Wednesday, June 15, 2011

माझाही नाममात्र करडा घोडा...






एम एफ हुसैन यांच्या निधनाला काही दिवस लोटल्यावर आता त्यांच्याबद्दल मनापासून लिहिता येईल. बालिश हिंदुत्ववादी (नेटकरी) आणि भांडवलशाहीचे पुरेपूर फायदे घेणारे लिबरल (विशेषतः मिडियातले) यांना हुसैन हे चित्रकार म्हणून आपलेसे वाटण्यापेक्षा त्यांच्या सामाजिक भूमिकेमुळेच उपयुक्त होते. भारतीय समाजात हुसैन यांचे एक सांस्कृतिक स्थान होतेच. त्याच सोबत त्यांनी निवडलेल्या अभिव्यक्तिमुळे ते स्थान वादग्रस्तही होते. या वादग्रस्ततेमुळेच हुसैन आयडिआलॉजिकली वादग्रस्त लोकांना आपलेसे वाटले यात नवल नाही. अजून जसजसा काळ जाईल तसे हुसैन यांच्याबद्दलचे आपले आकलनही बदलेल..किंबहुना ते अधिक स्पष्ट होईल. हुसैन यांच्या निधनानंतर का होईना आपण त्या साऱ्या प्रकरणातून काही शिकलो तर तर तेही नसे थोडके.

बजरंग दलानं केलेला हल्ला, नंतर गावोगावी हुसैन यांच्यावर टाकलेल्या कोर्टकेसेस आणि त्यानंतर त्यांचे एकूण वाढलेले परदेशी वास्तव्य, २००६ मध्ये त्यांनी स्वतःहून भारतातून निघून जाणं आणि कतारचं नागरिकत्व स्वीकारणं यामधील अत्यंतिक वेदना कुणाही संवेदनशील व्यक्तिमत्वाला जाणवू शकेल. शत्रूवरही ही वेळ येऊ नये.

१९९६ -- म्हणजे बाबरी मशीदवादोत्तर भारतात नवे-संस्कृतिरक्षक जन्माला आले. आणि दुर्दैवाने शासन त्यांना रोखण्यास अपयशी ठरले. हुसैन यांना जगात कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळलं असतं. रश्दींप्रमाणे संरक्षणही. २००६ मधलं जग बदललं होतं. बजरंगदलासारख्या अतिरेकी संघटनेच्या हिंसेचा परिणाम असा झाला कि हुसैन यांनी कतार या मुस्लीम देशाचं नागरिकत्व घेतलं. व्यक्तिचे व्यक्ती म्हणून असलेले हक्क आधुनिक शासन जेव्हा अबाधित राखू शकत नाही तेव्हा ती व्यक्ती शेवटी कोणत्यातरी गटाचा आधार घेते- ही भारतीय आधुनिक लोकशाहीची नामुष्की आहे. भारतीय शासनाला याचीही लाज वाटत नाही. सरतेशेवटी व्यक्तिला समूहशरण बनवणं ही फंडामेंटलिस्ट चाल आहे.
 
हुसैन जन्मानं मुस्लिम असूनही त्यांनी हिंदू देवदेवतांची चित्रं काढली म्हणून त्यांच्यावर भडकलेल्या हिन्दू वर्गाला जो त्रास होतो त्या त्रासाबद्दल माझ्या मनात सहानूभूती नाही. सेक्युलर समाजाचे सर्व फायदे उपभोगून पार्टटाईम-हिन्दू संवेदना बाळगणाऱ्या वर्गाला तो त्रास आवश्यकच आहे. इतिहासाचा, परंपरांचा आणि कलेचा कोणताही अभ्यास नसताना हाकनाक दुःखी होणाऱ्या लोकांना थोडं दुखलं तरी काही फरक पडत नाही. अनेक अभ्यासकांनी दाखल्यानिशी सीता आणि सरस्वतीचे संदर्भ दाखवून त्यांची नग्नता किंवा हुसैन यांची त्यावरची ईलस्ट्रेटिव्ह कॉमेंट यामुळे भावना दुखावणे कसे अप्रस्तुत आहे हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ( उत्सुकतेपोटी वाचकांनी सरस्वती-जन्माची कथा वाचून बघावी.) हिंदुत्ववाद्यांना हुसैन डाचतात यात नवल नाही. ते शुद्ध राजकारण आहे. शिवाय भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला इथल्या संस्कृतिवर भाष्यं करण्याचा आधिकार त्यांना नाकारायचा आहे. त्यामुळे हुसैन यांना मुस्लीम- अस्मितेत ढकलणं ही आवश्यक चाल आहे. मात्र या पलीकडे जाऊन एका मोठ्या भारतीय हिंदू आणि मुस्लीम समाजाला हुसैन यांच्या शैलीने प्रोव्होक केलं होतं याचं कारण मात्र शोधावसं वाटतं.

१९५२ मध्ये लोहियांनी हैद्राबादेत’ ’कालचक्र’ ( Wheel of History) या विषयावर सात व्याख्याने दिली. याच विषयावर हुसैन यांनी काढलेले चित्र लोहिया यांच्यावरील पुस्तकातही वापरण्यात आले आहे. त्या चित्राचे वर्ष आहे १९५२. लोहियांच्या व्यापक सामाजिक धारणांशी परिचय असणारे हुसैन मग बदलले कसे?


हुसैन यांच्या कारकिर्दीवर भाष्यं करताना पत्रकार जमात ( पक्षी राजदीप एटआल) हिरीरीने बोलते आणि चित्रकार जमात (पक्षी विवान सुन्दरम) अवरोधून. हा अवरोध केवळ स्पर्धेपोटी आलेला नाही. फ्रंटलाईन मध्ये विवान सुंदरम यांची हुसैनवरची मुलाखत वाचताना हे लक्षात येतं. विवान सुन्दरम यांनी हुसैन यांना 'उधळा जिप्सी' म्हटलंय. आणि त्यांच्या कलेकडे बघताना तिला ’अपूर्ण आधुनिकतेचा परिपाक’ असंही म्हटलंय. हुसैन जरी मॉडर्निस्ट पेंटर होते तरी आधुनिकतेची मूल्यं (पिकासोप्रमाणे) त्यांनी संपूर्णतः स्वीकारली नव्हती. याच अर्ध्या-आधुनिकतेच्या स्वीकारातून अनेक विरोधाभासांचा जन्म झाला होता असे सुन्दरम यांचे म्हणणे आहे. कलेच्या आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने ते तपासणे अगत्याचे आहे.
लोहियांच्या प्रभावाखालील मांडणीतून स्वतःची ईलस्ट्रेटिव्ह शैली शोधणारा हा चित्रकार controversy-प्रवण कसा झाला? हा प्रश्न उरतोच. आणिबाणिच्या काळात इंदिरा गांधींना सहानुभूती दाखवणारी चित्रंही हुसैन यांनी काढलेली आहेतंच. त्याचमुळे त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आणि संसदोपनिषद साकारलं गेलं असं प्रभाकर कोलते यांच्या लेखात आहे. हुसैनमधला असा आयडिऑलॉजिकल विरोधाभास अनेक पातळ्यांवरचा आहे. बहुजनांच्या मिथकांवर डिसरप्टिव्ह भाष्य करताना अभिजनवर्गाचं सदस्य अबाधित ठेवायचं हा ही त्यातलाच एक.

सत्ता- मग ती बॉलिवूडमधली प्रसिद्धिची असो किंवा राजकीय. हुसैन यांचा सत्तेवर लोभ होता. लोकेषणा ही त्यांची महत्वाची प्रेरणा होती. गायतोंड्यांबद्दल बोलताना हुसैन एकदा म्हणाले होते,"गायतोंडे चित्रकार आहेत -मी पॉप्युलर आहे." पॉप्युलर असणॆ हे बाय डिफॉल्ट वादग्रस्त असतेच. लोकेषणेचा मोह ज्यांना आहे त्या प्रत्येकाला डाव्यांनी अगर उजव्यांनी, वापरलेले किंवा हैराण केलेले आहेच. लोहिया ते इंदिरा असा सत्ताप्रवास, बहुजन ते अभिजन (या अभिजन असण्यामध्ये ठाकरे लीलावतीत असताना त्यांना फुले घेऊन जाणे इत्यादी सर्व येतेच) असा वर्गप्रवास आणि लोकेषणामोह त्यातून प्रसिद्धीमोह -- यात कलेला आवश्यक परखड आत्मपरीक्षण कुठे कमी पडत गेले का?

हुसैन यांच्या कलेवर सुन्दरम यांच फार सुंदर भाष्यं आहे. अंर्तमन ढवळून काढणारी, नेणिवांना सुरुंग लावणारी डिसरप्टीव्ह आर्ट खरी सूझांची होती. त्यासाठी सूझांनी त्यांची नेणीव, चरित्र हे कच्चा माल म्हणून वापरलं. (जे कवितेत मर्ढेकरांनी केलं आहे) बहुजन समूहमनाच्या नेणिवांना ढवळून काढताना हुसैन अलिप्त रहिले. त्यांनी चरित्रातून वाहणाऱ्या विरोधाभासांना ऐरणीवर आणलं नाही. या अनुषंगानेच हुसैन यांचे अपूर्ण आधुनिकतेचे प्रॉजेक्ट तपासावे लागेल. हुसैन यांच्या निधनानंतर या विरोधाभासांना तपासणे आणि सुलभीकरणाखेरीज त्यांची छाननी करणे आता आवश्यक आहे.