जानेवारी महिन्यात पुण्यात पिफ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तिथं सोरेंटिनो या इटालियन दिग्दर्शकाचा अप्रतिम सिनेमा ‘द ग्रँड ब्युटी’-‘ला ग्रांद बेलझ्झा’ बघायला मिळाला. सुबत्तेच्या ओझ्याखाली क्षीण होत जाणाऱ्या सर्जनशील आवाजाचा, सौंदर्याचा, निर्मितीक्षमतेच्या अभावाचा शोध आणि विश्लेषण सोरेंटिनोनं या चित्रपटाद्वारे केलं आहे.
अंतोनिओनि आणि फेलिनी या दोन दिग्गज दिग्दर्शकांच्या कलाकृतीसोबत ‘द ग्रँड ब्युटी’ची व्हिज्युअल भाषा संवाद साधते. कित्येक महत्त्वाच्या कलाकृतींमधल्या (ला डोल्शे विट्टा, ला नोट्टे) प्रसंगांची पताका स्थानं मिरवत ‘द ग्रँड ब्युटी’ हा सिनेमा उलगडतो. ‘एट अँड हाफ’ या फेलिनीच्या सिनेमाची सुरुवात अत्यंत प्रभावात्मक आणि प्रतिकात्मक घुसमटीनं होते. ‘द ग्रँड ब्युटी’ आपल्याला अतिश्रीमंत, अति सुबत्तेत दंग असलेल्या रोमन पार्टीलाइफमध्ये खेचतो. पूर्वसुरींच्या कलाकृती सोबत सोरेंटिनोची फिल्म अत्यंत इंटेन्स पद्धतीनं संवाद साधते आणि ती बघणाऱ्या डोळ्यांना अधिक खोलात उडी मारायचं आवाहन करते.
जेप गॅम्बार्डेला- रोममधला लेखक- हाय सोसायटी पत्रकार.. त्यानं पहिली कादंबरी लिहूनही चाळीस वर्षं उलटलीएत. जेपच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या प्रचंड, डिकेडन्ट पार्टीनं ‘द ग्रँड ब्युटी’ची सुरुवात होते.
सुंदर शरीरं, फॅशन्स, बेभान म्युझिक, मनोरंजनाचं उथळ अमेरिकन नव्हे, तर युरोपियन वातावरण. अमेरिकन पार्टी म्हणजे तरुण, सेक्स-ड्रिव्हन, उथळ आणि कॅलस समूह तर युरोपियन हाय सोसायटी पार्टी ही उत्तरमध्यमवयीन, तारुण्याच्या शोधात पण तारुण्यापलीकडे गेलेल्या परंपरागत श्रीमंतांची पार्टी. या पार्टीत बेभान होऊ इच्छिणारे एकएकटे जीव आणि पार्टी संपल्यावर पहिल्यांदा भानावर येणारी जेपची सौंदर्यविहीन एडिटर या अत्यंत वेगवान पार्टी प्रसंगातून सोरेंटिनोचा ‘सौंदर्यशोध’ सुरू होतो.
रोममध्ये दोन राजधान्या एकमेकांसोबत नांदतात. पहिली कॅथलिक चर्चमुळं जगभरच्या ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मसत्तेचं केंद्र असलेलं रोम- दुसरीकडे मिलानसारख्या शहराजवळचं, डिझायनर फॅशनचं केंद्रस्थान. युरोपच्या धर्मसत्ता आणि श्रीमंत वर्गाची ‘कंझम्प्शन सत्ता’ रोममध्ये एकवटलीए- त्या शहरात, बाल्कनीतून सिटाडेल दिसतं अशा प्रचंड घरात जेप राहातो.
इथल्या जगण्यावर जेपनं मांड घातलीए- मात्र ते करताना जीवन त्याच्या बोटाच्या फटीतून निसटलंय. बाकी कुणाला नसलं तरी जेपला त्या जीवनाच्या, व्हायब्रंट अस्तित्वाच्या अभावाचं भान आहे.
रोममध्ये विविध नवश्रीमंतांचे थर येत आहेत.. आणि ही सुबत्तेची झुकझुक गाडी जागच्या जागीच फेऱ्या घालतीए.. ‘इथे आले, इथून पुढे कुठं?’ हा प्रश्नच त्यांना सोडवता येत नाहीए.. या साडेतीन फूट खोल स्विमिंगपूलमध्ये सगळेच तरंगतायत पण खोल सूर कोणालाच मारता येत नाहीए..या जीवनाची संगती लावत, काहीसा अलिप्त, पासष्टाव्या वाढदिवशी थोडा अस्वस्थ झालेला तीव्र बुद्धिमान जेप ‘ग्रँड ब्युटी’चा शोध घेतो.
रोममधल्या विविध ऐतिहासिक सौंदर्यपूर्ण वास्तू, चित्रकलेच्या क्षेत्रातले (उथळ) प्रयोग, हाय फॅशन, त्यासोबत येणारं हाय लाईफ- सोरेंटिनो या सुखानं भरलेल्या आयुष्यातल्या निर्मितीच्या अभावाचा कंद सोलतो. (लहान मुलीला खेळू न देता तिला चित्रात प्रयोग करायला लावणारा कलात्मक पेडोफेलिया इथंच भेटतो.)
या अति श्रीमंतीचं व्याकरण जेपनं आत्मसात केलंय. फ्यूनरलचं व्याकरण तो गणितमानी पायऱ्या-पायऱ्यांनी डिकोड करून मैत्रिणीला सांगू शकतो. फ्यूनरल कळणाऱ्या जेपला- मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ‘मृत्यू’ समजतो.
प्रेम, सेक्स, सौंदर्य, त्यामध्ये दंग होणं- सारं काही जेपच्या आयुष्यात आहे. मात्र सुबत्तेत सौंदर्याचं अवतरण होत नाही. मनावरची भुतं एकेकाळी यशस्वीपणे उतरवणारा कार्डिनल बेलुचीदेखील जेपच्या मनावरचं हे साचलेपणाचं भूत दूर करू शकत नाही. मात्र ‘पराकाष्ठा’ म्हणजे काय? ते समजलेली संतत्त्वाच्या पायऱ्या चढणारी नन- जेपला सौंदर्यरहस्याचा दरवाजा किलकिला करून दाखवते.
जेपच्या बाल्कनीत या ननच्या एका हळुवार हाकेनं जेव्हा सारस पक्षी अवतरतात आणि तिच्या हळुवार फुंकरीनं ते उडून जातात या चमत्कार दर्शनानं ‘द ग्रँड ब्युटी’चं सहजत्व आणि त्यातली जगणं जाणण्याची किमया जेपला क्षणकाल दिसून जाते.
या साऱ्या व्यक्तींचा ग्रँड परफॉर्मन्स ज्या स्टेजवर चालू आहे- त्या मोकळ्या जागेचं नाव आहे रोम. युगायुगांच्या सांस्कृतिक इतिहासाचे थर या शहरावर आहेत... ‘रोमानियत’- या रोमची घडी जेपला उलगडलीए- तसंच इथला घुसमटता, वांझ एकटेपणा, प्रेमाचा अभावही त्याला समजलाय.
युरोपच्या अति वैभवात दंग झालेली पार्टी जेपला बेचव वाटते. पण जे पार्टीत आहेत त्यांना पश्चात्तापाचा स्पर्शही झालेला नाही. या साऱ्या कंझप्शनग्रस्त जगाला अधोविश्वातून टेकू देणारा डॉन जेपचा शेजारी आहे आणि तो आपला शेजारी आहे हे त्याला अटक होईस्तोवर जेपला कळत नाही- हे सोरेंटिनोचं दिग्दर्शक म्हणून जाणवणारं रचनेचं कौशल्य आहे.
अस्तित्ववादाच्या पकडीतून सुटत एका पोस्टमॉडर्न चमत्काराला सोरेटिनोच्या ‘द ग्रँड ब्युटी’ कवेत घेतो. जेप गँबार्डेलामार्फत, १४२ मिनिटांत युरपच्या, डिकेडन्ट, दुखऱ्या, रिकाम्या ह-दयावर सोरेंटिनो कॅमेरा रोखतो आणि पार्टीनंतरच्या पहाटे- एक चमत्काराची शक्यता जेपच्या मनात जागी करतो.न लिहित्या लेखकाला, त्याच्या न लिहिण्यात केंद्रस्थानी ठेवणारी ही कलाकृती- आणि अति वैभवानं संवेदनाशून्य झालेलं रोम हे त्या लेखकाच्या मनाचं नेपथ्य- या जागेत ‘द ग्रँड ब्युटी’ आकाराला येते- आणि आयुष्य उलगडणाऱ्या डोळ्यांना खिळवून ठेवते.
waah. kay sundar parikshan lihilayat tumhi. Jabardast.
ReplyDeleteMi ha cinema pahila ani mala je kalala navhata te ya parikshanatun kalala.
Dhanyawad. :)