Friday, June 18, 2010

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव

मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय किंवा 'तुम्ही सारे कट करून मला गंडवताय' असं वाटून ठसठसतं दुखरं बनलंय. या सा-यासकट, मला मराठी मन नेहमी न्यूनगंडानं ग्रासलेलं दिसतं. 'जगात जे काही 'बेश्टं' आहे त्यापेक्षा मी पावछटाक कमी आहे' असा भाव मराठी माणसाच्या चेहे-यावर कायम दिसतो. जणू तो न्यूनगंड झाकून टाकायला मराठी माणूस आक्रमक आणि चिडका बिब्बा असल्यासारखा वसवसत असतो.
उदाहरणादाखल म्हणजे, इंग्रजी पत्रकारितेत प्रणव रॉय जर 'बेश्ट' असेल किंवा एन. राम- तर राजदीप कसा पावछटाक कमी वाटतो- तसं हे मराठी न्यूनगंडाचं दुखरं गळू आहे.
मराठी माणसाची चार प्रेमं बघितली तरी, उदाहरणार्थ, लताप्रेम, सचिनप्रेम, राजप्रेम आणि खरे मूळचे साहेबप्रेम; तर न्यूनगंडाच्या दुख-या निरगाठीचं राजकारण आपल्याला कळू शकतं. 'पावछटाक' कमी असण्याच्या वास्तवाचा तो प्रतिक्रियात्मक कडवा आविष्कार असतो. लताबाई - कारण ती जगातल्या कुठल्याही स्वर्गीय आवाजापेक्षा कमी नाही; किंबहुना काकणभर सरसच आहे. परमेश्वरानं बाईंच्या डोक्यावर हात ठेवलाय. मग लताप्रेम हा आमचा 'डिफायनिंग पॉईंट' आहे. सचिनप्रेम याच जातकुळीचं. या दोन 'भारतरत्न' मटेरिअल्सनंतरची मराठी माणसाची जी दोन प्रेमं आहेत, (राज) साहेब आणि मूळचे साहेब यांची; ती इतर प्रत्येक क्षेत्रातल्या ठसठसत्या डावललेपणाची भरपाई आहे. लताबाई आणि सचिन हे एकांडे शिलेदार आहेत. अनभिषिक्त साहेब आणि ओरिजिनल साहेब हे न्यूनगंडानं ग्रासलेल्या मराठी समाजाचे नेते आहेत. त्याच समाजासारखे दोघंही चिडके, दुखावलेले, हट्टी, प्रेमळ, सटॅक - मराठी माणसासारखेच प्रतिक्रियेत तिखट. दरक्षेत्रात 'आपण कुठेतरी कमी आहोत' या भावनेला कसा हात घालायचा, तो कंद कसा मॅनिप्युलेट करायचा, त्याचा राजकीय वापर कसा करायचा, त्या दुखरेपणावर अक्सीर इलाज शोधण्यापेक्षा त्याला दुखरं ठेवूनच अरेरावी कशी वाढवायची, याची पुरती गणितं या दोन्ही साहेबांना ठाऊक आहेत.
मराठी न्यूनगंडाचा राजकीय आविष्कार जसा 'सेना-प्रेमा'त होतो तसा तो इतरही अनेक ठिकाणी होताना दिसतो (पवारांनी मोठा केलेला मराठा महासंघ म्हणजे तरी काय आहे?). पण मग या न्यूनगंडाची ठसठस मागे तरी कुठपर्यंत जाते? त्या इतिहासाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न.
पेशवाईची सत्ता 1818 ला संपली. मग साहेबाचं कंपनी सरकार सत्तेत आलं. 'अधिकाधिक साहेबाळणं' हे सत्तेच्या जवळ जाण्याचं साधन झालं. बंगालमध्ये ही प्रक्रिया शंभरएक वर्षं अगोदर सुरू झाली होती. 'साहेबाळणं' प्रक्रियेचा बंगाली पुरूषांच्या प्रतिमेवर प्रचंड मोठा प्रभाव पडला. बंगाली बायकांच्या मदतीला बेण्टिकसारखे परकीय पुरूष आल्यानं बंगाली पुरूष हा पुरेसा 'पुरूषी' नाही असा त्याचा तेजोभंग इंग्रजांनी केला. बंगालच्या राजकारणावर, नंतरच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नांवर प्रतिमेचा हा प्रतिकार करण्याची निकड दिसून येते. महाराष्ट्रात मात्र 'साहेबाळण्या'ची ही प्रक्रिया काहीशी वेगळी होती. 'मर्द मराठयां'ना ब्रिटिश सत्तेच्या समोर झालेला पराभव जिव्हारी लागला. आणि म्हणून मर्द मराठयांच्या मनात 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला रेझिस्टन्स, प्रतिकाराची भावना कायम तेवती राहिली. मराठे आणि मुघल हे ब्रिटिशपूर्व सत्ताधारी! या दोघांचंही ब्रिटिशांशी नातं गुंतागुंतीचं आहे. पडतं घेऊन ब्रिटिशांसोबत सहकार्यानं वागणा-या इथल्या वैश्य वर्गापेक्षा या दोघांचं नातं प्रतिकारानं, लढयानं बनलेलं



आहे. अरे ला कारे? म्हणू शकणा-या 'मर्द'पणावरचा ब्रिटिश हल्ला म्हणूनच मराठी मनाला सहन झाला नाही. बंगाली पुरूषी प्रतिमेचा तेजोभंग ब्रिटिश काही प्रमाणात यशस्वीपणे करू शकले. मराठी माणसानं मात्र त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी वेषभूषा, इंग्रजी सत्ता यांच्याशी मराठी माणसाचं नातं विरोधाचं राहिलं. ज्याप्रमाणे उत्तरेतले नेहरूंसारखे नेते 'इंग्रजाळले' त्या तुलनेत मराठी नेतृत्व इंग्रजाळलं नाही. टिळक, फुले-शाहू यांनी देशी वाणात साहेबी गुणांना मिसळून टाकलं. हा सारा काळ हा दोन संस्कृतींच्या संघर्षाचा आणि सहजीवनाचा काळ होता. डाव्या नजरेनं आतापर्यंत या काळाला केवळ 'शोषणा'च्या एकांगी नजरेनं जोखलं. मात्र शोषणासोबत हा काळ अनेक नवीन मूल्यांच्या जन्माचा, दोन संस्कृतींच्या तुलनेचा, यातून आपण काय निवडायचं-काय नाकारायचं हे ठरवण्याचा, औचित्याचे प्रश्न उभे करणारा काळ होता. या काळात ज्या 'मर्द' मराठयांनी (इथं मराठा हा शब्द जातिवाचक घेतलेला नाही. 'मराठी माणसांनी' या अर्थानं मराठयांनी या शब्दाची योजना केली आहे.) 'साहेब शरणता' डावलण्याचा पुरूषार्थ केलेला दिसतो. मात्र हे गणित गांधीबाबांच्या आगमनानंतर ढासळलं. टिळकोत्तर गांधींच्या राजकारणाच्या उदयात मराठी न्यूनगंडाची काही बीजं दिसून येतात. या सगळया काळाचं विवेचन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात केलंय. गांधींच्या तालमीत तयार झालेले शंकरराव देवांसारखे नेते 'मराठी' राहिले नाहीत.

डॉ. केतकरांनी भाषिक राज्यासाठी धरलेला आग्रह, सावरकरांची भाषाशुध्दीची चळवळ या दोन्ही गोष्टी या 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला दिलेली तिखट उत्तरं म्हणून तपासाव्या लागतील. त्याचबरोबर नाना पाटलांचं 'पत्री सरकारही.' 'राष्ट्र' नावाची एक महाकाय नवी संकल्पना उदयाला येताना, 'लोकशाही' नावाचं 'एक माणूस - एक मत' असं नवं राजकीय मूल्य रुजत असताना 'साहेबोत्तर' पिढीमध्ये राष्ट्रीयत्वासाठी मराठीपण नाकरण्याकडे कल राहिला.
स्वातंत्र्योत्तर भारतात जे 'मराठी' विचारवंत झाले ते 'मराठी' नव्हते. ते राष्ट्रीय विचारवंत होते. त्यांच्या मते फक्त मराठीचा विचार म्हणजे संकुचित विचार. या उलट लोकशाहीवादी राष्ट्रीयत्वाचा विचार करणा-या नव्या राजकीय नेत्यांची फळी स्वातंत्र्योत्तर भारतात दिसते. हे नेते जन्मानं मराठी आणि विचारानं राष्ट्रीय होते. या सा-या काळात विनोबांनी 'महाराष्ट्र धर्मा'चा थोडासा विचार केलेला दिसतो. मात्र काका कालेलकर ते ना.ग. गोरे, एस.एम., मधू लिमयांपर्यंत व्हाया पटवर्धनबंधू पोस्ट-गांधी मराठी नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं. कम्युनिस्टांमधले डांगे-रणदिवे हे 'मराठी' नव्हेत तर राष्ट्रीय नेते होते. नवीन राष्ट्रवादाच्या कल्पनेचा अनुषंग म्हणूनच त्या सर्वांनी एकत्र येऊन 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' केली. ही चळवळ 'महाराष्ट्र' वेगळा हवा यासाठी नव्हती तर भारत देशाचा तो एक सकस भाग व्हावा म्हणून आणि मुंबईवरच्या मराठी शिक्क्यासाठी तो लढा होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्राकडे 'अस्मिते'चा लढा असं बघता येत नाही, तर राष्ट्र संकल्पनेला अधिक लोकाभिमुख करणारी ती चळवळ होती. सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असा की औद्योगिकीकरण, शहरीकरण या सर्व साहेबी काळापासून सुरू झालेल्या प्रक्रियांनी साठच्या दशकात अधिक वेग घेतला. आणि 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला प्रतिकार करणारा 'मराठी माणूस' स्वातंत्र्योत्तर आधुनिकतेत काहीसा मागे फेकला गेला. मराठी माणूस राहिला मुंबईचा कामगार आणि इंग्रजी शिकलेले दाक्षिणात्य मुंबईत नोक-या पटकावते झाले. याच काळात माटुंग्याचं 'मांटुंगम' झालं. शहरीकरणाच्या प्रक्रियेत राजकारण पालटलं आणि 'माझ्या भूमीत मी डौलानं माझ्या जातीय अहंकारासकट उभा राहीन' असं मानणा-या मराठी माणसाचा अहंकार ठेचला जाऊ लागला.
नवीन वैश्य गणितात मराठयांच्या क्षात्र तेजाची किंमत उरली नाही. म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली, मात्र वैश्य वृत्ती जोपासणा-या गुजराथी-मारवाडी-सिंधी-पंजाब्यांनी ती काबीज केली. मराठी न्युनगंडाचं दुसरं दुखरं कारण मला या साठीच्या दशकातल्या 'वैश्य' मुंबईत दडलेलं दिसतं.
अजूनही मुंबईत नवे उद्योग येताना मुंबईतले मराठी नेते कॉण्ट्रॅक्टस मागतात. इथलं सिक्युरिटीचं कॉण्ट्रॅक्ट आम्हाला द्या, इथं माझी मुलं कामाला लागतील. इथली युनियन आमची असेल. मात्र या मुंबईत नवे व्यवसाय सुरू करणारी मराठी माणसं कमी आहेत. या 'वैश्य' गणितात 'क्षात्र' क्षात्र 'तेजानं कंत्राटं आणि गुरगुर करून मिळवलेला उक्ता माज या पलीकडे काही साध्य केलेलं नाही. दुसरीकडे वाङ्मयीन जगात पुरेसा परिपुष्ट नसलेला नेमाडयांचा देशीवाद याच वैश्य राजकारणात उगवताना दिसतो. क्षात्र तेजाची पीछेहाट दिसून येते. मुंबईला महाराष्ट्रात आणण्यात 'संयुक्त महाराष्ट्रा'ची चळवळ यशस्वी झाली खरी, पण 'मराठी' माणूस मुंबईच्या जिओपॉलिटकल अर्थकारणातून बाहेर गेला.
मध्ययुगीन काळापासून मराठयांचं एक लक्षण सांगितलंय- ' दिध्ढले, गहिल्ले, कलहशीले'... हे कलहशीलत्व मात्र मराठी मनानं मनापासून जोपासलं. डावी चळवळ ते व्हाया शरद जोशी, मेधा पाटकर हे कलहशीलत्व मराठी माणसानं नीट संपन्न केलं आहे. त्याच्या दुख-या, ठसठसत्या अहंकाराला शोभेल अशा एकांडेपणानं. या एकांडया शिलेदारांना सामाजिक नेतृत्व लाभलेलं नाही. शरद जोशी-मेधा पाटकरांना काही काळ मायनॉरिटीचा पाठिंबा लाभला. त्यांचे साहेब झाले नाहीत. या सा-या प्रकाशात मला दिसतात महाराष्ट्रातले तीन साहेब- पवारसाहेब, जे दिल्लीच्या राजकारणात पावछटाक कमी पडले, मूळचे खरे साहेब- ज्यांनी डरकाळया फोडून मुंबई गाजवली आणि हे नवे येणारे अनभिषिक्त 'राज'साहेब. या तीन साहेबांनी महाराष्ट्रात नवा 'साहेबाळलेला वर्ग' निर्माण केला आहे.
वैश्य गणितातली दुसरी बाजू 'चिपा'त मिळणा-या कामगारांची होती. त्या मराठी कामगार वर्गालाच आता उत्तर भारतीयांबरोबर फाईट द्यावी लागते आहे . आमचं दुखणारं गळू अगदी टेकीला आलंय. तुम्ही जातीनं कुणीही असा- नुकताच हॅपी बर्थ डे झालेले 'राजसाहेब' मराठी माणसाला जातीपलीकडे जाऊन आवडतात.
'भाषाशुध्दी' आणि 'पाटया बदला'ची घोषणा त्यांच्या कामी आली. सावरकर खरे 'हिंदू हृदयसम्राट' तर राजसाहेब 'मराठी हृदयसम्राट झाले आहेत !'
आम्ही आधुनिकतेच्या क्रिकेटमध्ये कबड्डी खेळत मागे पडलो. आता, ग्लोबल बास्केटबॉलमध्ये आमचा टिकाव लागणार आहे का? आम्ही आता हा नवा गेम आपलासा करणार की अस्मितेच्या राजकारणाचा डाव खेळणार? वेगवेगळया सांस्कृतिक राजकारणाचं हे मैदान आहे. पंजाब्यांनी आपल्या न्यूनगंडावर स्वत:मधल्या जोमानं, रगीनं मात केली आणि गुजराथ्यांनी आपल्या पैशानं त्यावर मात केली. आम्ही निदान अकलेच्या जोरावर या न्यूनगंडापलीकडची छलांग मारायला रेडी आहोत का? की पुन्हा 'पाटया बदला'चा गेम खेळून आम्ही रडीचा डाव करणार आहोत? 'हॅपी बर्थ डे' झालेले साहेब तो डाव खेळतायत... आपण तोच डाव पुढे रेटणार का? हा प्रश्न आहे.

Friday, June 4, 2010

खेळ ‘बुध्दी–बुध्दी’चा

मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी भाषिक समुहात अजूनतरी प्रिमियम नाही. मराठी माणूस हुशार समजतो तरी कोणाला? आणि या हुशार समजण्याची परंपरा तपासली तर काय लक्षात येते? आपली हुशारपणाची व्याख्या बदलत चाललीय का? स्वत:ला हुशार समजणा-या; शिवाय, ज्यांच्याकडे यशस्वीतेचे ठोस ब्रॅंडिंग आहे अशा माणसांना जर मराठी इतिहासातली ‘हुशार’ नावे विचारली तर त्यात शिवाजी महाराज, पहिला बाजीराव- द ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट आणि नाना फडणवीस या कॉमन थीम्स दिसतात. पोस्ट-पेशवाई हुशारीत राजवाडे-केतकर-टिळक आणि स्वातंत्र्यकालीन हुशारीत एकीकडे तर्कतीर्थ टाईप मंडळी तर दुसरीकडे सीडी देशमुख या उच्चवर्णीय नावांचे उल्लेख दिसतात. डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले यांना त्यांच्या बौद्धिक कामगिरीबद्दल नावाजण्याची चाल उच्चवर्णियांमध्ये नाही हेही खेदाने जाणवते. इतकेच काय सावरकरांच्या हुशारीचे कौतुक करताना राजारामशास्त्री भागवत किंवा कर्मवीरांसारखा व्हिजनरी पुण्यामुंबईकडे पूर्णत: नजरेआड होतो. हुशार समजण्याच्या प्रक्रियेत ‘जेंडर’ ही पण दुफळी दिसते. पंडिता रमाबाई, इरावती कर्वे आणि दुर्गाबाई यांच्याखेरीज हुशार बायकांच्या नामावळीत नावे सापडत नाहीत. ताराबाई शिंद्यांच्या थेट जिनिअसचा उदोउदो ऐंशीच्या दशकात, स्त्रीमुक्तीचे वारे वाहता असताना दिसतो. एकीकडून ‘हुशार’ कोणाला म्हणायचे? हे जातिनिहाय ठरत जाताना – स्वातंत्र्योत्तर काळात ते विचारप्रणालीनिहाय ठरलेले दिसते. एकीकडे डांगे, कर्णिक, तळवलकर परंपरा, दुसरीकडे व्हाया तर्कतीर्थ, मे.पुं.रेगे वाई परंपरा, तिसरी प्रोफेशनल लोकांना बुद्धिमान मानण्याची परंपरा म्हणजे डॉ. शिरोडकर किंवा आयएएस अधिकारी किंवा लेखक यांच्यांतली हुशारी मराठी भाषिक समुहाने नावाजलेली दिसते. हुशार असण्याच्या व्याख्येत – विविध विषयांमधली व्युत्पन्नता, सोबत मराठी भाषिक समुहाशी जोडून घेण्याची क्षमता आणि काही प्रमाणात लेखन व वक्तृत्व गुण हे जणू काही आवश्यक घटक होते. समाजवाद्यांच्या गटात त्यामुळे अच्युतराव पटवर्धन, नाथ पै ते मधू लिमये ही नावे, तुम्ही समाजवाद्यांपैकी कोणते समाजवादी आहात यावर अवलंबून घेतली जातात. काही वेळा मराठवाड्यात कुरुंदकर, विदर्भात जिचकार किंवा सध्याच्या महाराष्ट्रात मुंबई- पुण्यात टिकेकर अशी विभागवार हुशारांची नामावळी देखील दिसते. याशिवाय विज्ञान विषयात नारळीकर किंवा संत साहित्यासाठी यू. म. पठाण , सदानंद मोरे अशी विभागणी दिसून येते स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषिक समुहाने दोन परिमाणे शोधून काढली. दहावी परीक्षेत बोर्डात नंबर येणे – आणि त्या खालोखाल आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे. अमेरिकेचा व्हिसा प्रोफेशनल्ससाठी सत्तरच्या दशकात खुला झाल्यावर डॉक्टर होऊन अमेरिकेत जाणे हेदेखील ‘हुशार’ असण्याचे लक्षण बनून गेले. मेनस्ट्रीम मराठी समुहाला या तिन्ही गोष्टी अजून महत्त्वाच्या वाटतात. शरद जोशी ते अविनाश धर्माधिकारींच्या पिढीपर्यंत आयएएस होण्यात / प्रशासकीय सेवेत निवड होण्यात ‘हुशार’ असण्याची ग्लोरी आहे असे मराठी समाजाला वाटत होते. मात्र आता, पोस्ट-भूषण गगराणी काळामध्ये (भूषण गगराणी आठवण्याचे कारण, त्यांनी मराठी वाड्मय हा विषय ऐच्छिक म्हणून घेतला होता, त्याचा उल्लेख सतत होतो!) सरकारी बाबूंना हुशार समजायची चाल फारशी उरलेली नाही. कदाचित गगराणी हे त्या यादीतले अपवाद असतील. मराठी भाषिक समुहात चिंतक, विद्वान, विचारवंत, लेखक यांची मांदियाळी निर्माण झाली – तशीच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही; परंतु हुशारपणाच्या पॅरामिटर्सवर अधिराज्य बहुतांश ‘ब्राह्मणी’ कल्पनांचे होते. ( जसे परवा मुकादमसर म्हणाले, की बाबा आढावांना कुठे आम्ही विचारवंत मानतो अजून?) याला थोडासा छेद देणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे तेंडुलकर आणि कुमार केतकर. ज्यांना पठडीपलीकडच्या डाव्या मतांचे कौतुक आहे अशाच लोकांना तेंडुलकर-केतकरांसारखे क्रिटिकल लेखक आवडतात आणि त्याच क्रिटिकल समुहात मेघा पाटकरांबद्दल आदर-पुष्पा भाव्यांच्या लेखनाचे कौतुकही वाटते. मात्र ‘प्रमाण’ मराठी भाषिक समुहाची ही चाल नाही. नव्वदच्या दशकात, आयटी क्षेत्राने बाजी मारल्यावर, फक्त बुद्धिमता नाही तर त्याबरोबर ‘पैसा’ हे प्रामाण्यदेखील आवश्यक झाले. आता नारायणमूर्ती, नंदन नीलेकनी हे ‘हुशार’ असण्याचे आणि डॉ. अभय बंग किंवा डॉ. प्रकाश आमटे हे सामाजिक भान असण्याचे मानदंड झाले. पुण्यात जन्माला आला असाल तर कपाळावर ज्ञान प्रबोधिनीचा ठप्पा हा अनेक काळ बुद्धिमान असण्याची पावती मानला जायचा. ज्ञानप्रबोधिनी, आयआयटी आणि अमेरिका या तीन गोष्टी म्हणजे पोस्ट-पेशवाई पुण्यात अजूनही हुशारीची चलनी नाणी आहेत. प्रबोधिनी नसली तर निदान पक्षी दहावी-बारावीची मेरिट लिस्ट हे नाणे तर कालपरवा, मेरिट लिस्ट खारीज होईपर्यंत चालायचे. ‘ज्ञानप्रबोधिनी’त प्रवेश परीक्षेत IQ टेस्ट घ्यायचे किंवा अजूनही घेतात. माझा मास्तर पॉल प्रायव्हेटिअर याचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ हे पुस्तक वाचत असताना मराठी ‘हुशारपणा’च्या व्याख्येचा हा इतिहास, त्यातले महत्त्वाचे नामोल्लेख मनात येत होते. पॉल प्रायव्हेटिअरने तर IQ या प्रकाराची सामाजिक मुळे शोधून काढून हा कोशंट ठरवणे हे सांस्कृतिक दृष्टया भेद करण्यासाठी निर्माण केलेले साधन कसे आहे याचा इतिहास लिहिलाय. ज्ञानप्रबोधिनी-ठप्पा, हुशारांचा IQ यांवरच पॉल प्रायव्हेटिअरचे पुस्तक प्रश्नचिन्ह निर्माण करते. पॉल सोबत शिकताना 'हुशारीकडे' एक स्वायत्त , निसर्गदत्त वस्तू म्हणून न बघता एक सामाजिक प्रोडक्ट म्हणून बघण्याची सवय लागली. मराठी हुशारीच्या perceptions म्हणून तपासणं महत्वाचं ठरत गेलं. कोणता ही समाज ‘बुद्धिमत्ता’ म्हणजे काय, हे कसे ठरवतो? मी एखाद्या आदिवासी पाड्यावर जन्माला आले असते तर माझे रान वाचायचे स्किल हे माझ्या हुशारीत गणले गेले असते का? की नाही? मात्र सध्या ब्राह्मणी हुशारीचे-मानदंड कोसळतायत, अशा वेळी नवे मानदंड नसल्यामुळे, सर्वात सोपे – म्हणजे पैसा-प्रामाण्य हुशारीला सब्स्टिट्युट म्हणून वापरले जाते. मात्र मी आता एका दुस-या डायनॅमिक्सकडे बघत आहे. मला वाटते, की जेव्हा रिसोर्सेस मर्यादित असतात तेव्हा त्या मर्यादित रिसोर्सेसवर कुणाचा हक्क आहे यातून सत्ता निर्माण होते आणि ती सत्ता एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना, बुद्धिमत्तेला उत्तेजन देते. सध्याच्या सगळ्या हुशार ‘डिजायनर्स’च्या पिढीकडे बघितल्यावर मला हे कुठेतरी जाणवते. NID किंवा IDC मध्ये प्रवेश मिळवणे दुरापास्त आणि म्हणून ही मायनॉरिटीतली ‘डिजायनर्स’ मंडळी दिवसेंदिवस ‘निश’ म्हणून बुद्धिमान गणली जातात. नव्या पोस्टमॉडर्न बाजारात अँडव्हर्टायजिंगला किंमत नाही. आता मानाचे स्थान आहे ते डिजायनर्सना. मात्र मराठी भाषिक समुहात हे नवीन परिमाण अजून आलेले नाही. आम्हाला अजूनही टीव्हीवरची चमको मंडळीच ‘हुशार’ वाटतात! अजूनही आमचे लेखक त्यांच्या परदेशी डिग्र्या आणि मेरिट लिस्टमधल्या नंबरांवर खूष आहेत. आम्हाला ‘डिजायनर्स’मधली हुशारी समजेस्तोवर – डिजायनर्सच्या सात पिढ्या झालेल्या असतील. हे सगळे बघताना मन आतून खंतावते. पण मग ज्यांनी आपलं आयुष्यं डिजाईन केलं त्यांचं काय? माणसाला माणूस म्हणून ओळखणा-या, अंतर्बाह्य integrity असणा-या, आपण जे कोणी आहोत त्या आपल्या स्पिरिटला पूर्ण उपलब्ध होणा-या ‘हुशार’ माणसांबद्दल सध्या तरी मराठी भाषिक समुहाला काही ठाऊक नाही. आणि व्हिज्युअल भाषेत बोलणारे नवे हुशारप्राणी शब्दांतून दूर जायला लागल्यामुळे आता ‘माध्यम-चतुर’ आणि ‘व्हिज्युअल-तल्ल्ख’ अशा नव्या कॅटॅगरीज तयार होताना दिसतात. पॉल प्रायव्हेटिअरचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ वाचून झाल्यावर जुन्या परिमाणांवरचा माझा क्रिटिकल रोष मलाच उमजून आला आणि त्याच प्रकाशात, ‘बुद्धी-बुद्धी’च्या मराठी खेळाची झालेली गोचीदेखील मला स्पष्ट दिसू लागली..