Thursday, September 23, 2010

विवाह संस्था आणि हिशोब



एक इतिहासाचार्य आणि एक उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना. राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून या संस्थेकडे बघताना घातलेल्या अनेक चष्म्यांना तडे जातात. इतिहासातून वाहत आलेली नाती राजवाडे त्यांच्या विश्लेषक पद्धतीनं तपासतात. कॉम्रेड डांग्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे माणसाचं जीवशास्त्रीय जगणं म्हणजे जिवंत राहणं आणि प्रजनन करणं असं मानणार्‍या एका बिंदूपासून राजवाडे सुरूवात करतात आणि विवाहसंस्थेच्या उदयात किती प्रकारचे हिशोब आदिम काळापासून गृहित धरले आहेत त्याची पुराव्यानुसार जंत्री देतात. कॉम्रेड डांग्यांना मार्क्स आणि एंगल्सचा ‘आदिम साम्यवाद’ या लेखनात आढळलाय – मग हे असं गंभीर पुस्तक वाचताना कोणत्या उथळपणाच्या परमोच्चबिंदूची आठवण यावी? तर ती आलीच. किम कट्रालची.

‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’ या मालिकेत किम कट्रालनं समंथा नावाचं कॅरेक्टर रंगवलय. इतिहासाचार्य राजवाडे आणि समंथा या दोघांनाही जगातल्या कोणत्याच बाई आणि बाप्याच्या परम्युटेशन-कॉम्बिनेशननं चकवलं नसतं. या दोघांनाही जगातल्या वैषेयिक आणि वैवाहिक संबंधांबद्दल एक प्रकारची तटस्थ जाण आहे. एकाला अभ्यासपूर्वक आणि एकाला अनुभवोत्तर.

आश्रमीय जीवनशैलीच्या बाहेर पाऊल टाकल्यामुळे संन्यासी आणि वेश्या यांना जगाचं खरं रूप कळतं असं म्हणतात. परंपरेनं वाहत आलेला ‘वेश्या’ हा शब्द आता, एकविसाव्या शतकात भांडवलशाहीनं जोडलेल्या अनेक नात्यांना लागू होतो. अगदी लग्नांतर्गत नात्यांनादेखील. त्यामुळे परंपरागत अर्थानं तो शब्द वापरणं चूकच. पण गृहस्थाश्रम मांडला नाही की नात्यातलं काहीतरी गंमतशीर कळतंच की. ‘इतिहास अभ्यासक’ आणि शरीरसंबंधांना कोणत्याही भावनिक गुंतवणुकीपलीकडे जीवशास्त्रीय गरज म्हणून तपासणारी ‘समंथा’, या दोघांनाही विवाहसंस्थेबद्दल काहीतरी मोलाचं कळलंय हे मला वाचता वाचता जाणवलं म्हणून या दोघांचीही आठवण एकत्र आली.

एका एपिसोडमध्ये एक पुरूष ‘गे’ आहे की नाही यावर समंथाच्या मैत्रिणी वाद घालू लागतात. तेव्हा त्यांना गप्पं करत समंथा म्हणते, ‘बुरसटलेल्या बायांसारखं काहीतरी बोलू नका. बाईला बाई आवडते की बाप्या, बाप्याला बाप्येच आवडतात की बाया या पलीकडे जग केव्हाच पोचलंय! आता होमो-हेटरो या बायनरीपलीकडे एक मोठं पॅनसेक्शुअल जग आहे. व्यक्ती आवडते की नाही हे महत्त्वाचं. नंतर मॅचिंग सेक्शुआलिटीचा विचार.’ समंथांच्या या सर्वसमावेशक, उदार वाक्यानं अर्थातच तिच्या मैत्रिणी चकित होतात. तिच्या ‘पॅनसेक्शुअल’ छत्रीखाली अमंगल असे ‘भेदाभेदांचे भ्रम’ टिकतच नाहीत.

राजवाड्यांचं पुस्तक वाचूनही तसंच होतं. विवाहसंस्थेकडे बघण्याचा व्हिक्टोरियन चष्मा राजवाडे मोडतात आणि सारा इतिहास नव्यानं मांडायला घेतात. त्यामुळे त्यानंतर विवाहसंस्थेचं कोणतंच रूप आपल्याला बिचकावणारं वाटत नाही. ‘असेल बुवा – तसंही असेल’ असं खांदे उडवून म्हणता येतं.

बेट्सी म्हणजे इलिझाबेथ ब्रेंट नावाची कमालीची हुशार अँथ्रोपोलॉजिस्ट बाई आम्हाला शिकवायची. बेट्सीच्या कोर्सचं नाव होतं, ‘निसर्ग आणि संस्कृती – बाईपणाचं घडत जाणं’. बेट्सी प्राणी जगतातल्या लिंगभेदांचा अभ्यास ते विविध संस्कृतींमधलं बाया-पुरुषांचं, त्यांच्या लैंगिक अस्मितांचं घडत जाणं शिकवायची. त्यात अर्थात तृतीय पंथीयांचा विषय नेहमी निघायचा. बेट्सी स्वत: नेटिव्ह अमेरिकन लोकांची अभ्यासक आहे. तिनं नवाहो इंडियनाचा प्रचड अभ्यास तिनं केलाय. एकदा शिकवताना आमच्या एकूण तीन लैंगिक ओळखींतून जगाकडे, संस्कृतीकडे बघण्याच्या चष्म्याला बेट्सीनं धक्का दिला. नवाहो इंडियन्स सात प्रकारचे लिंगभेद मानतात. स्त्रीच्या शरीरातली मनानं स्त्री, स्त्रीच्या शरीरातला मनानं पुरुष, स्त्रीच्या शरीरातला तृतीयपंथी/ना-स्त्री ना-पुरुष; त्याचप्रमाणे पुरुषाच्या शरीरातले तीन प्रकार आणि एक. पूर्णतया शरीरानं व मनानं स्त्री किंवा पुरूष नसलेली अस्मिता. नवाहो परंपरेत ना-स्त्री ना-पुरूष अशा व्यक्तीत दैवी शक्ती असतात असं मानतात. परंतु एकूणात, हे जग सात प्रकारच्या लिंगभेदांचं बनलंय असं नवाहोंचं मत आहे. प्रत्येक व्यक्तीत बाईपणाचा आणि पुरुषपणाचा काही प्रमाणात अंश असतो हे मतंही आताशा सामान्य ज्ञानाचा भाग झालंय.

बेट्सीच्या वर्गात पूर्वसंचितातून येणार्‍या चौकटींच्या ठिकर्‍या उडायच्या. ‘काळ’ या संकल्पनेबद्दल बोलताना एकदिश कालसंकल्पना आणि चक्राकार, पेंडयुलम सारखी आवर्ती काल संकल्पना यांच्यावर बोलून झालं की बेट्सी नेटिव्ह अमेरिकन परंपरेतून आलेली अनेकमिती काळांची कल्पना सांगायची. यानुसार आपण सगळे काळाच्या विविध मितींमधून फिरत असतो आणि भेटतो तेव्हा दोघांच्याही मिती समान असतातच असं नाही. नेटिव्ह अमेरिकनांना (तसंच आपल्याकडच्या आदिवासींनादेखील) ‘फोटो काढणं’ हे का अनैतिक वाटायचं त्याचा उलगडा बेट्सीच्या या ‘काळ’ संकल्पनेमुळे व्हायचा. ‘फोटो’ काढला म्हणजे त्या काळाच्या मितीतल्या माणसाला ठार मारला असा अर्थ नेटिव्ह अमेरिकन लावायचे आणि कॅमेर्‍याला घाबरून पळून जायचे. ते असं का करायचे याची संगती लागते. आपल्या मनातल्या ठाशीव कल्पना खुल्या करून समोर येणारं जग एकदा तपासायचं ठरवलं की कित्येक नव्या गोष्टी नजरेला पडू लागतात.

स.गं मालशांचं ‘आगळंवेगळं’ नावाचं एक पुस्तक होतं. त्यात जुन्या जैन परंपरेतल्या एका पात्राची कथा होती. तिचं नावं ‘धूर्ता’. ही धूर्ता चार थापेबाज चोरांना भेटते. प्रत्येक चोर विविध थापा मारत आपली शौर्यकथा सांगतो आणि ‘धूर्ता’ हिंदू पुराणातले दाखले देत त्या सार्‍या थापा कशा शक्य आहेत ते सांगते. ‘धूर्ता’ अशा जैन मुशीतून घडली आहे की हिंदू पुराणातली कोणतीच नवी संकल्पना तिला आश्चर्यचकित करत नाही! ज्यावेळी मी समाजशास्त्रज्ञाच्या, इतिहास अभ्यासकाच्या भूमिकांचा विचार करते त्यावेळी बेट्सी ब्रेंट आणि धूर्ता या प्रचंड वेगळ्या परंपरा जाणणार्‍या बाया मला आदर्शवत वाटतात. ‘ज्ञानोत्तर तटस्थपणा’ हे दोघींच्याही बेहद्द हुशारीचं लक्षण वाटतं मला.

पुन्हा, न बिचकण्याच्या राजवाडे क्षेत्राकडे जाते. माझ्या दररोजच्या बसप्रवासात हातात असलेलं सध्या पटावरचं पुस्तक म्हणजे डॉ. ऑलिव्हिया जडसनचं ‘डॉ तात्यानाज् सेक्स अ‍ॅडव्हाईज टु ऑल क्रिएशन्स’. ऑलिव्हिया ही जीवशास्त्राची संशोधक आणि डॉ रिचर्ड डॉकिन्सची विद्यार्थिनी तिनं प्राणिजगताच्या सेक्शुअल प्रश्नांना उत्तर द्यायला एक पात्र निर्माण केलंय ती म्हणजे डॉ. तात्याना. ही डॉ. तात्याना म्हणजे प्राण्यांना ‘ताईचा सल्ला’ देणारी ताई आहे. कबूतरं, सिंह, हत्ती, डास, कोळी यांचे नर-मादी डॉ. तात्यानाला आपले सेक्सविषयक प्रश्न पाठवतात आणि डॉ. तात्याना त्यांना लीलया उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करते. त्या प्रश्नापाठीमागची जीवशास्त्रीय कारणपरंपरा उलगडून सांगते. भावनेच्या प्रदेशापलीकडचं शरीरसंबंधांच्या जीवशास्त्राचं दर्शन देणारं हे पुस्तक – सुरुवातीला थक्क करतं – मग हसवतं आणि तेच करतं, जे प्रत्येक ‘ज्ञान’वस्तू अगत्यानं प्रत्येक वेळी करते-- सार्‍या शरीरव्यवहाराकडे बघण्याची जीवशास्त्रीय तटस्थता ही डॉ. तात्याना आपल्यापर्यंत पोचवते. बेट्सी आणि धूर्तेच्या यादीतली ही ऑलिव्हिया मला दिवसेंदिवस आवडू लागली आहे. तिच्याकडे केवळ तरतरीत बुद्धी नाही – तर त्या पलीकडे आहे जगण्याकडे निखळ, शुद्ध शहाणणानं बघण्यासाठी आवश्यक स्वच्छ दृष्टी आणि संवादाची उत्कृष्ट अशी शैली!

तिचं पुस्तक वाचताना बायांना, बाप्यांना, बाया-बाप्ये नसलेल्यांना तपासताना आपण चष्मा पूर्ण नाही काढला तरी आपल्याला चष्मा आहे याचं भान येतं आणि नोहाच्या नौकेतल्या कित्येक शक्यतांची आपसूक संगतीही लागते. राजवाड्यांना उमगलेले विवाह संस्थेतले सांस्कृतिक हिशोबही तिच्या जीवशास्त्रीय ज्ञानाच्या उजेडात लख्ख दिसतात.

10 comments:

  1. ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वाचताना तुम्ही म्हणताय तसा चष्मा पुरता निघाला नाही तरी तो आहे याची लख्ख जाणीव झाली होती. हे ही वाचून बघेन आता.

    कालच तुमच्या ब्लॉगचा शोध लागला. सगळे लेख अधाशासारखे वाचून काढले. सगळेच अतिशय आवडले.

    ReplyDelete
  2. स्वाती- धन्यवाद! प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढतो. Wish to exchange and learn from you too. Warmest, Dnyanada

    ReplyDelete
  3. The name Tatyana sounds a lot like the name Dnyanada. Is this a coincidence ?

    ReplyDelete
  4. Ajit- Prerequisite for this coincidence to work a bit better is '‘ज्ञानोत्तर तटस्थपणा’ :)Working on it!

    ReplyDelete
  5. आता ही तात्याना कुठे आणि कधी वाचणार.. तुम्हीच जरा तिच्या सल्ल्यांची चार उदाहरणं देता का... शिवाय, ती उदाहरणं तुमच्या चष्म्यातून पाहायला आवडतीलच की.. आळशीपणाबद्दल क्षमस्व..

    ReplyDelete
  6. Have you read Desmond Morris ? ( 'Naked ape'; 'Intimate behavior'? )

    ReplyDelete
  7. सुंदर विषय, लेखन आवडले. साधारणपणे याच विषयावर मागच्या आठवड्यात एक The Bisexual Revolution नावाची डॉक्युमेंटरी पाहिली. त्यातल्या नॅरेटरच्या म्हणण्यानुसार म्हणण्यानुसार होमो आणि लेस्बीयन आणि हेटरो नात्यांपलिकडे आता एक बायसेक्शुअल समाज उभा राहतोय. यांना कसा विरोध करावा हे युरोपातल्या कर्मठ समाजांना समजत नाहीये. जग नैसर्गिकरीत्या बाय सेक्शुअलच आहे. पण काहींना त्याची जाणीव होते. काहींना सो कॉल्ड संस्कृतीच्या थापलेल्या जाणीवाच बर्‍या वाटतात. असे त्यातल्या एका प्राध्यापकाचे म्हणणे होते. असो, या ही पलीकडे जाणारा तुमचा लेख आवडला.

    त्या डॉक्युमेंटरीचा दुवा : http://www.europeimages.com/en/programmes/4821-bisexual-revolution/

    ReplyDelete
  8. तुम्ही व्यंकटेश माडगुळकरांची मुलगी आहात काय??
    काही वर्षे किशोर च्या संपादकान चे काम तुम्ही केले आहे का??

    ReplyDelete
  9. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  10. ज्ञानदा नाईक या किशोरच्या संपादक होत्या आणि व्यंकटेश माडगूळकरांची मुलगी देखील - ती मी नव्हे.

    ReplyDelete