Saturday, January 25, 2014

खाष्ट विदुषी आणि अलिप्त परिपूर्ती


दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे या दोन लेखिकांची तुलना करण्यापूर्वी मराठी संस्कृती समीक्षेची संदर्भचौकट समजून घ्यावी लागेल. मराठीतील संस्कृती समीक्षेचा प्रवास राजवाडे, राजारामशास्त्री भागवत, फुले, विठ्ठल रामजी शिंदे, केतकर असा बघता येतो. भारतीय समाज आणि संस्कृती समीक्षेचा प्रवास डी. डी. कोसंबी, राहुल सांकृत्यायन, आनंद कुमारस्वामी, धरमपाल, लोहिया नावांखेरीज करता येत नाही. राजवाडे, फुले, भागवत यांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी सामाजिक आहे. विठ्ठल रामजी शिंदे, डाॅ. आंबेडकर, केतकर यांची जातिव्यवस्थेची समीक्षा ही सांस्कृतिक इतिहास जमेस धरून करण्यात आली आहे.

समकालीन लेखकांमध्ये देशीवादाची मांडणी करणारे डाॅ. भालचंद्र नेमाडे,तुकारामदर्शनकार  डाॅ. सदानंद मोरे तसेच विलास सारंग व दिलीप चित्रे यांची वाड्मयीन समीक्षा ही सांस्कृतिक समीक्षा म्हणूनच तपासावी लागेल.

पत्रकार नसताना वैचारिक लेखन करणा-या सामाजिक लेखकांच्या यादीत ‘गावगाडा’ लिहिणारे अत्रे, ‘स्रीपुरुष तुलना’ लिहिणा-या ताराबाई शिंदे यांचे लेखन करता येईल. या व्यापक संदर्भचौकटीच्या अंतर्गत  दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांचे लेखन बघून त्यांची तुलना करावी लागेल.

या दोन्ही लेखिकांच्या यशात आणि कौतुकात त्यांच्या बौद्धिक कष्टांचा, स्पष्टवक्तेपणाचा, स्वच्छ अंत:करणाचा जास्त वाटा आहे तसाच त्यांच्या उच्चवर्णीय स्री असण्याचा आणि प्रिव्हिलेज्ड कुटुंबाची पार्श्वभूमी लाभण्याचा वाटाही बराच मोठा आहे.

‘जेंडर’ आणि ‘जात’ या दोनही गोष्टी महाराष्ट्रात (आणि भारतात) वैचारिक योगदानाचा संदभ तपासताना ध्यानात ठेवाव्याच लागतात. या दोन्हीपेक्षा अधिक महत्वाची समाजशास्त्रीय अभ्यासकांची जोडगोळी म्हणून खरेतर विठ्ठल रामजी शिंदे आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांची तुलना आपल्याला करावी लागेल. शिंदे यांचा बहुजनवादी दृष्टिकोण आणि डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम, समाजशास्त्रीय लेखन आणि केतकरांचा ‘ज्ञानकोशा'सारखा बृहद्प्रकल्प, कादंब-यामधील सुधारणावादी दृष्टिकोन आणि चित्पावनकेंद्री भाषिक दृष्टी यांची तुलना संस्कृती समीक्षेत खरेतर अधिक महत्वाची ठरेल. मात्र या लेखाचा विषय त्यांची तुलना हा नाही. राजवाडे आणि राजारामशास्त्री भागवत, स्री सुधारणांच्या संदर्भात फुले आणि आगरकर या तीव्र बौध्दिक भेदांवर आधारित जोड्यापेक्षा दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांच्यात साम्यस्थळे अधिक आहेत.

मराठी संस्कृतीचा विश्लेषक अभ्यास हा दोघीच्याही अभ्यासात समान दुवा आहे. मराठीत लिहित्या- वाचत्या-विचारकर्त्या मनाला या दोघींची स्टेशनं लागतात, ती मलाही लागली. मी समाजशास्त्र शिकण्याचा निर्णय दुर्गाबाईबरोबर झालेल्या एका संवादानंतर घेतला. किनशिप सिस्टिम्सचा अभ्यास करताना इरावती कर्व्याचं लेखन संदर्भासाठी धुंडाळलं. तरी आता इतक्या वर्षानंतर या दोघींचं योगदान तपासताना त्याच्या आवाक्याच्या मर्यादाही ध्यानी येतात. ‘साधने’ तले जात-पात न मानणारे गांधीवादी ब्राह्मण आणि मौजेची बौद्धिक स्नॉबरी जपणारी पंरपरा उच्चवर्णीय या दोन्ही गटात या लेखिका फिट् बसल्या. आणि त्यांचं लेखन इंटरेस्टिंग आणि सुलभ असल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे किंवा केतकरांपेक्षा अर्थातच त्या आम्हाला अधिक जवळच्या वाटल्या, हे नमूद करायलाच हवं. या दोघीच्या लेखनाला ब्राह्मणी सदर्भचौकट आहे. ती ध्यानात ठेवून या विचारतुलेकडे बघावे लागेल.


संस्कृती समीक्षा (Cultural Studies या अर्थाने) हा शब्द वापरताना काही विशिष्ट ज्ञानशास्त्रीय साधनांचा आणि पंरपंराचा वापर आणि त्यांना वापरून केलेली संस्कृतीची चिकित्सा अभिप्रेत आहे. म्हणून हे बिरुद सर्व प्रकारच्या वाड्.मयीन समीक्षेला किंवा पत्रकारिता, प्रबोधन या हेतूने केलेल्या सर्व लेखनाला लागू पडत नाही.


इरावती कर्वे (जन्म 1905- मृत्यू 1970) आणि दुर्गा भागवत (जन्म 1910- मूत्यू 2002) या दोघी  समांतर लेखन करणा-या समकालीन लेखिका. त्या दोघींचे अभ्यासविषयही जवळपास सारखे. त्यामुळे त्याच्यात मनोमन फारसे चांगले गणित नसण्याचे मला नवल नाही.

दुर्गाबाईनी त्याच्या स्वभावानुसार ‘आठवले तसे’ मध्ये एक पूर्ण प्रकरण लिहून इरावतीबाईवर हल्ला चढवला आहे. त्या कशा स्वार्थी आणि करिअरिस्ट होत्या हे सांगताना इरावतींलर दुस-याचे श्रेय लाटण्याचा आणि अभ्यासात मूलभूत चुका करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इरावतींना ज्ञानापेक्षा ज्ञानमार्गाने मिळणा-या सत्तेची अभिलाषा आधिक होती असे दुर्गाबाईंचे म्हणणे आहे. दुर्गाबाईंच्या मनातील या संतापाचे, अढीचे दर्शन त्या लेखात होते. इरावती मात्र अशा बाबतीत व्यवहारात नेटक्या आणी तोल ढळू न देणा-या असल्यामुळे दुर्गाबाईंबद्दल त्यानी काही उलटसुलट लिहिलेले नाही.दुर्गाबाईंचा स्वभाव वादप्रवण आणि त्यांना स्वतःच्या नैतिकतेचा प्रचंड (दुर) अभिमान असल्यामुळे त्याच्या सेल्फरायचसपणाच्या तलवारीखाली सगळेजण येतात. नेमाडे, आंबेडकर, गांधी, बुद्ध-कुणीच त्यातून सुटू शकले नाही. इरावतीतर त्यांच्या स्पर्धेत होत्या त्यांची सुटका होण दुरापास्तच होतं.  दुर्गाबाईच्या एकूण सर्व  विचारप्रकियेत त्यांच्या अतिनैतिकतेच्या  हट्टापायी आलेले अनेक चमत्कारिक विरोधाभास आहेत. त्या तुलनेत इरावती कर्व्याचं व्यक्तिमत्व समतोल अलिप्त, शिष्ट आणि टीकेपेक्षा स्वतःच्या कामात आणि संसारात व्यग्र असं दिसतं.

दुर्गाबाईनी आपल्या स्वतःच्या ‘ स्पेशल केस” असण्याची स्पष्ट चिकित्सा केलेली नाही. वडिलांनी आर्थिक तरतूद करून ठेवल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली नाही. आणि कोणत्याही आर्थिक विवंचनाही पाठीमागे लागल्या नाहीत. संसार, सेक्स आणि नोकरी या तीन गोष्टी अनेक स्री- पुरुषांना नमवतात. त्यातल्या संसार दुर्गाबाईनी मांडला नाही. आणि विषप्रयोगातून सावरल्यानंतर सेक्सविषयक त्यांच्या भूमिकेशी त्या एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळे त्याच्या लेखनात सेक्सचा उल्लेख आणि पडसाद आढळले तरी त्या इच्छेनं त्यांना कधी नात्यात पडतं घ्यावं लागलेलं दिसत नाही.

नोकरी किवा अर्थाजनाची विवंचना नसल्यामुळे श्रेणीरचनेत सोसावे लागणारे अपमान त्याच्या वाट्यात आले नाहीत आणि संसारात कराव्या लागणा-या तडजोडीही त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत. मात्र या प्रचंड ‘प्रिव्हिलेज्ड स्पेस’ मध्ये त्यांनी त्यांमानानं मर्यादित काम केलं. विचारस्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य पणाला लावलं होत. मात्र मूलभूत आर्थिक सुरक्षा त्यांना त्याही परिस्थितीत होती ही वस्तुस्थिती डोळयाआड करता येणार नाही. ते सारं ससंदर्भच स्वीकारावं लागतं.

इरावती कर्व्याचा प्रवासही प्रिव्हिलेज्ड आहे परंतु निराळा. आई- वडील ब्रह्मदेशात असल्यामुळे त्या वाढत्या रॅंगलर पराजप्यांच्या घरात. बी. ए. ला तत्वज्ञान विषयात सर्वप्रथम आल्या होत्या. फर्ग्युसनमधली मानाची दक्षिणा फेलोशिप त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांचा दिनकर कर्व्याशी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर इरावतीबाईंनी मानवशास्रात एम. ए. केलं आणि घुर्ये याच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला.

त्यानतर नव-यासोबत पूर्व जर्मनीत पीएच. डी करण्यासाठी त्या रवाना झाल्या. परत भारतात आल्यावर जाताना शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं त्यांना क्रमप्राप्त होत. वयाच्या २६ व्या वर्षी कर्वे स्रीशिक्षण संस्थेत रजिस्ट्रार म्हणून त्या जाॅईन झाल्या. ते काम त्याच्या आवडीचं नव्हतं तरीही ते त्यांनी स्वीकारलं. भारतात परतल्यानंतर ते वयाच्या ३८व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळ जवळ बारा वर्षं इरावतीबाई आपली अॅकॅडमिक ओळख शोधत होत्या. दरम्यान त्यांनी (अत्यंत कटु घडामोडीनंतर) कर्वे स्रीशिक्षण संस्थेतील पदाचा राजीनामा दिला आणि डेक्कन कॉलेजमध्ये त्याची प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. याच दरम्यान त्यांच्या तीन मुलाचा जन्म झाला आहे.

इरावतीबाईचा पहिला लेख ‘अभिरुची’ त १९४३ साली प्रकाशित झाला. त्या वेळी गौरी, त्याची तिसरी मुलगी एक वर्षाची होती. १९४३-१९७० म्हणजे त्याच्या मूत्यूपर्यत २७ वर्ष इरावती लेखन-संशोधन  केलं आहे. या संशोधनाचा फोकस अर्थात त्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे फिजिकल अँथ्रोपाँलॉजी हा आहे. डेक्कन कॉलेजमधील नेमणुकिनंतरचा इरावतीबाईंचा प्रवास अॅकॅडमिक आहे. त्यांना नंतर एक वर्ष लंडन विद्यापीठात तर एक अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात व्याखती म्हणून आमंत्रित  करण्यात आलं होतं. बर्कलीतल्या इरावती कर्व्याच्या वास्तवानंतर त्यांच्या लेखनात एक निराळा बदल जाणवतो. बर्कलीच्या वाटेवर इरावतीबाईना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यानंतर त्या अनुभवाची छाया त्यांच्या मनावर कायम राहिली. त्याची घनिष्ट मैत्रिण सुलोचना देशमुख यांनी ‘गंगाजल’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी लिहीलं आहे.

इरावती कर्व्यांच्या लेखन प्रवासातला मह्त्वाचा टप्पा म्हणजे १९६७ साली त्यांनी लिहिलेलं ‘युगान्त’ त्याला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. (जो १९६२मध्ये प्रकाशित झालेल्या व्यासपर्वला नाही.) इरावतींच्या संस्कृती-केंद्री लेखनाला मिळालेली ती दाद होती. यानंतर तीन वर्षातच इरावतींचा मृत्यू झाला. इरावतीबाईंबद्दल इतकं सविस्तर लिहिण्याच कारण म्हणजे त्यांचं लेखनही याच जीवनानुभवावर आधारलेलं आहे, ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजल’ मध्ये भेटणा-या इरावतीबाईंना मुलं, करिअर, नोकरी, कुटुंबाचे सारे प्रश्न सामोरे येतात आणि सामान्य माणसाला विशेषत: स्रीला  हेवा वाटावा असा संसार करतानाही इरावतीबाईंचा तटस्थपणा त्यांच्या भाषेतून जाणवत राहतो. या अलिप्तपणानं त्यांचं वैयक्तिक लेखन वेढलं गेलेलं आहे. ही ‘न गुतण्याची स्टॉईक किमया’ त्यांना साधलीए. वैचारिकदृष्ट्या त्यांच्यावर प्रभाव आहे तो उदारमतवादाचा आणि कुरुंदकर काहीही म्हणोत देवदयेनं इरावतीबाई लिबरल, नेमस्त आहेत पण समाजवादी नाहीत. समाजवादी ढोंगाचा अभाव ही त्यांच्या लेखनाची मोलाची बाजू आहे. त्या राजकीय भूमिकेत गुंतलेल्या नाहीत. मात्र अत्यंत व्यावहारीक, प्रॅग्मॅटिक आणि वस्तुस्थितीला सामोरं जाणारी अशी त्यांची मतं आहेत.
हिंदू कायद्याच्या संदर्भात त्यांनी आपल्या साक्षीत जी मतं मांडली ती अभ्यासण्याजोगी आहेत,कर्वे कुटुंबातील र. धों. कर्व्यांचा प्रभाव हे कारणही असेलही परंतु बहुपत्नीत्व विवाहांतर्गत स्रीचे हक्क, लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमाच्या तडाख्यात सापडल्यामुळे  दुस-या बाईचे उद्ध्वस्त होणे या संदर्भात इरावतीबाई केवळ लिबरल मतं मांडत नाहीत . तर भारतीय संस्कृती इतिहासाच्या संदर्भात स्रीला मिळणारा न्याय म्हणजे काय? ते तपासतात.


दुर्गाबाईंचा प्रवास निराळा आहे. क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही डावललं गेल्याचा राग आणि संताप मनात आहे. अत्यंत तरुण वयात गोंडाचा अभ्यास करताना जंगलातलं विषारी सुरण खाल्यामुळं त्यांची तब्येत पूर्ण बिघडली. त्या आजारपणातून त्या उभ्या राहिल्या तीच त्यांच्या मन:शक्तीची कमाल म्हणावी लागेल. घुर्ये यांनी केलेल्या अन्यायामुळे बाईंची पीएच. डी. अभ्यास करूनही पूर्ण झाली नाही. राम गुहांनी लिहिलेले वेरिएर एल्विनचे चरित्र वाचताना घुर्येदर्शनही झाले. घुर्यांच्या विसंगती त्यामुळे नजरेला आल्या.

इरावती कालांतराने तरी अॅकॅडमिक धारेला लागल्या तशा दुर्गाबाई त्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्या. त्यानंतरचे त्यांचे अभ्यासक्षेत्र संहितांचा एन्थ्रोग्रॅफिक अभ्यास असे राहिलेले दिसते.
प्रतिभा रानडे यांनी ‘एैसपैस गप्पा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाईंचा प्रवास मांडलाय. १९३८साली मध्यप्रदेशात, अतिदुर्गम भागात संशोधनासाठी फिरताना त्यांना विषबाधा झाली.त्या वेळी दुर्गाबाई होत्या २८ वर्षाच्या. यापूर्वीचं दुर्गाबाईचं लेखन Early Buddhist Jurisprudence म्हणजे बुद्धकाळातील विनयपिटकात वर्णिलेल्या न्याय संकल्पनेचा अभ्यास या विषयावर झालेलं होत. मूळ बौद्ध ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्या पाली आणि अर्धमागधी शिकल्या होत्या. इरावतींच्या लेखनात पाश्च्यात तत्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो तर दुर्गाबाईंच्या विचारांचा मूळ कंद बौद्ध दर्शनात सापडतो.
दरम्यान दुर्गाबाईंना साने गुरुजींनी लिहिते केले. दुर्गाबाईंची भाषेबाबतची संवेदनशीलता अफाट आहे. आणि त्यांची भाषिक जाणीव अतिप्रगल्भ आहे. शैली त्यांनी अभ्यासानं कमावली. इरावतीचं लेखन आधेक उस्फूर्त तर दुर्गाबाईचं मेटिक्युलस असा दोघींच्या शैलीतला फरक.१९५६मध्ये ‘ऋतुचक्र’ १९६२मध्ये ‘व्यासपर्व’ दरम्यान दुर्गाबाईंचा हात सतत लिहिता होता.१९७०मध्ये’पैस’ प्रकाशित झाले. या दरम्यान दुर्गाबाईंनी विविध समाजशास्त्रीय कमिट्यांवर कामे केली. लेखन,भाषांतरं, वाचन, चिंतन केले. मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटण्याचा काळ म्हणजे ७०चं दशक.
वादप्रवणता आणि पॉलीटीकल करेक्टनेसपेक्षा स्वतःच्या नैतिक चौकटीत काय बसतं याचा विचार करून स्पष्ट बोलणं यामुळे दुर्गाबाई या दशकात सतत गाजत राहिल्या.वेश्याव्यवसायाची आवश्यकता मांडताना त्यांनी जी विधानं केलीएत ती वाचताना अंगावर काटा येतो. राजा ढाले यांनी बाईंच्या विरोधात ‘साधने’ त लेख लिहून त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. लिटील मॅगेझिनवाल्यांच्या म्हणजे भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, अरुण कोलटकर यांच्या बाई जवळ होत्या. परंतु लिटिल मॅगेझिनवाल्याची मार्क्सवादी, डावी आणि दलित जाणिवांणी समाज व्यवस्थेला शह देऊ पाहणारी विचारसरणी दुर्गाबाईंची नव्हती. त्या एका गांधीवादी मुशीतून घडल्या गेल्या. त्या मुशीत एकदा तत्व मानलं की त्या तत्वासाठी लढा देणं अभिप्रेत होतं मात्र त्या तत्वाची ‘पॉलिटकली करेक्टनेस’च्या दगडावर परीक्षा करण्यापेक्षा दुर्गाबाई नैतिकतेच्या भूमिकेवर त्याची चिकित्सा करत होत्या.

त्यामुळेच भाऊ पाध्यांना समर्थनही देताना हुसेनवर टीका करण्यास त्या कचरल्या नाहीत. हुसेन याचा रामायणाचा अभ्यास धड नाही आणि त्याची चित्रं संदर्भहीन म्हणून अश्लील आहेत हे मत मांडताना त्यांच्यातला अभ्यासक मागेपुढे पाहत नाही.हुसेनला पाठिंबा देणा-या आणि रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ वर टीका करणा-या डाव्या लिबरल्सना दुर्गाबाई ठोकून काढतात. अनेक समाजवादी जेव्हा दुर्गाबाईचं कौतुक करतात तेव्हा कितीदा माझ्या मनात येतं की,अरे तुमच्या या आयडिऑलीजिकल दंभाच्या पूर्ण विरोधात ही बाई उभी होती हे तुम्हांला समजतंय. या थेटपणाचे,निर्भीडपणाचे आणि निस्पृह्तेचे सर्व मार्क दुर्गाबाईंच्या पारड्यात जातात.यानंतर त्यांच्या जीवनपटात घडतो तो आणिबाणी आणि कराडच्या साहित्य संमेलनाचा एपिसोड.

दुर्गाबाईंवर त्यांच्या अनेक मतांबद्दल टीका करताना, त्यांच्या निर्णयांची समीक्षा करताना तरीही याबद्दल अपार आदर वाटत राहतो. तो त्यांच्या कराडच्या संमेलनातल्या आणिबाणी निषेधामुळं. दुर्गाबाईंना आयुष्यानं दिलेल्या ‘प्रिव्हिलेज्ड स्पेस’ चा अत्यंत उदात्त निर्णयासाठी त्यांनी या प्रसंगात उपयोग केला.विचारस्वातंत्र्याच्या लढ्यात या कृतीला तोड नाही. दुर्गाबाईंच्या नैतिकतेच्या बळाला जयप्रकाशांच्या आदर्शवादाबद्दल अतिशय आदर वाटत होता हे त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे.
मात्र नंतर एक नागरिक म्हणून मंत मांडताना झोपडपट्टी वाढण्याबद्दल ‘जंगल फोफावतंय’ सारखं भयंकर लेखन नंतर दुर्गाबाईंनी केलं आहे.‘सामना’ तलं स्तंभलेखन त्यांनी का केलं? हा प्रश्न पडतो. किंवा ‘आठवले तसे’ सारखं पुस्तक समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून कसं बघायचं याबद्दल मनात संदेह निर्माण होतो. बाईंनी यशवंतरावांसारख्या नेत्याला एका कॉमेंटच्या फटक्यानं उडवून लावणं हेदेखील न पटणारं. दुर्गाबाई या सा-या विरोधाभासांचं मिश्रण आहेत. प्रतिभा रानडे यांचं ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे पुस्तक मला आवडत नाही कारण त्यांनी फार मायेनं दुर्गाबाईंच्या विसंगती एडिट केल्यायत हे पदोपदी कळत रहातं. दुर्गाबाई हे अनेक कॉन्ट्रॅडिक्शन्शनी मिळून तयार झालेलं मिश्रण होतं. त्यामुळेच बदलत्या काळात, शेवटच्या टप्यात त्या रिलेव्हन्ट राहिल्या नाहोत. इरावती आणि दुर्गाबाईंची तुलना करताना दुर्गाबाईंच्या ‘देशी’ विचारप्रणालीतून सकस झालेल्या स्वर आणि इरावतीबाईचा पाश्च्यात लिबरल विचारधारेवर पोसलेला नेमस्त पिंड सतत जाणवत राहतो. त्या दोघींच्या फरकाचं मूळ त्यांच्या या भिन्न बौद्धिक परंपरांमध्ये आहे.

कर्व्यांच्या घरात सून म्हणून राहणं सोपं नव्हतं तसंच गौरीची आई होणं हीपण काही साधी भूमिका नव्हती. आपल्या आयुष्याबद्दल लिहिताना इरावती बाई स्वतःच्या निर्णयांची समीक्षा करतात. ही Self reflexivity हा त्याच्यां विचारप्रक्रियेचा भाग आहे.

फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करताना इरावतीबाई संस्कृतीशास्त्राच्या झेत्रात उतरतात. मराठी संस्कृती, हिंदू समाज, भारतीय जातीव्यवस्था यावर भाष्य करतात. संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देताना अल्पसंख्याक भाषिकांच्या हक्कांबाबत मंत मांडतात. आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्याचा अन्वय लावताना त्या मुळांकडे म्हणजे ‘महाभारता’ कडे वळतात. ‘बॉय फ्रेंड’ विठोबापेक्षा त्यांना महाभारतातील गुंतागुंतीच्या नात्यांचा अन्वय महत्वाचा वाटतो. कर्व्यांच्या घरातला ‘मनाला जे पटेल ते करणे’ हा संस्कार उत्तरार्धात त्यांनी आत्मसात केलेला दिसतो.

दुर्गाबाईंच्या धारणा मात्र भिन्न आहेत. आध्यात्मिक गूढतेचा  स्पर्श त्यांना झाला आहे. म्हणूनच ‘पैस’ मध्ये त्यांना ‘ज्ञानदेव’ नुसते भावत नाहीत तर ‘सहनसिद्धी’, ‘दु:खकालिंदी’ सारख्या ज्ञानेश्वरिय शब्दांची त्यांना भूल पडते. राजारामशास्त्री भागवतांचा परखड वारसा दुर्गाबाईंना लाभलेला आहे. जशी इरावतींची नाममुद्रा डेक्कन कॉलेजवर तसा दुर्गाबाईंचा ठसा एशियाटिकवर उमटलेला आहे. जे इरावतींनी कधी केलं नाही ते पुढच्या पिढीशी जोडून घेण्याचं काम दुर्गाबाईंनी इथेच केलं.
सर्वात शेवटी जो मुद्दा मी मांडणार आहे तो आहे या दोघींच्या स्रीवादी संदर्भातील मतांचा.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या दोघींचा जन्म झाला. इरावतीबाई त्यांच्या जागतिक वास्तवाच्या परिचयामुळे पाश्च्यात पद्धतीने अनेक गोष्टी करायच्या.त्यांच्या आयुष्यात हा आधुनिक स्रीवाद लगेच नजरेत येतो. दुर्गाबाई या त्या अर्थाने अधिक परंपरावादी आणि आध्यात्मिक. त्या स्रीलाही प्रथम माणूस म्हणून तपासतात. आणि तिच्या कोणत्याच विसंगतीमुळे डोळेझाक करीत नाहीत.स्रीमुक्तीवाल्या बायकांबद्दल त्यांची मंत पुरुषांपेक्षाही अधिक टीकात्म आहेत. सेक्शुअल स्वातंत्र्याबाबत इरावती कर्वे अधिक मोकळ्या तर दुर्गाबाई काही प्रमाणात कन्झर्वेटीव आहेत. दोघींना स्वयंपाक करण्याची आवड. पण दुर्गाबाईंना शिवण, टिपण, भरतकाम, खादी, स्वंयपाक हे सारेच क्षेत्र हौशीचे आणि आवडीचे. तर इरावतीबाई त्या सा-या क्षेत्रात अलिप्त इरावतींचा ग्राफ मला नेहमी वयानुरूप वाढणारा वाटतो. तर दुर्गाबाईचा वेगवेगळ्या उंचवटे आणि खोल गर्तांनी भरलेला.

प्रचंड रॅडीकल, नव्यानं मांडणी करणारा, आयुष्याचा अतिमूलभूत विचार करायला लावून सारं बदलवून टाकणारा असा विचार या दोघींनी मला दिलेल्या नाही. मात्र नेमाड्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘स्वहिताचं भान बाळगून’ सतत कामात एकाग्र राहण्याची, व्यग्र राहण्याची शिस्त आणि त्या कामाबद्दल अत्यंत नेटकेपणाची आणि निगुतीची धारणा या दोघींकडून शिकण्यासारखी आहे.

इरावतींचा अलिप्त मातृभाव, इमोशनली अस्ताव्यस्त अशा देशस्थ घरात वाढल्यामुळे मला हवासा वाटतो.तर दुर्गाबाईंचा खाष्ट तिरसटपणा आणि निस्पृहता मला आदरणीय वाटते. ज्ञानमार्गावरून चालू इच्छिणा-या बाईनं पुरुष आपला मानू नये. पोरं आपली मानू नयेत, संसार आपला मानू नये- फक्त स्वायत्तता आपली मानावी आणि ज्ञानयज्ञ निग्रहानं चालू ठेवावा हे या दोन बायांकडून शिकण्याचा माझा प्रयत्न आहे.
                         
( प्रथम प्रसिद्धी 'शब्द दीपोत्सव 2012)

8 comments:

  1. ह्म्म. दोघींचंही लेखन आवडतं, पण बरंचसं वाचलेलं नाही. वाचायला हवं आता!

    ReplyDelete
  2. लेख प्रचंड आवडला. विशेषतः दोघींमधील तुलना आणि अत्यंत मुद्दसूद बांधणीमुळे.

    ReplyDelete
  3. मनःपूर्वक धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल

    ReplyDelete
  4. सर्वप्रथम पुन्हा ब्लॉगलेखन सुरु केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आणि लेखही अप्रतिम आणि रोचक.
    साधारणतः सामान्य लोक सहज वाचन म्हणून समीक्षा फारशी वाचत नाहीत. कुरुंदकर, भागवत, दुर्गाबाई, इरावती हे टप्पे वाचनाच्या प्रवासात थोडा अभ्यासू व्यक्ती असेल तर लवकरच येतात पण त्यांना ओलांडून पुढे जायला वेळ अन कष्ट दोन्हीही लागते. आपला लेख त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

    ReplyDelete
  5. कित्येकदा तुमच्या ब्लॉगवर आल्यावर नविन काहीच लिखाण न दिसल्याने मन खट्टू व्हायचं. आणि एकदम ही मेजवानीचं दिलीत. बॅलन्स्ड आणि समर्पक तुलना. ईरावतीबाईंचं युगान्त आणि थोडं ललित लिखाण वगळता काही वाचलेलं नाही. पण दुर्गाबाईंचं लिखाण वाचून जी आदरयुक्त भिती जाणवते तिचा चेहरा तुमच्या लेखात बरोबर उमटलाय. ब्लॉगवर लिहीत रहा.

    ReplyDelete
  6. छान लिहिले आहे. अभिनन्दन.

    ReplyDelete
  7. आपल्या लिखाणात एक तरतरीत लय आहे.
    माझं वाचन मुळात तुटपुंज आहे,
    पण योगायोगाने आपण लिहिलेल्या संदर्भातल्या
    लेखकांचे थोडेफार वाचलंय म्हणुन मला लेख कळला असं म्हणता येईल.
    असो.

    आपणा पुन्हा लिहित्या झालात त्याबद्दल आपले अभिनंदन.
    नवीन काही लिहिल्यास व ते जर कळवल्यास
    अजून वाचायला नक्किच आवडेल.

    निदान आपला हा लेख तर वाचायला मिळाला.
    तर असो.

    ReplyDelete
  8. खूपच छान लेख लिहिला आहे . दुर्गा भागवत - राजा ढाले या यांच्यातील वादावरील लेख शोधताना हा लेख सापडला . आवडला .
    धन्यवाद !

    ReplyDelete