Monday, August 9, 2010

भयकारी कल्पनेची कल्पना

प्रत्येक चांगलं वाचणा-या माणसाला काही लेखकांची स्टेशनं लागतातंच. जसा दस्तयावस्की किंवा जेम्स बाल्डविन. तसं इंटरनेट सर्फिंग करताना काही वेबसाईट्स प्रत्येक जिज्ञासू सर्फरला भेटतातंच. तुम्ही कोणत्या साईटसना भेट देता यावरून तुमच्या विचारसरणीचा, इझम्सच्या पगडयाचा, त्यातून बाहेर पडायच्या धडपडीचा किंवा कमिटमेंट फोबियाच्या पलीकडे- 'आहे मी लिबरल आणि आवडतात मला वेगवेगळया वादातल्या गोष्टी' या वृत्तीचा अंदाज येतो. माझ्या एका जिज्ञासू मित्रानं माझं नवीन गोष्टी वाचण्याच्या भुकेचं लक्षण हेरून बरेच वर्षांपूर्वी एका वेबसाईटशी माझा परिचय करून दिला- ती होती www.edge.org . स्लेट, सलॉन, अटलांटिक , NPR च्या जोडीने एज ची नेट- भेट त्याच्यामुळे सवयीची झाली.
स्टिव्हन पिंकर, नासिम तालेब, मॅट रिडले, रिचर्ड डॉकिन्स यांसारखे लेखक 'एज'वर आपल्या लेखनाची, कल्पनांची चिकित्सा करतात आणि त्यांच्या 'एज'वरच्या चर्चा या अकलेला खुराक देतात हे माझ्या तात्काळ लक्षात आलं. कित्येकदा या चर्चा डोक्यावरून गेल्या तरी त्या आवडू लागल्या. या वेबसाईटचा संपादक जॉन ब्रोकमन यानं 'एज'वर अनेक वाद-विवाद, उपक्रम राबवले आणि यातील काही चर्चांची नंतर पुस्तक स्वरूपात निर्मिती केली. या लेखकांमध्ये प्रचंड ज्ञानपिपासा आहे. त्यामुळे इझमच्या वादापलीकडे जाऊन, शास्त्रीय विश्लेषण पध्दतीने विविध सामाजिक आणि शास्त्रीय विषयांचा ऊहापोह 'एज'वर गेल्या दहा वर्षांत माझ्या वाचनात आला. 'एज'वरचं लेखन डाव्या किंवा आंधळया उजव्या वादांपलीकडचं असल्यामुळं सुरुवातीच्या काळात त्यांनी एक संकल्पना मांडली- थर्ड कल्चर. या थर्ड कल्चरमधल्या अनेक लेखनाशी मनोमन वाद घालत कधी आवडीनं मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत 'एज'वरचे अनेक प्रकल्प चवीनं वाचले. ('एज' लेखनाचा प्रतिवाद करताना माझ्या एका अतिहुशार मैत्रिणीनं ’ क्लिफ़’ नावाचा 'एज'मधल्या विचारांची समीक्षा करणारा गटही मग स्थापन केला."एज’वर वाचायचं आणि ’क्लिफ’ वर वाद घालायचे, अधिक समजून घ्यायचं हे ठरून गेलं.)
जॉन ब्रोकमन या 'एज'च्या संपादकानं दरवर्षी या वेबसाईटसाठी एक प्रकल्प राबवला. तो म्हणजे एका विशिष्ठ कल्पनेला विविध क्षेत्रातील बुध्दीमंतांचा काय प्रतिसाद आहे याचं एक संकलन त्यांनी वेबसाईटवर मांडलं आणि नंतर पुस्तक रूपानं ते छापलंही.
पहिल्या वर्षीचं संकलन होतं, 'व्हॉट वी बिलीव्ह बट कॅनॉट प्रूव्ह' म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्यावर आमची श्रध्दा/विश्वास आहे पण त्या सिध्द करता येत नाहीत. तेंडुलकरांची 'नियती' ही संकल्पना घेतली उदाहरणार्थ तर तशा विविध संकल्पनांचा उहापोह जगभरातल्या विविध विषयातल्या तज्ज्ञांनी केला. त्यांच्या आतापर्यंत सिध्द न झालेल्या अशा संकल्पना त्यांनी 'एज'वर मांडल्या होत्या. या अत्यंत लक्षवेधी उपक्रमानंतर दुस-या वर्षी माझ्यासारख्या अनेक पाकोळयांनी 'एज'वर कोणता प्रश्न असेल याची वाट पाहिली... आणि नंतरचा प्रश्न अधिक फॅसिनेटिंग होता. 'व्हॉट इज युअर डेंजरस आयडिया?' मनात उमटणा-या भयकारी कल्पना मांडायला त्यांनी जगभरातल्या 108 विद्वानांना पाचारण केलं होतं. भयंकर कल्पनांचं हे संकलन हे माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे.
आपले विचार, कल्पना, नवीन संकल्पना जिथून जन्म घेतात अशा पारंपरिक इझम्सनी वेढलेल्या विचार व्यूहापलीकडे जाऊन ज्ञात/अज्ञात/अज्ञेयाच्या कसोटयांवर घासून 'डेंजरस आयडिया' मांडणारे लेखक मला आवडले आणि ही कल्पना राबवणारा संपादक त्याहून महत्त्वाचा वाटला. 'एज' या वेबसाईटने पूर्वी 'पुढील पन्नास वर्षे' या विषयावरचे लेखनही संकलीत केले आहे. मात्र त्या संकल्पनेपेक्षा 'डेंजरस आयडिया' मला अधिक भावली. यातल्या सर्व 'आयडिया' चांगल्या/पॉझिटिव्ह/मानवसमूहाला हितकारक/चॅरिटेबल अशा नाहीत. काही कल्पना अतिशय वादग्रस्त किंवा अंगावर काटा आणणा-या आहेत. उदाहरणार्थ स्टिव्हन पिंकरची कल्पना - जेनेटिक छापानुसार मानवीय गटांमध्ये त्यांची बुध्दी आणि मनोवृत्ती यात फरक असणार ही अंगावर काटा आणणारी आहे. सर्व मानवीय समूहांमध्ये अतितीव्र बुध्दीमत्ता किंवा संवेदनशील असण्याच्या शक्यता समप्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे मानवतावादी मूल्यं- तर त्यालाच सुरूंग लावणारी ही स्टिव्हन पिंकरची- जेनेटिक छापानुसार बौध्दिक कुवत आणि मनोवृत्ती गटागटात विषम प्रमाणात वाटल्या गेल्या आहेत हे सिद्ध होईल ही कल्पना वादग्रस्त म्हणून अधिक खोलात विचार करायला लावणारी आहे.
यात डॅनियल हिलीसनं ही 'डेंजरस आयडिया' एकमेकांना उघडपणे सांगण्याची कल्पनाच 'भयप्रद' असल्याचं नोंदवलंय तर दुसरीकडं डॅनियल गिल्बर्टनं आयडिया ’डेंजर" असू शकतात' ही संकल्पनाच 'डेंजरस' आहे असं मत मांडलंय. हे पुस्तक हातात आलं की त्याच्याशी वाद घालत घालतच वाचून संपतं आणि नंतर पुस्तकांच्या कपाटात हाताशी येईल अशा अंतरावर राहतं.
जे कृष्णमूर्तींच्या एका संवादामध्ये रूपर्ट शेल्ड्रेक हे नाव भेटलं होतं. फिजिक्सचे अभ्यासक डेव्हिड बोहम आणि जीवशास्त्रज्ञ रूपर्ट शेल्ड्रेक यांच्या कृष्णमूर्तीं बरोबरच्या संवादांनी माझ्या मनावर ठसा उमटवला होता. शेल्ड्रेक यांची एक डेंजरस कल्पना या पुस्तकामध्ये आहे. 'कबुतरं आपापल्या घरटयात परत कशी येतात?' या अतिशय सोप्या प्रश्नातून सुरुवात करून प्राणी आपले मार्ग/दिशा निश्चित कशी करतात आणि त्या आकलनाकडे विज्ञान जगताचं त्यांच्या मर्यादांमुळे होणारं अक्षम्य दुर्लक्ष यामुळॆ होणारं अपरिमित नुकसान यावर शेल्ड्रेक यांनी विवेचन केलंय. 'थर्ड कल्चर'च्या या वाचनानं माझ्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभी केली. असे रोबस्ट प्रश्न घेऊन आम्ही का खोल पाण्यात उडया घेत नाही ?असं वाटून मन खंतावलंदेखील.
ऍन सायलरनं या 'एज'ला प्रत्युत्तर म्हणून 'क्लिफ' हा गट सुरू केला होता. 'एज' म्हणजे कडयाचं टोक तर क्लिफ म्हणजे 'दरी' म्हणून तिच्या प्रतिक्रियेचं नाव क्लिफ. तिनं मला एकदा विचारलं होतं, की तुझी डेंजरस आयडिया काय आहे? पुस्तकाची इतकी पारायणं झाली होती की ऍनचा प्रश्न मला सुरुवातीला साधा-सोप्पा वाटला. खूप डेंजरस आयडिया माझ्या मनात असतील असं मला वाटत होतं. पण जसजशा तिला मी माझ्या कल्पना सांगू लागले तस तसं प्रत्येकवेळी ती हसून, 'ज्ञानदा, तू सांगतीएस तो युटोपिआ आहे त्यात भयकारी असं काही नाही.' असं माझ्या प्रत्येक कल्पनेला म्हणत राहिली.
'युध्द' बेकायदेशीर ठरतील, प्रत्येक भारतीय तथाकथित उच्चवर्णीय हा जातीय सरमिसळीतून बनलाय हे सत्य जेनेटिकली सामोरं येईल, सामाजिक शब्दकोषातून 'अनौरस', 'व्यभिचार', 'लग्न' असे शब्द नामशेष होऊन त्या जागी - ’अस्तित्वात असलेल्या कायदेशीर सोयी सवलती धुडकावून जन्माला आलेलं मूल’ किंवा’ ’ अर्थिक स्थिरतेसाठी तगवलेली लग्न नावाची गंजकी व्यवस्था मोडून दुसरी व्यवस्था समान्तरपणॆ चालवणारे नाते' किंवा 'सामाजिक सोयीसाठी आणि मुलांसाठी तगवलेली आर्थिक तडजोड' असे नवे वर्णन लागू होईल अशी माझी दिवास्वप्नं मी 'ऍन'ला 'डेंजरस आयडिया' म्हणून ऐकवली. तल्लख ऍननं अर्थातच सा-या माझ्या कल्पनंमध्ये 'डेंजरस' असं काहीच नाही हे दाखवून दिलं. शक्यता, विशफुल थिंकिंग या पलीकडे 'डेंजरस आयडीयेचं' क्षेत्र सुरू होतं हे मग माझ्या ध्यानात आलं. 'कर्मफळ सिध्दांतांचं फुल ऍण्ड फायनल शास्त्रीय ब्रेकडाऊन' अशी एक कल्पना मग मी तिला ऐकवली. ती कल्पना मात्र मला खरोखरच दक्षिण आशियाई मनाचं ब्रेकडाऊन करणारी भयावह कल्पना वाटते. अ‍ॅनच्या परीक्षेत ती कल्पना काठावर पास झाली.
जॉन ब्रॅकमननं संपादित केलेल्या 'डेंजरस कल्पना' अतिशय वेचक आहेत. पुस्तकाच्या शेवटी रिचर्ड डॉकिन्सनं या कल्पनांचं विश्लेषण केलंय. जगाच्या अंताबद्दल, कयामती बद्दल भाष्य करणा-या (माझ्या कर्मफळ सिध्दांत याच पठडीतला) आणि त्या अनुषंगाने सामाजिक चिंतन करणा-या 24, मन/सायकॉलॉजी यावर चिंतन करणा-या 20, राजकारण आणि अर्थकारणाबद्दलच्या 14 आणि मग धर्मकल्पना, आणि इतर या संकल्पनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या कल्पना मिळून 108 कल्पना या पुस्तकात मांडल्या आहेत. डॉकिन्सचं विश्लेषण मूळातूनच वाचण्यासारखं आहे. अनेकदा माणसाचा विचर आपण यांत्रिक पद्धतीने करतो मात्र तोंडदेखलेपणॆ जेनेटीक पद्धतीने माणसं निर्माण करण्याला विरोध करतो- या पाठिमागे आपल्या कोणत्या तृष्णा आहेत? हा डॉकिन्सचा प्रश्न महत्वाचा वाटला. आपला सारा विचार किती संस्कृती केंद्री, मानव केंद्री आहे हे तत्क्षणी जाणवलं.
भयकारी कल्पनांची गुंफण ही मानवी नैतिकतेला केंद्रस्थानी मानून त्याभोवती झाली आहे याचं डॉकिन्सनं विश्लेषण केलं आहे. माणूस म्हणून जगताना 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' हे मांडताना सारा विचार कसा मनुष्यकेंद्री होतो याकडे डॉकिन्स निर्देश करतो. उत्क्रन्तीची प्रक्रिया मात्र मनुष्यकेन्द्री नाही हे तो स्पष्ट करतो.
अशा धक्का देणाऱ्या कल्पना शास्त्रीय संशोधन पुढे नेतील असा ’एज’ वाल्यांचा विश्वास आहे. वरवरून पाहता 'डेंजरस आयडिया' आकर्षक, सहज सुचेल असं शिवधनुष्य वाटते. मग विचार करताना लक्षात येतं की खरी जिवंत, सळसळती डेंजरस कल्पना मनाच्या पटलावर जन्माला येणं यासाठी साधना हवी. तरच ते 'दर्शन' शक्य आहे. असं दर्शन ज्यामुळे भविष्यातील विज्ञानाची दिशा बदलेल. येरा गबाळयाचे ते काम नोहे

बाप रखुमादेवीवरू

आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं सारं चित्त पंढरीच्या वाटेवर चालणा-या, जगाच्या कानाकोप-यांतून आलेल्या पावलांची, मनांची, काळजी घेण्यात- त्यांच्या आर्ततेची संगती लावण्यात, त्यांना त्यांच्या मुळापर्यंत पोचवण्यात लागलं असणार... त्या काळात त्याला वामांगीकडं लक्ष द्यायलाही फुरसत नसते तर माझ्यासारख्या कन्फ्युज्ड जिवांची काय कथा? या वारीनं, या विठूनं, त्याच्या गजरानं न भारावलेला माणूस माझ्या परिचयाचा नाही. महाराष्ट्राच्या गुणसूत्रातच हा विठुराया स्थानापन्न झालेला आहे. असं काय आहे या त्याच्या भेटीत?
दिलीप चित्रे यांना एकदा वारी पुण्यात यायच्या दिवशी मी भेटले होते. तेव्हाचं चित्र्यांचं वाक्य माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते, की या वारीकडे संस्कृतीचं 'क्रॉस पॉलिनेशन' असं बघावं लागेल. वेगवेगळ्या भागांतून येणारी भक्तमंडळी इथं उराउरी भेटतात, गाणी गातात, दंग होतात आणि नवनव्या कल्पनांची देवाण-घेवाण करतात, इथं नवी संस्कृती जन्माला येते.
प्रत्येकानं आपापला मोक्ष स्वत: मिळवायचा ही या भूमीची परंपरा... पण अशा भक्ति मार्गावर एकमेकांना भेटून एकत्र पायवाट चालायची हे वारीचं इनोव्हेशन.
माझे गुरुजी जेम्स फोर्ड यांचा 'आयकॉन्स' नावाचा सेमिनार मी अटेण्ड करायचे. काय होतं या 'आयकॉन्स'च्या सेमिनारमध्ये? तर देशोदेशीचे आम्ही विद्यार्थी त्यात आपापल्या संस्कृतींतल्या 'चिन्हं, मूर्ती, प्रतिमा आणि मूर्तींचा अभाव' या विषयावर चर्चा करायचो. प्रोफेसर फोर्ड हे जपानमधील बौध्दधर्माचे प्राध्यापक. ते हा सेमिनार मॉडरेट करायचे - आम्हाला शिकवायचे. या सेमिनारमध्ये माझा ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या आयकॉन्सशी परिचय झाला, तर माझ्या आफ्रिकन मित्रानं मूर्त स्वरूपात परमेश्वराचं नसणं या इस्लामिक संकल्पनेचा आणि नायजेरमधल्या त्याच्या संस्कृतीचा अन्वय लावून दाखवला. डो डॉटरी या माझ्या अमेरिकन वर्गमैत्रिणीनं मॉर्मन चर्चमधल्या प्रतिमांतून नाहीशा होत गेलेल्या 'होली मदर'चं चित्र आमच्यासमोर मांडलं. प्रत्येक संस्कृतीनं आपापल्या दृश्य जाणिवांसकट आपापल्या विश्वातला परमेश्वर घडवला होता, हे आमच्या ध्यानात येऊ लागलं आणि त्यातून संस्कृतीच्या सब- कॉन्शस निरगाठी प्रत्येक समूह कशा सोडवितो ते लक्षात येण्यास सुरुवात झाली.
फोर्ड गुरूजींनी या सा-या सेमिनारची सुरुवात केली होती ती त्यांच्या अमिदा बुध्दाच्या कथेनं. एका गावातील अमिदा बुध्दाची मूर्ती त्याच्या भक्ताला दृष्टांत देते. अतीव भक्तीच्या टोकावर भक्ताच्या गालावर चटका बसतो आणि तो डाग त्या बुध्दाच्या मूर्तीवर उमटतो असं या कथेचं मूळ बीज. फोर्ड गुरूजींचं यावर एक मूलभूत विश्लेषण होतं. त्यांच्या मते, स्वर्गात किंवा ब्रह्मलोकात बुध्द आहे आणि त्याची 'मूर्ती' म्हणजे हा अमिदा बुध्द अशी या जपानी परंपरेत धारणा नाही तर ती मूर्ती म्हणजेच तो अमिदा बुध्द अशी त्यांची धारणा आहे. म्हणून भक्तांच्या स्वप्नात- चालता- बोलता मनुष्यमापातला असा अमिदाबुध्द येत नाही तर ती मूर्ती- म्हणजे 'तोच' येतो. फोर्ड गुरूजींचं प्रवचन ऐकणं हा भाग्ययोगच. त्यांच्या या 'मूर्ती हेच देवाचं असणं' या विषयानं मात्र मला जागं केलं. मला जाणवलं, की विठोबासुध्दा असा आपल्या स्वप्नात कर कटावर ठेवूनच येतो. ‘संत सखू’ सिनेमात सखूला सोडवायला कर कटावर ठेवलेला चार फुटी 'मूर्ती विठोबा' ऊर्फ खरा विठोबा येतो. आपणही विठोबाकडे स्वर्गात, क्षीरसागरात कुठेतरी आनंदात राहणा-या ओरिजनल विठोबाची पंढरपूरची प्रतिकृती असं न बघता- हाच तो नाम्याचं जेवण जेवणारा विठुराया, हाच-ज्यानं जनीचे केस विंचरले, हाच- ज्यानं तुकोबाला दर्शन दिलं, हाच-ज्यानं दामाजी पंतांची सुटका केली, हाच-तो समचरण, साजिरा विठोबा असं त्याच्याकडे बघतो. फोर्ड गुरूजींना मी जेव्हा रा. चिं. ढे-यांचं माढ्याची मूळ विठोबा मूर्ती आणि ही नवी मूर्ती यांबाबतचं संशोधन ऐकवलं तेव्हा माझ्या सेमिनार पेपरमध्ये अजून भर पडली. भक्तांना 'मूर्ती'पलीकडचा विठोबाही दिसतो. मूळ मूर्ती कुठेही गेली तरी ज्या मूर्तीत आपण भाव जडवला, जीव गुंतवला तीच मूर्ती; नव्हे, तोच विठोबा आम्हाला खरा विठोबा वाटतो... नव्हे, तोच खरा विठोबा असतो.
याच फोर्ड गुरूजींच्या वर्गात आम्हा सर्वांच्या लक्षात अजून एक गोंधळ येऊ लागला. तो म्हणजे इंग्रजी भाषेच्या मर्यादेचा. आता, विठोबाला काय म्हणायचं? गॉड- तर तो गॉड या अब्राहमिक धर्मातल्या
( अब्राहम ज्यांचा मूळपुरुष आहे असे धर्म - म्हणजे ज्यू , इस्लाम आणि ख्रिश्चन ) 'गॉड'पेक्षा निराळा आहे. पंढरपुरातल्या विठोबाला आपण 'मूर्ती' म्हणू शकत नाही, तो प्रतिमा नाही, तो विठ्ठलाची प्रतिकृती नाही- तो शंभर टक्के ओरिजिनल विठ्ठल आहे. या साजि-या ध्यानाचं वर्णन करायला इंग्रजी भाषा तोकडी आहे याचं ज्ञान झालं. त्याचबरोबर गॉड, रिलिजन, सेक्रेड, फेथ, ग्रेस, बेनेव्हलन्स या सर्व शब्दांना अभिप्रेत ख्रिश्चन धर्मकल्पनेचा संदर्भ सतत नजरेसमोर येऊ लागला. 'गॉड' या शब्दात अभिप्रेत असलेला परमेश्वर वाळवंटात कुत्र्याचं रूप घेऊन, प्रकट होऊन धावत नव्हता किंवा त्याच्या पाठीमागे नामदेव तूप घेऊन धावत नव्हते. 'गॉड' या कल्पनेला सर्वात्मक परमेश्वर श्रीखंड्या होऊन एकनाथांच्या घरी व्रात्यपणा पण करणारा नव्हता. प्रत्येक संस्कृतीनं आपल्या कॉस्मॉलॉजीत, आपल्या असण्यात, आपल्या माणूसपणाच्या सीमा जाणण्यात त्या पलीकडे स्थित असणा-या 'परमेश्वराचं' एक रुपडं ठरवलं होतं. आणि ते रूप त्याच्या भाषेशी निगडित होतं.
माझा चीनमधल्या चर्चमध्ये काम करणारा एक वर्गमित्र मोठ्ठे डोळे करून म्हणाला, तुमच्याकडे तीन प्रकारचे देव आहेत. देवांचा एक गट आपल्या गावाला राहतात आणि त्यांना भेटायला त्यांच्या घरी तुम्ही जाता. विठोबा, तिरूपती, काशी विश्वेश्वर किंवा जेजुरीचा खंडेराया. दुसरे देव आहेत ते पाहुणे बनून तुमच्या घरी येतात- नवरात्रातली देवी किंवा गणपती. आणि तिसरे देव- तुमच्या घरात राहतात. ज्यांची तुम्ही घरातच पूजा करता. त्याचं वर्णन काही अंशी बरोबर होतं. पण या तीन प्रकारापलीकडे कधी झाडात, कधी गावाच्या सीमेवर, कधी पाण्यात, नदीत, तळयात, भक्तांच्या हृदयात प्रकट झालेले देव आहेत असं त्याला सांगावंसं वाटलं. मग जाणवलं की या भारतीय भूमीत चराचरात परमेश्वराचं रूप दडलंय असं म्हणतात. हे या भूमीतलं अद्वैती नातेसंबंधानं बांधलेलं विश्व आहे. अरुण कोलटकरांच्या 'जेजुरी' त नाही का अशा 'दगडात देव शोधणा-या माणसांचं' जग आहे.
मग मला आमच्या पुण्याच्या घरातलं देवघर आठवलं. काकाला घरी यायला उशीर झाला की बाळकृष्णाला पाण्यात बुडवणारी आजी आठवली. किंवा खंडोबाच्या नवरात्रात वडे तळणारा तिचा गोरा गोरा चेहेरा समोर आला... या 'देव' कॅटॅगरीत काकूच्या अन्नपूर्णेपासून बरीच 'देवमाणसं' देवघरात बसायची. माझा लाडका विठोबा घरच्या देवघरात रुक्मिणीसमवेत उभा राहायचा हे देखील आठवलं. माझ्या लाल अलवणातल्या आजीची जगण्याची घुसमट वारी त्याच्या डोळ्यादेखत घडत होती- ते ही.
ढे-यांच्या ‘महासमन्वया’नं या विठोबाचं कित्येक पिढ्यांना, अवतारांना, कल्पनांना पोटात घेऊ शकणारं रूप सामोरं आणलं. जैन, बौध्द परंपरांपासून ते तुकोबांच्या गाथेतल्या अल्लाच्या अभंगांपर्यंत विठुरायाची सांस्कृतिक व्याप्ती पसरलेली आहे हे लक्षात आलं. चार्ल्स साँडर्स पर्स नावाच्या एका तत्त्वज्ञानं चिन्ह जगाचं तत्त्वज्ञान मांडलंय. तो तीन प्रकारच्या चिन्हांचं विश्लेषण करतो. आयकॉन- म्हणजे जी गोष्ट निर्देशित करायची त्याचं छोटं रूप, इंडेक्स- म्हणजे त्या गोष्टीचं निर्देशन होईल अशी सूचक गोष्ट आणि सिम्बॉल-म्हणजे त्या वस्तूला दिलेली विवक्षित खूण. चिन्हांची ही सारी व्यवस्था एका सबस्ट्रॅटम म्हणजे मूळ सांस्कृतिक भूमीवर उभी असते असं विवेचन पर्स ने केलं आहे. विठोबाच्या गोजि-या ध्यानाकडे बघितल्यावर पर्सनं निदेशित केलेल्या या सांस्कृतिक भूमीतच 'महाराष्ट्री' असण्याचं सारं गमक दडलंय असं मला वाटायला लागलं. या भूमीत जे जे सारं परमेश्वराबद्दलचं चिंतन झालं त्या सा-याला विठोबाच्या विटेनं सामावून घेतलंय. त्यानं हरिहर भेद गिळून टाकले, त्यानं बुध्दाचा अवतारच आपलासा केला. एवढंच काय, साईबाबांचंदेखील 'विठोबाकरण' या महाराष्ट्राच्या भूमीत होऊ शकलं.
या पार्श्वभूमीवर नेमाड्यांच्या 'हिंदू' कादंबरीत नायकाचं नाव खंडेराव विठ्ठल म्हटल्यावर मला हसूच आलं, परवा. अरेच्च्या- म्हणजे नेमाड्यांनी 'हिंदू' मध्ये जेजुरी-पंढरी असा शैव-वैष्णव लंबगोल मानून त्याची खंडेराव आणि विठ्ठल अशी दोन केंद्र मानलीत कां काय? असा विचार मनात आला. की खंडेरावात हे हरिहर एकत्र झालेत? असा प्रश्नही मनात आला. देशी जाणीवांना व्यक्त प्रश्न करणारा ' पांडुरंग' सांगवीकर आणि दक्षिण आशियात पसरलेली बहुकेंद्री हिंदू जाणीव तपासणारा खंडेराव यांना वेधून असलेला विठ्ठल डोळ्यांना दिसला.
परवाच, सुषमा देशपांडेनं लिहिलेल्या 'बया दार उघड' या नाटकाची तालीम बघत होते. त्यातल्या विठा नावाच्या एका भक्ताची कथा सामोरी आली. तिचं मन विठोबावर जडलंय. आणि नवरा परंपरेचा आधार घेत शारीर बळजबरी करू बघतो. त्याला विठ्ठलाच्या प्रेमात दंग झालेली विठा सुनावते-
'तुझी सत्ता आहे देहावरी समज
माझेवरी तुझी किंचित नाही'
विठ्ठलाच्या भक्तीत सकस झालेले देशी स्त्रीवादाचे स्वर सुषमाच्या नाटकात भेटले. नुसताच हरी हर नव्हे तर स्त्री पुरुष भेदही गिळणारी विठू माऊली सामोरी आली.
या अशा सर्व काही व्यापून दशांगुळं शिल्लक राहणा-या विठोबाची मला आर्त आठवण येते आहे. आषाढीनंतर तृप्त वैष्णवजन आपापल्या संसारात परततील. मग माझ्या विठोबाला सवड मिळेल माझ्यासाठी. मला इरावती कर्व्यांना भेटलेला 'बॉयफ्रेंड' नको. मला हवाय या जगण्याच्या वाळवंटात माझं बोट धरून चालणारा माझा हक्काचा बाप. कृपा सिंधु करुणा करू, बाप रखुमादेवीवरू!

Friday, July 16, 2010

लेन प्रकरणाचा धडा

सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन, त्यांची सामाजिक सलोखा/शांतता टिकवण्याची जबाबदारी, आपल्याला सहन न होणारे विचार कोणी पुस्तकरूपाने मांडले तर त्याचे काय करायचे? किंवा ज्या पुस्तकातले विचार , त्यांची मांडणी अयोग्य वाटते त्यांचे काय करायचे असे विविध प्रश्न -विविध बाजू नजरेसमोर आल्या.

जेम्स लेन हे रिलिजस स्टडीज या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 1985 पासून मॅकलिस्टर कॉलेजमध्ये अध्यापन केले आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून टीएच.डी. म्हणजे डॉक्टरेट इन थिऑलॉजी ही पदवी घेतली. त्यांचा भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील हिंदू आणि मुस्लिम परंपरांचा, संस्कृतीचा, इतिहासाचा अभ्यास आहे. लेन यांच्याकडे महाराष्ट्र स्टडीज ग्रुप (एमएसजी) या, महाराष्ट्राचा अभ्यास करणा-या अ‍ॅकॅडमिक गटाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक आहे. 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. त्याविरुध्द संघराज रूपवते, आनंद पटवर्धन आणि कुंदा प्रमिला नीळकंठ यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं ही बंदी उठवली आणि वादळास सुरुवात झाली.



सुरुवातीलाच, मी माझी भूमिका स्पष्ट करते. मला प्राध्यापक लेन यांनी केलेली शिवचरित्राची मांडणी, शिवाजी महाराजांच्या 'मिथ'चे त्यांनी केलेले भंजन आणि त्या संदर्भात केलेले लेखन बेजाबदार वाटते आणि पटत नाही. परंतु पुस्तकावर बंदी घालणं हा त्यावर उपाय नाही. आक्षेपार्ह मजकुरावर कारवाई होऊ शकते, तो गाळला जाऊ शकतो, त्यावर वाद घातला जाऊ शकतो, प्रतिवादात पुस्तक लिहिता येतं. परंतु 'बंदी घालणं' हा राज्य सरकारनं निवडलेला पर्याय केवळ तात्पुरता, विचार न करता, व्होट बँका नजरेसमोर ठेवून केलेला उद्योग असल्यामुळे तो न्यायालयात टिकू शकलेला नाही. विचारांचा / कमी दर्जाच्या लेखनाचा प्रतिवाद विचारांनी होऊ शकतो. त्यासाठी रिचर्स इन्स्टिट्यूटवर हल्ले करणे किंवा हिंस्त्र मार्गांचा, लोकशाहीविरोधी मार्गांचा अवलंब करणे हे चुकीचे आहे. त्याचबरोबर पुस्तकावर बंदी घालणं हे शासनाच्या विचार न करण्याचं लक्षण आहे.

जेम्स लेन यांना जे लिहायचं होतं ते त्यांनी लिहिलं आणि त्यांच्या देशात या पुस्तकावर बंदी नाही. त्यामुळे तिथे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच आहे. राहता राहिला प्रश्न भारतीय विचारवंतांच्या विचार-स्वातंत्र्याचा आणि त्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती करण्याचा. तो विचार केंद्रस्थानी ठेवून इथल्या विचारवंतांनी या सा-या घटनेला तपासावयास हवं असं वाटतं. कारण ज्या पध्दतीनं जेम्स लेनच्या निमित्तानं प्रवीण गायकवाड सदृश नेते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू बघतात, त्यांना कायद्यानं वेळीच आवरणं गरजेचं आहे.

धर्माच्या अभ्यासाची पार्श्वभूमी :

ज्या पुस्तकाबद्दल इतका वाद झाला त्या पुस्तकाच्या लेखकानं मांडलेला उद्देश आणि हेतू समजून घेणं आणि त्या संदर्भात त्याच्या आक्षेपार्ह विधानांचा विचार करणे आवश्यक आहे.रिलिजस स्टडीज- म्हणजे धर्माच्या अभ्यासाची सुरुवात मध्ययुगीन युरोपात झाली. मात्र त्यावेळी धर्माचा अभ्यास करणारे अभ्यासक स्वत: धर्माचं पालन करणारे होते, म्हणून मध्ययुगीन धर्माभ्यास हा 'थिऑलॉजी' या प्रकारात मोडतो.

आधुनिक काळात ज्ञानशास्त्रात 'विवेककेंद्री' विचारांनी प्रवेश केला. मध्ययुगीन परमेश्वरकेंद्री विश्वव्यवस्थेकडून 'रिझन', विवेककेंद्री, पर्यायानं मनुष्यकेंद्री विचारसरणीकडे युरोपातील विचारवंतांचा प्रवास झाला. या प्रवासातल्या विविध टप्प्यांवर धर्माचं समाजातील स्थान, धर्म आणि राजसत्ता यांचा परस्परसंबंध, आधुनिकता आणि धर्मसंकल्पना यांचा परस्परसंबंध याबाबत वैचारिक घडामोडी झाल्या. कांटचा समकालीन श्लायरमाखर यांच्या पासून ते ऑटो, मर्सिआ एलियाडा यांसारख्या धर्माच्या अभ्यासकांच्या लेखनाकडे आपल्याला या धर्माभ्यासाचा इतिहास तपासताना पाहावं लागतं. 'सेक्युलॅरिझम' या विचारप्रणालीच्या उदयानंतर लोकशाही व्यवस्थेत धर्माचा अभ्यास सेक्युलर पध्दतीनं करणं शक्य आहे का? असा प्रश्न अभ्यासकांच्या समोर आला. आणि या प्रश्नाला उत्तर देताना, विशेषत: अमेरिकेत 'रिलिजन' आणि 'रिलिजस स्टडीज' या विभागांची स्थापना झाली. या विषयांचे अभ्यासक 'धर्मनिरपेक्षतेने धर्माचा/धार्मिकतेचा अभ्यास करण्यात गुंतले.

भारतामध्ये धर्माचा अभ्यास करणारी अशा प्रकारची डिपार्टमेंट्स नाहीत. आपल्याकडील धर्मांचा अभ्यास हा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विभागांतून होतो. स्वातंत्र्योत्तर भारतात, अमेरिकेतून हिंदू धर्माचा अभ्यास करणारे तसेच मुस्लिम धर्माचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक भारतात आले. डायना एक, जॅक हॉली, लिंडा हेस, वेंडी डोनिंजर- यांच्यासारखे विद्वान अभ्यासक भारतीय हिंदू धर्माचा अभ्यास करायला भारतात आले. तसेच ब्रूस लॅरेन्स, सिंथिया टालबॉट, कार्ल अर्न्स्ट या विद्वानांनी भारतीय इस्लामचा अभ्यास केला.

जेम्स लेन यांच्या लेखनाचा विचार या पार्श्वभूमीवर करणं आवश्यक आहे. याच अभ्यासकांच्या नंतरच्या पिढीत जेम्स लेन यांचा समावेश होतो.

वाद पुस्तकाचा :

नव्वदच्या दशकाच्या अगोदर भारतातील 'हिंदू' धर्माच्या अभ्यासाला साठीच्या 'बीट जनरेशन'चा गुलाबी चष्मा होता. भारतीय आध्यात्मिक परंपरांचा, जगण्याचा, व्रतवैकल्यांचा इथल्या रामायण-महाभारताला 'अप्रिशिएट' करण्याच्या उद्देशाने भरपूर अभ्यास करण्यात आला. मात्र नव्वदनंतर, बाबरी मशीद पडल्यानंतर आणि त्यापूर्वी काही काळ हे सारं समीकरण बदललं. भाजपाच्या उदयानंतर 'हिंदू' धर्माचा भारतातील राजकीय वापर वाढू लागला आणि अनेक देशी, विदेशी अभ्यासक हे 'हिंदू'- 'हिंदुत्ववाद' या संकल्पनांच्या अभ्यासात गुंतले.

सुमित सरकार, तानिका सरकार, सुदिप्त कावराज, ग्यान पांडे, पार्थ चॅटर्जी, ग्यान प्रकाश यांच्यासारखे भारतीय समाजचिंतक यांनी 'हिंदुत्व’या संकल्पनेचा ऐतिहासिक अन्वय लावणारे ग्रंथ लिहिले. आणि रिलिजस स्टडीजच्या, अँथ्रोपॉलॉजीच्या चष्म्यातून लेखन करणा-या परदेशी विद्वानांनी नव्वदच्या दशकात शिवसेना, भाजपप्रणित 'हिंदू राष्ट्रवाद’ची चिकित्सा केली.

यांतलं महत्त्वाचं नाव म्हणजे पीटर व्हॅन डेअर विअर यांचं. त्यांचा 'रिलिजस नॅशनॅलिझम' या पुस्तकानं भाजपप्रणीत हिंदू धर्माच्या राजकीय वापराची समीक्षा केली. अमेरिकन अ‍ॅकॅडमिक्सला जाचक वाटणारा मार्क्सवादी चष्मा युरोपीय विचारवंतांना अडचणीचा वाटत नव्हता. डॉ. सुजाता पटेल यांनी 1992 च्या डिसेंबरमध्ये एस.एन.डी.टी.त 'बॉम्बे सेमिनार'चे (हो, 92 साली मुंबई ही 'बॉम्बे'च होती.) आयोजन केले होते. बाबरी मशिदीच्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर हा सेमिनार झाला होता आणि मुंबईवरच्या शिवसेनेच्या पकडीची चर्चा या सेमिनारच्या केंद्रस्थानी होती.

हे सारं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे या काळात 'शिवसेनेनं केलेला शिवचरित्राचा वापर' देशी तसेच विदेशी अभ्यासकांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आला आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मुस्लिम द्वेषासाठी केला जाणारा वापर यावर त्यानंतर अनेकांनी लेखन केलं आहे. ज्यांना या विषयावर अधिक वाचायचं आहे त्यांनी थॉमस ब्लोम हानसेन यांचं 'वेजेस ऑफ व्हायलन्स : नेमिंग ऍण्ड आयडेंटीटी इन पोस्टकलोनिअल बॉम्बे' हे पुस्तक जरूर वाचावं. माझ्या मते, जेम्स लेन यांच्या पुस्तकातील ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाचं विश्लेषण थॉमस ब्लॉम हानसेन यांच्या पुस्तकात आहेत.

लेन यांचं पुस्तक छोटेखानी, केवळ 105 पानांचं आहे. अनेक विद्वान आणि अभ्यासू इतिहासकारांना त्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत हे दिसलेलं आहे. लेन यांचा उद्देश सरळ आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर समकालीन राजकारणात शिवसेनेकडून (आणि आता मराठा महासंघाकडून) केला जातो. या चरित्राचा 'हिंदू/ हिंदुत्ववादी ' अर्थ लावल्यामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र हे 'चांगली विरूध्द वाईट' अशा प्रकारच्या लढाईचं प्रतीक होतं. यात 'वाईट' बाजूला अफझल खान, शाईस्तेखान, औरंगजेब हे मुस्लिम नेते असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर भारतातील मुस्लिम विद्वेष वाढवण्यासाठी होतो. म्हणून ही शिवचरित्राची, 'हिंदुत्ववादी मिथ' तपासून मोडून काढली तर त्याचा वापर करणा-या शिवसेनेच्या पोकळ डोला-याची समीक्षा होऊ शकेल असे प्राध्यापक लेन यांचे एक उद्दिष्ट असावं असा विचार त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो.

पुस्तकाचा आरंभ मायकेल फुको या तत्त्वचिंतकाच्या वाक्याने होतो. 'These pre existing forms of continuity. (..).. they must not be rejected definitively of course, but tranquility with which they are accepted must be disturbed; we must show that they do not come about of themselves, but are always the result of a construction the rules of which must be known, and justifications of which must be scrutinized.

मराठी अस्मितेची घडी जर शिवचरित्राच्या महाकाव्यातून प्रेरणा घेते - तर त्या महाकाव्यातील नायकाच्या 'मिथ'ला तपासलं, त्याच्या 'मिथ'ला खिंडारं पाडून बघितली तर अधिक खुला, माणूसपणाचा विचार समोर येईल असा भाव लेन यांच्या लेखनातून प्रतीत होतो. ज्या वाक्याबद्दल अनेकांना आक्षेप आहे ते वाक्यही पुस्तकात 'ऐतिहासिक सत्य' म्हणून येत नाही, तर शिवाजी महाराजांच्या संदर्भातील मिथचा एक भाग म्हणून त्याचा उल्लेख येतो. मात्र ते मांडण्याची लेन यांची पद्धत आक्षेपार्ह आहे.

पुस्तकातील पाचव्या प्रकरणाचं नाव आहे 'क्रॅक्स इन द नॅरेटिव्ह'. शिवाजी महाराजांच्या चरित्राला तपासताना, शिवाजी महाराजांकडे 'माणूस' म्हणून पाहताना-- त्यांना 'दैवत' म्हणून जे बघतात त्यांना अस्वस्थ करतील असे प्रश्न प्राध्यापक लेन विचारतात. त्यांचा उद्देश ऐतिहासिक सत्याकडे निर्देश करणं असा नसून शिवाजी महाराजांचं ब्राह्मणी- हिंदुत्वीकरण नाकारणं असा आहे हे जाणवतं. शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणा-या ग्रँड फचा आधुनिक अवतार होणं हे जेम्स लेन यांचं उद्दिष्ट नाही असं ते स्वत:च लिहितात. मात्र ते वावडी स्वरूपी वाक्याचा उल्लेख एका 'मिथ'चं भंजन करण्यासाठी ते करतात. शिवरायांची 'मिथ' आणि शिवरायांचं वास्तव यांचा पगडा मराठी समाजमनावर असल्यामुळे अशा वावडी वाक्यानं समाजमन घायाळ होईल याची कोणतीच जाणीव लेन यांनी बाळगलेली नाही.

लेन यांची चूक लक्षात घेतल्या नंतरही काहीं तथ्यांकडे आपल्याला बघावे लागेल. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर करून महाराष्ट्रात मुस्लिम जनतेवर अन्याय केला जातो, हे क्रूर सत्य आपण सर्वांनी प्रथमत: नीट बघायला हवं आणि स्वीकारायलाही हवं. परवा परवा, मिरजेत झालेल्या दंगलीत ज्या पध्दतीनं 'अफजल खान' यांची 'मिथ' वापरली गेली ते बघता शिवाजी महाराजांच्या मायथॉलॉजीचं शिवसेनेनं जे हिंदुत्वीकरण केलं आहे त्याकडे गांभीर्यानं बघावं लागेल.

मात्र तरीही काही प्रश्न लेन यांच्या संशोधन-लेखन पध्दतीत पडतातच. त्या प्रश्नांमुळे त्यांची पध्दत मला आक्षेपार्ह वाटते. मात्र या आक्षेपांना नोंदवताना या पुस्तकाचा प्रकाशित होण्याचा हक्क मान्य करावा. त्यावर बंदी घालू नये असं माझं मत आहे. बंदी हा शासनाचा पळपुटेपणा आहे.

शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मुस्लिम विद्वेषासाठी वापर शिवसेनेनं केला आहे. दरम्यानच्या काळात बाबासाहेब पुरंदरे जनरेशनपलीकडे, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड यांनी 'सेना-मॉडेल'चाच वापर सुरू केला आहे. शिवसेनेच्या ओबीसी राजकारणानं हबकून एकीकडून मराठा आरक्षण आणि दुसरीकडून मराठा-जातीय अस्मितेचं अधोरेखन या मराठा जातीय संघटनांनी केलं आहे. कोणत्याही राजकीय, जातीय, धार्मिक पक्षाला आपलं अस्तित्व दाखवायला पायाभूत हिंसेचा प्रयोग करावाच लागतो. शिवसेनेनं तो 69 मध्ये आणि नंतर 84 मध्ये भिवंडी दंगलीत केला. जेम्स लेन यांचं पुस्तक ब्रिगेड आणि महासंघाच्या राजकीय उदयाच्या वेळी प्रकाशित झालं आणि वादाच्या भोव-यात सापडलं. आत्यंतिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शरद पवारांसारख्या पुरोगामी नेतृत्वानं या जातीय संघटनांना काबूत ठेवलेलं नाही. काहूर उठवणा-या अशा प्रश्नांवर आर.आर. पाटील भावनिक विधानं करतात, मात्र शरद पवार कोणतीही भूमिका मांडत नाहीत- हे असं राजकारण दुर्दैवी आहे. त्यामुळेच प्रियांका भोतमांगे च्या निकालापेक्षा जास्त प्रतिक्रिया लेनच्या पुस्तकावर उमटते, असं महाराष्ट्राचं दुर्दैवी वास्तव आहे.

‘आयबीएन-लोकमत’च्या चर्चेत जतीन देसाई यांनी म्हटल्याप्रमाणे,या पुस्तकाचा सर्वाधिक उपयोग संभाजी ब्रिगेड, मराठा-जातीयवादी संघटना आणि सेना यांनी केला आहे. जेम्स लेन यांचा उद्देशच मायकेल फुको यांनी म्हटल्याप्रमाणे 'थोडंसं डिस्टर्ब करून त्यातून नवीन प्रश्न निर्माण करण्याचा होता.' मात्र शिवाजी महाराजांचं चरित्र या त-हेच्या अ‍ॅकॅडमिक ट्रीटमेंटसाठी उपयुक्त होतं का? या प्रश्नाचं उत्तर मी नकारार्थी देते. म्हणून ज्याला आपण 'काऊंटर प्रॉडक्टिव्ह' म्हणू असा 'करायला गेलो एक आणि झालं नेमकं जे व्हायला नको होतं तेच' असा परिणाम या पुस्तकाचा झाला आहे. ब्राह्मण -ब्राह्मणेत्तर तेढ वाढण्यात त्याची परिणती झाली आहे.

तिढा अ‍ॅकॅडमिक आरग्युमेंटचा :

शिवसेनेनं केलेला शिवरायांचा वापर खरोखर अंगावर काटा आणणारा आहे. परंतु शिवसेनेचा विरोध करण्यासाठी शिवरायांच्या 'मिथ'चं भंजन करायचं, पर्यायानं शिवसेनेनं केलेला चुकीचा वापर दाखवून द्यायचा हा प्रयत्न खोचक, दुखावणारा आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघता अनाठायी आणि दुर्दैवी आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेले अनेक निर्णय केवळ 'हिंदू-मुस्लिम' समकालीन तथाकथित तेढीच्या पलीकडचे होते. 'मुस्लिम द्वेष' ही शिवाजी महाराजांच्या मूळ चरित्रातून सामोरी येणारी धारणा नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, त्यांच्या चरित्रातील घटनांचा महाराष्ट्रात खरंतर पॉझिटिव्ह वापर शक्य आहे. शिवाजी महाराजांचा उदारमतवाद सेनेच्या हिंदुत्वीकरणाला आणि ब्रिगेडच्या जातीय राजकारणात पुरून उरणारा अहे. म्हणूनच लेनची मीमांसापध्दत मला उपयुक्त वाटत नाही. लेन पध्दतीचं प्रोव्होकेटिव्ह, उसकवणारं मूर्तिभंजन मला टीकापात्र वाटतं.

दुसरं म्हणजे शिवसेनाप्रणीत राजकारणाचा मृत्यू तूर्तास त्यांच्याच कर्मानं होत आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी, की महाराष्ट्रातील मराठा जातीय राजकारणाच्या विरूद्ध महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे परंपरागत डाव्यांनी ज्या पध्दतीनं शिवसेनेकडे 'धर की धोपट' चष्म्यातून बघितलं त्या चष्म्यानं बघून महाराष्ट्रातील राजकीय तिढे सुटत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला मराठवाड्यात सेनेनं चाप लावले, ते बघता शिवसेनेची सांस्कृतिक भूमिका चुकीच्या पायांवर उभी असली तरी त्यांच्या राजकीय उपयोगाचा विचार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मराठा जातीय संघटना आता 'खरे शिवाजी महाराज' आमचेच आहेत असं, राजकीय उपयोगापोटी का म्हणत आहेत हे आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे.

शिवसेनेचं डिकन्स्ट्रक्शन, त्यांच्या ‘आदेश’ राजकारणाची टीका थेट करता येते. असं असताना शिवरायांच्या संदर्भात कोणत्याही मराठी माणसाला अनुचित वाटतील अशा वावडीस्वरूपी उद्गारांना अ‍ॅकॅडमिक जागा देण्याची चूक लेन यांनी केली आहे.

मायकेल फुकोचंचं एक पुस्तक आहे. पॉवर/नॉलेज. ज्ञान आणि सत्ता यांचा परस्परसंबंध फुको ऐतिहासिक/ज्ञानशास्त्रीय घडणीतून उलगडून दाखवतो. मला वाटतं, की जेम्स लेन यांची पोझिशन - अमेरिकेतील एक संशोधक असणं हीच एक पॉवर पोझिशन आहे. आपण एका वावडीचा जर अ‍ॅकॅडमिक वापर करत असू तर त्यातून काय होऊ शकतं हे न कळण्याजोगे जेम्स लेन हे भाबडे सदगृहस्थ नाहीत. या संहितेत अध्यहृत जो जाणीवपूर्वक उस्कावण्याचा प्रयोग आहे तो अ‍ॅकॅडमिक शिस्तीला धरून नाही. यामुळे आपण ज्या समाजाचा अभ्यास करतो त्यांना आपण कमी/गृहित लेखतो असा अर्थ प्रतीत होतो. त्या समाजाबद्दल आपण बेदरकार आहोत हे त्यातून प्रतीत होतं.

'हिंदू' या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेन यांनी ज्या प्रकारची उत्तरं दिली आहेत ती बघता हे पुस्तक त्यांनी 'सेक्युलर' भूमिकेतून लिहिलं आहे की एक प्रकारच्या वसाहतवादी उध्दटपणातून लिहिलं आहे हे तपासावं लागेल, त्याची अ‍ॅकॅडमिक चिकित्सा होणं आवश्यक आहे. भारतीय वास्तवाचा अभ्यास करणा-या परदेशी अभ्यासकांना अनेक काळ 'बाबा वाक्यं प्रमाणम' सारखं आम्ही स्वीकारलं आहे. परंतु आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वैचारिक लढाई चालू ठेवताना या स्वातंत्र्याची दुसरी बाजू म्हणजे भारतीय समाजाच्या संदर्भात देशी/ विदेशी अभ्यासकांची जी अ‍ॅकॅडमिक जबाबदारी आहे ती सुध्दा आपल्याला मांडावी लागेल, अधोरेखित करावी लागेल.



एक लेखक म्हणून वैचारिक स्वातंत्र्याचा आग्रह शंभर टक्के धरावाच लागेल. समाजाला सोयिस्कर, जैसे थे वादी ठेवणं हे विचारवंतांचं काम नाही. त्यांना अस्वस्थ करणं, विचार करायला लावणं हे विचारवंतांचं काम आहे. परंतु हे करताना माणूसपणाच्या भूमिकेवर अ‍ॅकॅडमिक संवेदनशीलता जागी राहते की नाही याचं भानही हवं. जेम्स लेन यांच्या लेखनात आवेश आणि अ‍ॅकॅडमिक प्रकल्पाला आवश्यक ऊर्जा आहे. मात्र अशी संहिता समाजावर जे परिणाम घडवते त्याची कोणतीही जबाबदारी त्यांना घ्यायची नाही. शिवाय, त्यांच्या लेखनाचा उद्देश ज्या संघटनांना दुर्बळ करणं हा होता तसं न होता उलट, त्या संघटना अधिक त्वेषानं याच पुस्तकाचा वापर करून बलवान होताना दिसत आहेत.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात या जातीय राजकारणाची चिकित्सा होणं आवश्यक आहे. जेम्स लेन यांच्या काही वाक्यांची आणि त्यांच्या संशोधन पध्दतीचा निषेध करण्यासोबत सेना-ब्रिगेड-महासंघाच्या हिंसेचा निषेधही होणं आवश्यक आहे. त्यांच्या आक्रस्ताळ्या प्रतिक्रियांना कायदेशीर चाप बसवण्याची आवश्यकता आहे. आपलं बोटचेपं शासन बंदी घालण्याचा उत्साह दाखवताना या संघटनांचा पध्दतशीर वापर करून घेतं, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. संघराज रूपवते, कुंदा प्रमिला नीळकंठ आणि आनंद पटवर्धन यांनी आविष्कारस्वातंत्र्याची बाजू लावून धरली आहे. आता गरज आहे चिकित्सक अभ्यासाची. आपल्या इतिहासातल्या ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाच्या, हिंदू-मुस्लिम विद्वेषाच्या, अस्मितेच्या क्रूर राजकारणाच्या दुख-या जागी जेम्स लेनच्या पुस्तकानं जाणूनबुजून सुई खुपसलीय. त्याचा राजकीय वापर होऊ द्यायचा की मूळ जखमा कशा भरून येतील ते बघायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. शाहू महाराजांच्या, विठ्ठल रामजी शिंद्यांच्या, राजारामशास्त्री भागवतांच्या भूमीत हे अशक्य नाही.

Thursday, July 15, 2010

आगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक



http://www.loksatta.com/old/daily/20061126/sun02.htm

Found my old article on Loksatta's website! It was published on November 26 , 2006. I think its relevant to revisit Boal's theatre in India. I had attended his workshop in Kolkata in 2006.

Boal claims that democracy and theatre are both participative processes. I think it would be extremely relevant in the present context to engage citizens in such participatory activity!

Anyway-- old thought for a new day. In the first photograph on the extreme right is Augusto Boal. And the next photo is that of the performance in Kolkata.

Friday, July 9, 2010

महाराष्ट्र देशी असावे!

अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुसयांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं अंगण तपासायला गेले. ख्रिश्चन मिशनरी आणि वसाहतींमधले उच्च अधिकारी यांनी 'एम्पायर'च्या गरजेपोटी जगभरातल्या संस्कृतींचा अभ्यास सुरू केला. डार्विनच्या उत्क्रांतीच्या मॅपवर स्वत:ला सर्वात 'प्रगत' समजणा-या गो-या, युरोपीयन साहेबांनी या शास्त्राचा पाया रचला. या पहिल्या फळीतल्या रिस्ले ते एल्विन या पिढ्यांनंतर भारतात भारतीय अंगणाचा अभ्यास करणारे अँथ्रॉपोलिजिस्ट आले. धुर्ये, इरावती कर्वे ते अगदी कमला गणेशपर्यंत प्रत्येक भारतीय अँथ्रॉपोलिजिस्टनं स्वत:ची संस्कृती तपासलेली आपल्याला दिसते. यांतली दोन महत्त्वाची नावं म्हणजे दुर्गाबाई भागवत आणि इरावती. आणि या दोघींमध्ये त्यांच्यातील भेदांपलीकडे एक समान दुवा म्हणजे 'मराठी असणे ऊर्फ मराठीनेस' या वास्तवाकडे दोघींची वळलेली नजर.
इरावती कर्व्यांच्या लेखात भेटणारा भैयाची घोंगडी फेकून दिली तरी त्यातल्या पैशाला हात न लावणारा नफ्फट, तर्कट मराठी माणूस किंवा दुर्गाबाईंच्या नजरेनं टिपल्या जाणा-या मराठीपणाच्या, वारकरी भक्तीच्या, धनगरांच्या बारीक घडणी या दोन्ही वाचणं आणि अभ्यासणं मनोहारी आणि अभ्यासपूर्ण; म्हणून महत्त्वाचं.
या मराठीपणाकडे नंतर जगभरातून येणा-या अँथ्रॉपोलिजिस्टांची नजर वळली. धुर्ये पिढीनं महाराष्ट्रातले भिल्ल, कातकरी, महादेव, कोळी इत्यादी तमाम आदिवासी गटांना पिंजून काढल्यानंतर प्रादेशिक अस्मितांच्या जातीय गटांच्या घडणीचा अभ्यास त्यानंतरच्या फळीला महत्त्वाचा वाटला.
गुंथर सोन्थायमरनं केलेला महाराष्ट्रातील धनगरांचा, वारीचा अभ्यास किंवा अँन फेल्डहाऊसनं चक्रधरांच्या महानुभाव पंथाकडून 'मराठीनेस'च्या अभ्यासात मारलेली उडी या गोष्टी ऐंशीच्या दशकात महत्त्वाच्या होत्या. या दोघांनी त्यांच्या गो-या नजरेनं 'मराठीनेस' सोलला. त्यात अँन फेल्डहाऊसनं केवळ अँथ्रॉपोलिजी नव्हे तर 'रिलिजिस स्टडीज'ची अभ्यासपूर्ण लेन्स वापरून महाराष्ट्र देशी राहणा-या देव-देवतांची, नद्यांची, जत्रांची चिकित्सा केली. मराठी असण्याचा सांस्कृतिक धर्म तिने तपासाला. Encyclopedia of Religion मध्ये अँन फेल्डहाऊसनं लिहिलेली मराठी संस्कृतीची एन्ट्री यासाठी वाचायला हवी.
माझ्या अँकॅडमिक प्रवासातले दोन योगायोग मला कायम महत्त्वाचे वाटले आहेत. पहिला जेव्हा एल्फिन्स्टन कॉलेजमधली लेक्चर्स बुडवून मी एशियाटिकला वाचत बसायचे तेव्हा माझी दुर्गाबाई भागवतांशी ओळख झाली आणि दोन-तीन भेटींत त्यांनी मला 'तू अँथ्रॉपोलॉजी हा विषय का घेत नाहीस?' असा प्रश्न केला. विविध ज्ञानशाखांतून फिरत असताना 'अँथ्रॉपोलॉजी' ही अत्यंत वसाहतवादी ज्ञानशाखा माझ्या विचारांच्या केंद्रस्थानी राहिली, कारण तो दुर्गाबाईंचा प्रश्न. या विद्याशाखेताला वसाहतवाद सोलून त्यापलीकडे काय करता येईल या प्रश्नानं मला कायम ग्रासलं आणि माझा अभ्यास चालू राहिला.
दुसरी बरी गोष्ट म्हणजे अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत मी अँन फेल्डहाऊसची विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला आणि मग टिपिकल दुस-या टाईपच्या अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासकासारखं स्वत:चं बॅकयार्ड उस्कटायला घेतलं. 'मराठी असण्याचं माझं अंगण' हाच मग माझा अभ्यास- विषय झाला.
अँन फेल्डहाऊसनं 60 नंतरच्या 'रोमॅटिक इंडिया' लेन्समधून मराठीपणाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. माझा अभ्यास 92 च्या दंगलीनंतर मुंबईतल्या उद्विग्न मराठीपणाच्या मोमेंटवर सुरू झाला होता. अँनच्या हाताखाली मी जो ग्रॅज्युएट थिसिस लिहिला त्याचं शीर्षक आहे 'लँग्वेज अँण्ड रिलीजन इन महाराष्ट्र'. 92-93च्या दंगली नंतर 'मराठी असणं आणि हिंदू असणं' या दोन्हीतली दरी संपून 'मराठी माणूस = हिंदू माणूस' हे जे नवं समीकरण झालं त्याचा उद्वेग माझ्या मनाच्या तळाशी होता. मी माझ्या मराठी अंगणाकडे काहीशा डाव्या रागानं बघत होते. अँनच्या अँरिझोनामधल्या 'रिलिजस स्टडीज' या डिपार्टमेंटने मात्र मला माझ्या मुंबईतल्या इंटुक सर्किटला आवश्यक 'डाव्या-आवेशा'पासून थोडं दूर जायला जागा दिली. 'मराठीनेस तपासण्यासाठी' तत्कालीन समाजात उपलब्ध rhetoric दूर जायला ती जागा माझ्या उपयोगाला आली.
अँन फेल्डहाऊसमुळे माझी 'मराठीपणाचा इतिहास' तपासणा-या विविध विचारवंतांशी ओळख झाली. त्यांतला डॉ. रिचर्ड इटन यांच्यासोबतचा सेमिनार मला कायम आठवतो. आमच्या डिपार्टमेंटला डॉ. इटन यांनी एक पेपर वाचला होता. त्याचा विषय होता मलिक अंबर. आदिलशहाच्या आईने लहानग्या आदिलशहाला मलिक अंबरच्या मांडीवर दिले आणि त्याने आदिलशाही राबवली हा चौथीच्या पुस्तकातला उल्लेख मला आठवत होता. पण डॉ. इटन यांनी या मलिक अंबरचं सारं राजकीय आणि ऐतिहासिक चरित्र समोर मांडलं.
मलिक अंबर हा मूळचा अँबिसिनियाचा, आफ्रिकन. या अँबिसेनियन्सना आपल्याकडे 'हबशी' म्हणतात. (हैदराबादेत एक हबशीकुडा पण आहे.) तिथून त्याला पकडून इराकला आणला आणि त्याचं धर्मांतर करून नाव ठेवलं मलिक अंबर. त्या काळात वेगवेगळे मुजाहुद्दीन म्हणजे पगारी लढाऊ सैनिक विकत घ्यायची पध्दत होती. तशा गुलाम-मुजाहुद्दीनांच्या बाजारातून आदिलशहाच्या आईनं मलिक अंबरला विकत घेऊन महाराष्ट्रात आणला.
डॉ. इटनच्या भाषणात, त्यांनं महाराष्ट्रातली चौथाई सरदेशमुखीची महसुली पध्दत मलिक अंबरनं त्याच्या आफ्रिकन संस्कृतीतून उसनी आणून महाराष्ट्रात कशी रुजवली यावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं. महाराष्ट्रातली महसूल पध्दत, इथले गड-किल्ले यांची रचना या सा-यांत मलिक अंबरचं योगदान मोठं आहे. आदिलशहाच्या अधिपत्याखाली महसुली युनिट म्हणून 'महाराष्ट्र' प्रथम एकत्र झाला. 'मराठी असण्याच्या' प्रक्रियेत एक अँबिसेनिअन दृष्टी अशी मिसळून गेली आहे.

'मराठी' असण्याचा इतिहास शोधताना जगभरातून आलेल्या अशा अनेक गोष्टी भेटत गेल्या. कधी, डॉ. अशोक केळकरांच्या पर्सो मराठीच्या अभ्यासात मराठीतले उझबेकी-तुर्की शब्द सापडले. कधी, 'तमिळ-मराठी' शब्दकोशात इडली ऊर्फ इडरीच्या मराठी जन्माची कथा मिळाली. कधी, पोस्ट-होयसाळ राजांच्या इतिहासातून वाहत आलेला कानडी उच्चभ्रूपणा मराठी शब्दांत भेटला. वेरूळ-अजिंठ्याच्या निर्मितीच्या वेळी बिहारमधून आलेले बौध्द-जैन कारागिर-मेडिटेटर्स यांनी ही मराठी भूमी आपली मानून निर्माण केलेली साडेसातशे लेणी पाहून महाराष्ट्रातल्या स्थलांतराकडे नव्या नजरेनं पाहण्याची सवय लागली. बौध्द वास्तुकलेतून वाहत आलेलं 'तोरण' मराठी दारांवर चढताना संस्कृती किती विविध परंपरांचा संगम पोटात सामावून घेते हे बघून मन भरून आलं.
मला अभ्यास करायचा होता भाषा आणि धर्म या दोन गोष्टी अस्मितेच्या प्रांतात कशा वापरल्या जातात त्याचा. आणि भाषिक अस्मितेचा इतिहास तपासताना भाषा ही कशी अनेक संस्कृतींच्या सरमिसळीतून घडत जाणारी, हवेशीर, खुली, एका भाषेतून दुस-या भाषेत जाणं अवघड न करणारा नात्यांचा ताणाबाणा आहे, या वास्तवाचा परिचय व्हायला लागला.
भाषेला अस्मितेशी जोडणारी आधुनिक नाळ म्हणजे मातृभाषेची संकल्पना. मराठीपणाच्या अभ्यासातली एक पायरी मला अशीच आठवते. ती म्हणजे सुमती रामस्वामी यांच्या तमिळ भाषेच्या अभ्यासादरम्यान भेटलेला एक रेफरन्स. 'मातृभाषा' हा विचारच कसा आधुनिक आहे याची मीमांसा त्यात डॉ. रामस्वामी यांनी केली आहे. भाषेचा राजकीय इतिहास कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. सुमती रामस्वामी यांचं 'पॅशन्स ऑफ द टंग' हे पुस्तक आहे. मातृभाषा आणि त्याला जोडून अस्मितेचं राजकारण हा सारा जर्मन भाषाशास्त्रज्ञांचा भाषेकडे बघण्याचा 'आधुनिक' विचार आहे. मातृभाषा ही संकल्पना आणि त्याला जोडून अस्मितेचे लढे हा आधुनिकतेचा परिपाक आहे असा रामस्वामी याचं म्हणणं आहे. मूळ संस्कृती ही बहुतेकदा बहुभाषिक असते याबद्दल त्यांनी विवेचन केलं आहे. या बहुभाषिकतेचा, बहुकेंद्री अस्मितांचा विसर आपल्याला पडतो ते केवळ भयाचं राजकारण आहे. 'पॅशन्स ऑफ द टंग' तमिळ भाषेच्या संदर्भात हे विवेचन करते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म यांचं अंगण पिंजून काढताना या अंगणात आलेले कित्येक वैश्विक शब्द, विचारप्रवाह, भाषा भेटत गेल्या. त्या तशाच भेटल्या जेव्हा इतर संस्कृतींचे अभ्यासक भेटले. त्या कुणी मराठी खोपा घातलेल्या अफगाण बायका पोस्ट-पानिपत अफगाणिस्तानात कशा फोटोमध्ये बंदिस्त झाल्या त्याची गोष्ट सांगितली. तर कुणी खानखोज्यांसारख्या मराठी असण्याच्या मेक्सिकन खुणांचा परिचय करून दिला.
भयापोटी माणूस संकुचित विचार करतो हे माझं हायपोथिसिस मी गेली कित्येक वर्षे तपासत आहे. अँथ्रॉपोलॉजी, रिलिजस स्टडीज आणि माध्यमांच्या अभ्यासात या भाषेत आणि पर्यायानं संस्कृतीत विणलेले विविध संस्कृतींचे सरमिसळ पदर डोळ्यांना दिसू लागले आहेत.
संस्कृतीचा अभ्यास करताना अनेक सामाजिक शास्त्रज्ञ एक शब्द वापरतात -पालिमसेस्ट- म्हणजे काय? तर भूर्जपत्र. कसं भूर्जपत्रं? तर ज्या भूर्जपत्रावर एक निरोप लिहून झाला, की त्याला पांढरा रंग देऊन त्यावर दुसरा निरोप लिहिता येतो असं- इतिहासाच्या खुणा जपणारं भूर्जपत्र. आणि जर जाणकार हातांनी हा पालिमसेस्ट सोलला तर त्या खाली दडलेले अनेक निरोप वाचता येतात... निदान निरोपांचे अनेक थर इथं अस्तित्वात आहेत याचं भान येतं. अँथ्रॉपोलॉजित संस्कृतीचं स्वरूप या पालिमसेस्टसारखं बहुपदरी मानलंय.
मराठी असण्याबद्दल माझ्या असलेल्या प्रेमाचा परिपाक म्हणून असेल मला सेना-मनसे जेव्हा मराठी असण्याबद्दल बोलतात तेव्हा अंगावर काटा येतो. (अर्थात असाच काटा राष्ट्रवादीच्या पोस्टरवर 'भाषा हे साधन संपर्काचे नाही-संघर्षाचे' हे वाक्य बघितल्यावरही येतो.) कारण या राजकीय पक्षांना भाषेला राबवायचं आहे, वाढवायचं नाही.
बहुकेंद्री असणं हा भाषिक संस्कृतीचा मूळ धर्म आहे. तो भयापोटी नाकारून चालणारं संकुचित राजकारण चुकीचं वाटतं. या राजकीय पक्षांना मुंबईतलं मराठी मायनॉरिटीचं राजकारण कळतं, त्याचबरोबर जागतिकीकरणात डावलल्या गेलेल्या त्रस्त मराठी तरूण मुलांचं भयग्रस्त मन समजतं. मात्र त्यांना ज्ञानोबांनी सांगितलेला 'मराठी' असण्याचा पसायदान अर्थ लागण्याची सुतराम शक्यता नाही. तो अर्थ फार पुढची गोष्ट झाली पण त्यांना मूलभूत मानवी हक्क जपत लोकशाहीवादी राजकारण कसा करायचं हे पण समजून घ्यायचं नाही.

ख-या अर्थानं मराठी असणं म्हणजे आपल्या भूमीत रुजायला पोषक अशी मूलद्रव्यं सर्व संस्कृतींतून घेणं, त्यासाठी खुली धारणा बाळगणं आणि त्या खुलेपणामध्ये अनेकांना सामावून घेणं-- अशा रोबस्ट मराठीपणाच्या राजकारणाची मी वाट पाहतेय. कोंज्या अस्मितेच्या राजकारणाची नाही!

Friday, June 18, 2010

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव

मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय किंवा 'तुम्ही सारे कट करून मला गंडवताय' असं वाटून ठसठसतं दुखरं बनलंय. या सा-यासकट, मला मराठी मन नेहमी न्यूनगंडानं ग्रासलेलं दिसतं. 'जगात जे काही 'बेश्टं' आहे त्यापेक्षा मी पावछटाक कमी आहे' असा भाव मराठी माणसाच्या चेहे-यावर कायम दिसतो. जणू तो न्यूनगंड झाकून टाकायला मराठी माणूस आक्रमक आणि चिडका बिब्बा असल्यासारखा वसवसत असतो.
उदाहरणादाखल म्हणजे, इंग्रजी पत्रकारितेत प्रणव रॉय जर 'बेश्ट' असेल किंवा एन. राम- तर राजदीप कसा पावछटाक कमी वाटतो- तसं हे मराठी न्यूनगंडाचं दुखरं गळू आहे.
मराठी माणसाची चार प्रेमं बघितली तरी, उदाहरणार्थ, लताप्रेम, सचिनप्रेम, राजप्रेम आणि खरे मूळचे साहेबप्रेम; तर न्यूनगंडाच्या दुख-या निरगाठीचं राजकारण आपल्याला कळू शकतं. 'पावछटाक' कमी असण्याच्या वास्तवाचा तो प्रतिक्रियात्मक कडवा आविष्कार असतो. लताबाई - कारण ती जगातल्या कुठल्याही स्वर्गीय आवाजापेक्षा कमी नाही; किंबहुना काकणभर सरसच आहे. परमेश्वरानं बाईंच्या डोक्यावर हात ठेवलाय. मग लताप्रेम हा आमचा 'डिफायनिंग पॉईंट' आहे. सचिनप्रेम याच जातकुळीचं. या दोन 'भारतरत्न' मटेरिअल्सनंतरची मराठी माणसाची जी दोन प्रेमं आहेत, (राज) साहेब आणि मूळचे साहेब यांची; ती इतर प्रत्येक क्षेत्रातल्या ठसठसत्या डावललेपणाची भरपाई आहे. लताबाई आणि सचिन हे एकांडे शिलेदार आहेत. अनभिषिक्त साहेब आणि ओरिजिनल साहेब हे न्यूनगंडानं ग्रासलेल्या मराठी समाजाचे नेते आहेत. त्याच समाजासारखे दोघंही चिडके, दुखावलेले, हट्टी, प्रेमळ, सटॅक - मराठी माणसासारखेच प्रतिक्रियेत तिखट. दरक्षेत्रात 'आपण कुठेतरी कमी आहोत' या भावनेला कसा हात घालायचा, तो कंद कसा मॅनिप्युलेट करायचा, त्याचा राजकीय वापर कसा करायचा, त्या दुखरेपणावर अक्सीर इलाज शोधण्यापेक्षा त्याला दुखरं ठेवूनच अरेरावी कशी वाढवायची, याची पुरती गणितं या दोन्ही साहेबांना ठाऊक आहेत.
मराठी न्यूनगंडाचा राजकीय आविष्कार जसा 'सेना-प्रेमा'त होतो तसा तो इतरही अनेक ठिकाणी होताना दिसतो (पवारांनी मोठा केलेला मराठा महासंघ म्हणजे तरी काय आहे?). पण मग या न्यूनगंडाची ठसठस मागे तरी कुठपर्यंत जाते? त्या इतिहासाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न.
पेशवाईची सत्ता 1818 ला संपली. मग साहेबाचं कंपनी सरकार सत्तेत आलं. 'अधिकाधिक साहेबाळणं' हे सत्तेच्या जवळ जाण्याचं साधन झालं. बंगालमध्ये ही प्रक्रिया शंभरएक वर्षं अगोदर सुरू झाली होती. 'साहेबाळणं' प्रक्रियेचा बंगाली पुरूषांच्या प्रतिमेवर प्रचंड मोठा प्रभाव पडला. बंगाली बायकांच्या मदतीला बेण्टिकसारखे परकीय पुरूष आल्यानं बंगाली पुरूष हा पुरेसा 'पुरूषी' नाही असा त्याचा तेजोभंग इंग्रजांनी केला. बंगालच्या राजकारणावर, नंतरच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नांवर प्रतिमेचा हा प्रतिकार करण्याची निकड दिसून येते. महाराष्ट्रात मात्र 'साहेबाळण्या'ची ही प्रक्रिया काहीशी वेगळी होती. 'मर्द मराठयां'ना ब्रिटिश सत्तेच्या समोर झालेला पराभव जिव्हारी लागला. आणि म्हणून मर्द मराठयांच्या मनात 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला रेझिस्टन्स, प्रतिकाराची भावना कायम तेवती राहिली. मराठे आणि मुघल हे ब्रिटिशपूर्व सत्ताधारी! या दोघांचंही ब्रिटिशांशी नातं गुंतागुंतीचं आहे. पडतं घेऊन ब्रिटिशांसोबत सहकार्यानं वागणा-या इथल्या वैश्य वर्गापेक्षा या दोघांचं नातं प्रतिकारानं, लढयानं बनलेलं



आहे. अरे ला कारे? म्हणू शकणा-या 'मर्द'पणावरचा ब्रिटिश हल्ला म्हणूनच मराठी मनाला सहन झाला नाही. बंगाली पुरूषी प्रतिमेचा तेजोभंग ब्रिटिश काही प्रमाणात यशस्वीपणे करू शकले. मराठी माणसानं मात्र त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी वेषभूषा, इंग्रजी सत्ता यांच्याशी मराठी माणसाचं नातं विरोधाचं राहिलं. ज्याप्रमाणे उत्तरेतले नेहरूंसारखे नेते 'इंग्रजाळले' त्या तुलनेत मराठी नेतृत्व इंग्रजाळलं नाही. टिळक, फुले-शाहू यांनी देशी वाणात साहेबी गुणांना मिसळून टाकलं. हा सारा काळ हा दोन संस्कृतींच्या संघर्षाचा आणि सहजीवनाचा काळ होता. डाव्या नजरेनं आतापर्यंत या काळाला केवळ 'शोषणा'च्या एकांगी नजरेनं जोखलं. मात्र शोषणासोबत हा काळ अनेक नवीन मूल्यांच्या जन्माचा, दोन संस्कृतींच्या तुलनेचा, यातून आपण काय निवडायचं-काय नाकारायचं हे ठरवण्याचा, औचित्याचे प्रश्न उभे करणारा काळ होता. या काळात ज्या 'मर्द' मराठयांनी (इथं मराठा हा शब्द जातिवाचक घेतलेला नाही. 'मराठी माणसांनी' या अर्थानं मराठयांनी या शब्दाची योजना केली आहे.) 'साहेब शरणता' डावलण्याचा पुरूषार्थ केलेला दिसतो. मात्र हे गणित गांधीबाबांच्या आगमनानंतर ढासळलं. टिळकोत्तर गांधींच्या राजकारणाच्या उदयात मराठी न्यूनगंडाची काही बीजं दिसून येतात. या सगळया काळाचं विवेचन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात केलंय. गांधींच्या तालमीत तयार झालेले शंकरराव देवांसारखे नेते 'मराठी' राहिले नाहीत.

डॉ. केतकरांनी भाषिक राज्यासाठी धरलेला आग्रह, सावरकरांची भाषाशुध्दीची चळवळ या दोन्ही गोष्टी या 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला दिलेली तिखट उत्तरं म्हणून तपासाव्या लागतील. त्याचबरोबर नाना पाटलांचं 'पत्री सरकारही.' 'राष्ट्र' नावाची एक महाकाय नवी संकल्पना उदयाला येताना, 'लोकशाही' नावाचं 'एक माणूस - एक मत' असं नवं राजकीय मूल्य रुजत असताना 'साहेबोत्तर' पिढीमध्ये राष्ट्रीयत्वासाठी मराठीपण नाकरण्याकडे कल राहिला.
स्वातंत्र्योत्तर भारतात जे 'मराठी' विचारवंत झाले ते 'मराठी' नव्हते. ते राष्ट्रीय विचारवंत होते. त्यांच्या मते फक्त मराठीचा विचार म्हणजे संकुचित विचार. या उलट लोकशाहीवादी राष्ट्रीयत्वाचा विचार करणा-या नव्या राजकीय नेत्यांची फळी स्वातंत्र्योत्तर भारतात दिसते. हे नेते जन्मानं मराठी आणि विचारानं राष्ट्रीय होते. या सा-या काळात विनोबांनी 'महाराष्ट्र धर्मा'चा थोडासा विचार केलेला दिसतो. मात्र काका कालेलकर ते ना.ग. गोरे, एस.एम., मधू लिमयांपर्यंत व्हाया पटवर्धनबंधू पोस्ट-गांधी मराठी नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं. कम्युनिस्टांमधले डांगे-रणदिवे हे 'मराठी' नव्हेत तर राष्ट्रीय नेते होते. नवीन राष्ट्रवादाच्या कल्पनेचा अनुषंग म्हणूनच त्या सर्वांनी एकत्र येऊन 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' केली. ही चळवळ 'महाराष्ट्र' वेगळा हवा यासाठी नव्हती तर भारत देशाचा तो एक सकस भाग व्हावा म्हणून आणि मुंबईवरच्या मराठी शिक्क्यासाठी तो लढा होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्राकडे 'अस्मिते'चा लढा असं बघता येत नाही, तर राष्ट्र संकल्पनेला अधिक लोकाभिमुख करणारी ती चळवळ होती. सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असा की औद्योगिकीकरण, शहरीकरण या सर्व साहेबी काळापासून सुरू झालेल्या प्रक्रियांनी साठच्या दशकात अधिक वेग घेतला. आणि 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला प्रतिकार करणारा 'मराठी माणूस' स्वातंत्र्योत्तर आधुनिकतेत काहीसा मागे फेकला गेला. मराठी माणूस राहिला मुंबईचा कामगार आणि इंग्रजी शिकलेले दाक्षिणात्य मुंबईत नोक-या पटकावते झाले. याच काळात माटुंग्याचं 'मांटुंगम' झालं. शहरीकरणाच्या प्रक्रियेत राजकारण पालटलं आणि 'माझ्या भूमीत मी डौलानं माझ्या जातीय अहंकारासकट उभा राहीन' असं मानणा-या मराठी माणसाचा अहंकार ठेचला जाऊ लागला.
नवीन वैश्य गणितात मराठयांच्या क्षात्र तेजाची किंमत उरली नाही. म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली, मात्र वैश्य वृत्ती जोपासणा-या गुजराथी-मारवाडी-सिंधी-पंजाब्यांनी ती काबीज केली. मराठी न्युनगंडाचं दुसरं दुखरं कारण मला या साठीच्या दशकातल्या 'वैश्य' मुंबईत दडलेलं दिसतं.
अजूनही मुंबईत नवे उद्योग येताना मुंबईतले मराठी नेते कॉण्ट्रॅक्टस मागतात. इथलं सिक्युरिटीचं कॉण्ट्रॅक्ट आम्हाला द्या, इथं माझी मुलं कामाला लागतील. इथली युनियन आमची असेल. मात्र या मुंबईत नवे व्यवसाय सुरू करणारी मराठी माणसं कमी आहेत. या 'वैश्य' गणितात 'क्षात्र' क्षात्र 'तेजानं कंत्राटं आणि गुरगुर करून मिळवलेला उक्ता माज या पलीकडे काही साध्य केलेलं नाही. दुसरीकडे वाङ्मयीन जगात पुरेसा परिपुष्ट नसलेला नेमाडयांचा देशीवाद याच वैश्य राजकारणात उगवताना दिसतो. क्षात्र तेजाची पीछेहाट दिसून येते. मुंबईला महाराष्ट्रात आणण्यात 'संयुक्त महाराष्ट्रा'ची चळवळ यशस्वी झाली खरी, पण 'मराठी' माणूस मुंबईच्या जिओपॉलिटकल अर्थकारणातून बाहेर गेला.
मध्ययुगीन काळापासून मराठयांचं एक लक्षण सांगितलंय- ' दिध्ढले, गहिल्ले, कलहशीले'... हे कलहशीलत्व मात्र मराठी मनानं मनापासून जोपासलं. डावी चळवळ ते व्हाया शरद जोशी, मेधा पाटकर हे कलहशीलत्व मराठी माणसानं नीट संपन्न केलं आहे. त्याच्या दुख-या, ठसठसत्या अहंकाराला शोभेल अशा एकांडेपणानं. या एकांडया शिलेदारांना सामाजिक नेतृत्व लाभलेलं नाही. शरद जोशी-मेधा पाटकरांना काही काळ मायनॉरिटीचा पाठिंबा लाभला. त्यांचे साहेब झाले नाहीत. या सा-या प्रकाशात मला दिसतात महाराष्ट्रातले तीन साहेब- पवारसाहेब, जे दिल्लीच्या राजकारणात पावछटाक कमी पडले, मूळचे खरे साहेब- ज्यांनी डरकाळया फोडून मुंबई गाजवली आणि हे नवे येणारे अनभिषिक्त 'राज'साहेब. या तीन साहेबांनी महाराष्ट्रात नवा 'साहेबाळलेला वर्ग' निर्माण केला आहे.
वैश्य गणितातली दुसरी बाजू 'चिपा'त मिळणा-या कामगारांची होती. त्या मराठी कामगार वर्गालाच आता उत्तर भारतीयांबरोबर फाईट द्यावी लागते आहे . आमचं दुखणारं गळू अगदी टेकीला आलंय. तुम्ही जातीनं कुणीही असा- नुकताच हॅपी बर्थ डे झालेले 'राजसाहेब' मराठी माणसाला जातीपलीकडे जाऊन आवडतात.
'भाषाशुध्दी' आणि 'पाटया बदला'ची घोषणा त्यांच्या कामी आली. सावरकर खरे 'हिंदू हृदयसम्राट' तर राजसाहेब 'मराठी हृदयसम्राट झाले आहेत !'
आम्ही आधुनिकतेच्या क्रिकेटमध्ये कबड्डी खेळत मागे पडलो. आता, ग्लोबल बास्केटबॉलमध्ये आमचा टिकाव लागणार आहे का? आम्ही आता हा नवा गेम आपलासा करणार की अस्मितेच्या राजकारणाचा डाव खेळणार? वेगवेगळया सांस्कृतिक राजकारणाचं हे मैदान आहे. पंजाब्यांनी आपल्या न्यूनगंडावर स्वत:मधल्या जोमानं, रगीनं मात केली आणि गुजराथ्यांनी आपल्या पैशानं त्यावर मात केली. आम्ही निदान अकलेच्या जोरावर या न्यूनगंडापलीकडची छलांग मारायला रेडी आहोत का? की पुन्हा 'पाटया बदला'चा गेम खेळून आम्ही रडीचा डाव करणार आहोत? 'हॅपी बर्थ डे' झालेले साहेब तो डाव खेळतायत... आपण तोच डाव पुढे रेटणार का? हा प्रश्न आहे.

Friday, June 4, 2010

खेळ ‘बुध्दी–बुध्दी’चा

मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी भाषिक समुहात अजूनतरी प्रिमियम नाही. मराठी माणूस हुशार समजतो तरी कोणाला? आणि या हुशार समजण्याची परंपरा तपासली तर काय लक्षात येते? आपली हुशारपणाची व्याख्या बदलत चाललीय का? स्वत:ला हुशार समजणा-या; शिवाय, ज्यांच्याकडे यशस्वीतेचे ठोस ब्रॅंडिंग आहे अशा माणसांना जर मराठी इतिहासातली ‘हुशार’ नावे विचारली तर त्यात शिवाजी महाराज, पहिला बाजीराव- द ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट आणि नाना फडणवीस या कॉमन थीम्स दिसतात. पोस्ट-पेशवाई हुशारीत राजवाडे-केतकर-टिळक आणि स्वातंत्र्यकालीन हुशारीत एकीकडे तर्कतीर्थ टाईप मंडळी तर दुसरीकडे सीडी देशमुख या उच्चवर्णीय नावांचे उल्लेख दिसतात. डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले यांना त्यांच्या बौद्धिक कामगिरीबद्दल नावाजण्याची चाल उच्चवर्णियांमध्ये नाही हेही खेदाने जाणवते. इतकेच काय सावरकरांच्या हुशारीचे कौतुक करताना राजारामशास्त्री भागवत किंवा कर्मवीरांसारखा व्हिजनरी पुण्यामुंबईकडे पूर्णत: नजरेआड होतो. हुशार समजण्याच्या प्रक्रियेत ‘जेंडर’ ही पण दुफळी दिसते. पंडिता रमाबाई, इरावती कर्वे आणि दुर्गाबाई यांच्याखेरीज हुशार बायकांच्या नामावळीत नावे सापडत नाहीत. ताराबाई शिंद्यांच्या थेट जिनिअसचा उदोउदो ऐंशीच्या दशकात, स्त्रीमुक्तीचे वारे वाहता असताना दिसतो. एकीकडून ‘हुशार’ कोणाला म्हणायचे? हे जातिनिहाय ठरत जाताना – स्वातंत्र्योत्तर काळात ते विचारप्रणालीनिहाय ठरलेले दिसते. एकीकडे डांगे, कर्णिक, तळवलकर परंपरा, दुसरीकडे व्हाया तर्कतीर्थ, मे.पुं.रेगे वाई परंपरा, तिसरी प्रोफेशनल लोकांना बुद्धिमान मानण्याची परंपरा म्हणजे डॉ. शिरोडकर किंवा आयएएस अधिकारी किंवा लेखक यांच्यांतली हुशारी मराठी भाषिक समुहाने नावाजलेली दिसते. हुशार असण्याच्या व्याख्येत – विविध विषयांमधली व्युत्पन्नता, सोबत मराठी भाषिक समुहाशी जोडून घेण्याची क्षमता आणि काही प्रमाणात लेखन व वक्तृत्व गुण हे जणू काही आवश्यक घटक होते. समाजवाद्यांच्या गटात त्यामुळे अच्युतराव पटवर्धन, नाथ पै ते मधू लिमये ही नावे, तुम्ही समाजवाद्यांपैकी कोणते समाजवादी आहात यावर अवलंबून घेतली जातात. काही वेळा मराठवाड्यात कुरुंदकर, विदर्भात जिचकार किंवा सध्याच्या महाराष्ट्रात मुंबई- पुण्यात टिकेकर अशी विभागवार हुशारांची नामावळी देखील दिसते. याशिवाय विज्ञान विषयात नारळीकर किंवा संत साहित्यासाठी यू. म. पठाण , सदानंद मोरे अशी विभागणी दिसून येते स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषिक समुहाने दोन परिमाणे शोधून काढली. दहावी परीक्षेत बोर्डात नंबर येणे – आणि त्या खालोखाल आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे. अमेरिकेचा व्हिसा प्रोफेशनल्ससाठी सत्तरच्या दशकात खुला झाल्यावर डॉक्टर होऊन अमेरिकेत जाणे हेदेखील ‘हुशार’ असण्याचे लक्षण बनून गेले. मेनस्ट्रीम मराठी समुहाला या तिन्ही गोष्टी अजून महत्त्वाच्या वाटतात. शरद जोशी ते अविनाश धर्माधिकारींच्या पिढीपर्यंत आयएएस होण्यात / प्रशासकीय सेवेत निवड होण्यात ‘हुशार’ असण्याची ग्लोरी आहे असे मराठी समाजाला वाटत होते. मात्र आता, पोस्ट-भूषण गगराणी काळामध्ये (भूषण गगराणी आठवण्याचे कारण, त्यांनी मराठी वाड्मय हा विषय ऐच्छिक म्हणून घेतला होता, त्याचा उल्लेख सतत होतो!) सरकारी बाबूंना हुशार समजायची चाल फारशी उरलेली नाही. कदाचित गगराणी हे त्या यादीतले अपवाद असतील. मराठी भाषिक समुहात चिंतक, विद्वान, विचारवंत, लेखक यांची मांदियाळी निर्माण झाली – तशीच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही; परंतु हुशारपणाच्या पॅरामिटर्सवर अधिराज्य बहुतांश ‘ब्राह्मणी’ कल्पनांचे होते. ( जसे परवा मुकादमसर म्हणाले, की बाबा आढावांना कुठे आम्ही विचारवंत मानतो अजून?) याला थोडासा छेद देणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे तेंडुलकर आणि कुमार केतकर. ज्यांना पठडीपलीकडच्या डाव्या मतांचे कौतुक आहे अशाच लोकांना तेंडुलकर-केतकरांसारखे क्रिटिकल लेखक आवडतात आणि त्याच क्रिटिकल समुहात मेघा पाटकरांबद्दल आदर-पुष्पा भाव्यांच्या लेखनाचे कौतुकही वाटते. मात्र ‘प्रमाण’ मराठी भाषिक समुहाची ही चाल नाही. नव्वदच्या दशकात, आयटी क्षेत्राने बाजी मारल्यावर, फक्त बुद्धिमता नाही तर त्याबरोबर ‘पैसा’ हे प्रामाण्यदेखील आवश्यक झाले. आता नारायणमूर्ती, नंदन नीलेकनी हे ‘हुशार’ असण्याचे आणि डॉ. अभय बंग किंवा डॉ. प्रकाश आमटे हे सामाजिक भान असण्याचे मानदंड झाले. पुण्यात जन्माला आला असाल तर कपाळावर ज्ञान प्रबोधिनीचा ठप्पा हा अनेक काळ बुद्धिमान असण्याची पावती मानला जायचा. ज्ञानप्रबोधिनी, आयआयटी आणि अमेरिका या तीन गोष्टी म्हणजे पोस्ट-पेशवाई पुण्यात अजूनही हुशारीची चलनी नाणी आहेत. प्रबोधिनी नसली तर निदान पक्षी दहावी-बारावीची मेरिट लिस्ट हे नाणे तर कालपरवा, मेरिट लिस्ट खारीज होईपर्यंत चालायचे. ‘ज्ञानप्रबोधिनी’त प्रवेश परीक्षेत IQ टेस्ट घ्यायचे किंवा अजूनही घेतात. माझा मास्तर पॉल प्रायव्हेटिअर याचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ हे पुस्तक वाचत असताना मराठी ‘हुशारपणा’च्या व्याख्येचा हा इतिहास, त्यातले महत्त्वाचे नामोल्लेख मनात येत होते. पॉल प्रायव्हेटिअरने तर IQ या प्रकाराची सामाजिक मुळे शोधून काढून हा कोशंट ठरवणे हे सांस्कृतिक दृष्टया भेद करण्यासाठी निर्माण केलेले साधन कसे आहे याचा इतिहास लिहिलाय. ज्ञानप्रबोधिनी-ठप्पा, हुशारांचा IQ यांवरच पॉल प्रायव्हेटिअरचे पुस्तक प्रश्नचिन्ह निर्माण करते. पॉल सोबत शिकताना 'हुशारीकडे' एक स्वायत्त , निसर्गदत्त वस्तू म्हणून न बघता एक सामाजिक प्रोडक्ट म्हणून बघण्याची सवय लागली. मराठी हुशारीच्या perceptions म्हणून तपासणं महत्वाचं ठरत गेलं. कोणता ही समाज ‘बुद्धिमत्ता’ म्हणजे काय, हे कसे ठरवतो? मी एखाद्या आदिवासी पाड्यावर जन्माला आले असते तर माझे रान वाचायचे स्किल हे माझ्या हुशारीत गणले गेले असते का? की नाही? मात्र सध्या ब्राह्मणी हुशारीचे-मानदंड कोसळतायत, अशा वेळी नवे मानदंड नसल्यामुळे, सर्वात सोपे – म्हणजे पैसा-प्रामाण्य हुशारीला सब्स्टिट्युट म्हणून वापरले जाते. मात्र मी आता एका दुस-या डायनॅमिक्सकडे बघत आहे. मला वाटते, की जेव्हा रिसोर्सेस मर्यादित असतात तेव्हा त्या मर्यादित रिसोर्सेसवर कुणाचा हक्क आहे यातून सत्ता निर्माण होते आणि ती सत्ता एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना, बुद्धिमत्तेला उत्तेजन देते. सध्याच्या सगळ्या हुशार ‘डिजायनर्स’च्या पिढीकडे बघितल्यावर मला हे कुठेतरी जाणवते. NID किंवा IDC मध्ये प्रवेश मिळवणे दुरापास्त आणि म्हणून ही मायनॉरिटीतली ‘डिजायनर्स’ मंडळी दिवसेंदिवस ‘निश’ म्हणून बुद्धिमान गणली जातात. नव्या पोस्टमॉडर्न बाजारात अँडव्हर्टायजिंगला किंमत नाही. आता मानाचे स्थान आहे ते डिजायनर्सना. मात्र मराठी भाषिक समुहात हे नवीन परिमाण अजून आलेले नाही. आम्हाला अजूनही टीव्हीवरची चमको मंडळीच ‘हुशार’ वाटतात! अजूनही आमचे लेखक त्यांच्या परदेशी डिग्र्या आणि मेरिट लिस्टमधल्या नंबरांवर खूष आहेत. आम्हाला ‘डिजायनर्स’मधली हुशारी समजेस्तोवर – डिजायनर्सच्या सात पिढ्या झालेल्या असतील. हे सगळे बघताना मन आतून खंतावते. पण मग ज्यांनी आपलं आयुष्यं डिजाईन केलं त्यांचं काय? माणसाला माणूस म्हणून ओळखणा-या, अंतर्बाह्य integrity असणा-या, आपण जे कोणी आहोत त्या आपल्या स्पिरिटला पूर्ण उपलब्ध होणा-या ‘हुशार’ माणसांबद्दल सध्या तरी मराठी भाषिक समुहाला काही ठाऊक नाही. आणि व्हिज्युअल भाषेत बोलणारे नवे हुशारप्राणी शब्दांतून दूर जायला लागल्यामुळे आता ‘माध्यम-चतुर’ आणि ‘व्हिज्युअल-तल्ल्ख’ अशा नव्या कॅटॅगरीज तयार होताना दिसतात. पॉल प्रायव्हेटिअरचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ वाचून झाल्यावर जुन्या परिमाणांवरचा माझा क्रिटिकल रोष मलाच उमजून आला आणि त्याच प्रकाशात, ‘बुद्धी-बुद्धी’च्या मराठी खेळाची झालेली गोचीदेखील मला स्पष्ट दिसू लागली..