id=67562&channelid=361

If 90:10 quota adopted by Maharashtra Government for 11th grade admissions is correct?- June 11, 2009