Tuesday, November 30, 2010

सतीश तांबे यांची साहित्य प्रश्नावली

सतीश तांबे यांनी ब्लॉग वरची चर्चा वाचून पुढील प्रश्नावली पाठवली. त्यातील प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत.

१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
३) साहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
४) तुमच्या लेखी सर्व साहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता, कथा, कादंबरी असा कोणताही साहित्यप्रकार न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान देता का?

या तांब्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते.

माझ्या मते अनिल अवचट हे मूळात 'रिपोर्ताज' पद्धतीचे लेखन करतात. अवचटांची अनेक वर्णने पार्शल असतात. आणि ते छोट्या अनुभवाची बरीच लांब बतावणी करतात. याला आम्ही 'पालीची मगर करणे' असे म्हणायचो. अवचटांची 'अमेरिका' हे अशा problematic लिखाणाचं उदाहरण आहे. मात्र आता त्यावर सवडीने लिहावयास हवे. शिवाय लेखनाची समीक्षा ही त्यांच्या इतर कामाची बाय डिफॉल्ट टीका नव्हे. मात्र लेखनाबद्दल लिहिताना सारखी जीभ आवरायची गरज काय?

6 comments:

  1. @ Dyanda....मी अणि अजुन काही जनानी ही प्रश्न टाकले आहेत की..पण बहुतेक आम्हा वाचक वर्गाची एवढी लायकी नसावी की तुम्ही त्याना उत्तर देण्याचा किंवा त्या अनुशंगाने चर्चा करण्याचा त्रास घ्याल ...

    तुम्ही ते प्रश्न conveniently ignore केले का?

    ReplyDelete
  2. Jasa vel milel tashi savdine uttare det aahe.- Dnyanada

    Just for the clarity - I assume that when you are referring to questions those are the ones you had asked in your reaction/reply no? I need some time for that.

    Bear with me..Will respond..later. But if there are any other questions- then please let me know..because I publish all the comments unless ofcourse those are abusive and anonymous .

    ReplyDelete
  3. its reaction to the article....its appearing as comment in ur last article

    ReplyDelete
  4. निकष समजले म्हणजे संवाद सोपा जातो असे मला वाटले म्हणून प्रश्नावली डकवली. अवचट चांगले किंवा वाईट किंवा कंटाळवाणे हे मत एका मनोमन निकष व्यवस्थेचा भाग आहे. 'मला पुलं अतिशय रंजक वाटतात मात्र भाऊ पाध्यांची साहित्यदृष्टी महत्त्वाची वाटते.' हे विधान एका निकष व्यवस्थेचा भाग आहे. त्या माझ्या वैयक्तिक निकषांवर आधारित अवचटांबद्द्लही माझे वाचक म्हणून मत बनत गेले. आयबीएन लोकमत मध्ये काम करत असताना मी ग्रेटभेट कार्यक्रमासाठी रिसर्च करत असे. त्यावेळी माझी अवचटांशी मुलाखतपूर्व भेटही झाली होती. तेव्हाही ही माझी मते त्यांना सांगितली होती. तेव्हा मी त्यांच्या साहित्यावर समी़क्षात्मक लेख लिहिणार होते आणि तो नक्की लिहावा असे अवचटांनी सुचवलेही होते. कदाचित आता त्यांना ही भेट/ संवाद आठवेल की नाही माहित नाही. त्यांनी एक कविता ' न्यांदा गं न्यांदा - डोक्यावर हांडा' अशी लिहून दिली होती. लोंढा प्रसारमाध्यमांसाठी काम करताना बरीच सहनशक्ती लागते. असो. हे मुद्द्याला धरून नाही. आणि तो सविस्तर लेख मी अजून लिहिलेला नाही- लिहीन नंतर.

    अवचटांना 'तुम्ही जे लिहिता त्यापेक्षा तुम्ही जे एडिट करता ते मला महत्वाचे वाटते' हे माझे मत आहे हे सांगितले होते - आता ब्लॉग मध्ये लिहिले. त्यात नवीन असे काही नाही. घरात रट्ट पडले कि घर आवरण्यापेक्षा बाल्कनीत जाऊन उभे रहावे तसे ते लेखन आहे. (ही उपमा बॉरोड आहे.)

    अवचट मला बोअर करतात असे मी म्हटले आहे. का ते लिहिले आहे. ते त्रोटक आहे. परंतु ' का कोण जाणे नाही बाई मला अवचट आवडत' असे न म्हणता माझी कारणेही मांडली. अलीकडे अवचट नॉनफिक्शन ( दुय्यम दर्जाच्या ) फिक्शन प्रमाणे लिहितात हा माझा कंद आक्षेप. (या संदर्भात या महिन्याच्या नव-अनुष्ठुभ मध्ये चंप्र देशपांडे यांचा लेख आहे तो मूळातून वाचावा असा आहे). लेखनाने (ललित तसेच तांब्याच्या विवेचनाप्रमणे साहित्यिक ) आयुष्य उलगडण्याचा प्रयोग करावा असे मला वाटते. पत्रकरिता माहिती देते, विश्लेषण करते. लेखन (साहित्यिक/ आत्मनिष्ठ) हे जगण्याला उलगडते, जगण्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्नांची उकल करण्याचा, त्याचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करते. श्रेष्ठ लेखन काळाच्या संदर्भासकट 'मनुष्य असण्याचे' कंगोरे मांडते (कोसला) , मनुष्याचे अस्तित्ववादी प्रश्न रचते (हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव, सात सक्कं त्रेचाळीस ) , आशयाला विशिष्ठ घाटात /मुशीत घडवते (महानिर्वाण, चिरीमिरी- कोलटकर) किंवा जगण्याचा , मानवी विकारांचा, कार्यकारण भावांचा अन्वय लावते (जीए, तेंडुलकर, पेठे इत्यादि), मुख्य म्हणजे दंभ नाकारते (भाऊ पाध्ये, मन्या ओक) . मला घाट आणि आशयाचे द्वैत जिथे संपते तो प्रत्येक साहित्यप्रकार श्रेष्ठ वाटतो. उदा- मोकाशींची 'आमोद सुनास आले', कोलटकरांची 'वामांगी. ( घाशीरामचा/ बेगम बर्वेचा परफॉर्मन्स, सत्यजित रे ची 'चारुलता'- साहित्यबाह्य). आशयाला पूर्ण व्यक्त करणारा घाट मला श्रेष्ठ वाटतो.

    या पलीकडेही लेखन होते-- ते मी वाचते. त्यातील कित्येक गोष्टी आवडतात. म्हणजे सध्या माझी मापकं अंतिम आहेत/ बरोबर आहेत असा माझा समज नाही. अनेकांना त्यांच्या रुचीनुसार गोष्टी आवडणार आणि माझ्या ब्लॉगवर मी मला जे वाटतं तेच मत मांडणार.

    पत्रकारितेच्या मापाने अवचट सेन्सेटिव्ह, चांगले रिपोर्ताज लिहिणारे आहेत मात्र काहीसे (समाजवादी) रोम्यांटिक म्हणून रोम्यांटिक खोटेपणासकट लिहितात. हे पण खरे की 'पूर्णिया' मधील अवचट आताशा जे अवचट आहेत त्यापेक्षा निराळे आहेत. सध्याच्या लेखनात 'बाबाडम' खूपच येते.

    ललित/ आत्मचरित्रात्मक लेखक म्हणून ते सतीश तांब्याच्या एका कथाशीर्षकाप्रमाणे 'वरवर अचूक आणि खोलवर चूकच चूक' आहेत असे मला वाटते. याबद्दल सविस्तर लिहावे लागेल. तूर्त इथेच थांबते. (इथे खूप लिहिण्यासारखे होते- उदा- गुर्जिएफ ची एक गोष्ट, स्युडो / दांभिक असण्याचे निकष इत्यादी. असो)

    कोणी काय वाचावे हा वैयक्तिक चॉईस आहे. काय आवडावे हा देखील. लोकप्रियता हे मूल्य निरुपयोगी आहे असं मला वाटतं. अवचटांचे सामाजिक काम आणि लेखन या दोन्ही गोष्टींची एकत्र समीक्षा वैयक्तिक संवादात होईल मात्र पब्लिक डोमेन मध्ये 'लेखन लेखनाच्या तराजूत' -सामाजिक काम सामाजिक कामाच्या तराजूत' जाणे योग्य. त्या दोन्ही गोष्टी मापण्याच्या कसोट्या निराळ्या आहेत.

    ReplyDelete
  5. न्यांदे तुझ्या सुरीला छान धार आली आहे. आता ती फक्त स्कालपेल म्हणून वापरायला हरकत नाही.

    ReplyDelete