Monday, August 9, 2010

बाप रखुमादेवीवरू

आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं सारं चित्त पंढरीच्या वाटेवर चालणा-या, जगाच्या कानाकोप-यांतून आलेल्या पावलांची, मनांची, काळजी घेण्यात- त्यांच्या आर्ततेची संगती लावण्यात, त्यांना त्यांच्या मुळापर्यंत पोचवण्यात लागलं असणार... त्या काळात त्याला वामांगीकडं लक्ष द्यायलाही फुरसत नसते तर माझ्यासारख्या कन्फ्युज्ड जिवांची काय कथा? या वारीनं, या विठूनं, त्याच्या गजरानं न भारावलेला माणूस माझ्या परिचयाचा नाही. महाराष्ट्राच्या गुणसूत्रातच हा विठुराया स्थानापन्न झालेला आहे. असं काय आहे या त्याच्या भेटीत?
दिलीप चित्रे यांना एकदा वारी पुण्यात यायच्या दिवशी मी भेटले होते. तेव्हाचं चित्र्यांचं वाक्य माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते, की या वारीकडे संस्कृतीचं 'क्रॉस पॉलिनेशन' असं बघावं लागेल. वेगवेगळ्या भागांतून येणारी भक्तमंडळी इथं उराउरी भेटतात, गाणी गातात, दंग होतात आणि नवनव्या कल्पनांची देवाण-घेवाण करतात, इथं नवी संस्कृती जन्माला येते.
प्रत्येकानं आपापला मोक्ष स्वत: मिळवायचा ही या भूमीची परंपरा... पण अशा भक्ति मार्गावर एकमेकांना भेटून एकत्र पायवाट चालायची हे वारीचं इनोव्हेशन.
माझे गुरुजी जेम्स फोर्ड यांचा 'आयकॉन्स' नावाचा सेमिनार मी अटेण्ड करायचे. काय होतं या 'आयकॉन्स'च्या सेमिनारमध्ये? तर देशोदेशीचे आम्ही विद्यार्थी त्यात आपापल्या संस्कृतींतल्या 'चिन्हं, मूर्ती, प्रतिमा आणि मूर्तींचा अभाव' या विषयावर चर्चा करायचो. प्रोफेसर फोर्ड हे जपानमधील बौध्दधर्माचे प्राध्यापक. ते हा सेमिनार मॉडरेट करायचे - आम्हाला शिकवायचे. या सेमिनारमध्ये माझा ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या आयकॉन्सशी परिचय झाला, तर माझ्या आफ्रिकन मित्रानं मूर्त स्वरूपात परमेश्वराचं नसणं या इस्लामिक संकल्पनेचा आणि नायजेरमधल्या त्याच्या संस्कृतीचा अन्वय लावून दाखवला. डो डॉटरी या माझ्या अमेरिकन वर्गमैत्रिणीनं मॉर्मन चर्चमधल्या प्रतिमांतून नाहीशा होत गेलेल्या 'होली मदर'चं चित्र आमच्यासमोर मांडलं. प्रत्येक संस्कृतीनं आपापल्या दृश्य जाणिवांसकट आपापल्या विश्वातला परमेश्वर घडवला होता, हे आमच्या ध्यानात येऊ लागलं आणि त्यातून संस्कृतीच्या सब- कॉन्शस निरगाठी प्रत्येक समूह कशा सोडवितो ते लक्षात येण्यास सुरुवात झाली.
फोर्ड गुरूजींनी या सा-या सेमिनारची सुरुवात केली होती ती त्यांच्या अमिदा बुध्दाच्या कथेनं. एका गावातील अमिदा बुध्दाची मूर्ती त्याच्या भक्ताला दृष्टांत देते. अतीव भक्तीच्या टोकावर भक्ताच्या गालावर चटका बसतो आणि तो डाग त्या बुध्दाच्या मूर्तीवर उमटतो असं या कथेचं मूळ बीज. फोर्ड गुरूजींचं यावर एक मूलभूत विश्लेषण होतं. त्यांच्या मते, स्वर्गात किंवा ब्रह्मलोकात बुध्द आहे आणि त्याची 'मूर्ती' म्हणजे हा अमिदा बुध्द अशी या जपानी परंपरेत धारणा नाही तर ती मूर्ती म्हणजेच तो अमिदा बुध्द अशी त्यांची धारणा आहे. म्हणून भक्तांच्या स्वप्नात- चालता- बोलता मनुष्यमापातला असा अमिदाबुध्द येत नाही तर ती मूर्ती- म्हणजे 'तोच' येतो. फोर्ड गुरूजींचं प्रवचन ऐकणं हा भाग्ययोगच. त्यांच्या या 'मूर्ती हेच देवाचं असणं' या विषयानं मात्र मला जागं केलं. मला जाणवलं, की विठोबासुध्दा असा आपल्या स्वप्नात कर कटावर ठेवूनच येतो. ‘संत सखू’ सिनेमात सखूला सोडवायला कर कटावर ठेवलेला चार फुटी 'मूर्ती विठोबा' ऊर्फ खरा विठोबा येतो. आपणही विठोबाकडे स्वर्गात, क्षीरसागरात कुठेतरी आनंदात राहणा-या ओरिजनल विठोबाची पंढरपूरची प्रतिकृती असं न बघता- हाच तो नाम्याचं जेवण जेवणारा विठुराया, हाच-ज्यानं जनीचे केस विंचरले, हाच- ज्यानं तुकोबाला दर्शन दिलं, हाच-ज्यानं दामाजी पंतांची सुटका केली, हाच-तो समचरण, साजिरा विठोबा असं त्याच्याकडे बघतो. फोर्ड गुरूजींना मी जेव्हा रा. चिं. ढे-यांचं माढ्याची मूळ विठोबा मूर्ती आणि ही नवी मूर्ती यांबाबतचं संशोधन ऐकवलं तेव्हा माझ्या सेमिनार पेपरमध्ये अजून भर पडली. भक्तांना 'मूर्ती'पलीकडचा विठोबाही दिसतो. मूळ मूर्ती कुठेही गेली तरी ज्या मूर्तीत आपण भाव जडवला, जीव गुंतवला तीच मूर्ती; नव्हे, तोच विठोबा आम्हाला खरा विठोबा वाटतो... नव्हे, तोच खरा विठोबा असतो.
याच फोर्ड गुरूजींच्या वर्गात आम्हा सर्वांच्या लक्षात अजून एक गोंधळ येऊ लागला. तो म्हणजे इंग्रजी भाषेच्या मर्यादेचा. आता, विठोबाला काय म्हणायचं? गॉड- तर तो गॉड या अब्राहमिक धर्मातल्या
( अब्राहम ज्यांचा मूळपुरुष आहे असे धर्म - म्हणजे ज्यू , इस्लाम आणि ख्रिश्चन ) 'गॉड'पेक्षा निराळा आहे. पंढरपुरातल्या विठोबाला आपण 'मूर्ती' म्हणू शकत नाही, तो प्रतिमा नाही, तो विठ्ठलाची प्रतिकृती नाही- तो शंभर टक्के ओरिजिनल विठ्ठल आहे. या साजि-या ध्यानाचं वर्णन करायला इंग्रजी भाषा तोकडी आहे याचं ज्ञान झालं. त्याचबरोबर गॉड, रिलिजन, सेक्रेड, फेथ, ग्रेस, बेनेव्हलन्स या सर्व शब्दांना अभिप्रेत ख्रिश्चन धर्मकल्पनेचा संदर्भ सतत नजरेसमोर येऊ लागला. 'गॉड' या शब्दात अभिप्रेत असलेला परमेश्वर वाळवंटात कुत्र्याचं रूप घेऊन, प्रकट होऊन धावत नव्हता किंवा त्याच्या पाठीमागे नामदेव तूप घेऊन धावत नव्हते. 'गॉड' या कल्पनेला सर्वात्मक परमेश्वर श्रीखंड्या होऊन एकनाथांच्या घरी व्रात्यपणा पण करणारा नव्हता. प्रत्येक संस्कृतीनं आपल्या कॉस्मॉलॉजीत, आपल्या असण्यात, आपल्या माणूसपणाच्या सीमा जाणण्यात त्या पलीकडे स्थित असणा-या 'परमेश्वराचं' एक रुपडं ठरवलं होतं. आणि ते रूप त्याच्या भाषेशी निगडित होतं.
माझा चीनमधल्या चर्चमध्ये काम करणारा एक वर्गमित्र मोठ्ठे डोळे करून म्हणाला, तुमच्याकडे तीन प्रकारचे देव आहेत. देवांचा एक गट आपल्या गावाला राहतात आणि त्यांना भेटायला त्यांच्या घरी तुम्ही जाता. विठोबा, तिरूपती, काशी विश्वेश्वर किंवा जेजुरीचा खंडेराया. दुसरे देव आहेत ते पाहुणे बनून तुमच्या घरी येतात- नवरात्रातली देवी किंवा गणपती. आणि तिसरे देव- तुमच्या घरात राहतात. ज्यांची तुम्ही घरातच पूजा करता. त्याचं वर्णन काही अंशी बरोबर होतं. पण या तीन प्रकारापलीकडे कधी झाडात, कधी गावाच्या सीमेवर, कधी पाण्यात, नदीत, तळयात, भक्तांच्या हृदयात प्रकट झालेले देव आहेत असं त्याला सांगावंसं वाटलं. मग जाणवलं की या भारतीय भूमीत चराचरात परमेश्वराचं रूप दडलंय असं म्हणतात. हे या भूमीतलं अद्वैती नातेसंबंधानं बांधलेलं विश्व आहे. अरुण कोलटकरांच्या 'जेजुरी' त नाही का अशा 'दगडात देव शोधणा-या माणसांचं' जग आहे.
मग मला आमच्या पुण्याच्या घरातलं देवघर आठवलं. काकाला घरी यायला उशीर झाला की बाळकृष्णाला पाण्यात बुडवणारी आजी आठवली. किंवा खंडोबाच्या नवरात्रात वडे तळणारा तिचा गोरा गोरा चेहेरा समोर आला... या 'देव' कॅटॅगरीत काकूच्या अन्नपूर्णेपासून बरीच 'देवमाणसं' देवघरात बसायची. माझा लाडका विठोबा घरच्या देवघरात रुक्मिणीसमवेत उभा राहायचा हे देखील आठवलं. माझ्या लाल अलवणातल्या आजीची जगण्याची घुसमट वारी त्याच्या डोळ्यादेखत घडत होती- ते ही.
ढे-यांच्या ‘महासमन्वया’नं या विठोबाचं कित्येक पिढ्यांना, अवतारांना, कल्पनांना पोटात घेऊ शकणारं रूप सामोरं आणलं. जैन, बौध्द परंपरांपासून ते तुकोबांच्या गाथेतल्या अल्लाच्या अभंगांपर्यंत विठुरायाची सांस्कृतिक व्याप्ती पसरलेली आहे हे लक्षात आलं. चार्ल्स साँडर्स पर्स नावाच्या एका तत्त्वज्ञानं चिन्ह जगाचं तत्त्वज्ञान मांडलंय. तो तीन प्रकारच्या चिन्हांचं विश्लेषण करतो. आयकॉन- म्हणजे जी गोष्ट निर्देशित करायची त्याचं छोटं रूप, इंडेक्स- म्हणजे त्या गोष्टीचं निर्देशन होईल अशी सूचक गोष्ट आणि सिम्बॉल-म्हणजे त्या वस्तूला दिलेली विवक्षित खूण. चिन्हांची ही सारी व्यवस्था एका सबस्ट्रॅटम म्हणजे मूळ सांस्कृतिक भूमीवर उभी असते असं विवेचन पर्स ने केलं आहे. विठोबाच्या गोजि-या ध्यानाकडे बघितल्यावर पर्सनं निदेशित केलेल्या या सांस्कृतिक भूमीतच 'महाराष्ट्री' असण्याचं सारं गमक दडलंय असं मला वाटायला लागलं. या भूमीत जे जे सारं परमेश्वराबद्दलचं चिंतन झालं त्या सा-याला विठोबाच्या विटेनं सामावून घेतलंय. त्यानं हरिहर भेद गिळून टाकले, त्यानं बुध्दाचा अवतारच आपलासा केला. एवढंच काय, साईबाबांचंदेखील 'विठोबाकरण' या महाराष्ट्राच्या भूमीत होऊ शकलं.
या पार्श्वभूमीवर नेमाड्यांच्या 'हिंदू' कादंबरीत नायकाचं नाव खंडेराव विठ्ठल म्हटल्यावर मला हसूच आलं, परवा. अरेच्च्या- म्हणजे नेमाड्यांनी 'हिंदू' मध्ये जेजुरी-पंढरी असा शैव-वैष्णव लंबगोल मानून त्याची खंडेराव आणि विठ्ठल अशी दोन केंद्र मानलीत कां काय? असा विचार मनात आला. की खंडेरावात हे हरिहर एकत्र झालेत? असा प्रश्नही मनात आला. देशी जाणीवांना व्यक्त प्रश्न करणारा ' पांडुरंग' सांगवीकर आणि दक्षिण आशियात पसरलेली बहुकेंद्री हिंदू जाणीव तपासणारा खंडेराव यांना वेधून असलेला विठ्ठल डोळ्यांना दिसला.
परवाच, सुषमा देशपांडेनं लिहिलेल्या 'बया दार उघड' या नाटकाची तालीम बघत होते. त्यातल्या विठा नावाच्या एका भक्ताची कथा सामोरी आली. तिचं मन विठोबावर जडलंय. आणि नवरा परंपरेचा आधार घेत शारीर बळजबरी करू बघतो. त्याला विठ्ठलाच्या प्रेमात दंग झालेली विठा सुनावते-
'तुझी सत्ता आहे देहावरी समज
माझेवरी तुझी किंचित नाही'
विठ्ठलाच्या भक्तीत सकस झालेले देशी स्त्रीवादाचे स्वर सुषमाच्या नाटकात भेटले. नुसताच हरी हर नव्हे तर स्त्री पुरुष भेदही गिळणारी विठू माऊली सामोरी आली.
या अशा सर्व काही व्यापून दशांगुळं शिल्लक राहणा-या विठोबाची मला आर्त आठवण येते आहे. आषाढीनंतर तृप्त वैष्णवजन आपापल्या संसारात परततील. मग माझ्या विठोबाला सवड मिळेल माझ्यासाठी. मला इरावती कर्व्यांना भेटलेला 'बॉयफ्रेंड' नको. मला हवाय या जगण्याच्या वाळवंटात माझं बोट धरून चालणारा माझा हक्काचा बाप. कृपा सिंधु करुणा करू, बाप रखुमादेवीवरू!

1 comment:

  1. अप्रतिम..!! विठ्ठलाविषयीचं असं हे अनोखं पोस्ट-मॉडर्न पर्सेप्शन तयार होण्याची प्रक्रियाही नकळत मांडली गेली आहे. ह्या मांडणीच्या पद्धतीसहित आवडलं !! :)

    "पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ||" असं तुकोबा म्हणतातच!! :)

    -हेमंत राजोपाध्ये

    ReplyDelete