Thursday, September 23, 2010

विवाह संस्था आणि हिशोब



एक इतिहासाचार्य आणि एक उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना. राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून या संस्थेकडे बघताना घातलेल्या अनेक चष्म्यांना तडे जातात. इतिहासातून वाहत आलेली नाती राजवाडे त्यांच्या विश्लेषक पद्धतीनं तपासतात. कॉम्रेड डांग्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे माणसाचं जीवशास्त्रीय जगणं म्हणजे जिवंत राहणं आणि प्रजनन करणं असं मानणार्‍या एका बिंदूपासून राजवाडे सुरूवात करतात आणि विवाहसंस्थेच्या उदयात किती प्रकारचे हिशोब आदिम काळापासून गृहित धरले आहेत त्याची पुराव्यानुसार जंत्री देतात. कॉम्रेड डांग्यांना मार्क्स आणि एंगल्सचा ‘आदिम साम्यवाद’ या लेखनात आढळलाय – मग हे असं गंभीर पुस्तक वाचताना कोणत्या उथळपणाच्या परमोच्चबिंदूची आठवण यावी? तर ती आलीच. किम कट्रालची.

‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’ या मालिकेत किम कट्रालनं समंथा नावाचं कॅरेक्टर रंगवलय. इतिहासाचार्य राजवाडे आणि समंथा या दोघांनाही जगातल्या कोणत्याच बाई आणि बाप्याच्या परम्युटेशन-कॉम्बिनेशननं चकवलं नसतं. या दोघांनाही जगातल्या वैषेयिक आणि वैवाहिक संबंधांबद्दल एक प्रकारची तटस्थ जाण आहे. एकाला अभ्यासपूर्वक आणि एकाला अनुभवोत्तर.

आश्रमीय जीवनशैलीच्या बाहेर पाऊल टाकल्यामुळे संन्यासी आणि वेश्या यांना जगाचं खरं रूप कळतं असं म्हणतात. परंपरेनं वाहत आलेला ‘वेश्या’ हा शब्द आता, एकविसाव्या शतकात भांडवलशाहीनं जोडलेल्या अनेक नात्यांना लागू होतो. अगदी लग्नांतर्गत नात्यांनादेखील. त्यामुळे परंपरागत अर्थानं तो शब्द वापरणं चूकच. पण गृहस्थाश्रम मांडला नाही की नात्यातलं काहीतरी गंमतशीर कळतंच की. ‘इतिहास अभ्यासक’ आणि शरीरसंबंधांना कोणत्याही भावनिक गुंतवणुकीपलीकडे जीवशास्त्रीय गरज म्हणून तपासणारी ‘समंथा’, या दोघांनाही विवाहसंस्थेबद्दल काहीतरी मोलाचं कळलंय हे मला वाचता वाचता जाणवलं म्हणून या दोघांचीही आठवण एकत्र आली.

एका एपिसोडमध्ये एक पुरूष ‘गे’ आहे की नाही यावर समंथाच्या मैत्रिणी वाद घालू लागतात. तेव्हा त्यांना गप्पं करत समंथा म्हणते, ‘बुरसटलेल्या बायांसारखं काहीतरी बोलू नका. बाईला बाई आवडते की बाप्या, बाप्याला बाप्येच आवडतात की बाया या पलीकडे जग केव्हाच पोचलंय! आता होमो-हेटरो या बायनरीपलीकडे एक मोठं पॅनसेक्शुअल जग आहे. व्यक्ती आवडते की नाही हे महत्त्वाचं. नंतर मॅचिंग सेक्शुआलिटीचा विचार.’ समंथांच्या या सर्वसमावेशक, उदार वाक्यानं अर्थातच तिच्या मैत्रिणी चकित होतात. तिच्या ‘पॅनसेक्शुअल’ छत्रीखाली अमंगल असे ‘भेदाभेदांचे भ्रम’ टिकतच नाहीत.

राजवाड्यांचं पुस्तक वाचूनही तसंच होतं. विवाहसंस्थेकडे बघण्याचा व्हिक्टोरियन चष्मा राजवाडे मोडतात आणि सारा इतिहास नव्यानं मांडायला घेतात. त्यामुळे त्यानंतर विवाहसंस्थेचं कोणतंच रूप आपल्याला बिचकावणारं वाटत नाही. ‘असेल बुवा – तसंही असेल’ असं खांदे उडवून म्हणता येतं.

बेट्सी म्हणजे इलिझाबेथ ब्रेंट नावाची कमालीची हुशार अँथ्रोपोलॉजिस्ट बाई आम्हाला शिकवायची. बेट्सीच्या कोर्सचं नाव होतं, ‘निसर्ग आणि संस्कृती – बाईपणाचं घडत जाणं’. बेट्सी प्राणी जगतातल्या लिंगभेदांचा अभ्यास ते विविध संस्कृतींमधलं बाया-पुरुषांचं, त्यांच्या लैंगिक अस्मितांचं घडत जाणं शिकवायची. त्यात अर्थात तृतीय पंथीयांचा विषय नेहमी निघायचा. बेट्सी स्वत: नेटिव्ह अमेरिकन लोकांची अभ्यासक आहे. तिनं नवाहो इंडियनाचा प्रचड अभ्यास तिनं केलाय. एकदा शिकवताना आमच्या एकूण तीन लैंगिक ओळखींतून जगाकडे, संस्कृतीकडे बघण्याच्या चष्म्याला बेट्सीनं धक्का दिला. नवाहो इंडियन्स सात प्रकारचे लिंगभेद मानतात. स्त्रीच्या शरीरातली मनानं स्त्री, स्त्रीच्या शरीरातला मनानं पुरुष, स्त्रीच्या शरीरातला तृतीयपंथी/ना-स्त्री ना-पुरुष; त्याचप्रमाणे पुरुषाच्या शरीरातले तीन प्रकार आणि एक. पूर्णतया शरीरानं व मनानं स्त्री किंवा पुरूष नसलेली अस्मिता. नवाहो परंपरेत ना-स्त्री ना-पुरूष अशा व्यक्तीत दैवी शक्ती असतात असं मानतात. परंतु एकूणात, हे जग सात प्रकारच्या लिंगभेदांचं बनलंय असं नवाहोंचं मत आहे. प्रत्येक व्यक्तीत बाईपणाचा आणि पुरुषपणाचा काही प्रमाणात अंश असतो हे मतंही आताशा सामान्य ज्ञानाचा भाग झालंय.

बेट्सीच्या वर्गात पूर्वसंचितातून येणार्‍या चौकटींच्या ठिकर्‍या उडायच्या. ‘काळ’ या संकल्पनेबद्दल बोलताना एकदिश कालसंकल्पना आणि चक्राकार, पेंडयुलम सारखी आवर्ती काल संकल्पना यांच्यावर बोलून झालं की बेट्सी नेटिव्ह अमेरिकन परंपरेतून आलेली अनेकमिती काळांची कल्पना सांगायची. यानुसार आपण सगळे काळाच्या विविध मितींमधून फिरत असतो आणि भेटतो तेव्हा दोघांच्याही मिती समान असतातच असं नाही. नेटिव्ह अमेरिकनांना (तसंच आपल्याकडच्या आदिवासींनादेखील) ‘फोटो काढणं’ हे का अनैतिक वाटायचं त्याचा उलगडा बेट्सीच्या या ‘काळ’ संकल्पनेमुळे व्हायचा. ‘फोटो’ काढला म्हणजे त्या काळाच्या मितीतल्या माणसाला ठार मारला असा अर्थ नेटिव्ह अमेरिकन लावायचे आणि कॅमेर्‍याला घाबरून पळून जायचे. ते असं का करायचे याची संगती लागते. आपल्या मनातल्या ठाशीव कल्पना खुल्या करून समोर येणारं जग एकदा तपासायचं ठरवलं की कित्येक नव्या गोष्टी नजरेला पडू लागतात.

स.गं मालशांचं ‘आगळंवेगळं’ नावाचं एक पुस्तक होतं. त्यात जुन्या जैन परंपरेतल्या एका पात्राची कथा होती. तिचं नावं ‘धूर्ता’. ही धूर्ता चार थापेबाज चोरांना भेटते. प्रत्येक चोर विविध थापा मारत आपली शौर्यकथा सांगतो आणि ‘धूर्ता’ हिंदू पुराणातले दाखले देत त्या सार्‍या थापा कशा शक्य आहेत ते सांगते. ‘धूर्ता’ अशा जैन मुशीतून घडली आहे की हिंदू पुराणातली कोणतीच नवी संकल्पना तिला आश्चर्यचकित करत नाही! ज्यावेळी मी समाजशास्त्रज्ञाच्या, इतिहास अभ्यासकाच्या भूमिकांचा विचार करते त्यावेळी बेट्सी ब्रेंट आणि धूर्ता या प्रचंड वेगळ्या परंपरा जाणणार्‍या बाया मला आदर्शवत वाटतात. ‘ज्ञानोत्तर तटस्थपणा’ हे दोघींच्याही बेहद्द हुशारीचं लक्षण वाटतं मला.

पुन्हा, न बिचकण्याच्या राजवाडे क्षेत्राकडे जाते. माझ्या दररोजच्या बसप्रवासात हातात असलेलं सध्या पटावरचं पुस्तक म्हणजे डॉ. ऑलिव्हिया जडसनचं ‘डॉ तात्यानाज् सेक्स अ‍ॅडव्हाईज टु ऑल क्रिएशन्स’. ऑलिव्हिया ही जीवशास्त्राची संशोधक आणि डॉ रिचर्ड डॉकिन्सची विद्यार्थिनी तिनं प्राणिजगताच्या सेक्शुअल प्रश्नांना उत्तर द्यायला एक पात्र निर्माण केलंय ती म्हणजे डॉ. तात्याना. ही डॉ. तात्याना म्हणजे प्राण्यांना ‘ताईचा सल्ला’ देणारी ताई आहे. कबूतरं, सिंह, हत्ती, डास, कोळी यांचे नर-मादी डॉ. तात्यानाला आपले सेक्सविषयक प्रश्न पाठवतात आणि डॉ. तात्याना त्यांना लीलया उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करते. त्या प्रश्नापाठीमागची जीवशास्त्रीय कारणपरंपरा उलगडून सांगते. भावनेच्या प्रदेशापलीकडचं शरीरसंबंधांच्या जीवशास्त्राचं दर्शन देणारं हे पुस्तक – सुरुवातीला थक्क करतं – मग हसवतं आणि तेच करतं, जे प्रत्येक ‘ज्ञान’वस्तू अगत्यानं प्रत्येक वेळी करते-- सार्‍या शरीरव्यवहाराकडे बघण्याची जीवशास्त्रीय तटस्थता ही डॉ. तात्याना आपल्यापर्यंत पोचवते. बेट्सी आणि धूर्तेच्या यादीतली ही ऑलिव्हिया मला दिवसेंदिवस आवडू लागली आहे. तिच्याकडे केवळ तरतरीत बुद्धी नाही – तर त्या पलीकडे आहे जगण्याकडे निखळ, शुद्ध शहाणणानं बघण्यासाठी आवश्यक स्वच्छ दृष्टी आणि संवादाची उत्कृष्ट अशी शैली!

तिचं पुस्तक वाचताना बायांना, बाप्यांना, बाया-बाप्ये नसलेल्यांना तपासताना आपण चष्मा पूर्ण नाही काढला तरी आपल्याला चष्मा आहे याचं भान येतं आणि नोहाच्या नौकेतल्या कित्येक शक्यतांची आपसूक संगतीही लागते. राजवाड्यांना उमगलेले विवाह संस्थेतले सांस्कृतिक हिशोबही तिच्या जीवशास्त्रीय ज्ञानाच्या उजेडात लख्ख दिसतात.

Friday, September 17, 2010

मास्तरांच्या नसण्याचं ऊन

सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय; तो मूळातून वाचावा असा आहे. महत्वाचा आहे. कारण लेख फक्त कौतुक संप्रदायातला नाही. ‘अज्ञानापोटी अति कौतुक’ हा मराठी वाङमयास ग्रासणारा दुर्गुण तर आहेच परंतु तो अनेक सुमार मनोवृत्तींचं द्योतक आहे. चलाख आणि सुमार माणसाला आपण सुमार आहोत हे कळलं की तो ‘सर्वांचं बेफाट कौतुक’ अशी सर्वसमावेशक रणनीती आपलीशी करतो. ही केवळ खुशमस्करेगिरी नसते, तर हा विनिमय असतो. ‘मी तुमचं कौतुक करतो तुम्ही माझं सुमारत्व उघडं पाडू नका’ असा चलाख विनिमय! पण नामदेव ढसाळांचा लेख ( या वेळी तरी) विनिमयाच्या कंगो-यापलीकडचा म्हणून महत्त्वाचा आहे. मास्तरांनी सत्तरच्या दशकानंतरचं बदलतं गिरणगाव, तिथलं राजकारण का टिपलं नाही? असा प्रश्न नामदेव ढसाळ विचारतात. त्याचा खोलात विचार करावाच लागतो. सुर्वेमास्तरांबद्दल असे काही प्रश्न पडतात आणि काही अनुत्तरितही राहतात.
सुर्वेमास्तरांच्या निधनानंतर त्यांचा मानसपुत्र मुकुंद सावंत यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेत श्रध्दांजली सभा आयोजित केली होती. त्या दिवशी त्या समाजविज्ञान संस्थेत त्या बहुतांश अमराठी समुहात मास्तरांना आठवताना कवितेचा, जगण्याचा, डाव्या चळवळींचा मोठा पट सामोरा आला. संस्कृतीला काचणारे प्रश्न कविता निर्भयपणे मांडते आणि जिथे माणसं बघू इच्छित नाहीत अशा, कार्पेटखालच्या वास्तवावर तीव्र उजेड पाडते. मास्तर तर भारतीय संस्कृतीला फास लावणा-या अनेक प्रश्नांच्या तिठ्यावर उभे होते. त्यांच्या कवितेनं मराठी सरस्वताला भानावर आणलं. इश्क आणि इन्किलाब या उर्दू परम्परेतल्या दोन भूमिकांवर त्यांनी कामगार वर्गाच्या अनुभवांचं जे अफाट कलम केलं, ते किती महत्त्वाचं! आणि त्यांचा मनात अपराधीभाव बाळगणारा बाप. नात्यांच्या ताण्याबाण्यातून उलगडणारं शहराचं लुम्पेन वास्तव. किती अमानवी वास्तवाच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं मास्तरांनी.
हिंदू कुटुंबानं वाढवलेला हा ‘जातलेस’ माणूस. ‘मास्तरांची सावली’ हे कृष्णाबाईंचं आत्मचरित्र वाचून वाटतं, की अशा ‘बाळगलेल्या’, ‘पाळलेल्या’ पण नाही – फक्त ‘बाळगलेल्या’ या मुलानं या ‘गुंग्या ग्रहावर’ स्वत:ची किती ‘अस्खलित सिग्नेचर’ उमटवली. मेघना पेठेचा ‘अजातपुत्रास अनौरस आईचा अनाहूत सल्ला’ त्याच सुमारास प्रसिध्द झाला होता. वाटलं, मास्तरांना अशा अनौरस आईचा अनाहूत सल्ला जणू आतून कळला होता. म्हणून कवितेसदृश कोणतंही वातावरण नसताना हा नारायण कवितेत व्यक्त झाला.
‘जातलेस असणं’ हा एक काच; तर दुसरा काच म्हणजे सर्व मराठी काव्यपरंपरा ‘विठोबाग्रस्त’ असण्याचा. या भक्तीपलीकडे जाणारा सुर्वेमास्तर हा पहिला लोकयत महान कवी. करंदीकर , मुक्तिबोधांनी मार्क्सवादी कविता लिहिली, परंतु त्या अर्थानं, मास्तरांनी फक्त माणसाची कविता लिहिली. स्वत:ची जातकुळी तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर अशी तपासून पाहूनही मास्तर निराळे राहिले. मास्तरांची महत्ता जेंव्हा भवताली सारा खरेपणा, सच्चाई गिळून टाकणारं वास्तव असतानादेखील ते कवितेत जेन्युईन राहिले यात आहे. त्यांची कविता हीच नव्या क्रांतीची पताका.
मास्तरांच्या कवितेत कित्येक पात्रं भेटतात. त्यांतला ‘जिवा’ माझा सगळ्यात लाडका. ‘तुमच्या त्या उदास रात्री मला नकोत’ म्हणून कवींनाही प्रॅग्मॅटिक फटकारणारा. मास्तरांनी माणसाला आणि मार्क्सला कवितेत खेचून आणलं. मास्तरांच्या चरित्रातले विविध तिढे, त्यांचं कामगारवर्गातलं स्थान या सा-यांमुळेच त्यांची कविता वेगळी झाली. मात्र असं सारं असूनही मास्तरांचा सुलभ डावेपणा कधीकधी डाचतो. त्याचबरोबर याच सोप्या/ सुलभ , ’डाव्या’ कवीला जवळ करताना मुंबईतल्या तमाम ‘बॉम्बेवासियांची’ मास्तरांप्रती असलेली टोकन चॅरिटी ऊर्फ ‘लटकी सहानुभूती’ मला त्रास देते. जर या क्रयविक्रयाच्या विक्राळ शहरात, जिथे पैसा सर्वस्व झाला, तिथं इतर कवींचं काय झालं याची पर्वा कधी कोणी फारशी केल्याचं ऐकिवात नाही. त्या शहरात या ‘बॉम्बे’वासियांनी मास्तरांच्या कवितेवर प्रेम केलं, की मास्तरांच्या टोकन अस्मितेवर? असा प्रश्न नेहमी मला पडतो. पण मास्तरांना हे कळूनही मास्तर साधे राहिले. टोकन म्हणून ते कौतुक स्वीकारतही राहिले.
वसंत  गुर्जर, तुळशी परब, वाहरू सोनावणे या माणूसकेंद्री कवितेच्या परंपरेतल्या पुढल्या कवींचं काय झालं? की मास्तरांच्या कवितेला ‘लटकी सहानुभूती’ दाखवून आम्ही इतर ‘बॉम्बे’वासियांप्रमाणे नंतरच्या कविंना विसरलो? हे आता मास्तर गेल्यानंतर तरी खरेपणानं आपण आपल्याला विचारायला हवं. काय करता येईल या कवितेला घुसमटवून टाकणा-या शहरात, ज्यांनी जगण्याशी पंगा घेतला अशा आमच्या कविपरंपरेसाठी? एकीकडून संमेलनाचे घासून बुळबुळीत झालेले ‘तेच ते’ आवाज कानावर पडत आहेत आणि मनात माझ्या तुळशीचं पुढे काय झालं? कुठे गेली त्याची कविता? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
काय पध्दतीचं टोक सुमार राजकारण गाठू शकतं याचा दर संमेलन म्हणजे एक जिवंत नमुना! कमअस्सल कवी, कमअस्सल लेखक प्रसिध्द होण्यासाठी कायम धडपडतात, पण ज्यांच्या निष्ठांचा, कवितेचा, शब्दांचा आत्मा खणखणीत असतो असे लेखक आणि कवी ‘मला मदत करा किंवा मला मान द्या’ अशी निकृष्ट भीक मागत नाहीत! सुमार साहित्यिकांना माणूस कळत नाही – माणसांना खरं साहित्य कळत नाही अशा विचित्र, सांधा निखळलेल्या चक्रात जी ‘सुमारांची सद्दी’ चालू आहे, ती अंगावर काटा आणणारी आहे.
असो. हे सारं वास्तव रेषेरेषेच्या फरकानं डाचतं... एकिकडे सुर्व्यांच्या कवितेपेक्षा त्यांच्या ‘टोकन अस्मिते’वर व्यक्त झालेली लटकी सहानुभुती आणि दुसरीकडे बेदरकार शहरातलं कवितेचा गळा घोटणारं साहित्यिक राजकारण – पण ह्या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारणारी जिवंत कविता अशी संपत नाही. ती येतेच हट्टानं उगवून – जिथं कविता उगवेल असं कदापि वाटणं शक्य नाही तिथेही! सु्र्वेमास्तरांसारखी... उकिरड्यावरही!

Friday, September 3, 2010

मोहेंजोदडो ते मोरगाव..

माझा मित्र एक गोष्ट सांगायचा. ( त्याला हजारदा ‘हे लिही’ हे सांगूनही त्यानं न लिहिल्यामुळे अजितची ही गोष्ट त्याचा कॉपीराईट मान्य करून मीच सांगणार आहे.) टीआयएफआरमध्ये ऐंशीच्या दशकात बुद्धिमान मंडळींचा फिल्म क्लब होता. आजच्यासारखे एचबीओ/सोनी पिक्स चॅनेल्स नव्हते. त्यामुळे मुंबईत इंटुक फिल्म बघायच्या तर फिल्म सोसायटी किंवा छोटा फिल्म क्लब याशिवाय गत्यंतर नव्हतं. कोणती तरी एक समांतर फिल्म बघून एका संध्याकाळी सारे टीआयएफआरच्या कॅम्पसमधून बाहेर पडत होतो. कुणी काहीच बोलत नव्हतं. नॉर्मल प्रॅक्टिस म्हणजे बाहेर पडून त्या सिनेमाचं विश्लेषण करायचं, पण फिल्म एकूणच बंपर होती. कोणी काहीच बोलेना तेव्हा अजितनं त्याच्या एका मित्राला विचारलं, “ काय रे, कशी वाटली फिल्म?” त्याच्या मित्रानं दोन मिनिटं गहन विचार केला आणि मिलियन डॉलर उत्तर दिलं, “ I have not yet decided to like it.” फिल्म आवडून घ्यायचं मी अजून ठरवलेलं नाही! मी अजितला आमच्या प्रत्येक भेटीत एकदा तरी या किश्शाची आठवण करून देते. ‘फिल्म आवडून घ्यायची हे अजून ठरवलेलं नाही ‘ हे बेष्ट उत्तर आहे. अजित तो सारा प्रसंग सांगतोही रंगवून!

‘हिंदू’ कादंबरी गाजावाजा होऊन प्रकाशित झाली, पण कोणाची वाचून झाली म्हणून प्रतिक्रिया विचारावी तर बहुतेकदा चेहरा अजितच्या मित्रासारखा होतो. ‘‘हिंदू’ आवडून घ्यायची हे अजून ठरवलेलं नाही!’ असं उत्तर चेह-यावर तरळतं. सुलभ गोष्टी चटकन आवडतात किवा त्यांच्याबद्दल चटकन प्रतिक्रिया मिळतात. पण ‘हिंदू’सारखं प्रचंड डायडॅक्टिक ऊर्फ बुद्धी-बुद्धी पुस्तक डिसमिस केलं तरी पंचाईत, नाही आवडलं तरी पंचाईत आणि आवडलं तर त्याहून! त्यामुळे एकूणच परिस्थिती कठीण.

प्रत्येक जण ‘हिंदू’बद्दल दुसरा काय म्हणतोय ते ऐकून घ्यायला उत्सुक. पूर्वी ‘ललित’ किंवा ‘मटा’तलं परीक्षण वाचून अनेक मध्यमवर्गीय मतं बनायची. पण आता ‘ललित’ मध्येही इतकी भंपक पुस्तकओळख सापडते, की ‘मानाचं पान’ ज्या लेखकांना मिळतं त्यांना दोन दिवस त्याच पानांत चेहरा लपवावासा वाटेल! त्यामुळे “‘हिंदू’ कशी वाटली”चं सध्याचं चलनातलं पॉलिटिकली करेक्ट उत्तर म्हणजे ‘वाचून संपली नाही’.

माझ्या छोट्या सॅम्पलमधलं निरीक्षण पुढीलप्रमाणे: ज्यांना ‘हिंदू’ पहिल्या झटक्यात प्रचंड आवडली, त्यांनाच कर्मधर्मसंयोगानं राजन गवसही प्रचंड आवडतात. ज्यांना रंगनाथ पठारे प्रचंड आवडतात त्यांनीही ‘हिंदू’ला पॉझिटिव्ह मार्क्स दिलेत. ‘हिंदू’त नेमाड्यांनी त्यांना शोभेशा अभिनिवेशात ‘हिंदुत्त्वा’च्या खपल्या काढल्यात, त्यामुळे ‘हिंदुत्त्ववाद्यां’नी आपली कॉपी विकत घेतली आहे, पण ते अजून मतप्रदर्शन करत नाहीत. ‘नामांतरा’च्या मुद्याचा एकूण घोळ झाल्यानं ‘पुरोगामी’ प्रतिक्रिया जरा उशीरानंच येतायत. ‘अ‍ॅडवर्ल्ड’मधला दादामाणूस नुकताच मला भेटला. ‘कोसला’वर एकेकाळी प्रेम केलेल्या पिढीतला... ‘फार मिनिमाईज करतात ते नेमाडे वाचकाला’ म्हणत त्यानं पंधरा पानांत कादंबरी बाजूला ठेवल्याचं सांगितलं. पण मराठीत पुस्तक पूर्ण न वाचताच ते ‘आवडलं’ असं ठरवलेले वाचकही असतात. त्यांपैकी एकानं मला ‘हिंदू’ पुराण सांगून ती किती आवडली ते सांगितलं होतं. अर्थात त्याच्या वेगवान आयुष्यात ‘हिंदू’ हातात घेतली=बघितली=वाचली हे गणित मला ठाऊक होतं.पण अजून, उदाहरणार्थ, ‘हिंदू’ आवडलेला आणि इतर वेळी ‘मौजे’चा वाचक असलेला माझ्या पाहण्यात नाही आला. एकूण, निर्णयनाच्या पहिल्या धारेत अजून अदमास घेणं चालू आहे...

आता, या सगळ्यांच्या टोप्या उडवल्यावर मला काय वाटलं ते वाचून सांगायची नैतिक जबाबदारी येतेच. ‘हिंदू’बद्दल दीर्घ लेख स्वतंत्रपणे लिहितच आहे. परंतु तत्पूर्वी, त्या दीर्घ लेखाअलिकडची ही काही निरीक्षणं.
पहिल्या वाचनात, मला नव्हती आवडली ‘हिंदू’. त्यावेळी पॉप्युलर प्रकाशनाच्या पी.आर.वाल्यानं वाचायला दिलेली ती कॉपी होती. मला नव्हतीच आवडली ती पहिल्या वाचनात. 'अरे, माझ्या मराठी वाचक मित्रांनो, ‘बघा कसा इंटुकडा खंडेराव मी डिजाईन केलाय ’ असा अभिनिवेश आणि त्यातले ‘स्त्रीमुक्तीवाल्या टाईप’ बायकांचे उगीचच उल्लेख – मंडी-बिंडीचं दूरस्थ अप्रूव्हल आणि परंपरेतून मुक्त स्त्री म्हणजे जणू गावची स्थानिक नगरवधू किंवा बेलाबाला असं वाचून माझं तर डोकंच फिरलं.

अ‍ॅकॅडमिक माहितीचा ताकाला तूर लागू द्यायचा नाही आणि जडजड थिअ-या बोलीभाषेत पेरून ठेवायच्या. मला ते जिगसॉ रेफरन्स शोधायचा कंटाळा आला. या दोन ओळींतले राजवाडे, त्या परिच्छेदातला कार्ल अर्न्स्ट किंवा ते स.शि. भावे किंवा त्या तुकड्यातला फुको असं नोंदवताना वात आला. पण एखादा प्रचंड अ‍ॅटिट्युडवाला ओळखीचा माणूस दुस-या भेटीत गप्पा मारताना खुलावा, आणि आधीच्या तुसडेपणाचे अवशेष शिल्लक ठेवूनही दुस-या भेटीत त्याच्याशी सुरेख संवाद साधला जावा आणि त्या संवादात त्यानं त्याचे प्रयोग खुलवून सांगावेत तसं झालं माझं ‘हिंदू’ नीटस, गोमटी प्रत बनून हातात पडली तेव्हा.

त्यानंतर मला दुस-या वाचण्यात ‘हिंदू’ आवडली, आक्षेपांसहित आवडली. मनापासून. प्रत्येक वाचणेच्छुक व्यक्तीला ‘पहिली पंधरा पानं प्लीज वाचा आणि हातातून खाली ठेवू नका’ असं बजावून सांगितलं मी. कारण शीण त्या पहिल्या पंधरा पानांचा येतोच न चुकता. त्यानंतर त्या कादंबरीला आलेली ग्रिप बघून भारावून गेले. पहिले दोन चॅप्टर्स हे मास्टरपीस आहेत. उत्कृष्ट लेखन कसं असावं, कादंबरीनं कसं असावं या क्राफ्टसमनशिपचा अप्रतिम वस्तुपाठ. तिसरं-चौथं प्रकरण मला तुकड्यांत आवडलं. पाचवं आणि सहावं पुन्हा अप्रतिम. ‘प्रचंड अडगळ’ मधल्या प्रकरणात काहीशी मूळ धाग्याला कसर लावणारी. ही कादंबरी म्हणजे दक्षिण आशियातल्या मनाचा बृह्दपट. नशिबानं त्याचं केंद्र ‘मोरगाव’ असल्यानं हा मराठी विश्वाचा भाग बनतो.

‘खंडेराव’ पहिल्या दोन प्रकरणांनंतर अंगावर येत नाही. पहिल्या दोन प्रकरणांत तो आहे तसा टोकदारही राहत नाही. नंतर अस्ताव्यस्त पसरतो. त्याची स्वत:च्या आतल्या गृहितकांवर भक्कन उजेड टाकायची त्याची क्षमताही कमी होते. कधी कधी प्रेडिक्टेबल वागतो तो. पण हिंडून-फिरून परत येतो तो बापापाशी, परत त्या जैविक नाळेपाशी. सा-या इण्टेन्स बायकांच्या आयुष्यांची प्रचंड बारकाव्यांनीशी उभी कलेली चित्रं घेऊन परत येतो तो बापाच्या मरणाशी. घोडा घेऊन रानोमाळ भटकून आलेला खंडेराव शेवटी मोरगावच्या विटेवर जो विठ्ठल उभा आहे; त्या विटेपाशी येतोच, हडबडत.
एका ब्लॉगवर लिहून संपेल असा हा ‘खंडेराव’ नाही. मात्र ‘हिंदू’ मला दुस-या वाचनात ‘चसका’ लावेल इतकी आवडली. भावात्मक बुद्धी आणि खोल घुसण्याची किमया जशी ‘पांडुरंग सांगवीकर’कडे आहे तशी ती ‘खंडेरावा’कडे नाही, तरीही. खंडेरावाला लेखकाच्या अभिनिवेशाची कसर लागली आहे. जिथे जिथे नेमाड्यांचं राजकारण ‘खंडेरावा’ला डसतं तिथं तिथं तो आपली इण्टेन्सिटी गमावून बसतो, तरीही.
खंडेरावाचा उत्तर तरूणाईतला नॉन सेक्शुअल कारेपणा आकर्षक वाटत नाही, जसा चांगदेवाचा वाटला होता. कुटुंबाच्या राजकारणाला आणि नात्यांच्या ‘वस्तू’ होत जाण्याला जवळून पाहिल्यामुळे खंडेरावानं सेक्स वगळून दाखवलेलं नातलगबाज कुटुंब मर्यादेपर्यंत ठीक वाटतं. पण त्यातून या भूमीची दांभिक घडी उलगडत जाते. वाचून तंद्री लागेल अशी ही कादंबरी नाही, पण वाचायलाच हवी अशी आहे.
एक छोटी कळ सांगते. मेघना पेठेच्या ‘नातिचरामि’त जसं बारीकीचं काम आहे, तसं बायकांना मांडताना बारीकीचं काम केलं आहे, ‘हिंदू’मध्ये. त्या बायांनी मला वेड लावलंय; खंडेरावाहून जास्त. हा नेमाडे - ‘नातिचरामि’ दुवा पण तपासण्यायोग्यच आहे.

दोन्ही पाय उचलून जर खंडेराव कुदला असता तर अल्बेर काम्यूच्या बिनबुडाच्या ‘फॉल’ गर्तेत कोसळला असता. पण तो एक पाय मोरगावच्या मातीत रोवून फिरलाय. जगभर गेला तरी अस्मितेच्या नाळेचा लगाम त्याच्या मानेत गच्चं बसलाय. मोहेंजोदडो ते मोरगाव असा आहे त्या नाळेचा व्यास. पण त्या अस्मिताग्रस्त नाळेमुळेच राजकीय म्हणून काहीशी कमअस्सलही होते हिंदूची धार. त्या नाळेचा अस्मिताग्रस्त पीळ ‘हिंदू’ची अ‍ॅकिलसची टाच आहे. पण त्या दुबळ्या दुव्यामुळेच तर कादंबरीची ओळख ‘हिंदू’ अशी होते. ‘कोसला’पेक्षा पूर्ण नामानिराळी!

Thursday, September 2, 2010

तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या – त्यातूनही इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या
कानाखाली सणसणीत आवाज काढणारे दोन तास म्हणजे ‘पीपली लाईव्ह’!
मिडियाबद्दल लोकबुद्धीला ठाऊक असलेल्या गोष्टी प्रत्ययकारी पद्धतीने
मध्यमवर्गापर्यंत थेट पोचवण्याची देखणी व्हिज्युअल किमया अनुशा रिझवीनं
केली. मेनस्ट्रीम सिनेमा जसा असावा असं वाटतं तसा सुंदर सिनेमा
बघितल्याचा आनंद ‘पीपली लाईव्ह’नं दिला आणि मी इलेक्ट्रॉनिक माध्यमात
नुकतीच दोन वर्षं काढलेली असल्यामुळे त्यातल्या कित्येक गोष्टी
भावल्या-आवडल्या-पटल्या.

टोकाचा उपहास-त्यातून उलगडणारी पीपली गावातल्या नत्थाची ही कथा.
त्यातल्या गावाचं नाव ‘पीपली’ तर नायक ऐरा गैरा नत्थू खैरा – सिनेमाची
व्हिज्युअल बांधणी उत्कृष्ट आहे, तसंच त्यातले भेदक संवादही. आत्महत्या
करून का होईना कुटुंबाचं पोषण करू शकू असं वाटणारा नत्थू, शेवटी त्या
कुटुंबाला पारखा होतो आणि दरम्यान गावातला ‘जनमोर्चा’ या वर्तमानपत्राचा
रिपोर्टर-स्ट्रिंगर राकेश या बातमीतल्या वेदनेचा परिपाक म्हणून ख-या
पत्रकारितेचा मृत्यू भोगतो. 'माणसाविषयी कणव आणि बातमी देण्याची धडपड – या
दोन्हींत माणसापेक्षा बातमी श्रेष्ठ! असं तुला वाटत नसेल तर पत्रकारिता
सोड' असं राकेशला सांगणारी महत्त्वाकांक्षी अँकर रिपोर्टर ‘पीपली
लाईव्ह’मध्ये भेटते.


सत्य आणि स्टिरिओटाईप यांमध्ये फरक काय? तर स्टिरिओटाईप म्हणजे अर्धसत्य;
असं अर्धसत्य, की जे पूर्णसत्य आहे असा क्लेम करतं. ‘पीपली लाईव्ह’नं
अनेक स्टिरिओटाईप्स समोर मांडलेत. सेकंड फ्लश दार्जिलिंग टी पिणारा आयएएस
ऑफिसर, नत्थूकार्डाची घोषणा करणारा कृषिमंत्री सलीम, बरखासदृश
संवेदनशीलतेनं बातमीपाठीमागे धावणारी न्यूज अँकर, हिंदी चॅनेलमधला नफ्फट
रिजनल रिपोर्टर.... सारे साचे ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटतात. ‘स्टोरी’ घडते
एका मृत्यूबद्दल आणि त्या मृत्यूचं ‘लाईव्ह’ थैमान अनुशा रिझवीनं
कॅमे-यात पकडलंय. मात्र हे अर्धसत्य साचे तिनं काही क्षणांना
पूर्णसत्याकडे ढकललेत. तो तिचा जिनियस आहे.

हा चित्रपट केवळ शेतक-यांच्या आत्महत्या या विषयावरचा नाही. हा विषय
माणुसकीचा मृत्यू अनेक थऱांवर होत असताना आपण तो कंझ्युम कसा करतो
याबद्दलचा आहे आणि तो आपण ‘मेणबत्ती संवेदनशीलते’नं रिचवत असताना,
दरम्यान, माध्यमं त्या अर्धमेल्या माणुसकीला पूर्ण ठार कशी करतात या
प्रक्रियेवर ‘पीपली लाईव्ह’ भाष्य करतो.

माध्यमांचा वसाहतवाद, त्यातल्या सुमारांची सद्दी, दररोजच्या घडामोडींमुळे
आलेला बधीरपणा, टीआरपीचा बिनडोक खेळ आणि त्याचा वापर करणारे निर्ढावलेले
राजकारणी... ‘पीपली लाईव्ह’नं हे सारं वास्तव एकत्र पॅकेज केलं आहे.


यातल्या माध्यमांच्या क्रिटिककडे बघण्यापूर्वी दोन गोष्टींबद्दल
सांगितलंच पाहिजे. एक म्हणजे या सिनेमातलं अप्रतिम कॅमेरावर्क. ते
गोंधळलेपणाला, स्वप्नांना, आक्रमणांना, संतापाला सामावून घेतं. अनुशानं
कॅमे-याचा डोळा यातल्या उपहासावर रोखलाय. हे ‘वास्तव’ नाही – ही
‘कलाकृती’ आहे याचं भान असल्यामुळे कलाकृतीला आवश्यक व्हिज्युअल शिस्त
आणि सौंदर्य, दोन्ही या चित्रपटानं सांभाळलंय. त्याचबरोबर अतिशय म्हणजे
अतिशय नीटस, आर्त संगीत. हॅटस् ऑफ टु इंडियन ओशन. जर बॉलिवूड ही आमची
खरीखुरी भारतीय आधुनिक लोककला असेल तर ‘पीपली लाईव्ह’नं भारतीय लोककलेची
सारी मूल्यं सांभाळली आहेत. दशावतारात जसे उपहासानं विनोदाकडे नेणारे
कॅरॅक्टरचे साचे भेटतात तसेच साचे ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटतात. स्वेटर
घातलेल्या बक-याला रात्रीच्या सन्नाट्यात मिठीत घेणारा नत्थू, त्याचा
थोरला भाऊ, संसाराला कळंजलेली पॉवरफुल- व्यवहारी सून, मिडिया-नॉईजला पारखा झालेला भुकेकंगाल होरी, ‘पीपली लाईव्ह’ मधल्या भूमिका आणि त्यांच्या नात्यातून निर्माण होणारं सबटेक्स्ट यांचा समतोल साधून –‘पीपली लाईव्ह’ जिवंत होतो.

चोवीस तास (२४X७) बातम्या हीच ग्लोबल भारताची बिमारी आहे असं शेवटी वाटू
लागतं. बातमी खेचा, ओढा, डेव्हलप करा-वाढवा, मोठी करा, पिटत राहा हेच खरं
दुखणं आहे. अशा बातमीचं वस्त्रहरण होतं, त्यानं माणसं भरडली जातात. या
सा-या इलेक्ट्रॉनिक कच-यातून निर्माण होणा-या चिरफाडीची जबाबदारी कोणाची?
न्यूज चॅनेलच्या भडकपणाला डोळ्यांच्या बाहुल्या चिकटवणा-या मध्यमवर्गाची,
की ती न्यूज तशा भडकपणे दाखवणा-या स्पर्धात्मक चॅनेल्सची, की
माध्यमांच्या उथळपणानं ज्यांना फायदा होतो अशा निगरगट्ट राजकारण्यांची?
कोणाच्या मूर्खपणाची ही सारी किंमत विचार करणारी मनं भरत असतात?

‘पीपली लाईव्ह’नं मला माझ्या दोन वर्षांचा जाबजबाब विचारला. मी इंग्रजी
आणि हिंदी चॅनेलपेक्षा कित्येक पटींनी ब-या/उजव्या चॅनेलमध्ये काम केलं,
तरीही या माध्यमाच्याच काही मर्यादा आहेत आणि दुसरं म्हणजे या माध्यमाला
कसं ‘कंझ्युम’ करायचं हे अजूनही आपण जाणत नाही. कोणतंच माध्यम प्रश्न
सोडवत नाही; ते फक्त प्रश्न मांडतं. त्या प्रश्नाभोवती लोकांची चळवळ उभी
राहिली, तरच प्रश्न सुटतात. मात्र हल्ली अनेकांना वाटतं, की ‘रस्त्यात
खड्डे आहेत’ इथपासून ते ‘मला अन्यायानं नोकरीतून काढून टाकलं’ इथपर्यंत
सर्व प्रश्न न्यूज चॅनेल सोडवू शकतात. चॅनेलवाल्यांनाही ही समजूत करून
द्यायला आवडतं आणि चळवळ करू न इच्छिणा-या थंड समाजाला असा पॅसिव्ह
अँक्टिव्हिजम आयताच हाती सापडतो. ‘माध्यमं’ प्रश्न सोडवायला जन्माला
आलेली नाहीत. विशेषत:, न्यूज चॅनेल्स बातम्या देण्याचा 'व्यवसाय' नफा कमावण्यासाठी करतात.
प्रश्न सोडवणं हा त्यांचा KRA नाही. व्यवसायाला आवश्यक तेवढ्या
बातम्यांचा ते पाठपुरावा करतात. त्यातून काही वेळा काही प्रश्न
सुटतात/सुटल्यासारखे वाटतात-मात्र ते त्यांचं कंद काम नाही.
प्रश्न सोडवणं हे नागरिकांचंच काम आहे. पण जागतिकीकरणात नागरिक राहिलेत कुठे? इथे फक्त
‘कंझ्युमर’ जन्माला येतायत.

सवयीनं प्राईमटाईम, ब्रेकिंग न्यूज बघणारे मध्यमवर्गीय
‘पीपली लाईव्ह’ बघायला तिकिट काढून जातात. पॉपकॉर्न खात, कोकचा घोट घेत,
थंड काळ्या शांततेत चित्रपट सुरू होतो आणि पहिल्याच, ओपनिंग सीनमध्ये
नत्थाला उलटी होते. करमणुकीच्या आशेनं आलेल्या मध्यमवर्गीय
न्यूज-चॅनेलच्या ग्राहकाला पहिली भेटते ती नत्थाची कडुजहर उलटी... आणि मग
अनुशाच्या दिग्दर्शक म्हणून तिनं केलेल्या खेळाची सुरूवात होते. यात
जीवनदर्शन नाही. यात ‘ब्रेख्त’च्या नाटकासारखं, तीन पैशांच्या तमाशातून
दाहक वास्तवाकडे बघताना अंतर्मुख करणारं मटेरिअल आहे. ‘बघणं’, ‘कंझ्युम
करणं’ हीच या मध्यमवर्गाची कृती असेल तर पुढच्या वेळी चॅनेल सर्फ
करताना, त्या बटणांशी खेळताना, त्या आक्रस्ताळ्या आवाजातल्या ब्रेकिंग
न्यूज ऐकताना, ते टीआरपीग्रस्त कार्यक्रम बघताना – आपल्या डोळ्यांना जाग
येईल इतपत ‘चळवळ’ हा सिनेमा करतो. म्हणून तो महत्त्वाचा आहे.

वास्तववादानं ग्रासून, ‘षंढ असणं/कंझ्युमर असणं किती बरं?’ असं मानणा-या
मध्यमवर्गाला निदान थोडं तरी भानावर आणतो हा ‘पीपली लाईव्ह’! त्यातल्या
पत्रकारितेतल्या माणूसपणाच्या ऑनस्क्रीन मृत्यूनं निदान एवढं जरी शिकवलं
आपल्याला तरी अनुशा रिझवी जिंकली असंच म्हणावं लागेल!