Wednesday, October 7, 2020

शंभर मी - एक ज्ञानशास्त्रीय प्रयोग

श्याम मनोहर यांची नवी कादंबरी ‘शंभर मी’ हा मराठी कादंबरीलेखनाच्या परंपरेतला एक महत्त्वाचा प्रयोग आहे- मराठी वाचकांनी त्याचा अनुभव घ्यायला हवा असा.

श्याम मनोहर आवडणार्‍या लोकांना ‘नेमाडे’ नावडतात. किंबहुना, नेमाडे नावडतात म्हणूनच श्याम मनोहर आवडतात असं त्यांनी ठरवलेलं असतं. अशा आवडीत आणि नावडीतही फारसं स्वारस्य नसतं. कारण कादंबरीच्या श्रेष्ठत्वाच्या निकषांवर नव्हे तर व्यक्तिगत किंवा साहित्यिक राजकारणाचा भाग म्हणून अशी आवड-निवड जन्माला आलेली असते.

मराठी कादंबरीच्या पटावर भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर हे दोन ध्रुव आहेत. नेमाड्यांची कादंबरी काळाच्या विस्तृत पटावर प्रोटॅगॉनिस्टला उभा करून त्याच्या नजरेने असण्याचा अन्वय मांडते. नेमाडे भावात्मक बुद्धीची कमाल दाखवताना कधी राजकीय खेळी रचतात. नेमाड्यांची कादंबरी वाचकाला गुंगवते, त्यावर गारूड करते

मनोहरांची कादंबरी वाचकाला, त्याच्या एकसंध असण्याच्या पूर्वकल्पनेला प्रश्न करत त्याच्यावर गारूड तर करत नाहीच, उलट त्याला भानावर आणते, जागं करते, सलगतेच्या हिप्नॉसिसमधून बाहेर काढायला वेगवेगळ्या प्रश्नांचे व्यूह रचते. त्यामुळेच श्याम मनोहरांची कादंबरी ही मराठीतील खर्‍या अर्थाने शोधनमार्गाने जाणारी कादंबरी आहे.


‘शंभर मी’ हा प्रयोग आहे. या प्रयोगाला कादंबरी का म्हणायचं? ‘कादंबरी’ असण्याच्या आवश्यक आणि पुरेशा अटी कोणत्या? काळाची रचना, निवेदन, पात्रांची रचना, कथानक, त्यातला संवाद, विरोध, समतोल? ‘कादंबरी’ हा आधुनिकतेला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेला घाट अनेकांनी विविध प्रकारांनी राबवलाय. ‘शंभर मी’ ही या समकालाची कादंबरी आहे. अस्मितेच्या हजार तुकड्यांत विखुरलेला ‘मी’ आणि त्याच्या विखुरलेपणाला सामोरी जाणारी भाषा या दोन्हीचं डायलेक्टिक लौकिक ‘शंभर मी’ने नेमकं पकडलंय. ते पकडताना कंद प्रश्नाने सांधलेला, हजार तुकड्यांत विखुरलेला फॅार्म त्यांनी शोधून काढलाय.

श्याम मनोहरांच्या लेखनावरच्या जे. कृष्णमूर्ती आणि नित्शेच्या प्रभावावर सतीश तांबे यांनी ‘लेखाजोखा’मध्ये लिहिलं आहे. श्याम मनोहरांच्या लेखनावर एक तिसरा अत्यंत खोल प्रभाव आहे तो म्हणजे वैज्ञानिक शोधप्रणालीचा. अविवेकी मनुष्यप्राण्याची विवेकाची निकड फक्त शास्त्राच्या चौकटीत भागवली जाते. त्या मेथडॉलॉजीचा प्रयोग-अनुमान-निष्कर्ष पद्धतीचा श्याम मनोहरांच्या कादंबरीरचनेवर प्रभाव आहे. ‘शंभर मी’ हा या अर्थानेही ‘मी म्हणजे काय काय काय’ शोधणारा प्रयोग आहे.

‘मी कोण?’ हा भारतीय संस्कृतीतील आद्य प्रश्न. उपनिषदांतले ऋषीदेखील रानात जाऊन हे सारं भवताल बघणारा, अनुभवणारा, भोगणारा ‘मी’ कोण आहे, या प्रश्नापासून सुरुवात करून आत वळायचे. एका अर्थाने श्याम मनोहरांनी ‘मी कोण’ला डावलून ‘मी काय?’ हा प्रश्न विचारून भारतीय अध्यात्माच्या कचाट्यातून कादंबरीची मुक्ती करून घेतलीय.

‘मी काय?’ची अनेक उत्तरं- (शंभराहून अधिक) त्यांनी रचली आहेत. नामरूपाकडून सुरुवात करून तो ‘मी’ नक्की वर्णन करता येतो काय? (प्रणवमामा, ओंकारमामा, सोहंमामांचं प्रकरण.) की शरीर, सेक्स, मूल होणं, जन्म, वंध्यत्व या जैविक हालचालींतून प्रगट होतो? श्याम मनोहरांची ‘शंभर मी’ सलील वाघांच्या भाषेत बोलायचं तर ‘विनानेपथ्याच्या निवेदनभूमी’वरून या प्रश्नाकडे बघते.

वाचकाला प्रोटॅगॉनिस्टचा एकसंध ‘मी’ ही कादंबरी लाभू देत नाही, तर ‘मी’च्या हजार ज्ञानशास्त्रीय शक्यता ती तपासते. ‘मी’चं स्वरूप तपासणं हा तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात सत्ताशास्त्रीय प्रश्न आहे. ‘मी’चं असणं श्याम मनोहर तपासतात तो सारा प्रयोग ‘मी’चं ज्ञानशास्त्रीय संशोधन आहे.

भाषेतला ‘मी’, लहान मुलाचा ‘मी’, दुसर्‍याचा ‘मी’ न्याहाळणं हे क्रौर्य आहे हे जाणलेला ‘मी’, संस्करणातून अविवेकासकट जगू पाहणारा, अहंकारातून मुक्ती झाल्याचं भान येणारा एका प्रेताचा ‘मी’- सारे ‘मी’ श्याम मनोहर एकत्र आणतात, रचतात, त्यांची मांडणी करतात. वाचकाला या ‘मी’च्या ‘काय काय’पणाला प्रश्न करायला लावतात.

श्रेष्ठ कलाकृती ही संस्कृतीच्या केवळ समकालीन नव्हे तर निरंतर प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते. ‘शंभर मी’ ते साध्य करते. म्हणूनच ती श्रेष्ठ कलाकृती आहे.

‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तम राव’, ‘कळ’ आणि ‘उत्सुकतेने मी झोपलो’ हे श्याम मनोहरांचे प्रयोग मानवी अस्तित्वाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. या तिन्हींपेक्षा ‘शंभर मी’ निराळी आहे ती तिच्या वाचनीयतेमुळे आणि अ‍ॅक्सेसिबिलिटीमुळे. अधिक अधिक मोठ्या साक्षर समुदायापर्यंत पोहोचण्याची क्षमता असणारी वाचनीय कलाकृती हे ‘शंभर मी’चं आणखी एक बलस्थान.


समकालातील एक महत्त्वाचा, जागं करणारा, भानावर आणणारा प्रयोग म्हणून ‘शंभर मी’ ही जशी वाचली जाईल, अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल तशी तिची महत्ता परिचित होत जाईल.


आपली स्मृती एका सलग ‘मी’ची निर्मिती करते. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनुभव घेणारा एक सलग ‘मी’ देहाच्या आत राहतो, अशी परस्परपोषक समजूत बाळगून समाजव्यवहार चालतात, पण ज्ञानव्यवहार तसा चालत नाही. 


मूल न होणार्‍या बाईचा ‘मी’, बायको दुसर्‍याला लागू असलेल्या पुरुषाचा ‘मी’, मनातल्या मनात रचलेल्या प्रयोगांचा साक्षीदार ‘मी’, भाषेत व्यक्त होणारा लिंगांची विभिन्नता ओळखणारा ‘मी’ हे ‘शंभर मी’तले सारे ‘ व्यवहारातले आणि तरीही सलग न राहू शकणारे 'मी’ आहेत.

मला जाणवणारा मनोहरांच्या ‘मी’च्या विश्लेषणातला, स्त्रीलिंगी ‘मी’च्या चित्रीकरणातला परंपरागत भाबडेपणा कधी अस्वस्थ करतो. मात्र, अशा काही जागा वगळता हा ‘मी’ ज्ञानव्यवहारात लिंगभावनिरपेक्ष वावरत असतो.


ग्लोबलायझेशनने मुक्त झालेला (काही प्रमाणात) समाज किती निरनिराळ्या माहितीच्या इनपुट सिस्टीम्सवर पोसला जातो आणि त्यातून व्यक्तींचे ‘मी’ कसे घडत जातात याचा ज्या सूक्ष्म नजरेने मनोहर वेध घेतात तो खरोखरच अभ्यासपूर्ण आहे.

असणे म्हणजे काय? ‘मी’ची भरवण करताना भवतालातून कोणत्या गोष्टींना ‘मी’ स्वीकारतो त्याला प्रश्न विचारतो, त्यामुळे घडविला जातो. ही सारी प्रक्रिया मनोहर निगुतीने मांडतात.

या कथात्म साहित्यातला ‘मी’ मानवांना सांगतो, ‘मानवहो, मी तुमची श्रद्धा मागत नाही. तुम्हाला स्वतंत्र ठेवतो.’ तर वाचकाला स्वातंत्र्याच्या भानापर्यंत नेणारी ही आधुनिक, शोधनमार्गी संहिता आहे आणि प्रयोगशील वाचकासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे यात शंका नाही.


शंभर मी / श्याम मनोहर / पॉप्युलर प्रकाशन /

पृष्ठे : ३३६/ मूल्य : ३२५ रुपये

Friday, September 11, 2020

मूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग




समाजमानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात 2010 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर २००४ साली वादग्रस्त लेख लिहिला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक लेखांतून आणि मुलाखतींतून चंगळवादी बनलेल्या, जुनी मूल्ये हरवलेल्या मध्यमवर्गाचे विश्लेषण हे सूत्र सतत दिसून येत होते. भारताच्या आर्थिक प्रगतीचे खरे पेव ज्या वर्गामुळे फुटले तो हा 'द ग्रेट इंडियन मिडलक्लास'! नंदी मात्र या मध्यमवर्गाला आर्थिक प्रगतीचे व्हॅनगार्डस न मानता - फक्त वस्तूंचा वापर, विक्रय आणि त्यावर उधळपट्टी करणारा, मूल्यांची चाड नसणारा हुकुमशाहीशरण मध्यमवर्ग आहे असे मानतात आणि त्यांवर टीका करतात. मोदींना निवडून आणणारा हा मध्यमवर्ग आहे.


आपण सगळे स्वतःला मध्यमवर्गाचा भाग समजतो म्हणून ही 'नव्या-मध्यमवर्गा'वर होणारी टीका समजावून घेणे, तिचा विचार करणे आणि त्यातला कंद मुद्दा जाणून घेणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटतं.

मध्यमवर्ग म्हणताक्षणी आपल्या नजरेसमोर त्या मध्यमवर्गाच्या मूल्यांचा एक समुदाय उभा ठाकतो. नेकीने नोकरी करणे, कामात सचोटी बाळगणे, शिक्षणाला -डिग्रीला प्रचंड महत्त्व देणे, न्याय्य भूमिकेसाठी आग्रह धरणे, चौकटीतले जगणे जगत असताना त्या चौकटीबाहेरच्या, त्यात सामावल्या न जाणा-या व्यक्ती अगर समूहांबाबत चॅरिटेबल विचार करणे, हिंसेची भयास्तव का होईना नालस्ती करणे, उधळपट्टी न करणे, बचत हे मूल्य मानणे, कर्जाला घाबरून असणे, कोर्ट-कज्ज्यांना शक्यतो नाकारणे; तरीही नेहरूप्रणित समाजवादी, लोकशाही मूल्यांच्या चौकटीत सर्व विसंगतींसकट बसणे अशी मूल्ये 'जुन्या मध्यमवर्गा'चा विचार करताना दिसून येतात. मराठी मध्यमवर्गाने ही सरमिसळ, नेमस्त मूल्ये कित्येक काळ उराशी बाळगली.

जगभरातच मध्यमवर्गाची निर्मिती ही औद्योगिकीकरणानंतर झाली. फ्रेंच भाषेत औद्योगिकीकरणानंतर जन्माला आलेल्या या वर्गाला 'पेटी बूर्ज्वा' असे नावही मिळाले. शहरीकरणाच्या प्रक्रियेत, रॅशनल आर्थिक गणितात शेतीपासून क्रमश: तुटत गेलेला हा 'व्हाईट कॉलर' समाज निर्माण झाला. आधुनिक शासनाने निर्माण केलेल्या नोकरशाहीने या मध्यमवर्गाला पगार दिले आणि त्यातूनच ज्ञान श्रमातून, व्यवस्थापन श्रमातून, सल्लागार श्रमातून वाढणारी मध्यवर्गीय मूल्ये निर्माण झाली. भारतात या मध्यमवर्गाच्या उगमाकडे जाताना इंग्रजांच्या राज्यातल्या 'बाबू' लोकांकडे प्रथम जावे लागते. शिक्षक, कारकून, साहेब ते सैन्यातले छोटे अधिकारी या सर्व, शासनाने पोसलेल्या पगारी नोकरदारांमधून भारतीय मध्यमवर्गाची निर्मिती झाली.
भारतातल्या या पहिल्या फळीतल्या मध्यमवर्गाने ज्यामध्ये तथाकथित उच्चवर्णीय जातींचा समावेश होता त्यांनी, परंपरागत उच्चवर्णीय मूल्ये आणि इंग्रजी सत्तेला आवश्यक ती पाश्चात्य मूल्ये यांच्या संकरातून आपले पर्याय निवडले. 'वर्क इज वर्शिप’, ‘ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी' ही काही ब्राह्मणी मूल्ये नव्हती तर ती प्रोटेस्टंट मूल्ये होती. अशा भारतीय उच्चवर्णीय आणि पाश्चात्य मूल्यांच्या संकरातून जुन्या मध्यवर्गीय जाणिवा निर्माण झाल्या.

असे सगळे लिहिताना मला मराठी वाड्मयीन परंपरेतले काही प्रातिनिधीक मध्यमवर्गीय आवाज आठवतात - केतकरांपासून ते अगदी तेंडुलकरांच्या 'कन्यादान'पर्यंत, या मध्यमवर्गाची वेगवेगळी रूपे समोर येतात. या सगळ्यांच्या जोडीने शाहुमहाराजांमुळे पश्चिम महाराष्ट्रात थोडा निराळा मध्यमवर्ग निर्माण झाला. कर्मवीर ते किर्लोस्करवाडी असे त्या मध्यमवर्गाचे काही ठळक प्रवाह आपल्या नजरेसमोर येऊ शकते.

या जुन्या मध्यमवर्गाच्या मूल्यांचे रेषेरेषेच्या फरकाने प्रतिनिधीत्व मटा, लोकसत्ता ही माध्यमे परंपरा मराठीत करताना दिसते. जुना मटा बदलला, तशी जुनी मटाप्रणित मूल्ये बदलली आहेत. आता ‘शॉपर्स स्टॉप’ आणि ‘मॉल्स’मध्ये जाणारा, क्रेडिट कार्ड, आयटी, इंग्लिश, मॅकडीचे बर्गर- संस्कृतीतल्या मध्यमवर्गाकडे, बाय द वे ज्याला एकीकडून दिवाळी पहाट, आणि संदीप खरे आवडतात त्या मध्यमवर्गाची मूल्ये कोणती आहेत? हा नवा मध्यमवर्ग 'मूल्ये' हरवलेलाआहे की त्याने त्याची नवी मूल्यव्यवस्था बनवली आहे? आणि ती जुन्या मध्यमवर्गाला पटत का नाही?

अमेरिकन हावरटपणा, भारतीय दुटप्पीपणा यांच्या उथळ मिश्रणातून या नव्या मध्यमवर्गाची काही मूल्ये जुन्या मध्यमवर्गाला उलगडताना मला दिसताहेत. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक भाबडा, सुलभ नॉस्टॅल्जियादेखील जाणवतो आहे.

नवमध्यमवर्गाच्या या हपापलेपणाकडेही आपल्याला सांभाळून बघावे लागेल. स्थलांतराने, आपल्या मूळांपासून पूर्ण फारकत झालेल्या या नव्या मध्यमवर्गाने आपले सारे काही सुबत्तेसाठी पणाला लावले आहे. आपली, 'बिलाँगिंग'ची भूक हा मध्यमवर्ग वस्तूंनी भरून काढतोय! त्याला सगळे हवे आहे, आत्ताच्या आत्ता! त्याला याच आयुष्यात सारी सुखे उपभोगायची आहेत. हे करताना, अमेरिकन मध्यमवर्गाला काही परिमाणात लपेटून बसलेली सुप्त गिल्ट या भारतीय मध्यमवर्गाला डसलेली नाही. त्यामुळे भारतीय नवा मध्यमवर्ग हा अधिक खुला, अधिक बॅंडएड उत्तरे शोधणारा बनत चाललेला आहे. युरोपीयन मध्यमवर्गाला असलेले विवेकवादाचे झाकण किंवा अमेरिकन मध्यमवर्गाला ग्रासणारी ख्रिश्चन पापकल्पना भारतात नाही. म्हणून भारतीय नव्या मध्यमवर्गाची हिंसा आणि हावरटपणा दिवसेंदिवस exponential वेगाने वाढत जाणार हे उघड आहे.

मग या नव्या मध्यमवर्गासाठी नवी मूल्ये येणार तरी कुठून? मला या प्रश्नाचे उत्तर दोन बाजूंनी सापडण्याची शक्यता दिसते. त्यासाठी एक म्हणजे इंग्रजपूर्व काळात आपली मूल्ये कुठून आली याचा विचार आपण करायला हवा. क्षत्रिय समाजरचनेला आवश्यक 'स्वामिनिष्ठा' हे प्रधानमूल्य त्या काळात होते आणि त्याचबरोबर भागवतधर्माने त्यांच्या दर्शनातून माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी कसे वागावे? याची मांडणी केलेली होती. या जुन्या मूल्यसमूहाकडे अधिक उघड्या आणि खुल्या पद्धतीने आपल्याला बघावे लागेल.

ते साध्य करण्यासाठी जे. कृष्णमूर्ती, ओशो यांच्यासारखे आधुनिक ऋषी, साठच्या दशकातल्या नवी आध्यात्मिकता कदाचित कामी येईल. सध्याच्या 'ग्रीन'-पर्यावरणा प्रेमी कडूनही काही स्वागतार्ह मूल्ये स्वीकारता येतील.

दुसरीकडे मला ख्रिश्चन विचारसरणीचे विविध परिपाक-पर्याय डोळ्यांसमोर येतात. अल्बर्ट एलिस , व्हिक्टर फ्रॅंकेल इत्यादी मानसशास्त्रज्ञांच्या लेखनाचा उपयोग मूल्यांच्या निर्मितीत होऊ शकतो.

नव्या कॉर्पोरेट्समधून निर्माण होणा-या, HR ट्रेनिंगनं वाढणा-या या नव्या वर्किंग क्लासला ही दुसरी पर्यायी मूल्ये ड्रकर पासून कोव्हीपर्यंत उपलब्ध होतील. या नव्या मूल्यांची वाहणी फेसबुक, ट्विटर यांच्यासोबत नवनव्या कॉर्पोरेट व्हिजन-मिशनच्या मूल्यव्यवस्थेतूनही होईल. बाबू क्लासच्या पलीकडचा हा 'प्रायव्हेट सेक्टर क्लास' मध्यमवर्गाची मूल्ये भावी काळात ठरवेल. ही सारी समकालीन अमेरिकन वर्गाची मूल्ये आहेत.

या नव्या मध्यमवर्गापुढे कर्मफल सिद्धांताला पूर्ण बकवास समजून, हिंसेने सारे प्रश्न सोडवण्याचा पर्यायही उभा असणारच आहे. यातले निवडीचे पोस्टमॉडर्न कंपल्शन मध्यमवर्गाला नकोसे वाटते. त्यांना वोक-आदेशांची भूक नव्याने लागत आहे.

नंदींची टीका मला पूर्णत: पटत नाही. या नव्या मध्यमवर्गाला 'मूल्ये' नाहीत असे मोडीत काढण्यापेक्षा कोणत्या मार्गाने आपण त्या कंझंप्शन क्लासपर्यंत पोचणार आहोत याचा विचार आमच्या माध्यमांनी, लेखकांनी, विचारवंतांनी करायला हवा.
नव्या मध्यमवर्गीय नीतिशास्त्राची शोधन-समीक्षाकेंद्री मांडणीच श्याम मनोहरांनी 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू' या कादंबरीत केली आहे. मराठी मध्यमवर्गाचा घेट्टो म्हणज पुणेरी जाणिवा - त्यांना सोलून त्यांचा मूलगामी क्रिटिक आणि संशोधनाची ज्ञानमार्गी महत्ता मनोहरांनी अधोरेखित केली आहे.

नंदींच्या मूल्ये हरवलेल्या मध्यमवर्गापलीकडे असलेला मूल्यांच्या शोधातला हा मध्यमवर्ग मला अधिक महत्त्वाचा वाटतो आणि भावी काळासाठी अधिक लक्ष देण्यायोग्य !

Tuesday, June 3, 2014

मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग



भविष्यकाळ हा शक्यतांचा प्रदेश असतो. अस्तित्वातच नसलेल्या काळामध्ये मराठी साहित्यविश्वात काय नवे पाहायला मिळेल, हा कितीही अभ्यासपूर्ण असला तरी कल्पनाविलासच. अनेकानेक मल्टिनॅशनल कंपन्या, राष्ट्रांची नियोजन मंडळे ‘सिनारिओ बिल्डिंग’ किंवा ‘ट्रेंड्स मॅपिंग’ करतात ते त्या बदलांना तयार राहाण्यासाठी किंवा त्या बदलांसाठी तरतूद करण्यासाठी. मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग करायचं ते कुणासाठी? एक कारण मला दिसतं ते म्हणजे आपली समकालीन संस्कृती नवनिर्मितीला पोषक नाही. काय झाले असता ती अधिक उमदी, सृजनशील होईल याचा विचार करण्यासाठी ही कल्पनाविलासाची संधी वापरता येईल. सद्यकालीन मराठी साहित्यविश्वाच्या दूरवस्थेकडे बघता पुढील पंचवीस वर्षांसाठी काही अपेक्षा तरी व्यक्त करता येतील. ‘काहीही बदलणार नाही’ हा टिपिकल मराठी निराशावाद टाळून काही शक्यता जोखता येतील.

साहित्यकृती ज्या वातावरणात जन्म घेते ते वातावरण पुढील पंचवीस वर्षांत कसे बदलेल? साहित्यकृती रसिकांपर्यंत ज्या माध्यमातून पोहोचते त्या प्रसारित होण्याच्या पद्धती बदलतील त्याचा परिणाम साहित्यविश्वावर होईल का? आणि आशय आणि घाटाच्या, म्हणजे साहित्यकृतीच्या रचनेवरच पुढच्या पंचवीस वर्षांत काही बदल घडून येतील का? अशा तीन भागांमध्ये या ‘बदलाच्या शक्यता’ आपण बघू शकतो.
समकालीन सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या साहित्यिकांसाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे. परंतु सक्षम साहित्यनिर्मितीला पोषक हे वातावरण नाही. साहित्यविश्वात बोकाळलेला जातीयवाद, ‘पॉलिटिकली करेक्ट’ या बॅनरखाली डाव्या विचारांकडे झुकणारी दांभिक विचारसरणी, कथनी आणि करणीमध्ये योजनांचं अंतर ठेवण्याची वृत्ती, जातीय विचार केंद्रस्थानी ठेवून निर्माण होणाऱ्या संहिता आणि वाटली जाणारी बक्षिसे हे सारेच वातावरण छाडमाड साहित्यनिर्मितीच्या उपयोगाचे आहे.

मराठी साहित्यविश्वातला हा वाङ्मयीन मूल्यांवरील निष्ठेचा अभाव आणि दांभिकता पुढील पंचवीस वर्षांत कमी होईल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. पत्रकार कुळातील लेखक आणि समीक्षक होण्याच्या या काळात मराठी विश्वात मूलगामी परिवर्तनाची अपेक्षा पुढील पंचवीस वर्षांत ठेवता येईल का?

साहित्यकृतींच्या प्रसाराची माध्यमे बदलताना दिसत आहेत. ऑडिओबुक्स, बुकगंगा असा नवा प्रवाह हळूहळू रुजतो आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भाषेचे उथळ चलनवलन निश्चित वाढेल. मात्र गंभीर/उत्तम लेखनाला आवश्यक, ‘चिंतन आणि खोलीचा अभाव’ याच प्रवाहाबरोबर वाढेल असे लक्षण आहे. फेसबुक चर्चा, कादंबऱ्या, शोधनिबंध बघता सरकणाऱ्या फालतू टाईमलाईनवरचे लेखन कदाचित भरपूर उगवून येईल.
दुसरीकडे कॉपीराईट शहाणे-टाईप कृतीतून नवी आर्थिक समीकरणेही उदयाला येतील. लेख समाविष्ट केल्यावर किंवा कादंबरी छापल्यावर लेखकांना ‘न मागता’ पैसे देण्याची अक्कल प्रकाशकांना पुढील पंचवीस वर्षांत आली तर ‘पावले’ असे म्हणावे लागेल. जर प्रथम दर्जाचे लेखन, विशेषतः कथनात्म सकस साहित्य येत्या पंचवीस वर्षांत वाढले तर ‘प्रकाशक-लेखक’ नात्यातील प्रकाशकीय दादागिरी काही प्रमाणात आटोक्यात येईल. दिवाळी अंक, पुरस्कार, प्राध्यापकीय नोकऱ्या, कॉर्पोरेट कंटाळ्यावर उपाय, राजकारण्यांकडून पैसे वा मान उधार घेऊन उपकार परतफेड करण्यासाठी आजकाल कथात्म अथवा समीक्षात्मक साहित्याचा वापर होतो. या समकालीन ‘चाटू’ संस्कृतीला उद्ध्वस्त करणारं लेखन पुढील पंचवीस वर्षांत जन्माला येईल काय?

प्रत्येक साहित्यिक आणि समीक्षक विविध कळपांच्या दगडाखाली हात असल्यामुळे ‘क्षीण विरोध’ करत फेसबुकी नोंदी करतात. साहित्यिकदृष्ट्या अत्यंत भ्रष्ट साहित्य संमेलने, अध्यक्षांच्या निवडीचं राजकारण, दुय्यम गुणवत्तेच्या अध्यक्षांची निवड यामध्ये पुढील पंचवीस वर्षांत बदल व्हायला हवा, मात्र या बदलाची सुरुवात होईल कुठून?

आशय किंवा घाटाचे प्रयोग हे कालसापेक्ष नाहीत. ते लेखक आणि कवीच्या ऊर्जासापेक्ष आहेत. म्हणजे काय? तर पंचवीस वर्षांचा काळ, त्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रोमोझोमल बदल- कंद मनुष्यपणा बदलत नाहीत. त्या बदलांमुळे न लिहिणारे समूह, व्यक्ती लिहिते होतात- मात्र आशयात आणि घाटात खरी क्रांती होते ती लेखकाच्या तपश्चर्येतून.

एक आशा अशी आहे की भारतात नव्यानं येणारा पैसा, ग्लोबल संधी यामुळे लिहित्या व्यक्तीला चरितार्थासाठीचा पैसा कमावण्यासाठी विविध साधने उपलब्ध होतील यातून कदाचित लेखकाचे स्वातंत्र्य वाढेल, मिंधेपणा कमी होईल.

सद्यकाळात धरठावाचा अभाव आणि पुनर्लेखनाच्या शिस्तीचा अभाव यामुळे कादंबरीसारखं दिसणारं परंतु कादंबरीच्या पातळीला न पोहोचलेलं लेखन बजबजलेलं आहे. पुढील पंचवीस वर्षांत काही भागातल्या समाजकारणाच्या बदलांमुळे मन लावून लिहिणे, गद्याचा सखोल विचार करून, त्यावर संस्करण करून ते प्रकाशित करणे यासाठी आवश्यक नैतिकतेचा आणि धीराचा जन्म पुढील पंचवीस वर्षांत कदाचित पहावयास मिळेल.

अशी एक आशा आहे की साहित्य अकादमी असो किंवा गावोगावचे छडमाड पुरस्कार, ते तुम्हाला लेखक बनवत नाहीत. तर समकालीन लेखक म्हणून मिळणारी पुरस्कारग्रस्त प्रसिद्धी ही मोठ्या मापाच्या चड्डीसारखी आपसूक घरंगळणारी वस्तू आहे हे कळल्यानंतर समकालीन बऱ्या लेखकांना भान येईल. पुरस्कार आणि कळप यांना फाट्यावर मारून लेखक म्हणून आपण एक निश्चित भूमी मिळवू शकतो हा खरा, अस्सल देशीवाद पुढील पंचवीस वर्षांत जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेची भूमी सकस आहे परंतु इथं ‘सनदी शेतकरी’ ‘हजारातुनी एखादाही’ दिसत नाही हे दुर्दैव.

शब्दातील, भाषेतील, विचारातील ताकद- ते शब्द, ती भाषा ते विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या सच्चेपणावर, तिच्या मूल्यनिष्ठांवर, विसंगती टिपू शकणाऱ्या तिच्या बुद्धिमत्तेवर, माणूस म्हणून जाणू शकणाऱ्या तिच्या करुणेवर आणि तिने स्वीकारलेल्या लेखनमार्गावरील प्रवासातल्या अथक एकल्या श्रमांवर अवलंबून आहे.

समकालीन संस्कृतीतला साहित्यिक प्रभावहीन आहे. या परिस्थितीची तरफ उलटवायची तर आशयाच्या नवनवीन प्रयोगातून वाचनीय (रंजक नव्हे) साहित्याची निर्मिती ही एकमेव गोष्ट लेखकाला प्रभाव क्षेत्राच्या केंद्राकडे घेऊन जाईल. त्या प्रक्रियेची सुरुवात कळपाचा आपल्या आतल्या समाधानाला शून्य उपयोग होतो या मूलभूत भानातून होईल अशी आशा मला आहे.

शेवटचा मुद्दा असा की, पुढील पंचवीस वर्षांत ज्या सावल्यांच्या आधारानं मराठी साहित्यसंस्कृती डौलानं उभी राहिली ते वटवृक्ष पृथ्वीतलावर नसतीलही- नेमाडे यांचं राजकारण वजावूनही उरणारी लेखनावरची प्रचंड निष्ठा, हेतूची सुस्पष्टता, फॉर्मचं अत्यंत नेमस्त भान, श्याम मनोहरांचा ज्ञानमार्गी वज्रपंथ, प्रयोग करण्याची आणि मांडण्याची प्रचंड क्षमता आणि त्यासाठी आवश्यक तपश्चर्या, नामदेव ढसाळांच्या (राजकीय आणि सामाजिक घटिया तडजोडी वगळता) प्रचंड ताकदीचं कवितेच्या ऊर्जेचं बळ याचा वारसा पुढे नेईल असे लेखनकर्मी पुढील पंचवीस वर्षांत तयार होतील का? तसं होण्यासाठी या समकालीन सभ्यतेतल्या कोंडमाऱ्याचं आकलन आपल्याला करून घ्यावं लागेल, त्यावर उपाय शोधावे लागतील.

राजकारणाला हाताशी धरून नेमाडे यांनी त्यांच्या प्रातिभ बळावर त्यांच्यापुरते उपाय काढले, श्याम मनोहरांनी ‘बेबी युनिव्हर्स’चे प्रयोग करत तुसडेपणानं स्वतःचा मार्ग शोधला- मात्र पुढील पंचवीस वर्षांत प्रथम दर्जाच्या निर्मितीक्षमतेवर सतत दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या कळपांचा विजय याचं गणित भेदून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का?

यातल्या प्रवासातच नव्या वाचकाशी अधिक सत्य नातं निर्माण होण्याची बीजं रुजत जातील. सुरुवातीचे मर्ढेकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक यासारख्या कवींनी केलेला भाषेचा, तत्त्वज्ञानाचा लवचिक वापर, नव्या रुपकांची निर्मिती समकालीन कवितेत दिसत नाही. अरुण कोलटकरांसारख्या कवितांसाठी आवश्यक एकांतऊर्जा पुढील पंचवीस वर्षांत कवींकडे एकवटेल काय? या खरा प्रश्न आहे.

लेखनात, कथात्म साहित्यात समाज बदलण्याची ताकद असते मात्र त्याची पूर्वअट म्हणजे साहित्यिकांची डोकी आणि हृदयं जागच्याजागी लागतात.

उत्तर-भांडवलशाहीत मास (लोंढा) याऐवजी ट्राईब (छोटा एकजिनसी बुद्धिमान समूह) सर्व मार्केटिंग संकल्पनांच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. ब्रुस नुसब्राऊमे ‘क्रिएटिव्ह इंटेलिजन्स’ किंवा टॉम केलीचे ‘क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स’ ही दोन पुस्तके व्यावसायिक क्षेत्रातील सृजनशीलतेची महत्ता अधोरेखित करतात.

या वातावरणात पुढील पंचवीस वर्षांत मराठीतील लिहिती, विचार करती, वाचती व्यक्ती क्षुद्र राजकारणापलीकडे छलांग मारू शकली तर मराठी साहित्यात नवीन निर्मला पुतुल, नवा मार्खेज, नवा मुराकामी, नवा चक्रधर, नवा मर्ढेकर- नवा नवा साहित्यिक, पहिल्या धारेचा आणि ओरिजिनल जन्माला नक्कीच येऊ शकेल! (जन्माला आला असेल तर संस्कृतीच्या केंद्रस्थानी येऊन प्रभावही टाकू शकेल हे निश्चित!)
---

 (प्रथम प्रसिद्धी चित्रलेखा साप्ताहिक)

सोरेंटिनोचा ‘द ग्रँड ब्युटी’





जानेवारी महिन्यात पुण्यात पिफ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तिथं सोरेंटिनो या इटालियन दिग्दर्शकाचा अप्रतिम सिनेमा ‘द ग्रँड ब्युटी’-‘ला ग्रांद बेलझ्झा’ बघायला मिळाला. सुबत्तेच्या ओझ्याखाली क्षीण होत जाणाऱ्या सर्जनशील आवाजाचा, सौंदर्याचा, निर्मितीक्षमतेच्या अभावाचा शोध आणि विश्लेषण सोरेंटिनोनं या चित्रपटाद्वारे केलं आहे.

अंतोनिओनि आणि फेलिनी या दोन दिग्गज दिग्दर्शकांच्या कलाकृतीसोबत ‘द ग्रँड ब्युटी’ची व्हिज्युअल भाषा संवाद साधते. कित्येक महत्त्वाच्या कलाकृतींमधल्या (ला डोल्शे विट्टा, ला नोट्टे) प्रसंगांची पताका स्थानं मिरवत ‘द ग्रँड ब्युटी’ हा सिनेमा उलगडतो. ‘एट अँड हाफ’ या फेलिनीच्या सिनेमाची सुरुवात अत्यंत प्रभावात्मक आणि प्रतिकात्मक घुसमटीनं होते. ‘द ग्रँड ब्युटी’ आपल्याला अतिश्रीमंत, अति सुबत्तेत दंग असलेल्या रोमन पार्टीलाइफमध्ये खेचतो. पूर्वसुरींच्या कलाकृती सोबत सोरेंटिनोची फिल्म अत्यंत इंटेन्स पद्धतीनं संवाद साधते आणि ती बघणाऱ्या डोळ्यांना अधिक खोलात उडी मारायचं आवाहन करते.

जेप गॅम्बार्डेला- रोममधला लेखक- हाय सोसायटी पत्रकार.. त्यानं पहिली कादंबरी लिहूनही चाळीस वर्षं उलटलीएत. जेपच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या प्रचंड, डिकेडन्ट पार्टीनं ‘द ग्रँड ब्युटी’ची सुरुवात होते.
सुंदर शरीरं, फॅशन्स, बेभान म्युझिक, मनोरंजनाचं उथळ अमेरिकन नव्हे, तर युरोपियन वातावरण. अमेरिकन पार्टी म्हणजे तरुण, सेक्स-ड्रिव्हन, उथळ आणि कॅलस समूह तर युरोपियन हाय सोसायटी पार्टी ही उत्तरमध्यमवयीन, तारुण्याच्या शोधात पण तारुण्यापलीकडे गेलेल्या परंपरागत श्रीमंतांची पार्टी. या पार्टीत बेभान होऊ इच्छिणारे एकएकटे जीव आणि पार्टी संपल्यावर पहिल्यांदा भानावर येणारी जेपची सौंदर्यविहीन एडिटर या अत्यंत वेगवान पार्टी प्रसंगातून सोरेंटिनोचा ‘सौंदर्यशोध’ सुरू होतो.

रोममध्ये दोन राजधान्या एकमेकांसोबत नांदतात. पहिली कॅथलिक चर्चमुळं जगभरच्या ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मसत्तेचं केंद्र असलेलं रोम- दुसरीकडे मिलानसारख्या शहराजवळचं, डिझायनर फॅशनचं केंद्रस्थान. युरोपच्या धर्मसत्ता आणि श्रीमंत वर्गाची ‘कंझम्प्शन सत्ता’ रोममध्ये एकवटलीए- त्या शहरात, बाल्कनीतून सिटाडेल दिसतं अशा प्रचंड घरात जेप राहातो.

इथल्या जगण्यावर जेपनं मांड घातलीए- मात्र ते करताना जीवन त्याच्या बोटाच्या फटीतून निसटलंय. बाकी कुणाला नसलं तरी जेपला त्या जीवनाच्या, व्हायब्रंट अस्तित्वाच्या अभावाचं भान आहे.

रोममध्ये विविध नवश्रीमंतांचे थर येत आहेत.. आणि ही सुबत्तेची झुकझुक गाडी जागच्या जागीच फेऱ्या घालतीए.. ‘इथे आले, इथून पुढे कुठं?’ हा प्रश्नच त्यांना सोडवता येत नाहीए.. या साडेतीन फूट खोल स्विमिंगपूलमध्ये सगळेच तरंगतायत पण खोल सूर कोणालाच मारता येत नाहीए..या जीवनाची संगती लावत, काहीसा अलिप्त, पासष्टाव्या वाढदिवशी थोडा अस्वस्थ झालेला तीव्र बुद्धिमान जेप ‘ग्रँड ब्युटी’चा शोध घेतो.

रोममधल्या विविध ऐतिहासिक सौंदर्यपूर्ण वास्तू, चित्रकलेच्या क्षेत्रातले (उथळ) प्रयोग, हाय फॅशन, त्यासोबत येणारं हाय लाईफ- सोरेंटिनो या सुखानं भरलेल्या आयुष्यातल्या निर्मितीच्या अभावाचा कंद सोलतो. (लहान मुलीला खेळू न देता तिला चित्रात प्रयोग करायला लावणारा कलात्मक पेडोफेलिया इथंच भेटतो.)

या अति श्रीमंतीचं व्याकरण जेपनं आत्मसात केलंय. फ्यूनरलचं व्याकरण तो गणितमानी पायऱ्या-पायऱ्यांनी डिकोड करून मैत्रिणीला सांगू शकतो. फ्यूनरल कळणाऱ्या जेपला- मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ‘मृत्यू’ समजतो.
प्रेम, सेक्स, सौंदर्य, त्यामध्ये दंग होणं- सारं काही जेपच्या आयुष्यात आहे. मात्र सुबत्तेत सौंदर्याचं अवतरण होत नाही. मनावरची भुतं एकेकाळी यशस्वीपणे उतरवणारा कार्डिनल बेलुचीदेखील जेपच्या मनावरचं हे साचलेपणाचं भूत दूर करू शकत नाही. मात्र ‘पराकाष्ठा’ म्हणजे काय? ते समजलेली संतत्त्वाच्या पायऱ्या चढणारी नन- जेपला सौंदर्यरहस्याचा दरवाजा किलकिला करून दाखवते.

जेपच्या बाल्कनीत या ननच्या एका हळुवार हाकेनं जेव्हा सारस पक्षी अवतरतात आणि तिच्या हळुवार फुंकरीनं ते उडून जातात या चमत्कार दर्शनानं ‘द ग्रँड ब्युटी’चं सहजत्व आणि त्यातली जगणं जाणण्याची किमया जेपला क्षणकाल दिसून जाते.

या साऱ्या व्यक्तींचा ग्रँड परफॉर्मन्स ज्या स्टेजवर चालू आहे- त्या मोकळ्या जागेचं नाव आहे रोम. युगायुगांच्या सांस्कृतिक इतिहासाचे थर या शहरावर आहेत... ‘रोमानियत’- या रोमची घडी जेपला उलगडलीए- तसंच इथला घुसमटता, वांझ एकटेपणा, प्रेमाचा अभावही त्याला समजलाय.

युरोपच्या अति वैभवात दंग झालेली पार्टी जेपला बेचव वाटते. पण जे पार्टीत आहेत त्यांना पश्चात्तापाचा स्पर्शही झालेला नाही. या साऱ्या कंझप्शनग्रस्त जगाला अधोविश्वातून टेकू देणारा डॉन जेपचा शेजारी आहे आणि तो आपला शेजारी आहे हे त्याला अटक होईस्तोवर जेपला कळत नाही- हे सोरेंटिनोचं दिग्दर्शक म्हणून जाणवणारं रचनेचं कौशल्य आहे.

अस्तित्ववादाच्या पकडीतून सुटत एका पोस्टमॉडर्न चमत्काराला सोरेटिनोच्या ‘द ग्रँड ब्युटी’ कवेत घेतो. जेप गँबार्डेलामार्फत, १४२ मिनिटांत युरपच्या, डिकेडन्ट, दुखऱ्या, रिकाम्या ह-दयावर सोरेंटिनो कॅमेरा रोखतो आणि पार्टीनंतरच्या पहाटे- एक चमत्काराची शक्यता जेपच्या मनात जागी करतो.न लिहित्या लेखकाला, त्याच्या न लिहिण्यात केंद्रस्थानी ठेवणारी ही कलाकृती- आणि अति वैभवानं संवेदनाशून्य झालेलं रोम हे त्या लेखकाच्या मनाचं नेपथ्य- या जागेत ‘द ग्रँड ब्युटी’ आकाराला येते- आणि आयुष्य उलगडणाऱ्या डोळ्यांना खिळवून ठेवते.

Saturday, January 25, 2014

खाष्ट विदुषी आणि अलिप्त परिपूर्ती


दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे या दोन लेखिकांची तुलना करण्यापूर्वी मराठी संस्कृती समीक्षेची संदर्भचौकट समजून घ्यावी लागेल. मराठीतील संस्कृती समीक्षेचा प्रवास राजवाडे, राजारामशास्त्री भागवत, फुले, विठ्ठल रामजी शिंदे, केतकर असा बघता येतो. भारतीय समाज आणि संस्कृती समीक्षेचा प्रवास डी. डी. कोसंबी, राहुल सांकृत्यायन, आनंद कुमारस्वामी, धरमपाल, लोहिया नावांखेरीज करता येत नाही. राजवाडे, फुले, भागवत यांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी सामाजिक आहे. विठ्ठल रामजी शिंदे, डाॅ. आंबेडकर, केतकर यांची जातिव्यवस्थेची समीक्षा ही सांस्कृतिक इतिहास जमेस धरून करण्यात आली आहे.

समकालीन लेखकांमध्ये देशीवादाची मांडणी करणारे डाॅ. भालचंद्र नेमाडे,तुकारामदर्शनकार  डाॅ. सदानंद मोरे तसेच विलास सारंग व दिलीप चित्रे यांची वाड्मयीन समीक्षा ही सांस्कृतिक समीक्षा म्हणूनच तपासावी लागेल.

पत्रकार नसताना वैचारिक लेखन करणा-या सामाजिक लेखकांच्या यादीत ‘गावगाडा’ लिहिणारे अत्रे, ‘स्रीपुरुष तुलना’ लिहिणा-या ताराबाई शिंदे यांचे लेखन करता येईल. या व्यापक संदर्भचौकटीच्या अंतर्गत  दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांचे लेखन बघून त्यांची तुलना करावी लागेल.

या दोन्ही लेखिकांच्या यशात आणि कौतुकात त्यांच्या बौद्धिक कष्टांचा, स्पष्टवक्तेपणाचा, स्वच्छ अंत:करणाचा जास्त वाटा आहे तसाच त्यांच्या उच्चवर्णीय स्री असण्याचा आणि प्रिव्हिलेज्ड कुटुंबाची पार्श्वभूमी लाभण्याचा वाटाही बराच मोठा आहे.

‘जेंडर’ आणि ‘जात’ या दोनही गोष्टी महाराष्ट्रात (आणि भारतात) वैचारिक योगदानाचा संदभ तपासताना ध्यानात ठेवाव्याच लागतात. या दोन्हीपेक्षा अधिक महत्वाची समाजशास्त्रीय अभ्यासकांची जोडगोळी म्हणून खरेतर विठ्ठल रामजी शिंदे आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांची तुलना आपल्याला करावी लागेल. शिंदे यांचा बहुजनवादी दृष्टिकोण आणि डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम, समाजशास्त्रीय लेखन आणि केतकरांचा ‘ज्ञानकोशा'सारखा बृहद्प्रकल्प, कादंब-यामधील सुधारणावादी दृष्टिकोन आणि चित्पावनकेंद्री भाषिक दृष्टी यांची तुलना संस्कृती समीक्षेत खरेतर अधिक महत्वाची ठरेल. मात्र या लेखाचा विषय त्यांची तुलना हा नाही. राजवाडे आणि राजारामशास्त्री भागवत, स्री सुधारणांच्या संदर्भात फुले आणि आगरकर या तीव्र बौध्दिक भेदांवर आधारित जोड्यापेक्षा दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांच्यात साम्यस्थळे अधिक आहेत.

मराठी संस्कृतीचा विश्लेषक अभ्यास हा दोघीच्याही अभ्यासात समान दुवा आहे. मराठीत लिहित्या- वाचत्या-विचारकर्त्या मनाला या दोघींची स्टेशनं लागतात, ती मलाही लागली. मी समाजशास्त्र शिकण्याचा निर्णय दुर्गाबाईबरोबर झालेल्या एका संवादानंतर घेतला. किनशिप सिस्टिम्सचा अभ्यास करताना इरावती कर्व्याचं लेखन संदर्भासाठी धुंडाळलं. तरी आता इतक्या वर्षानंतर या दोघींचं योगदान तपासताना त्याच्या आवाक्याच्या मर्यादाही ध्यानी येतात. ‘साधने’ तले जात-पात न मानणारे गांधीवादी ब्राह्मण आणि मौजेची बौद्धिक स्नॉबरी जपणारी पंरपरा उच्चवर्णीय या दोन्ही गटात या लेखिका फिट् बसल्या. आणि त्यांचं लेखन इंटरेस्टिंग आणि सुलभ असल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे किंवा केतकरांपेक्षा अर्थातच त्या आम्हाला अधिक जवळच्या वाटल्या, हे नमूद करायलाच हवं. या दोघीच्या लेखनाला ब्राह्मणी सदर्भचौकट आहे. ती ध्यानात ठेवून या विचारतुलेकडे बघावे लागेल.


संस्कृती समीक्षा (Cultural Studies या अर्थाने) हा शब्द वापरताना काही विशिष्ट ज्ञानशास्त्रीय साधनांचा आणि पंरपंराचा वापर आणि त्यांना वापरून केलेली संस्कृतीची चिकित्सा अभिप्रेत आहे. म्हणून हे बिरुद सर्व प्रकारच्या वाड्.मयीन समीक्षेला किंवा पत्रकारिता, प्रबोधन या हेतूने केलेल्या सर्व लेखनाला लागू पडत नाही.


इरावती कर्वे (जन्म 1905- मृत्यू 1970) आणि दुर्गा भागवत (जन्म 1910- मूत्यू 2002) या दोघी  समांतर लेखन करणा-या समकालीन लेखिका. त्या दोघींचे अभ्यासविषयही जवळपास सारखे. त्यामुळे त्याच्यात मनोमन फारसे चांगले गणित नसण्याचे मला नवल नाही.

दुर्गाबाईनी त्याच्या स्वभावानुसार ‘आठवले तसे’ मध्ये एक पूर्ण प्रकरण लिहून इरावतीबाईवर हल्ला चढवला आहे. त्या कशा स्वार्थी आणि करिअरिस्ट होत्या हे सांगताना इरावतींलर दुस-याचे श्रेय लाटण्याचा आणि अभ्यासात मूलभूत चुका करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इरावतींना ज्ञानापेक्षा ज्ञानमार्गाने मिळणा-या सत्तेची अभिलाषा आधिक होती असे दुर्गाबाईंचे म्हणणे आहे. दुर्गाबाईंच्या मनातील या संतापाचे, अढीचे दर्शन त्या लेखात होते. इरावती मात्र अशा बाबतीत व्यवहारात नेटक्या आणी तोल ढळू न देणा-या असल्यामुळे दुर्गाबाईंबद्दल त्यानी काही उलटसुलट लिहिलेले नाही.दुर्गाबाईंचा स्वभाव वादप्रवण आणि त्यांना स्वतःच्या नैतिकतेचा प्रचंड (दुर) अभिमान असल्यामुळे त्याच्या सेल्फरायचसपणाच्या तलवारीखाली सगळेजण येतात. नेमाडे, आंबेडकर, गांधी, बुद्ध-कुणीच त्यातून सुटू शकले नाही. इरावतीतर त्यांच्या स्पर्धेत होत्या त्यांची सुटका होण दुरापास्तच होतं.  दुर्गाबाईच्या एकूण सर्व  विचारप्रकियेत त्यांच्या अतिनैतिकतेच्या  हट्टापायी आलेले अनेक चमत्कारिक विरोधाभास आहेत. त्या तुलनेत इरावती कर्व्याचं व्यक्तिमत्व समतोल अलिप्त, शिष्ट आणि टीकेपेक्षा स्वतःच्या कामात आणि संसारात व्यग्र असं दिसतं.

दुर्गाबाईनी आपल्या स्वतःच्या ‘ स्पेशल केस” असण्याची स्पष्ट चिकित्सा केलेली नाही. वडिलांनी आर्थिक तरतूद करून ठेवल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली नाही. आणि कोणत्याही आर्थिक विवंचनाही पाठीमागे लागल्या नाहीत. संसार, सेक्स आणि नोकरी या तीन गोष्टी अनेक स्री- पुरुषांना नमवतात. त्यातल्या संसार दुर्गाबाईनी मांडला नाही. आणि विषप्रयोगातून सावरल्यानंतर सेक्सविषयक त्यांच्या भूमिकेशी त्या एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळे त्याच्या लेखनात सेक्सचा उल्लेख आणि पडसाद आढळले तरी त्या इच्छेनं त्यांना कधी नात्यात पडतं घ्यावं लागलेलं दिसत नाही.

नोकरी किवा अर्थाजनाची विवंचना नसल्यामुळे श्रेणीरचनेत सोसावे लागणारे अपमान त्याच्या वाट्यात आले नाहीत आणि संसारात कराव्या लागणा-या तडजोडीही त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत. मात्र या प्रचंड ‘प्रिव्हिलेज्ड स्पेस’ मध्ये त्यांनी त्यांमानानं मर्यादित काम केलं. विचारस्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य पणाला लावलं होत. मात्र मूलभूत आर्थिक सुरक्षा त्यांना त्याही परिस्थितीत होती ही वस्तुस्थिती डोळयाआड करता येणार नाही. ते सारं ससंदर्भच स्वीकारावं लागतं.

इरावती कर्व्याचा प्रवासही प्रिव्हिलेज्ड आहे परंतु निराळा. आई- वडील ब्रह्मदेशात असल्यामुळे त्या वाढत्या रॅंगलर पराजप्यांच्या घरात. बी. ए. ला तत्वज्ञान विषयात सर्वप्रथम आल्या होत्या. फर्ग्युसनमधली मानाची दक्षिणा फेलोशिप त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांचा दिनकर कर्व्याशी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर इरावतीबाईंनी मानवशास्रात एम. ए. केलं आणि घुर्ये याच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला.

त्यानतर नव-यासोबत पूर्व जर्मनीत पीएच. डी करण्यासाठी त्या रवाना झाल्या. परत भारतात आल्यावर जाताना शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं त्यांना क्रमप्राप्त होत. वयाच्या २६ व्या वर्षी कर्वे स्रीशिक्षण संस्थेत रजिस्ट्रार म्हणून त्या जाॅईन झाल्या. ते काम त्याच्या आवडीचं नव्हतं तरीही ते त्यांनी स्वीकारलं. भारतात परतल्यानंतर ते वयाच्या ३८व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळ जवळ बारा वर्षं इरावतीबाई आपली अॅकॅडमिक ओळख शोधत होत्या. दरम्यान त्यांनी (अत्यंत कटु घडामोडीनंतर) कर्वे स्रीशिक्षण संस्थेतील पदाचा राजीनामा दिला आणि डेक्कन कॉलेजमध्ये त्याची प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. याच दरम्यान त्यांच्या तीन मुलाचा जन्म झाला आहे.

इरावतीबाईचा पहिला लेख ‘अभिरुची’ त १९४३ साली प्रकाशित झाला. त्या वेळी गौरी, त्याची तिसरी मुलगी एक वर्षाची होती. १९४३-१९७० म्हणजे त्याच्या मूत्यूपर्यत २७ वर्ष इरावती लेखन-संशोधन  केलं आहे. या संशोधनाचा फोकस अर्थात त्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे फिजिकल अँथ्रोपाँलॉजी हा आहे. डेक्कन कॉलेजमधील नेमणुकिनंतरचा इरावतीबाईंचा प्रवास अॅकॅडमिक आहे. त्यांना नंतर एक वर्ष लंडन विद्यापीठात तर एक अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात व्याखती म्हणून आमंत्रित  करण्यात आलं होतं. बर्कलीतल्या इरावती कर्व्याच्या वास्तवानंतर त्यांच्या लेखनात एक निराळा बदल जाणवतो. बर्कलीच्या वाटेवर इरावतीबाईना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यानंतर त्या अनुभवाची छाया त्यांच्या मनावर कायम राहिली. त्याची घनिष्ट मैत्रिण सुलोचना देशमुख यांनी ‘गंगाजल’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी लिहीलं आहे.

इरावती कर्व्यांच्या लेखन प्रवासातला मह्त्वाचा टप्पा म्हणजे १९६७ साली त्यांनी लिहिलेलं ‘युगान्त’ त्याला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. (जो १९६२मध्ये प्रकाशित झालेल्या व्यासपर्वला नाही.) इरावतींच्या संस्कृती-केंद्री लेखनाला मिळालेली ती दाद होती. यानंतर तीन वर्षातच इरावतींचा मृत्यू झाला. इरावतीबाईंबद्दल इतकं सविस्तर लिहिण्याच कारण म्हणजे त्यांचं लेखनही याच जीवनानुभवावर आधारलेलं आहे, ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजल’ मध्ये भेटणा-या इरावतीबाईंना मुलं, करिअर, नोकरी, कुटुंबाचे सारे प्रश्न सामोरे येतात आणि सामान्य माणसाला विशेषत: स्रीला  हेवा वाटावा असा संसार करतानाही इरावतीबाईंचा तटस्थपणा त्यांच्या भाषेतून जाणवत राहतो. या अलिप्तपणानं त्यांचं वैयक्तिक लेखन वेढलं गेलेलं आहे. ही ‘न गुतण्याची स्टॉईक किमया’ त्यांना साधलीए. वैचारिकदृष्ट्या त्यांच्यावर प्रभाव आहे तो उदारमतवादाचा आणि कुरुंदकर काहीही म्हणोत देवदयेनं इरावतीबाई लिबरल, नेमस्त आहेत पण समाजवादी नाहीत. समाजवादी ढोंगाचा अभाव ही त्यांच्या लेखनाची मोलाची बाजू आहे. त्या राजकीय भूमिकेत गुंतलेल्या नाहीत. मात्र अत्यंत व्यावहारीक, प्रॅग्मॅटिक आणि वस्तुस्थितीला सामोरं जाणारी अशी त्यांची मतं आहेत.
हिंदू कायद्याच्या संदर्भात त्यांनी आपल्या साक्षीत जी मतं मांडली ती अभ्यासण्याजोगी आहेत,कर्वे कुटुंबातील र. धों. कर्व्यांचा प्रभाव हे कारणही असेलही परंतु बहुपत्नीत्व विवाहांतर्गत स्रीचे हक्क, लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमाच्या तडाख्यात सापडल्यामुळे  दुस-या बाईचे उद्ध्वस्त होणे या संदर्भात इरावतीबाई केवळ लिबरल मतं मांडत नाहीत . तर भारतीय संस्कृती इतिहासाच्या संदर्भात स्रीला मिळणारा न्याय म्हणजे काय? ते तपासतात.


दुर्गाबाईंचा प्रवास निराळा आहे. क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही डावललं गेल्याचा राग आणि संताप मनात आहे. अत्यंत तरुण वयात गोंडाचा अभ्यास करताना जंगलातलं विषारी सुरण खाल्यामुळं त्यांची तब्येत पूर्ण बिघडली. त्या आजारपणातून त्या उभ्या राहिल्या तीच त्यांच्या मन:शक्तीची कमाल म्हणावी लागेल. घुर्ये यांनी केलेल्या अन्यायामुळे बाईंची पीएच. डी. अभ्यास करूनही पूर्ण झाली नाही. राम गुहांनी लिहिलेले वेरिएर एल्विनचे चरित्र वाचताना घुर्येदर्शनही झाले. घुर्यांच्या विसंगती त्यामुळे नजरेला आल्या.

इरावती कालांतराने तरी अॅकॅडमिक धारेला लागल्या तशा दुर्गाबाई त्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्या. त्यानंतरचे त्यांचे अभ्यासक्षेत्र संहितांचा एन्थ्रोग्रॅफिक अभ्यास असे राहिलेले दिसते.
प्रतिभा रानडे यांनी ‘एैसपैस गप्पा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाईंचा प्रवास मांडलाय. १९३८साली मध्यप्रदेशात, अतिदुर्गम भागात संशोधनासाठी फिरताना त्यांना विषबाधा झाली.त्या वेळी दुर्गाबाई होत्या २८ वर्षाच्या. यापूर्वीचं दुर्गाबाईचं लेखन Early Buddhist Jurisprudence म्हणजे बुद्धकाळातील विनयपिटकात वर्णिलेल्या न्याय संकल्पनेचा अभ्यास या विषयावर झालेलं होत. मूळ बौद्ध ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्या पाली आणि अर्धमागधी शिकल्या होत्या. इरावतींच्या लेखनात पाश्च्यात तत्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो तर दुर्गाबाईंच्या विचारांचा मूळ कंद बौद्ध दर्शनात सापडतो.
दरम्यान दुर्गाबाईंना साने गुरुजींनी लिहिते केले. दुर्गाबाईंची भाषेबाबतची संवेदनशीलता अफाट आहे. आणि त्यांची भाषिक जाणीव अतिप्रगल्भ आहे. शैली त्यांनी अभ्यासानं कमावली. इरावतीचं लेखन आधेक उस्फूर्त तर दुर्गाबाईचं मेटिक्युलस असा दोघींच्या शैलीतला फरक.१९५६मध्ये ‘ऋतुचक्र’ १९६२मध्ये ‘व्यासपर्व’ दरम्यान दुर्गाबाईंचा हात सतत लिहिता होता.१९७०मध्ये’पैस’ प्रकाशित झाले. या दरम्यान दुर्गाबाईंनी विविध समाजशास्त्रीय कमिट्यांवर कामे केली. लेखन,भाषांतरं, वाचन, चिंतन केले. मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटण्याचा काळ म्हणजे ७०चं दशक.
वादप्रवणता आणि पॉलीटीकल करेक्टनेसपेक्षा स्वतःच्या नैतिक चौकटीत काय बसतं याचा विचार करून स्पष्ट बोलणं यामुळे दुर्गाबाई या दशकात सतत गाजत राहिल्या.वेश्याव्यवसायाची आवश्यकता मांडताना त्यांनी जी विधानं केलीएत ती वाचताना अंगावर काटा येतो. राजा ढाले यांनी बाईंच्या विरोधात ‘साधने’ त लेख लिहून त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. लिटील मॅगेझिनवाल्यांच्या म्हणजे भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, अरुण कोलटकर यांच्या बाई जवळ होत्या. परंतु लिटिल मॅगेझिनवाल्याची मार्क्सवादी, डावी आणि दलित जाणिवांणी समाज व्यवस्थेला शह देऊ पाहणारी विचारसरणी दुर्गाबाईंची नव्हती. त्या एका गांधीवादी मुशीतून घडल्या गेल्या. त्या मुशीत एकदा तत्व मानलं की त्या तत्वासाठी लढा देणं अभिप्रेत होतं मात्र त्या तत्वाची ‘पॉलिटकली करेक्टनेस’च्या दगडावर परीक्षा करण्यापेक्षा दुर्गाबाई नैतिकतेच्या भूमिकेवर त्याची चिकित्सा करत होत्या.

त्यामुळेच भाऊ पाध्यांना समर्थनही देताना हुसेनवर टीका करण्यास त्या कचरल्या नाहीत. हुसेन याचा रामायणाचा अभ्यास धड नाही आणि त्याची चित्रं संदर्भहीन म्हणून अश्लील आहेत हे मत मांडताना त्यांच्यातला अभ्यासक मागेपुढे पाहत नाही.हुसेनला पाठिंबा देणा-या आणि रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ वर टीका करणा-या डाव्या लिबरल्सना दुर्गाबाई ठोकून काढतात. अनेक समाजवादी जेव्हा दुर्गाबाईचं कौतुक करतात तेव्हा कितीदा माझ्या मनात येतं की,अरे तुमच्या या आयडिऑलीजिकल दंभाच्या पूर्ण विरोधात ही बाई उभी होती हे तुम्हांला समजतंय. या थेटपणाचे,निर्भीडपणाचे आणि निस्पृह्तेचे सर्व मार्क दुर्गाबाईंच्या पारड्यात जातात.यानंतर त्यांच्या जीवनपटात घडतो तो आणिबाणी आणि कराडच्या साहित्य संमेलनाचा एपिसोड.

दुर्गाबाईंवर त्यांच्या अनेक मतांबद्दल टीका करताना, त्यांच्या निर्णयांची समीक्षा करताना तरीही याबद्दल अपार आदर वाटत राहतो. तो त्यांच्या कराडच्या संमेलनातल्या आणिबाणी निषेधामुळं. दुर्गाबाईंना आयुष्यानं दिलेल्या ‘प्रिव्हिलेज्ड स्पेस’ चा अत्यंत उदात्त निर्णयासाठी त्यांनी या प्रसंगात उपयोग केला.विचारस्वातंत्र्याच्या लढ्यात या कृतीला तोड नाही. दुर्गाबाईंच्या नैतिकतेच्या बळाला जयप्रकाशांच्या आदर्शवादाबद्दल अतिशय आदर वाटत होता हे त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे.
मात्र नंतर एक नागरिक म्हणून मंत मांडताना झोपडपट्टी वाढण्याबद्दल ‘जंगल फोफावतंय’ सारखं भयंकर लेखन नंतर दुर्गाबाईंनी केलं आहे.‘सामना’ तलं स्तंभलेखन त्यांनी का केलं? हा प्रश्न पडतो. किंवा ‘आठवले तसे’ सारखं पुस्तक समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून कसं बघायचं याबद्दल मनात संदेह निर्माण होतो. बाईंनी यशवंतरावांसारख्या नेत्याला एका कॉमेंटच्या फटक्यानं उडवून लावणं हेदेखील न पटणारं. दुर्गाबाई या सा-या विरोधाभासांचं मिश्रण आहेत. प्रतिभा रानडे यांचं ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे पुस्तक मला आवडत नाही कारण त्यांनी फार मायेनं दुर्गाबाईंच्या विसंगती एडिट केल्यायत हे पदोपदी कळत रहातं. दुर्गाबाई हे अनेक कॉन्ट्रॅडिक्शन्शनी मिळून तयार झालेलं मिश्रण होतं. त्यामुळेच बदलत्या काळात, शेवटच्या टप्यात त्या रिलेव्हन्ट राहिल्या नाहोत. इरावती आणि दुर्गाबाईंची तुलना करताना दुर्गाबाईंच्या ‘देशी’ विचारप्रणालीतून सकस झालेल्या स्वर आणि इरावतीबाईचा पाश्च्यात लिबरल विचारधारेवर पोसलेला नेमस्त पिंड सतत जाणवत राहतो. त्या दोघींच्या फरकाचं मूळ त्यांच्या या भिन्न बौद्धिक परंपरांमध्ये आहे.

कर्व्यांच्या घरात सून म्हणून राहणं सोपं नव्हतं तसंच गौरीची आई होणं हीपण काही साधी भूमिका नव्हती. आपल्या आयुष्याबद्दल लिहिताना इरावती बाई स्वतःच्या निर्णयांची समीक्षा करतात. ही Self reflexivity हा त्याच्यां विचारप्रक्रियेचा भाग आहे.

फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करताना इरावतीबाई संस्कृतीशास्त्राच्या झेत्रात उतरतात. मराठी संस्कृती, हिंदू समाज, भारतीय जातीव्यवस्था यावर भाष्य करतात. संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देताना अल्पसंख्याक भाषिकांच्या हक्कांबाबत मंत मांडतात. आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्याचा अन्वय लावताना त्या मुळांकडे म्हणजे ‘महाभारता’ कडे वळतात. ‘बॉय फ्रेंड’ विठोबापेक्षा त्यांना महाभारतातील गुंतागुंतीच्या नात्यांचा अन्वय महत्वाचा वाटतो. कर्व्यांच्या घरातला ‘मनाला जे पटेल ते करणे’ हा संस्कार उत्तरार्धात त्यांनी आत्मसात केलेला दिसतो.

दुर्गाबाईंच्या धारणा मात्र भिन्न आहेत. आध्यात्मिक गूढतेचा  स्पर्श त्यांना झाला आहे. म्हणूनच ‘पैस’ मध्ये त्यांना ‘ज्ञानदेव’ नुसते भावत नाहीत तर ‘सहनसिद्धी’, ‘दु:खकालिंदी’ सारख्या ज्ञानेश्वरिय शब्दांची त्यांना भूल पडते. राजारामशास्त्री भागवतांचा परखड वारसा दुर्गाबाईंना लाभलेला आहे. जशी इरावतींची नाममुद्रा डेक्कन कॉलेजवर तसा दुर्गाबाईंचा ठसा एशियाटिकवर उमटलेला आहे. जे इरावतींनी कधी केलं नाही ते पुढच्या पिढीशी जोडून घेण्याचं काम दुर्गाबाईंनी इथेच केलं.
सर्वात शेवटी जो मुद्दा मी मांडणार आहे तो आहे या दोघींच्या स्रीवादी संदर्भातील मतांचा.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या दोघींचा जन्म झाला. इरावतीबाई त्यांच्या जागतिक वास्तवाच्या परिचयामुळे पाश्च्यात पद्धतीने अनेक गोष्टी करायच्या.त्यांच्या आयुष्यात हा आधुनिक स्रीवाद लगेच नजरेत येतो. दुर्गाबाई या त्या अर्थाने अधिक परंपरावादी आणि आध्यात्मिक. त्या स्रीलाही प्रथम माणूस म्हणून तपासतात. आणि तिच्या कोणत्याच विसंगतीमुळे डोळेझाक करीत नाहीत.स्रीमुक्तीवाल्या बायकांबद्दल त्यांची मंत पुरुषांपेक्षाही अधिक टीकात्म आहेत. सेक्शुअल स्वातंत्र्याबाबत इरावती कर्वे अधिक मोकळ्या तर दुर्गाबाई काही प्रमाणात कन्झर्वेटीव आहेत. दोघींना स्वयंपाक करण्याची आवड. पण दुर्गाबाईंना शिवण, टिपण, भरतकाम, खादी, स्वंयपाक हे सारेच क्षेत्र हौशीचे आणि आवडीचे. तर इरावतीबाई त्या सा-या क्षेत्रात अलिप्त इरावतींचा ग्राफ मला नेहमी वयानुरूप वाढणारा वाटतो. तर दुर्गाबाईचा वेगवेगळ्या उंचवटे आणि खोल गर्तांनी भरलेला.

प्रचंड रॅडीकल, नव्यानं मांडणी करणारा, आयुष्याचा अतिमूलभूत विचार करायला लावून सारं बदलवून टाकणारा असा विचार या दोघींनी मला दिलेल्या नाही. मात्र नेमाड्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘स्वहिताचं भान बाळगून’ सतत कामात एकाग्र राहण्याची, व्यग्र राहण्याची शिस्त आणि त्या कामाबद्दल अत्यंत नेटकेपणाची आणि निगुतीची धारणा या दोघींकडून शिकण्यासारखी आहे.

इरावतींचा अलिप्त मातृभाव, इमोशनली अस्ताव्यस्त अशा देशस्थ घरात वाढल्यामुळे मला हवासा वाटतो.तर दुर्गाबाईंचा खाष्ट तिरसटपणा आणि निस्पृहता मला आदरणीय वाटते. ज्ञानमार्गावरून चालू इच्छिणा-या बाईनं पुरुष आपला मानू नये. पोरं आपली मानू नयेत, संसार आपला मानू नये- फक्त स्वायत्तता आपली मानावी आणि ज्ञानयज्ञ निग्रहानं चालू ठेवावा हे या दोन बायांकडून शिकण्याचा माझा प्रयत्न आहे.
                         
( प्रथम प्रसिद्धी 'शब्द दीपोत्सव 2012)

Thursday, March 8, 2012

विंगेतल्या चळवळीची वाट पाहताना...

लिंकिंग रोडवरून येताना, मी डोकं बाहेर काढून रस्ता बघत होते आणि एकदम जाणवलं की अरे, मगाचपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंला सराफांची दुकानं लागतायत. पण सोन्याच्या दागिन्यांचं एकही दुकान बाईच्या नावाचं नाही. दाणाभाई, त्रिभुवनदास भिमजी… मग स्वत:शीच हसू आलं. असल्या विचाराला 'टिपिकल स्त्रीमुक्तीवाल्यांचा विचार' म्हणून ब्रॅण्ड कसं होईल ते उमगून हसायला आलं. पण मनाचा चाळा चालू राहिला. राजमल लखीचंद, पु.ना. गाडगीळ, वामन हरी पेठे, पालशेतकर, बायकेरीकर, अष्टेकर अशी जी नावं आठवत होती त्यात बाईचं एकही नाव नाही! याची कारणं अगदी उघड आहेत. सोन्याच्या व्यवहाराला आवश्यक भांडवल कुठे होतं कधी बायकांकडे? पेशव्यांच्या काळात सावकारांनी सोनं गहाण ठेवून घ्यायला आणि पेशव्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली तशी जमिनदार ब्राह्मणांची एण्ट्री या पेशात झाली. नाहीतर हे जग खरं मारवाडी पुरूषाचं जग. पण आता, सुबत्तेच्या युगात दागिने डिझाईन करणा-या बायका असल्या तरी 'सोन्याची दुकानं' बायकांच्या नावाची नाहीत. या साध्या, 'जेंडर'मुळे होणा-या आर्थिक घटनांना तपासायचं तर या तपासण्यात 'स्त्रीमुक्तीवादी' शिक्का बसेल असं मनात तरी का आलं? की सध्याची 'मी नाही बाई फेमिनिस्ट' ही फॅशन त्याला कारणीभूत आहे का ?

ऐशीच्या दशकात महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली, फोफावली. त्र्याण्णवच्या महिला धोरणात त्या चळवळीचं प्रतिबिंबही दिसलं. मात्र आता का बरं ही चळवळ ऑल्मोस्ट नामशेष झाली? तिचं महत्त्व का कमी झालं आहे? दोन हजार दहामध्ये या चळवळीला कसं बरं तपासायचं?

दिवरालाच्या रुपकंवरचा सती-खून किंवा पुण्यातल्या मंजुश्री सारडा खून खटल्याची घटना स्त्रीमुक्तीची चळवळ लोकांपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली होती . ऐंशीच्या दशकातले हुंडाबळी इतके क्रूर होते, की स्त्रीचळवळ जर नसती तर या क्रौर्यानं कोणतं टोक गाठलं असतं ते सांगता येत नाही. सीमा साखरे, विद्या बाळ या आद्य नावांपासून ते तत्कालीन समाजात शारदा साठे, छाया दातार, ज्योती म्हापसेकर, मंगला खिंवसरा, विद्युत भागवत,  माया पंडित या सा-या नावांची आठवण येणं अपरिहार्य आहे.

मृणालताई, तारा रेड्डी, अहिल्या रांगणेकर राजकारणात होत्या मात्र पोस्ट विद्या बाळ पिढी ही स्त्रीप्रश्नांचा राजकीय अभ्यास करताना स्त्रीविषयक संघटनात्मक कामाशी बांधली गेली होती. त्यामुळे ऐंशीच्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळीनं स्त्रियांवर कुटुंबांतर्गत होणा-या अत्याचाराची बाजू मांडली तसं 'स्त्री असणं' या वास्तवाचा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींच्या संदर्भात अन्वय लावण्याचं मोठं कामंही केलं. राजकारणातल्या स्त्री नेतृत्वाच्या पलीकडचं हे काम होतं.

त्यावेळी दादा धर्माधिकारींच्या लेखनात येणारा ज्युलियट मिचेलचा रेफरन्स किंवा पुष्पा भावे, विद्युत भागवत यांनी तोरिल मुआ, केट मिलेट, मारी दाली, अँण्ड्रिआ ड्वौरकिन यांसारख्या स्त्रीवादी विचारवंतांची करून दिलेली ओळख... त्या दशकानं स्वतंत्र स्त्री-भूमिकेचा राजकीयच नाही तर ज्ञानशास्त्रीय विचारही त्यावेळी समोर आणला.

त्या ‘मिळून सा-या जणी’, ‘बायजा’ किंवा तत्कालीन समाजात, नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला ‘पॉप्युलर’ने प्रकाशित केलेल्या 'पाऊलखुणा' यासोबत स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली, फोफावली. मात्र 'मुलगी झाली हो'च्या उल्लेखाशिवाय सारं अपुरं ठरावं इतका बदल या एका नाटकानं घडवून आणला. महाराष्ट्रातल्या चळवळीच्या जागराचं श्रेय या नाटकाला जातं.

पुणेरी पेठ-घरात मोठं होताना, घरात स्वायत्त विचार मांडणं सुरू झालं, की 'तुला विद्या बाळ व्हायचंय का?' असं विचारलं जायचं. असे ते दिवस होते. आता ज्या पन्नाशीच्या आसपास आहेत त्या बायांना, ज्या साठीच्या पलीकडे आहेत त्या पहिल्या फळीच्या 'स्त्रीमुक्ती'च्या प्रणेत्यांनी कितीतरी दारं उघडून दिली होती!

परंतु दोन हजार दहामध्ये आयडियॉलॉजी हरवलेला आणि कधीतरी आक्रमक बनणारा तरूण स्त्रियांचा आवाज जो भेटतो तो असा कसा झाला? या पोरी फेमिनिझम का नाकारतात? कर्वे-फुले-आंबेडकरांची सकस पायाभरणी असूनही महाराष्ट्रातल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं भुस्कट का झालं? डाव्या चळवळीच्या एकूण अपयशाच्या कॅनव्हासवर या चळवळीचं अपयश शांत डोक्यानं तपासायला हवं.  अपयशाची मीमांसा हा 'खापर फोडण्याचा प्रयोग' नाही तर उघड्या डोळ्यांनी काय चुकलं असं वाटतंय याबद्दल मत मांडण्याचा प्रयत्न आहे.

स्त्रीस्वातंत्र्याची प्रेरणा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, गांधी-विनोबांपासून घेतली त्या आद्य पिढीनं 'स्त्रीमुक्ती'कडे फक्त रोझा लक्झेंबर्ग चष्म्यातून बघितलं नाही. गांधीबाबाचं सोपं बनिया-बेरजेचं राजकारण समजून घेत मृणालताईंनी लढे उभारले, यशस्वी केले. या लढाऊ राजकारणाची दुसरी बाजू म्हणजे दुर्गाबाईंसारखी व्यक्तिमत्त्वं होती. आधुनिक स्त्रियांच्या पहिल्या फळीतल्या स्त्रिया या आपल्या भूमिकेवर ठाम आणि स्वच्छ होत्या. त्यांच्याकडे आताच्या काळात दुर्लभ अशी वैचारिक स्पष्टता होती.

यानंतर डाव्या चळवळीतून प्रेरणा घेतलेली, पोस्ट युक्रांद जी स्त्रीवादी पिढी आली ती चळवळीच्या ऊर्जेनं भारावलेली होती. या पिढीकडं बघताना मन भरून येतं. कारण आधुनिक रोमॅंटिसिझम आणि चळवळीचं क्रूर राजकारण अशी तारेवरची कसरत या पिढीनं केली. या पिढीतल्या गौरी देशपांडेसारख्या इण्टेन्स बाईनं मग रोमॅंटिक असण्याचा ऑप्शन घेतला तर नीलम गो-ह्यांसारखी बाई राजकारणाच्या सर्व छटांना परिचित होत्साती झाली.

या सा-यात काहीशा समजूतदार, सुलभ राजकारणाची कास विद्याताई बाळांनी पकडली. मात्र विद्याताईंनंतरच्या, पुष्पाबाईनंतरच्या पिढीचा मला सॉलिड प्रॉब्लेम जाणवतो. कारण अतिशय नम्रपणे मला असं म्हणावंसं वाटतं, की त्यांच्या कन्व्हिक्शन्स कमी पडल्या आहेत. यानंतरच्या बायांना राजकारण धड समजत नव्हतं; अकॅडमिक आवेश मात्र प्रचंड होता आणि त्याच बरोबर या पिढीनं 'विंगेतून आगरकर-टाईप बाप्ये येतील का?' अशी मनोमन सतत वाट पाहिली. हे विश्लेषण माझ्या मैत्रिणीनं केलं तेव्हा मला टोचलं होतं. परंतु, स्त्रीवाद्यांनी मनोमन एका 'पूर्ण पुरूषाची' वाट पाहात अनेक प्रयोग केले, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. प्रयोग करण्यात गैर काहीच नाही, परंतु त्या प्रयोगांच्या किंमती चुकवण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली.

नावडत्या, नमककम परंतु सुस्थितीतल्या नव-यांबरोबर संसार करायचे, त्यांतल्या तळटिपेतल्या अटी न पाळता पळवाटा शोधायच्या, परंतु सुखवस्तूपणाला अ-राजकीय चिकटून राहायचं हे यानंतरच्या फोर-फ्रंटवरच्या पिढीनं केलंय. त्या दंभाचा परिणाम चळवळीवर नक्कीच झाला. तसंच कोऑपरेशनच्या नावाखाली पुरुषांसोबत प्रचंड स्पर्धा केली, त्याचाही परिणाम या चळवळीवर झाला.

स्वातंत्र्य ही अतिशय महाग वस्तू असून त्यासाठी 'स्व'ला स्टेकला लावायला लागतं. 'केवळ मटिरिअल सुबत्ता देऊ शकणारा खटारा संसार आम्ही रेटला' या त्यागात फारशी ग्लोरी नव्हती आणि तो सारा कचखाऊपणा स्त्री मुक्ती चळवळीच्या पोस्ट-विद्याताई टप्प्यात दिसतो. यांतल्या काही जणींनी बोअरिंग किंवा क्रूर संसार नाकारले. मात्र नव्या संसाराची, यशाची अपेक्षा इण्टॅक्ट ठेवूनच… त्यामुळे झडझडून स्वायत्तता किंवा स्वत:चा निर्भर आवाज त्यांना लाभू शकला नाही. पुरूषप्रधानता/पॅट्रिआर्की नाकारताना या पॅट्रिआर्कीपलीकडे उडी टाकणारे पुरूष असतीलच की... असं त्यांना मनोमन वाटत राहिलं.

त्या मानानं पुण्या-मुंबईपलीकडच्या बाया जास्त ठोस आणि शहाण्या होत्या. त्यांनी चळवळ जेव्हा स्वीकारली तेव्हा मनापासून, झोकून देऊन चळवळ उभी केली. नागपूरच्या सीमाताई साख-य़ांचं आत्मचरित्र वाचताना माझ्या डोळ्यात पाणी अालं. त्यांना राजकारण नीट उमगलं होतं.  नंतर एकीकडून तोरिल मुआचं 'सेक्शुअल अँण्ड टेक्शुअल पॉलिटिक्स' वाचणा-या बाया जेव्हा अंतिमत: 'मारूती माक्सिस्ट' बनल्या तेव्हा या चळवळीचं अस्तित्व माध्यमांपुरतंच मर्यादित झालं. म्हणूनच नंतरच्या काळातला स्त्रीलिंगी गर्भचिकित्सेचा मुद्दा चळवळीतल्या आवाजापेक्षा कितीतरी जास्त पटीनी डॉक्टरांनी व इतर एन.जी.ओ.वाल्यांनी उचलून धरलेला दिसतो. यानंतर स्त्री-मुक्तीवाद्यांच्या जास्त चर्चा 'आहे मनोहर तरी' आणि 'बंध-अनुबंध'वर झाल्या. हे कसलं लक्षण आहे?

एकीकडून स्त्रीमुक्तीची भाषा वापरणा-या नवरा-शरण बायांनी, आई म्हणून आपल्या पोरींवर कसले संस्कार घडवले? कच खाण्याचे? मटिरिअल सुबत्तेला शरण जाण्याचे की घरच्या कार्पेटखाली सारी हिपोक्रसी दडपण्याचे? नो वंडर, अशा घरातल्या मुली पुढे येऊन 'आय अँम नॉट अ फेमिनिस्ट' म्हणतात. आणि पुरूष? या दरम्यान काही समजूतदार पुरूष बदलले. चळवळवाल्या पुरूषांनी नॅपी बदलण्याचं शिक्षण घेतलं. पण मूळ ढाचा पुरूष असण्याचा फारसा बदललेला नाही. रादर, स्वतंत्र वाटणा-या बाया अधिकच कॉंन्झरर्व्हेटिव्ह निघाल्या असं पुरूषी गणित काहींनी मांडलं, जोखलं आणि वापरलंही. ते पॅट्रिआर्कीचे फायदे असे सहजी कुठे सोडणार होते?

सुपरबोअरिंग लग्नं तर नॉन-स्त्रीमुक्तीवाल्या बायकांनीही टिकवलीच होती. रादर, तीच तर परंपरा होती आपल्या देशात. मात्र त्यांनी आपल्या पोरींना लग्नात सौख्य, समाधान इत्यादी न शोधण्याचा मोलाचा धडा दिला होता. पोरांमध्ये मन गुंतवायचं, जोडलेल्या नात्यापेक्षा रक्ताची नाती जोपासायची हे बेसिक धडे या कॉंन्झरर्व्हेटिव्ह आयांचे होते. पोस्ट मॅनॉपॉझल फेजमध्ये, पोरं हाताशी आली की नव-याला डंख करण्याची एकही संधी न सोडणा-या पॉवरबाज बायका चळवळीनं घडवलेल्या नव्हत्या, तर त्या बदलत्या अर्थव्यवस्थेत स्वत:चं शहाणपण वापरून घडल्या होत्या. रेशनिंग ऑफिस, एल.आय.सी., मंत्रालयात नोकरी करून ज्यांनी आपले संसार रेटले त्यांनी आपल्या पोरींना कॉंन्झरर्व्हेटिव्ह किंवा मुक्त होण्याचे धडे दिले नाहीत. रादर, त्यांनी नोकरीतले कष्ट, त्रास पोरींना उमजू दिले. आज आय.टी.मध्ये लाखात पगार कमावणा-या पोरी त्यामुळे स्त्रीमुक्तीची भाषा बोलत नाहीत किंवा त्या उर्मिला देशपांडेसारखं 'पॅक ऑफ लाईज'ही लिहीत नाहीत.

या नव्या, स्वायत्त पोरी एकट्या परदेशी जातात, बख्खळ पैसा कमावतात, स्वत:चे फ्लॅट्स घेतात. रादर, आईला चिकटून राहतात आणि प्रत्येक नात्याला करार म्हणून स्वीकारताना स्वत:चं काय 'डील' आहे ते नीट तपासून घेतात. त्या निदान विंगेतून माझ्यासाठी आगरकर-सदृश पुरूष कधी येईल ? याची वाट तरी पाहात नाहीत! किंवा आपला पुरुष आगरकर टाइप नसणार म्हणून आपापले मार्गही शोधतात.

मात्र हे सारं शहरात घडताना जे गावात घडतंय त्याकडे सेन्सिटिव्हली कसं पाहायचं ते या कधी शिकणार? प्रश्न तर अनेक आहेत आणि माझ्यासारख्या 'ना अरत्र ना परत्र' फेमिनिस्ट बाईला चळवळ मनापासून आवश्यक वाटते. हा माझा हास्यास्पद चळवळ-नॉस्टॅल्जिआ मला समजतो, तरी हवासा वाटतो. म्हणूनच मी विंगेतल्या चळवळीची वाट बघते. एका स्त्री-पुरूष नॉनहिपोक्रिट मुक्तीची!

Wednesday, June 15, 2011

माझाही नाममात्र करडा घोडा...






एम एफ हुसैन यांच्या निधनाला काही दिवस लोटल्यावर आता त्यांच्याबद्दल मनापासून लिहिता येईल. बालिश हिंदुत्ववादी (नेटकरी) आणि भांडवलशाहीचे पुरेपूर फायदे घेणारे लिबरल (विशेषतः मिडियातले) यांना हुसैन हे चित्रकार म्हणून आपलेसे वाटण्यापेक्षा त्यांच्या सामाजिक भूमिकेमुळेच उपयुक्त होते. भारतीय समाजात हुसैन यांचे एक सांस्कृतिक स्थान होतेच. त्याच सोबत त्यांनी निवडलेल्या अभिव्यक्तिमुळे ते स्थान वादग्रस्तही होते. या वादग्रस्ततेमुळेच हुसैन आयडिआलॉजिकली वादग्रस्त लोकांना आपलेसे वाटले यात नवल नाही. अजून जसजसा काळ जाईल तसे हुसैन यांच्याबद्दलचे आपले आकलनही बदलेल..किंबहुना ते अधिक स्पष्ट होईल. हुसैन यांच्या निधनानंतर का होईना आपण त्या साऱ्या प्रकरणातून काही शिकलो तर तर तेही नसे थोडके.

बजरंग दलानं केलेला हल्ला, नंतर गावोगावी हुसैन यांच्यावर टाकलेल्या कोर्टकेसेस आणि त्यानंतर त्यांचे एकूण वाढलेले परदेशी वास्तव्य, २००६ मध्ये त्यांनी स्वतःहून भारतातून निघून जाणं आणि कतारचं नागरिकत्व स्वीकारणं यामधील अत्यंतिक वेदना कुणाही संवेदनशील व्यक्तिमत्वाला जाणवू शकेल. शत्रूवरही ही वेळ येऊ नये.

१९९६ -- म्हणजे बाबरी मशीदवादोत्तर भारतात नवे-संस्कृतिरक्षक जन्माला आले. आणि दुर्दैवाने शासन त्यांना रोखण्यास अपयशी ठरले. हुसैन यांना जगात कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळलं असतं. रश्दींप्रमाणे संरक्षणही. २००६ मधलं जग बदललं होतं. बजरंगदलासारख्या अतिरेकी संघटनेच्या हिंसेचा परिणाम असा झाला कि हुसैन यांनी कतार या मुस्लीम देशाचं नागरिकत्व घेतलं. व्यक्तिचे व्यक्ती म्हणून असलेले हक्क आधुनिक शासन जेव्हा अबाधित राखू शकत नाही तेव्हा ती व्यक्ती शेवटी कोणत्यातरी गटाचा आधार घेते- ही भारतीय आधुनिक लोकशाहीची नामुष्की आहे. भारतीय शासनाला याचीही लाज वाटत नाही. सरतेशेवटी व्यक्तिला समूहशरण बनवणं ही फंडामेंटलिस्ट चाल आहे.
 
हुसैन जन्मानं मुस्लिम असूनही त्यांनी हिंदू देवदेवतांची चित्रं काढली म्हणून त्यांच्यावर भडकलेल्या हिन्दू वर्गाला जो त्रास होतो त्या त्रासाबद्दल माझ्या मनात सहानूभूती नाही. सेक्युलर समाजाचे सर्व फायदे उपभोगून पार्टटाईम-हिन्दू संवेदना बाळगणाऱ्या वर्गाला तो त्रास आवश्यकच आहे. इतिहासाचा, परंपरांचा आणि कलेचा कोणताही अभ्यास नसताना हाकनाक दुःखी होणाऱ्या लोकांना थोडं दुखलं तरी काही फरक पडत नाही. अनेक अभ्यासकांनी दाखल्यानिशी सीता आणि सरस्वतीचे संदर्भ दाखवून त्यांची नग्नता किंवा हुसैन यांची त्यावरची ईलस्ट्रेटिव्ह कॉमेंट यामुळे भावना दुखावणे कसे अप्रस्तुत आहे हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ( उत्सुकतेपोटी वाचकांनी सरस्वती-जन्माची कथा वाचून बघावी.) हिंदुत्ववाद्यांना हुसैन डाचतात यात नवल नाही. ते शुद्ध राजकारण आहे. शिवाय भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला इथल्या संस्कृतिवर भाष्यं करण्याचा आधिकार त्यांना नाकारायचा आहे. त्यामुळे हुसैन यांना मुस्लीम- अस्मितेत ढकलणं ही आवश्यक चाल आहे. मात्र या पलीकडे जाऊन एका मोठ्या भारतीय हिंदू आणि मुस्लीम समाजाला हुसैन यांच्या शैलीने प्रोव्होक केलं होतं याचं कारण मात्र शोधावसं वाटतं.

१९५२ मध्ये लोहियांनी हैद्राबादेत’ ’कालचक्र’ ( Wheel of History) या विषयावर सात व्याख्याने दिली. याच विषयावर हुसैन यांनी काढलेले चित्र लोहिया यांच्यावरील पुस्तकातही वापरण्यात आले आहे. त्या चित्राचे वर्ष आहे १९५२. लोहियांच्या व्यापक सामाजिक धारणांशी परिचय असणारे हुसैन मग बदलले कसे?


हुसैन यांच्या कारकिर्दीवर भाष्यं करताना पत्रकार जमात ( पक्षी राजदीप एटआल) हिरीरीने बोलते आणि चित्रकार जमात (पक्षी विवान सुन्दरम) अवरोधून. हा अवरोध केवळ स्पर्धेपोटी आलेला नाही. फ्रंटलाईन मध्ये विवान सुंदरम यांची हुसैनवरची मुलाखत वाचताना हे लक्षात येतं. विवान सुन्दरम यांनी हुसैन यांना 'उधळा जिप्सी' म्हटलंय. आणि त्यांच्या कलेकडे बघताना तिला ’अपूर्ण आधुनिकतेचा परिपाक’ असंही म्हटलंय. हुसैन जरी मॉडर्निस्ट पेंटर होते तरी आधुनिकतेची मूल्यं (पिकासोप्रमाणे) त्यांनी संपूर्णतः स्वीकारली नव्हती. याच अर्ध्या-आधुनिकतेच्या स्वीकारातून अनेक विरोधाभासांचा जन्म झाला होता असे सुन्दरम यांचे म्हणणे आहे. कलेच्या आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने ते तपासणे अगत्याचे आहे.
लोहियांच्या प्रभावाखालील मांडणीतून स्वतःची ईलस्ट्रेटिव्ह शैली शोधणारा हा चित्रकार controversy-प्रवण कसा झाला? हा प्रश्न उरतोच. आणिबाणिच्या काळात इंदिरा गांधींना सहानुभूती दाखवणारी चित्रंही हुसैन यांनी काढलेली आहेतंच. त्याचमुळे त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आणि संसदोपनिषद साकारलं गेलं असं प्रभाकर कोलते यांच्या लेखात आहे. हुसैनमधला असा आयडिऑलॉजिकल विरोधाभास अनेक पातळ्यांवरचा आहे. बहुजनांच्या मिथकांवर डिसरप्टिव्ह भाष्य करताना अभिजनवर्गाचं सदस्य अबाधित ठेवायचं हा ही त्यातलाच एक.

सत्ता- मग ती बॉलिवूडमधली प्रसिद्धिची असो किंवा राजकीय. हुसैन यांचा सत्तेवर लोभ होता. लोकेषणा ही त्यांची महत्वाची प्रेरणा होती. गायतोंड्यांबद्दल बोलताना हुसैन एकदा म्हणाले होते,"गायतोंडे चित्रकार आहेत -मी पॉप्युलर आहे." पॉप्युलर असणॆ हे बाय डिफॉल्ट वादग्रस्त असतेच. लोकेषणेचा मोह ज्यांना आहे त्या प्रत्येकाला डाव्यांनी अगर उजव्यांनी, वापरलेले किंवा हैराण केलेले आहेच. लोहिया ते इंदिरा असा सत्ताप्रवास, बहुजन ते अभिजन (या अभिजन असण्यामध्ये ठाकरे लीलावतीत असताना त्यांना फुले घेऊन जाणे इत्यादी सर्व येतेच) असा वर्गप्रवास आणि लोकेषणामोह त्यातून प्रसिद्धीमोह -- यात कलेला आवश्यक परखड आत्मपरीक्षण कुठे कमी पडत गेले का?

हुसैन यांच्या कलेवर सुन्दरम यांच फार सुंदर भाष्यं आहे. अंर्तमन ढवळून काढणारी, नेणिवांना सुरुंग लावणारी डिसरप्टीव्ह आर्ट खरी सूझांची होती. त्यासाठी सूझांनी त्यांची नेणीव, चरित्र हे कच्चा माल म्हणून वापरलं. (जे कवितेत मर्ढेकरांनी केलं आहे) बहुजन समूहमनाच्या नेणिवांना ढवळून काढताना हुसैन अलिप्त रहिले. त्यांनी चरित्रातून वाहणाऱ्या विरोधाभासांना ऐरणीवर आणलं नाही. या अनुषंगानेच हुसैन यांचे अपूर्ण आधुनिकतेचे प्रॉजेक्ट तपासावे लागेल. हुसैन यांच्या निधनानंतर या विरोधाभासांना तपासणे आणि सुलभीकरणाखेरीज त्यांची छाननी करणे आता आवश्यक आहे.