भविष्यकाळ हा शक्यतांचा प्रदेश असतो. अस्तित्वातच नसलेल्या काळामध्ये मराठी साहित्यविश्वात काय नवे पाहायला मिळेल, हा कितीही अभ्यासपूर्ण असला तरी कल्पनाविलासच. अनेकानेक मल्टिनॅशनल कंपन्या, राष्ट्रांची नियोजन मंडळे ‘सिनारिओ बिल्डिंग’ किंवा ‘ट्रेंड्स मॅपिंग’ करतात ते त्या बदलांना तयार राहाण्यासाठी किंवा त्या बदलांसाठी तरतूद करण्यासाठी. मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग करायचं ते कुणासाठी? एक कारण मला दिसतं ते म्हणजे आपली समकालीन संस्कृती नवनिर्मितीला पोषक नाही. काय झाले असता ती अधिक उमदी, सृजनशील होईल याचा विचार करण्यासाठी ही कल्पनाविलासाची संधी वापरता येईल. सद्यकालीन मराठी साहित्यविश्वाच्या दूरवस्थेकडे बघता पुढील पंचवीस वर्षांसाठी काही अपेक्षा तरी व्यक्त करता येतील. ‘काहीही बदलणार नाही’ हा टिपिकल मराठी निराशावाद टाळून काही शक्यता जोखता येतील.
साहित्यकृती ज्या वातावरणात जन्म घेते ते वातावरण पुढील पंचवीस वर्षांत कसे बदलेल? साहित्यकृती रसिकांपर्यंत ज्या माध्यमातून पोहोचते त्या प्रसारित होण्याच्या पद्धती बदलतील त्याचा परिणाम साहित्यविश्वावर होईल का? आणि आशय आणि घाटाच्या, म्हणजे साहित्यकृतीच्या रचनेवरच पुढच्या पंचवीस वर्षांत काही बदल घडून येतील का? अशा तीन भागांमध्ये या ‘बदलाच्या शक्यता’ आपण बघू शकतो.
समकालीन सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या साहित्यिकांसाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक आहे. परंतु सक्षम साहित्यनिर्मितीला पोषक हे वातावरण नाही. साहित्यविश्वात बोकाळलेला जातीयवाद, ‘पॉलिटिकली करेक्ट’ या बॅनरखाली डाव्या विचारांकडे झुकणारी दांभिक विचारसरणी, कथनी आणि करणीमध्ये योजनांचं अंतर ठेवण्याची वृत्ती, जातीय विचार केंद्रस्थानी ठेवून निर्माण होणाऱ्या संहिता आणि वाटली जाणारी बक्षिसे हे सारेच वातावरण छाडमाड साहित्यनिर्मितीच्या उपयोगाचे आहे.
मराठी साहित्यविश्वातला हा वाङ्मयीन मूल्यांवरील निष्ठेचा अभाव आणि दांभिकता पुढील पंचवीस वर्षांत कमी होईल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. पत्रकार कुळातील लेखक आणि समीक्षक होण्याच्या या काळात मराठी विश्वात मूलगामी परिवर्तनाची अपेक्षा पुढील पंचवीस वर्षांत ठेवता येईल का?
साहित्यकृतींच्या प्रसाराची माध्यमे बदलताना दिसत आहेत. ऑडिओबुक्स, बुकगंगा असा नवा प्रवाह हळूहळू रुजतो आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भाषेचे उथळ चलनवलन निश्चित वाढेल. मात्र गंभीर/उत्तम लेखनाला आवश्यक, ‘चिंतन आणि खोलीचा अभाव’ याच प्रवाहाबरोबर वाढेल असे लक्षण आहे. फेसबुक चर्चा, कादंबऱ्या, शोधनिबंध बघता सरकणाऱ्या फालतू टाईमलाईनवरचे लेखन कदाचित भरपूर उगवून येईल.
दुसरीकडे कॉपीराईट शहाणे-टाईप कृतीतून नवी आर्थिक समीकरणेही उदयाला येतील. लेख समाविष्ट केल्यावर किंवा कादंबरी छापल्यावर लेखकांना ‘न मागता’ पैसे देण्याची अक्कल प्रकाशकांना पुढील पंचवीस वर्षांत आली तर ‘पावले’ असे म्हणावे लागेल. जर प्रथम दर्जाचे लेखन, विशेषतः कथनात्म सकस साहित्य येत्या पंचवीस वर्षांत वाढले तर ‘प्रकाशक-लेखक’ नात्यातील प्रकाशकीय दादागिरी काही प्रमाणात आटोक्यात येईल. दिवाळी अंक, पुरस्कार, प्राध्यापकीय नोकऱ्या, कॉर्पोरेट कंटाळ्यावर उपाय, राजकारण्यांकडून पैसे वा मान उधार घेऊन उपकार परतफेड करण्यासाठी आजकाल कथात्म अथवा समीक्षात्मक साहित्याचा वापर होतो. या समकालीन ‘चाटू’ संस्कृतीला उद्ध्वस्त करणारं लेखन पुढील पंचवीस वर्षांत जन्माला येईल काय?
प्रत्येक साहित्यिक आणि समीक्षक विविध कळपांच्या दगडाखाली हात असल्यामुळे ‘क्षीण विरोध’ करत फेसबुकी नोंदी करतात. साहित्यिकदृष्ट्या अत्यंत भ्रष्ट साहित्य संमेलने, अध्यक्षांच्या निवडीचं राजकारण, दुय्यम गुणवत्तेच्या अध्यक्षांची निवड यामध्ये पुढील पंचवीस वर्षांत बदल व्हायला हवा, मात्र या बदलाची सुरुवात होईल कुठून?
आशय किंवा घाटाचे प्रयोग हे कालसापेक्ष नाहीत. ते लेखक आणि कवीच्या ऊर्जासापेक्ष आहेत. म्हणजे काय? तर पंचवीस वर्षांचा काळ, त्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रोमोझोमल बदल- कंद मनुष्यपणा बदलत नाहीत. त्या बदलांमुळे न लिहिणारे समूह, व्यक्ती लिहिते होतात- मात्र आशयात आणि घाटात खरी क्रांती होते ती लेखकाच्या तपश्चर्येतून.
एक आशा अशी आहे की भारतात नव्यानं येणारा पैसा, ग्लोबल संधी यामुळे लिहित्या व्यक्तीला चरितार्थासाठीचा पैसा कमावण्यासाठी विविध साधने उपलब्ध होतील यातून कदाचित लेखकाचे स्वातंत्र्य वाढेल, मिंधेपणा कमी होईल.
सद्यकाळात धरठावाचा अभाव आणि पुनर्लेखनाच्या शिस्तीचा अभाव यामुळे कादंबरीसारखं दिसणारं परंतु कादंबरीच्या पातळीला न पोहोचलेलं लेखन बजबजलेलं आहे. पुढील पंचवीस वर्षांत काही भागातल्या समाजकारणाच्या बदलांमुळे मन लावून लिहिणे, गद्याचा सखोल विचार करून, त्यावर संस्करण करून ते प्रकाशित करणे यासाठी आवश्यक नैतिकतेचा आणि धीराचा जन्म पुढील पंचवीस वर्षांत कदाचित पहावयास मिळेल.
अशी एक आशा आहे की साहित्य अकादमी असो किंवा गावोगावचे छडमाड पुरस्कार, ते तुम्हाला लेखक बनवत नाहीत. तर समकालीन लेखक म्हणून मिळणारी पुरस्कारग्रस्त प्रसिद्धी ही मोठ्या मापाच्या चड्डीसारखी आपसूक घरंगळणारी वस्तू आहे हे कळल्यानंतर समकालीन बऱ्या लेखकांना भान येईल. पुरस्कार आणि कळप यांना फाट्यावर मारून लेखक म्हणून आपण एक निश्चित भूमी मिळवू शकतो हा खरा, अस्सल देशीवाद पुढील पंचवीस वर्षांत जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेची भूमी सकस आहे परंतु इथं ‘सनदी शेतकरी’ ‘हजारातुनी एखादाही’ दिसत नाही हे दुर्दैव.
शब्दातील, भाषेतील, विचारातील ताकद- ते शब्द, ती भाषा ते विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या सच्चेपणावर, तिच्या मूल्यनिष्ठांवर, विसंगती टिपू शकणाऱ्या तिच्या बुद्धिमत्तेवर, माणूस म्हणून जाणू शकणाऱ्या तिच्या करुणेवर आणि तिने स्वीकारलेल्या लेखनमार्गावरील प्रवासातल्या अथक एकल्या श्रमांवर अवलंबून आहे.
समकालीन संस्कृतीतला साहित्यिक प्रभावहीन आहे. या परिस्थितीची तरफ उलटवायची तर आशयाच्या नवनवीन प्रयोगातून वाचनीय (रंजक नव्हे) साहित्याची निर्मिती ही एकमेव गोष्ट लेखकाला प्रभाव क्षेत्राच्या केंद्राकडे घेऊन जाईल. त्या प्रक्रियेची सुरुवात कळपाचा आपल्या आतल्या समाधानाला शून्य उपयोग होतो या मूलभूत भानातून होईल अशी आशा मला आहे.
शेवटचा मुद्दा असा की, पुढील पंचवीस वर्षांत ज्या सावल्यांच्या आधारानं मराठी साहित्यसंस्कृती डौलानं उभी राहिली ते वटवृक्ष पृथ्वीतलावर नसतीलही- नेमाडे यांचं राजकारण वजावूनही उरणारी लेखनावरची प्रचंड निष्ठा, हेतूची सुस्पष्टता, फॉर्मचं अत्यंत नेमस्त भान, श्याम मनोहरांचा ज्ञानमार्गी वज्रपंथ, प्रयोग करण्याची आणि मांडण्याची प्रचंड क्षमता आणि त्यासाठी आवश्यक तपश्चर्या, नामदेव ढसाळांच्या (राजकीय आणि सामाजिक घटिया तडजोडी वगळता) प्रचंड ताकदीचं कवितेच्या ऊर्जेचं बळ याचा वारसा पुढे नेईल असे लेखनकर्मी पुढील पंचवीस वर्षांत तयार होतील का? तसं होण्यासाठी या समकालीन सभ्यतेतल्या कोंडमाऱ्याचं आकलन आपल्याला करून घ्यावं लागेल, त्यावर उपाय शोधावे लागतील.
राजकारणाला हाताशी धरून नेमाडे यांनी त्यांच्या प्रातिभ बळावर त्यांच्यापुरते उपाय काढले, श्याम मनोहरांनी ‘बेबी युनिव्हर्स’चे प्रयोग करत तुसडेपणानं स्वतःचा मार्ग शोधला- मात्र पुढील पंचवीस वर्षांत प्रथम दर्जाच्या निर्मितीक्षमतेवर सतत दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या कळपांचा विजय याचं गणित भेदून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का?
यातल्या प्रवासातच नव्या वाचकाशी अधिक सत्य नातं निर्माण होण्याची बीजं रुजत जातील. सुरुवातीचे मर्ढेकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक यासारख्या कवींनी केलेला भाषेचा, तत्त्वज्ञानाचा लवचिक वापर, नव्या रुपकांची निर्मिती समकालीन कवितेत दिसत नाही. अरुण कोलटकरांसारख्या कवितांसाठी आवश्यक एकांतऊर्जा पुढील पंचवीस वर्षांत कवींकडे एकवटेल काय? या खरा प्रश्न आहे.
लेखनात, कथात्म साहित्यात समाज बदलण्याची ताकद असते मात्र त्याची पूर्वअट म्हणजे साहित्यिकांची डोकी आणि हृदयं जागच्याजागी लागतात.
उत्तर-भांडवलशाहीत मास (लोंढा) याऐवजी ट्राईब (छोटा एकजिनसी बुद्धिमान समूह) सर्व मार्केटिंग संकल्पनांच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. ब्रुस नुसब्राऊमे ‘क्रिएटिव्ह इंटेलिजन्स’ किंवा टॉम केलीचे ‘क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स’ ही दोन पुस्तके व्यावसायिक क्षेत्रातील सृजनशीलतेची महत्ता अधोरेखित करतात.
या वातावरणात पुढील पंचवीस वर्षांत मराठीतील लिहिती, विचार करती, वाचती व्यक्ती क्षुद्र राजकारणापलीकडे छलांग मारू शकली तर मराठी साहित्यात नवीन निर्मला पुतुल, नवा मार्खेज, नवा मुराकामी, नवा चक्रधर, नवा मर्ढेकर- नवा नवा साहित्यिक, पहिल्या धारेचा आणि ओरिजिनल जन्माला नक्कीच येऊ शकेल! (जन्माला आला असेल तर संस्कृतीच्या केंद्रस्थानी येऊन प्रभावही टाकू शकेल हे निश्चित!)
---
(प्रथम प्रसिद्धी चित्रलेखा साप्ताहिक)