Friday, June 18, 2010

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव

मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय किंवा 'तुम्ही सारे कट करून मला गंडवताय' असं वाटून ठसठसतं दुखरं बनलंय. या सा-यासकट, मला मराठी मन नेहमी न्यूनगंडानं ग्रासलेलं दिसतं. 'जगात जे काही 'बेश्टं' आहे त्यापेक्षा मी पावछटाक कमी आहे' असा भाव मराठी माणसाच्या चेहे-यावर कायम दिसतो. जणू तो न्यूनगंड झाकून टाकायला मराठी माणूस आक्रमक आणि चिडका बिब्बा असल्यासारखा वसवसत असतो.
उदाहरणादाखल म्हणजे, इंग्रजी पत्रकारितेत प्रणव रॉय जर 'बेश्ट' असेल किंवा एन. राम- तर राजदीप कसा पावछटाक कमी वाटतो- तसं हे मराठी न्यूनगंडाचं दुखरं गळू आहे.
मराठी माणसाची चार प्रेमं बघितली तरी, उदाहरणार्थ, लताप्रेम, सचिनप्रेम, राजप्रेम आणि खरे मूळचे साहेबप्रेम; तर न्यूनगंडाच्या दुख-या निरगाठीचं राजकारण आपल्याला कळू शकतं. 'पावछटाक' कमी असण्याच्या वास्तवाचा तो प्रतिक्रियात्मक कडवा आविष्कार असतो. लताबाई - कारण ती जगातल्या कुठल्याही स्वर्गीय आवाजापेक्षा कमी नाही; किंबहुना काकणभर सरसच आहे. परमेश्वरानं बाईंच्या डोक्यावर हात ठेवलाय. मग लताप्रेम हा आमचा 'डिफायनिंग पॉईंट' आहे. सचिनप्रेम याच जातकुळीचं. या दोन 'भारतरत्न' मटेरिअल्सनंतरची मराठी माणसाची जी दोन प्रेमं आहेत, (राज) साहेब आणि मूळचे साहेब यांची; ती इतर प्रत्येक क्षेत्रातल्या ठसठसत्या डावललेपणाची भरपाई आहे. लताबाई आणि सचिन हे एकांडे शिलेदार आहेत. अनभिषिक्त साहेब आणि ओरिजिनल साहेब हे न्यूनगंडानं ग्रासलेल्या मराठी समाजाचे नेते आहेत. त्याच समाजासारखे दोघंही चिडके, दुखावलेले, हट्टी, प्रेमळ, सटॅक - मराठी माणसासारखेच प्रतिक्रियेत तिखट. दरक्षेत्रात 'आपण कुठेतरी कमी आहोत' या भावनेला कसा हात घालायचा, तो कंद कसा मॅनिप्युलेट करायचा, त्याचा राजकीय वापर कसा करायचा, त्या दुखरेपणावर अक्सीर इलाज शोधण्यापेक्षा त्याला दुखरं ठेवूनच अरेरावी कशी वाढवायची, याची पुरती गणितं या दोन्ही साहेबांना ठाऊक आहेत.
मराठी न्यूनगंडाचा राजकीय आविष्कार जसा 'सेना-प्रेमा'त होतो तसा तो इतरही अनेक ठिकाणी होताना दिसतो (पवारांनी मोठा केलेला मराठा महासंघ म्हणजे तरी काय आहे?). पण मग या न्यूनगंडाची ठसठस मागे तरी कुठपर्यंत जाते? त्या इतिहासाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न.
पेशवाईची सत्ता 1818 ला संपली. मग साहेबाचं कंपनी सरकार सत्तेत आलं. 'अधिकाधिक साहेबाळणं' हे सत्तेच्या जवळ जाण्याचं साधन झालं. बंगालमध्ये ही प्रक्रिया शंभरएक वर्षं अगोदर सुरू झाली होती. 'साहेबाळणं' प्रक्रियेचा बंगाली पुरूषांच्या प्रतिमेवर प्रचंड मोठा प्रभाव पडला. बंगाली बायकांच्या मदतीला बेण्टिकसारखे परकीय पुरूष आल्यानं बंगाली पुरूष हा पुरेसा 'पुरूषी' नाही असा त्याचा तेजोभंग इंग्रजांनी केला. बंगालच्या राजकारणावर, नंतरच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नांवर प्रतिमेचा हा प्रतिकार करण्याची निकड दिसून येते. महाराष्ट्रात मात्र 'साहेबाळण्या'ची ही प्रक्रिया काहीशी वेगळी होती. 'मर्द मराठयां'ना ब्रिटिश सत्तेच्या समोर झालेला पराभव जिव्हारी लागला. आणि म्हणून मर्द मराठयांच्या मनात 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला रेझिस्टन्स, प्रतिकाराची भावना कायम तेवती राहिली. मराठे आणि मुघल हे ब्रिटिशपूर्व सत्ताधारी! या दोघांचंही ब्रिटिशांशी नातं गुंतागुंतीचं आहे. पडतं घेऊन ब्रिटिशांसोबत सहकार्यानं वागणा-या इथल्या वैश्य वर्गापेक्षा या दोघांचं नातं प्रतिकारानं, लढयानं बनलेलं



आहे. अरे ला कारे? म्हणू शकणा-या 'मर्द'पणावरचा ब्रिटिश हल्ला म्हणूनच मराठी मनाला सहन झाला नाही. बंगाली पुरूषी प्रतिमेचा तेजोभंग ब्रिटिश काही प्रमाणात यशस्वीपणे करू शकले. मराठी माणसानं मात्र त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी वेषभूषा, इंग्रजी सत्ता यांच्याशी मराठी माणसाचं नातं विरोधाचं राहिलं. ज्याप्रमाणे उत्तरेतले नेहरूंसारखे नेते 'इंग्रजाळले' त्या तुलनेत मराठी नेतृत्व इंग्रजाळलं नाही. टिळक, फुले-शाहू यांनी देशी वाणात साहेबी गुणांना मिसळून टाकलं. हा सारा काळ हा दोन संस्कृतींच्या संघर्षाचा आणि सहजीवनाचा काळ होता. डाव्या नजरेनं आतापर्यंत या काळाला केवळ 'शोषणा'च्या एकांगी नजरेनं जोखलं. मात्र शोषणासोबत हा काळ अनेक नवीन मूल्यांच्या जन्माचा, दोन संस्कृतींच्या तुलनेचा, यातून आपण काय निवडायचं-काय नाकारायचं हे ठरवण्याचा, औचित्याचे प्रश्न उभे करणारा काळ होता. या काळात ज्या 'मर्द' मराठयांनी (इथं मराठा हा शब्द जातिवाचक घेतलेला नाही. 'मराठी माणसांनी' या अर्थानं मराठयांनी या शब्दाची योजना केली आहे.) 'साहेब शरणता' डावलण्याचा पुरूषार्थ केलेला दिसतो. मात्र हे गणित गांधीबाबांच्या आगमनानंतर ढासळलं. टिळकोत्तर गांधींच्या राजकारणाच्या उदयात मराठी न्यूनगंडाची काही बीजं दिसून येतात. या सगळया काळाचं विवेचन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात केलंय. गांधींच्या तालमीत तयार झालेले शंकरराव देवांसारखे नेते 'मराठी' राहिले नाहीत.

डॉ. केतकरांनी भाषिक राज्यासाठी धरलेला आग्रह, सावरकरांची भाषाशुध्दीची चळवळ या दोन्ही गोष्टी या 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला दिलेली तिखट उत्तरं म्हणून तपासाव्या लागतील. त्याचबरोबर नाना पाटलांचं 'पत्री सरकारही.' 'राष्ट्र' नावाची एक महाकाय नवी संकल्पना उदयाला येताना, 'लोकशाही' नावाचं 'एक माणूस - एक मत' असं नवं राजकीय मूल्य रुजत असताना 'साहेबोत्तर' पिढीमध्ये राष्ट्रीयत्वासाठी मराठीपण नाकरण्याकडे कल राहिला.
स्वातंत्र्योत्तर भारतात जे 'मराठी' विचारवंत झाले ते 'मराठी' नव्हते. ते राष्ट्रीय विचारवंत होते. त्यांच्या मते फक्त मराठीचा विचार म्हणजे संकुचित विचार. या उलट लोकशाहीवादी राष्ट्रीयत्वाचा विचार करणा-या नव्या राजकीय नेत्यांची फळी स्वातंत्र्योत्तर भारतात दिसते. हे नेते जन्मानं मराठी आणि विचारानं राष्ट्रीय होते. या सा-या काळात विनोबांनी 'महाराष्ट्र धर्मा'चा थोडासा विचार केलेला दिसतो. मात्र काका कालेलकर ते ना.ग. गोरे, एस.एम., मधू लिमयांपर्यंत व्हाया पटवर्धनबंधू पोस्ट-गांधी मराठी नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं. कम्युनिस्टांमधले डांगे-रणदिवे हे 'मराठी' नव्हेत तर राष्ट्रीय नेते होते. नवीन राष्ट्रवादाच्या कल्पनेचा अनुषंग म्हणूनच त्या सर्वांनी एकत्र येऊन 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' केली. ही चळवळ 'महाराष्ट्र' वेगळा हवा यासाठी नव्हती तर भारत देशाचा तो एक सकस भाग व्हावा म्हणून आणि मुंबईवरच्या मराठी शिक्क्यासाठी तो लढा होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्राकडे 'अस्मिते'चा लढा असं बघता येत नाही, तर राष्ट्र संकल्पनेला अधिक लोकाभिमुख करणारी ती चळवळ होती. सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असा की औद्योगिकीकरण, शहरीकरण या सर्व साहेबी काळापासून सुरू झालेल्या प्रक्रियांनी साठच्या दशकात अधिक वेग घेतला. आणि 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला प्रतिकार करणारा 'मराठी माणूस' स्वातंत्र्योत्तर आधुनिकतेत काहीसा मागे फेकला गेला. मराठी माणूस राहिला मुंबईचा कामगार आणि इंग्रजी शिकलेले दाक्षिणात्य मुंबईत नोक-या पटकावते झाले. याच काळात माटुंग्याचं 'मांटुंगम' झालं. शहरीकरणाच्या प्रक्रियेत राजकारण पालटलं आणि 'माझ्या भूमीत मी डौलानं माझ्या जातीय अहंकारासकट उभा राहीन' असं मानणा-या मराठी माणसाचा अहंकार ठेचला जाऊ लागला.
नवीन वैश्य गणितात मराठयांच्या क्षात्र तेजाची किंमत उरली नाही. म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली, मात्र वैश्य वृत्ती जोपासणा-या गुजराथी-मारवाडी-सिंधी-पंजाब्यांनी ती काबीज केली. मराठी न्युनगंडाचं दुसरं दुखरं कारण मला या साठीच्या दशकातल्या 'वैश्य' मुंबईत दडलेलं दिसतं.
अजूनही मुंबईत नवे उद्योग येताना मुंबईतले मराठी नेते कॉण्ट्रॅक्टस मागतात. इथलं सिक्युरिटीचं कॉण्ट्रॅक्ट आम्हाला द्या, इथं माझी मुलं कामाला लागतील. इथली युनियन आमची असेल. मात्र या मुंबईत नवे व्यवसाय सुरू करणारी मराठी माणसं कमी आहेत. या 'वैश्य' गणितात 'क्षात्र' क्षात्र 'तेजानं कंत्राटं आणि गुरगुर करून मिळवलेला उक्ता माज या पलीकडे काही साध्य केलेलं नाही. दुसरीकडे वाङ्मयीन जगात पुरेसा परिपुष्ट नसलेला नेमाडयांचा देशीवाद याच वैश्य राजकारणात उगवताना दिसतो. क्षात्र तेजाची पीछेहाट दिसून येते. मुंबईला महाराष्ट्रात आणण्यात 'संयुक्त महाराष्ट्रा'ची चळवळ यशस्वी झाली खरी, पण 'मराठी' माणूस मुंबईच्या जिओपॉलिटकल अर्थकारणातून बाहेर गेला.
मध्ययुगीन काळापासून मराठयांचं एक लक्षण सांगितलंय- ' दिध्ढले, गहिल्ले, कलहशीले'... हे कलहशीलत्व मात्र मराठी मनानं मनापासून जोपासलं. डावी चळवळ ते व्हाया शरद जोशी, मेधा पाटकर हे कलहशीलत्व मराठी माणसानं नीट संपन्न केलं आहे. त्याच्या दुख-या, ठसठसत्या अहंकाराला शोभेल अशा एकांडेपणानं. या एकांडया शिलेदारांना सामाजिक नेतृत्व लाभलेलं नाही. शरद जोशी-मेधा पाटकरांना काही काळ मायनॉरिटीचा पाठिंबा लाभला. त्यांचे साहेब झाले नाहीत. या सा-या प्रकाशात मला दिसतात महाराष्ट्रातले तीन साहेब- पवारसाहेब, जे दिल्लीच्या राजकारणात पावछटाक कमी पडले, मूळचे खरे साहेब- ज्यांनी डरकाळया फोडून मुंबई गाजवली आणि हे नवे येणारे अनभिषिक्त 'राज'साहेब. या तीन साहेबांनी महाराष्ट्रात नवा 'साहेबाळलेला वर्ग' निर्माण केला आहे.
वैश्य गणितातली दुसरी बाजू 'चिपा'त मिळणा-या कामगारांची होती. त्या मराठी कामगार वर्गालाच आता उत्तर भारतीयांबरोबर फाईट द्यावी लागते आहे . आमचं दुखणारं गळू अगदी टेकीला आलंय. तुम्ही जातीनं कुणीही असा- नुकताच हॅपी बर्थ डे झालेले 'राजसाहेब' मराठी माणसाला जातीपलीकडे जाऊन आवडतात.
'भाषाशुध्दी' आणि 'पाटया बदला'ची घोषणा त्यांच्या कामी आली. सावरकर खरे 'हिंदू हृदयसम्राट' तर राजसाहेब 'मराठी हृदयसम्राट झाले आहेत !'
आम्ही आधुनिकतेच्या क्रिकेटमध्ये कबड्डी खेळत मागे पडलो. आता, ग्लोबल बास्केटबॉलमध्ये आमचा टिकाव लागणार आहे का? आम्ही आता हा नवा गेम आपलासा करणार की अस्मितेच्या राजकारणाचा डाव खेळणार? वेगवेगळया सांस्कृतिक राजकारणाचं हे मैदान आहे. पंजाब्यांनी आपल्या न्यूनगंडावर स्वत:मधल्या जोमानं, रगीनं मात केली आणि गुजराथ्यांनी आपल्या पैशानं त्यावर मात केली. आम्ही निदान अकलेच्या जोरावर या न्यूनगंडापलीकडची छलांग मारायला रेडी आहोत का? की पुन्हा 'पाटया बदला'चा गेम खेळून आम्ही रडीचा डाव करणार आहोत? 'हॅपी बर्थ डे' झालेले साहेब तो डाव खेळतायत... आपण तोच डाव पुढे रेटणार का? हा प्रश्न आहे.

Friday, June 4, 2010

खेळ ‘बुध्दी–बुध्दी’चा

मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी भाषिक समुहात अजूनतरी प्रिमियम नाही. मराठी माणूस हुशार समजतो तरी कोणाला? आणि या हुशार समजण्याची परंपरा तपासली तर काय लक्षात येते? आपली हुशारपणाची व्याख्या बदलत चाललीय का? स्वत:ला हुशार समजणा-या; शिवाय, ज्यांच्याकडे यशस्वीतेचे ठोस ब्रॅंडिंग आहे अशा माणसांना जर मराठी इतिहासातली ‘हुशार’ नावे विचारली तर त्यात शिवाजी महाराज, पहिला बाजीराव- द ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट आणि नाना फडणवीस या कॉमन थीम्स दिसतात. पोस्ट-पेशवाई हुशारीत राजवाडे-केतकर-टिळक आणि स्वातंत्र्यकालीन हुशारीत एकीकडे तर्कतीर्थ टाईप मंडळी तर दुसरीकडे सीडी देशमुख या उच्चवर्णीय नावांचे उल्लेख दिसतात. डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले यांना त्यांच्या बौद्धिक कामगिरीबद्दल नावाजण्याची चाल उच्चवर्णियांमध्ये नाही हेही खेदाने जाणवते. इतकेच काय सावरकरांच्या हुशारीचे कौतुक करताना राजारामशास्त्री भागवत किंवा कर्मवीरांसारखा व्हिजनरी पुण्यामुंबईकडे पूर्णत: नजरेआड होतो. हुशार समजण्याच्या प्रक्रियेत ‘जेंडर’ ही पण दुफळी दिसते. पंडिता रमाबाई, इरावती कर्वे आणि दुर्गाबाई यांच्याखेरीज हुशार बायकांच्या नामावळीत नावे सापडत नाहीत. ताराबाई शिंद्यांच्या थेट जिनिअसचा उदोउदो ऐंशीच्या दशकात, स्त्रीमुक्तीचे वारे वाहता असताना दिसतो. एकीकडून ‘हुशार’ कोणाला म्हणायचे? हे जातिनिहाय ठरत जाताना – स्वातंत्र्योत्तर काळात ते विचारप्रणालीनिहाय ठरलेले दिसते. एकीकडे डांगे, कर्णिक, तळवलकर परंपरा, दुसरीकडे व्हाया तर्कतीर्थ, मे.पुं.रेगे वाई परंपरा, तिसरी प्रोफेशनल लोकांना बुद्धिमान मानण्याची परंपरा म्हणजे डॉ. शिरोडकर किंवा आयएएस अधिकारी किंवा लेखक यांच्यांतली हुशारी मराठी भाषिक समुहाने नावाजलेली दिसते. हुशार असण्याच्या व्याख्येत – विविध विषयांमधली व्युत्पन्नता, सोबत मराठी भाषिक समुहाशी जोडून घेण्याची क्षमता आणि काही प्रमाणात लेखन व वक्तृत्व गुण हे जणू काही आवश्यक घटक होते. समाजवाद्यांच्या गटात त्यामुळे अच्युतराव पटवर्धन, नाथ पै ते मधू लिमये ही नावे, तुम्ही समाजवाद्यांपैकी कोणते समाजवादी आहात यावर अवलंबून घेतली जातात. काही वेळा मराठवाड्यात कुरुंदकर, विदर्भात जिचकार किंवा सध्याच्या महाराष्ट्रात मुंबई- पुण्यात टिकेकर अशी विभागवार हुशारांची नामावळी देखील दिसते. याशिवाय विज्ञान विषयात नारळीकर किंवा संत साहित्यासाठी यू. म. पठाण , सदानंद मोरे अशी विभागणी दिसून येते स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषिक समुहाने दोन परिमाणे शोधून काढली. दहावी परीक्षेत बोर्डात नंबर येणे – आणि त्या खालोखाल आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे. अमेरिकेचा व्हिसा प्रोफेशनल्ससाठी सत्तरच्या दशकात खुला झाल्यावर डॉक्टर होऊन अमेरिकेत जाणे हेदेखील ‘हुशार’ असण्याचे लक्षण बनून गेले. मेनस्ट्रीम मराठी समुहाला या तिन्ही गोष्टी अजून महत्त्वाच्या वाटतात. शरद जोशी ते अविनाश धर्माधिकारींच्या पिढीपर्यंत आयएएस होण्यात / प्रशासकीय सेवेत निवड होण्यात ‘हुशार’ असण्याची ग्लोरी आहे असे मराठी समाजाला वाटत होते. मात्र आता, पोस्ट-भूषण गगराणी काळामध्ये (भूषण गगराणी आठवण्याचे कारण, त्यांनी मराठी वाड्मय हा विषय ऐच्छिक म्हणून घेतला होता, त्याचा उल्लेख सतत होतो!) सरकारी बाबूंना हुशार समजायची चाल फारशी उरलेली नाही. कदाचित गगराणी हे त्या यादीतले अपवाद असतील. मराठी भाषिक समुहात चिंतक, विद्वान, विचारवंत, लेखक यांची मांदियाळी निर्माण झाली – तशीच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही; परंतु हुशारपणाच्या पॅरामिटर्सवर अधिराज्य बहुतांश ‘ब्राह्मणी’ कल्पनांचे होते. ( जसे परवा मुकादमसर म्हणाले, की बाबा आढावांना कुठे आम्ही विचारवंत मानतो अजून?) याला थोडासा छेद देणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे तेंडुलकर आणि कुमार केतकर. ज्यांना पठडीपलीकडच्या डाव्या मतांचे कौतुक आहे अशाच लोकांना तेंडुलकर-केतकरांसारखे क्रिटिकल लेखक आवडतात आणि त्याच क्रिटिकल समुहात मेघा पाटकरांबद्दल आदर-पुष्पा भाव्यांच्या लेखनाचे कौतुकही वाटते. मात्र ‘प्रमाण’ मराठी भाषिक समुहाची ही चाल नाही. नव्वदच्या दशकात, आयटी क्षेत्राने बाजी मारल्यावर, फक्त बुद्धिमता नाही तर त्याबरोबर ‘पैसा’ हे प्रामाण्यदेखील आवश्यक झाले. आता नारायणमूर्ती, नंदन नीलेकनी हे ‘हुशार’ असण्याचे आणि डॉ. अभय बंग किंवा डॉ. प्रकाश आमटे हे सामाजिक भान असण्याचे मानदंड झाले. पुण्यात जन्माला आला असाल तर कपाळावर ज्ञान प्रबोधिनीचा ठप्पा हा अनेक काळ बुद्धिमान असण्याची पावती मानला जायचा. ज्ञानप्रबोधिनी, आयआयटी आणि अमेरिका या तीन गोष्टी म्हणजे पोस्ट-पेशवाई पुण्यात अजूनही हुशारीची चलनी नाणी आहेत. प्रबोधिनी नसली तर निदान पक्षी दहावी-बारावीची मेरिट लिस्ट हे नाणे तर कालपरवा, मेरिट लिस्ट खारीज होईपर्यंत चालायचे. ‘ज्ञानप्रबोधिनी’त प्रवेश परीक्षेत IQ टेस्ट घ्यायचे किंवा अजूनही घेतात. माझा मास्तर पॉल प्रायव्हेटिअर याचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ हे पुस्तक वाचत असताना मराठी ‘हुशारपणा’च्या व्याख्येचा हा इतिहास, त्यातले महत्त्वाचे नामोल्लेख मनात येत होते. पॉल प्रायव्हेटिअरने तर IQ या प्रकाराची सामाजिक मुळे शोधून काढून हा कोशंट ठरवणे हे सांस्कृतिक दृष्टया भेद करण्यासाठी निर्माण केलेले साधन कसे आहे याचा इतिहास लिहिलाय. ज्ञानप्रबोधिनी-ठप्पा, हुशारांचा IQ यांवरच पॉल प्रायव्हेटिअरचे पुस्तक प्रश्नचिन्ह निर्माण करते. पॉल सोबत शिकताना 'हुशारीकडे' एक स्वायत्त , निसर्गदत्त वस्तू म्हणून न बघता एक सामाजिक प्रोडक्ट म्हणून बघण्याची सवय लागली. मराठी हुशारीच्या perceptions म्हणून तपासणं महत्वाचं ठरत गेलं. कोणता ही समाज ‘बुद्धिमत्ता’ म्हणजे काय, हे कसे ठरवतो? मी एखाद्या आदिवासी पाड्यावर जन्माला आले असते तर माझे रान वाचायचे स्किल हे माझ्या हुशारीत गणले गेले असते का? की नाही? मात्र सध्या ब्राह्मणी हुशारीचे-मानदंड कोसळतायत, अशा वेळी नवे मानदंड नसल्यामुळे, सर्वात सोपे – म्हणजे पैसा-प्रामाण्य हुशारीला सब्स्टिट्युट म्हणून वापरले जाते. मात्र मी आता एका दुस-या डायनॅमिक्सकडे बघत आहे. मला वाटते, की जेव्हा रिसोर्सेस मर्यादित असतात तेव्हा त्या मर्यादित रिसोर्सेसवर कुणाचा हक्क आहे यातून सत्ता निर्माण होते आणि ती सत्ता एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना, बुद्धिमत्तेला उत्तेजन देते. सध्याच्या सगळ्या हुशार ‘डिजायनर्स’च्या पिढीकडे बघितल्यावर मला हे कुठेतरी जाणवते. NID किंवा IDC मध्ये प्रवेश मिळवणे दुरापास्त आणि म्हणून ही मायनॉरिटीतली ‘डिजायनर्स’ मंडळी दिवसेंदिवस ‘निश’ म्हणून बुद्धिमान गणली जातात. नव्या पोस्टमॉडर्न बाजारात अँडव्हर्टायजिंगला किंमत नाही. आता मानाचे स्थान आहे ते डिजायनर्सना. मात्र मराठी भाषिक समुहात हे नवीन परिमाण अजून आलेले नाही. आम्हाला अजूनही टीव्हीवरची चमको मंडळीच ‘हुशार’ वाटतात! अजूनही आमचे लेखक त्यांच्या परदेशी डिग्र्या आणि मेरिट लिस्टमधल्या नंबरांवर खूष आहेत. आम्हाला ‘डिजायनर्स’मधली हुशारी समजेस्तोवर – डिजायनर्सच्या सात पिढ्या झालेल्या असतील. हे सगळे बघताना मन आतून खंतावते. पण मग ज्यांनी आपलं आयुष्यं डिजाईन केलं त्यांचं काय? माणसाला माणूस म्हणून ओळखणा-या, अंतर्बाह्य integrity असणा-या, आपण जे कोणी आहोत त्या आपल्या स्पिरिटला पूर्ण उपलब्ध होणा-या ‘हुशार’ माणसांबद्दल सध्या तरी मराठी भाषिक समुहाला काही ठाऊक नाही. आणि व्हिज्युअल भाषेत बोलणारे नवे हुशारप्राणी शब्दांतून दूर जायला लागल्यामुळे आता ‘माध्यम-चतुर’ आणि ‘व्हिज्युअल-तल्ल्ख’ अशा नव्या कॅटॅगरीज तयार होताना दिसतात. पॉल प्रायव्हेटिअरचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ वाचून झाल्यावर जुन्या परिमाणांवरचा माझा क्रिटिकल रोष मलाच उमजून आला आणि त्याच प्रकाशात, ‘बुद्धी-बुद्धी’च्या मराठी खेळाची झालेली गोचीदेखील मला स्पष्ट दिसू लागली..

Thursday, May 27, 2010

कवितेचं नामशेष होत जाणं...

एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक तर संपलं. कशासाठी लक्षात राहतील ही दहा वर्षं? जगाच्या स्मृतित जसे 9/11, त्सुनामी, ओबामाची निवडणूक, डॉलीचा क्लोन राहिले - तशी कशासाठी लक्षात राहतील ही पहिली दहा वर्षं? म्हणजे उदाहरणार्थ, मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी या दहा वर्षांत काय झालं? मराठी कवितेसाठी हे दशक कशासाठी लक्षात राहील? लाडक्या कवींच्या मृत्यूमुळे की मराठी कवितेच्याच नष्ट होण्याच्या प्रक्रियेमुळे?
अरूण कोलटकर, दिलीप चित्रे, अरूण काळे, भुजंग मेश्राम या कवींच्या जाण्यानंच लक्षात राहणार का गेलं दशक? की सकस मराठी कवितेच्या दुर्मिळ होत जाण्यानं?
हे सगळं मनात झरझर आलं कारण नामदेव ढसाळांचं 'निर्वाणा अगोदरची पीडा' वाचलं म्हणून. ज्यांच्या कवितेनी झोप उडवली, घसा कडू जहर केला, 'छबुकलं दारिद्रय' ज्यांनी लिहिली, ज्यांच्या कवितेतल्या उद्रेकानं काळजात काहिली पेरली त्या नामदेव ढसाळांनी या दशकात जी कविता लिहिलीय, ती या दशकालाच साजेशी आहे. फ्रॅगमेंटेड. ढसाळांची कविता जिथे जाऊ शकते तिथे न जाणारी. यात ढसाळांचे कित्येक तुकडे विखुरलेयत - त्यांचं आजारपण, 'विलासराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे'- अशी अर्पण पत्रिका, मल्लिका बरोबर लिहिलेल्या 'गोमू संगतीनं' दोन कविता - अनेक नामदेव ढसाळांनी ही 'निर्वाणा अगोदरची पीडा' प्रत्यक्षात आणलीय. त्यात एक ढसाळ गेल्या दशकातल्या मृत कविंचे मृत्यू जिव्हारी लागलेले ढसाळही आहेत. म्हणजे यात त्यांच्या चित्रे-कोलटकरांच्यावरच्या साठीच्या कविताही आहेत.
गेल्या दशकातल्या कवितेच्या वैराणपणाचं दुखरं कारण मला वाटतंय, ते म्हणजे पोस्ट मॉडर्न, पोस्ट इंडस्ट्रियल, पोस्ट सर्व काही, फ्रॅगमेंटेड अस्तित्व. गेल्या दशकात ज्यांनी कवितासदृश काही लिहिलं त्यांनी या एका कालरेषेवर वेगवेगळी आयुष्यं, एकाचवेळी जगण्याचा अट्टाहास नोंदवलाय. परंतु तो अट्टाहास आणि त्याच्या नोंदी म्हणजे कविता नाही हे त्या कविता-सदृश लेखकांनाही मनातून कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सदृश लेखनाची कडवट टीका करण्यात हशील नाही.
चिरीमिरी, भिजकी वही, अभुज माड, ग्लोबलचं गावकूस, नंतर आलेले लोक - या दशकातला महत्त्वाच्या कविता त्या छापल्या जरी 2000 नंतर तरी बहुतेक आधी लिहिल्या गेलेल्या आहेत. (कदाचित अरूण काळयांच्या काही कवितांचा सन्माननीय अपवाद वगळता.)
सध्याची फॅशनेबल चाल म्हणजे सा-या दुखण्याचं निदान 'सुमारांची सद्दी' या ढोबळ कॉईनेजनं करायचं. मला ते पटत नाही. सर्व काळात सदा सर्वदा सुमार कवी असतातच... पण सदा सर्वकाळ सळसळत खरी कविताही लिहिली जात असते. त्या कवितेचं या दशकात काय झालं?
रॅण्डम मला असं वाटतं - की जितकं इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन, टेक्स्ट मेसेजिंग, व्हर्च्युअल अस्तित्व वाढतंय तितकी एकसंध व्यक्तिमत्त्वच नामशेष होतायत. प्रत्येक जण जेवताना टीव्ही बघतोय, टीव्ही बघताना फोन घेतोय, फोनवर ऐकताना एसएमएस पाठवतोय, मेल चेक करतोय, इन्टेन्स फिलिंग जगणं आणि ते भावोत्कट पानांवर/स्क्रीनवर उतरवणं क्रमश: दुर्मिळ होतंय. किंवा एकच व्यक्तिमत्त्व कवी, राजकारणी, प्राध्यापक अशा पन्नास भूमिका निभावतंय. यातून कविता कशी निर्माण होणार?
कालच एका कवितासदृश लेखनात प्रियकराशी बोलताना टीव्ही बघणारी बाई दिसल्यावर तर या हायपोथेसिसला बळकटीच मिळाली. मग वाटलं, अरूण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणूनच तो माणूस खरी कविता लिहू शकला का काय? फेसबुकवरचं व्हर्च्युअल अस्तित्व, टिङ्कटरवरचे मतामतांचे गलबले, हजारो इच्छांची टोकं विणता विणता 'वामांगी' सारखी कविता शक्य तरी होईल का?
किंवा मला अत्यंत आवडणा-या मराठीतल्या दोन कवयित्री - सुचिन्हा भागवत जिनं आपलं अस्तित्व आणि त्याच्या गुंतागुंतीला दुस्तर आयडेंटिटीतून दूर ढकललंय आणि मेघना पेठे जिच्या व्हर्च्युअल मिडिआतल्या मौनानं मला कायम चकित केलंय, या दोन्ही व्यक्ती जिवंत, सळसळत्या कविता का लिहू शकतायत? मेघनाची अर्थात 'मी नाय साला तुझी बायको होणार' ही एकमेव कविता या दशकातली आहे - पण ती महत्त्वाची मानावी इतकी ऐतिहासिक आहे.
एकीकडून जगणं तपासत जाताना पोस्ट इंडस्ट्रियल जगण्याची कंपल्शन्स जशी लक्षात येतायत - तितकी कवितेच्या दुर्भिक्ष्याची ओळख नव्यानं व्हायला लागलीय. कवितेसारखं दिसणारं बरंच काही लिहिलं जातंय - पण त्या कविता नाहीत. निखळ कवितेसाठी व्हर्च्युअल प्रलोभनांना दूर ढकलायचं किंवा निदान कवितेपुरतं तरी त्यांना दूर ढकलून आपण दुसरंच व्हायचं - अशा स्ट्रेटेजीज लक्षात येतायत. कदाचित म्हणूनच सकस मराठी कवितेचं केंद्र आता वेगळया गावांकडे सरकायला लागलंय. जरी पुरस्कारांना तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार असला तरी.
अरिझोनातला मध्ययुगीन जपानी कवितेचा प्रोफेसर फोर्ड यांचा वर्ग मला आठवतोय. धर्म आणि कला अशी फारकत न झालेला जपानी कवितेचा तो काळ. कवी तिथे त्याच्या पूर्ण झेन असण्यात उमलून यायचा. प्रोफेसर फोर्ड त्या कविता शिकवताना माणसाचं विखुरलेपण आणि एकसंघ होण्याची तगमग ह्याबद्दल सांगायचे. संस्कृती जगण्याच्या निरगाठींची उत्तरं कशी कवितेत शोधते याचं फोर्डगुरूजींचं प्रवचन मला अजून आठवतंय. हायकू आणि बुध्दाला उमजलेली नित्यशून्यता यांचं नातं अधिक लक्षात येतं.

सकस कवितेचं नामशेष होत जाणं म्हणजेच सकस 'मी' नावाच्या भूमीचं पूर्ण खालसा होणं. ती निरगाठ न उकलताच - त्याचं शंभर निरगाठींसकट तगमगत राहाणं. ग्लोबलच्या गावकुसात 'कविता' मरण्याचं कारण हेच आहे का काय?
माझ्या लाडक्या कविंच्या नसण्यानं - म्हणजे विंदा, चित्रे, कोलटकर, अरूण काळे, भुजंग मेश्राम यांच्या नसण्यानं हे शतक सुरू झालंय - या नंतर? मराठी भाषेला युनिकोडमध्ये जगवताना कवितेच्या नसण्याकडं कोणाचंच लक्ष जाणार नाहीए का काय? की भाषा जगवताना कवितेचा सायलेंट मृत्यू हा इश्चेनिया आम्ही मान्य केलाय बहुधा.
'निर्वाणा अगोदरच्या पीडे'मध्ये ढसाळांचे फ्रॅगमेंट म्हणतंय - तसंच म्हणावं लागेल मग कदाचित, ''किती कडू असतं, हतबल माणसाचं जगणं'' - आणि हतबल वर्तमानात कवितेनं ठार नामशेष होत जाणं.

Thursday, May 20, 2010

मायाजालात 'इंटरनेट हिंदू'

इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची संधी मिळाली. वाद सुरू झाला 'इंटरनेट हिंदू' या वाक्प्रयोगातून.
दिल्लीतील 'इंडिया इंटरनॅशनल'मधल्या कॅज्युअल चर्चाही बातम्या होतात. तसेच, इंटरनेटवरील काही वर्तुळांतले कॉईन शब्द तत्काळ प्रतिष्ठित कॉलम्समध्ये जातात!
CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले. सागरिका यांनी टि्वटरवरच्या मतप्रदर्शनात 'इंटरनेट हिंदू' जमातीतल्या लोकांना शिव्या घातल्या, तेव्हा त्यांनी सारे 'इंटरनेट हिंदू' कसे तिय्यम दर्जाचे आहेत असे सांगत अजून पाच-पन्नास वेळा टि्वट केले. त्यांचे एक टि्वट माझ्या चांगल्या लक्षात राहिले. त्या लिहितात, ‘इंटरनेट हिंदू’ हे चवताळलेल्या माश्यांच्या झुंडींसारखे आहेत. मोदी, पाकिस्तान, मुस्लिम हे शब्द वाचले की या माश्यांची झुंड हल्ला करते.'' सागारिकला 'इंटरनेट हिंदूं'बाबत वाद-चर्चा करण्यापेक्षा त्यांना उचकावण्यात जास्त रस आहे असे माझे मत झाले आहे.

कांचन गुप्ता यांनी कॉइन झालेल्या या शब्दावर 'सण्डे पायोनियर'मध्ये लेख लिहिला. त्यांनी अमेरिकेत अथवा भारतात दिल्ली, चेन्नई अशा शहरांत स्थिर, झालेले उच्चशिक्षित उच्चभ्रू 'इंटरनेट हिंदू' हे स्युडो सेक्युलरिस्टांना कसे जागेवर ठेवतात याचे वर्णन आणि समर्थन केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमे, विशेषतः सीएनएन-आयबीएन, एनडीटीव्ही ज्या पध्दतीने 'हिंदुत्वा’चे खंडन करतात ते 'इंटरनेट हिंदूं'ना आवडत नाही आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून टि्वट्स, ब्लॉग्ज, यांच्यावर आपापली मते मनसोक्त प्रकाशित करतात. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष यांच्या ब्लॉग्जवर 'इंटरनेट हिंदूं'च्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. माध्यमांची भूमिका एककल्ली आहे आणि पत्रकारांना जनतेला माहिती देण्यापेक्षा, त्यांना आपली मते लादण्यात जास्त रस आहे असे या 'इंटरनेट हिंदूं'चे मत असते. त्यामुळे सागरिका घोष यांना त्यांच्या 'डाव्या' मतांबद्दल शिव्या घालणे यात 'इंटरनेट हिंदूं'ना गैर वाटत नाही आणि 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखण्यात सागारिकला काही कमी वाटत नाही.
हिंदुत्ववाद ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत जेव्हा वाढत होता तेव्हा डाव्यांना 'दंगलखोर शिवसैनिक' आणि 'अर्ध्या पँटीतले संघवाले' ही दोनच हिंदू रूपे ठाऊक होती. उलट, डाव्यांकडे इंटेलेक्चुअल्स, कामगार, कलाकार, सोविएत प्रणित फंडिंगवर जगणारे अनेक मान्यवर लेखक अशी जी विविधता होती, त्यापेक्षा कित्येकपट सरधोपट आणि अल्पसंख्य ओळख 'हिंदू' मते मांडणा-या समुहात होती. संजय पवार यांच्या 'कोण म्हणतं टक्का दिला?' नाटकामधला सोमनाथ मंदिराची पुनःपुन्हा आठवण काढणारा भाऊ हा या 'इंटरनेट हिंदूं'चा पूर्वसुरी मानता येईल!
मात्र हे गणित नव्वदच्या दशकानंतर बदलले. इंटरनेटचा वापर ऍकॅडमिक संस्थांमधून मोठया प्रमाणावर चालू झाला आणि समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय संशोधन अशा ज्या क्षेत्रांत बहुतांश डाव्यांची मक्तेदारी होती त्या विषयांवर इतर विद्याशाखांतील माणसेही आपापली मते व्यक्त करू लागली. इंटरनेटमुळे प्रथमतः मानव्य शाखा आणि इंजिनीयरिंग, प्युअर सायन्स रिसर्च, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थ या सा-यांना एकत्र व्यासपीठ निर्माण झाले. तोपर्यंत मानव्य शाखांत संशोधन करणा-या व्यक्तींना त्यांचा 'स्वायत्त' डावा कोष होता. आयआयटीत डावे-उजवे गट होते, परंतु ते हॉस्टेलमध्ये रात्र रात्र जागून केलेल्या भांडणांपुरते. y2k नंतरच्या काळात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, मानव्य शाखांचे शिक्षण नसलेले, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय, IT क्षेत्रांत घुसलेले घोडागिरी स्पेशालिस्ट (सॉरी, म्हणजे बॉडीशॉपिंगच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन फारसे महत्त्वाचे काम न करणारे असे लोक) यांची मोठी फळी इंटरनेटवर कार्यरत झाली. यांत काही अतिशय स्मार्ट आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारेही होते.
या फळीला डाव्यांनी वर्षानुवर्षे उराशी कवटाळलेली समाजवादसुलभ मते पटायची नाहीत आणि तिथूनच 'स्युडो सेक्युलारिस्ट' या विशेषणाचा इंटरनेट वापर वाढलेला दिसून येईल.
पूर्वी 'याहू ग्रूप्स'वर वाद चालायचे. हे 'याहू ग्रूप्स' भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत इत्यादी गोष्टींवर चर्चा करायचे. एखाद्या 'याहू ग्रूप'वर हजारो माणसे जरी मेंबर असतील तरी त्यांतले व्यक्त होणारे दहा-पंधरा जणच असायचे. बाकीचे वाचक असायचे. 'इंटरनेट हिंदूं'चा पहिला जन्म झाला तो या 'याहू ग्रूप्स'वर. इथे प्रथम मी मुंबईतल्या ९२सालच्या अयोध्येनंतरच्या दंगलीबद्दलची चर्चा ८४च्या शीख दिल्लीतील दंगलींपर्यंत गेलेली वाचली किंवा रोमिला थापर यांना मनसोक्त शिव्या घालणा-या लेखकांचे ताशेरेही वाचले.
अनेकांनी 'याहू ग्रूप्स'मधून फुटून आपापले गट तयार केले. यात 'सॉनेट'चा (म्हणजे साऊथ एशियन विमेन्स नेटवर्क) उल्लेख करते. 'याहू ग्रूप्स'ना कंटाळून लिबरल डाव्यांनी आपली वेगळी चूल मांडणे सुरू केले. 'सॉनेट'वर तर फक्त स्त्रिया पोस्ट करू शकायच्या. या सा-या ग्रूप्समध्ये इंग्रजीवर प्रभुत्व असणा-या दोन-चार 'इंटरनेट हिंदूं'ची आणि लिबरल डाव्यांची सतत जुंपायची. दरम्यान, 'सुलेखा' या पोर्टलचा जन्म झाला. अनेक अनिवासी भारतीयांना 'सुलेखा'मुळे आधार मिळाला. त्यावर क्लासिफाईड्स होत्या, लग्ने जमवण्याची सोय होती; शिवाय ब्लॉग आणि चर्चा करण्यासाठीही जागा होती!
भारतातल्या भाजप सरकारच्या काळात, जेव्हा 'इंडिया शायनिंग' होता तेव्हा 'इंटरनेट हिंदूं'नी आघाडी घेतली. सुलेखावर त्या काळात झालेले 'आर्यांचे आक्रमण खरे की खोटे?', 'सिंधु संस्कृतीचा प्रश्न', 'प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये' या विषयांवरचे वाद मला आठवतात.
इन्फिनिटी फाऊंडेशनचे राजीव मल्होत्रा, बापा राव, संक्रांत सानू ही मंडळी तत्कालीन समाजात 'इंटरनेट हिंदूं'चे काम करत. डाव्यांच्या सेक्युलर तुच्छतावादाला इंटरनेटवरून दिलेले हे जहाल 'हिंदू' प्रत्युत्तर होते. त्या सुमारास झालेले दोन-तीन वाद महत्त्वाचे होते.
शिकागो विद्यापीठात वेंडी डोनिजर या प्राध्यापिका शिकवतात. अमेरिकन विद्यापीठात रिलिजन, रिलिजस स्टडीज या विषयांचा 'सेक्युलर' व ‘धार्मिक', दोन्ही अंगांनी अभ्यास होतो. यामध्ये अनेक वर्षे डोनिजरबाईंनी भारतीय हिंदू धर्माबद्दल लेखन, संशोधन केले आहे. मात्र पूर्वी, अशा त-हेचे लेखन केवळ विद्यापीठीय वाचनापुरते मर्यादित होते. Y2k नंतरच्या जगात उच्चविद्याविभुषित, भारतीय संस्कृतीवर प्रेम करणा-या लोकांनी डोनिजरबाईंची पुस्तके वाचली. त्यांना त्यातले भारतीय देवी-देवतांबद्दलचे उल्लेख असह्य झाले. वेंडी डोनिजर, पॉल कार्टेराईट, जेम्स लेन या तीन, 'रिलिजन' या विद्याशाखेत संशोधन करणा-या लेखकांवर ‘सुलेखा’वरून सडकून टीका करण्यात आली. नंतर त्याचेच पर्यवसान वेंडी डोनिजरवर अंडी फेकण्यात किंवा भारतात जेम्स लेनच्या पुस्तकावरून वादळ उठवण्यात झाले. 'इंटरनेट हिंदूं'चे हे शक्तिप्रदर्शन होते.
गेल्या आठवड्यात अशोक मलिक यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये 'व्हेन द फ्रिंज बेनिफिट्स' म्हणजे जेव्हा अल्पसंख्यांचा फायदा होतो असा कॉलम लिहिला, तेव्हा त्या कॉलममधून त्यांनी 'इंटरनेट हिंदू'चा पुन्हा उल्लेख केला.
अशोक मलिक यांच्या मते, भाजपप्रणित हिंदू फळीला वाव राहिलेला नसल्यामुळे ते आता 'इंटरनेट अँक्टिव्हिजम' करत आहेत.
कांचन गुप्ता यांचे मत वेगळे आहे. त्यांना या 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखायचे नाही. माध्यम आणि शिक्षणव्यवस्थेतली डाव्यांची दादागिरी हे 'इंटरनेट हिंदू' मोडीत काढतात असे त्यांना वाटते.
'याहू इंडिया'वरचा अमित वर्मांचा कॉलम आणि मला आवडणा-या 'सेपिया म्युटिनी' या ब्लॉगवरची मते मात्र मला या संदर्भात फार आवडली. अमित वर्माने सागरिका यांच्या दुख-या भागावर बोट ठेवले. इंटरनेटवर 'ट्रॉल' नावाची एक जमात असते. तुमच्या मतांना विरोध करून, अत्यंत ग्राम्य भाषेत तुमच्याबद्दल लिहून तुम्हाला भडकावणे एवढेच 'ट्रॉल'चे काम असते. इंटरनेटवर ज्यांनी अनेक वर्षे काढली. त्यांनी या 'ट्रॉल'बरोबर वाद न घालता त्यांना दुर्लक्षून मारून टाकावे असे बेसिक ट्रेनिंग आवश्यक असते. हे ट्रेनिंग इंटरनेटवर मते व्यक्त करणा-या प्रत्येकाला हवे असे अमित वर्मांचे मत आहे. अमित वर्मा 'डुकरांबरोबर कुस्ती खेळू नये. तुम्हाला चिखल लागतो आणि डुकरांना मज्जा येते!' असे मूळ तत्त्व सांगतात.
पण त्याही पलीकडचे सुंदर निरीक्षण नोंदवले गेले आहे, 'सेपिया म्युटिनी'वर. इंटरनेटवर माणसे वास्तवात आहेत, त्यापेक्षा जास्त अतिरेकी वागतात. शिवाय, समविचारी ब्लॉगर किंवा प्रतिक्रिया लिहिणारे भेटले की त्यांची मते अहमहमिकेने अधिक जहाल बनत जातात. या जहालपणाची चढाओढ चिन्ह जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी होते. मात्र इंटरनेटवरचा अतिरेकीपणा ही केवळ 'इंटरनेट हिंदूं'ची मक्तेदारी नाही असे 'सेपिया म्युटिनी'वर म्हटले आहे. इंटरनेट मार्क्सिस्टस्, इंटरनेट ज्यू, इंटरनेट मुस्लिम असे अनेक प्रकारचे ‘कडवे वाल’ इंटरनेटवर जन्माला आलेले आहेत. यांच्या जन्माचे कारण म्हणजे त्यांची 'अस्मिते'ची भूक आहे. या नव्या अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. बदनामीचे एक साधन म्हणून इंटरनेट वापरता येऊ शकते, म्हणूनच केवळ 'इंटरनेट हिंदूं'ना खडयासारखे वेगळे काढता येणार नाही.
माध्यमांकडे, अँकॅडॅमिक्समध्ये पूर्वापार असणारी डाव्या विचारसरणीची वैचारिक दादागिरी नव्या पिढीला चालत नाही. मनसेच्या राड्यानंतर किंवा मिरजेच्या दंगलीनंतर तरुण मुले इंटरनेटवरून आपापली मते त्वेषाने मांडताना दिसतात. 'इंटरनेट हिंदूं'ची ही जनरेशन नेक्स्ट आहे. मनसेचे इंटरनेट मनसैनिक 'राजसाहेबांना' ज्या प्रकारे मानतात ते बघितल्यावर येणा-या काळाची चुणूक दिसते.
मात्र या माध्यमात अशा त-हेच्या नव्या अस्मिता जन्माला येताना बरेच काही शिकण्याजोगे आहे. 'महाराष्ट्र माझा' या शिरीष पारकरांच्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसचा उल्लेख 'व्हीटी' असा केला. ही बातमी टि्वटरवरून पसरताच इंटरनेट मनसैनिक सरसावले. ही तरुण पिढी किती वेगळी आहे बघा! त्यांतले अनेक जण म्हणाले, की 'राजसाहेबांनी व्हीटी म्हटले असेल तर ते चूक आहे. त्यांनी 'सॉरी' म्हणावे म्हणजे प्रश्न मिटला.' नेत्यांकडे, त्यांच्या राजकारणाकडे खुलेपणाने बघणारी ही तरुण पिढी इंटरनेटवर व्यक्त होत आहे.
अशा तरुण पिढीला अतिरेकी डावी मते मांडून स्वतःला स्नॉब समजणा-या सागरिका आवडणार नाहीत. तसेच, दुसरीकडे त्यांना श्रीराम सेनेचा मूर्खपणा किंवा संघिष्ट -हेटॉरिकल प्रतिवादही आवडणार नाही. 'इंटरनेट हिंदू', इंटरनेट ज्यू, इंटरनेट मराठी हे इंटरनेटवरी कडवे अस्मितावादी; परंतु ते त्यांच्या व्यवहारात अतिशय सेक्युलर असू शकतात, किंबहुना असतातच. इंटरनेटवर त्यांनी आपल्या कडवेपणाने लिबरल कडवेपणाला शह दिलेला असतो. इंटरनेट नावाच्या मायाजालातल्या या नव्या शक्यता आहेत. नेटवरच्या नव्या समीकरणांत पन्नाशीकडे झुकलेले जुने डावे, जुने समाजवादी, जुने हिंदू, जुने जहाल, कोणीही टिकणार नाहीत. आता नवे प्रॅग्मॅटिक जहाल इथे निर्माण होतील आणि स्वतःला शहाण्या समजणा-या प्रत्येक व्यक्तीचे राजकारण तपासून बघतील. त्यांचे विचार इंटरनेट माध्यमातून समाजमनात झिरपत जातील.
खरी ओळख लपवणे इंटरनेटमुळे शक्य होते. त्यामुळे इंटरनेटचे जग हे प्रत्येक सामाजिक व्यक्तीचे वाभाडे काढू शकेल. शेवटी, आपल्याला कोणत्या डुकरांशी कुस्ती खेळायची आहे की त्यांना सॉक्रेटिक शहाणपणापर्यन्त न्यायचे आहे हा असेल ज्याचा त्याचा प्रश्न!

Saturday, May 8, 2010

गुरुदेवांना आठवताना

महाराष्ट्राला पन्नास वर्षं पूर्ण होतायत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतायत. महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण अगत्याचंच आहे.
मी एका दुर्लक्षित अभावाकडे लक्ष वेधू इच्छिते. आपल्या जगण्यातून क्रमश: नाहीशा होणार्या सुंदरतेचा अभाव मला अस्वस्थ करतो. माणसा-माणसातली, निसर्ग आणि माणसातली, शासन आणि नागरिकांमधली असुंदर नाती अंगावर काटा आणतात. वास्तवाच्या या कुरूप दर्शनानं अस्वस्थ होण्याचं एक महत्त्वाचं कारण किंवा या अभावाची प्रकर्षानं जाणीव होण्याचं कारण म्हणजे 7 मे रोजी येणारी रविंद्रनाथ टागोरांची जयंती. रविंद्रनाथांच्या जन्माला यावर्षी दीडशे वर्षं पूर्ण झाली. त्या सौंदर्यपूजकाची आठवण काढताना, जगण्यातल्या सौंदर्यांच्या अभावाची आठवण होणं अपरिहार्य! एकेकाळी अभिजात कलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं राजकारण, समाजकारण संस्कृतिकारण, भाषाकारण चालू आहे ते बघता सौंदर्यांची, सुंदरतेच्या मूल्याची साधी आठवणही कोणाला राहिली आहे असं वाटत नाही. आणि हा सुमारपणा आमच्या धोरणांपासून ते संस्कृतीच्या नावावर चाललेल्या अत्यंत भंपक अस्मिताकारणातूनही दिसतोय.
पण, रविंद्रनाथांना आठवताना, मूळ मुद्दा केवळ राजकीय नाही; तर तो त्या पलीकडचा आहे. एक कारण मला असं जाणवतंय, की सामाजिक नेतृत्व हे गांधीवादी, समाजवादी, डाव्या चळवळींशी निगडित असल्यानं अनेकांना 'सत्यासाठी लढा' हे मूल्य महत्त्वाचं वाटतं. ते लढाऊ मूल्य मराठी मातीत रुजलेलं आहे. नरेंद्र दाभोळकर, मेधा पाटकर, डॉ. अभय बंग... कित्येक जण लढयात दिसतात. मात्र कलात्मक विचार केंद्रस्थानी मानणार्यांळचा ठार अभाव प्रत्ययाला येतो.
कलेला केंद्रस्थानी मानणारा सौंदर्यविचार हा 'एलिटिस्ट' म्हणून जणू काही नाकारण्यायोग्य आहे अशी चुकीची समजूत सार्वत्रिक पसरलेली दिसतीय. यामागे अज्ञान आणि राजकारण, दोन्ही आहे. कलेचं क्षेत्र कार्यकर्त्यांनी एकीकडून नाकारायचं आणि दुसरीकडून ती फक्त एक अतिश्रीमंत वर्गाची मक्तेदारी बनायची, या दोन्ही प्रक्रिया महाराष्ट्रात घडताना दिसतायत.
एकीकडे मराठी चित्रकारांना, आर्किटेक्टस्ना, डिजायनर्सना उत्तम दिवस आलेत, तर दुसरीकडे भंपक दिवाळी अंक, सुमार साहित्य आणि 'सारेगमप'प्रणित संगीत मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आलंय. आपल्या आयुष्यातल्या असमतोलाचा आणि निसर्गातून, कलेतून आपलं वजा होणं यांचा संबंध आहे का? ते आपण तपासायला हवे. मात्र अनेकांना प्रश्न असा पडतो, की जगणं एवढे बकाल आणि भकास बनत जाताना, जीवनमरणाचे प्रश्न समोर असताना सौंदर्याचा विचार कसा सुचणार? तो तर पोट भरल्यानंतरच सुचतो. परवा क्लारीसा पिंकोला इस्टेस या लेखिकेचं 'वूमन हू रन विथ वुल्वज्' नावाचं अतिशय प्रभावी पुस्तक वाचताना याच विचारांचा पुन्हा प्रत्यय आला (बाय द वे अरुण कोलटकरांच्या 'भिजकी वही'तली 'हाडम्मा' याच पुस्तकातून आली) इस्टेस ही सायकोथेरपिस्ट आहे. आत्महत्येच्या टोकाला गेलेल्या रुग्णानं, तिला आपण आत्महत्या करायचं का नाकारलं? हे एकदा सांगितलं. ती म्हणाली, 'त्या उदास दिवशी मी एक कोळी अतिशय सुंदर जाळं विणताना बघितला, त्या सौंदर्यानं मी भारावले. जगण्याकडं पुन्हा वळले.'
इस्टेस म्हणते, मनातले अनंत कल्लोळ निवळवण्याचं सामर्थ्य निसर्गाच्या, सौंदर्याच्या क्षणकाळ दर्शनातही असतं. तरतरून बहरलेलं झाड, पावसानंतरचं इंद्रधनुष्य, सुंदरशी कविता, देखणं जगलेलं आयुष्य, एखादी कलाकृती, पहाटेच्या एकांतातला झाडांचा सहवास- निसर्गाच्या कलेच्या सौंदर्यकेंद्री जादूनं कित्येक मनं पुन्हा उभी राहताना तिनं बघितली. इस्टेस म्हणते, की अनंत न्युरॉसिस निवळवू शकेल असं मनाचं शांतवन करण्याचं सामर्थ्य सौंदर्यमूल्यात आहे.
त्या मूल्याचा अभाव म्हणून तर आपण बकाल आणि भकास, तोल हरवलेलं जगणं पदरात बांधून घेत नाही आहोत ना? रविंद्रनाथांच्या शब्दांत सांगायचं तर खरा सौंदर्यपूजकच खरा अहिंसक होऊ शकतो. हिंसेतली अपुरी कुरूपता तो जाणू शकतो. स्वत: रविंद्रनाथांनी अशी जातिव्यवस्थेतली कुरूपता जाणून तिला विरोधही केला होता.
सत्य आणि सौंदर्य ही म्युच्युअली एक्सक्लुझिव- म्हणजे एक असेल तर दुसरं नसेल अशा पर्यायी पठडीतली मूल्यं नाहीत. सत्यात साधेपणा, सरळपणा आहे. तो सुंदरच आहे आणि सौंदर्याचा आग्रहदेखील आपल्याला सत्यापर्यंत पोचवतो हे जाणणं, याचं भान पुन्हा एकदा येणं आवश्यक आहे.
गौतम बुध्दाचं अंतिम प्रवचन फक्त मौनात आणि एक अकारण सुंदर कमळाच्या दर्शनानं साजरं झालं. त्या देखण्या क्षणाचा अन्वय फक्त महाकश्यपाला लागला होता. अशा क्षणामधलं इन्टेन्स सौंदर्य आपल्याला समजावून सांगावं लागत नाही. ते कळतं, ते जाणवतं, ते आपल्याला माणूस बनवतं. मात्र त्याच्या अभावानं आताशा आपला जीव खंतावत नाही, घशात आवंढा येत नाही. आपण 'वो सब नही परवडता' म्हणून निमूट निघण्याची तयारी करतो.
रविंद्रनाथांच्या जयंतीच्या निमित्तानं, ज्यानं गांधींना 'महात्मा' म्हणून ओळखलं आणि ज्याला गांधींनी 'गुरुदेव' म्हणून जाणलं अशा कवीला पुन्हा आठवणं आणि त्याच्या 'सुंदरतेच्या साक्षात्कारा'चा परिचय तरी करून घेणं आवश्यक आहे. मराठी आणि माणूस दोन्ही बनवण्यासाठी!

My new column www.thinkmaharashtra.com titled Brihatkatha. You could read more on the site here..... http://www.thinkmaharashtra.com/think1/

Wednesday, May 5, 2010

वाचता वाचता

Keep in mind the old jungle saying, 'Never wrestle with a pig. You get dirty and the pig enjoys it.' The internet empowers loonies of all kinds by giving them a megaphone -- but no one is forced to listen to them. The noise-to-signal ratio is way out of whack on the net (Sturgeon's Law), and any smart internet veteran will tell you that to keep your sanity, you need to ignore the noise.

..While reading Amit Verma's viewfinder, came across his great insight.

Monday, April 5, 2010

विमलाजी : देखण्या आयुष्याची ओळख

विमला ठकार हे या भारतात फुललेलं एक सुंदर आयुष्य होतं. विमलाजींच्या देहावसानाची बातमी लोकसत्तेत वाचली. माझ्या हातात कायम विमलाजींची पुस्तकं असायची किंवा माझ्या जवळच्या मैत्रिणींना विमलाजी मला अत्यंत आदरस्थानी आहेत हे ठाऊक होतं. त्यांच्या सोबत विमलाजींबद्दल बोलणं झालं. विमलाजी असत्या तर, 'विमल' नावाचा देह आता आपल्यात नाही असं स्पष्ट म्हणाल्या असत्या. सत्यावर नुसतं प्रेम करणारी नव्हे सत्य जगणारी, सत्य असणारी ही व्यक्ती होती. मृत्यूसमयी त्या 88 वर्षांच्या होत्या. अॅनला फोनवर मी म्हटलं, " त्या आता नाहीत यात शोक करण्यासारखं काही नाही. या विश्वाला, त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला, आयुष्याला विमलाजींनी भरभरून दिलंय, समृद्ध केलंय. काय सुंदर, देखणं आयुष्यं होतं त्यांचं!" अॅन म्हणाली, "what a remarkable life!"
पण मग कसं होतं हे आयुष्य? विमलाजींचा जन्म अमरावतीचा. घरात परंपरेनं अध्यात्म आणि विवेकवादाचं वातावरण. आजोबांकडं आध्यात्मिक सत्पुरुषांचं येणं-जाणं तर वडील रॅशनॅलिस्ट संघटनेचा विचार मांडणारे. अशा घरात, पूर्ण स्वातंत्र्यात विमलाजींचं बालपण गेलं. विमलाजींच्या चरित्रात या सर्व गोष्टींचे उल्लेख येतात. त्यांची आध्यात्मिक जिज्ञासा, प्रयोग या सर्वांचे. पण माझ्या लक्षात राहिला तो विमलाजींचा त्यांच्या वडिलांसोबत झालेला हृद्य संवाद.
विमलाजींना आध्यात्मिक जिज्ञासा आहे हे कळल्यावर वडील त्यांना म्हणाले, "तुम्हाला ज्या पद्धतीनं शोध घ्यायचा तो घ्या. पण कुणाच्याही 'गुरू' म्हणून आहारी जाऊ नका. जे मनाला, बुद्धीला पारखून घेता येईल तेच ज्ञान म्हणून स्वीकारा."
आणि हा धागा विमलाजींच्या जीवनशोधात, शोधयात्रेत सतत दिसतो. आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात गुरू करायला आणि गुरू व्हायला अनेक प्रलोभनं असतात. आयुष्याच्या दर्शनानं भयभीत झालेल्या विकल मनाला स्वत:च्या कृत्यांची पूर्ण जबाबदारी घेण्यापेक्षा 'गुरू'ची आयुष्यात स्थापना करणं सुलभ वाटतं. आणि गुरूंचंही तसंच होतं. विमलाजी म्हणायच्या, "कामेषणा, वित्तेषणा सुटते पण लोकेषणा सुटत नाही." म्हणजे मनुष्य एखाद्यावेळी कामभावनेतून, धनलोभापासून मोकळा होऊ शकतो. पण लोकांनी मला नेता किंवा गुरू मानावं ही भावना सोडणं सर्वात अवघड. कुणी आपल्याला 'गुरू' मानलं की जसं अहंकाराचं पोषण होतं. ते सोडणं फार अवघड. अध्यात्माच्या क्षेत्रात सात दशकांहून अधिक वावर करूनही विमलाजी या लोकेषणेपासून मुक्त राहिल्या. त्यांनी 'गुरू'चं नातं कुणाशीही जोडलं नाही. कृष्णमूर्ती यांच्या अगदी निकट असून त्यांनी कृष्णमूर्ती यांचंही 'शिष्यत्व' कधी स्वीकारलं नाही.
नव्या युगातल्या नव्या माणसांशी त्यांनी सख्यत्वाचं, मैत्रीचं नातं जोडलं आणि मैत्रीपूर्ण संवाद केला.
माझा आणि विमलाजींचा असा मैत्रीपूर्ण संवाद झाला होता. आणि इतकी मोकळी, स्वीकाराची ज्ञानपूर्ण संवादाची, समजून घेण्याची भेट मी आयुष्यात त्यापूर्वी कधी अनुभवली नव्हती.
जे. कृष्णमूर्ती यांच्या लेखनाचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता. कृष्णमूर्ती यांच्या परखड, स्पष्ट, तरीही ऋजू विश्लेषणानं मला खूप काही दिलं होतं. मात्र मला संवादाची भूक होती. माझ्या आतले प्रश्न, कोलाहल, अशांत मन यावर जालीम उपाय शोधावा अशी विशीतली आकांक्षा माझ्या प्रयोगांच्या पाठीशी होती. सबब मी माझ्या मार्क्सवादी शिक्षणात न शोभेलशा भुकेनं तुकोबांपासून ते निसर्गदत्तांपर्यंत जे हाती मिळेल त्याचं वाचन करत होते. घरातून संत वाङ्मयाचे संस्कार होते. परंतु माझ्या अस्वस्थ एकटेपणाची, हृदयस्थ काहिलीची उत्तरं मला कळत नव्हती. अशा वेळी कृष्णमूर्ती यांच्या लेखनानं किंवा दर्शनानं म्हणते हवं तर, मला एक दरवाजा उघडून दिला. स्वत:च्या कृत्यांची unconditional जबाबदारी घेण्याचा दरवाजा. जगावर, भूतकाळावर परिस्थितीवर बोट दाखवताना स्वत:कडं वळलेल्या तीन बोटांची जबाबदारी घेण्याचा दरवाजा जिद्‌दूनं मला दाखवला. पण जिद्‌दू मला अप्राप्य वाटायचा.
मला संवाद हवा होता. या आयुष्याच्या निरगाठींवर जिता जागता संवाद. आणि कृपा किंवा योगायोग म्हणू. हवं तर माझ्या हातात विमलाजींचं 'प्रयाणोत्सव' हे पुस्तक आलं. कृष्णमूर्ती यांच्या लेखनातून परंपरा पूर्ण वजा होती. तर बाईंनी भारतीय आध्यात्मिक परंपरा न नाकारता तिला आधुनिकतेला जोडलं होतं. ज्ञानोबा-तुकोबा जे मला प्रिय होते त्याच्या शब्दांची उकल विमलाजीं इतकी सुंदर दुस-या कुणीच कधीही केली नाहीए. यांना आपण भेटायचं असं मी ठरवलं. त्यावेळी कैसर इराणी ही त्यांची सेक्रेटरी होती. मी कैसरला पत्र लिहलं. विमलाजींनी मला दोन तासाची वेळ दिली. माऊंट अबूला, शिवकुटीमध्ये त्यांनी मला बोलावलं.
कविहृदयाची स्त्री, विनोबांच्या भूदान चळवळीत तिनं महत्त्वाचं योगदान दिलं. भारतभर प्रवास केला. जेपींपासून ते दादा धर्माधिकारींपर्यंत सर्वांसोबत काम केलं. विवेकाला पटलं त्या सर्व सामाजिक कामात सहभाग घेतला पण कधीही स्वत:चं संस्थान होऊ दिलं नाही.अशा प्रखर बुद्धिमान व्यक्तीला भेटणं हा माझ्या आयुष्यातला फार मोठा योग होता.
कोणत्याही भेटीत आपण आपल्या अहंकाराचं कसं पोषण होईल ते बघत असतो. या अमक्या थोर व्यक्तीनं मला अमुक असं कॉम्प्लिमेंट दिलं हे आपण नंतर चवीनं सांगतो. विमलाजींच्या भेटीत ते झालं तो संवाद होता. त्यात कौतुक नव्हतं तर जाणवली होती त्यांची आस्था. आपल्याशी संवाद साधू इच्छिणा-या धडपडणा-या मुलीच्या प्रश्नांना उत्तरं देताना, कोणताही आविर्भाव न घेता प्रेमानं विमलाजींनी माझ्याशी संवाद साधला. "अगं, आयुष्याच्या या टप्प्यांवर आपण का भेटलो? भेटी का होतात? ते जरी आपल्याला ठाऊक नसलं तरी प्रत्येक भेटीत जे काही उत्तम माझ्याजवळ आहे ते सारं मी त्या भेट घेणा-याला द्यावं असं मला वाटतं," असं त्या म्हणाल्या. विमलाजींशी भेट म्हणजे खुल्या अवकाशाशी भेट. या भेटीनं मला माणूस म्हणून खूप काही दिलं. किती बालिश वाटतात आता मला मी विचारलेले प्रश्न आणि किती मूलभूत उत्तरं दिली त्यांनी मला. तो संवादही नंतर मी स्वतंत्रपणे लिहून काढला.
आज ते वाचताना विमलाजींच्या आस्थेचं प्रत्यंतर जागोजाग येतं. कृष्णमूर्ती आणि विमलाजींच्या विषयी जरी मी, लिहिलं तरी मी कोरडा पाषाण आहे! त्यामुळे अशा भेटीनंतर बदल होतो. तोही अतिशय थोडासा. पण त्या थोड्याशा बदलानंही मला भान दिलं. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाकडं, त्यातून निर्माण होणा-या तीव्र दु:खाकडंही एका अनुभवासाठी आवश्यक शिकवणी म्हणून बघण्याचं भान विमलाजींनी मला दिलं.
मराठी मुलखातल्या असून नंतर गुजरात ही त्यांनी कर्मभूमी मानली. डलहौसी आणि माऊंट अबू इथं त्या राहायच्या. माऊंट अबूतली शिवकुटीतली संध्याकाळ अजून मला आठवते. स्मरणरंजनासाठी नाही. तर त्या संवादानंतर ता-यांनी उमलून आलेलं आकाश जसं माझ्या नजरेला दिसलं त्या अवकाशाची ती आठवण आहे. विमलाजींचं आयुष्य हा फार मोठा प्रवास आहे. त्या प्रवासानं अनेक लढे, सामाजिक चळवळी, आयुष्यं उजळली. त्यांच्या देहाचं आपल्यात नसण्याचं हे स्मरण. त्याचबरोबर त्यांच्या असण्याचं समृद्ध झालेल्या क्षणांचंही!