Wednesday, June 15, 2011

माझाही नाममात्र करडा घोडा...






एम एफ हुसैन यांच्या निधनाला काही दिवस लोटल्यावर आता त्यांच्याबद्दल मनापासून लिहिता येईल. बालिश हिंदुत्ववादी (नेटकरी) आणि भांडवलशाहीचे पुरेपूर फायदे घेणारे लिबरल (विशेषतः मिडियातले) यांना हुसैन हे चित्रकार म्हणून आपलेसे वाटण्यापेक्षा त्यांच्या सामाजिक भूमिकेमुळेच उपयुक्त होते. भारतीय समाजात हुसैन यांचे एक सांस्कृतिक स्थान होतेच. त्याच सोबत त्यांनी निवडलेल्या अभिव्यक्तिमुळे ते स्थान वादग्रस्तही होते. या वादग्रस्ततेमुळेच हुसैन आयडिआलॉजिकली वादग्रस्त लोकांना आपलेसे वाटले यात नवल नाही. अजून जसजसा काळ जाईल तसे हुसैन यांच्याबद्दलचे आपले आकलनही बदलेल..किंबहुना ते अधिक स्पष्ट होईल. हुसैन यांच्या निधनानंतर का होईना आपण त्या साऱ्या प्रकरणातून काही शिकलो तर तर तेही नसे थोडके.

बजरंग दलानं केलेला हल्ला, नंतर गावोगावी हुसैन यांच्यावर टाकलेल्या कोर्टकेसेस आणि त्यानंतर त्यांचे एकूण वाढलेले परदेशी वास्तव्य, २००६ मध्ये त्यांनी स्वतःहून भारतातून निघून जाणं आणि कतारचं नागरिकत्व स्वीकारणं यामधील अत्यंतिक वेदना कुणाही संवेदनशील व्यक्तिमत्वाला जाणवू शकेल. शत्रूवरही ही वेळ येऊ नये.

१९९६ -- म्हणजे बाबरी मशीदवादोत्तर भारतात नवे-संस्कृतिरक्षक जन्माला आले. आणि दुर्दैवाने शासन त्यांना रोखण्यास अपयशी ठरले. हुसैन यांना जगात कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळलं असतं. रश्दींप्रमाणे संरक्षणही. २००६ मधलं जग बदललं होतं. बजरंगदलासारख्या अतिरेकी संघटनेच्या हिंसेचा परिणाम असा झाला कि हुसैन यांनी कतार या मुस्लीम देशाचं नागरिकत्व घेतलं. व्यक्तिचे व्यक्ती म्हणून असलेले हक्क आधुनिक शासन जेव्हा अबाधित राखू शकत नाही तेव्हा ती व्यक्ती शेवटी कोणत्यातरी गटाचा आधार घेते- ही भारतीय आधुनिक लोकशाहीची नामुष्की आहे. भारतीय शासनाला याचीही लाज वाटत नाही. सरतेशेवटी व्यक्तिला समूहशरण बनवणं ही फंडामेंटलिस्ट चाल आहे.
 
हुसैन जन्मानं मुस्लिम असूनही त्यांनी हिंदू देवदेवतांची चित्रं काढली म्हणून त्यांच्यावर भडकलेल्या हिन्दू वर्गाला जो त्रास होतो त्या त्रासाबद्दल माझ्या मनात सहानूभूती नाही. सेक्युलर समाजाचे सर्व फायदे उपभोगून पार्टटाईम-हिन्दू संवेदना बाळगणाऱ्या वर्गाला तो त्रास आवश्यकच आहे. इतिहासाचा, परंपरांचा आणि कलेचा कोणताही अभ्यास नसताना हाकनाक दुःखी होणाऱ्या लोकांना थोडं दुखलं तरी काही फरक पडत नाही. अनेक अभ्यासकांनी दाखल्यानिशी सीता आणि सरस्वतीचे संदर्भ दाखवून त्यांची नग्नता किंवा हुसैन यांची त्यावरची ईलस्ट्रेटिव्ह कॉमेंट यामुळे भावना दुखावणे कसे अप्रस्तुत आहे हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ( उत्सुकतेपोटी वाचकांनी सरस्वती-जन्माची कथा वाचून बघावी.) हिंदुत्ववाद्यांना हुसैन डाचतात यात नवल नाही. ते शुद्ध राजकारण आहे. शिवाय भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला इथल्या संस्कृतिवर भाष्यं करण्याचा आधिकार त्यांना नाकारायचा आहे. त्यामुळे हुसैन यांना मुस्लीम- अस्मितेत ढकलणं ही आवश्यक चाल आहे. मात्र या पलीकडे जाऊन एका मोठ्या भारतीय हिंदू आणि मुस्लीम समाजाला हुसैन यांच्या शैलीने प्रोव्होक केलं होतं याचं कारण मात्र शोधावसं वाटतं.

१९५२ मध्ये लोहियांनी हैद्राबादेत’ ’कालचक्र’ ( Wheel of History) या विषयावर सात व्याख्याने दिली. याच विषयावर हुसैन यांनी काढलेले चित्र लोहिया यांच्यावरील पुस्तकातही वापरण्यात आले आहे. त्या चित्राचे वर्ष आहे १९५२. लोहियांच्या व्यापक सामाजिक धारणांशी परिचय असणारे हुसैन मग बदलले कसे?


हुसैन यांच्या कारकिर्दीवर भाष्यं करताना पत्रकार जमात ( पक्षी राजदीप एटआल) हिरीरीने बोलते आणि चित्रकार जमात (पक्षी विवान सुन्दरम) अवरोधून. हा अवरोध केवळ स्पर्धेपोटी आलेला नाही. फ्रंटलाईन मध्ये विवान सुंदरम यांची हुसैनवरची मुलाखत वाचताना हे लक्षात येतं. विवान सुन्दरम यांनी हुसैन यांना 'उधळा जिप्सी' म्हटलंय. आणि त्यांच्या कलेकडे बघताना तिला ’अपूर्ण आधुनिकतेचा परिपाक’ असंही म्हटलंय. हुसैन जरी मॉडर्निस्ट पेंटर होते तरी आधुनिकतेची मूल्यं (पिकासोप्रमाणे) त्यांनी संपूर्णतः स्वीकारली नव्हती. याच अर्ध्या-आधुनिकतेच्या स्वीकारातून अनेक विरोधाभासांचा जन्म झाला होता असे सुन्दरम यांचे म्हणणे आहे. कलेच्या आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने ते तपासणे अगत्याचे आहे.
लोहियांच्या प्रभावाखालील मांडणीतून स्वतःची ईलस्ट्रेटिव्ह शैली शोधणारा हा चित्रकार controversy-प्रवण कसा झाला? हा प्रश्न उरतोच. आणिबाणिच्या काळात इंदिरा गांधींना सहानुभूती दाखवणारी चित्रंही हुसैन यांनी काढलेली आहेतंच. त्याचमुळे त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आणि संसदोपनिषद साकारलं गेलं असं प्रभाकर कोलते यांच्या लेखात आहे. हुसैनमधला असा आयडिऑलॉजिकल विरोधाभास अनेक पातळ्यांवरचा आहे. बहुजनांच्या मिथकांवर डिसरप्टिव्ह भाष्य करताना अभिजनवर्गाचं सदस्य अबाधित ठेवायचं हा ही त्यातलाच एक.

सत्ता- मग ती बॉलिवूडमधली प्रसिद्धिची असो किंवा राजकीय. हुसैन यांचा सत्तेवर लोभ होता. लोकेषणा ही त्यांची महत्वाची प्रेरणा होती. गायतोंड्यांबद्दल बोलताना हुसैन एकदा म्हणाले होते,"गायतोंडे चित्रकार आहेत -मी पॉप्युलर आहे." पॉप्युलर असणॆ हे बाय डिफॉल्ट वादग्रस्त असतेच. लोकेषणेचा मोह ज्यांना आहे त्या प्रत्येकाला डाव्यांनी अगर उजव्यांनी, वापरलेले किंवा हैराण केलेले आहेच. लोहिया ते इंदिरा असा सत्ताप्रवास, बहुजन ते अभिजन (या अभिजन असण्यामध्ये ठाकरे लीलावतीत असताना त्यांना फुले घेऊन जाणे इत्यादी सर्व येतेच) असा वर्गप्रवास आणि लोकेषणामोह त्यातून प्रसिद्धीमोह -- यात कलेला आवश्यक परखड आत्मपरीक्षण कुठे कमी पडत गेले का?

हुसैन यांच्या कलेवर सुन्दरम यांच फार सुंदर भाष्यं आहे. अंर्तमन ढवळून काढणारी, नेणिवांना सुरुंग लावणारी डिसरप्टीव्ह आर्ट खरी सूझांची होती. त्यासाठी सूझांनी त्यांची नेणीव, चरित्र हे कच्चा माल म्हणून वापरलं. (जे कवितेत मर्ढेकरांनी केलं आहे) बहुजन समूहमनाच्या नेणिवांना ढवळून काढताना हुसैन अलिप्त रहिले. त्यांनी चरित्रातून वाहणाऱ्या विरोधाभासांना ऐरणीवर आणलं नाही. या अनुषंगानेच हुसैन यांचे अपूर्ण आधुनिकतेचे प्रॉजेक्ट तपासावे लागेल. हुसैन यांच्या निधनानंतर या विरोधाभासांना तपासणे आणि सुलभीकरणाखेरीज त्यांची छाननी करणे आता आवश्यक आहे.

8 comments:

  1. ज्ञानदा,
    मी एकदा सोडून तीनदा तुझा मजकूर वाचला. याला कारण म्हणजे चित्रकलेबाबत माझा अभ्यास नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याइतकं माझं वाचन नाही. तू मराठीत लिहिताना इंग्रजी सदरलेखकांप्रमाणे 'लोकांनी ते वाचलं असेलच' असं गृहीत धरतेस. ते वाचन माझं नसल्यानं काही चुकीचं आकलन होऊ नये आणि मग अभिप्रायही चुकीचा दिला जाऊ नये या दक्षतेपोटी मी मजकूर तीनदा वाचला.
    '....भांडवलशाहीचे पुरेपूर फायदे घेणारे लिबरल ( विशेषतः मिडियातले) यांना हुसैन हे चित्रकार म्हणून आपलेसे वाटण्यापेक्षा त्यांच्या सामाजिक भूमिकेमुळेच उपयुक्त होते.' म्हणजे काय?- कसे? माझ्या ध्यानात ते नीट आले नाही. हिंदुत्ववादी लोकांबद्दल तू ठणकावून लिहिलं आहेस आणि ते मला आवडलं. त्यांनी स्वतःहून भारतातून निघून जाणं आणि कतारचं नगरिकत्व स्वीकारणं यामधील अत्यंतिक वेदना कुणाही संवेदनशील व्यक्तिमत्वाला जाणवू शकेल. शत्रूवरही ही वेळ येऊ नये. हे मलाही स्पर्शून गेलं.
    लोहियावादाला पाठिंबा देणारे हुसैन हे पुढे केवळ लोकप्रियतेच्या हव्यासातून इंदिरा गांधींची चित्रे काढू लागले असं काहीसं तुला म्हणायचं आहे. ते मला मान्य नाही. अलीकडच्या काळात इंदिरा गांधींच्या साऱ्या वादग्रस्ततेसकट त्यांना चाहणारा मोठा वर्ग आहे. कुमार केतकर हे त्याचे प्रतिनिधी मानता येतील. विशेषतः नंतरच्या काळातील सर्व पक्षातील खुज्या पुढाऱ्यांची लांबलचक रांग पाहता त्या मोठ्याच होत्या, असं मानावं लागेल. हुसैन यांना त्या खरंच अपील झाल्या असतील, त्यांच्यात 'दुर्गा' दिसली असेल, असा संशयाचा फायदा त्यांना दिला पाहिजे. त्यामुळे ते संसदेत ते गेले असतील, पण मुळात काही गणितं आखून त्यांनी ती भूमिका घेतली असेल, असं मला वाटत नाही.
    'ठाकऱ्यांना फुलं घेऊन जाणॆ' हा धोरणाचा भाग ठरतो. कोट्यावधी रुपयांची चित्रं फाडू नयेत, जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून अवलंबलेला हा भाग आहे. तो त्यांनी अवलंबू नये , असं म्हणणं हे बऱ्याचदा काहीच स्टेकला न लागलेल्या समाजाला शक्य असतं. त्यामुळे ते हुसेनपेक्षा जास्त नीतिमान ठरू शकतात. भंपक लोकांच्या राज्यात आणि शासनाचं कोणतंही संरक्षण नसताना त्यांनी अशा काही गोष्टी धोरणाचा भाग म्हणून जर केल्या असतील तर त्यातून फार अर्थ काढण्यात अर्थ नाही.
    चित्रकार जमात अवरोधून बोलत असेल तर तो माझा प्रांत नव्हे. सुंदरम यांच्या मताप्रमाणे 'पिकासोप्रमाणे त्यांनी आधुनिकतेची मूल्यं पूर्णपणे स्वीकारली नसतील' तर तो त्यांच्या स्व-तंत्र शैलीचा आणि विचारसरणीचा भाग नाही का? भारतीय संस्कृतीतील बहु-सांस्कृतिकता अंगी बाणल्यानंतर 'अमुक एका पद्धतीची आधुनिकता' त्यांनी स्वीकारली नाही, हा त्यांचा कदाचित गुणच असू शकेल. किंबहूना आपण जसजसे 'वाढतो', तसतशा या 'विसंगती' आपल्यात निर्माण होत राहतात. या विसंगती हे प्रौढपणाचंच लक्षण असू शकतं. आणि हुसैनसारखा चित्रकार तर 'एकारलेला आधुनिक' असणं शक्यच नाही. मी हे कदाचित तुला किंवा सुंदरमला चुकीचं समजून घेऊन मांडत असेन तर मला माफ कर. कारण चित्रकला हा माझ्या अभ्यासाचा विषय नव्हे.
    - तू या पद्धतीच्या टिप्पण्या लिहिणार असतील तर थोड्या विस्ताराने लिहाव्यास असं मला वाटतं. मराठी वाचक सारं वाचतो, त्याला ठाऊक असतं असं गृहीत धरण्यात अर्थ नाही.
    बाकी एकूण मजकूर तुझ्या खास शैलीतला आहे. आणि ती शैली मला आवडतेच. म्हणजे मी तुझा फॅन आहेच.
    तेव्हा नव्या ब्लॉगची वाट पाहत आहे.
    - मुकुंद

    ReplyDelete
  2. ज्ञानदाजी, सुंदर. अगदी फ्यूचरिस्टिकली मॅच्युअर आणि सुंदर.. अशाच लिहित्या रहा. उन्मादाला भानावर आणण्यासाठी अशा लखलखीत लेखनाची कायमच गरज आहे.
    रेणुकादास देशपांडे

    ReplyDelete
  3. माझंही मत मुकुंद यांच्‍यासारखंच झालंय्. काही गोष्‍टींबाबत तू आणखी विस्‍ताराने लिहावंस. आम्‍ही खूप समृध्‍द वाचक आहोत असं तू उगीचच गृहीत धरलंयस. मर्ढेकरांचा संदर्भ आम्‍हाला कळतो, पण सुंदरम् 'अपूर्ण आधुनिकतेचा परिपाक' कशाला म्‍हणतायत हे कळत नाही. लोहियांची मांडणी चित्रात व्‍यक्‍त करण्‍यातलं मोठेपणही आम्‍हाला उलगडून सांगितलंस तर बरं होईल.
    बहुजनप्रिय देवतांची संदिग्‍ध नग्‍न चित्रे काढण्‍यात मात्र मला कलाकारीपेक्षा लोकेषणाच महत्‍वाची प्रेरणा असेल असे वाटते. घटं भिन्‍द्यात् पटं छिन्‍द्यात् प्रसिध्‍दीचा झोत मिळवण्‍याची प्रेरणा ही बजरंग दल आणि हुसैन दोघांच्‍यात कॉमन आहे.
    अस्‍तु. त्‍या कालचक्राच्‍या चित्रावर एक स्‍वतंत्र स्‍फुट लिही ना,
    - मिलिंद

    ReplyDelete
  4. हुसेनचा शोध घेण्यासाठी त्यांच्या चित्रांचा मार्ग सोडून जो तू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मार्ग निवडलास तो राजमार्ग जरी नसला तरी कौतुकास्पद नक्कीच आहे. एखाद्या सराईत शल्य-विशारदाप्रमाणे तू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहेस. मी वाचलेल्या कोणत्याही मृत्युलेखापेक्षा काकणभर सरसच आहे तुझा लेख. तुझ्या सगळ्या लेखाचं जे take -away आहे ते म्हणजे..."हुसैनमधला आयडिऑलॉजिकल विरोधाभास". कोणत्याही कलाकारास राजाश्रय आणि लोकाश्रय या दोन्ही गोष्टी लागतातच. या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं या सर्कशीमूळेच कदाचित हुसेनचा ideaological विरोधाभास जरी लोकांच्या नजरेत आला नसला, तरी त्त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला कुठेतरी खुपला असावा. कदाचित म्हणूनच त्यांनी देश सोडायचा निर्णय घेतला असावा. I really appreciate the thought process...n all the hard-work. Keep it up !! :-)

    ReplyDelete
  5. Hi D,
    Great Article. I wonder if a person has to be as well read as you are, to see through the web that the media spins around any controversy. I also wonder how the society & moral police, who are so tolerant of the political scum find it in them to corner an artist and his expression. It is probably just the power that the latter yields. Still the irony disturbs.

    Will now move on to reading your earlier posts ;) keep writing

    ReplyDelete
  6. हुसेनच नव्हे तर कोणताही माणूस पुष्कळ विरोधाभास आपल्या आत घेऊन जगत असतो. हुसेनसारख्या (larger-than-life) व्यक्तिमत्वात तर एकसंधता सापडण्याच्या शक्यता कमीच आहेत. त्यामुळे मला स्वत:ला तरी हुसेन एखाद्या विषयावर किंवा आपल्याच चित्रांविषयी काय बोलतात याहून त्यांची चित्रं काय बोलतात यामध्ये अधिक रस वाटतो. चित्रं पाहता हुसेन मूर्तिभंजक होता असं वाटत नाही. त्यामुळे तो पुरेसा modernist किंवा disruptive नव्हता हे विवान सुंदरम यांचं मत मला पटतं. आधुनिकतेतला अस्तित्ववादी प्रश्नांचा धांडोळा हुसेननं फारसा घेतलाच नाही. पण भारतीय लोकपरंपरा, त्यातले रंग-रेषा वापरून आधुनिक भारतातले विषय चित्रित करणं यांत एक नेहरुव्हिअन (romantic) आधुनिकता होती हे मान्य करावं लागतं. आणि अशी नेहरुव्हिअन romantic आधुनिकता अखेर पुरी पडत नाही हे तर आज स्पष्ट दिसतं.

    वाईट मात्र याचं वाटतं की जो मुळात मूर्तिभंजक नव्हताच त्याला तसे आरोप सहन करावे लागले. डोळ्यांना जे दिसतं ते कळून घेण्यासाठी दृश्यभाषासुद्धा शिकली पाहिजे हा मुद्दा आपल्याकडे सुशिक्षित लोकही विसरतात. हुसेनच्या चित्रांना घेऊन जे भावना भडकण्याचे दावे केले जातात ते पाहून हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. मुळात समाजाची आधुनिकता हीच अपुरी आणि वरवरची आहे हेच त्यातून दिसतं.

    ReplyDelete
  7. महात्मा गांधींबद्दल मला ह्यासाठी आदर आहे की त्यांनी एकदा ठरवले की सदरा घालणार नाही व नंतर घातलाही नाही. हे खूप अवघड आहे. तसेच हुसेन ह्यांनी चप्प्ल घालणार नाही असे ठरवले व विलिंग्डन क्लबातून हुसकावून लावले तरी चप्पल घातली नाही. पण शोभा डे म्हणतात की त्यांनी हुसेन ना कितीतरी विमानतळांवर बूट घातलेले पाहिले आहे. म्हणजे त्यांचे अनवाणी असणे काही काळचेच असावे. त्यांना जेव्हा हिंदू विचारीत की तुम्ही मुसलमान संतांची नागडी चित्रे का काढीत नाहीत ? तेव्हा त्यांचे उत्तर असे की इस्लाम मध्ये चित्र काढण्यावरच रोष आहे. पॉप्युलर असणार्‍या व सतत तसेच राहणार्‍या माणसाला अशी कसरत करावीच लागते. कतार सरकारने म्हणतात फार चांगले पॅकेज दिले होते म्हणूनच पॉप्युलर मनाने ते स्वीकारले असावे.चित्रकार, छदमी-आदमी, व्यवहार-चतुर, मनस्वी, आणि स्वच्छंदी असे गुण एकाचवेळी असणारा माणूस विरळा तर खराच. पण त्यांच्या चित्रांसंबंधी कोणी का बोलत नाही. स्वत:ला कविता करिता न येणारा वाचक मर्ढेकरांच्या कवितांविषयी बोलतो मग लोक हुसेनच्या चित्रांविषयी का बोलत नाहीत ?
    ---------अरुण अनंत भालेराव ( arunbhalerao67@gmail.com )

    ReplyDelete
  8. It is indeed a shame that he had to leave India / he left India.

    ReplyDelete