सतीश तांबे यांनी ब्लॉग वरची चर्चा वाचून पुढील प्रश्नावली पाठवली. त्यातील प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत.
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
३) साहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
४) तुमच्या लेखी सर्व साहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता, कथा, कादंबरी असा कोणताही साहित्यप्रकार न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान देता का?
या तांब्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते.
माझ्या मते अनिल अवचट हे मूळात 'रिपोर्ताज' पद्धतीचे लेखन करतात. अवचटांची अनेक वर्णने पार्शल असतात. आणि ते छोट्या अनुभवाची बरीच लांब बतावणी करतात. याला आम्ही 'पालीची मगर करणे' असे म्हणायचो. अवचटांची 'अमेरिका' हे अशा problematic लिखाणाचं उदाहरण आहे. मात्र आता त्यावर सवडीने लिहावयास हवे. शिवाय लेखनाची समीक्षा ही त्यांच्या इतर कामाची बाय डिफॉल्ट टीका नव्हे. मात्र लेखनाबद्दल लिहिताना सारखी जीभ आवरायची गरज काय?
Tuesday, November 30, 2010
Friday, October 29, 2010
A Tourist and A Traveler

Tunner: We're probably the first tourists they've had since the war.
Kit Moresby: Tunner, we're not tourists. We're travelers.
Tunner: Oh. What's the difference?
Port Moresby: A tourist is someone who thinks about going home the moment they arrive, Tunner.
Kit Moresby: Whereas a traveler might not come back at all.
Tunner: You mean I'm a tourist.
Kit Moresby: Yes, Tunner. And I'm half and half.
From The Sheltering Sky 1990.
अनिल अवचट : एक न आवडणं
बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यांतली नायिका फरक सांगते –प्रवासाबद्दलच्या धारणेचा.
‘मी इथं आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून नाही’ – आणि मग, टूरिस्ट सहप्रवासी मित्राच्या चेहेर्यावरचे भाव वाचून ती पुढे म्हणते –‘टूरिस्ट म्हणजे जो नव्या देशात येताक्षणी परत जाण्याची तारीख निश्चित करतो आणि ‘ट्रॅव्हलर’ला नव्या देशात आलं की परत जाण्याची आठवणही होत नाही. प्रवास हेच त्याचं सर्वस्व!’
पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे – टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण. मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. हनिमूनचे फोटो दाखवण्याचा मूर्ख अश्लीलपणा हे पण याच वर्गाचं लक्षण! जर अनुभवाला मनापासून सामोरं जायचं तर फोटो कोण काढील? दारू पीत त्या संबंधीची वर्णनं कोण सांगील? पण लग्नाच्या नात्यातला चार्म संपला की ‘आमची युरोपची टूर’ ‘आम्ही ठेक्कडीला गेलो होतो तेव्हा’ अशा गप्पा सुरू होतात – बकार्डी पीत पीत...
‘आठवडाभर मी ट्विट करणार नाही’ असं जाहीर करत राजदीप सरदेसाई नाही का कर्नाटकात भटकायला गेला आणि त्याची बायको सागरिका घोष लिहीत होती आठवडाभर जगाला ट्विट करत – नागरहोळे आणि काबिनी किती सुंदर आहे म्हणून! मनात आलं, “अगं माझ्या बायो, जर ते इतकं सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की. ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.
'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.
या पब्लिकचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते वाचण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना पु.ल. देशपांडे आवडतात आणि पन्नाशीत येता येता, त्यांना अनिल अवचट थोर वाटतात! जे असुंदर आहे त्याच्या डोळ्यांत डोळा घालून पाहायचं एकदा का भयापोटी नाकारलं की मग सर्व गोष्टिंना सरसहा चांगलं म्हणणारा पोस्टमेनॉपॉझल समाजवाद हीच काय ती बुडत्याची काडी!
ठाण्याच्या ‘मॅजेस्टिक’मध्ये पुस्तकांचे गठ्ठे पडले होते. भोचकपणे मी एक पुस्तक खेचून बाहेर काढलं – ‘पुण्याची अपूर्वाई’. बकाल पुण्यात राहणार्या बहुसंख्य पुणेकरांना अवचटांनी ही ‘अपूर्वाई’ सप्रेम दिली हे म्हणतानाच मला हसू फुटलं. पु.ल. म्हणजे ‘अपूर्वाई’साठी परदेशी जाणारे पहिल्या धारेचे समाजवादी कार्तिकेयस्वामी; तर अनिल अवचट म्हणजे दुसर्या धारेचे पुण्यालाच अपूर्व करून प्रदक्षिणेचं पुण्यं मिळवणारे पुणेरी गणपती!
पूर्वी वाचकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं होतं. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. ‘नाही आवडावं’ असं त्यांच्या लेखनात काही नाहीच. पण कंटाळा येण्यासारखं खूप काही आहे. त्यांचा दंभ किती मोहक आहे ? उगीच का वर्णी लागते कॉर्पोरेट आणि एन आर आय जगात त्यांची ? अनिल अवचट मला बोअर करतात. माझा राग अनिल अवचटांच्या लेखनावर नाही. राग येईल असं ते लिहीतच नाहीत, मुळी! पण त्यांच्या बिनमिठाच्या नॅरेटिव्हजनी मला सुपरकंटाळा येतो. इयत्ता आठवीपर्यंत मुलं किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.
‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अॅडिक्टिव्ह. मध्यमवर्गीय माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणं रोम्यॅंटिक करून मांडायला हा लेखक जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.
माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात. ही पुरोगामी बाईची पुरुषाला पान्हा फोडायची ईर्षा अवचटांनी ताडून त्यांनी ‘लग्न’ या व्यवस्थेची जी पार्शल वर्णनं केलीत त्यांना मी (विनोबांच्या भाषेत) वाचाचौर्याचं लक्षण मानते. कारण तसं ‘लग्न’ वास्तवात असताना त्यात खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत.
अगदी रॅश उदाहरण द्यायचं तर लोकांच्या घऱची देखणी कुत्री मला आवडतात. पण मग त्या प्रत्येक कुत्रीच्या पाळीच्या काळात तिची काळजी कोण घेत असेल? किंवा त्या कुत्रीला मेटिंगसाठी कुठे न्यायचं? ते कोण ठरवत असेल अशा प्रश्नांनी मी भानावर येते आणि माझ्या पाळीव प्राणिप्रेमाची तात्कलिक नशा उतरते. कुत्री पाळणं किती मज्जेशीर आहे ते लिहिणं आणि पाळलेली कुत्री निभावणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्या निभावण्याच्या प्रक्रियेतलं सारं असुंदर वगळून जे जग अवचट तयार करतात त्यामुळे त्या सद्गुणी लेखनाचा एडिटेड भाग मला अधिकाधिक खुणावू लागतो.
अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!
Friday, October 1, 2010
गर्दीची अक्कल

दोन माणसांच्या तीव्र हुशारीनं मला कॉम्प्लेक्स येतो. इतके कसे हे दोघे हुशार, विटी, विनोदी, हाड-हुड स्पेशालिस्ट ? कसे बुवा हे असे चार्मिंग आणि तरीही यांची हृदयं जागच्या जागी? कोल्बर्ट रिपोर्टवाला स्टिफन कोल्बर्ट आणि जॉन स्ट्युर्ट या दोघांमुळे टीव्ही नावाची गोष्ट मला आवडू लागली. हे दोन्ही चार्मर्स तुम्हाला माहीत नसतील तर आग्रहानं माहीत करून घ्यायला हवेत इतके इंटरेस्टिंग. कोल्बर्ट आणि स्ट्युअर्ट जे काही अमेरिकन राजकारणाबद्दल बोलू शकतात, ते बघता लोकशाहीत विनोदाचं स्थान आणि सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे ते ध्यानात येतं.
या कोल्बर्टनं अनेक संकल्पनांसोबत एक नवीन शब्द जन्माला घातलाय, तो शब्द म्हणजे ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ म्हणजे सत्याचा आभास निर्माण करु शकण्याची शक्ती. ब-याच मतप्रदर्शनांमध्ये सत्याचा अंश सत्यासाठी आवश्यक पुरावा नसतो, परंतु त्यात सत्याभासाची शक्यता भरपूर असते. अशा वाक्यांना, दृष्टीकोन बनवणा-या मतांना कोल्बर्टनं नाव ठेवलं ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ नावाचं हे वास्तव जन्माला आलं, त्याबरोबर त्या आभासाचा उपयोगही लक्षात आला, कारण जमाना आलाय क्राऊड सोर्सिंगचा.
या कोल्बर्टनं अनेक संकल्पनांसोबत एक नवीन शब्द जन्माला घातलाय, तो शब्द म्हणजे ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ म्हणजे सत्याचा आभास निर्माण करु शकण्याची शक्ती. ब-याच मतप्रदर्शनांमध्ये सत्याचा अंश सत्यासाठी आवश्यक पुरावा नसतो, परंतु त्यात सत्याभासाची शक्यता भरपूर असते. अशा वाक्यांना, दृष्टीकोन बनवणा-या मतांना कोल्बर्टनं नाव ठेवलं ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ नावाचं हे वास्तव जन्माला आलं, त्याबरोबर त्या आभासाचा उपयोगही लक्षात आला, कारण जमाना आलाय क्राऊड सोर्सिंगचा.
‘क्राऊड सोर्सिंग’ हा सध्याचा बझवर्ड आहे. चिन्हवास्तवाच्या जगात लक्षावधी व्यक्ती ट्विटर, फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईट्स इथं मतप्रदर्शन करत फिरतायत. त्यांच्या या मत-मतांच्या गलबल्यांचा उपयोग अनेक कॉर्पोरेट व्यावसायिकांना होत आहे. या सा-या नव्या गर्दी-अकलेचं नाव आहे ‘क्राऊड सोर्सिंग’.व्यापारी वर्गाला हे क्राऊडसोर्सिंगचं महत्त्व फार पूर्वीपासून माहिती आहे. माझा एक अत्यंत हुशार व्यावसायिक बॉस होता. फाळणीच्या वेळी तो सहा वर्षांचा होता. अक्षरशः नेसत्या कपड्यानिशी घरदार सोडून तो मुंबईत आला आणि नंतर झोपडपट्टीत वाढला. मात्र नंतर करोडो रुपयांच्या उलाढालीतल्या व्यवसायात यशस्वी झाला. तो मला हसून म्हणायचा, ’ज्ञानदा, बिझनेसमधल्या यशाचं गमक एकच, एकट्याची अक्कल चालवू नका. दहा लोकांना विचारा. कुठल्याही एका बुध्दीमान उत्तरापेक्षा जास्त माहीती, तुम्हाला तोच प्रश्न दहा लोकांना विचारून मिळेल’. मला त्याच्या बोलण्याचा वैताग यायचा कारण रियाझानं, अभ्यासानं तयार केलेल्या अकलेला नाकारून तो सामान्य दहा जणांची मतं का विचारात घेतोय ? असं वाटून चिडचिड व्हायची. मग एके दिवशी बॉसच्या ‘क्राऊड-सोर्सिंग’चं गमक मला उलगडलं.
व्यापारात-बिझनेसमध्ये ज्यांना यशस्वी म्हणून आपण ओळखतो ते पण निर्णयनाच्या प्रक्रियेच्या अलिकडे आश्वासक उत्तरं (इन्डॉर्समेंट्स) शोधत असतात. एखादी नवीन कल्पना मांडायची आणि ‘तुम क्या सोचते हो?’ असा प्रश्न फ्लोट करायचा. आयआयटी, आयआयएम मंडळी असा प्रश्न आला की तल्लख, चतुर उत्तरांचा मारा करतात आणि बघता बघता लीडरकडं पंधरावीस कुरकुरीत विचारांची यादी तयार होते. त्यातुन विविध नफा-नुकसानीचा हिशोब करत बॉस निर्णय घेतो. वैश्य बॉसच्या यशाचं गमक, त्याची बुध्दीमान निर्णय सुचण्याची क्षमता हे नव्हतंच कधी, तर कोणती माहिती व्यवस्थित रिस्क घेऊन, कशी वापरायची यातंच तर होती वैश्य किमया! या किमयेचा आता नवा अदभुत अवतार म्हणजे ‘क्राऊडसोर्सिंग’. एखादा नवा ब्रँड लाँच करायचा आहे तर टाका तो फेसबुकात, बघा लोकं काय उत्तरं देतायत ते. इंटुकड्यांना विचारा दर बुधवारी ’तहेलका’ वाचनाच्या सवयींबद्दल, वेगवेगळे प्रश्न कसे टाकत राहतं फेसबुकात? या हजारो वाचणा-या, व्यक्त होणा-या माणसांच्या लसावि उत्तरात सापडून जातं यशाचं गमक.
हे यशाचं गमक जस व्यापा-यांच्या उपयोगाचं तसंच ते राजकारण्यांच्याही. म्हणून तर कोल्बर्टनं वर्णलेला ‘ट्रुथीनेस’ तपासण्याची नवी मॉडेल्स तयार होत आहेत. इंडियाना विद्यापीठानं तर truthy.indiana.edu ही वेबसाईटच लाँच केली आहे. एखाद्या राजकीय/ सामाजिक मतप्रदर्शनानंतर लोकं ट्विटर/ फेसबुकवर कशी प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रियांना मोजून त्यातल्या ‘सत्त्याभासा’ची शक्यताही मोजतात इंडियानातली गणितमानी मंडळी.
कलेचं एक जग आहे. ज्याला मी सिग्नेचरचं जग म्हणते. तिथे तुम्ही जे काही करता ते तुमच्या शिक्क्यानं जन्माला येतं आणि दुसरं एक परात्म करणारं औद्योगिक जग आहे. या भुसार जगात कोणाच्याही सहीचं काहीच नसतं. गर्दीच्या गरजा भागवायला गर्दीचीच अक्कल वापरायची असा असतो इथला व्यवहार, बिनसहीचा- क्राऊडसोर्सिंगमधून जन्माला येणारा. मोठ्या मोठ्या ब्युरोक्रॅटिक रचनांमध्येदेखील मतांचा कॉपीराईट कोणाच्या हातात उरत नाही. एखादं ट्विटरवरचं मत कसं पटापटा रिट्विट होतं – मूळ ट्विट-निर्मात्याला त्याचं काही श्रेय मिळतच नाही. पोस्ट मॉडर्न जगात हे असं व्हर्जनिंग आणि कॉप्यांचं प्रसृतीकरण सतत चालू असतं.
परवाच माझी एक मैत्रिण तणतणत म्हणाली, ’अगं, माझं विश्लेषण या माझ्या बॉससोबत शेअर केलं आणि दुस-या दिवशी ‘मिंट’ मध्ये याच्या नावावर लेख, त्यात माझा साधा उल्लेखही नाही.’
तेव्हा तिला मी हसून हे माझं ‘क्राऊड सोर्सिंग’चं तत्त्वज्ञान ऐकवलं. ‘बॉस’ नावाच्या प्राण्याला शेवटी इजिप्तच्या फारोहा सारखं पिरॅमिड बांधायचं श्रेय मिळतं. त्या पिरॅमिडचा दगड कोणी कुठून वाहत आणला याचा काही मतलब उरत नाही. शेवटी कल्पनांचे दगड कुठून आले त्याला महत्त्वच नाही. मी तिला मग चिडवायच्या स्वरात म्हटलं, ’अगं, तुझ्या विश्लेषणावर तुझी सही लागून त्याचं फारफार तर काय झालं असतं? एखादं आर्टिकल, पण या पॉवर-स्प्रिंगबोर्डवरच्या बॉसच्या मुखातून तेच ज्ञान टपटपल्यानं त्याची किंमत वाढली आणि तुझ्या अनामिक भागीदारीचं श्रेय तुझ्या गुटगुटीत पगारात परावर्तित झालंच की.’
सबब हे श्रेयाचं आणि क्राऊड सोर्सिंगचं नातं हे असं व्यस्त आहे, पण परत एकदा मूळ मुद्दा ‘सत्याचा आभास’ तयार करण्याचा. हा ‘ट्रुथीनेस’ दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरत जाणार आहे. सध्या बघा निळू दामल्यांनी लवासाच्या अर्धमाहितीला त्यांच्या तथाकथित ’तटस्थ ’ ट्रुथीनेसचा टेकू दिलाय, तो ‘मौजे’नं प्रसिध्दही केलाय... मी अभ्यास करतीए तो हा ‘ट्रुथीनेस’ जिंकतोय की सुनीतीचं खरंखुरं राजकारण – त्याचा!
-----
This blog is also published on www.thinkmaharashtra.com on every Friday.
Thursday, September 23, 2010
विवाह संस्था आणि हिशोब

एक इतिहासाचार्य आणि एक उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना. राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून या संस्थेकडे बघताना घातलेल्या अनेक चष्म्यांना तडे जातात. इतिहासातून वाहत आलेली नाती राजवाडे त्यांच्या विश्लेषक पद्धतीनं तपासतात. कॉम्रेड डांग्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे माणसाचं जीवशास्त्रीय जगणं म्हणजे जिवंत राहणं आणि प्रजनन करणं असं मानणार्या एका बिंदूपासून राजवाडे सुरूवात करतात आणि विवाहसंस्थेच्या उदयात किती प्रकारचे हिशोब आदिम काळापासून गृहित धरले आहेत त्याची पुराव्यानुसार जंत्री देतात. कॉम्रेड डांग्यांना मार्क्स आणि एंगल्सचा ‘आदिम साम्यवाद’ या लेखनात आढळलाय – मग हे असं गंभीर पुस्तक वाचताना कोणत्या उथळपणाच्या परमोच्चबिंदूची आठवण यावी? तर ती आलीच. किम कट्रालची.
‘सेक्स अॅण्ड द सिटी’ या मालिकेत किम कट्रालनं समंथा नावाचं कॅरेक्टर रंगवलय. इतिहासाचार्य राजवाडे आणि समंथा या दोघांनाही जगातल्या कोणत्याच बाई आणि बाप्याच्या परम्युटेशन-कॉम्बिनेशननं चकवलं नसतं. या दोघांनाही जगातल्या वैषेयिक आणि वैवाहिक संबंधांबद्दल एक प्रकारची तटस्थ जाण आहे. एकाला अभ्यासपूर्वक आणि एकाला अनुभवोत्तर.
आश्रमीय जीवनशैलीच्या बाहेर पाऊल टाकल्यामुळे संन्यासी आणि वेश्या यांना जगाचं खरं रूप कळतं असं म्हणतात. परंपरेनं वाहत आलेला ‘वेश्या’ हा शब्द आता, एकविसाव्या शतकात भांडवलशाहीनं जोडलेल्या अनेक नात्यांना लागू होतो. अगदी लग्नांतर्गत नात्यांनादेखील. त्यामुळे परंपरागत अर्थानं तो शब्द वापरणं चूकच. पण गृहस्थाश्रम मांडला नाही की नात्यातलं काहीतरी गंमतशीर कळतंच की. ‘इतिहास अभ्यासक’ आणि शरीरसंबंधांना कोणत्याही भावनिक गुंतवणुकीपलीकडे जीवशास्त्रीय गरज म्हणून तपासणारी ‘समंथा’, या दोघांनाही विवाहसंस्थेबद्दल काहीतरी मोलाचं कळलंय हे मला वाचता वाचता जाणवलं म्हणून या दोघांचीही आठवण एकत्र आली.
एका एपिसोडमध्ये एक पुरूष ‘गे’ आहे की नाही यावर समंथाच्या मैत्रिणी वाद घालू लागतात. तेव्हा त्यांना गप्पं करत समंथा म्हणते, ‘बुरसटलेल्या बायांसारखं काहीतरी बोलू नका. बाईला बाई आवडते की बाप्या, बाप्याला बाप्येच आवडतात की बाया या पलीकडे जग केव्हाच पोचलंय! आता होमो-हेटरो या बायनरीपलीकडे एक मोठं पॅनसेक्शुअल जग आहे. व्यक्ती आवडते की नाही हे महत्त्वाचं. नंतर मॅचिंग सेक्शुआलिटीचा विचार.’ समंथांच्या या सर्वसमावेशक, उदार वाक्यानं अर्थातच तिच्या मैत्रिणी चकित होतात. तिच्या ‘पॅनसेक्शुअल’ छत्रीखाली अमंगल असे ‘भेदाभेदांचे भ्रम’ टिकतच नाहीत.
राजवाड्यांचं पुस्तक वाचूनही तसंच होतं. विवाहसंस्थेकडे बघण्याचा व्हिक्टोरियन चष्मा राजवाडे मोडतात आणि सारा इतिहास नव्यानं मांडायला घेतात. त्यामुळे त्यानंतर विवाहसंस्थेचं कोणतंच रूप आपल्याला बिचकावणारं वाटत नाही. ‘असेल बुवा – तसंही असेल’ असं खांदे उडवून म्हणता येतं.
बेट्सी म्हणजे इलिझाबेथ ब्रेंट नावाची कमालीची हुशार अँथ्रोपोलॉजिस्ट बाई आम्हाला शिकवायची. बेट्सीच्या कोर्सचं नाव होतं, ‘निसर्ग आणि संस्कृती – बाईपणाचं घडत जाणं’. बेट्सी प्राणी जगतातल्या लिंगभेदांचा अभ्यास ते विविध संस्कृतींमधलं बाया-पुरुषांचं, त्यांच्या लैंगिक अस्मितांचं घडत जाणं शिकवायची. त्यात अर्थात तृतीय पंथीयांचा विषय नेहमी निघायचा. बेट्सी स्वत: नेटिव्ह अमेरिकन लोकांची अभ्यासक आहे. तिनं नवाहो इंडियनाचा प्रचड अभ्यास तिनं केलाय. एकदा शिकवताना आमच्या एकूण तीन लैंगिक ओळखींतून जगाकडे, संस्कृतीकडे बघण्याच्या चष्म्याला बेट्सीनं धक्का दिला. नवाहो इंडियन्स सात प्रकारचे लिंगभेद मानतात. स्त्रीच्या शरीरातली मनानं स्त्री, स्त्रीच्या शरीरातला मनानं पुरुष, स्त्रीच्या शरीरातला तृतीयपंथी/ना-स्त्री ना-पुरुष; त्याचप्रमाणे पुरुषाच्या शरीरातले तीन प्रकार आणि एक. पूर्णतया शरीरानं व मनानं स्त्री किंवा पुरूष नसलेली अस्मिता. नवाहो परंपरेत ना-स्त्री ना-पुरूष अशा व्यक्तीत दैवी शक्ती असतात असं मानतात. परंतु एकूणात, हे जग सात प्रकारच्या लिंगभेदांचं बनलंय असं नवाहोंचं मत आहे. प्रत्येक व्यक्तीत बाईपणाचा आणि पुरुषपणाचा काही प्रमाणात अंश असतो हे मतंही आताशा सामान्य ज्ञानाचा भाग झालंय.
बेट्सीच्या वर्गात पूर्वसंचितातून येणार्या चौकटींच्या ठिकर्या उडायच्या. ‘काळ’ या संकल्पनेबद्दल बोलताना एकदिश कालसंकल्पना आणि चक्राकार, पेंडयुलम सारखी आवर्ती काल संकल्पना यांच्यावर बोलून झालं की बेट्सी नेटिव्ह अमेरिकन परंपरेतून आलेली अनेकमिती काळांची कल्पना सांगायची. यानुसार आपण सगळे काळाच्या विविध मितींमधून फिरत असतो आणि भेटतो तेव्हा दोघांच्याही मिती समान असतातच असं नाही. नेटिव्ह अमेरिकनांना (तसंच आपल्याकडच्या आदिवासींनादेखील) ‘फोटो काढणं’ हे का अनैतिक वाटायचं त्याचा उलगडा बेट्सीच्या या ‘काळ’ संकल्पनेमुळे व्हायचा. ‘फोटो’ काढला म्हणजे त्या काळाच्या मितीतल्या माणसाला ठार मारला असा अर्थ नेटिव्ह अमेरिकन लावायचे आणि कॅमेर्याला घाबरून पळून जायचे. ते असं का करायचे याची संगती लागते. आपल्या मनातल्या ठाशीव कल्पना खुल्या करून समोर येणारं जग एकदा तपासायचं ठरवलं की कित्येक नव्या गोष्टी नजरेला पडू लागतात.
स.गं मालशांचं ‘आगळंवेगळं’ नावाचं एक पुस्तक होतं. त्यात जुन्या जैन परंपरेतल्या एका पात्राची कथा होती. तिचं नावं ‘धूर्ता’. ही धूर्ता चार थापेबाज चोरांना भेटते. प्रत्येक चोर विविध थापा मारत आपली शौर्यकथा सांगतो आणि ‘धूर्ता’ हिंदू पुराणातले दाखले देत त्या सार्या थापा कशा शक्य आहेत ते सांगते. ‘धूर्ता’ अशा जैन मुशीतून घडली आहे की हिंदू पुराणातली कोणतीच नवी संकल्पना तिला आश्चर्यचकित करत नाही! ज्यावेळी मी समाजशास्त्रज्ञाच्या, इतिहास अभ्यासकाच्या भूमिकांचा विचार करते त्यावेळी बेट्सी ब्रेंट आणि धूर्ता या प्रचंड वेगळ्या परंपरा जाणणार्या बाया मला आदर्शवत वाटतात. ‘ज्ञानोत्तर तटस्थपणा’ हे दोघींच्याही बेहद्द हुशारीचं लक्षण वाटतं मला.
पुन्हा, न बिचकण्याच्या राजवाडे क्षेत्राकडे जाते. माझ्या दररोजच्या बसप्रवासात हातात असलेलं सध्या पटावरचं पुस्तक म्हणजे डॉ. ऑलिव्हिया जडसनचं ‘डॉ तात्यानाज् सेक्स अॅडव्हाईज टु ऑल क्रिएशन्स’. ऑलिव्हिया ही जीवशास्त्राची संशोधक आणि डॉ रिचर्ड डॉकिन्सची विद्यार्थिनी तिनं प्राणिजगताच्या सेक्शुअल प्रश्नांना उत्तर द्यायला एक पात्र निर्माण केलंय ती म्हणजे डॉ. तात्याना. ही डॉ. तात्याना म्हणजे प्राण्यांना ‘ताईचा सल्ला’ देणारी ताई आहे. कबूतरं, सिंह, हत्ती, डास, कोळी यांचे नर-मादी डॉ. तात्यानाला आपले सेक्सविषयक प्रश्न पाठवतात आणि डॉ. तात्याना त्यांना लीलया उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करते. त्या प्रश्नापाठीमागची जीवशास्त्रीय कारणपरंपरा उलगडून सांगते. भावनेच्या प्रदेशापलीकडचं शरीरसंबंधांच्या जीवशास्त्राचं दर्शन देणारं हे पुस्तक – सुरुवातीला थक्क करतं – मग हसवतं आणि तेच करतं, जे प्रत्येक ‘ज्ञान’वस्तू अगत्यानं प्रत्येक वेळी करते-- सार्या शरीरव्यवहाराकडे बघण्याची जीवशास्त्रीय तटस्थता ही डॉ. तात्याना आपल्यापर्यंत पोचवते. बेट्सी आणि धूर्तेच्या यादीतली ही ऑलिव्हिया मला दिवसेंदिवस आवडू लागली आहे. तिच्याकडे केवळ तरतरीत बुद्धी नाही – तर त्या पलीकडे आहे जगण्याकडे निखळ, शुद्ध शहाणणानं बघण्यासाठी आवश्यक स्वच्छ दृष्टी आणि संवादाची उत्कृष्ट अशी शैली!
तिचं पुस्तक वाचताना बायांना, बाप्यांना, बाया-बाप्ये नसलेल्यांना तपासताना आपण चष्मा पूर्ण नाही काढला तरी आपल्याला चष्मा आहे याचं भान येतं आणि नोहाच्या नौकेतल्या कित्येक शक्यतांची आपसूक संगतीही लागते. राजवाड्यांना उमगलेले विवाह संस्थेतले सांस्कृतिक हिशोबही तिच्या जीवशास्त्रीय ज्ञानाच्या उजेडात लख्ख दिसतात.
Friday, September 17, 2010
मास्तरांच्या नसण्याचं ऊन
सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय; तो मूळातून वाचावा असा आहे. महत्वाचा आहे. कारण लेख फक्त कौतुक संप्रदायातला नाही. ‘अज्ञानापोटी अति कौतुक’ हा मराठी वाङमयास ग्रासणारा दुर्गुण तर आहेच परंतु तो अनेक सुमार मनोवृत्तींचं द्योतक आहे. चलाख आणि सुमार माणसाला आपण सुमार आहोत हे कळलं की तो ‘सर्वांचं बेफाट कौतुक’ अशी सर्वसमावेशक रणनीती आपलीशी करतो. ही केवळ खुशमस्करेगिरी नसते, तर हा विनिमय असतो. ‘मी तुमचं कौतुक करतो तुम्ही माझं सुमारत्व उघडं पाडू नका’ असा चलाख विनिमय! पण नामदेव ढसाळांचा लेख ( या वेळी तरी) विनिमयाच्या कंगो-यापलीकडचा म्हणून महत्त्वाचा आहे. मास्तरांनी सत्तरच्या दशकानंतरचं बदलतं गिरणगाव, तिथलं राजकारण का टिपलं नाही? असा प्रश्न नामदेव ढसाळ विचारतात. त्याचा खोलात विचार करावाच लागतो. सुर्वेमास्तरांबद्दल असे काही प्रश्न पडतात आणि काही अनुत्तरितही राहतात.
सुर्वेमास्तरांच्या निधनानंतर त्यांचा मानसपुत्र मुकुंद सावंत यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेत श्रध्दांजली सभा आयोजित केली होती. त्या दिवशी त्या समाजविज्ञान संस्थेत त्या बहुतांश अमराठी समुहात मास्तरांना आठवताना कवितेचा, जगण्याचा, डाव्या चळवळींचा मोठा पट सामोरा आला. संस्कृतीला काचणारे प्रश्न कविता निर्भयपणे मांडते आणि जिथे माणसं बघू इच्छित नाहीत अशा, कार्पेटखालच्या वास्तवावर तीव्र उजेड पाडते. मास्तर तर भारतीय संस्कृतीला फास लावणा-या अनेक प्रश्नांच्या तिठ्यावर उभे होते. त्यांच्या कवितेनं मराठी सरस्वताला भानावर आणलं. इश्क आणि इन्किलाब या उर्दू परम्परेतल्या दोन भूमिकांवर त्यांनी कामगार वर्गाच्या अनुभवांचं जे अफाट कलम केलं, ते किती महत्त्वाचं! आणि त्यांचा मनात अपराधीभाव बाळगणारा बाप. नात्यांच्या ताण्याबाण्यातून उलगडणारं शहराचं लुम्पेन वास्तव. किती अमानवी वास्तवाच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं मास्तरांनी.
हिंदू कुटुंबानं वाढवलेला हा ‘जातलेस’ माणूस. ‘मास्तरांची सावली’ हे कृष्णाबाईंचं आत्मचरित्र वाचून वाटतं, की अशा ‘बाळगलेल्या’, ‘पाळलेल्या’ पण नाही – फक्त ‘बाळगलेल्या’ या मुलानं या ‘गुंग्या ग्रहावर’ स्वत:ची किती ‘अस्खलित सिग्नेचर’ उमटवली. मेघना पेठेचा ‘अजातपुत्रास अनौरस आईचा अनाहूत सल्ला’ त्याच सुमारास प्रसिध्द झाला होता. वाटलं, मास्तरांना अशा अनौरस आईचा अनाहूत सल्ला जणू आतून कळला होता. म्हणून कवितेसदृश कोणतंही वातावरण नसताना हा नारायण कवितेत व्यक्त झाला.
‘जातलेस असणं’ हा एक काच; तर दुसरा काच म्हणजे सर्व मराठी काव्यपरंपरा ‘विठोबाग्रस्त’ असण्याचा. या भक्तीपलीकडे जाणारा सुर्वेमास्तर हा पहिला लोकयत महान कवी. करंदीकर , मुक्तिबोधांनी मार्क्सवादी कविता लिहिली, परंतु त्या अर्थानं, मास्तरांनी फक्त माणसाची कविता लिहिली. स्वत:ची जातकुळी तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर अशी तपासून पाहूनही मास्तर निराळे राहिले. मास्तरांची महत्ता जेंव्हा भवताली सारा खरेपणा, सच्चाई गिळून टाकणारं वास्तव असतानादेखील ते कवितेत जेन्युईन राहिले यात आहे. त्यांची कविता हीच नव्या क्रांतीची पताका.
मास्तरांच्या कवितेत कित्येक पात्रं भेटतात. त्यांतला ‘जिवा’ माझा सगळ्यात लाडका. ‘तुमच्या त्या उदास रात्री मला नकोत’ म्हणून कवींनाही प्रॅग्मॅटिक फटकारणारा. मास्तरांनी माणसाला आणि मार्क्सला कवितेत खेचून आणलं. मास्तरांच्या चरित्रातले विविध तिढे, त्यांचं कामगारवर्गातलं स्थान या सा-यांमुळेच त्यांची कविता वेगळी झाली. मात्र असं सारं असूनही मास्तरांचा सुलभ डावेपणा कधीकधी डाचतो. त्याचबरोबर याच सोप्या/ सुलभ , ’डाव्या’ कवीला जवळ करताना मुंबईतल्या तमाम ‘बॉम्बेवासियांची’ मास्तरांप्रती असलेली टोकन चॅरिटी ऊर्फ ‘लटकी सहानुभूती’ मला त्रास देते. जर या क्रयविक्रयाच्या विक्राळ शहरात, जिथे पैसा सर्वस्व झाला, तिथं इतर कवींचं काय झालं याची पर्वा कधी कोणी फारशी केल्याचं ऐकिवात नाही. त्या शहरात या ‘बॉम्बे’वासियांनी मास्तरांच्या कवितेवर प्रेम केलं, की मास्तरांच्या टोकन अस्मितेवर? असा प्रश्न नेहमी मला पडतो. पण मास्तरांना हे कळूनही मास्तर साधे राहिले. टोकन म्हणून ते कौतुक स्वीकारतही राहिले.
वसंत गुर्जर, तुळशी परब, वाहरू सोनावणे या माणूसकेंद्री कवितेच्या परंपरेतल्या पुढल्या कवींचं काय झालं? की मास्तरांच्या कवितेला ‘लटकी सहानुभूती’ दाखवून आम्ही इतर ‘बॉम्बे’वासियांप्रमाणे नंतरच्या कविंना विसरलो? हे आता मास्तर गेल्यानंतर तरी खरेपणानं आपण आपल्याला विचारायला हवं. काय करता येईल या कवितेला घुसमटवून टाकणा-या शहरात, ज्यांनी जगण्याशी पंगा घेतला अशा आमच्या कविपरंपरेसाठी? एकीकडून संमेलनाचे घासून बुळबुळीत झालेले ‘तेच ते’ आवाज कानावर पडत आहेत आणि मनात माझ्या तुळशीचं पुढे काय झालं? कुठे गेली त्याची कविता? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
काय पध्दतीचं टोक सुमार राजकारण गाठू शकतं याचा दर संमेलन म्हणजे एक जिवंत नमुना! कमअस्सल कवी, कमअस्सल लेखक प्रसिध्द होण्यासाठी कायम धडपडतात, पण ज्यांच्या निष्ठांचा, कवितेचा, शब्दांचा आत्मा खणखणीत असतो असे लेखक आणि कवी ‘मला मदत करा किंवा मला मान द्या’ अशी निकृष्ट भीक मागत नाहीत! सुमार साहित्यिकांना माणूस कळत नाही – माणसांना खरं साहित्य कळत नाही अशा विचित्र, सांधा निखळलेल्या चक्रात जी ‘सुमारांची सद्दी’ चालू आहे, ती अंगावर काटा आणणारी आहे.
असो. हे सारं वास्तव रेषेरेषेच्या फरकानं डाचतं... एकिकडे सुर्व्यांच्या कवितेपेक्षा त्यांच्या ‘टोकन अस्मिते’वर व्यक्त झालेली लटकी सहानुभुती आणि दुसरीकडे बेदरकार शहरातलं कवितेचा गळा घोटणारं साहित्यिक राजकारण – पण ह्या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारणारी जिवंत कविता अशी संपत नाही. ती येतेच हट्टानं उगवून – जिथं कविता उगवेल असं कदापि वाटणं शक्य नाही तिथेही! सु्र्वेमास्तरांसारखी... उकिरड्यावरही!
Sunday, September 12, 2010
Subscribe to:
Comments (Atom)

