बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यांतली नायिका फरक सांगते –प्रवासाबद्दलच्या धारणेचा.
‘मी इथं आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून नाही’ – आणि मग, टूरिस्ट सहप्रवासी मित्राच्या चेहेर्यावरचे भाव वाचून ती पुढे म्हणते –‘टूरिस्ट म्हणजे जो नव्या देशात येताक्षणी परत जाण्याची तारीख निश्चित करतो आणि ‘ट्रॅव्हलर’ला नव्या देशात आलं की परत जाण्याची आठवणही होत नाही. प्रवास हेच त्याचं सर्वस्व!’
पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे – टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण. मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. हनिमूनचे फोटो दाखवण्याचा मूर्ख अश्लीलपणा हे पण याच वर्गाचं लक्षण! जर अनुभवाला मनापासून सामोरं जायचं तर फोटो कोण काढील? दारू पीत त्या संबंधीची वर्णनं कोण सांगील? पण लग्नाच्या नात्यातला चार्म संपला की ‘आमची युरोपची टूर’ ‘आम्ही ठेक्कडीला गेलो होतो तेव्हा’ अशा गप्पा सुरू होतात – बकार्डी पीत पीत...
‘आठवडाभर मी ट्विट करणार नाही’ असं जाहीर करत राजदीप सरदेसाई नाही का कर्नाटकात भटकायला गेला आणि त्याची बायको सागरिका घोष लिहीत होती आठवडाभर जगाला ट्विट करत – नागरहोळे आणि काबिनी किती सुंदर आहे म्हणून! मनात आलं, “अगं माझ्या बायो, जर ते इतकं सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की. ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.
'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.
या पब्लिकचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते वाचण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना पु.ल. देशपांडे आवडतात आणि पन्नाशीत येता येता, त्यांना अनिल अवचट थोर वाटतात! जे असुंदर आहे त्याच्या डोळ्यांत डोळा घालून पाहायचं एकदा का भयापोटी नाकारलं की मग सर्व गोष्टिंना सरसहा चांगलं म्हणणारा पोस्टमेनॉपॉझल समाजवाद हीच काय ती बुडत्याची काडी!
ठाण्याच्या ‘मॅजेस्टिक’मध्ये पुस्तकांचे गठ्ठे पडले होते. भोचकपणे मी एक पुस्तक खेचून बाहेर काढलं – ‘पुण्याची अपूर्वाई’. बकाल पुण्यात राहणार्या बहुसंख्य पुणेकरांना अवचटांनी ही ‘अपूर्वाई’ सप्रेम दिली हे म्हणतानाच मला हसू फुटलं. पु.ल. म्हणजे ‘अपूर्वाई’साठी परदेशी जाणारे पहिल्या धारेचे समाजवादी कार्तिकेयस्वामी; तर अनिल अवचट म्हणजे दुसर्या धारेचे पुण्यालाच अपूर्व करून प्रदक्षिणेचं पुण्यं मिळवणारे पुणेरी गणपती!
पूर्वी वाचकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं होतं. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. ‘नाही आवडावं’ असं त्यांच्या लेखनात काही नाहीच. पण कंटाळा येण्यासारखं खूप काही आहे. त्यांचा दंभ किती मोहक आहे ? उगीच का वर्णी लागते कॉर्पोरेट आणि एन आर आय जगात त्यांची ? अनिल अवचट मला बोअर करतात. माझा राग अनिल अवचटांच्या लेखनावर नाही. राग येईल असं ते लिहीतच नाहीत, मुळी! पण त्यांच्या बिनमिठाच्या नॅरेटिव्हजनी मला सुपरकंटाळा येतो. इयत्ता आठवीपर्यंत मुलं किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो.
‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अॅडिक्टिव्ह. मध्यमवर्गीय माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणं रोम्यॅंटिक करून मांडायला हा लेखक जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.
माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात. ही पुरोगामी बाईची पुरुषाला पान्हा फोडायची ईर्षा अवचटांनी ताडून त्यांनी ‘लग्न’ या व्यवस्थेची जी पार्शल वर्णनं केलीत त्यांना मी (विनोबांच्या भाषेत) वाचाचौर्याचं लक्षण मानते. कारण तसं ‘लग्न’ वास्तवात असताना त्यात खिचडीसोबात इतर कोणकोणत्या गोष्टी आणि नावडते विनिमयदेखील असतात त्या असुंदर भागाबद्दल अवचट अवाक्षर लिहीत नाहीत.
अगदी रॅश उदाहरण द्यायचं तर लोकांच्या घऱची देखणी कुत्री मला आवडतात. पण मग त्या प्रत्येक कुत्रीच्या पाळीच्या काळात तिची काळजी कोण घेत असेल? किंवा त्या कुत्रीला मेटिंगसाठी कुठे न्यायचं? ते कोण ठरवत असेल अशा प्रश्नांनी मी भानावर येते आणि माझ्या पाळीव प्राणिप्रेमाची तात्कलिक नशा उतरते. कुत्री पाळणं किती मज्जेशीर आहे ते लिहिणं आणि पाळलेली कुत्री निभावणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्या निभावण्याच्या प्रक्रियेतलं सारं असुंदर वगळून जे जग अवचट तयार करतात त्यामुळे त्या सद्गुणी लेखनाचा एडिटेड भाग मला अधिकाधिक खुणावू लागतो.
अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!