Tuesday, November 30, 2010

सतीश तांबे यांची साहित्य प्रश्नावली

सतीश तांबे यांनी ब्लॉग वरची चर्चा वाचून पुढील प्रश्नावली पाठवली. त्यातील प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत.

१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
३) साहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
४) तुमच्या लेखी सर्व साहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता, कथा, कादंबरी असा कोणताही साहित्यप्रकार न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान देता का?

या तांब्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते.

माझ्या मते अनिल अवचट हे मूळात 'रिपोर्ताज' पद्धतीचे लेखन करतात. अवचटांची अनेक वर्णने पार्शल असतात. आणि ते छोट्या अनुभवाची बरीच लांब बतावणी करतात. याला आम्ही 'पालीची मगर करणे' असे म्हणायचो. अवचटांची 'अमेरिका' हे अशा problematic लिखाणाचं उदाहरण आहे. मात्र आता त्यावर सवडीने लिहावयास हवे. शिवाय लेखनाची समीक्षा ही त्यांच्या इतर कामाची बाय डिफॉल्ट टीका नव्हे. मात्र लेखनाबद्दल लिहिताना सारखी जीभ आवरायची गरज काय?

Friday, October 29, 2010

A Tourist and A Traveler


Tunner: We're probably the first tourists they've had since the war.
Kit Moresby: Tunner, we're not tourists. We're travelers.
Tunner: Oh. What's the difference?
Port Moresby: A tourist is someone who thinks about going home the moment they arrive, Tunner.
Kit Moresby: Whereas a traveler might not come back at all.
Tunner: You mean I'm a tourist.
Kit Moresby: Yes, Tunner. And I'm half and half.


From The Sheltering Sky 1990.

अनिल अवचट : एक न आवडणं

बर्तोलुचीच्या शेल्टरिंग स्काय या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्‍यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यांतली नायिका फरक सांगते प्रवासाबद्दलच्या धारणेचा.

मी इथं आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून नाही आणि मग, टूरिस्ट सहप्रवासी मित्राच्या चेहेर्‍यावरचे भाव वाचून ती पुढे म्हणते टूरिस्ट म्हणजे जो नव्या देशात येताक्षणी परत जाण्याची तारीख निश्चित करतो आणि ट्रॅव्हलरला नव्या देशात आलं की परत जाण्याची आठवणही होत नाही. प्रवास हेच त्याचं सर्वस्व!’

पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण. मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. हनिमूनचे फोटो दाखवण्याचा मूर्ख अश्लीलपणा हे पण याच वर्गाचं लक्षण! जर अनुभवाला मनापासून सामोरं जायचं तर फोटो कोण काढील? दारू पीत त्या संबंधीची वर्णनं कोण सांगील? पण लग्नाच्या नात्यातला चार्म संपला की आमची युरोपची टूर आम्ही ठेक्कडीला गेलो होतो तेव्हा अशा गप्पा सुरू होतात बकार्डी पीत पीत...


आठवडाभर मी ट्विट करणार नाही असं जाहीर करत राजदीप सरदेसाई नाही का कर्नाटकात भटकायला गेला आणि त्याची बायको सागरिका घोष लिहीत होती आठवडाभर जगाला ट्विट करत नागरहोळे आणि काबिनी किती सुंदर आहे म्हणून! मनात आलं, अगं माझ्या बायो, जर ते इतकं सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की. ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.

'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.


या पब्लिकचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते वाचण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना पु.ल. देशपांडे आवडतात आणि पन्नाशीत येता येता, त्यांना अनिल अवचट थोर वाटतात! जे असुंदर आहे त्याच्या डोळ्यांत डोळा घालून पाहायचं एकदा का भयापोटी नाकारलं की मग सर्व गोष्टिंना सरसहा चांगलं म्हणणारा पोस्टमेनॉपॉझल समाजवाद हीच काय ती बुडत्याची काडी!


ठाण्याच्या मॅजेस्टिकमध्ये पुस्तकांचे गठ्ठे पडले होते. भोचकपणे मी एक पुस्तक खेचून बाहेर काढलं पुण्याची अपूर्वाई. बकाल पुण्यात राहणार्‍या बहुसंख्य पुणेकरांना अवचटांनी ही अपूर्वाई सप्रेम दिली हे म्हणतानाच मला हसू फुटलं. पु.. म्हणजे अपूर्वाईसाठी परदेशी जाणारे पहिल्या धारेचे समाजवादी कार्तिकेयस्वामी; तर अनिल अवचट म्हणजे दुसर्‍या धारेचे पुण्यालाच अपूर्व करून प्रदक्षिणेचं पुण्यं मिळवणारे पुणेरी गणपती!


पूर्वी वाचकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं होतं. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. नाही आवडावं असं त्यांच्या लेखनात काही नाहीच. पण कंटाळा येण्यासारखं खूप काही आहे. त्यांचा दंभ किती मोहक आहे ? उगीच का वर्णी लागते कॉर्पोरेट आणि एन आर आय जगात त्यांची ? अनिल अवचट मला बोअर करतात. माझा राग अनिल अवचटांच्या लेखनावर नाही. राग येईल असं ते लिहीतच नाहीत, मुळी! पण त्यांच्या बिनमिठाच्या नॅरेटिव्हजनी मला सुपरकंटाळा येतो. इयत्ता आठवीपर्यंत मुलं किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्‍या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.


गुडी टु शूज माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच. त्यातही पुण्यातल्याच', या सुनील तांब्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण तो लेखक माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणं रोम्यॅंटिक करून मांडायला जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.


माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात. ही पुरोगामी बाईची पुरुषाला पान्हा फोडायची ईर्षा अवचटांनी ताडून त्यांनी लग्न या व्यवस्थेची जी पार्शल वर्णनं केलीत त्यांना मी (विनोबांच्या भाषेत) वाचाचौर्याचं लक्षण मानते. कारण तसं लग्न वास्तवात असताना त्यात खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत.


अगदी रॅश उदाहरण द्यायचं तर लोकांच्या घऱची देखणी कुत्री मला आवडतात. पण मग त्या प्रत्येक कुत्रीच्या पाळीच्या काळात तिची काळजी कोण घेत असेल? किंवा त्या कुत्रीला मेटिंगसाठी कुठे न्यायचं? ते कोण ठरवत असेल अशा प्रश्नांनी मी भानावर येते आणि माझ्या पाळीव प्राणिप्रेमाची तात्कलिक नशा उतरते. कुत्री पाळणं किती मज्जेशीर आहे ते लिहिणं आणि पाळलेली कुत्री निभावणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्या निभावण्याच्या प्रक्रियेतलं सारं असुंदर वगळून जे जग अवचट तयार करतात त्यामुळे त्या सद्‍गुणी लेखनाचा एडिटेड भाग मला अधिकाधिक खुणावू लागतो.


अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, बाय वन गेट वन फ्रीच्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!

Friday, October 1, 2010

गर्दीची अक्कल
दोन माणसांच्या तीव्र हुशारीनं मला कॉम्प्लेक्स येतो. इतके कसे हे दोघे हुशार, विटी, विनोदी, हाड-हुड स्पेशालिस्ट ? कसे बुवा हे असे चार्मिंग आणि तरीही यांची हृदयं जागच्या जागी? कोल्बर्ट रिपोर्टवाला स्टिफन कोल्बर्ट आणि जॉन स्ट्युर्ट या दोघांमुळे टीव्ही नावाची गोष्ट मला आवडू लागली. हे दोन्ही चार्मर्स तुम्हाला माहीत नसतील तर आग्रहानं माहीत करून घ्यायला हवेत इतके इंटरेस्टिंग. कोल्बर्ट आणि स्ट्युअर्ट जे काही अमेरिकन राजकारणाबद्दल बोलू शकतात, ते बघता लोकशाहीत विनोदाचं स्थान आणि सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे ते ध्यानात येतं.
या कोल्बर्टनं अनेक संकल्पनांसोबत एक नवीन शब्द जन्माला घातलाय, तो शब्द म्हणजे ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ म्हणजे सत्याचा आभास निर्माण करु शकण्याची शक्ती. ब-याच मतप्रदर्शनांमध्ये सत्याचा अंश सत्यासाठी आवश्यक पुरावा नसतो, परंतु त्यात सत्याभासाची शक्यता भरपूर असते. अशा वाक्यांना, दृष्टीकोन बनवणा-या मतांना कोल्बर्टनं नाव ठेवलं ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ नावाचं हे वास्तव जन्माला आलं, त्याबरोबर त्या आभासाचा उपयोगही लक्षात आला, कारण जमाना आलाय क्राऊड सोर्सिंगचा.


‘क्राऊड सोर्सिंग’ हा सध्याचा बझवर्ड आहे. चिन्हवास्तवाच्या जगात लक्षावधी व्यक्ती ट्विटर, फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईट्स इथं मतप्रदर्शन करत फिरतायत. त्यांच्या या मत-मतांच्या गलबल्यांचा उपयोग अनेक कॉर्पोरेट व्यावसायिकांना होत आहे. या सा-या नव्या गर्दी-अकलेचं नाव आहे ‘क्राऊड सोर्सिंग’.व्यापारी वर्गाला हे क्राऊडसोर्सिंगचं महत्त्व फार पूर्वीपासून माहिती आहे. माझा एक अत्यंत हुशार व्यावसायिक बॉस होता. फाळणीच्या वेळी तो सहा वर्षांचा होता. अक्षरशः नेसत्या कपड्यानिशी घरदार सोडून तो मुंबईत आला आणि नंतर झोपडपट्टीत वाढला. मात्र नंतर करोडो रुपयांच्या उलाढालीतल्या व्यवसायात यशस्वी झाला. तो मला हसून म्हणायचा, ’ज्ञानदा, बिझनेसमधल्या यशाचं गमक एकच, एकट्याची अक्कल चालवू नका. दहा लोकांना विचारा. कुठल्याही एका बुध्दीमान उत्तरापेक्षा जास्त माहीती, तुम्हाला तोच प्रश्न दहा लोकांना विचारून मिळेल’. मला त्याच्या बोलण्याचा वैताग यायचा कारण रियाझानं, अभ्यासानं तयार केलेल्या अकलेला नाकारून तो सामान्य दहा जणांची मतं का विचारात घेतोय ? असं वाटून चिडचिड व्हायची. मग एके दिवशी बॉसच्या ‘क्राऊड-सोर्सिंग’चं गमक मला उलगडलं.

व्यापारात-बिझनेसमध्ये ज्यांना यशस्वी म्हणून आपण ओळखतो ते पण निर्णयनाच्या प्रक्रियेच्या अलिकडे आश्वासक उत्तरं (इन्डॉर्समेंट्स) शोधत असतात. एखादी नवीन कल्पना मांडायची आणि ‘तुम क्या सोचते हो?’ असा प्रश्न फ्लोट करायचा. आयआयटी, आयआयएम मंडळी असा प्रश्न आला की तल्लख, चतुर उत्तरांचा मारा करतात आणि बघता बघता लीडरकडं पंधरावीस कुरकुरीत विचारांची यादी तयार होते. त्यातुन विविध नफा-नुकसानीचा हिशोब करत बॉस निर्णय घेतो. वैश्य बॉसच्या यशाचं गमक, त्याची बुध्दीमान निर्णय सुचण्याची क्षमता हे नव्हतंच कधी, तर कोणती माहिती व्यवस्थित रिस्क घेऊन, कशी वापरायची यातंच तर होती वैश्य किमया! या किमयेचा आता नवा अदभुत अवतार म्हणजे ‘क्राऊडसोर्सिंग’. एखादा नवा ब्रँड लाँच करायचा आहे तर टाका तो फेसबुकात, बघा लोकं काय उत्तरं देतायत ते. इंटुकड्यांना विचारा दर बुधवारी ’तहेलका’ वाचनाच्या सवयींबद्दल, वेगवेगळे प्रश्न कसे टाकत राहतं फेसबुकात? या हजारो वाचणा-या, व्यक्त होणा-या माणसांच्या लसावि उत्तरात सापडून जातं यशाचं गमक.

हे यशाचं गमक जस व्यापा-यांच्या उपयोगाचं तसंच ते राजकारण्यांच्याही. म्हणून तर कोल्बर्टनं वर्णलेला ‘ट्रुथीनेस’ तपासण्याची नवी मॉडेल्स तयार होत आहेत. इंडियाना विद्यापीठानं तर truthy.indiana.edu ही वेबसाईटच लाँच केली आहे. एखाद्या राजकीय/ सामाजिक मतप्रदर्शनानंतर लोकं ट्विटर/ फेसबुकवर कशी प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रियांना मोजून त्यातल्या ‘सत्त्याभासा’ची शक्यताही मोजतात इंडियानातली गणितमानी मंडळी.

कलेचं एक जग आहे. ज्याला मी सिग्नेचरचं जग म्हणते. तिथे तुम्ही जे काही करता ते तुमच्या शिक्क्यानं जन्माला येतं आणि दुसरं एक परात्म करणारं औद्योगिक जग आहे. या भुसार जगात कोणाच्याही सहीचं काहीच नसतं. गर्दीच्या गरजा भागवायला गर्दीचीच अक्कल वापरायची असा असतो इथला व्यवहार, बिनसहीचा- क्राऊडसोर्सिंगमधून जन्माला येणारा. मोठ्या मोठ्या ब्युरोक्रॅटिक रचनांमध्येदेखील मतांचा कॉपीराईट कोणाच्या हातात उरत नाही. एखादं ट्विटरवरचं मत कसं पटापटा रिट्विट होतं – मूळ ट्विट-निर्मात्याला त्याचं काही श्रेय मिळतच नाही. पोस्ट मॉडर्न जगात हे असं व्हर्जनिंग आणि कॉप्यांचं प्रसृतीकरण सतत चालू असतं.

परवाच माझी एक मैत्रिण तणतणत म्हणाली, ’अगं, माझं विश्लेषण या माझ्या बॉससोबत शेअर केलं आणि दुस-या दिवशी ‘मिंट’ मध्ये याच्या नावावर लेख, त्यात माझा साधा उल्लेखही नाही.’
तेव्हा तिला मी हसून हे माझं ‘क्राऊड सोर्सिंग’चं तत्त्वज्ञान ऐकवलं. ‘बॉस’ नावाच्या प्राण्याला शेवटी इजिप्तच्या फारोहा सारखं पिरॅमिड बांधायचं श्रेय मिळतं. त्या पिरॅमिडचा दगड कोणी कुठून वाहत आणला याचा काही मतलब उरत नाही. शेवटी कल्पनांचे दगड कुठून आले त्याला महत्त्वच नाही. मी तिला मग चिडवायच्या स्वरात म्हटलं, ’अगं, तुझ्या विश्लेषणावर तुझी सही लागून त्याचं फारफार तर काय झालं असतं? एखादं आर्टिकल, पण या पॉवर-स्प्रिंगबोर्डवरच्या बॉसच्या मुखातून तेच ज्ञान टपटपल्यानं त्याची किंमत वाढली आणि तुझ्या अनामिक भागीदारीचं श्रेय तुझ्या गुटगुटीत पगारात परावर्तित झालंच की.’

सबब हे श्रेयाचं आणि क्राऊड सोर्सिंगचं नातं हे असं व्यस्त आहे, पण परत एकदा मूळ मुद्दा ‘सत्याचा आभास’ तयार करण्याचा. हा ‘ट्रुथीनेस’ दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरत जाणार आहे. सध्या बघा निळू दामल्यांनी लवासाच्या अर्धमाहितीला त्यांच्या तथाकथित ’तटस्थ ’ ट्रुथीनेसचा टेकू दिलाय, तो ‘मौजे’नं प्रसिध्दही केलाय... मी अभ्यास करतीए तो हा ‘ट्रुथीनेस’ जिंकतोय की सुनीतीचं खरंखुरं राजकारण – त्याचा!


-----

This blog is also published on www.thinkmaharashtra.com on every Friday.

Thursday, September 23, 2010

विवाह संस्था आणि हिशोबएक इतिहासाचार्य आणि एक उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना. राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून या संस्थेकडे बघताना घातलेल्या अनेक चष्म्यांना तडे जातात. इतिहासातून वाहत आलेली नाती राजवाडे त्यांच्या विश्लेषक पद्धतीनं तपासतात. कॉम्रेड डांग्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे माणसाचं जीवशास्त्रीय जगणं म्हणजे जिवंत राहणं आणि प्रजनन करणं असं मानणार्‍या एका बिंदूपासून राजवाडे सुरूवात करतात आणि विवाहसंस्थेच्या उदयात किती प्रकारचे हिशोब आदिम काळापासून गृहित धरले आहेत त्याची पुराव्यानुसार जंत्री देतात. कॉम्रेड डांग्यांना मार्क्स आणि एंगल्सचा ‘आदिम साम्यवाद’ या लेखनात आढळलाय – मग हे असं गंभीर पुस्तक वाचताना कोणत्या उथळपणाच्या परमोच्चबिंदूची आठवण यावी? तर ती आलीच. किम कट्रालची.

‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’ या मालिकेत किम कट्रालनं समंथा नावाचं कॅरेक्टर रंगवलय. इतिहासाचार्य राजवाडे आणि समंथा या दोघांनाही जगातल्या कोणत्याच बाई आणि बाप्याच्या परम्युटेशन-कॉम्बिनेशननं चकवलं नसतं. या दोघांनाही जगातल्या वैषेयिक आणि वैवाहिक संबंधांबद्दल एक प्रकारची तटस्थ जाण आहे. एकाला अभ्यासपूर्वक आणि एकाला अनुभवोत्तर.

आश्रमीय जीवनशैलीच्या बाहेर पाऊल टाकल्यामुळे संन्यासी आणि वेश्या यांना जगाचं खरं रूप कळतं असं म्हणतात. परंपरेनं वाहत आलेला ‘वेश्या’ हा शब्द आता, एकविसाव्या शतकात भांडवलशाहीनं जोडलेल्या अनेक नात्यांना लागू होतो. अगदी लग्नांतर्गत नात्यांनादेखील. त्यामुळे परंपरागत अर्थानं तो शब्द वापरणं चूकच. पण गृहस्थाश्रम मांडला नाही की नात्यातलं काहीतरी गंमतशीर कळतंच की. ‘इतिहास अभ्यासक’ आणि शरीरसंबंधांना कोणत्याही भावनिक गुंतवणुकीपलीकडे जीवशास्त्रीय गरज म्हणून तपासणारी ‘समंथा’, या दोघांनाही विवाहसंस्थेबद्दल काहीतरी मोलाचं कळलंय हे मला वाचता वाचता जाणवलं म्हणून या दोघांचीही आठवण एकत्र आली.

एका एपिसोडमध्ये एक पुरूष ‘गे’ आहे की नाही यावर समंथाच्या मैत्रिणी वाद घालू लागतात. तेव्हा त्यांना गप्पं करत समंथा म्हणते, ‘बुरसटलेल्या बायांसारखं काहीतरी बोलू नका. बाईला बाई आवडते की बाप्या, बाप्याला बाप्येच आवडतात की बाया या पलीकडे जग केव्हाच पोचलंय! आता होमो-हेटरो या बायनरीपलीकडे एक मोठं पॅनसेक्शुअल जग आहे. व्यक्ती आवडते की नाही हे महत्त्वाचं. नंतर मॅचिंग सेक्शुआलिटीचा विचार.’ समंथांच्या या सर्वसमावेशक, उदार वाक्यानं अर्थातच तिच्या मैत्रिणी चकित होतात. तिच्या ‘पॅनसेक्शुअल’ छत्रीखाली अमंगल असे ‘भेदाभेदांचे भ्रम’ टिकतच नाहीत.

राजवाड्यांचं पुस्तक वाचूनही तसंच होतं. विवाहसंस्थेकडे बघण्याचा व्हिक्टोरियन चष्मा राजवाडे मोडतात आणि सारा इतिहास नव्यानं मांडायला घेतात. त्यामुळे त्यानंतर विवाहसंस्थेचं कोणतंच रूप आपल्याला बिचकावणारं वाटत नाही. ‘असेल बुवा – तसंही असेल’ असं खांदे उडवून म्हणता येतं.

बेट्सी म्हणजे इलिझाबेथ ब्रेंट नावाची कमालीची हुशार अँथ्रोपोलॉजिस्ट बाई आम्हाला शिकवायची. बेट्सीच्या कोर्सचं नाव होतं, ‘निसर्ग आणि संस्कृती – बाईपणाचं घडत जाणं’. बेट्सी प्राणी जगतातल्या लिंगभेदांचा अभ्यास ते विविध संस्कृतींमधलं बाया-पुरुषांचं, त्यांच्या लैंगिक अस्मितांचं घडत जाणं शिकवायची. त्यात अर्थात तृतीय पंथीयांचा विषय नेहमी निघायचा. बेट्सी स्वत: नेटिव्ह अमेरिकन लोकांची अभ्यासक आहे. तिनं नवाहो इंडियनाचा प्रचड अभ्यास तिनं केलाय. एकदा शिकवताना आमच्या एकूण तीन लैंगिक ओळखींतून जगाकडे, संस्कृतीकडे बघण्याच्या चष्म्याला बेट्सीनं धक्का दिला. नवाहो इंडियन्स सात प्रकारचे लिंगभेद मानतात. स्त्रीच्या शरीरातली मनानं स्त्री, स्त्रीच्या शरीरातला मनानं पुरुष, स्त्रीच्या शरीरातला तृतीयपंथी/ना-स्त्री ना-पुरुष; त्याचप्रमाणे पुरुषाच्या शरीरातले तीन प्रकार आणि एक. पूर्णतया शरीरानं व मनानं स्त्री किंवा पुरूष नसलेली अस्मिता. नवाहो परंपरेत ना-स्त्री ना-पुरूष अशा व्यक्तीत दैवी शक्ती असतात असं मानतात. परंतु एकूणात, हे जग सात प्रकारच्या लिंगभेदांचं बनलंय असं नवाहोंचं मत आहे. प्रत्येक व्यक्तीत बाईपणाचा आणि पुरुषपणाचा काही प्रमाणात अंश असतो हे मतंही आताशा सामान्य ज्ञानाचा भाग झालंय.

बेट्सीच्या वर्गात पूर्वसंचितातून येणार्‍या चौकटींच्या ठिकर्‍या उडायच्या. ‘काळ’ या संकल्पनेबद्दल बोलताना एकदिश कालसंकल्पना आणि चक्राकार, पेंडयुलम सारखी आवर्ती काल संकल्पना यांच्यावर बोलून झालं की बेट्सी नेटिव्ह अमेरिकन परंपरेतून आलेली अनेकमिती काळांची कल्पना सांगायची. यानुसार आपण सगळे काळाच्या विविध मितींमधून फिरत असतो आणि भेटतो तेव्हा दोघांच्याही मिती समान असतातच असं नाही. नेटिव्ह अमेरिकनांना (तसंच आपल्याकडच्या आदिवासींनादेखील) ‘फोटो काढणं’ हे का अनैतिक वाटायचं त्याचा उलगडा बेट्सीच्या या ‘काळ’ संकल्पनेमुळे व्हायचा. ‘फोटो’ काढला म्हणजे त्या काळाच्या मितीतल्या माणसाला ठार मारला असा अर्थ नेटिव्ह अमेरिकन लावायचे आणि कॅमेर्‍याला घाबरून पळून जायचे. ते असं का करायचे याची संगती लागते. आपल्या मनातल्या ठाशीव कल्पना खुल्या करून समोर येणारं जग एकदा तपासायचं ठरवलं की कित्येक नव्या गोष्टी नजरेला पडू लागतात.

स.गं मालशांचं ‘आगळंवेगळं’ नावाचं एक पुस्तक होतं. त्यात जुन्या जैन परंपरेतल्या एका पात्राची कथा होती. तिचं नावं ‘धूर्ता’. ही धूर्ता चार थापेबाज चोरांना भेटते. प्रत्येक चोर विविध थापा मारत आपली शौर्यकथा सांगतो आणि ‘धूर्ता’ हिंदू पुराणातले दाखले देत त्या सार्‍या थापा कशा शक्य आहेत ते सांगते. ‘धूर्ता’ अशा जैन मुशीतून घडली आहे की हिंदू पुराणातली कोणतीच नवी संकल्पना तिला आश्चर्यचकित करत नाही! ज्यावेळी मी समाजशास्त्रज्ञाच्या, इतिहास अभ्यासकाच्या भूमिकांचा विचार करते त्यावेळी बेट्सी ब्रेंट आणि धूर्ता या प्रचंड वेगळ्या परंपरा जाणणार्‍या बाया मला आदर्शवत वाटतात. ‘ज्ञानोत्तर तटस्थपणा’ हे दोघींच्याही बेहद्द हुशारीचं लक्षण वाटतं मला.

पुन्हा, न बिचकण्याच्या राजवाडे क्षेत्राकडे जाते. माझ्या दररोजच्या बसप्रवासात हातात असलेलं सध्या पटावरचं पुस्तक म्हणजे डॉ. ऑलिव्हिया जडसनचं ‘डॉ तात्यानाज् सेक्स अ‍ॅडव्हाईज टु ऑल क्रिएशन्स’. ऑलिव्हिया ही जीवशास्त्राची संशोधक आणि डॉ रिचर्ड डॉकिन्सची विद्यार्थिनी तिनं प्राणिजगताच्या सेक्शुअल प्रश्नांना उत्तर द्यायला एक पात्र निर्माण केलंय ती म्हणजे डॉ. तात्याना. ही डॉ. तात्याना म्हणजे प्राण्यांना ‘ताईचा सल्ला’ देणारी ताई आहे. कबूतरं, सिंह, हत्ती, डास, कोळी यांचे नर-मादी डॉ. तात्यानाला आपले सेक्सविषयक प्रश्न पाठवतात आणि डॉ. तात्याना त्यांना लीलया उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करते. त्या प्रश्नापाठीमागची जीवशास्त्रीय कारणपरंपरा उलगडून सांगते. भावनेच्या प्रदेशापलीकडचं शरीरसंबंधांच्या जीवशास्त्राचं दर्शन देणारं हे पुस्तक – सुरुवातीला थक्क करतं – मग हसवतं आणि तेच करतं, जे प्रत्येक ‘ज्ञान’वस्तू अगत्यानं प्रत्येक वेळी करते-- सार्‍या शरीरव्यवहाराकडे बघण्याची जीवशास्त्रीय तटस्थता ही डॉ. तात्याना आपल्यापर्यंत पोचवते. बेट्सी आणि धूर्तेच्या यादीतली ही ऑलिव्हिया मला दिवसेंदिवस आवडू लागली आहे. तिच्याकडे केवळ तरतरीत बुद्धी नाही – तर त्या पलीकडे आहे जगण्याकडे निखळ, शुद्ध शहाणणानं बघण्यासाठी आवश्यक स्वच्छ दृष्टी आणि संवादाची उत्कृष्ट अशी शैली!

तिचं पुस्तक वाचताना बायांना, बाप्यांना, बाया-बाप्ये नसलेल्यांना तपासताना आपण चष्मा पूर्ण नाही काढला तरी आपल्याला चष्मा आहे याचं भान येतं आणि नोहाच्या नौकेतल्या कित्येक शक्यतांची आपसूक संगतीही लागते. राजवाड्यांना उमगलेले विवाह संस्थेतले सांस्कृतिक हिशोबही तिच्या जीवशास्त्रीय ज्ञानाच्या उजेडात लख्ख दिसतात.

Friday, September 17, 2010

मास्तरांच्या नसण्याचं ऊन


सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय; तो मूळातून वाचावा असा आहे. महत्वाचा आहे. कारण लेख फक्त कौतुक संप्रदायातला नाही. ‘अज्ञानापोटी अति कौतुक’ हा मराठी वाङमयास ग्रासणारा दुर्गुण तर आहेच परंतु तो अनेक सुमार मनोवृत्तींचं द्योतक आहे. चलाख आणि सुमार माणसाला आपण सुमार आहोत हे कळलं की तो ‘सर्वांचं बेफाट कौतुक’ अशी सर्वसमावेशक रणनीती आपलीशी करतो. ही केवळ खुशमस्करेगिरी नसते, तर हा विनिमय असतो. ‘मी तुमचं कौतुक करतो तुम्ही माझं सुमारत्व उघडं पाडू नका’ असा चलाख विनिमय! पण नामदेव ढसाळांचा लेख ( या वेळी तरी) विनिमयाच्या कंगो-यापलीकडचा म्हणून महत्त्वाचा आहे. मास्तरांनी सत्तरच्या दशकानंतरचं बदलतं गिरणगाव, तिथलं राजकारण का टिपलं नाही? असा प्रश्न नामदेव ढसाळ विचारतात. त्याचा खोलात विचार करावाच लागतो. सुर्वेमास्तरांबद्दल असे काही प्रश्न पडतात आणि काही अनुत्तरितही राहतात.

सुर्वेमास्तरांच्या निधनानंतर त्यांचा मानसपुत्र मुकुंद सावंत यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेत श्रध्दांजली सभा आयोजित केली होती. त्या दिवशी त्या समाजविज्ञान संस्थेत त्या बहुतांश अमराठी समुहात मास्तरांना आठवताना कवितेचा, जगण्याचा, डाव्या चळवळींचा मोठा पट सामोरा आला. संस्कृतीला काचणारे प्रश्न कविता निर्भयपणे मांडते आणि जिथे माणसं बघू इच्छित नाहीत अशा, कार्पेटखालच्या वास्तवावर तीव्र उजेड पाडते. मास्तर तर भारतीय संस्कृतीला फास लावणा-या अनेक प्रश्नांच्या तिठ्यावर उभे होते. त्यांच्या कवितेनं मराठी सरस्वताला भानावर आणलं. इश्क आणि इन्किलाब या उर्दू परम्परेतल्या दोन भूमिकांवर त्यांनी कामगार वर्गाच्या अनुभवांचं जे अफाट कलम केलं, ते किती महत्त्वाचं! आणि त्यांचा मनात अपराधीभाव बाळगणारा बाप. नात्यांच्या ताण्याबाण्यातून उलगडणारं शहराचं लुम्पेन वास्तव. किती अमानवी वास्तवाच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं मास्तरांनी.

हिंदू कुटुंबानं वाढवलेला हा ‘जातलेस’ माणूस. ‘मास्तरांची सावली’ हे कृष्णाबाईंचं आत्मचरित्र वाचून वाटतं, की अशा ‘बाळगलेल्या’, ‘पाळलेल्या’ पण नाही – फक्त ‘बाळगलेल्या’ या मुलानं या ‘गुंग्या ग्रहावर’ स्वत:ची किती ‘अस्खलित सिग्नेचर’ उमटवली. मेघना पेठेचा ‘अजातपुत्रास अनौरस आईचा अनाहूत सल्ला’ त्याच सुमारास प्रसिध्द झाला होता. वाटलं, मास्तरांना अशा अनौरस आईचा अनाहूत सल्ला जणू आतून कळला होता. म्हणून कवितेसदृश कोणतंही वातावरण नसताना हा नारायण कवितेत व्यक्त झाला.

‘जातलेस असणं’ हा एक काच; तर दुसरा काच म्हणजे सर्व मराठी काव्यपरंपरा ‘विठोबाग्रस्त’ असण्याचा. या भक्तीपलीकडे जाणारा सुर्वेमास्तर हा पहिला लोकयत महान कवी. करंदीकर , मुक्तिबोधांनी मार्क्सवादी कविता लिहिली, परंतु त्या अर्थानं, मास्तरांनी फक्त माणसाची कविता लिहिली. स्वत:ची जातकुळी तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर अशी तपासून पाहूनही मास्तर निराळे राहिले. मास्तरांची महत्ता जेंव्हा भवताली सारा खरेपणा, सच्चाई गिळून टाकणारं वास्तव असतानादेखील ते कवितेत जेन्युईन राहिले यात आहे. त्यांची कविता हीच नव्या क्रांतीची पताका.

मास्तरांच्या कवितेत कित्येक पात्रं भेटतात. त्यांतला ‘जिवा’ माझा सगळ्यात लाडका. ‘तुमच्या त्या उदास रात्री मला नकोत’ म्हणून कवींनाही प्रॅग्मॅटिक फटकारणारा. मास्तरांनी माणसाला आणि मार्क्सला कवितेत खेचून आणलं. मास्तरांच्या चरित्रातले विविध तिढे, त्यांचं कामगारवर्गातलं स्थान या सा-यांमुळेच त्यांची कविता वेगळी झाली. मात्र असं सारं असूनही मास्तरांचा सुलभ डावेपणा कधीकधी डाचतो. त्याचबरोबर याच सोप्या/ सुलभ , ’डाव्या’ कवीला जवळ करताना मुंबईतल्या तमाम ‘बॉम्बेवासियांची’ मास्तरांप्रती असलेली टोकन चॅरिटी ऊर्फ ‘लटकी सहानुभूती’ मला त्रास देते. जर या क्रयविक्रयाच्या विक्राळ शहरात, जिथे पैसा सर्वस्व झाला, तिथं इतर कवींचं काय झालं याची पर्वा कधी कोणी फारशी केल्याचं ऐकिवात नाही. त्या शहरात या ‘बॉम्बे’वासियांनी मास्तरांच्या कवितेवर प्रेम केलं, की मास्तरांच्या टोकन अस्मितेवर? असा प्रश्न नेहमी मला पडतो. पण मास्तरांना हे कळूनही मास्तर साधे राहिले. टोकन म्हणून ते कौतुक स्वीकारतही राहिले.

वसंत सीताराम गुर्जर, तुळशी परब, वाहरू सोनावणे या माणूसकेंद्री कवितेच्या परंपरेतल्या पुढल्या कवींचं काय झालं? की मास्तरांच्या कवितेला ‘लटकी सहानुभूती’ दाखवून आम्ही इतर ‘बॉम्बे’वासियांप्रमाणे नंतरच्या कविंना विसरलो? हे आता मास्तर गेल्यानंतर तरी खरेपणानं आपण आपल्याला विचारायला हवं. काय करता येईल या कवितेला घुसमटवून टाकणा-या शहरात, ज्यांनी जगण्याशी पंगा घेतला अशा आमच्या कविपरंपरेसाठी? एकीकडून संमेलनाचे घासून बुळबुळीत झालेले ‘तेच ते’ आवाज कानावर पडत आहेत आणि मनात माझ्या तुळशीचं पुढे काय झालं? कुठे गेली त्याची कविता? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

काय पध्दतीचं टोक सुमार राजकारण गाठू शकतं याचा दर संमेलन म्हणजे एक जिवंत नमुना! कमअस्सल कवी, कमअस्सल लेखक प्रसिध्द होण्यासाठी कायम धडपडतात, पण ज्यांच्या निष्ठांचा, कवितेचा, शब्दांचा आत्मा खणखणीत असतो असे लेखक आणि कवी ‘मला मदत करा किंवा मला मान द्या’ अशी निकृष्ट भीक मागत नाहीत! सुमार साहित्यिकांना माणूस कळत नाही – माणसांना खरं साहित्य कळत नाही अशा विचित्र, सांधा निखळलेल्या चक्रात जी ‘सुमारांची सद्दी’ चालू आहे, ती अंगावर काटा आणणारी आहे.

असो. हे सारं वास्तव रेषेरेषेच्या फरकानं डाचतं... एकिकडे सुर्व्यांच्या कवितेपेक्षा त्यांच्या ‘टोकन अस्मिते’वर व्यक्त झालेली लटकी सहानुभुती आणि दुसरीकडे बेदरकार शहरातलं कवितेचा गळा घोटणारं साहित्यिक राजकारण – पण ह्या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारणारी जिवंत कविता अशी संपत नाही. ती येतेच हट्टानं उगवून – जिथं कविता उगवेल असं कदापि वाटणं शक्य नाही तिथेही! सु्र्वेमास्तरांसारखी... उकिरड्यावरही!

Friday, September 10, 2010

ठणकतं दुःख

'हिंदू दहशतवाद' म्हटलं की स्वःताला हिंदू समजणा-या माणसाच्या मनात कितपत दुखावं? नवबौद्ध मित्रानं ब्राह्मणांना शिव्या घातल्या की ब्राह्मण घरात जन्मकर्मसंयोगाने जन्माला आलेल्या व्यक्तीनं ते स्वतःच्या अंगाला लावून घ्यावं का? कोणी कुराण जाळतो म्हणणारा बिनडोक ख्रिश्चन उपटला तर आजन्म ज्यांनी प्रोटेस्टंट ख्रिश्चनांना शिव्या घातल्या त्या कॅथलिक ख्रिश्चनांनी काय वाटवून घ्यायचं ? की आपली एक अस्मिता त्या मूर्ख, दुष्ट, दहशतवादी, क्रूर, शोषण करणा-या व्यक्ती अथवा समूहासोबत शेअर झाली आहे हे निमूट मान्य करून दुःखी व्हायचं?

काही नशीबवान व्यक्तींना स्व-श्रेष्ठगंडाची अर्थात सेल्फ- रायचसपणाची झिंग असते. त्यांना आपण जन्मतःच पॉलिटिकली करेक्ट होतो असं वाटतं. ते जन्मानं ब्राह्मण, हिंदू, दलित, उदारमतवादी आणि उरलेल्या वेळात संधिसाधू, स्त्रीवादी आणि घरी बायको = मोलकरीण ही समानता जपणारे आणि त्यात भरीत भर म्हणजे यशस्वी असतील तर त्यांना परमेश्वर कृपेनं अशा टोचण्या लागत नाहीत. त्या थोर यशस्वी समूहाला आता जरा बाजूला ठेवूयात. हा नैतिक प्रश्न ज्यांना टोचणी लागते त्यांचा आहे. माझे काही लकी डावे मित्र आणि काही 'दक्ष' हिंदूराष्ट्रवादी परिचित, काही यशस्वी व्यावसायिक, काही कॉर्पोरेट उच्चपदस्थ, काही डाव्या-कळकळग्रस्त मैत्रिणी, काही पर्पेच्युअल व्हिक्टिमाईज्ड आत्मे ही काही जात्याच दुष्ट मंडळी नाहीत. परंतु स्वःताच्या पॉलिटिकली करेक्ट असण्याकडे टीकात्मक बघण्याची त्यांची तूर्त तयारी नाही. त्यांच्या कॉन्ट्रॅडिक्शन्स त्यांना पहाव्याशा वाटत नाहीत. एलकुंचवारांच्या 'वाडा' मध्ये एक पात्र म्हणतं तसं, ' सर्वांचे हात राड्यात आहेत काहींचे कोपरापर्यंत तर काहींचे ढोपरापर्यंत' असंही त्यानां वाटतं क्वचित. सर्वच जण थोडे थोडे पॉलिटिकली इन्करेक्ट असतील तर टोचणी का बाळगा? म्हणून मग टोचणी लागणं क्रमशः निरर्थक बनत जात असावं.

त्यांना तरी का दोष द्या किंवा टार्गेट करा - माध्यमात काम करताना कधी कधी मी देखील पोझिशन घेऊन उर्मट प्रश्न विचारलेत की. माझी आयडिऑलोजिकल धारणा पक्की नाही. किंवा असं म्हणू की ती सतत प्रश्न विचारण्याच्या, स्केप्टिक भूमीवर आणि स्वतःला उद्ध्वस्त करू शकेल अशा ज्वालामुखीच्या तोंडावर रेलून उभी आहे. अशा न पक्क्या अस्मितेचा प्रश्न अधिक दुखरा होतो. दरम्यान केलेले विचारप्रणाल्यांचे निर्णय अस्मितेचा भाग बनून बसतात. आणि त्यांचा प्रतिवाद करताना कधी कधी त्यातली भगदाडं सामोरी येतात. त्याला तोंड द्यावं लागतंच. तेव्हा ते अर्धवट अस्मितेचं दुखणं अधिक अवघड. त्या पापाची स्मृती भयंकर.

माझ्या लाडका दिग्दर्शक रॉबर्ट आल्टमान याचं एक कोटेशन मला फार आवडायचं. If you do not have a leg to stand on, you can not put your foot down. पण आपण ज्या कोणत्या भूमीवर उभं राहून ठासून काही बोलायला जातो या भूमीचा पाया जर जिद्दू कृष्णमूर्तीनी आधीच कापला असेल तर पोझिशन घेतानाच तिच्या उध्वस्त होण्याची बीजंही आपण पेरली आहेत हे ध्यानात येतं. असो. तिथपर्यंत जाण्यापूर्वी शेअर केलेल्या अस्मितेकडे पुन्हा एकदा वळते.

ज्यांना 'हिंदू' म्हणून ओळख आवडते त्यांना ‘हिंदू दहशतवाद’ या कल्पनेचा राग येतो. त्यापेक्षा काकणभर अधिक राग ज्यांना 'हिंदू' अस्मिता नाकारली तरीही ज्यांना 'हिंदू' म्हणून टार्गेट केलं जातं त्यांना येतो. पण काही राजकीय नेत्यांची आपल्याला राग येत नाही हे दाखवण्यातच गुंतवणूक असते. अस्मिता ही जगण्यासाठी, सर्व्हायवलसाठी वापरलेली रणनीती असल्यामुळे त्या रणनीतीचा पाया राजकीय असतोच.

मी मराठी पण ’मनसेग्रस्त’ नव्हे, मी बाई पण काही बायांच्या ढाक भावनिक राजकारणाचा भाग नव्हे. गायत्री स्पिवॅक सारखं मग लांबलचक टिपण स्व-ओळखीला जोडावं लागतं. स्वायत्त व्यक्तिवाद जपण्याच्या मर्यादेत आपण जगण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आणि त्या तडजोडींमुळे ज्या ज्या अस्मितेच्या गटांमध्ये आपण ढकलले गेलो त्याची संगती कशी लावायची हा प्रश्न मला कायम ग्रासतो.

गांधीजींच्या राजकारणाचं महत्व इथं कळतं. शोषण करणा-याच्या मनातल्या माणसाला आवाहन करणे म्हणजे काय? ते का महत्त्वाचं आहे त्याची ताकद इथं जाणवायला लागते. अस्मितेच्या राजकारणाची संगती लागते हळूहळू.

हे सारं आठवायचं कारण म्हणजे ९/११ ची आठवण. माझी मैत्रीण फरझाना आणि मी यावर बोललो होतो. महम्मद आटा = मुस्लीम, फरझाना = मुस्लिम असं म्हणत फरझानालाही जेव्हा ९/११ नंतरच्या अमेरिकेत दहशतवादग्रस्त नजरेन तोललं जायचं त्यावेळी तेव्हा ती भडकून उठायची. फरझानच्या व्यक्तिगत आयुष्यात वैचारिक स्वातंत्र्यासाठी तिने मोजलेली किंमत ज्यांना माहीत होती त्यांना तिचा संताप समजायचा. परंतु लोंढामाध्यमं अस्मिताबाबतच्या आपल्या जाणिवा-धारणांना आकार देतात. त्यांच्या रेट्यात पहिला बळी व्यक्तिवादाचा जातो. अस्मितेच्या राजकारणात सर्वांत जास्त भरडला जातो ते स्वायत्त, एकटा लढणारा, अस्त्र ना परत्र, डक बिल्ड प्लॅटिपस- ज्याला कोणत्याच अस्मितेच्या कुशीत शांत वाटत नाही.

Friday, September 3, 2010

मोहेंजोदडो ते मोरगाव..

माझा मित्र एक गोष्ट सांगायचा. ( त्याला हजारदा ‘हे लिही’ हे सांगूनही त्यानं न लिहिल्यामुळे अजितची ही गोष्ट त्याचा कॉपीराईट मान्य करून मीच सांगणार आहे.) टीआयएफआरमध्ये ऐंशीच्या दशकात बुद्धिमान मंडळींचा फिल्म क्लब होता. आजच्यासारखे एचबीओ/सोनी पिक्स चॅनेल्स नव्हते. त्यामुळे मुंबईत इंटुक फिल्म बघायच्या तर फिल्म सोसायटी किंवा छोटा फिल्म क्लब याशिवाय गत्यंतर नव्हतं. कोणती तरी एक समांतर फिल्म बघून एका संध्याकाळी सारे टीआयएफआरच्या कॅम्पसमधून बाहेर पडत होतो. कुणी काहीच बोलत नव्हतं. नॉर्मल प्रॅक्टिस म्हणजे बाहेर पडून त्या सिनेमाचं विश्लेषण करायचं, पण फिल्म एकूणच बंपर होती. कोणी काहीच बोलेना तेव्हा अजितनं त्याच्या एका मित्राला विचारलं, “ काय रे, कशी वाटली फिल्म?” त्याच्या मित्रानं दोन मिनिटं गहन विचार केला आणि मिलियन डॉलर उत्तर दिलं, “ I have not yet decided to like it.” फिल्म आवडून घ्यायचं मी अजून ठरवलेलं नाही! मी अजितला आमच्या प्रत्येक भेटीत एकदा तरी या किश्शाची आठवण करून देते. ‘फिल्म आवडून घ्यायची हे अजून ठरवलेलं नाही ‘ हे बेष्ट उत्तर आहे. अजित तो सारा प्रसंग सांगतोही रंगवून!

‘हिंदू’ कादंबरी गाजावाजा होऊन प्रकाशित झाली, पण कोणाची वाचून झाली म्हणून प्रतिक्रिया विचारावी तर बहुतेकदा चेहरा अजितच्या मित्रासारखा होतो. ‘‘हिंदू’ आवडून घ्यायची हे अजून ठरवलेलं नाही!’ असं उत्तर चेह-यावर तरळतं. सुलभ गोष्टी चटकन आवडतात किवा त्यांच्याबद्दल चटकन प्रतिक्रिया मिळतात. पण ‘हिंदू’सारखं प्रचंड डायडॅक्टिक ऊर्फ बुद्धी-बुद्धी पुस्तक डिसमिस केलं तरी पंचाईत, नाही आवडलं तरी पंचाईत आणि आवडलं तर त्याहून! त्यामुळे एकूणच परिस्थिती कठीण.

प्रत्येक जण ‘हिंदू’बद्दल दुसरा काय म्हणतोय ते ऐकून घ्यायला उत्सुक. पूर्वी ‘ललित’ किंवा ‘मटा’तलं परीक्षण वाचून अनेक मध्यमवर्गीय मतं बनायची. पण आता ‘ललित’ मध्येही इतकी भंपक पुस्तकओळख सापडते, की ‘मानाचं पान’ ज्या लेखकांना मिळतं त्यांना दोन दिवस त्याच पानांत चेहरा लपवावासा वाटेल! त्यामुळे “‘हिंदू’ कशी वाटली”चं सध्याचं चलनातलं पॉलिटिकली करेक्ट उत्तर म्हणजे ‘वाचून संपली नाही’. सुनील तांबे वगळता अजून तरी कोणाचा ‘हिंदू’वरचा ‘टेक’ वाचण्यात आलेला नाही. (http://moklik.blogspot.com/2010/08/blog-post_26.html).

माझ्या छोट्या सॅम्पलमधलं निरीक्षण पुढीलप्रमाणे: ज्यांना ‘हिंदू’ पहिल्या झटक्यात प्रचंड आवडली, त्यांनाच कर्मधर्मसंयोगानं राजन गवसही प्रचंड आवडतात. ज्यांना रंगनाथ पठारे प्रचंड आवडतात त्यांनीही ‘हिंदू’ला पॉझिटिव्ह मार्क्स दिलेत. ‘हिंदू’त नेमाड्यांनी त्यांना शोभेशा अभिनिवेशात ‘हिंदुत्त्वा’च्या खपल्या काढल्यात, त्यामुळे ‘हिंदुत्त्ववाद्यां’नी आपली कॉपी विकत घेतली आहे, पण ते अजून मतप्रदर्शन करत नाहीत. ‘नामांतरा’च्या मुद्याचा एकूण घोळ झाल्यानं ‘पुरोगामी’ प्रतिक्रिया जरा उशीरानंच येतायत. ‘अ‍ॅडवर्ल्ड’मधला दादामाणूस नुकताच मला भेटला. ‘कोसला’वर एकेकाळी प्रेम केलेल्या पिढीतला... ‘फार मिनिमाईज करतात ते नेमाडे वाचकाला’ म्हणत त्यानं पंधरा पानांत कादंबरी बाजूला ठेवल्याचं सांगितलं. पण मराठीत पुस्तक पूर्ण न वाचताच ते ‘आवडलं’ असं ठरवलेले वाचकही असतात. त्यांपैकी एकानं मला ‘हिंदू’ पुराण सांगून ती किती आवडली ते सांगितलं होतं. अर्थात त्याच्या वेगवान आयुष्यात ‘हिंदू’ हातात घेतली=बघितली=वाचली हे गणित मला ठाऊक होतं.पण अजून, उदाहरणार्थ, ‘हिंदू’ आवडलेला आणि इतर वेळी ‘मौजे’चा वाचक असलेला माझ्या पाहण्यात नाही आला. एकूण, निर्णयनाच्या पहिल्या धारेत अजून अदमास घेणं चालू आहे...

आता, या सगळ्यांच्या टोप्या उडवल्यावर मला काय वाटलं ते वाचून सांगायची नैतिक जबाबदारी येतेच. ‘हिंदू’बद्दल दीर्घ लेख स्वतंत्रपणे लिहितच आहे. परंतु तत्पूर्वी, त्या दीर्घ लेखाअलिकडची ही काही निरीक्षणं.
पहिल्या वाचनात, मला नव्हती आवडली ‘हिंदू’. त्यावेळी पॉप्युलर प्रकाशनाच्या पी.आर.वाल्यानं वाचायला दिलेली ती कॉपी होती. मला नव्हतीच आवडली ती पहिल्या वाचनात. 'अरे, माझ्या मराठी वाचक मित्रांनो, ‘बघा कसा इंटुकडा खंडेराव मी डिजाईन केलाय ’ असा अभिनिवेश आणि त्यातले ‘स्त्रीमुक्तीवाल्या टाईप’ बायकांचे उगीचच उल्लेख – मंडी-बिंडीचं दूरस्थ अप्रूव्हल आणि परंपरेतून मुक्त स्त्री म्हणजे जणू गावची स्थानिक नगरवधू किंवा बेलाबाला असं वाचून माझं तर डोकंच फिरलं.

अ‍ॅकॅडमिक माहितीचा ताकाला तूर लागू द्यायचा नाही आणि जडजड थिअ-या बोलीभाषेत पेरून ठेवायच्या. मला ते जिगसॉ रेफरन्स शोधायचा कंटाळा आला. या दोन ओळींतले राजवाडे, त्या परिच्छेदातला कार्ल अर्न्स्ट किंवा ते स.शि. भावे किंवा त्या तुकड्यातला फुको असं नोंदवताना वात आला. पण एखादा प्रचंड अ‍ॅटिट्युडवाला ओळखीचा माणूस दुस-या भेटीत गप्पा मारताना खुलावा, आणि आधीच्या तुसडेपणाचे अवशेष शिल्लक ठेवूनही दुस-या भेटीत त्याच्याशी सुरेख संवाद साधला जावा आणि त्या संवादात त्यानं त्याचे प्रयोग खुलवून सांगावेत तसं झालं माझं ‘हिंदू’ नीटस, गोमटी प्रत बनून हातात पडली तेव्हा.

त्यानंतर मला दुस-या वाचण्यात ‘हिंदू’ आवडली, आक्षेपांसहित आवडली. मनापासून. प्रत्येक वाचणेच्छुक व्यक्तीला ‘पहिली पंधरा पानं प्लीज वाचा आणि हातातून खाली ठेवू नका’ असं बजावून सांगितलं मी. कारण शीण त्या पहिल्या पंधरा पानांचा येतोच न चुकता. त्यानंतर त्या कादंबरीला आलेली ग्रिप बघून भारावून गेले. पहिले दोन चॅप्टर्स हे मास्टरपीस आहेत. उत्कृष्ट लेखन कसं असावं, कादंबरीनं कसं असावं या क्राफ्टसमनशिपचा अप्रतिम वस्तुपाठ. तिसरं-चौथं प्रकरण मला तुकड्यांत आवडलं. पाचवं आणि सहावं पुन्हा अप्रतिम. ‘प्रचंड अडगळ’ मधल्या प्रकरणात काहीशी मूळ धाग्याला कसर लावणारी. ही कादंबरी म्हणजे दक्षिण आशियातल्या मनाचा बृह्दपट. नशिबानं त्याचं केंद्र ‘मोरगाव’ असल्यानं हा मराठी विश्वाचा भाग बनतो.

‘खंडेराव’ पहिल्या दोन प्रकरणांनंतर अंगावर येत नाही. पहिल्या दोन प्रकरणांत तो आहे तसा टोकदारही राहत नाही. नंतर अस्ताव्यस्त पसरतो. त्याची स्वत:च्या आतल्या गृहितकांवर भक्कन उजेड टाकायची त्याची क्षमताही कमी होते. कधी कधी प्रेडिक्टेबल वागतो तो. पण हिंडून-फिरून परत येतो तो बापापाशी, परत त्या जैविक नाळेपाशी. सा-या इण्टेन्स बायकांच्या आयुष्यांची प्रचंड बारकाव्यांनीशी उभी कलेली चित्रं घेऊन परत येतो तो बापाच्या मरणाशी. घोडा घेऊन रानोमाळ भटकून आलेला खंडेराव शेवटी मोरगावच्या विटेवर जो विठ्ठल उभा आहे; त्या विटेपाशी येतोच, हडबडत.
एका ब्लॉगवर लिहून संपेल असा हा ‘खंडेराव’ नाही. मात्र ‘हिंदू’ मला दुस-या वाचनात ‘चसका’ लावेल इतकी आवडली. भावात्मक बुद्धी आणि खोल घुसण्याची किमया जशी ‘पांडुरंग सांगवीकर’कडे आहे तशी ती ‘खंडेरावा’कडे नाही, तरीही. खंडेरावाला लेखकाच्या अभिनिवेशाची कसर लागली आहे. जिथे जिथे नेमाड्यांचं राजकारण ‘खंडेरावा’ला डसतं तिथं तिथं तो आपली इण्टेन्सिटी गमावून बसतो, तरीही.
खंडेरावाचा उत्तर तरूणाईतला नॉन सेक्शुअल कारेपणा आकर्षक वाटत नाही, जसा चांगदेवाचा वाटला होता. कुटुंबाच्या राजकारणाला आणि नात्यांच्या ‘वस्तू’ होत जाण्याला जवळून पाहिल्यामुळे खंडेरावानं सेक्स वगळून दाखवलेलं नातलगबाज कुटुंब मर्यादेपर्यंत ठीक वाटतं. पण त्यातून या भूमीची दांभिक घडी उलगडत जाते. वाचून तंद्री लागेल अशी ही कादंबरी नाही, पण वाचायलाच हवी अशी आहे.
एक छोटी कळ सांगते. मेघना पेठेच्या ‘नातिचरामि’त जसं बारीकीचं काम आहे, तसं बायकांना मांडताना बारीकीचं काम केलं आहे, ‘हिंदू’मध्ये. त्या बायांनी मला वेड लावलंय; खंडेरावाहून जास्त. हा नेमाडे - ‘नातिचरामि’ दुवा पण तपासण्यायोग्यच आहे.

दोन्ही पाय उचलून जर खंडेराव कुदला असता तर अल्बेर काम्यूच्या बिनबुडाच्या ‘फॉल’ गर्तेत कोसळला असता. पण तो एक पाय मोरगावच्या मातीत रोवून फिरलाय. जगभर गेला तरी अस्मितेच्या नाळेचा लगाम त्याच्या मानेत गच्चं बसलाय. मोहेंजोदडो ते मोरगाव असा आहे त्या नाळेचा व्यास. पण त्या अस्मिताग्रस्त नाळेमुळेच राजकीय म्हणून काहीशी कमअस्सलही होते हिंदूची धार. त्या नाळेचा अस्मिताग्रस्त पीळ ‘हिंदू’ची अ‍ॅकिलसची टाच आहे. पण त्या दुबळ्या दुव्यामुळेच तर कादंबरीची ओळख ‘हिंदू’ अशी होते. ‘कोसला’पेक्षा पूर्ण नामानिराळी!

Thursday, September 2, 2010

तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या – त्यातूनही इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या
कानाखाली सणसणीत आवाज काढणारे दोन तास म्हणजे ‘पीपली लाईव्ह’!
मिडियाबद्दल लोकबुद्धीला ठाऊक असलेल्या गोष्टी प्रत्ययकारी पद्धतीने
मध्यमवर्गापर्यंत थेट पोचवण्याची देखणी व्हिज्युअल किमया अनुशा रिझवीनं
केली. मेनस्ट्रीम सिनेमा जसा असावा असं वाटतं तसा सुंदर सिनेमा
बघितल्याचा आनंद ‘पीपली लाईव्ह’नं दिला आणि मी इलेक्ट्रॉनिक माध्यमात
नुकतीच दोन वर्षं काढलेली असल्यामुळे त्यातल्या कित्येक गोष्टी
भावल्या-आवडल्या-पटल्या.

टोकाचा उपहास-त्यातून उलगडणारी पीपली गावातल्या नत्थाची ही कथा.
त्यातल्या गावाचं नाव ‘पीपली’ तर नायक ऐरा गैरा नत्थू खैरा – सिनेमाची
व्हिज्युअल बांधणी उत्कृष्ट आहे, तसंच त्यातले भेदक संवादही. आत्महत्या
करून का होईना कुटुंबाचं पोषण करू शकू असं वाटणारा नत्थू, शेवटी त्या
कुटुंबाला पारखा होतो आणि दरम्यान गावातला ‘जनमोर्चा’ या वर्तमानपत्राचा
रिपोर्टर-स्ट्रिंगर राकेश या बातमीतल्या वेदनेचा परिपाक म्हणून ख-या
पत्रकारितेचा मृत्यू भोगतो. 'माणसाविषयी कणव आणि बातमी देण्याची धडपड – या
दोन्हींत माणसापेक्षा बातमी श्रेष्ठ! असं तुला वाटत नसेल तर पत्रकारिता
सोड' असं राकेशला सांगणारी महत्त्वाकांक्षी अँकर रिपोर्टर ‘पीपली
लाईव्ह’मध्ये भेटते.


सत्य आणि स्टिरिओटाईप यांमध्ये फरक काय? तर स्टिरिओटाईप म्हणजे अर्धसत्य;
असं अर्धसत्य, की जे पूर्णसत्य आहे असा क्लेम करतं. ‘पीपली लाईव्ह’नं
अनेक स्टिरिओटाईप्स समोर मांडलेत. सेकंड फ्लश दार्जिलिंग टी पिणारा आयएएस
ऑफिसर, नत्थूकार्डाची घोषणा करणारा कृषिमंत्री सलीम, बरखासदृश
संवेदनशीलतेनं बातमीपाठीमागे धावणारी न्यूज अँकर, हिंदी चॅनेलमधला नफ्फट
रिजनल रिपोर्टर.... सारे साचे ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटतात. ‘स्टोरी’ घडते
एका मृत्यूबद्दल आणि त्या मृत्यूचं ‘लाईव्ह’ थैमान अनुशा रिझवीनं
कॅमे-यात पकडलंय. मात्र हे अर्धसत्य साचे तिनं काही क्षणांना
पूर्णसत्याकडे ढकललेत. तो तिचा जिनियस आहे.

हा चित्रपट केवळ शेतक-यांच्या आत्महत्या या विषयावरचा नाही. हा विषय
माणुसकीचा मृत्यू अनेक थऱांवर होत असताना आपण तो कंझ्युम कसा करतो
याबद्दलचा आहे आणि तो आपण ‘मेणबत्ती संवेदनशीलते’नं रिचवत असताना,
दरम्यान, माध्यमं त्या अर्धमेल्या माणुसकीला पूर्ण ठार कशी करतात या
प्रक्रियेवर ‘पीपली लाईव्ह’ भाष्य करतो.

माध्यमांचा वसाहतवाद, त्यातल्या सुमारांची सद्दी, दररोजच्या घडामोडींमुळे
आलेला बधीरपणा, टीआरपीचा बिनडोक खेळ आणि त्याचा वापर करणारे निर्ढावलेले
राजकारणी... ‘पीपली लाईव्ह’नं हे सारं वास्तव एकत्र पॅकेज केलं आहे.


यातल्या माध्यमांच्या क्रिटिककडे बघण्यापूर्वी दोन गोष्टींबद्दल
सांगितलंच पाहिजे. एक म्हणजे या सिनेमातलं अप्रतिम कॅमेरावर्क. ते
गोंधळलेपणाला, स्वप्नांना, आक्रमणांना, संतापाला सामावून घेतं. अनुशानं
कॅमे-याचा डोळा यातल्या उपहासावर रोखलाय. हे ‘वास्तव’ नाही – ही
‘कलाकृती’ आहे याचं भान असल्यामुळे कलाकृतीला आवश्यक व्हिज्युअल शिस्त
आणि सौंदर्य, दोन्ही या चित्रपटानं सांभाळलंय. त्याचबरोबर अतिशय म्हणजे
अतिशय नीटस, आर्त संगीत. हॅटस् ऑफ टु इंडियन ओशन. जर बॉलिवूड ही आमची
खरीखुरी भारतीय आधुनिक लोककला असेल तर ‘पीपली लाईव्ह’नं भारतीय लोककलेची
सारी मूल्यं सांभाळली आहेत. दशावतारात जसे उपहासानं विनोदाकडे नेणारे
कॅरॅक्टरचे साचे भेटतात तसेच साचे ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटतात. स्वेटर
घातलेल्या बक-याला रात्रीच्या सन्नाट्यात मिठीत घेणारा नत्थू, त्याचा
थोरला भाऊ, संसाराला कळंजलेली पॉवरफुल- व्यवहारी सून, मिडिया-नॉईजला पारखा झालेला भुकेकंगाल होरी, ‘पीपली लाईव्ह’ मधल्या भूमिका आणि त्यांच्या नात्यातून निर्माण होणारं सबटेक्स्ट यांचा समतोल साधून –‘पीपली लाईव्ह’ जिवंत होतो.

चोवीस तास (२४X७) बातम्या हीच ग्लोबल भारताची बिमारी आहे असं शेवटी वाटू
लागतं. बातमी खेचा, ओढा, डेव्हलप करा-वाढवा, मोठी करा, पिटत राहा हेच खरं
दुखणं आहे. अशा बातमीचं वस्त्रहरण होतं, त्यानं माणसं भरडली जातात. या
सा-या इलेक्ट्रॉनिक कच-यातून निर्माण होणा-या चिरफाडीची जबाबदारी कोणाची?
न्यूज चॅनेलच्या भडकपणाला डोळ्यांच्या बाहुल्या चिकटवणा-या मध्यमवर्गाची,
की ती न्यूज तशा भडकपणे दाखवणा-या स्पर्धात्मक चॅनेल्सची, की
माध्यमांच्या उथळपणानं ज्यांना फायदा होतो अशा निगरगट्ट राजकारण्यांची?
कोणाच्या मूर्खपणाची ही सारी किंमत विचार करणारी मनं भरत असतात?

‘पीपली लाईव्ह’नं मला माझ्या दोन वर्षांचा जाबजबाब विचारला. मी इंग्रजी
आणि हिंदी चॅनेलपेक्षा कित्येक पटींनी ब-या/उजव्या चॅनेलमध्ये काम केलं,
तरीही या माध्यमाच्याच काही मर्यादा आहेत आणि दुसरं म्हणजे या माध्यमाला
कसं ‘कंझ्युम’ करायचं हे अजूनही आपण जाणत नाही. कोणतंच माध्यम प्रश्न
सोडवत नाही; ते फक्त प्रश्न मांडतं. त्या प्रश्नाभोवती लोकांची चळवळ उभी
राहिली, तरच प्रश्न सुटतात. मात्र हल्ली अनेकांना वाटतं, की ‘रस्त्यात
खड्डे आहेत’ इथपासून ते ‘मला अन्यायानं नोकरीतून काढून टाकलं’ इथपर्यंत
सर्व प्रश्न न्यूज चॅनेल सोडवू शकतात. चॅनेलवाल्यांनाही ही समजूत करून
द्यायला आवडतं आणि चळवळ करू न इच्छिणा-या थंड समाजाला असा पॅसिव्ह
अँक्टिव्हिजम आयताच हाती सापडतो. ‘माध्यमं’ प्रश्न सोडवायला जन्माला
आलेली नाहीत. विशेषत:, न्यूज चॅनेल्स बातम्या देण्याचा 'व्यवसाय' नफा कमावण्यासाठी करतात.
प्रश्न सोडवणं हा त्यांचा KRA नाही. व्यवसायाला आवश्यक तेवढ्या
बातम्यांचा ते पाठपुरावा करतात. त्यातून काही वेळा काही प्रश्न
सुटतात/सुटल्यासारखे वाटतात-मात्र ते त्यांचं कंद काम नाही.
प्रश्न सोडवणं हे नागरिकांचंच काम आहे. पण जागतिकीकरणात नागरिक राहिलेत कुठे? इथे फक्त
‘कंझ्युमर’ जन्माला येतायत.

सवयीनं प्राईमटाईम, ब्रेकिंग न्यूज बघणारे मध्यमवर्गीय
‘पीपली लाईव्ह’ बघायला तिकिट काढून जातात. पॉपकॉर्न खात, कोकचा घोट घेत,
थंड काळ्या शांततेत चित्रपट सुरू होतो आणि पहिल्याच, ओपनिंग सीनमध्ये
नत्थाला उलटी होते. करमणुकीच्या आशेनं आलेल्या मध्यमवर्गीय
न्यूज-चॅनेलच्या ग्राहकाला पहिली भेटते ती नत्थाची कडुजहर उलटी... आणि मग
अनुशाच्या दिग्दर्शक म्हणून तिनं केलेल्या खेळाची सुरूवात होते. यात
जीवनदर्शन नाही. यात ‘ब्रेख्त’च्या नाटकासारखं, तीन पैशांच्या तमाशातून
दाहक वास्तवाकडे बघताना अंतर्मुख करणारं मटेरिअल आहे. ‘बघणं’, ‘कंझ्युम
करणं’ हीच या मध्यमवर्गाची कृती असेल तर पुढच्या वेळी चॅनेल सर्फ
करताना, त्या बटणांशी खेळताना, त्या आक्रस्ताळ्या आवाजातल्या ब्रेकिंग
न्यूज ऐकताना, ते टीआरपीग्रस्त कार्यक्रम बघताना – आपल्या डोळ्यांना जाग
येईल इतपत ‘चळवळ’ हा सिनेमा करतो. म्हणून तो महत्त्वाचा आहे.

वास्तववादानं ग्रासून, ‘षंढ असणं/कंझ्युमर असणं किती बरं?’ असं मानणा-या
मध्यमवर्गाला निदान थोडं तरी भानावर आणतो हा ‘पीपली लाईव्ह’! त्यातल्या
पत्रकारितेतल्या माणूसपणाच्या ऑनस्क्रीन मृत्यूनं निदान एवढं जरी शिकवलं
आपल्याला तरी अनुशा रिझवी जिंकली असंच म्हणावं लागेल!

Thursday, August 19, 2010

इतिहासाचं अवघड ओझं

मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं होतं. अ‍ॅन फ्रॅंकची डायरी असो किंवा जी.ए. कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेलं ओल्गा ल्योगेलचं ‘रात्र वै-याची आहे’ असो, जर्मनीतल्या छळछावण्यांतल्या यातनांचं डॉक्युमेंटेशन आपणांस भेटतं – अंगावर काटा आणतं.


व्हिक्टर फ्रॅंकेलचं ‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’ हे माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आयुष्यात कोसळून जाण्याचे जेव्हा जेव्हा क्षण आले - तेव्हा तेव्हा या पुस्तकानं मला सावरलं. जगण्याचा अन्वय लावत, ‘अर्थ’ शोधणा-या डॉ. फ्रॅंकेलनं मला प्रत्येक ठेचेसमोर मोठी रेष काढायला ऊर्जा दिली. डॉ. फ्रॅंकेलं हे नावाजलेले मानसोपचारतज्ञ – त्यांची नाझी छळछावणीत रवानगी झाली. त्या क्षणापासून ते शेवटी युद्धाच्या टोकाला काही छळछावण्यांत माणसं अन्नाच्या अभावानं एकमेकांना खाऊ लागली या टोकाच्या वास्तवापर्यंत प्रत्येक क्षणाला डॉ. फ्रॅंकेल यांनी नोंदवलं आहे. ‘माणूसपण’ मारून टाकण्याच्या प्रत्येक नाझी-प्रयत्नाला त्यांनी आपलं ‘अर्थ’ शोधणारं मन कसं जिवंत ठेवलं याची नोंद म्हणजे ‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’.‘हॉलोकास्ट’मध्ये फक्त ज्यू नव्हे तर ज्यांना ‘जिप्सी’ म्हणून ओळखलं जातं ते रोमान, कॅथलिक, गे, लेस्बियन अशा जवळ जवळ अकरा दक्षलक्ष व्यक्तींचं शिरकाण करण्यात आलं. लहान मुलं, स्त्रिया, पुरूष, अपंग, आजारी – कोणाला म्हणजे कोणालाही यातून निसटता आलं नाही. आऊशवित्झ आणि दखाऊच्या छावण्यांत दाखल झालेल्या सुरूवातीच्या ज्यूंना आपल्याला मारून टाकणार आहेत याची तर कल्पनादेखील नव्हती. स्पिलबर्गचा ‘शिंडलर्स लिस्ट’ किंवा त्याहून अंगावर काटा आणणारा अलॉं रेनेचा ‘नाईट अ‍ॅण्ड फॉग’ पाहिल्यावर या क्रौर्याच्या अमानवी मिती डोळ्यांसमोर येतात. अ‍ॅडॉल्फ हिटलर नावाचा क्रूर माणूस या सा-या हत्याकांडाच्या पाठीमागे होता – ‘माणूस’ म्हणून त्याची गणती तरी कशी करायची? असा प्रश्न पडतो. काय करायचं अशा वांशिक विद्वेषानं भरलेल्या इतिहासाचं? काय शिकणार आपण त्यातून?


१९७६ मध्ये अमेरिकेतल्या बॉस्टनमध्ये दोन शाळाशिक्षकांनी यातून येणा-या पिढ्यांना नवीन धडा शिकवायचा असं ठरवलं आणि त्यातून जवळ जवळ एकोणीस लाख विद्यार्थ्यांना ‘माणूसपणा’ची ओळख करून देणा-या ‘फेसिंग हिस्ट्री अ‍ॅण्ड अवरसेल्व्हज’ या कोर्सची निर्मिती झाली. त्या दोन शाळा-शिक्षकांपैकी एक जण होती मार्गो स्टर्न स्टॉर्म. ती अजूनही या नॉनप्रॉफिट संस्थेची कार्यकारी संचालक आहे. हॉलोकास्टच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना वंशवाद, वांशिक हत्याकांड, हिंसा याबद्दल जागरूक करायचं हे त्यांचं ध्येय आहे. जागं करणारा ज्ञानाचा क्षण कसं परिवर्तन घडवून आणू शकतो हे पाहायचं तर ‘फेसिंग हिस्टरी…’च्या प्रकल्पाकडे पाहावं लागतं. काय आहे हा प्रकल्प?‘इतिहासाला आणि स्वत:ला सामोरं जाताना’ हे या प्रकल्पाचं नाव आहे. त्याच्या केंद्रस्थानी आहे त्यांचं एक हॅण्डबुक. हॉलोकास्टमध्ये जे घडलं ते घडण्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती, इतिहास, जातीय विद्वेषाची कारणं या सा-या इतिहासासकट मुलांच्या शिक्षणाला सुरूवात होते. पण फक्त इतिहास शिकणे या टप्प्यावर हा प्रकल्प थांबत नाही. तर एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो अशा वातावरणात? असा प्रश्नही विचारला जातो. आपली अस्मिता कशी बनते? आपण जे आपल्यासारखे नाहीत त्यांचा द्वेष का करतो? या द्वेषाची पाळंमुळं आपल्या अस्मितेशी निगडित भयामध्ये कशी असतात? हॅण्डबुकच्या प्रत्येक पानावर वाचणा-या विद्यार्थ्यांला त्या इतिहासाशी आणि त्या इतिहासातून वर्तमानाशी कसं जोडायचं? याचे धडे मार्गोनं आणि त्यांच्या टीमनं तयार केले आहेत.मी याचं प्रात्यक्षिक पाहायला गेले न्यू यॉर्कच्या ‘फेसिंग हिस्टरी’च्या शाळेत. वर्ग चालू होता. वर्गशिक्षिकेनं मला आत बसायची परवानगी दिली. सातवी-आठवीतली मुलं वंशवादाला प्रश्न करत होती. एक विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणाला, “सगळे स्कूल टिचर्स डिमोक्रॅट्संना का मत देतात?” मग रिपब्लिकन-डिमोक्रॅट यांच्या वेगवेगळ्या धोरणांवर मुलं बोलायला लागली. धडा चालू होता जर्मन राजकीय पक्षांबद्दल. पण मग चर्चा अमेरिकेपर्यंत आलीच ओघानं. दोन देशांतल्या पक्षीय राजकारणाच्या तुलनेपासून ते अमेरिकन वंशवादापर्यंत अनेक विषयांवर त्या मुलांचा गट तावतावानं बोलत होता. सारे विद्यार्थी न्यू यॉर्कच्या ‘इनरसिटी’ म्हणजे शहरातल्या श्रमिक वस्तीतले होते. दुस-या साहित्याच्या वर्गात नववीचा वर्ग शेक्सपीयरच्या ‘ऑथेल्लो’वर चर्चा करत होता. ते नाटक बसवणार होते आणि त्या वर्गात ऑथेल्लोच्या ‘मूर’ अस्मितेवर विद्यार्थी वाद घालत होते.तिस-या तासाला, मी मुद्दामहून सायन्स क्लासमध्ये गेले. जीवशास्त्राचे बेसिक धडे, डीएनए- गुणसूत्रे शिकताना – सायन्स टिचरनं ‘युजेनिक्स आणि त्याचा हॉलोकास्टमधला वापर’ यावर छोटं प्रेझेंटेशन दिलं. मुलांनी शास्त्राची नाळ समाजापर्यंत कशी जोडली जाते यावर वर्गात चर्चा केली.हिटलरला वेडा, राक्षस, अतिरेकी, अघोरी माणूस असं संबोधलं, की नाझी अत्याचार समजून घेता येत नाही. पण त्यानंही ‘माणूस’ म्हणूनच हे शिरकाण केलं हे तपासायचं ठरवलं, की माणूसपणाच्या आणि प्रतिकाराच्या शक्यता तपासता येतात. ज्या प्रत्येकानं हिटलरचे आदेश पाळण्यापासून ते त्याला निमूटपणे समर्थन देण्यापर्यंत भूमिका निभावल्या, त्या प्रत्येक भूमिकेची चिरफाड मुलं करु शकत होती. हॉलोकास्टचा अनभुव केंद्रस्थानी ठेवून त्यातून काय शिकायचं? काय बदलायचं? कसं बदलायचं? अस्मितेच्या राजकारणाचे तोटे का होतात? या सा-या सामाजिक/राजकीय प्रश्नांना आठवी-नववीतली मुलं सामोरी जात होती. इतर अभ्यासक्रम होताच, परंतु त्या सर्व अभ्यासक्रमाकडे बघताना – परत कधीही हॉलोकास्ट होऊ द्यायचं नसेल तर नागरिकांची भावी पिढी कशी घडवायला हवी याचं भान शिक्षकांकडे होतं.अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या इतिहासाच्या शिक्षकांसाठी ‘फेसिंग हिस्टरी...’ शिबिर घेते. रवांडा या देशात हुतु आणि तुत्सी जमातींत दंगे होऊन त्याचं पर्यवसान वंशविच्छेदात झालं. पण त्यानंतर रवांडातल्या शाळांना प्रश्न पडला, की इथं ‘इतिहास’ कसा शिकवायचा ? तेव्हा ‘फेसिंग हिस्टरी...’ ला पाचारण करण्यात आलं. वांशिक दंगलीनंतरच्या रवांडात ‘फेसिंग हिस्टरी’नं त्या वांशिक दंग्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळेचे अभ्यासक्रम आखले. मुलांना जबाबदारीचं, माणूसपणाचं भान देत ते शिकवले. तुम्ही ‘फेसिंग हिस्टरी’च्या वेबसाईटवर गेलात तर जगभरातल्या घडामोडींवर तिथं शिक्षकांना – विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असं अभ्यासपूर्ण मटेरिअल भेटतं. ‘२६/११ नंतर मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यांना कसं समजून घ्यायचं?’ हे शिकवणारा धडाही ‘फेसिंग हिस्टरी’च्या वेबसाईटवर आला होता. आपल्याकडच्या शाळांतूनही असे प्रकल्प राबवायला हवेत असं मनात नेहमीच वाटतं.इतिहासाकडे सत्तेचं/घडामोडीचं डॉक्युमेंटेशन असं केवळ न बघता – शास्त्रीय ते सामाजिक सर्वच परिवर्तनात घेतलेल्या निवडींचा, निर्णयांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवण्याची ‘फेसिंग हिस्टरी’ची पद्धत अत्यंत लक्षणीय आहे.भारतातल्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना काय होईल आपण फाळणीचा इतिहास नीट उलगडून दाखवला तर! जर त्यांनी दीपा मेहतांचा ‘अर्थ’ किंवा ‘ट्रेन टु पाकिस्तान’ पाहिला, गांधीजींच्या नौखालीतल्या दैनंदिनीतली काही पानं वाचली, मुंबईतल्या मोहल्ल्यांची निर्मिती समजून घेतली आणि आपल्याला टोचणा-या निरगाठी न सुटलेल्या इतिहासाकडे बघितलं तर आपण अधिक खुल्या मनाचे नागरिक नाही का तयार करू शकणार? टोबा टेकसिंग बघून नववीतले विद्यार्थी भारतीय जातीयवादाकडं नव्या नजरेनं बघतीलच की नाही ? की जाऊन नंतर दंगलीत दगड मारतील?खूप वर्षांपासून एक प्रकल्प माझ्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या एकोणिसशेबहात्तरच्या दुष्काळाचं डॉक्युमेंटेशन करून, त्यातून महाराष्ट्रातल्या जातीयतेबद्दल विद्यार्थ्यांशी नीट खुलेपणानं बोलायचं, असा. त्यात बहात्तरमध्ये मुंबई माटुंगा लेबर कॅम्प, गोवंडीत माणसं कुठून आली? यावर एक धडा असेल. डॉ. मुकुंदराव घारे, डॉ. तात्याराव लहाने यांसारख्यांसोबतचे संवाद, युक्रांदमधल्या कार्यकर्त्यांचं लेखन, कॉम्रेड प्रभाकर संझगिरींच्या घरी पाहिलेले दुष्काळाचे फोटो, मिशन-यांचं महाराष्ट्रातलं बहात्तरचं काम- हे सारं विद्यार्थी बघतील , शिकतील. या काळाचा अभ्यास करताना बहात्तरच्या दुष्काळानं महाराष्ट्रातली कार्यकर्त्यांची फळी घडवली हे लक्षात येतं. आधुनिक महाराष्ट्राच्या पाठीशी बहात्तरचा हा दुष्काळ उभा आहे. यातून माणसं घडली, चळवळी उभ्या राहिल्या, गावागावातली जातीयता उघड झाली. आपले विद्यार्थी कुठलं परदेशी मर्टन, पार्सन्सचं समाजशास्त्र शिकतात? का नाही आपण निर्माण करू शकत या दुष्काळासोबत एक समाजशास्त्रीय अभ्यासक्रम? महाराष्ट्राचं एक देशी समाजशास्त्राचं पुस्तक नाही का तयार करता येणार आपल्याला? इतिहासाकडून फक्त भडकावणारा, अर्धवट ज्ञानावर आधारलेला भाषावाद स्वीकारून छोट्या युवराजांना शरण जायचं की इतिहास घडवण्याची आपली जबाबदारी ओळखून मानवी मूल्यांना जपण्याची इच्छा बाळगायची? यावर करू दे ना विद्यार्थ्यांना विचार! नव्यानं जग बघणाऱ्या

विद्यार्थ्यांना बहात्तरचा दुष्काळ जे शिकवेल, ते या भूमीत रुजलेलं शिक्षण असेल ना ?


हॉलोकास्टकडून, गुजरातच्या दंगलीकडून, बहात्तरच्या दुष्काळाकडून, फाळणीकडून शिकण्यासारखं अगाध आहे. आपल्या समाजाबद्दल, तसंच आपल्या स्वत:च्या धारणांबद्दलही. ‘फेसिंग हिस्टरी’च्या प्रकल्पानं हे सारं कसं शिकवता येईल याचं एक मॉडेल बनवलंय. याचं कलम मराठी भूमीत व्हायला हवं. मग इतिहासाचं ओझं कशाला अवघड वाटेल?

Friday, August 13, 2010

जात : परदेशस्थ

परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता माणूस कुठल्या परदेशात का गेला? याचं तर्कशास्त्र आपण शोधून काढू शकतो.

कॅलिफोर्नियामध्ये जंगलं तोडून राहणेबल जागा बनवण्यासाठी सरदारजींना मोठ्या प्रमाणात नेण्यात आलं होतं. एकोणिसाव्या शतकात, कष्ट करणा-या रोबस्ट माणसांना इंग्रजांनी जंगलतोडीच्या कामावर अक्षरश: विकलं. फक्त पंजाबी पुरूषांना नेल्यामुळं अर्थात त्यांनी तिथल्या बायकांशी लग्नं केली. त्या स्त्रियाही कष्टकरी वर्गातल्या हिस्पॅनिक्स होत्या. मेक्सिकोतून आलेल्या त्या लॅटिन अमेरिकन स्त्रिया आणि सरदारजी यांनी मग ‘कॅलिफोर्निया’मध्ये आपली नवी कुटुंबं वसवली. या ‘मेक्सिडूं’चा ( मेक्सिकन+हिंदू) अभ्यास करणारा एकजण मला जेव्हा भेटला तेव्हा ‘हिंदू’ म्हणून सामावलेले सरदारजी आणि लॅटिन अमेरिकन स्त्रिया यांचं स्थलांतरानं लादलेलं साहचर्य आणि त्यातून उलगडणारी NRI अस्मितेची एक घडी नजरेसमोर आली.

युगांडातून इदी अमीनच्या राजवटीत परागंदा झालेले ‘मिसिसिपी मसाला’ पटेल, अमेरिकेनं व्हिसा डॉक्टर्स, इंजिनीयर्सना साठच्या दशकात खुला केल्यावर पहिल्या फळीतले अमेरिकावासी प्रोफेशनल, Y2K च्या जमान्यात H1 च्या जोरावर लोंढ्यानं अमेरिकेत आलेले आयटीवाले किंवा पश्चिम आशियात पैसे कमावायला गेलेल्या NRIची अमेरिकेत शिकणारी अंडरग्रॅज्युएट पिढी. अमेरिकन NRI म्हटलं, की हे सारे समूह झरझर नजरेसमोर येतात. जगभरच्या भारतीय वंशाच्या NRIबद्दल समान पद्धतीनं लसावि काढून बोलणं योग्य नाही. मात्र
‘मौजे अमेरिकेतले NRI’ हा गट अभ्यासण्याजोगा आहे. अनिल अवचटांनी एकेकाळी केला तसा डिसमिस करण्याजोगा निश्चितच नाही.

साठच्या दशकात, ६८-६९ मध्ये जेव्हा अमेरिकेनं डॉक्टर्स आणि इंजिनीयर्ससाठी व्हिसा खुला केला तेव्हा अनेक प्रोफेशनल्स, आयआयटीयन्स अमेरिकेत गेले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर त्या अगोदर डॉ. केतकर, डॉ. आनंदीबाई जोशी किंवा मराठी नसूनही मराठी माणसाच्या स्मृतीत घट्ट रूतून बसलेले १८८५ सालच्या जागतिक धर्म परिषदेस गेलेले विवेकानंद ही काही उदाहरणं नजरेसमोर येतात.

माझ्या थिसिससाठी डॉ. केतकरांच्या भाषाविषयक विचारांचा विचार करत असताना त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्याबाबतही माहिती हाती येत गेली. पैसे नसल्यामुळे बटाट्याच्या शेतात काम करून दिवसाला दोन डॉलर्स कमावून काढलेले कष्टाचे दिवस किंवा कॉर्नेल विद्यापीठात असताना कडाक्याच्या अपस्टेट न्यू यॉर्कच्या मरणाच्या थंडीत हीटिंग उपलब्ध असलेल्या सिनेमागृहात काढलेले तासन‍्तास याबद्दल समजलं. त्या काळात अमेरिकेत अनेक हुन्नरी लोकांनी छलांग मारली. डॉ. केतकर मात्र त्यांच्या ध्येयानं प्रेरित होऊन अमेरिकेत आले होते. भारतात परत येताना जहाजावर त्यांची डॉ. अचिंत्य लक्ष्मीपती यांच्याशी गाठ पडली ‘भाषिक राज्याच्या’ कल्पनेवर त्या दोघांचंही एकमत झालं अशा नोंदी आहेत.

प्रत्येक स्थलांतरित, विस्थापित किंवा सेटल झालेला समाज आपल्या अनुभव, स्मृती आणि सत्तेची समीकरणं यांतून उतरंडीची एक रचना मनातल्या मनात निर्माण करतो. मी या ‘सत्ताकेंद्री’ रचनेला नवी वर्गव्यवस्था न मानता भारतीय गुणदोषांसकट वर्गव्यवस्थेबरोबरच रेप्लिकेट होणारी जातिव्यवस्था म्हणून बघते. उदाहरणार्थ, सत्तरच्या दशकात आलेल्या पिट्सबर्गच्या वेंकट अंकलना नव्वदच्या दशकात आलेल्या H1 आयटीवाल्यांचा नॉशिया येतो. त्यांची ABD म्हणजे अमेरिकेत जन्माला आलेली ‘देशी’ मुलं आता ३०-४० च्या वयोगटात आहेत तो भारतीयांचा एक ‘जातसमूह’ आहे. डॉ केतकरांनी वर्णन केल्याप्रमाणं या ‘प्रोफेशनल आद्य सिटिझन’ जातसमूहात लग्नसंबंध जुळतात आणि त्यांचे विचार/स्वयंपाकाबद्दलची बायकांची मते इत्यादी गोष्टींत साम्य आढळतं. H1 व्हिसावरचा ‘गुलटी’ म्हणजे आंध्रप्रदेशातला इंजिनीयर मुलगा आणि या आद्य सिटिझन समुहातला - ज्याचे आईवडील आंध्रातून आले यांचा ABD मुलगा यांच्यात जमीनअस्मानाचं अंतर असतं. मात्र तेलगू ABD आणि गुजराथी ABD आनंदानं नांदू शकतील इतका सारखेपणा दुस-या पिढीत दिसून येतो. भारतीय भाषा/राज्य यांच्या मावळणा-या प्रभावाच्या छायेत ही दुसरी पिढी वाढलेली असते. ती अधिक मनापासून अमेरिकन असते.

या आद्य सिटिझन समूहानं अमेरिकेत आल्यावर ‘अमेरिकन’ व्हायचा प्रयत्न मनोमन केला. यांच्या अम्मांनी इकडं पहिल्यांदा ट्राऊझर्स घालून इंग्रजी बोलण्याचा सराव केला. काही उच्चशिक्षित आंटी इथं ग्रंथपाल किंवा तत्सम सरकारी नोक-यांत लागल्या. न्यूजर्सीत ‘न्यूवर्क’मधल्या डॉट-बस्टर्सच्या गुंडगिरीचा दुर्दैवी अनुभवही यांतल्या काही मंडळींनी घेतला. व्हाया ब्रिटन अमेरिकेत आलेल्या पटेलांनी एडिसन, क्वीन्स मध्ये ‘लिटल इंडिया’ स्थापन केलं. तिथं या आद्य समूहानं आपली नाळ जोडली.

मात्र नंतरचे H1 वर आलेले दुस-या फळीतले सिटिझन्स... यांचा समूह अमेरिकेतही वेचून वेगळा काढता येतो. हार्वर्डची कायदाविषयाची प्राध्यपिका माझी मैत्रिण राकेल H1 कायद्याच्या निर्मितीसाठी ज्या कमिटीनं कायदेशीर बाबींवर संशोधन केलं त्याचा भाग होती. आफ्रिकेतून गुलाम आणताना वापरलेले स्लेव्हरीचे कायदे आणि H1 व्हिसाचे कायदे यांमधली साम्यस्थळं याबद्दलचं राकेलचं विवेचन ऐकून माझे डोळे अक्षरश: पाणावले!

H1 व्हिसावर आलेल्या व्यक्तींना अमेरिकेत कायमस्वरुपी शांततेनं राहता येणं... यासाठी सिटिझनशिपचा मार्ग दुस्तर करून त्यांचं खच्चीकरण कसं करायचं? हे पॉलिसीपातळीवर H1च्या धोरणातच ठरवलेलं आहे. तिशीत अमेरिकेत गेलेल्या आणि वयाच्या चाळिशीतच ‘म्हाता-या’ दिसणा-या H1 वाल्यांनी किती सोसलंय हे त्यांची कुटुंबं जाणतात. शिवाय, सुरूवातीला परदेशस्थ नातलगांबाबत असूया आणि नंतर तुच्छता दाखवणं हे भारतीय कुटुंबांत सर्रास पाहायला मिळतं, पण हे सुपर अफ्लुअंट लोकांचं विस्थापन पैसे वजा जाता दुष्काळात मराठवाड्यातून पुण्यात झालेल्या विस्थापनापेक्षा फारस सुसह्य नसतं. गणितात जशी ‘मॉड-व्हॅल्यू’ बघतात तशी ‘मॉड-व्हॅल्यू’ घेतली तर H1 वाल्यांचं आयुष्य पहिली दहा वर्षं प्रचंड खडतर असतं. परतायला ‘डोंबिवलीतल्या दोन खोल्या’ हे वास्तव त्याहून खडतर म्हणून कित्येकांनी अमेरिकेत खस्ता खाल्ल्या आणि ‘मारुतीच्या बेंबी’त नावाच्या नाटकाचा दुसरा अंक रंगवला.

आद्य सिटिझन्स आपल्या मुलांची आयव्ही लीगची कर्जं किंवा त्यांची मल्टिकल्चरल लग्नं यांमध्ये गुंतून होते तेव्हा नव्या दमाचे H1 वाले कॅलिफोर्नियात ' सर्वणा ’मध्ये जेवत, कन्सल्टंटच्या चक्रात ग्रीनकार्ड कधी /कसं / केव्हा होईल या चिंतेत होते. H4 म्हणजे H1 या व्हिसावर येणा-या व्यक्तीचा लग्नाचा जोडीदार. त्यांना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे, भारतातून अमेरिकेच्या ओढीनं आलेल्या मुलींची झालेली घुसमट हा या जातीय रचनेचा दुसरा पैलू. यातून काही समुहात वाढणारा हिंसाचार किंवा मानसिक त्रास हा वेगळ्या लेखाचा विषय.


यामध्ये विद्यार्थी म्हणून आलेल्या आणि नंतर परत न गेलेल्यांचा गट वेगळा. या गटाला सामान्य H1 पेक्षा आपण ‘थोर’ आहोत, अमेरिकन संस्कृती अधिक जाणणारे आहोत असं वाटत असतं. ‘कॅम्पस’वर राहिल्यामुळे कोणत्या गोष्टींना अमेरिकन नजरेत ‘D-क्लास’ दर्जा आहे हे या विद्यार्थिसमूहाला चटकन समजतं. त्यामुळे H1 ची Y2K फळी ही ‘घोडागिरी स्पेशालिस्ट’ आणि कॅम्पसवरून सिअ‍ॅटलला मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करणारे अधिक तरबेज स्पेशालिस्ट असा ‘देशस्थ-कोकणस्थ’ रेषेचा फरक या जातीत दिसतो.

अमेरिका बॉर्न देसी यांना ABCD म्हणजे अमेरिका बॉर्न कन्फ्युज्ड देसी म्हणायची सुरूवातीची चाल होती. मात्र अनुभवानं अमेरिकन वास्तवात वाढलेली भारतीय ‘दिसणारी’ दुसरी पिढी अजिबात ‘कन्फ्युज्ड’ नाही हे अनेकांच्या लक्षात आलंय.

सगळा देशच स्थलांतरित लोकांचा असल्यामुळे अमेरिकेत सामाजिक सत्तेची मापकं हे वेगवेगळे ब्रॅंड्स बनतात. उदाहरणार्थ तुमची मुलं आयव्ही लीगमध्ये जातात की नाही, तुम्ही राहता ते सबर्ब/काऊंटी कोणत्या दर्जाची आहे /तुमचं व्हिसा स्टेटस काय? / तुमची गाडी कोणती / तुम्ही मराठी मंडळाचे सभासद आहात की रोटरी मध्ये अ‍ॅक्टिव्ह आहात / तुमच्या भारताच्या फे-या किती फ्रिक्वेंट / तुम्ही अमेरिकेतच म्हातारं व्हायचं ठरवलंय की भारतात?... सारे प्रश्न महत्त्वाचे होतात. त्यांची उत्तरं हे ब्रॅंड्स बनतात.

लिबरल बनण्यापूर्वीच्या भारतात परदेशस्थांबद्दल कमालीचं अप्रूप होतं. परदेशस्थांनाही भारतीय नॉस्टॅल्जिया प्रचंड होता. मात्र आता दोन्ही देशांतली ‘मेटा नॅरेटिव्हज’ बदलत आहेत. अमेरिकन ठप्पा म्हणजे थोर हे समीकरण आता मोडलंय आणि अमेरिकेत प्रत्येक जण जणू ‘वॉलमार्ट’मध्ये काम करतोय, असा तुच्छ भाव बाळगायचेही दिवस गेले. आता दोन्हीकडचे मध्यमवर्ग एकमेकांची पॅकेजेस अधिक खुल्या आणि त्यामानानं कमी असूयेनं तपासू लागलेत. अमेरिकन उच्चवर्णीय मायग्रंट म्हणजे विश्व हिंदू परिषदेला जोपासणारा, अमेरिकेत दुय्यम दर्जाचं जीवन जगणारा, सांस्कृतिक दृष्ट्या रूटलेस म्हणून उथळ व सर्वसामान्य किंवा बुश राजवटीइतकाच आपमतलबी हा स्टिरिओटाईप आता बदलायची वेळ आली. जितका उथळपणा भारतात आहे तितकाच अमेरिकेतही आहे असं थंड डोक्यानं विचार केल्यावर दिसतं.

मराठी मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात गेलं की विद्यार्थी I-20 वाले नवे मायग्रंट्स आणि व्हेटरन अमेरिकन जुने अंकल असा मोठा स्पेक्ट्रम भेटतो. खरंतर, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मोठा क्रॉससेक्शन एकदम नजरेसमोर येतो. मला अमान मोमीन असाच भेटला होता. अमान होता ऑलमोस्ट पासष्ट वर्षांचा. त्याला अमेरिकन पद्धतीनं ‘अरे तुरे’ करायला त्यानंच शिकवलं. अमानच्या सुरूवातीच्या उत्कृष्ट कथांमध्ये हे ‘अर्ली-भारतीयांचं’ विश्व त्यानं उलगडलंय. नंतरची म्हणजे ‘कुंपणापलीकडच्या देशा’तली अजिता काळे पिढी. या पिढीनं आपली घसट भारतातल्या सांस्कृतिक केंद्रांबरोबर वाढवली. याचा पश्चिम किना-यावरचा परिपाक म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळानं विद्या हर्डीकरांसोबत घेतलेले विविध सांस्कृतिक इनिशिएटिव्हज.

पहिला Y2K धारेचे H1 वाले आता एकतर सिटिझनशिप घेऊन परत आलेत किंवा तिथंच स्थायिक झालेत. त्यांची रेडवुड सिटीत किंवा ऑस्टिनच्या काऊंटीत घरं झाली. अमेरिकन सिरीयलमध्ये आता भारतीय चेहेरे दिसायला लागलेत. अमेरिकन ज्यूंपेक्षाही जास्त दरडोई उत्पन्न आणि शिक्षण या समूहाकडं आज रोजी आहे.

पहिल्या फळीत आलेले उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय भारतीय होते. त्यांच्या बोच-या जातीय-ब्राह्मणी-जाणिवा आता ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ बनल्यात. ब्राह्मणेतराना ‘चॅरिटेबली’ सामावून घेतल्यासारखं दाखवायचं आता ‘अनकूल’ ठरलंय. माझ्या एका कार्यक्रमात आलेल्या नितीन कांबळे या आयटी तज्ञानं जेव्हा ही स्पर्धात्मक गुणवत्तेच्या वेष्टनाखालची आयटीवाल्यांची जातीयता खेचून बाहेर काढली तेव्हा मला कसनुसं झालेलं आठवतंय. ‘शादी डॉट कॉम’वरचा छोटा रिसर्चही या जातीय घडणीबद्दल तेच सांगतो.


NRI ही एक हायब्रिड अवस्था आहे. यात भारतीय म्हणून सुरुवातीला कौतुक, नंतर असूया, नंतर टीका आणि त्याची परिणती तुच्छतेत होते. मात्र आता या चष्म्यापलीकडे या हायब्रिडिटीला तपासण्याचे दिवस आलेत. त्यातली सामाजिक गणितं आता उलगडून पाहता येतात. भारतीय जातीय गुणदोषांपलीकडे NRI हायब्रिडिटी तपासणं आवश्यक आहे.

मराठी कुटुंब भेटल्यानंतर गप्पा कशावर चालल्या आहेत यावरून ‘व्हिसा-जात’ ओळखता येते. रूममेटच्या कटकटी – कॅंम्पस विद्यार्थी - बॉसचे तकाजे – ग्रीनकार्डचा वैताग - H1ची घुसमट, नवीन घर, मुलांच्या शाळा – ग्रीनकार्ड मास्टर्स, बेसमेंट रिनोव्हेशन – रोटरॅक्ट क्लब – सिटिझन फोरम – आयव्ही लीगमधली मुलं किंवा त्यांच्या बहुसांस्कृतिक विश्वात आपलं एकटेपण सर्वात महत्त्वाची म्हणजे मोक्ष आणि मर्सिडिजची चर्चा – आद्य नागरिकांचा ज्येष्ठ संघ ! दीक्षितांची माधुरी असो किंवा अश्विनी भावे – EB 1 सारख्या व्हिसावर अमेरिकेत आलेले क्रिएटिव्ह बुद्धिमान लोकं. इथल्या जात- व्यवस्थेत कोणीच अनप्रेडिक्टेबल राहात नाही.

अमेरिकेत बरीच दशकं ‘स्थलांतर-स्थलांतर’ खेळ चाललाय. यात माणसं आपण केलेल्या त्यागांची भरपाई विविध ब्रॅंड्संनी करत आहेत.
मला यातली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे पिढ्यान् पिढ्यांच्या भारतीय कौटुंबिक दंभाला अमेरिकन कडू व्यवहारी वास्तववादाची थेरपी मिळत आहे. आपल्या शरीरातल्या सा-या पेशी सात वर्षांत संपूर्ण नव्या होतात. अगदी डोळ्यांतले रॉडस आणि कोन्स पण नवे होतात. अशी सात वर्षं अमेरिकन अन्न खाल्लेले वन्स अपॉन टाईप भारतीय ज्या नफ्फट खरेपणानं ( मनातल्या मनात का होईना) आपली गणितं मांडतात, ट्रेड ऑफ्स जोखतात ते मला आवडतं. CYA सारख्या थिअ-या सांगणारे मोक्ष आणि मर्सिडिजच्या कचाट्यातही शेवटी एकटेपणा मान्य करतात. संस्कृती किंवा सिंगल माल्ट हा आधार आहे, उपाय नाही हे जाणून.

भारतीय जातींची, कुटुंबांच्या ग्लोरीची, भारतीय गुटगुटीत दंभाची कॉइन्स अमेरिकेत चालेनाशी होतात. अमेरिकन रूथलेस, माजुर्डी, ब्लंट, कष्टकरी संस्कृती या भारतीय मनांवर कलम होते. त्या कलमी वास्तवाचं समाजशास्त्र आता तपासायची वेळ आली आहे. झुंपा लाहिरीच्या ‘नेमसेक’मध्ये त्या वास्तवाचा एक तुकडा भेटतो... किंवा ‘हॅरॉल्ड अ‍ॅण्ड कुमार’ सारख्या विनोदी चित्रपटात दुसरा. जुन्या परदेशस्थ समीकरणापलीकडे ही ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ मूल्यांची नवी ग्लोबल जात घडताना डोळ्यांसमोर दिसते... या जातीत सरमिसळीनं, बरंवाईट, सारंच आहे. कौतुक, असूया, तुच्छता या सा-या पलीकडचं नवं कुरकरीत आणि तरीही दुखरं काहीतरी!

Monday, August 9, 2010

अपूर्णांकांचं प्रेम

माझे आजोबा त्यांच्या लहानपणी पो-या म्हणून मराठवाड्यातल्या चाकूरच्या बलभीम वाचनालयात कामाला होते. पहाटे ग्रंथालय झाडून ठेवायचं आणि पुस्तकांवरची धूळ झटकून पाणी भरून ठेवायचं हे त्यांचं काम होतं. माझे आजोबा राहायचे जवळच्या उजळंब नावाच्या खेड्यात. ते तिथून पहाटेचे निघून ग्रंथालयात जायचे. पुढे ते ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.शि.रा. रंगनाथन यांचे पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक म्हणून निवृत्त झाले. शेवटच्या श्वासापर्यंत, काका म्हणजे माझे आजोबा, म्हणजे श्री. कृ.मु. उजळंबकर स्वत:ची ओळख 'निवृत्त ग्रंथालय संचालक' अशी करून द्यायचे. काकांचं ग्रंथालयवेड इतकं जबरदस्त होतं की आम्ही सर्व त्यांच्या ग्रंथालयधर्माचे पहिले कन्व्हर्टस होतो. सुट्टया लागल्या की काकांबरोबर ‘शासकीय विभागीय’मध्ये जायचं आणि हाताला लागतील त्या पुस्तकांचा फन्ना पाडायचा हे ठरलेलं होतं. सुट्टया लागल्या की काका ‘शासकीय’मध्ये मुलांच्या पुस्तकांचा कोपरा तयार करायचे. पण ते मुळात लिबरल होते. हाताला लागेल ते कोणतंही पुस्तक वाचायला त्यांची मनाई नसायची. काका भाषावार प्रांतरचनेनंतर पुण्यात आले होते. त्यांचा खाक्या मराठवाडी, निझामशाहीतला-ढिसाळ आणि प्रेमळ, पुस्तकांवर प्रेम करणारा, उदारमतवादी होता.
काकांच्या ग्रंथालय-धर्मात धर्मांतरासाठी एकच गोष्ट आवश्यक होती, ती म्हणजे पुस्तकांवर प्रेम. एकदा जीव पुस्तकांना चटावला, की मग ते प्रेम सरणारं नाही हे काकांना पक्कं ठाऊक होतं.
काकांचे गुरू शि.रा. रंगनाथन हे ग्रंथालयशास्त्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांच्या 'ग्रंथालयाची पाच सूत्रं' जगभर प्रचलित आहेत. रंगनाथन यांची दशांश पध्दत जगभर महत्त्वाची मानली जाते. डॉ. रंगनाथन यांनी ज्ञानाची विभागवार वर्गवारी करून प्रत्येक पुस्तकाला नोंदणी क्रमांक देण्याची शिस्त निर्माण केली. रंगनाथन यांचा विचार, त्यांच्या अगोदर ज्यानं वर्गीकरण पध्दतीचा अभ्यास केला होता त्या मेल्विल ड्युईपेक्षा पुढे जाणारा होता. गुगलवर तुम्ही बघितलंत तर भारतातले आद्य आय.टी. प्रणेते म्हणून रंगनाथन यांचा उल्लेख आढळतो. 'याहू'च्या प्रणेत्यांनी आपलं आद्य सर्च इंजिन डिजाईन करताना रंगनाथन यांची विचारप्रणाली आधारभूत मानली होती. इंटरनेटवर जे सर्च इंजिन असतं त्या सर्च इंजिन पाठीमागे रंगनाथन यांचीच माहिती आणि ज्ञानाच्या वर्गवारीची व्यवस्था आहे. डॉ. रंगनाथन यांच्या वर्गीकरण पध्दतीनं ग्रंथालयातली सर्व पुस्तकं त्यांच्या त्यांच्या ओळखीनं त्यांच्या त्यांच्या योग्य ठिकाणी सापडतात. भारतीय ज्ञानशास्त्राचा पाया डॉ.रंगनाथन यांच्या वर्गीकरण पद्धतीमागे आहे. डॉ. रंगनाथन यांच्या शिस्तीमुळे हे नोंदणी क्रमांक उर्फ अपूर्णांक भारतातल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांवर आले. त्यातल्या काही अपूर्णांकांवर माझा तर जीवच जडलेला आहे.
काकांनी डॉ. रंगनाथन यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. त्यामुळे डॉ. रंगनाथन हे नाव लहानपणापासून परिचयाचं होतं. काकांबरोबर बोलताना कायम ग्रंथालयांचाच विषय निघायचा. ग्रंथालय संचालक झाल्यावर काकांचं ऑफिस होतं 'एशियाटिक'च्या इमारतीत. तेव्हापासून माझ्याही 'एशियाटिक'च्या फे-या सुरू झाल्या. तिथल्या नोंदणी क्रमांकांत दडलेल्या पुस्तकांचा परिचय होऊ लागला.
नोंदणी क्रमांक घालण्यापूर्वी अनेक पुस्तकं काकांकडे ग्रंथालयात यायची. 'इथं बसून वाचणार असशील तर वाचायला देतो' या अटीवर काकांच्या ऑफिसात बसून एका बैठकीत पुस्तकं वाचून संपवायला त्यांनी शिकवलं.
नंतर अमेरिकेतून फोन केला तरी काका गावाची, प्रवासाची चौकशी करायच्या अगोदर गावातल्या लायब्ररीची चौकशी करायचे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाची वॅन डर बिल्ट लायब्ररी, माझ्या स्कूलची अरिझोना स्टेटची हेडन लायब्ररी, न्यूयॉर्कची पब्लिक लायब्ररी, वॉशिंग्टनची फेमस अमेरिकन काँग्रेसची लायब्ररी... काकांमुळे हे प्रत्येक ग्रंथालय जणू मंदिर आहे अशा भक्तिभावानं तिथं प्रदक्षिणा केल्या, पुस्तकं वाचली, जागच्याजागी परत ठेवली आणि काकांना त्यांची वर्णनं ऐकवली.
एका समर सेमिस्टरला मला रिसर्च स्कॉलरशिप नव्हती. तेव्हा मध्ययुगीन युरोपचा अभ्यास करणारा एक गट अरिझोनात होता. त्यांना असिस्टंटची गरज होती. दिवसभर ग्रंथालयात बसून काम करायचं होतं. विद्यार्थी या कामाला तयार नसायचे. ती नोकरी मला मिळाली. काम होतं मध्ययुगीन युरोपचे सर्व संदर्भ एकत्रित करायचे. त्यासाठी मला रोजचे पुस्तकांचे, जर्नल्सचे नोंदणी क्रमांक मिळायचे. त्या नोंदणी क्रमांकांच्या खाली येणारं प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक जर्नलचा प्रत्येक अंक तपासून त्यातल्या मध्ययुगीन युरोपच्या संदर्भांना एकत्रित करायचं ते काम होतं. काकांच्या कोलॉन क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाच्या शिस्तीमुळे नोंदी करण्याचं काम मला कधीच अवघड वाटलं नाही. मध्ययुगीन युरोपातली माणसं थेट आपल्या जुन्या भारतीयांसारखी होती की- असं कित्येकदा लक्षात यायचं. एका स्कॉटिश मासिकात, मध्ययुगीन इंग्लंडमध्ये बोट जुनी झाली की तिचा दफनविधी कसा साग्रसंगीत करण्यात यायचा याचं वर्णन होतं. वस्तूंनाही नात्यानं बांधणारं मध्ययुगीन 'रिलेशनल कॉसमॉस' या प्रकल्पात असं अनेकदा भेटलं. माझे सहकारी मला 'लायब्ररी-मोल' म्हणायचे. मी उन्हाळयाच्या पूर्ण सुट्टीभर तासनतास या जुन्या जर्नल्समधून मध्ययुगीन संदर्भ काढून नोंदवण्याचं काम केलं. आधुनिक विज्ञानापूर्वीचं युरोपिअन वास्तव त्यामुळे परिचयाचं झालं. जगावर वसाहतवादी आक्रमण करण्यापूर्वी युरोपीयन अंगीकारलेल्या अंतर्गत -वसाहतवादाचं स्वरूप नजरेसमोर आलं. काकांनी लहानपणापासून काळजात पेरलेलं 'ग्रंथालय प्रेम' त्या उन्हाळ्यात कामी आलं.


अमेरिकेतल्या प्रशस्त, सर्व सोयींनी युक्त ग्रंथालयात मोकळेपणानं फिरताना मजा येत असे. दिवसाचे बारा तास या ग्रंथालयात प्रकल्पाचं काम करताना घालवले तरी त्रास होत नसे. सर्व सोयींनी युक्त ग्रंथालयं म्हणजे पुस्तकावर प्रेम करणा-या माणसांची पंढरीच होती. इथं मला या अपूर्णांकांवर जडलेलं प्रेम खरं कामाला आलं. अमेरिकेत ओळखपत्र असलेला प्रत्येक नागरिक विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतो. याउलट, पुण्यात परत आल्यावर मी जयकर ग्रंथालयात जेव्हा सभासद होण्यासाठी गेले तेव्हा, आम्ही 'इंडिपेण्डण्ट स्कॉलर' असं काही मानत नाही. तुम्ही विद्यार्थी नसाल तर इथं सभासद होता येणार नाही' असं खास पुणेरी उत्तर मिळालं.
आता किंडल, फ्लिपकार्ट आणि जेसटोर यांचे आशीर्वाद लाभल्यावर ग्रंथालयं रोज हाताशी नसली तरी आयुष्य धकतं. पण इंटरनेटनं समृध्द या सा-या माहितीची पायाभरणी डॉ. रंगनाथन यांनी केली आहे हे आठवलं की प्रत्येक वेळी ऊर भरून येतो. ९ ऑगस्ट हा डॉ. रंगनाथन यांचा जन्मदिवस. माझे आजोबा हयात नाहीत. नाहीतर प्रत्येक ९ ऑगस्टला ते रंगनाथन-स्मृती समारंभ आयोजित करत असत. मला वाटतं, प्रत्येक ग्रंथालयप्रेमीसाठी ९ ऑगस्टचा दिवस हा महत्त्वाचा असायला हवा. वाचणा-या, ग्रंथालयात जाणा-या प्रत्येक माणसावर डॉ. रंगनाथन यांचं केवढं मोठं ऋण आहे!
रंगनाथन यांच्या वर्गीकरण पध्दतीत साहित्य 'O' या वर्णामध्ये वर्गीकृत केलेलं सापडतं. आठशे एकवीस पूर्णांक तेवीस (821.23) हा जगभरातल्या कवितासंग्रहांचा नोंदणी क्रमांक होता. मुंबईत म्हाता-या 'एशियाटिक'च्या आचळांना लुचताना तो क्रमांक माझ्या प्रथम परिचयाचा झाला. आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’च्या पुढ्यात मी दिवसेंदिवस घालवले आहेत. त्या वयाला शोभेशा पाब्लो नेरूदाच्या कविता पहिल्यांदा भेटल्या. रिल्केचं 'सॉनेटस ऑफ ऑर्फिअस' पण ‘आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’मध्येच सापडलं. पाऊल त्सेलान, येहुदा अमिचाई , शिम्बोरस्का, मांदेलश्ताम, लॉर्का -- लिटिल मॅगेझिनवाल्यांनी मराठीत ज्या ज्या कवींची नावं माझ्या ओळखीची करून दिली होती, त्या प्रत्येक नावाला मी ‘आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’ या खिंडीत गाठलं. अजूनही सवयीनं प्रत्येक ग्रंथालयात पाऊल टाकलं, की मी पहिल्यांदा 'जागतिक कवितेचा कप्पा' शोधते. तिथं नेहमीची बोदलेअर, रिम्बाँ, त्स्वेतयेवा ही स्टेशनं लागतात का? ते तपासून बघते. 'लॅण्डमार्क', 'क्रॉसवर्ड' मध्ये हे वर्गीकरण वापरत नाहीत, त्यामुळे मी वैतागते.
माझे आजोबा कृ.मु.उजळंबकर हे डॉ. रंगनाथन यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी काळजात पेरलेल्या ग्रंथालयप्रेमानं जगभरची कविमंडळी मला भेटली हे आठवून मला भरून येतं. 'एशियाटिक'मध्ये आयुष्यातल्या इतक्या उनाड दुपारी काढल्या की अजूनही डोळे मिटले तरी 'एशियाटिक'चे नोंदणी क्रमांक डोळ्यांसमोर येतात. समाजशास्त्र 300, मार्क्सवाद 313 असे... एकदा अ‍ॅण्ड्रिआ डवॉरकिनचं 'इंटरकोर्स' नावाचं स्त्रीवादी समीक्षेचं पुस्तक जेव्हा इतर इरॉटिक पुस्तकांसमवेत सापडलं तेव्हा फुटलेलं हसूही आठवतं. अशा अपूर्णांकांची प्रेमं आता नामशेष होताना दिसतात. तरीही या इंटरनेटच्या, सर्च इंजिनच्या सांगाड्यांना तेच अपूर्णांक बिलगून बसलेत या कल्पनेनं मला तसल्ली मिळते आणि डॉ. रंगनाथन यांच्याविषयी मनात अपार कृतज्ञता दाटून येते.

भयकारी कल्पनेची कल्पना

प्रत्येक चांगलं वाचणा-या माणसाला काही लेखकांची स्टेशनं लागतातंच. जसा दस्तयावस्की किंवा जेम्स बाल्डविन. तसं इंटरनेट सर्फिंग करताना काही वेबसाईट्स प्रत्येक जिज्ञासू सर्फरला भेटतातंच. तुम्ही कोणत्या साईटसना भेट देता यावरून तुमच्या विचारसरणीचा, इझम्सच्या पगडयाचा, त्यातून बाहेर पडायच्या धडपडीचा किंवा कमिटमेंट फोबियाच्या पलीकडे- 'आहे मी लिबरल आणि आवडतात मला वेगवेगळया वादातल्या गोष्टी' या वृत्तीचा अंदाज येतो. माझ्या एका जिज्ञासू मित्रानं माझं नवीन गोष्टी वाचण्याच्या भुकेचं लक्षण हेरून बरेच वर्षांपूर्वी एका वेबसाईटशी माझा परिचय करून दिला- ती होती www.edge.org . स्लेट, सलॉन, अटलांटिक , NPR च्या जोडीने एज ची नेट- भेट त्याच्यामुळे सवयीची झाली.
स्टिव्हन पिंकर, नासिम तालेब, मॅट रिडले, रिचर्ड डॉकिन्स यांसारखे लेखक 'एज'वर आपल्या लेखनाची, कल्पनांची चिकित्सा करतात आणि त्यांच्या 'एज'वरच्या चर्चा या अकलेला खुराक देतात हे माझ्या तात्काळ लक्षात आलं. कित्येकदा या चर्चा डोक्यावरून गेल्या तरी त्या आवडू लागल्या. या वेबसाईटचा संपादक जॉन ब्रोकमन यानं 'एज'वर अनेक वाद-विवाद, उपक्रम राबवले आणि यातील काही चर्चांची नंतर पुस्तक स्वरूपात निर्मिती केली. या लेखकांमध्ये प्रचंड ज्ञानपिपासा आहे. त्यामुळे इझमच्या वादापलीकडे जाऊन, शास्त्रीय विश्लेषण पध्दतीने विविध सामाजिक आणि शास्त्रीय विषयांचा ऊहापोह 'एज'वर गेल्या दहा वर्षांत माझ्या वाचनात आला. 'एज'वरचं लेखन डाव्या किंवा आंधळया उजव्या वादांपलीकडचं असल्यामुळं सुरुवातीच्या काळात त्यांनी एक संकल्पना मांडली- थर्ड कल्चर. या थर्ड कल्चरमधल्या अनेक लेखनाशी मनोमन वाद घालत कधी आवडीनं मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत 'एज'वरचे अनेक प्रकल्प चवीनं वाचले. ('एज' लेखनाचा प्रतिवाद करताना माझ्या एका अतिहुशार मैत्रिणीनं ’ क्लिफ़’ नावाचा 'एज'मधल्या विचारांची समीक्षा करणारा गटही मग स्थापन केला."एज’वर वाचायचं आणि ’क्लिफ’ वर वाद घालायचे, अधिक समजून घ्यायचं हे ठरून गेलं.)
जॉन ब्रोकमन या 'एज'च्या संपादकानं दरवर्षी या वेबसाईटसाठी एक प्रकल्प राबवला. तो म्हणजे एका विशिष्ठ कल्पनेला विविध क्षेत्रातील बुध्दीमंतांचा काय प्रतिसाद आहे याचं एक संकलन त्यांनी वेबसाईटवर मांडलं आणि नंतर पुस्तक रूपानं ते छापलंही.
पहिल्या वर्षीचं संकलन होतं, 'व्हॉट वी बिलीव्ह बट कॅनॉट प्रूव्ह' म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्यावर आमची श्रध्दा/विश्वास आहे पण त्या सिध्द करता येत नाहीत. तेंडुलकरांची 'नियती' ही संकल्पना घेतली उदाहरणार्थ तर तशा विविध संकल्पनांचा उहापोह जगभरातल्या विविध विषयातल्या तज्ज्ञांनी केला. त्यांच्या आतापर्यंत सिध्द न झालेल्या अशा संकल्पना त्यांनी 'एज'वर मांडल्या होत्या. या अत्यंत लक्षवेधी उपक्रमानंतर दुस-या वर्षी माझ्यासारख्या अनेक पाकोळयांनी 'एज'वर कोणता प्रश्न असेल याची वाट पाहिली... आणि नंतरचा प्रश्न अधिक फॅसिनेटिंग होता. 'व्हॉट इज युअर डेंजरस आयडिया?' मनात उमटणा-या भयकारी कल्पना मांडायला त्यांनी जगभरातल्या 108 विद्वानांना पाचारण केलं होतं. भयंकर कल्पनांचं हे संकलन हे माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे.
आपले विचार, कल्पना, नवीन संकल्पना जिथून जन्म घेतात अशा पारंपरिक इझम्सनी वेढलेल्या विचार व्यूहापलीकडे जाऊन ज्ञात/अज्ञात/अज्ञेयाच्या कसोटयांवर घासून 'डेंजरस आयडिया' मांडणारे लेखक मला आवडले आणि ही कल्पना राबवणारा संपादक त्याहून महत्त्वाचा वाटला. 'एज' या वेबसाईटने पूर्वी 'पुढील पन्नास वर्षे' या विषयावरचे लेखनही संकलीत केले आहे. मात्र त्या संकल्पनेपेक्षा 'डेंजरस आयडिया' मला अधिक भावली. यातल्या सर्व 'आयडिया' चांगल्या/पॉझिटिव्ह/मानवसमूहाला हितकारक/चॅरिटेबल अशा नाहीत. काही कल्पना अतिशय वादग्रस्त किंवा अंगावर काटा आणणा-या आहेत. उदाहरणार्थ स्टिव्हन पिंकरची कल्पना - जेनेटिक छापानुसार मानवीय गटांमध्ये त्यांची बुध्दी आणि मनोवृत्ती यात फरक असणार ही अंगावर काटा आणणारी आहे. सर्व मानवीय समूहांमध्ये अतितीव्र बुध्दीमत्ता किंवा संवेदनशील असण्याच्या शक्यता समप्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे मानवतावादी मूल्यं- तर त्यालाच सुरूंग लावणारी ही स्टिव्हन पिंकरची- जेनेटिक छापानुसार बौध्दिक कुवत आणि मनोवृत्ती गटागटात विषम प्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे सिद्ध होईल ही कल्पना वादग्रस्त म्हणून अधिक खोलात विचार करायला लावणारी आहे.
यात डॅनियल हिलीसनं ही 'डेंजरस आयडिया' एकमेकांना उघडपणे सांगण्याची कल्पनाच 'भयप्रद' असल्याचं नोंदवलंय तर दुसरीकडं डॅनियल गिल्बर्टनं आयडिया ’डेंजर" असू शकतात' ही संकल्पनाच 'डेंजरस' आहे असं मत मांडलंय. हे पुस्तक हातात आलं की त्याच्याशी वाद घालत घालतच वाचून संपतं आणि नंतर पुस्तकांच्या कपाटात हाताशी येईल अशा अंतरावर राहतं.
जे कृष्णमूर्तींच्या एका संवादामध्ये रूपर्ट शेल्ड्रेक हे नाव भेटलं होतं. फिजिक्सचे अभ्यासक डेव्हिड बोहम आणि जीवशास्त्रज्ञ रूपर्ट शेल्ड्रेक यांच्या कृष्णमूर्तीं बरोबरच्या संवादांनी माझ्या मनावर ठसा उमटवला होता. शेल्ड्रेक यांची एक डेंजरस कल्पना या पुस्तकामध्ये आहे. 'कबुतरं आपापल्या घरटयात परत कशी येतात?' या अतिशय सोप्या प्रश्नातून सुरुवात करून प्राणी आपले मार्ग/दिशा निश्चित कशी करतात आणि त्या आकलनाकडे विज्ञान जगताचं त्यांच्या मर्यादांमुळे होणारं अक्षम्य दुर्लक्ष यामुळॆ होणारं अपरिमित नुकसान यावर शेल्ड्रेक यांनी विवेचन केलंय. 'थर्ड कल्चर'च्या या वाचनानं माझ्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी केली. असे रोबस्ट प्रश्न घेऊन आम्ही का खोल पाण्यात उडया घेत नाही ?असं वाटून मन खंतावलंदेखील.
ऍन सायलरनं या 'एज'ला प्रत्युत्तर म्हणून 'क्लिफ' हा गट सुरू केला होता. 'एज' म्हणजे कडयाचं टोक तर क्लिफ म्हणजे 'दरी' म्हणून तिच्या प्रतिक्रियेचं नाव क्लिफ. तिनं मला एकदा विचारलं होतं, की तुझी डेंजरस आयडिया काय आहे? पुस्तकाची इतकी पारायणं झाली होती की ऍनचा प्रश्न मला सुरुवातीला साधा-सोप्पा वाटला. खूप डेंजरस आयडिया माझ्या मनात असतील असं मला वाटत होतं. पण जसजशा तिला मी माझ्या कल्पना सांगू लागले तस तसं प्रत्येकवेळी ती हसून, 'ज्ञानदा, तू सांगतीएस तो युटोपिआ आहे त्यात भयकारी असं काही नाही.' असं माझ्या प्रत्येक कल्पनेला म्हणत राहिली.
'युध्द' बेकायदेशीर ठरतील, प्रत्येक भारतीय तथाकथित उच्चवर्णीय हा जातीय सरमिसळीतून बनलाय हे सत्य जेनेटिकली सामोरं येईल, सामाजिक शब्दकोषातून 'अनौरस', 'व्यभिचार', 'लग्न' असे शब्द नामशेष होऊन त्या जागी - ’अस्तित्वात असलेल्या कायदेशीर सोयी सवलती धुडकावून जन्माला आलेलं मूल’ किंवा’ ’ अर्थिक स्थिरतेसाठी तगवलेली लग्न नावाची गंजकी व्यवस्था मोडून दुसरी व्यवस्था समान्तरपणॆ चालवणारे नाते' किंवा 'सामाजिक सोयीसाठी आणि मुलांसाठी तगवलेली आर्थिक तडजोड' असे नवे वर्णन लागू होईल अशी माझी दिवास्वप्नं मी 'ऍन'ला 'डेंजरस आयडिया' म्हणून ऐकवली. तल्लख ऍननं अर्थातच सा-या माझ्या कल्पनंमध्ये 'डेंजरस' असं काहीच नाही हे दाखवून दिलं. शक्यता, विशफुल थिंकिंग या पलीकडे 'डेंजरस आयडीयेचं' क्षेत्र सुरू होतं हे मग माझ्या ध्यानात आलं. 'कर्मफळ सिध्दांतांचं फुल ऍण्ड फायनल शास्त्रीय ब्रेकडाऊन' अशी एक कल्पना मग मी तिला ऐकवली. ती कल्पना मात्र मला खरोखरच दक्षिण आशियाई मनाचं ब्रेकडाऊन करणारी भयावह कल्पना वाटते. अ‍ॅनच्या परीक्षेत ती कल्पना काठावर पास झाली.
जॉन ब्रॅकमननं संपादित केलेल्या 'डेंजरस कल्पना' अतिशय वेचक आहेत. पुस्तकाच्या शेवटी रिचर्ड डॉकिन्सनं या कल्पनांचं विश्लेषण केलंय. जगाच्या अंताबद्दल, कयामती बद्दल भाष्य करणा-या (माझ्या कर्मफळ सिध्दांत याच पठडीतला) आणि त्या अनुषंगाने सामाजिक चिंतन करणा-या 24, मन/सायकॉलॉजी यावर चिंतन करणा-या 20, राजकारण आणि अर्थकारणाबद्दलच्या 14 आणि मग धर्मकल्पना, आणि इतर या संकल्पनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या कल्पना मिळून 108 कल्पना या पुस्तकात मांडल्या आहेत. डॉकिन्सचं विश्लेषण मूळातूनच वाचण्यासारखं आहे. अनेकदा माणसाचा विचर आपण यांत्रिक पद्धतीने करतो मात्र तोंडदेखलेपणॆ जेनेटीक पद्धतीने माणसं निर्माण करण्याला विरोध करतो- या पाठिमागे आपल्या कोणत्या तृष्णा आहेत? हा डॉकिन्सचा प्रश्न महत्वाचा वाटला. आपला सारा विचार किती संस्कृती केंद्री, मानव केंद्री आहे हे तत्क्षणी जाणवलं.
भयकारी कल्पनांची गुंफण ही मानवी नैतिकतेला केंद्रस्थानी मानून त्याभोवती झाली आहे याचं डॉकिन्सनं विश्लेषण केलं आहे. माणूस म्हणून जगताना 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' हे मांडताना सारा विचार कसा मनुष्यकेंद्री होतो याकडे डॉकिन्स निर्देश करतो. उत्क्रन्तीची प्रक्रिया मात्र मनुष्यकेन्द्री नाही हे तो स्पष्ट करतो.
अशा धक्का देणाऱ्या कल्पना शास्त्रीय संशोधन पुढे नेतील असा ’एज’ वाल्यांचा विश्वास आहे. वरवरून पाहता 'डेंजरस आयडिया' आकर्षक, सहज सुचेल असं शिवधनुष्य वाटते. मग विचार करताना लक्षात येतं की खरी जिवंत, सळसळती डेंजरस कल्पना मनाच्या पटलावर जन्माला येणं यासाठी साधना हवी. तरच ते 'दर्शन' शक्य आहे. असं दर्शन ज्यामुळे भविष्यातील विज्ञानाची दिशा बदलेल. येरा गबाळयाचे ते काम नोहे

बाप रखुमादेवीवरू

आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं सारं चित्त पंढरीच्या वाटेवर चालणा-या, जगाच्या कानाकोप-यांतून आलेल्या पावलांची, मनांची, काळजी घेण्यात- त्यांच्या आर्ततेची संगती लावण्यात, त्यांना त्यांच्या मुळापर्यंत पोचवण्यात लागलं असणार... त्या काळात त्याला वामांगीकडं लक्ष द्यायलाही फुरसत नसते तर माझ्यासारख्या कन्फ्युज्ड जिवांची काय कथा? या वारीनं, या विठूनं, त्याच्या गजरानं न भारावलेला माणूस माझ्या परिचयाचा नाही. महाराष्ट्राच्या गुणसूत्रातच हा विठुराया स्थानापन्न झालेला आहे. असं काय आहे या त्याच्या भेटीत?
दिलीप चित्रे यांना एकदा वारी पुण्यात यायच्या दिवशी मी भेटले होते. तेव्हाचं चित्र्यांचं वाक्य माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते, की या वारीकडे संस्कृतीचं 'क्रॉस पॉलिनेशन' असं बघावं लागेल. वेगवेगळ्या भागांतून येणारी भक्तमंडळी इथं उराउरी भेटतात, गाणी गातात, दंग होतात आणि नवनव्या कल्पनांची देवाण-घेवाण करतात, इथं नवी संस्कृती जन्माला येते.
प्रत्येकानं आपापला मोक्ष स्वत: मिळवायचा ही या भूमीची परंपरा... पण अशा भक्ति मार्गावर एकमेकांना भेटून एकत्र पायवाट चालायची हे वारीचं इनोव्हेशन.
माझे गुरुजी जेम्स फोर्ड यांचा 'आयकॉन्स' नावाचा सेमिनार मी अटेण्ड करायचे. काय होतं या 'आयकॉन्स'च्या सेमिनारमध्ये? तर देशोदेशीचे आम्ही विद्यार्थी त्यात आपापल्या संस्कृतींतल्या 'चिन्हं, मूर्ती, प्रतिमा आणि मूर्तींचा अभाव' या विषयावर चर्चा करायचो. प्रोफेसर फोर्ड हे जपानमधील बौध्दधर्माचे प्राध्यापक. ते हा सेमिनार मॉडरेट करायचे - आम्हाला शिकवायचे. या सेमिनारमध्ये माझा ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या आयकॉन्सशी परिचय झाला, तर माझ्या आफ्रिकन मित्रानं मूर्त स्वरूपात परमेश्वराचं नसणं या इस्लामिक संकल्पनेचा आणि नायजेरमधल्या त्याच्या संस्कृतीचा अन्वय लावून दाखवला. डो डॉटरी या माझ्या अमेरिकन वर्गमैत्रिणीनं मॉर्मन चर्चमधल्या प्रतिमांतून नाहीशा होत गेलेल्या 'होली मदर'चं चित्र आमच्यासमोर मांडलं. प्रत्येक संस्कृतीनं आपापल्या दृश्य जाणिवांसकट आपापल्या विश्वातला परमेश्वर घडवला होता, हे आमच्या ध्यानात येऊ लागलं आणि त्यातून संस्कृतीच्या सब- कॉन्शस निरगाठी प्रत्येक समूह कशा सोडवितो ते लक्षात येण्यास सुरुवात झाली.
फोर्ड गुरूजींनी या सा-या सेमिनारची सुरुवात केली होती ती त्यांच्या अमिदा बुध्दाच्या कथेनं. एका गावातील अमिदा बुध्दाची मूर्ती त्याच्या भक्ताला दृष्टांत देते. अतीव भक्तीच्या टोकावर भक्ताच्या गालावर चटका बसतो आणि तो डाग त्या बुध्दाच्या मूर्तीवर उमटतो असं या कथेचं मूळ बीज. फोर्ड गुरूजींचं यावर एक मूलभूत विश्लेषण होतं. त्यांच्या मते, स्वर्गात किंवा ब्रह्मलोकात बुध्द आहे आणि त्याची 'मूर्ती' म्हणजे हा अमिदा बुध्द अशी या जपानी परंपरेत धारणा नाही तर ती मूर्ती म्हणजेच तो अमिदा बुध्द अशी त्यांची धारणा आहे. म्हणून भक्तांच्या स्वप्नात- चालता- बोलता मनुष्यमापातला असा अमिदाबुध्द येत नाही तर ती मूर्ती- म्हणजे 'तोच' येतो. फोर्ड गुरूजींचं प्रवचन ऐकणं हा भाग्ययोगच. त्यांच्या या 'मूर्ती हेच देवाचं असणं' या विषयानं मात्र मला जागं केलं. मला जाणवलं, की विठोबासुध्दा असा आपल्या स्वप्नात कर कटावर ठेवूनच येतो. ‘संत सखू’ सिनेमात सखूला सोडवायला कर कटावर ठेवलेला चार फुटी 'मूर्ती विठोबा' ऊर्फ खरा विठोबा येतो. आपणही विठोबाकडे स्वर्गात, क्षीरसागरात कुठेतरी आनंदात राहणा-या ओरिजनल विठोबाची पंढरपूरची प्रतिकृती असं न बघता- हाच तो नाम्याचं जेवण जेवणारा विठुराया, हाच-ज्यानं जनीचे केस विंचरले, हाच- ज्यानं तुकोबाला दर्शन दिलं, हाच-ज्यानं दामाजी पंतांची सुटका केली, हाच-तो समचरण, साजिरा विठोबा असं त्याच्याकडे बघतो. फोर्ड गुरूजींना मी जेव्हा रा. चिं. ढे-यांचं माढ्याची मूळ विठोबा मूर्ती आणि ही नवी मूर्ती यांबाबतचं संशोधन ऐकवलं तेव्हा माझ्या सेमिनार पेपरमध्ये अजून भर पडली. भक्तांना 'मूर्ती'पलीकडचा विठोबाही दिसतो. मूळ मूर्ती कुठेही गेली तरी ज्या मूर्तीत आपण भाव जडवला, जीव गुंतवला तीच मूर्ती; नव्हे, तोच विठोबा आम्हाला खरा विठोबा वाटतो... नव्हे, तोच खरा विठोबा असतो.
याच फोर्ड गुरूजींच्या वर्गात आम्हा सर्वांच्या लक्षात अजून एक गोंधळ येऊ लागला. तो म्हणजे इंग्रजी भाषेच्या मर्यादेचा. आता, विठोबाला काय म्हणायचं? गॉड- तर तो गॉड या अब्राहमिक धर्मातल्या
( अब्राहम ज्यांचा मूळपुरुष आहे असे धर्म - म्हणजे ज्यू , इस्लाम आणि ख्रिश्चन ) 'गॉड'पेक्षा निराळा आहे. पंढरपुरातल्या विठोबाला आपण 'मूर्ती' म्हणू शकत नाही, तो प्रतिमा नाही, तो विठ्ठलाची प्रतिकृती नाही- तो शंभर टक्के ओरिजिनल विठ्ठल आहे. या साजि-या ध्यानाचं वर्णन करायला इंग्रजी भाषा तोकडी आहे याचं ज्ञान झालं. त्याचबरोबर गॉड, रिलिजन, सेक्रेड, फेथ, ग्रेस, बेनेव्हलन्स या सर्व शब्दांना अभिप्रेत ख्रिश्चन धर्मकल्पनेचा संदर्भ सतत नजरेसमोर येऊ लागला. 'गॉड' या शब्दात अभिप्रेत असलेला परमेश्वर वाळवंटात कुत्र्याचं रूप घेऊन, प्रकट होऊन धावत नव्हता किंवा त्याच्या पाठीमागे नामदेव तूप घेऊन धावत नव्हते. 'गॉड' या कल्पनेला सर्वात्मक परमेश्वर श्रीखंड्या होऊन एकनाथांच्या घरी व्रात्यपणा पण करणारा नव्हता. प्रत्येक संस्कृतीनं आपल्या कॉस्मॉलॉजीत, आपल्या असण्यात, आपल्या माणूसपणाच्या सीमा जाणण्यात त्या पलीकडे स्थित असणा-या 'परमेश्वराचं' एक रुपडं ठरवलं होतं. आणि ते रूप त्याच्या भाषेशी निगडित होतं.
माझा चीनमधल्या चर्चमध्ये काम करणारा एक वर्गमित्र मोठ्ठे डोळे करून म्हणाला, तुमच्याकडे तीन प्रकारचे देव आहेत. देवांचा एक गट आपल्या गावाला राहतात आणि त्यांना भेटायला त्यांच्या घरी तुम्ही जाता. विठोबा, तिरूपती, काशी विश्वेश्वर किंवा जेजुरीचा खंडेराया. दुसरे देव आहेत ते पाहुणे बनून तुमच्या घरी येतात- नवरात्रातली देवी किंवा गणपती. आणि तिसरे देव- तुमच्या घरात राहतात. ज्यांची तुम्ही घरातच पूजा करता. त्याचं वर्णन काही अंशी बरोबर होतं. पण या तीन प्रकारापलीकडे कधी झाडात, कधी गावाच्या सीमेवर, कधी पाण्यात, नदीत, तळयात, भक्तांच्या हृदयात प्रकट झालेले देव आहेत असं त्याला सांगावंसं वाटलं. मग जाणवलं की या भारतीय भूमीत चराचरात परमेश्वराचं रूप दडलंय असं म्हणतात. हे या भूमीतलं अद्वैती नातेसंबंधानं बांधलेलं विश्व आहे. अरुण कोलटकरांच्या 'जेजुरी' त नाही का अशा 'दगडात देव शोधणा-या माणसांचं' जग आहे.
मग मला आमच्या पुण्याच्या घरातलं देवघर आठवलं. काकाला घरी यायला उशीर झाला की बाळकृष्णाला पाण्यात बुडवणारी आजी आठवली. किंवा खंडोबाच्या नवरात्रात वडे तळणारा तिचा गोरा गोरा चेहेरा समोर आला... या 'देव' कॅटॅगरीत काकूच्या अन्नपूर्णेपासून बरीच 'देवमाणसं' देवघरात बसायची. माझा लाडका विठोबा घरच्या देवघरात रुक्मिणीसमवेत उभा राहायचा हे देखील आठवलं. माझ्या लाल अलवणातल्या आजीची जगण्याची घुसमट वारी त्याच्या डोळ्यादेखत घडत होती- ते ही.
ढे-यांच्या ‘महासमन्वया’नं या विठोबाचं कित्येक पिढ्यांना, अवतारांना, कल्पनांना पोटात घेऊ शकणारं रूप सामोरं आणलं. जैन, बौध्द परंपरांपासून ते तुकोबांच्या गाथेतल्या अल्लाच्या अभंगांपर्यंत विठुरायाची सांस्कृतिक व्याप्ती पसरलेली आहे हे लक्षात आलं. चार्ल्स साँडर्स पर्स नावाच्या एका तत्त्वज्ञानं चिन्ह जगाचं तत्त्वज्ञान मांडलंय. तो तीन प्रकारच्या चिन्हांचं विश्लेषण करतो. आयकॉन- म्हणजे जी गोष्ट निर्देशित करायची त्याचं छोटं रूप, इंडेक्स- म्हणजे त्या गोष्टीचं निर्देशन होईल अशी सूचक गोष्ट आणि सिम्बॉल-म्हणजे त्या वस्तूला दिलेली विवक्षित खूण. चिन्हांची ही सारी व्यवस्था एका सबस्ट्रॅटम म्हणजे मूळ सांस्कृतिक भूमीवर उभी असते असं विवेचन पर्स ने केलं आहे. विठोबाच्या गोजि-या ध्यानाकडे बघितल्यावर पर्सनं निदेशित केलेल्या या सांस्कृतिक भूमीतच 'महाराष्ट्री' असण्याचं सारं गमक दडलंय असं मला वाटायला लागलं. या भूमीत जे जे सारं परमेश्वराबद्दलचं चिंतन झालं त्या सा-याला विठोबाच्या विटेनं सामावून घेतलंय. त्यानं हरिहर भेद गिळून टाकले, त्यानं बुध्दाचा अवतारच आपलासा केला. एवढंच काय, साईबाबांचंदेखील 'विठोबाकरण' या महाराष्ट्राच्या भूमीत होऊ शकलं.
या पार्श्वभूमीवर नेमाड्यांच्या 'हिंदू' कादंबरीत नायकाचं नाव खंडेराव विठ्ठल म्हटल्यावर मला हसूच आलं, परवा. अरेच्च्या- म्हणजे नेमाड्यांनी 'हिंदू' मध्ये जेजुरी-पंढरी असा शैव-वैष्णव लंबगोल मानून त्याची खंडेराव आणि विठ्ठल अशी दोन केंद्र मानलीत कां काय? असा विचार मनात आला. की खंडेरावात हे हरिहर एकत्र झालेत? असा प्रश्नही मनात आला. देशी जाणीवांना व्यक्त प्रश्न करणारा ' पांडुरंग' सांगवीकर आणि दक्षिण आशियात पसरलेली बहुकेंद्री हिंदू जाणीव तपासणारा खंडेराव यांना वेधून असलेला विठ्ठल डोळ्यांना दिसला.
परवाच, सुषमा देशपांडेनं लिहिलेल्या 'बया दार उघड' या नाटकाची तालीम बघत होते. त्यातल्या विठा नावाच्या एका भक्ताची कथा सामोरी आली. तिचं मन विठोबावर जडलंय. आणि नवरा परंपरेचा आधार घेत शारीर बळजबरी करू बघतो. त्याला विठ्ठलाच्या प्रेमात दंग झालेली विठा सुनावते-
'तुझी सत्ता आहे देहावरी समज
माझेवरी तुझी किंचित नाही'
विठ्ठलाच्या भक्तीत सकस झालेले देशी स्त्रीवादाचे स्वर सुषमाच्या नाटकात भेटले. नुसताच हरी हर नव्हे तर स्त्री पुरुष भेदही गिळणारी विठू माऊली सामोरी आली.
या अशा सर्व काही व्यापून दशांगुळं शिल्लक राहणा-या विठोबाची मला आर्त आठवण येते आहे. आषाढीनंतर तृप्त वैष्णवजन आपापल्या संसारात परततील. मग माझ्या विठोबाला सवड मिळेल माझ्यासाठी. मला इरावती कर्व्यांना भेटलेला 'बॉयफ्रेंड' नको. मला हवाय या जगण्याच्या वाळवंटात माझं बोट धरून चालणारा माझा हक्काचा बाप. कृपा सिंधु करुणा करू, बाप रखुमादेवीवरू!