Friday, August 13, 2010

जात : परदेशस्थ

परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता माणूस कुठल्या परदेशात का गेला? याचं तर्कशास्त्र आपण शोधून काढू शकतो.

कॅलिफोर्नियामध्ये जंगलं तोडून राहणेबल जागा बनवण्यासाठी सरदारजींना मोठ्या प्रमाणात नेण्यात आलं होतं. एकोणिसाव्या शतकात, कष्ट करणा-या रोबस्ट माणसांना इंग्रजांनी जंगलतोडीच्या कामावर अक्षरश: विकलं. फक्त पंजाबी पुरूषांना नेल्यामुळं अर्थात त्यांनी तिथल्या बायकांशी लग्नं केली. त्या स्त्रियाही कष्टकरी वर्गातल्या हिस्पॅनिक्स होत्या. मेक्सिकोतून आलेल्या त्या लॅटिन अमेरिकन स्त्रिया आणि सरदारजी यांनी मग ‘कॅलिफोर्निया’मध्ये आपली नवी कुटुंबं वसवली. या ‘मेक्सिडूं’चा ( मेक्सिकन+हिंदू) अभ्यास करणारा एकजण मला जेव्हा भेटला तेव्हा ‘हिंदू’ म्हणून सामावलेले सरदारजी आणि लॅटिन अमेरिकन स्त्रिया यांचं स्थलांतरानं लादलेलं साहचर्य आणि त्यातून उलगडणारी NRI अस्मितेची एक घडी नजरेसमोर आली.

युगांडातून इदी अमीनच्या राजवटीत परागंदा झालेले ‘मिसिसिपी मसाला’ पटेल, अमेरिकेनं व्हिसा डॉक्टर्स, इंजिनीयर्सना साठच्या दशकात खुला केल्यावर पहिल्या फळीतले अमेरिकावासी प्रोफेशनल, Y2K च्या जमान्यात H1 च्या जोरावर लोंढ्यानं अमेरिकेत आलेले आयटीवाले किंवा पश्चिम आशियात पैसे कमावायला गेलेल्या NRIची अमेरिकेत शिकणारी अंडरग्रॅज्युएट पिढी. अमेरिकन NRI म्हटलं, की हे सारे समूह झरझर नजरेसमोर येतात. जगभरच्या भारतीय वंशाच्या NRIबद्दल समान पद्धतीनं लसावि काढून बोलणं योग्य नाही. मात्र
‘मौजे अमेरिकेतले NRI’ हा गट अभ्यासण्याजोगा आहे. अनिल अवचटांनी एकेकाळी केला तसा डिसमिस करण्याजोगा निश्चितच नाही.

साठच्या दशकात, ६८-६९ मध्ये जेव्हा अमेरिकेनं डॉक्टर्स आणि इंजिनीयर्ससाठी व्हिसा खुला केला तेव्हा अनेक प्रोफेशनल्स, आयआयटीयन्स अमेरिकेत गेले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर त्या अगोदर डॉ. केतकर, डॉ. आनंदीबाई जोशी किंवा मराठी नसूनही मराठी माणसाच्या स्मृतीत घट्ट रूतून बसलेले १८८५ सालच्या जागतिक धर्म परिषदेस गेलेले विवेकानंद ही काही उदाहरणं नजरेसमोर येतात.

माझ्या थिसिससाठी डॉ. केतकरांच्या भाषाविषयक विचारांचा विचार करत असताना त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्याबाबतही माहिती हाती येत गेली. पैसे नसल्यामुळे बटाट्याच्या शेतात काम करून दिवसाला दोन डॉलर्स कमावून काढलेले कष्टाचे दिवस किंवा कॉर्नेल विद्यापीठात असताना कडाक्याच्या अपस्टेट न्यू यॉर्कच्या मरणाच्या थंडीत हीटिंग उपलब्ध असलेल्या सिनेमागृहात काढलेले तासन‍्तास याबद्दल समजलं. त्या काळात अमेरिकेत अनेक हुन्नरी लोकांनी छलांग मारली. डॉ. केतकर मात्र त्यांच्या ध्येयानं प्रेरित होऊन अमेरिकेत आले होते. भारतात परत येताना जहाजावर त्यांची डॉ. अचिंत्य लक्ष्मीपती यांच्याशी गाठ पडली ‘भाषिक राज्याच्या’ कल्पनेवर त्या दोघांचंही एकमत झालं अशा नोंदी आहेत.

प्रत्येक स्थलांतरित, विस्थापित किंवा सेटल झालेला समाज आपल्या अनुभव, स्मृती आणि सत्तेची समीकरणं यांतून उतरंडीची एक रचना मनातल्या मनात निर्माण करतो. मी या ‘सत्ताकेंद्री’ रचनेला नवी वर्गव्यवस्था न मानता भारतीय गुणदोषांसकट वर्गव्यवस्थेबरोबरच रेप्लिकेट होणारी जातिव्यवस्था म्हणून बघते. उदाहरणार्थ, सत्तरच्या दशकात आलेल्या पिट्सबर्गच्या वेंकट अंकलना नव्वदच्या दशकात आलेल्या H1 आयटीवाल्यांचा नॉशिया येतो. त्यांची ABD म्हणजे अमेरिकेत जन्माला आलेली ‘देशी’ मुलं आता ३०-४० च्या वयोगटात आहेत तो भारतीयांचा एक ‘जातसमूह’ आहे. डॉ केतकरांनी वर्णन केल्याप्रमाणं या ‘प्रोफेशनल आद्य सिटिझन’ जातसमूहात लग्नसंबंध जुळतात आणि त्यांचे विचार/स्वयंपाकाबद्दलची बायकांची मते इत्यादी गोष्टींत साम्य आढळतं. H1 व्हिसावरचा ‘गुलटी’ म्हणजे आंध्रप्रदेशातला इंजिनीयर मुलगा आणि या आद्य सिटिझन समुहातला - ज्याचे आईवडील आंध्रातून आले यांचा ABD मुलगा यांच्यात जमीनअस्मानाचं अंतर असतं. मात्र तेलगू ABD आणि गुजराथी ABD आनंदानं नांदू शकतील इतका सारखेपणा दुस-या पिढीत दिसून येतो. भारतीय भाषा/राज्य यांच्या मावळणा-या प्रभावाच्या छायेत ही दुसरी पिढी वाढलेली असते. ती अधिक मनापासून अमेरिकन असते.

या आद्य सिटिझन समूहानं अमेरिकेत आल्यावर ‘अमेरिकन’ व्हायचा प्रयत्न मनोमन केला. यांच्या अम्मांनी इकडं पहिल्यांदा ट्राऊझर्स घालून इंग्रजी बोलण्याचा सराव केला. काही उच्चशिक्षित आंटी इथं ग्रंथपाल किंवा तत्सम सरकारी नोक-यांत लागल्या. न्यूजर्सीत ‘न्यूवर्क’मधल्या डॉट-बस्टर्सच्या गुंडगिरीचा दुर्दैवी अनुभवही यांतल्या काही मंडळींनी घेतला. व्हाया ब्रिटन अमेरिकेत आलेल्या पटेलांनी एडिसन, क्वीन्स मध्ये ‘लिटल इंडिया’ स्थापन केलं. तिथं या आद्य समूहानं आपली नाळ जोडली.

मात्र नंतरचे H1 वर आलेले दुस-या फळीतले सिटिझन्स... यांचा समूह अमेरिकेतही वेचून वेगळा काढता येतो. हार्वर्डची कायदाविषयाची प्राध्यपिका माझी मैत्रिण राकेल H1 कायद्याच्या निर्मितीसाठी ज्या कमिटीनं कायदेशीर बाबींवर संशोधन केलं त्याचा भाग होती. आफ्रिकेतून गुलाम आणताना वापरलेले स्लेव्हरीचे कायदे आणि H1 व्हिसाचे कायदे यांमधली साम्यस्थळं याबद्दलचं राकेलचं विवेचन ऐकून माझे डोळे अक्षरश: पाणावले!

H1 व्हिसावर आलेल्या व्यक्तींना अमेरिकेत कायमस्वरुपी शांततेनं राहता येणं... यासाठी सिटिझनशिपचा मार्ग दुस्तर करून त्यांचं खच्चीकरण कसं करायचं? हे पॉलिसीपातळीवर H1च्या धोरणातच ठरवलेलं आहे. तिशीत अमेरिकेत गेलेल्या आणि वयाच्या चाळिशीतच ‘म्हाता-या’ दिसणा-या H1 वाल्यांनी किती सोसलंय हे त्यांची कुटुंबं जाणतात. शिवाय, सुरूवातीला परदेशस्थ नातलगांबाबत असूया आणि नंतर तुच्छता दाखवणं हे भारतीय कुटुंबांत सर्रास पाहायला मिळतं, पण हे सुपर अफ्लुअंट लोकांचं विस्थापन पैसे वजा जाता दुष्काळात मराठवाड्यातून पुण्यात झालेल्या विस्थापनापेक्षा फारस सुसह्य नसतं. गणितात जशी ‘मॉड-व्हॅल्यू’ बघतात तशी ‘मॉड-व्हॅल्यू’ घेतली तर H1 वाल्यांचं आयुष्य पहिली दहा वर्षं प्रचंड खडतर असतं. परतायला ‘डोंबिवलीतल्या दोन खोल्या’ हे वास्तव त्याहून खडतर म्हणून कित्येकांनी अमेरिकेत खस्ता खाल्ल्या आणि ‘मारुतीच्या बेंबी’त नावाच्या नाटकाचा दुसरा अंक रंगवला.

आद्य सिटिझन्स आपल्या मुलांची आयव्ही लीगची कर्जं किंवा त्यांची मल्टिकल्चरल लग्नं यांमध्ये गुंतून होते तेव्हा नव्या दमाचे H1 वाले कॅलिफोर्नियात ' सर्वणा ’मध्ये जेवत, कन्सल्टंटच्या चक्रात ग्रीनकार्ड कधी /कसं / केव्हा होईल या चिंतेत होते. H4 म्हणजे H1 या व्हिसावर येणा-या व्यक्तीचा लग्नाचा जोडीदार. त्यांना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे, भारतातून अमेरिकेच्या ओढीनं आलेल्या मुलींची झालेली घुसमट हा या जातीय रचनेचा दुसरा पैलू. यातून काही समुहात वाढणारा हिंसाचार किंवा मानसिक त्रास हा वेगळ्या लेखाचा विषय.


यामध्ये विद्यार्थी म्हणून आलेल्या आणि नंतर परत न गेलेल्यांचा गट वेगळा. या गटाला सामान्य H1 पेक्षा आपण ‘थोर’ आहोत, अमेरिकन संस्कृती अधिक जाणणारे आहोत असं वाटत असतं. ‘कॅम्पस’वर राहिल्यामुळे कोणत्या गोष्टींना अमेरिकन नजरेत ‘D-क्लास’ दर्जा आहे हे या विद्यार्थिसमूहाला चटकन समजतं. त्यामुळे H1 ची Y2K फळी ही ‘घोडागिरी स्पेशालिस्ट’ आणि कॅम्पसवरून सिअ‍ॅटलला मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करणारे अधिक तरबेज स्पेशालिस्ट असा ‘देशस्थ-कोकणस्थ’ रेषेचा फरक या जातीत दिसतो.

अमेरिका बॉर्न देसी यांना ABCD म्हणजे अमेरिका बॉर्न कन्फ्युज्ड देसी म्हणायची सुरूवातीची चाल होती. मात्र अनुभवानं अमेरिकन वास्तवात वाढलेली भारतीय ‘दिसणारी’ दुसरी पिढी अजिबात ‘कन्फ्युज्ड’ नाही हे अनेकांच्या लक्षात आलंय.

सगळा देशच स्थलांतरित लोकांचा असल्यामुळे अमेरिकेत सामाजिक सत्तेची मापकं हे वेगवेगळे ब्रॅंड्स बनतात. उदाहरणार्थ तुमची मुलं आयव्ही लीगमध्ये जातात की नाही, तुम्ही राहता ते सबर्ब/काऊंटी कोणत्या दर्जाची आहे /तुमचं व्हिसा स्टेटस काय? / तुमची गाडी कोणती / तुम्ही मराठी मंडळाचे सभासद आहात की रोटरी मध्ये अ‍ॅक्टिव्ह आहात / तुमच्या भारताच्या फे-या किती फ्रिक्वेंट / तुम्ही अमेरिकेतच म्हातारं व्हायचं ठरवलंय की भारतात?... सारे प्रश्न महत्त्वाचे होतात. त्यांची उत्तरं हे ब्रॅंड्स बनतात.

लिबरल बनण्यापूर्वीच्या भारतात परदेशस्थांबद्दल कमालीचं अप्रूप होतं. परदेशस्थांनाही भारतीय नॉस्टॅल्जिया प्रचंड होता. मात्र आता दोन्ही देशांतली ‘मेटा नॅरेटिव्हज’ बदलत आहेत. अमेरिकन ठप्पा म्हणजे थोर हे समीकरण आता मोडलंय आणि अमेरिकेत प्रत्येक जण जणू ‘वॉलमार्ट’मध्ये काम करतोय, असा तुच्छ भाव बाळगायचेही दिवस गेले. आता दोन्हीकडचे मध्यमवर्ग एकमेकांची पॅकेजेस अधिक खुल्या आणि त्यामानानं कमी असूयेनं तपासू लागलेत. अमेरिकन उच्चवर्णीय मायग्रंट म्हणजे विश्व हिंदू परिषदेला जोपासणारा, अमेरिकेत दुय्यम दर्जाचं जीवन जगणारा, सांस्कृतिक दृष्ट्या रूटलेस म्हणून उथळ व सर्वसामान्य किंवा बुश राजवटीइतकाच आपमतलबी हा स्टिरिओटाईप आता बदलायची वेळ आली. जितका उथळपणा भारतात आहे तितकाच अमेरिकेतही आहे असं थंड डोक्यानं विचार केल्यावर दिसतं.

मराठी मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात गेलं की विद्यार्थी I-20 वाले नवे मायग्रंट्स आणि व्हेटरन अमेरिकन जुने अंकल असा मोठा स्पेक्ट्रम भेटतो. खरंतर, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मोठा क्रॉससेक्शन एकदम नजरेसमोर येतो. मला अमान मोमीन असाच भेटला होता. अमान होता ऑलमोस्ट पासष्ट वर्षांचा. त्याला अमेरिकन पद्धतीनं ‘अरे तुरे’ करायला त्यानंच शिकवलं. अमानच्या सुरूवातीच्या उत्कृष्ट कथांमध्ये हे ‘अर्ली-भारतीयांचं’ विश्व त्यानं उलगडलंय. नंतरची म्हणजे ‘कुंपणापलीकडच्या देशा’तली अजिता काळे पिढी. या पिढीनं आपली घसट भारतातल्या सांस्कृतिक केंद्रांबरोबर वाढवली. याचा पश्चिम किना-यावरचा परिपाक म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळानं विद्या हर्डीकरांसोबत घेतलेले विविध सांस्कृतिक इनिशिएटिव्हज.

पहिला Y2K धारेचे H1 वाले आता एकतर सिटिझनशिप घेऊन परत आलेत किंवा तिथंच स्थायिक झालेत. त्यांची रेडवुड सिटीत किंवा ऑस्टिनच्या काऊंटीत घरं झाली. अमेरिकन सिरीयलमध्ये आता भारतीय चेहेरे दिसायला लागलेत. अमेरिकन ज्यूंपेक्षाही जास्त दरडोई उत्पन्न आणि शिक्षण या समूहाकडं आज रोजी आहे.

पहिल्या फळीत आलेले उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय भारतीय होते. त्यांच्या बोच-या जातीय-ब्राह्मणी-जाणिवा आता ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ बनल्यात. ब्राह्मणेतराना ‘चॅरिटेबली’ सामावून घेतल्यासारखं दाखवायचं आता ‘अनकूल’ ठरलंय. माझ्या एका कार्यक्रमात आलेल्या नितीन कांबळे या आयटी तज्ञानं जेव्हा ही स्पर्धात्मक गुणवत्तेच्या वेष्टनाखालची आयटीवाल्यांची जातीयता खेचून बाहेर काढली तेव्हा मला कसनुसं झालेलं आठवतंय. ‘शादी डॉट कॉम’वरचा छोटा रिसर्चही या जातीय घडणीबद्दल तेच सांगतो.


NRI ही एक हायब्रिड अवस्था आहे. यात भारतीय म्हणून सुरुवातीला कौतुक, नंतर असूया, नंतर टीका आणि त्याची परिणती तुच्छतेत होते. मात्र आता या चष्म्यापलीकडे या हायब्रिडिटीला तपासण्याचे दिवस आलेत. त्यातली सामाजिक गणितं आता उलगडून पाहता येतात. भारतीय जातीय गुणदोषांपलीकडे NRI हायब्रिडिटी तपासणं आवश्यक आहे.

मराठी कुटुंब भेटल्यानंतर गप्पा कशावर चालल्या आहेत यावरून ‘व्हिसा-जात’ ओळखता येते. रूममेटच्या कटकटी – कॅंम्पस विद्यार्थी - बॉसचे तकाजे – ग्रीनकार्डचा वैताग - H1ची घुसमट, नवीन घर, मुलांच्या शाळा – ग्रीनकार्ड मास्टर्स, बेसमेंट रिनोव्हेशन – रोटरॅक्ट क्लब – सिटिझन फोरम – आयव्ही लीगमधली मुलं किंवा त्यांच्या बहुसांस्कृतिक विश्वात आपलं एकटेपण सर्वात महत्त्वाची म्हणजे मोक्ष आणि मर्सिडिजची चर्चा – आद्य नागरिकांचा ज्येष्ठ संघ ! दीक्षितांची माधुरी असो किंवा अश्विनी भावे – EB 1 सारख्या व्हिसावर अमेरिकेत आलेले क्रिएटिव्ह बुद्धिमान लोकं. इथल्या जात- व्यवस्थेत कोणीच अनप्रेडिक्टेबल राहात नाही.

अमेरिकेत बरीच दशकं ‘स्थलांतर-स्थलांतर’ खेळ चाललाय. यात माणसं आपण केलेल्या त्यागांची भरपाई विविध ब्रॅंड्संनी करत आहेत.
मला यातली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे पिढ्यान् पिढ्यांच्या भारतीय कौटुंबिक दंभाला अमेरिकन कडू व्यवहारी वास्तववादाची थेरपी मिळत आहे. आपल्या शरीरातल्या सा-या पेशी सात वर्षांत संपूर्ण नव्या होतात. अगदी डोळ्यांतले रॉडस आणि कोन्स पण नवे होतात. अशी सात वर्षं अमेरिकन अन्न खाल्लेले वन्स अपॉन टाईप भारतीय ज्या नफ्फट खरेपणानं ( मनातल्या मनात का होईना) आपली गणितं मांडतात, ट्रेड ऑफ्स जोखतात ते मला आवडतं. CYA सारख्या थिअ-या सांगणारे मोक्ष आणि मर्सिडिजच्या कचाट्यातही शेवटी एकटेपणा मान्य करतात. संस्कृती किंवा सिंगल माल्ट हा आधार आहे, उपाय नाही हे जाणून.

भारतीय जातींची, कुटुंबांच्या ग्लोरीची, भारतीय गुटगुटीत दंभाची कॉइन्स अमेरिकेत चालेनाशी होतात. अमेरिकन रूथलेस, माजुर्डी, ब्लंट, कष्टकरी संस्कृती या भारतीय मनांवर कलम होते. त्या कलमी वास्तवाचं समाजशास्त्र आता तपासायची वेळ आली आहे. झुंपा लाहिरीच्या ‘नेमसेक’मध्ये त्या वास्तवाचा एक तुकडा भेटतो... किंवा ‘हॅरॉल्ड अ‍ॅण्ड कुमार’ सारख्या विनोदी चित्रपटात दुसरा. जुन्या परदेशस्थ समीकरणापलीकडे ही ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ मूल्यांची नवी ग्लोबल जात घडताना डोळ्यांसमोर दिसते... या जातीत सरमिसळीनं, बरंवाईट, सारंच आहे. कौतुक, असूया, तुच्छता या सा-या पलीकडचं नवं कुरकरीत आणि तरीही दुखरं काहीतरी!

6 comments:

  1. झक्कास! पुनःप्रत्ययाचा आनंद झाला! मी नागरिकत्व घेऊन परत येउन ९ वर्षे लोटलीत. गंमत म्हणून सांगतो - मी अमेरिकेत गेल्यानंतरच मला कोकणस्थ - देशस्थ आडनावातला फरक कळायला लागला. :) ABD हे नामकरण आवडले - चीनी वंशाच्या लोकांना खाजगीत चपटे म्हणणार्‍या आई-बापांना समज देणारी मुलं पाहून मला फार बरं वाटलं होतं.

    ReplyDelete
  2. Chhan lekh ahe. tu barach abhyas kela ahes. baki kay?
    - Mukund Taksale

    ReplyDelete
  3. I received some comments from my friends in the USA. Some snippets here:
    "Could not quite get the point that she was trying to make. She is probably more knowledgeable about USA than other writers that write based on one visit ... "ekatepaNaa maanya karataat" or "nava kurkureet aNi tareehee dukhara kaahee" means what? Apart from saying that there is different "jaat-vyavasthaa" between the early migrants, people who came here to do Masters and Ph.D., people who came on H-1 and the young students who are coming now on I-20, what is the point of this article? "

    Another one :
    I think this is yet-unsynthesized data. Perhaps a follow-up with analysis is expected?
    ... Although I may not agree with some of her early analysis e.g. "jaat vyavasthaa", it is an interesting read.

    After my latest trip to India - I agree with her statement that "आता दोन्हीकडचे मध्यमवर्ग एकमेकांची पॅकेजेस अधिक खुल्या आणि त्यामानानं कमी असूयेनं तपासू लागलेत.

    Having said this, while reading news papers/watching tv programs in India, I felt siginificant disconnect. Amount/need of emotional and "shabda ba.mbaaL" logic was most distracting to me. Is this what she means by "अशी सात वर्षं अमेरिकन अन्न खाल्लेले वन्स अपॉन टाईप भारतीय ज्या नफ्फट खरेपणानं ( मनातल्या मनात का होईना) आपली गणितं मांडतात, ट्रेड ऑफ्स जोखतात ते मला आवडतं....अमेरिकन रूथलेस, माजुर्डी, ब्लंट, कष्टकरी संस्कृती या भारतीय मनांवर कलम होते".
    I was confused about "कौतुक, असूया, तुच्छता या सा-या पलीकडचं नवं कुरकरीत आणि तरीही दुखरं काहीतरी! " as well. "दुखरं" for whom? Overall - good "beer material"

    And third :
    अमेरिकेत आलेल्या मंड्ळींमध्य़ेही "नवी" जात-पात असते बरं का, एवढा एक एक सर्वसाधारण निष्कर्ष काढायचा असावा. पण त्यासाठी बर्‍याच शाब्दिक कोलांट-उड्य़ा माराव्या लागल्या आहेत. साध्य़ा भाषेत, कुणालाही समजेल असं न लिहिता चमकदार, नव्या धाट्णीचे पण नक्की अर्थ नसणारे "नफ्फट", "भारतीय गुटगुटीत दंभ" असे शब्द वापरले की आपण खूप महत्त्वाचं काही लिहीलं असं वाटत असेल तर मग धन्य आहे!

    शेवटी: माझ्या मते बरेच वाक्य-समूह म्हणजे "सर्व काही आणि काही(च) नाही" अशा पोकळ लेखनाचा कळस आहे! ज्या कुणाला हे समजले असेल तो ते समजावून सांगेल का?

    ReplyDelete
  4. साधारणपणे अमेरिकेतील मराठी लोक आरामात असतात. ह्या वर रिसर्च कश्यासाठी? कुठलेही महत्वाचे प्रश्न शिल्लक न राहिलेला समाज कमी महत्वाचे प्रश्न उकरून काढतो. एक आहे , आर्थिक प्रश्न नसलेला समाज नवनिर्मिती करतो का ?
    का आरामामुळे इच्छा खुंटते ? हा मात्र इंटरेस्टिंग प्रश्न आहे

    ReplyDelete
  5. Liked!
    Small technical correction: Swami Vivekanand was in US in 1893 for Chicago conference. not 1885. (U may delete this comment later)

    ReplyDelete
  6. प्रचंड सहमत
    तुमच्या निरीक्षण शक्तीला सलाम
    मी विद्यार्थी म्हणून लंडन आलो आणि माझ्या शिक्षणाचा विषय हॉटेल व्यवस्थापन होता , म्हणूनच मी स्वतःला येथील समाजात सहजतेने इंटिग्रेटेड करू शकलो मात्र तुम्ही म्हणता तसे येथे थेट नोकरी करायला येणाऱ्या लोकांशी येथे जुळवून घेतांना उडणारी तारांबळ पाहून इनका कूच नाही हो सकता अशी भावना नेहमी यायची

    ReplyDelete