विमला ठकार हे या भारतात फुललेलं एक सुंदर आयुष्य होतं. विमलाजींच्या देहावसानाची बातमी लोकसत्तेत वाचली. माझ्या हातात कायम विमलाजींची पुस्तकं असायची किंवा माझ्या जवळच्या मैत्रिणींना विमलाजी मला अत्यंत आदरस्थानी आहेत हे ठाऊक होतं. त्यांच्या सोबत विमलाजींबद्दल बोलणं झालं. विमलाजी असत्या तर, 'विमल' नावाचा देह आता आपल्यात नाही असं स्पष्ट म्हणाल्या असत्या. सत्यावर नुसतं प्रेम करणारी नव्हे सत्य जगणारी, सत्य असणारी ही व्यक्ती होती. मृत्यूसमयी त्या 88 वर्षांच्या होत्या. अॅनला फोनवर मी म्हटलं, " त्या आता नाहीत यात शोक करण्यासारखं काही नाही. या विश्वाला, त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला, आयुष्याला विमलाजींनी भरभरून दिलंय, समृद्ध केलंय. काय सुंदर, देखणं आयुष्यं होतं त्यांचं!" अॅन म्हणाली, "what a remarkable life!"
पण मग कसं होतं हे आयुष्य? विमलाजींचा जन्म अमरावतीचा. घरात परंपरेनं अध्यात्म आणि विवेकवादाचं वातावरण. आजोबांकडं आध्यात्मिक सत्पुरुषांचं येणं-जाणं तर वडील रॅशनॅलिस्ट संघटनेचा विचार मांडणारे. अशा घरात, पूर्ण स्वातंत्र्यात विमलाजींचं बालपण गेलं. विमलाजींच्या चरित्रात या सर्व गोष्टींचे उल्लेख येतात. त्यांची आध्यात्मिक जिज्ञासा, प्रयोग या सर्वांचे. पण माझ्या लक्षात राहिला तो विमलाजींचा त्यांच्या वडिलांसोबत झालेला हृद्य संवाद.
विमलाजींना आध्यात्मिक जिज्ञासा आहे हे कळल्यावर वडील त्यांना म्हणाले, "तुम्हाला ज्या पद्धतीनं शोध घ्यायचा तो घ्या. पण कुणाच्याही 'गुरू' म्हणून आहारी जाऊ नका. जे मनाला, बुद्धीला पारखून घेता येईल तेच ज्ञान म्हणून स्वीकारा."
आणि हा धागा विमलाजींच्या जीवनशोधात, शोधयात्रेत सतत दिसतो. आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात गुरू करायला आणि गुरू व्हायला अनेक प्रलोभनं असतात. आयुष्याच्या दर्शनानं भयभीत झालेल्या विकल मनाला स्वत:च्या कृत्यांची पूर्ण जबाबदारी घेण्यापेक्षा 'गुरू'ची आयुष्यात स्थापना करणं सुलभ वाटतं. आणि गुरूंचंही तसंच होतं. विमलाजी म्हणायच्या, "कामेषणा, वित्तेषणा सुटते पण लोकेषणा सुटत नाही." म्हणजे मनुष्य एखाद्यावेळी कामभावनेतून, धनलोभापासून मोकळा होऊ शकतो. पण लोकांनी मला नेता किंवा गुरू मानावं ही भावना सोडणं सर्वात अवघड. कुणी आपल्याला 'गुरू' मानलं की जसं अहंकाराचं पोषण होतं. ते सोडणं फार अवघड. अध्यात्माच्या क्षेत्रात सात दशकांहून अधिक वावर करूनही विमलाजी या लोकेषणेपासून मुक्त राहिल्या. त्यांनी 'गुरू'चं नातं कुणाशीही जोडलं नाही. कृष्णमूर्ती यांच्या अगदी निकट असून त्यांनी कृष्णमूर्ती यांचंही 'शिष्यत्व' कधी स्वीकारलं नाही.
नव्या युगातल्या नव्या माणसांशी त्यांनी सख्यत्वाचं, मैत्रीचं नातं जोडलं आणि मैत्रीपूर्ण संवाद केला.
माझा आणि विमलाजींचा असा मैत्रीपूर्ण संवाद झाला होता. आणि इतकी मोकळी, स्वीकाराची ज्ञानपूर्ण संवादाची, समजून घेण्याची भेट मी आयुष्यात त्यापूर्वी कधी अनुभवली नव्हती.
जे. कृष्णमूर्ती यांच्या लेखनाचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता. कृष्णमूर्ती यांच्या परखड, स्पष्ट, तरीही ऋजू विश्लेषणानं मला खूप काही दिलं होतं. मात्र मला संवादाची भूक होती. माझ्या आतले प्रश्न, कोलाहल, अशांत मन यावर जालीम उपाय शोधावा अशी विशीतली आकांक्षा माझ्या प्रयोगांच्या पाठीशी होती. सबब मी माझ्या मार्क्सवादी शिक्षणात न शोभेलशा भुकेनं तुकोबांपासून ते निसर्गदत्तांपर्यंत जे हाती मिळेल त्याचं वाचन करत होते. घरातून संत वाङ्मयाचे संस्कार होते. परंतु माझ्या अस्वस्थ एकटेपणाची, हृदयस्थ काहिलीची उत्तरं मला कळत नव्हती. अशा वेळी कृष्णमूर्ती यांच्या लेखनानं किंवा दर्शनानं म्हणते हवं तर, मला एक दरवाजा उघडून दिला. स्वत:च्या कृत्यांची unconditional जबाबदारी घेण्याचा दरवाजा. जगावर, भूतकाळावर परिस्थितीवर बोट दाखवताना स्वत:कडं वळलेल्या तीन बोटांची जबाबदारी घेण्याचा दरवाजा जिद्दूनं मला दाखवला. पण जिद्दू मला अप्राप्य वाटायचा.
मला संवाद हवा होता. या आयुष्याच्या निरगाठींवर जिता जागता संवाद. आणि कृपा किंवा योगायोग म्हणू. हवं तर माझ्या हातात विमलाजींचं 'प्रयाणोत्सव' हे पुस्तक आलं. कृष्णमूर्ती यांच्या लेखनातून परंपरा पूर्ण वजा होती. तर बाईंनी भारतीय आध्यात्मिक परंपरा न नाकारता तिला आधुनिकतेला जोडलं होतं. ज्ञानोबा-तुकोबा जे मला प्रिय होते त्याच्या शब्दांची उकल विमलाजीं इतकी सुंदर दुस-या कुणीच कधीही केली नाहीए. यांना आपण भेटायचं असं मी ठरवलं. त्यावेळी कैसर इराणी ही त्यांची सेक्रेटरी होती. मी कैसरला पत्र लिहलं. विमलाजींनी मला दोन तासाची वेळ दिली. माऊंट अबूला, शिवकुटीमध्ये त्यांनी मला बोलावलं.
कविहृदयाची स्त्री, विनोबांच्या भूदान चळवळीत तिनं महत्त्वाचं योगदान दिलं. भारतभर प्रवास केला. जेपींपासून ते दादा धर्माधिकारींपर्यंत सर्वांसोबत काम केलं. विवेकाला पटलं त्या सर्व सामाजिक कामात सहभाग घेतला पण कधीही स्वत:चं संस्थान होऊ दिलं नाही.अशा प्रखर बुद्धिमान व्यक्तीला भेटणं हा माझ्या आयुष्यातला फार मोठा योग होता.
कोणत्याही भेटीत आपण आपल्या अहंकाराचं कसं पोषण होईल ते बघत असतो. या अमक्या थोर व्यक्तीनं मला अमुक असं कॉम्प्लिमेंट दिलं हे आपण नंतर चवीनं सांगतो. विमलाजींच्या भेटीत ते झालं तो संवाद होता. त्यात कौतुक नव्हतं तर जाणवली होती त्यांची आस्था. आपल्याशी संवाद साधू इच्छिणा-या धडपडणा-या मुलीच्या प्रश्नांना उत्तरं देताना, कोणताही आविर्भाव न घेता प्रेमानं विमलाजींनी माझ्याशी संवाद साधला. "अगं, आयुष्याच्या या टप्प्यांवर आपण का भेटलो? भेटी का होतात? ते जरी आपल्याला ठाऊक नसलं तरी प्रत्येक भेटीत जे काही उत्तम माझ्याजवळ आहे ते सारं मी त्या भेट घेणा-याला द्यावं असं मला वाटतं," असं त्या म्हणाल्या. विमलाजींशी भेट म्हणजे खुल्या अवकाशाशी भेट. या भेटीनं मला माणूस म्हणून खूप काही दिलं. किती बालिश वाटतात आता मला मी विचारलेले प्रश्न आणि किती मूलभूत उत्तरं दिली त्यांनी मला. तो संवादही नंतर मी स्वतंत्रपणे लिहून काढला.
आज ते वाचताना विमलाजींच्या आस्थेचं प्रत्यंतर जागोजाग येतं. कृष्णमूर्ती आणि विमलाजींच्या विषयी जरी मी, लिहिलं तरी मी कोरडा पाषाण आहे! त्यामुळे अशा भेटीनंतर बदल होतो. तोही अतिशय थोडासा. पण त्या थोड्याशा बदलानंही मला भान दिलं. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाकडं, त्यातून निर्माण होणा-या तीव्र दु:खाकडंही एका अनुभवासाठी आवश्यक शिकवणी म्हणून बघण्याचं भान विमलाजींनी मला दिलं.
मराठी मुलखातल्या असून नंतर गुजरात ही त्यांनी कर्मभूमी मानली. डलहौसी आणि माऊंट अबू इथं त्या राहायच्या. माऊंट अबूतली शिवकुटीतली संध्याकाळ अजून मला आठवते. स्मरणरंजनासाठी नाही. तर त्या संवादानंतर ता-यांनी उमलून आलेलं आकाश जसं माझ्या नजरेला दिसलं त्या अवकाशाची ती आठवण आहे. विमलाजींचं आयुष्य हा फार मोठा प्रवास आहे. त्या प्रवासानं अनेक लढे, सामाजिक चळवळी, आयुष्यं उजळली. त्यांच्या देहाचं आपल्यात नसण्याचं हे स्मरण. त्याचबरोबर त्यांच्या असण्याचं समृद्ध झालेल्या क्षणांचंही!