Thursday, March 8, 2012

विंगेतल्या चळवळीची वाट पाहताना...

लिंकिंग रोडवरून येताना, मी डोकं बाहेर काढून रस्ता बघत होते आणि एकदम जाणवलं की अरे, मगाचपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंला सराफांची दुकानं लागतायत. पण सोन्याच्या दागिन्यांचं एकही दुकान बाईच्या नावाचं नाही. दाणाभाई, त्रिभुवनदास भिमजी… मग स्वत:शीच हसू आलं. असल्या विचाराला 'टिपिकल स्त्रीमुक्तीवाल्यांचा विचार' म्हणून ब्रॅण्ड कसं होईल ते उमगून हसायला आलं. पण मनाचा चाळा चालू राहिला. राजमल लखीचंद, पु.ना. गाडगीळ, वामन हरी पेठे, पालशेतकर, बायकेरीकर, अष्टेकर अशी जी नावं आठवत होती त्यात बाईचं एकही नाव नाही! याची कारणं अगदी उघड आहेत. सोन्याच्या व्यवहाराला आवश्यक भांडवल कुठे होतं कधी बायकांकडे? पेशव्यांच्या काळात सावकारांनी सोनं गहाण ठेवून घ्यायला आणि पेशव्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली तशी जमिनदार ब्राह्मणांची एण्ट्री या पेशात झाली. नाहीतर हे जग खरं मारवाडी पुरूषाचं जग. पण आता, सुबत्तेच्या युगात दागिने डिझाईन करणा-या बायका असल्या तरी 'सोन्याची दुकानं' बायकांच्या नावाची नाहीत. या साध्या, 'जेंडर'मुळे होणा-या आर्थिक घटनांना तपासायचं तर या तपासण्यात 'स्त्रीमुक्तीवादी' शिक्का बसेल असं मनात तरी का आलं? की सध्याची 'मी नाही बाई फेमिनिस्ट' ही फॅशन त्याला कारणीभूत आहे का ?

ऐशीच्या दशकात महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली, फोफावली. त्र्याण्णवच्या महिला धोरणात त्या चळवळीचं प्रतिबिंबही दिसलं. मात्र आता का बरं ही चळवळ ऑल्मोस्ट नामशेष झाली? तिचं महत्त्व का कमी झालं आहे? दोन हजार दहामध्ये या चळवळीला कसं बरं तपासायचं?

दिवरालाच्या रुपकंवरचा सती-खून किंवा पुण्यातल्या मंजुश्री सारडा खून खटल्याची घटना स्त्रीमुक्तीची चळवळ लोकांपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली होती . ऐंशीच्या दशकातले हुंडाबळी इतके क्रूर होते, की स्त्रीचळवळ जर नसती तर या क्रौर्यानं कोणतं टोक गाठलं असतं ते सांगता येत नाही. सीमा साखरे, विद्या बाळ या आद्य नावांपासून ते तत्कालीन समाजात शारदा साठे, छाया दातार, ज्योती म्हापसेकर, मंगला खिंवसरा, विद्युत भागवत,  माया पंडित या सा-या नावांची आठवण येणं अपरिहार्य आहे.

मृणालताई, तारा रेड्डी, अहिल्या रांगणेकर राजकारणात होत्या मात्र पोस्ट विद्या बाळ पिढी ही स्त्रीप्रश्नांचा राजकीय अभ्यास करताना स्त्रीविषयक संघटनात्मक कामाशी बांधली गेली होती. त्यामुळे ऐंशीच्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळीनं स्त्रियांवर कुटुंबांतर्गत होणा-या अत्याचाराची बाजू मांडली तसं 'स्त्री असणं' या वास्तवाचा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींच्या संदर्भात अन्वय लावण्याचं मोठं कामंही केलं. राजकारणातल्या स्त्री नेतृत्वाच्या पलीकडचं हे काम होतं.

त्यावेळी दादा धर्माधिकारींच्या लेखनात येणारा ज्युलियट मिचेलचा रेफरन्स किंवा पुष्पा भावे, विद्युत भागवत यांनी तोरिल मुआ, केट मिलेट, मारी दाली, अँण्ड्रिआ ड्वौरकिन यांसारख्या स्त्रीवादी विचारवंतांची करून दिलेली ओळख... त्या दशकानं स्वतंत्र स्त्री-भूमिकेचा राजकीयच नाही तर ज्ञानशास्त्रीय विचारही त्यावेळी समोर आणला.

त्या ‘मिळून सा-या जणी’, ‘बायजा’ किंवा तत्कालीन समाजात, नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला ‘पॉप्युलर’ने प्रकाशित केलेल्या 'पाऊलखुणा' यासोबत स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली, फोफावली. मात्र 'मुलगी झाली हो'च्या उल्लेखाशिवाय सारं अपुरं ठरावं इतका बदल या एका नाटकानं घडवून आणला. महाराष्ट्रातल्या चळवळीच्या जागराचं श्रेय या नाटकाला जातं.

पुणेरी पेठ-घरात मोठं होताना, घरात स्वायत्त विचार मांडणं सुरू झालं, की 'तुला विद्या बाळ व्हायचंय का?' असं विचारलं जायचं. असे ते दिवस होते. आता ज्या पन्नाशीच्या आसपास आहेत त्या बायांना, ज्या साठीच्या पलीकडे आहेत त्या पहिल्या फळीच्या 'स्त्रीमुक्ती'च्या प्रणेत्यांनी कितीतरी दारं उघडून दिली होती!

परंतु दोन हजार दहामध्ये आयडियॉलॉजी हरवलेला आणि कधीतरी आक्रमक बनणारा तरूण स्त्रियांचा आवाज जो भेटतो तो असा कसा झाला? या पोरी फेमिनिझम का नाकारतात? कर्वे-फुले-आंबेडकरांची सकस पायाभरणी असूनही महाराष्ट्रातल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं भुस्कट का झालं? डाव्या चळवळीच्या एकूण अपयशाच्या कॅनव्हासवर या चळवळीचं अपयश शांत डोक्यानं तपासायला हवं.  अपयशाची मीमांसा हा 'खापर फोडण्याचा प्रयोग' नाही तर उघड्या डोळ्यांनी काय चुकलं असं वाटतंय याबद्दल मत मांडण्याचा प्रयत्न आहे.

स्त्रीस्वातंत्र्याची प्रेरणा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, गांधी-विनोबांपासून घेतली त्या आद्य पिढीनं 'स्त्रीमुक्ती'कडे फक्त रोझा लक्झेंबर्ग चष्म्यातून बघितलं नाही. गांधीबाबाचं सोपं बनिया-बेरजेचं राजकारण समजून घेत मृणालताईंनी लढे उभारले, यशस्वी केले. या लढाऊ राजकारणाची दुसरी बाजू म्हणजे दुर्गाबाईंसारखी व्यक्तिमत्त्वं होती. आधुनिक स्त्रियांच्या पहिल्या फळीतल्या स्त्रिया या आपल्या भूमिकेवर ठाम आणि स्वच्छ होत्या. त्यांच्याकडे आताच्या काळात दुर्लभ अशी वैचारिक स्पष्टता होती.

यानंतर डाव्या चळवळीतून प्रेरणा घेतलेली, पोस्ट युक्रांद जी स्त्रीवादी पिढी आली ती चळवळीच्या ऊर्जेनं भारावलेली होती. या पिढीकडं बघताना मन भरून येतं. कारण आधुनिक रोमॅंटिसिझम आणि चळवळीचं क्रूर राजकारण अशी तारेवरची कसरत या पिढीनं केली. या पिढीतल्या गौरी देशपांडेसारख्या इण्टेन्स बाईनं मग रोमॅंटिक असण्याचा ऑप्शन घेतला तर नीलम गो-ह्यांसारखी बाई राजकारणाच्या सर्व छटांना परिचित होत्साती झाली.

या सा-यात काहीशा समजूतदार, सुलभ राजकारणाची कास विद्याताई बाळांनी पकडली. मात्र विद्याताईंनंतरच्या, पुष्पाबाईनंतरच्या पिढीचा मला सॉलिड प्रॉब्लेम जाणवतो. कारण अतिशय नम्रपणे मला असं म्हणावंसं वाटतं, की त्यांच्या कन्व्हिक्शन्स कमी पडल्या आहेत. यानंतरच्या बायांना राजकारण धड समजत नव्हतं; अकॅडमिक आवेश मात्र प्रचंड होता आणि त्याच बरोबर या पिढीनं 'विंगेतून आगरकर-टाईप बाप्ये येतील का?' अशी मनोमन सतत वाट पाहिली. हे विश्लेषण माझ्या मैत्रिणीनं केलं तेव्हा मला टोचलं होतं. परंतु, स्त्रीवाद्यांनी मनोमन एका 'पूर्ण पुरूषाची' वाट पाहात अनेक प्रयोग केले, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. प्रयोग करण्यात गैर काहीच नाही, परंतु त्या प्रयोगांच्या किंमती चुकवण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली.

नावडत्या, नमककम परंतु सुस्थितीतल्या नव-यांबरोबर संसार करायचे, त्यांतल्या तळटिपेतल्या अटी न पाळता पळवाटा शोधायच्या, परंतु सुखवस्तूपणाला अ-राजकीय चिकटून राहायचं हे यानंतरच्या फोर-फ्रंटवरच्या पिढीनं केलंय. त्या दंभाचा परिणाम चळवळीवर नक्कीच झाला. तसंच कोऑपरेशनच्या नावाखाली पुरुषांसोबत प्रचंड स्पर्धा केली, त्याचाही परिणाम या चळवळीवर झाला.

स्वातंत्र्य ही अतिशय महाग वस्तू असून त्यासाठी 'स्व'ला स्टेकला लावायला लागतं. 'केवळ मटिरिअल सुबत्ता देऊ शकणारा खटारा संसार आम्ही रेटला' या त्यागात फारशी ग्लोरी नव्हती आणि तो सारा कचखाऊपणा स्त्री मुक्ती चळवळीच्या पोस्ट-विद्याताई टप्प्यात दिसतो. यांतल्या काही जणींनी बोअरिंग किंवा क्रूर संसार नाकारले. मात्र नव्या संसाराची, यशाची अपेक्षा इण्टॅक्ट ठेवूनच… त्यामुळे झडझडून स्वायत्तता किंवा स्वत:चा निर्भर आवाज त्यांना लाभू शकला नाही. पुरूषप्रधानता/पॅट्रिआर्की नाकारताना या पॅट्रिआर्कीपलीकडे उडी टाकणारे पुरूष असतीलच की... असं त्यांना मनोमन वाटत राहिलं.

त्या मानानं पुण्या-मुंबईपलीकडच्या बाया जास्त ठोस आणि शहाण्या होत्या. त्यांनी चळवळ जेव्हा स्वीकारली तेव्हा मनापासून, झोकून देऊन चळवळ उभी केली. नागपूरच्या सीमाताई साख-य़ांचं आत्मचरित्र वाचताना माझ्या डोळ्यात पाणी अालं. त्यांना राजकारण नीट उमगलं होतं.  नंतर एकीकडून तोरिल मुआचं 'सेक्शुअल अँण्ड टेक्शुअल पॉलिटिक्स' वाचणा-या बाया जेव्हा अंतिमत: 'मारूती माक्सिस्ट' बनल्या तेव्हा या चळवळीचं अस्तित्व माध्यमांपुरतंच मर्यादित झालं. म्हणूनच नंतरच्या काळातला स्त्रीलिंगी गर्भचिकित्सेचा मुद्दा चळवळीतल्या आवाजापेक्षा कितीतरी जास्त पटीनी डॉक्टरांनी व इतर एन.जी.ओ.वाल्यांनी उचलून धरलेला दिसतो. यानंतर स्त्री-मुक्तीवाद्यांच्या जास्त चर्चा 'आहे मनोहर तरी' आणि 'बंध-अनुबंध'वर झाल्या. हे कसलं लक्षण आहे?

एकीकडून स्त्रीमुक्तीची भाषा वापरणा-या नवरा-शरण बायांनी, आई म्हणून आपल्या पोरींवर कसले संस्कार घडवले? कच खाण्याचे? मटिरिअल सुबत्तेला शरण जाण्याचे की घरच्या कार्पेटखाली सारी हिपोक्रसी दडपण्याचे? नो वंडर, अशा घरातल्या मुली पुढे येऊन 'आय अँम नॉट अ फेमिनिस्ट' म्हणतात. आणि पुरूष? या दरम्यान काही समजूतदार पुरूष बदलले. चळवळवाल्या पुरूषांनी नॅपी बदलण्याचं शिक्षण घेतलं. पण मूळ ढाचा पुरूष असण्याचा फारसा बदललेला नाही. रादर, स्वतंत्र वाटणा-या बाया अधिकच कॉंन्झरर्व्हेटिव्ह निघाल्या असं पुरूषी गणित काहींनी मांडलं, जोखलं आणि वापरलंही. ते पॅट्रिआर्कीचे फायदे असे सहजी कुठे सोडणार होते?

सुपरबोअरिंग लग्नं तर नॉन-स्त्रीमुक्तीवाल्या बायकांनीही टिकवलीच होती. रादर, तीच तर परंपरा होती आपल्या देशात. मात्र त्यांनी आपल्या पोरींना लग्नात सौख्य, समाधान इत्यादी न शोधण्याचा मोलाचा धडा दिला होता. पोरांमध्ये मन गुंतवायचं, जोडलेल्या नात्यापेक्षा रक्ताची नाती जोपासायची हे बेसिक धडे या कॉंन्झरर्व्हेटिव्ह आयांचे होते. पोस्ट मॅनॉपॉझल फेजमध्ये, पोरं हाताशी आली की नव-याला डंख करण्याची एकही संधी न सोडणा-या पॉवरबाज बायका चळवळीनं घडवलेल्या नव्हत्या, तर त्या बदलत्या अर्थव्यवस्थेत स्वत:चं शहाणपण वापरून घडल्या होत्या. रेशनिंग ऑफिस, एल.आय.सी., मंत्रालयात नोकरी करून ज्यांनी आपले संसार रेटले त्यांनी आपल्या पोरींना कॉंन्झरर्व्हेटिव्ह किंवा मुक्त होण्याचे धडे दिले नाहीत. रादर, त्यांनी नोकरीतले कष्ट, त्रास पोरींना उमजू दिले. आज आय.टी.मध्ये लाखात पगार कमावणा-या पोरी त्यामुळे स्त्रीमुक्तीची भाषा बोलत नाहीत किंवा त्या उर्मिला देशपांडेसारखं 'पॅक ऑफ लाईज'ही लिहीत नाहीत.

या नव्या, स्वायत्त पोरी एकट्या परदेशी जातात, बख्खळ पैसा कमावतात, स्वत:चे फ्लॅट्स घेतात. रादर, आईला चिकटून राहतात आणि प्रत्येक नात्याला करार म्हणून स्वीकारताना स्वत:चं काय 'डील' आहे ते नीट तपासून घेतात. त्या निदान विंगेतून माझ्यासाठी आगरकर-सदृश पुरूष कधी येईल ? याची वाट तरी पाहात नाहीत! किंवा आपला पुरुष आगरकर टाइप नसणार म्हणून आपापले मार्गही शोधतात.

मात्र हे सारं शहरात घडताना जे गावात घडतंय त्याकडे सेन्सिटिव्हली कसं पाहायचं ते या कधी शिकणार? प्रश्न तर अनेक आहेत आणि माझ्यासारख्या 'ना अरत्र ना परत्र' फेमिनिस्ट बाईला चळवळ मनापासून आवश्यक वाटते. हा माझा हास्यास्पद चळवळ-नॉस्टॅल्जिआ मला समजतो, तरी हवासा वाटतो. म्हणूनच मी विंगेतल्या चळवळीची वाट बघते. एका स्त्री-पुरूष नॉनहिपोक्रिट मुक्तीची!

11 comments:

  1. Well written.  पण मोठा बदल व्हायला angry चळवळ हवी हे मागच्या शतकातल thinking नाही का? When jewelry stops being 'gold n making charge', and start becoming a design that you pay for, ritu kumars and anita dogre of branded adornment will emerge. Women buy dresses for themselves. Most women need men to buy दागिने. When that changes, the market will throw up elizabeth arden of jewelers in india.You don't need an angry upset to cause change in the new millennium. When Korum Mall tries an all girls parking lot, I see revolution. When dirty picture and ishqiya make money without a man in the lead, thats revolution. When carts become mechanized and women can be porters at airports, thats change. When women come into panchayats and more women vote in rural UP than men, that's huge to me. Paanivaali bai and laatne motcha or special schools for ablaa women is obsolete to my liberal eyes. If every year, more girls get distinction in ssc than boys, 'men in trouble' is the writing on the wall in the knowledge economy, according to me.Emphatic evolution will always proven to be stronger and durable in nature and society is my view. Neither nature, nor society is in a hurry. Nor do they have sympathy for the angst of a generation in transition......like ours....

    ReplyDelete
  2. ८० च्या दशकात वाढलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं जे काही झालं आहे ते खरोखरच खेदजनक आहे. अर्थात हे वाक्य ‘स्त्रीमुक्ती चळवळ’ याच्या जागी ‘दलित चळवळ’, किंवा एकंदरित ‘डावी चळवळ’ असं काहीही घातलं तरी सत्य आहे. हेही खेदजनकच आहे.
    पण तरीही चळवळ ही हवीच! कोणत्याच गोष्टी आपोआप सुरळित होत नाहीत. उलट आपोआप विस्कळित होण्याकडेच गोष्टींचा कल असतो हा नियमच आहे. अगदी दामोदरनी दिलेल्या उदाहरणांचं पाहिलं तरीही त्यामागे चळवळच आहे. आज कमावत्या स्त्रिया हा बाजारपेठेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक आहे. पण स्त्रिया शिकणं, कमावत्या होणं हे चळवळीमुळेच साध्य झालेलं आहे. पंचायती राज्यात स्त्रियांना स्थान मिळणं यामागेही चळवळच नाही का?
    तरीही स्त्रीमुक्ती चळवळीचं आज हे असं का झालंय? मान्य की पूर्वीच्या चळवळीतल्या बायांच्या मुलींना फेमिनिस्ट म्हणवून घ्यायला लाज वाटते, असेल. पण ज्यांच्या आया फेमिनिस्ट नव्हत्या अशा असंख्य मुलींचं काय? ज्या आयटीमध्ये लाखलाख पगार घेत नाहीत, परदेशी फिरत नाहीत, ज्यांना फ्लॅट्स घेता येत नाहीत अशा? त्यांच्यात अशा अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, काही करावंसं वाटणाऱ्या मुली नाहीत?
    अर्थातच आहेत. आणि त्यांना काही करावंसंही वाटतं. माझ्या आजूबाजूला अशा कितीतरी मुली मला दिसतात. पण आज त्यांना अलगद झेलायला असंख्य एनजीओ तयार आहेत. खरंच, माझं म्हणणं कदाचित एकांगी वाटेल, पण यात अतिशयोक्ती नाही. पूर्वी ज्या मुली एकत्र येऊन मुलगी झाली हो सारखं नाटक का होईना पण गावोगावी फिरून करायला तयार झाल्या असत्या अशा कित्येक मुली आज कसलेसे सर्व्हे करून गुळगुळीत रिपोर्ट तयार करणं आणि एनजीओंच्या कार्यालयातल्या खोट्या खोट्या समानतेच्या वातावरणात समाधानी राहणं हे करत आहेत. आणि यांची संख्या प्रचंड आहे – प्र.चं.ड.!
    अशा वेळी चळवळीमध्ये मनुष्यबळ येणार कुठून?

    अनघा

    ReplyDelete
  3. गोळीबंद आढावा. याहुन चांगले मांडलेले मी तरी वाचले नाहीये.
    झरझर सगळी चळवळ डोळ्यापुढुन सरकली. विस्मृतीचित्रांवरील धूळ पुसली गेली.
    अनास्थेबाबत सहमत आहे.
    तरीही अजून सम्यक होऊ शकला असता लेख.

    रैना

    ReplyDelete
  4. माझा तुम्ही ज्या चळवळींचा उल्लेख केलाय त्याचा फार अभ्यास नाही हे नमूद करतो. पण मुळात कुठलीही चळवळ संपून ती जगायची पद्धत बनली पाहिजे, हा तिचं कितीही शोकात्म वाटलं तरी यशस्वी होण्याचा एकमेव मापदंड आहे असं मला वाटतं. आणि दुसरी म्हणजे 'identity'बाबतच्या ज्या चळवळी आहेत त्याचा पाय मुळात व्यक्ती म्हणून समाजाच्या किती घटकांना जाग आहे यात आहे. अंधानुकरण म्हणून नाही पण अभ्यास म्हणून जर युरोपिअन प्रबोधानाकडे पाहिलं तर असं दिसतं कि व्यवस्थेचा अंकित माणूस हे गृहीतक जाऊन व्यक्ती ही मुलभूत संकल्पना उदयाला आल्यावरच पुढचे बदल घडले आणि तेही सावकाश. मुळात बदल पचवण्याची मानसिकता आणि सामाजिक अवहेलना झेपण्याची कुवत ह्या दोन गोष्टी सुद्धा चळवळींच्या समांतर जन्माला यायला हव्यात. आणि ह्या दोन गोष्टी आर्थिक उन्नती आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांच्याशी निगडीत आहेत. कारण चळवळींना नुसता पाठीवर हात असून उपयोग नाही, त्यातल्या नवे काही जगू पाहणाऱ्यांना पोसताही आले पाहिजे. आणि त्यासाठी विचार समजू शकणारा आणि मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची मानसिक आणि आर्थिक ताकद असलेला गट बनला पाहिजे. थोडक्यात आर्थिक प्रगती होत असलेल्या समाजात व्यक्तीस्वातंत्र्य आणि त्याच्या पुढच्या identity चे स्वातंत्र्य अधिक ठळकपणे उमटू शकते.
    ज्या चळवळींचा संदर्भ या पोस्टमध्ये आहे, त्या बाबतीत असं वाटतं कि त्यांचा जेवढा वैचारिक पाया होता, त्या करणाऱ्यांनी जेवढा माणसाच्या असण्याचा मुलभूत विचार केला होता तेवढ्या त्या सुफळ झाल्या असाव्यात. अर्थात माझा यातला अभ्यास मर्यादीत आहे. दुसरं असं असावं कि मुळात आपल्या बदलांकडे पाहण्याच्या अपेक्षा जरा जास्तच वेगवान झाल्या आहेत. तुम्ही गावाकडच्या स्त्रियांचा उल्लेख करताना बचत गटाच्या चळवळीतून होणारे बदल मांडले नाहीत. बचत गटांच्या अभ्यासात अनेक ठिकाणी बदल दिसतात. अर्थात ते क्रांतिकारक नाहीत, पण उत्क्रांतीकारक नक्कीच आहेत. आणि वर म्हटलं तसं ते व्यक्ती स्वातंत्र्य आणि आर्थिक अवस्था यांच्या सापेक्ष पाहीले पाहिजेत. बचत गटांची चळवळ ही थेट तुम्ही म्हणता ती चळवळ नसेल पण ती बदल घडवते आहे हे नक्की.
    चळवळ म्हणजे तरी नेमकं काय? तिचं फॉर्म कायम एकच राहील का? व्यवस्था 'बाई'म्हणून अन्याय करत असताना तिच्याविरुद्ध बोलणाऱ्या मुला-मुलींची संख्या आज नक्कीच जास्त आहे, संख्या आणि प्रमाण दोन्ही. पण कदाचित त्याचे हे विरुद्ध जाणे तितके जाणवत नसावे कारण व्यवस्थाही बदलली आहे. आणि ही मुलं- विशेषतः मुली नुसत्याच सर्वे करून गुळगुळीत कागदांवर रिपोर्ट लिहित नाहीत हे मी अनुभवाने सांगू शकतो. पण जे शहरात आहेत ते गावांच्या समस्या का बघत नाहीत हे रडणं थोडं बाळबोध आहे. 'गाव' ही जी काही सिस्टीम आहे त्यात मुळातच व्यक्ती हा घटक दबलेला आहे. पिढ्यान-पिढ्याच्या आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक 'ताकदी'च्या नात्यांवर उभ्या सिस्टीममध्ये बदल घडावेत अशी अजून किती वर्ष अपेक्षा आपण बाळगणार आहोत? तिला पर्यायी, तिच्यापेक्षा अधिक स्पेस देणारी 'शहर' सिस्टीम उभी करणं हाच least worst पर्याय आपल्याकडे आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि आर्थिक बदल हे गावांच्या चौकटीत घडतील हे दिवास्वप्न आहे. शहरीकरण ( cliche) कितीही कुरूप असले तरी ते व्यक्तीला तिच्या कुवतीच्या आविष्काराची संधी नक्कीच जास्त देतं. तेच तर हवंय ना आपल्याला?

    ReplyDelete
  5. gaon patliwar khoop kam have aahe.

    ReplyDelete
  6. एकीकडून स्त्रीमुक्तीची भाषा वापरणा-या नवरा-शरण बायांनी, आई म्हणून आपल्या पोरींवर कसले संस्कार घडवले? कच खाण्याचे? मटिरिअल सुबत्तेला शरण जाण्याचे की घरच्या कार्पेटखाली सारी हिपोक्रसी दडपण्याचे?
    ......
    स्त्रीवाद्यांनी मनोमन एका 'पूर्ण पुरूषाची' वाट पाहात अनेक प्रयोग केले, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. प्रयोग करण्यात गैर काहीच नाही, परंतु त्या प्रयोगांच्या किंमती चुकवण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली.

    नावडत्या, नमककम परंतु सुस्थितीतल्या नव-यांबरोबर संसार करायचे, त्यांतल्या तळटिपेतल्या अटी न पाळता पळवाटा शोधायच्या, परंतु सुखवस्तूपणाला अ-राजकीय चिकटून राहायचं हे यानंतरच्या फोर-फ्रंटवरच्या पिढीनं केलंय..

    no one can deny this.. whats the solution?

    ReplyDelete
  7. Your blog and responses bring to fore the contradiction between the outwardly progression of women,and the angst which persists. Women are doing this, and doing that.., arre pan ghari aalya war swayampaak tichya kadunach apekshit ahe naahi ka? You have very correctly spoken about the rural disconnect :women-folk forgotten in the debates. It's the same story- our 'afsaney' concern only a miniscule middle-class minority of the population. And yes this also applies to the misplaced notions of Marathi-hood, highlighted admirably in your blog dated 1st November 2011. On both the issues-we Narmada-kinaare-waalas really admire Medhatai.

    ReplyDelete
  8. great... या पोरी खैरलांजीतल्या प्रियंकासाठी रस्त्यावर उतरणारच नाहीत का? this question is very important, but not for only them...?

    ReplyDelete
  9. It is thought provoking at the end . Every Year I really enjoy your visit at Borivili for Shabdda Gappa
    Programme.

    ReplyDelete