लिंकिंग रोडवरून येताना, मी डोकं बाहेर काढून रस्ता बघत होते आणि एकदम जाणवलं की अरे, मगाचपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंला सराफांची दुकानं लागतायत. पण सोन्याच्या दागिन्यांचं एकही दुकान बाईच्या नावाचं नाही. दाणाभाई, त्रिभुवनदास भिमजी… मग स्वत:शीच हसू आलं. असल्या विचाराला 'टिपिकल स्त्रीमुक्तीवाल्यांचा विचार' म्हणून ब्रॅण्ड कसं होईल ते उमगून हसायला आलं. पण मनाचा चाळा चालू राहिला. राजमल लखीचंद, पु.ना. गाडगीळ, वामन हरी पेठे, पालशेतकर, बायकेरीकर, अष्टेकर अशी जी नावं आठवत होती त्यात बाईचं एकही नाव नाही! याची कारणं अगदी उघड आहेत. सोन्याच्या व्यवहाराला आवश्यक भांडवल कुठे होतं कधी बायकांकडे? पेशव्यांच्या काळात सावकारांनी सोनं गहाण ठेवून घ्यायला आणि पेशव्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली तशी जमिनदार ब्राह्मणांची एण्ट्री या पेशात झाली. नाहीतर हे जग खरं मारवाडी पुरूषाचं जग. पण आता, सुबत्तेच्या युगात दागिने डिझाईन करणा-या बायका असल्या तरी 'सोन्याची दुकानं' बायकांच्या नावाची नाहीत. या साध्या, 'जेंडर'मुळे होणा-या आर्थिक घटनांना तपासायचं तर या तपासण्यात 'स्त्रीमुक्तीवादी' शिक्का बसेल असं मनात तरी का आलं? की सध्याची 'मी नाही बाई फेमिनिस्ट' ही फॅशन त्याला कारणीभूत आहे का ?
ऐशीच्या दशकात महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली, फोफावली. त्र्याण्णवच्या महिला धोरणात त्या चळवळीचं प्रतिबिंबही दिसलं. मात्र आता का बरं ही चळवळ ऑल्मोस्ट नामशेष झाली? तिचं महत्त्व का कमी झालं आहे? दोन हजार दहामध्ये या चळवळीला कसं बरं तपासायचं?
दिवरालाच्या रुपकंवरचा सती-खून किंवा पुण्यातल्या मंजुश्री सारडा खून खटल्याची घटना स्त्रीमुक्तीची चळवळ लोकांपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली होती . ऐंशीच्या दशकातले हुंडाबळी इतके क्रूर होते, की स्त्रीचळवळ जर नसती तर या क्रौर्यानं कोणतं टोक गाठलं असतं ते सांगता येत नाही. सीमा साखरे, विद्या बाळ या आद्य नावांपासून ते तत्कालीन समाजात शारदा साठे, छाया दातार, ज्योती म्हापसेकर, मंगला खिंवसरा, विद्युत भागवत, माया पंडित या सा-या नावांची आठवण येणं अपरिहार्य आहे.
मृणालताई, तारा रेड्डी, अहिल्या रांगणेकर राजकारणात होत्या मात्र पोस्ट विद्या बाळ पिढी ही स्त्रीप्रश्नांचा राजकीय अभ्यास करताना स्त्रीविषयक संघटनात्मक कामाशी बांधली गेली होती. त्यामुळे ऐंशीच्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळीनं स्त्रियांवर कुटुंबांतर्गत होणा-या अत्याचाराची बाजू मांडली तसं 'स्त्री असणं' या वास्तवाचा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींच्या संदर्भात अन्वय लावण्याचं मोठं कामंही केलं. राजकारणातल्या स्त्री नेतृत्वाच्या पलीकडचं हे काम होतं.
त्यावेळी दादा धर्माधिकारींच्या लेखनात येणारा ज्युलियट मिचेलचा रेफरन्स किंवा पुष्पा भावे, विद्युत भागवत यांनी तोरिल मुआ, केट मिलेट, मारी दाली, अँण्ड्रिआ ड्वौरकिन यांसारख्या स्त्रीवादी विचारवंतांची करून दिलेली ओळख... त्या दशकानं स्वतंत्र स्त्री-भूमिकेचा राजकीयच नाही तर ज्ञानशास्त्रीय विचारही त्यावेळी समोर आणला.
त्या ‘मिळून सा-या जणी’, ‘बायजा’ किंवा तत्कालीन समाजात, नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला ‘पॉप्युलर’ने प्रकाशित केलेल्या 'पाऊलखुणा' यासोबत स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली, फोफावली. मात्र 'मुलगी झाली हो'च्या उल्लेखाशिवाय सारं अपुरं ठरावं इतका बदल या एका नाटकानं घडवून आणला. महाराष्ट्रातल्या चळवळीच्या जागराचं श्रेय या नाटकाला जातं.
पुणेरी पेठ-घरात मोठं होताना, घरात स्वायत्त विचार मांडणं सुरू झालं, की 'तुला विद्या बाळ व्हायचंय का?' असं विचारलं जायचं. असे ते दिवस होते. आता ज्या पन्नाशीच्या आसपास आहेत त्या बायांना, ज्या साठीच्या पलीकडे आहेत त्या पहिल्या फळीच्या 'स्त्रीमुक्ती'च्या प्रणेत्यांनी कितीतरी दारं उघडून दिली होती!
परंतु दोन हजार दहामध्ये आयडियॉलॉजी हरवलेला आणि कधीतरी आक्रमक बनणारा तरूण स्त्रियांचा आवाज जो भेटतो तो असा कसा झाला? या पोरी फेमिनिझम का नाकारतात? कर्वे-फुले-आंबेडकरांची सकस पायाभरणी असूनही महाराष्ट्रातल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं भुस्कट का झालं? डाव्या चळवळीच्या एकूण अपयशाच्या कॅनव्हासवर या चळवळीचं अपयश शांत डोक्यानं तपासायला हवं. अपयशाची मीमांसा हा 'खापर फोडण्याचा प्रयोग' नाही तर उघड्या डोळ्यांनी काय चुकलं असं वाटतंय याबद्दल मत मांडण्याचा प्रयत्न आहे.
स्त्रीस्वातंत्र्याची प्रेरणा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, गांधी-विनोबांपासून घेतली त्या आद्य पिढीनं 'स्त्रीमुक्ती'कडे फक्त रोझा लक्झेंबर्ग चष्म्यातून बघितलं नाही. गांधीबाबाचं सोपं बनिया-बेरजेचं राजकारण समजून घेत मृणालताईंनी लढे उभारले, यशस्वी केले. या लढाऊ राजकारणाची दुसरी बाजू म्हणजे दुर्गाबाईंसारखी व्यक्तिमत्त्वं होती. आधुनिक स्त्रियांच्या पहिल्या फळीतल्या स्त्रिया या आपल्या भूमिकेवर ठाम आणि स्वच्छ होत्या. त्यांच्याकडे आताच्या काळात दुर्लभ अशी वैचारिक स्पष्टता होती.
यानंतर डाव्या चळवळीतून प्रेरणा घेतलेली, पोस्ट युक्रांद जी स्त्रीवादी पिढी आली ती चळवळीच्या ऊर्जेनं भारावलेली होती. या पिढीकडं बघताना मन भरून येतं. कारण आधुनिक रोमॅंटिसिझम आणि चळवळीचं क्रूर राजकारण अशी तारेवरची कसरत या पिढीनं केली. या पिढीतल्या गौरी देशपांडेसारख्या इण्टेन्स बाईनं मग रोमॅंटिक असण्याचा ऑप्शन घेतला तर नीलम गो-ह्यांसारखी बाई राजकारणाच्या सर्व छटांना परिचित होत्साती झाली.
या सा-यात काहीशा समजूतदार, सुलभ राजकारणाची कास विद्याताई बाळांनी पकडली. मात्र विद्याताईंनंतरच्या, पुष्पाबाईनंतरच्या पिढीचा मला सॉलिड प्रॉब्लेम जाणवतो. कारण अतिशय नम्रपणे मला असं म्हणावंसं वाटतं, की त्यांच्या कन्व्हिक्शन्स कमी पडल्या आहेत. यानंतरच्या बायांना राजकारण धड समजत नव्हतं; अकॅडमिक आवेश मात्र प्रचंड होता आणि त्याच बरोबर या पिढीनं 'विंगेतून आगरकर-टाईप बाप्ये येतील का?' अशी मनोमन सतत वाट पाहिली. हे विश्लेषण माझ्या मैत्रिणीनं केलं तेव्हा मला टोचलं होतं. परंतु, स्त्रीवाद्यांनी मनोमन एका 'पूर्ण पुरूषाची' वाट पाहात अनेक प्रयोग केले, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. प्रयोग करण्यात गैर काहीच नाही, परंतु त्या प्रयोगांच्या किंमती चुकवण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली.
नावडत्या, नमककम परंतु सुस्थितीतल्या नव-यांबरोबर संसार करायचे, त्यांतल्या तळटिपेतल्या अटी न पाळता पळवाटा शोधायच्या, परंतु सुखवस्तूपणाला अ-राजकीय चिकटून राहायचं हे यानंतरच्या फोर-फ्रंटवरच्या पिढीनं केलंय. त्या दंभाचा परिणाम चळवळीवर नक्कीच झाला. तसंच कोऑपरेशनच्या नावाखाली पुरुषांसोबत प्रचंड स्पर्धा केली, त्याचाही परिणाम या चळवळीवर झाला.
स्वातंत्र्य ही अतिशय महाग वस्तू असून त्यासाठी 'स्व'ला स्टेकला लावायला लागतं. 'केवळ मटिरिअल सुबत्ता देऊ शकणारा खटारा संसार आम्ही रेटला' या त्यागात फारशी ग्लोरी नव्हती आणि तो सारा कचखाऊपणा स्त्री मुक्ती चळवळीच्या पोस्ट-विद्याताई टप्प्यात दिसतो. यांतल्या काही जणींनी बोअरिंग किंवा क्रूर संसार नाकारले. मात्र नव्या संसाराची, यशाची अपेक्षा इण्टॅक्ट ठेवूनच… त्यामुळे झडझडून स्वायत्तता किंवा स्वत:चा निर्भर आवाज त्यांना लाभू शकला नाही. पुरूषप्रधानता/पॅट्रिआर्की नाकारताना या पॅट्रिआर्कीपलीकडे उडी टाकणारे पुरूष असतीलच की... असं त्यांना मनोमन वाटत राहिलं.
त्या मानानं पुण्या-मुंबईपलीकडच्या बाया जास्त ठोस आणि शहाण्या होत्या. त्यांनी चळवळ जेव्हा स्वीकारली तेव्हा मनापासून, झोकून देऊन चळवळ उभी केली. नागपूरच्या सीमाताई साख-य़ांचं आत्मचरित्र वाचताना माझ्या डोळ्यात पाणी अालं. त्यांना राजकारण नीट उमगलं होतं. नंतर एकीकडून तोरिल मुआचं 'सेक्शुअल अँण्ड टेक्शुअल पॉलिटिक्स' वाचणा-या बाया जेव्हा अंतिमत: 'मारूती माक्सिस्ट' बनल्या तेव्हा या चळवळीचं अस्तित्व माध्यमांपुरतंच मर्यादित झालं. म्हणूनच नंतरच्या काळातला स्त्रीलिंगी गर्भचिकित्सेचा मुद्दा चळवळीतल्या आवाजापेक्षा कितीतरी जास्त पटीनी डॉक्टरांनी व इतर एन.जी.ओ.वाल्यांनी उचलून धरलेला दिसतो. यानंतर स्त्री-मुक्तीवाद्यांच्या जास्त चर्चा 'आहे मनोहर तरी' आणि 'बंध-अनुबंध'वर झाल्या. हे कसलं लक्षण आहे?
एकीकडून स्त्रीमुक्तीची भाषा वापरणा-या नवरा-शरण बायांनी, आई म्हणून आपल्या पोरींवर कसले संस्कार घडवले? कच खाण्याचे? मटिरिअल सुबत्तेला शरण जाण्याचे की घरच्या कार्पेटखाली सारी हिपोक्रसी दडपण्याचे? नो वंडर, अशा घरातल्या मुली पुढे येऊन 'आय अँम नॉट अ फेमिनिस्ट' म्हणतात. आणि पुरूष? या दरम्यान काही समजूतदार पुरूष बदलले. चळवळवाल्या पुरूषांनी नॅपी बदलण्याचं शिक्षण घेतलं. पण मूळ ढाचा पुरूष असण्याचा फारसा बदललेला नाही. रादर, स्वतंत्र वाटणा-या बाया अधिकच कॉंन्झरर्व्हेटिव्ह निघाल्या असं पुरूषी गणित काहींनी मांडलं, जोखलं आणि वापरलंही. ते पॅट्रिआर्कीचे फायदे असे सहजी कुठे सोडणार होते?
सुपरबोअरिंग लग्नं तर नॉन-स्त्रीमुक्तीवाल्या बायकांनीही टिकवलीच होती. रादर, तीच तर परंपरा होती आपल्या देशात. मात्र त्यांनी आपल्या पोरींना लग्नात सौख्य, समाधान इत्यादी न शोधण्याचा मोलाचा धडा दिला होता. पोरांमध्ये मन गुंतवायचं, जोडलेल्या नात्यापेक्षा रक्ताची नाती जोपासायची हे बेसिक धडे या कॉंन्झरर्व्हेटिव्ह आयांचे होते. पोस्ट मॅनॉपॉझल फेजमध्ये, पोरं हाताशी आली की नव-याला डंख करण्याची एकही संधी न सोडणा-या पॉवरबाज बायका चळवळीनं घडवलेल्या नव्हत्या, तर त्या बदलत्या अर्थव्यवस्थेत स्वत:चं शहाणपण वापरून घडल्या होत्या. रेशनिंग ऑफिस, एल.आय.सी., मंत्रालयात नोकरी करून ज्यांनी आपले संसार रेटले त्यांनी आपल्या पोरींना कॉंन्झरर्व्हेटिव्ह किंवा मुक्त होण्याचे धडे दिले नाहीत. रादर, त्यांनी नोकरीतले कष्ट, त्रास पोरींना उमजू दिले. आज आय.टी.मध्ये लाखात पगार कमावणा-या पोरी त्यामुळे स्त्रीमुक्तीची भाषा बोलत नाहीत किंवा त्या उर्मिला देशपांडेसारखं 'पॅक ऑफ लाईज'ही लिहीत नाहीत.
या नव्या, स्वायत्त पोरी एकट्या परदेशी जातात, बख्खळ पैसा कमावतात, स्वत:चे फ्लॅट्स घेतात. रादर, आईला चिकटून राहतात आणि प्रत्येक नात्याला करार म्हणून स्वीकारताना स्वत:चं काय 'डील' आहे ते नीट तपासून घेतात. त्या निदान विंगेतून माझ्यासाठी आगरकर-सदृश पुरूष कधी येईल ? याची वाट तरी पाहात नाहीत! किंवा आपला पुरुष आगरकर टाइप नसणार म्हणून आपापले मार्गही शोधतात.
मात्र हे सारं शहरात घडताना जे गावात घडतंय त्याकडे सेन्सिटिव्हली कसं पाहायचं ते या कधी शिकणार? प्रश्न तर अनेक आहेत आणि माझ्यासारख्या 'ना अरत्र ना परत्र' फेमिनिस्ट बाईला चळवळ मनापासून आवश्यक वाटते. हा माझा हास्यास्पद चळवळ-नॉस्टॅल्जिआ मला समजतो, तरी हवासा वाटतो. म्हणूनच मी विंगेतल्या चळवळीची वाट बघते. एका स्त्री-पुरूष नॉनहिपोक्रिट मुक्तीची!