Monday, March 29, 2010

प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा

प्रसारमाध्यमातील भाषेचा जनमानसावर प्रचंड प्रभाव पडत असल्यामुळे प्रमाण भाषेचा प्रश्न प्रसार माध्यमांना गंभीरपणे घ्यावा लागतो. जी मराठी भाषा , ज्या प्रकाराने प्रसारमाध्यमात वापरली जाते, त्याचा लोकांवर प्रभाव पडतो. प्रसारमाध्यमातील भाषेचे लोकप्रियतेमुळे सार्वत्रिकीकरण होत जाते.

व्याकरणाच्या दृष्टीने जी प्रमाण मराठी भाषा मानली जाते- ती पुणेरी- पेशवाई- ब्राह्मणी असल्यामुळे, त्या प्रमाण भाषेला लोकभाषेचा मान मिळालेला नाही. अति संस्कृतप्रचुर किंवा ब्राह्मणी भाषा सर्वसामान्य मराठी माणसापासून दूरची राहिलेली आहे. या परिस्थितीत प्रसारमाध्यमे तात्कालिक निर्णय घेऊन 'भाषा' घडवण्याचे किंवा बिघडवण्याचे काम करत आहेत. प्रसारमाध्यमांचा प्रभाव लक्षात घेता कोणत्या प्रकारची भाषा प्रसार माध्यमात वापरली जायला हवी याबद्दल विचार आणि त्याचे डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे. पुस्तकी-शासकीय मराठी भाषा ही पुणेरी - ब्राह्मणी असल्यामुळे त्या भाषेला एक जातीय परिमाण आहे. मराठी प्रमाण भाषेचे देहू-आळंदी हे केंद्र मानल्यास त्याला व्यापक परिमाण लाभू शकेल आहे मला वाटते आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

जागतिकीकरण ही एक सांस्कृतिक प्रक्रिया आहे. अमेरीकाकरण करणारी एक सांस्कृतिक प्रक्रिया म्हणून या कल्चरल प्रोजेक्ट चे वर्णन अनेक think-tanks नि केले आहे. माझा मूळ मुद्दा या अमेरिकन- भांडवलशाही - जागतिकीकरणाला भाषिक अस्मिता कसा लढा देणार आहे? याचा आहे. मी दोन scenario मांडते. भांडवलशाही जीवन दृष्टीचे कलम मराठी भाषेवर करणे हा एक पर्याय. दुकानांच्या पाट्या बदलणे हे मला त्याचेच लक्षण वाटते. असे करून मराठी भाषा वाढवायची असेल तर इंग्रजी भाषेकडून तिला खूप शिकावे लागेल.

इंग्रजी भाषेच्या वाढीस आवश्यक असे अंतर्गत colonization करून जवळ जवळ चारशे वर्षात इंग्रजीने जगात पसरण्यापूर्वी आपल्या Scottish, Welsch, Gaelic इत्यादी भाषा नामशेष करून त्यातून एक प्रमाण इंग्रजी भाषेशी निर्मिती केली होती. या भाषेच्या अंतर्गत हिंसेचा फायदा इंग्रजीला जगभर पसरण्यासाठी झाला हे नाकारून चालणार नाही. मराठीला एक प्रमाण भाषा म्हणून वाढायचे असल्यास तिला कोंकणी, अहिराणी, वऱ्हाडी या भाषांबाबत आपले धोरण ठरवावे लागेल. अशा तऱ्हेच्या अंतर्गत वसाहतावादामुळे काही बोलींचा बळी जातो. त्या केवळ म्युझियम पुरत्या उरतात. हे कटू सत्यही स्वीकारावे लागेल कदाचित.

परंतु- जागतिकीकरणाच्या मूल्यासोबत जर मराठीला टक्कर घ्यायची असेल तर मारामारीचे राजकारण सोडून मराठीला मूलभूत विचारव्यूहाची निर्मिती करावी लागेल. यासाठी प्रथम मराठी असणे म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. भाषा ही धर्माप्रमाणेच सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र आणि नीतीशास्त्र या तीन तत्वज्ञानाच्या शाखांचे documentaion करत असते. मराठी भाषेचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र आणि नीतिशास्त्र म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. त्या पार्श्वभूमीवरून मग अमेरिकीकरण होणे म्हणजे काय ते तपासावे लागेल. भांडवलशाही आणि जागतिकीकरणाच्या विचार व्यूहाला छेद द्यायचे मूलभूत काम मग करावे लागेल.
तुकोबा - ज्ञानोबाच्या कवितेवर आणि तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या मराठी भाषेला हे शक्य आहे. मराठीचे भाषाकरण जर अशा 'मराठी' मूल्यांवर आधारित झाले तर ते दीर्घकाळ टिकणारे ठरेल.

पहिला मार्ग सोयीचा , चटकन समजणारा आणि तात्कालिक निकाल देणारा आहे. परंतु त्यात दीर्घकालीन हीत नाही. दुसरा मार्ग मात्र अजूनही विचारातच येत नाही. त्या विचार व्युहाकडे आपण आज बघतही नाही. माझ्या भूमीत रुजण्याची सर्व मूल्य माझ्या भाषेत आहेत. त्या मूल्यांवर मी संकर करेन परंतु कंद मूल्ये मी डावलणार नाही - अशा वृत्तीने काम केल्यास त्याचे परिणाम वेगळे होतील. मराठीची वैश्विक भूमिका नाती जोडणारी आहे. पसायादानातून व्यक्त होणारी आहे. या जोडणाऱ्या भाषेच्या केंद्रस्थानी सृजन आहे, नवी कल्पना आहे. 'जागतिकीकरणाच्या साठमारीत माझा थोडा मराठी शिंतोडा' असे symbolic स्टंटबाज राजकारण करणारे फक्त अस्मितावादाचा पुरस्कार करतात. त्यांची मूल्ये मला शेवटच्या मराठी माणसाचे हीत साधणारी वाटत नाहीत.
मात्र यावर अजून दीर्घ लिहिण्याची आवश्यकता आहे. मला वाटते मराठी भाषेत जी एक खुली, मोकळी नैतिक space आहे ती जाणून घेतली तर प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान या दोन्ही शाखांना अधिक माणूसपणाचा चेहेरा मिळेल.

मात्र मूलभूत विचार व्युहातून जागतिकीकरणाला छेद दिला तर दीर्घकालीन उपाय निघू शकतात. प्रश्न खोल पाण्यात उतरण्याचा आहे. साडेतीन फुटात ज्यांना पोहायचं त्यांचा नाही.

तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे यामधील मराठी म्हणूनच मराठी मानवतावादी मूल्यांसोबत रुजवली जाणे आवश्यक आहे.

1 comment:

  1. मराठी भाषेत जी एक खुली, मोकळी नैतिक space आहे ती जाणून घेतली तर प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान या दोन्ही शाखांना अधिक माणूसपणाचा चेहेरा मिळेल...
    म्हणजे काय? हे थोडं स्पष्ट करून लिहाल काय? वाचायला आवडेल.

    ReplyDelete